बरीच वर्षं श्रीलंकेला जाण्याचं मनात होतं. शेवटी गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘बियॉण्ड वाइल्ड' संस्थेच्या निसर्ग अभ्यास सहलीत डॉ. पराग आणि ३० निसर्गप्रेमी सहप्रवासींसमवेत प्रत्यक्ष योग आला. विमानाने चेन्नईमार्गे कोलंबोला पोचलो. एका खासगी आरामगाडीने पुढचा प्रवास सुरू झाला. बरोबर गाइडही घेतला गेला. त्याचं नाव आयेश बुद्धिका. तो एम.ए. हिस्टरी आहे हे समजल्यावर आनंद झाला. तो खूप बोलका, मनापासून माहिती सांगणारा होता.
आमचा पहिला मुक्काम पश्चिम किनारपट्टीवरच्याच नेगोंबो या गावात असणार होता. हे ठिकाण कोलंबोच्या उत्तरेला सुमारे सव्वाशे किलोमीटरवर आहे. नेगोंबोला पोहोचून जेवण, विश्रांती झाल्यावर एका कालवा भ्रमंतीसाठी बाहेर पडलो. डचांनी आपल्या कारकिर्दीत नेगोम्बोजवळ जलवाहतुकीसाठी सुमारे २०० मीटर लांबीचा एक कालवा खणला होता. हल्ली या कालव्यातून फिरवून आणण्याची व्यवस्था आहे. बोटीतून जाताना डेकवर उभं राहून आम्ही निरीक्षण सुरू केलं. फोटो काढणं तर अखंड चालूच होतं. काही खारफुटी वनस्पती तुरळकपणे दिसल्या. अनेक जातींचे जलपक्षी दिसले. करकोचे, पाणकावळे, बगळे, हेरॉन्सच्या काही जाती आणि ‘सी गल्स' भरपूर होते. विशेष म्हणजे भारतात फक्त पूर्व किनाऱ्यावर बघायला मिळणारा एक दुर्मिळ प्राणी दिसला, तो म्हणजे ‘एशियन वॉटर मॉनिटरी लिझर्ड' ऊर्फ ‘पाणघोरपड'.
संध्याकाळच्या बैठ्या चर्चासत्रात आयेशकडून आणखी माहिती मिळाली. श्रीलंकेचं हवामान एकंदरीत विषुववृत्तीय पट्ट्याचं असून त्याचे तीन भाग पडतात. एक म्हणजे समुद्रकिनाऱ्याजवळील उष्ण आणि दमट हवामानाचा सखल भाग. दुसरा, मध्यभागी असलेला डोंगराळ प्रदेश. हा जास्त पावसाचा, पण तुलनेने थंड हवामानाचा. या दोन्हींमधला विभाग कमी दमट, पण हवामान गरमच. विषुववृत्तीय हवामानामुळे इथे सर्वत्र हिरवंगार दिसत असलं तरी त्यामध्ये नैसर्गिक जंगल फारच कमी आहे. वृक्ष लागवड अधूनमधून दिसून येते. १८७० सालापर्यंत श्रीलंका हा कॉफीची निर्यात करणारा प्रमुख देश होता. पण त्यानंतर कॉफीच्या झुडुपांवर तांबेरा प्रकारचा रोग पडला. पाहता पाहता कॉफी पूर्णपणे नष्ट झाली. मग एकोणिसाव्या शतकात इंग्रजांनी चहाची लागवड यशस्वी करून दाखवली. आज सुमारे ४०,००० एकर क्षेत्रावर चहाचे मळे आहेत. पर्यटकांना हिरव्यागार चहाच्या मळ्यांची सुंदर हिरवाई सुखावून टाकते; पण आमच्यासारख्या निसर्ग अभ्यासकांना त्यामध्ये अतिमहत्त्वाच्या जंगल परिसंस्थांचा संपूर्ण विनाश अस्वस्थ करून टाकत होता.
श्रीलंकेचे सुमारे ९८ टक्के नागरिक साक्षर असून त्यांना सिंहली भाषा त्याचप्रमाणे इंग्रजीही येतं, हे ऐकल्यावर आम्हाला आश्चर्यच वाटलं. आयेश काही गोष्टींची अतिशयोक्ती करत असावा असंही वाटून गेलं. तो एम.ए. असूनही त्याचं इंग्रजी फारच अशुद्ध होतं. तो आत्यंतिक देशप्रेमी आणि बौद्ध धर्माभिमानी (काही वेळेला दुरभिमानी) होता. तो प्रचंड अंधश्रद्धाळूदेखील वाटला. त्याने ठामपणे असं सांगितलं, की ‘मोठमोठे स्तूप उभारल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढतं. श्रीलंकेतील विपुल पर्जन्यवृष्टीचं रहस्य बौद्ध धर्माचा प्रसार, पगडा आणि प्रगत स्थापत्यशास्त्र हेच आहे'. आता बोला!
हेही वाचा - उगवत्या सूर्याचं अरुणाचल
पुढचं मुक्कामाचं ठिकाण ‘पोलोन्नारुवा हेरिटेज साइट' हे होतं. पोलोन्नारुवा ही चोला राजांची राजधानी. रस्त्यात जिकडे पाहावं तिकडे सर्वत्र चहाची एकसुरी लागवड दिसत होती. रस्त्याकडेने आणि चहाच्या मळ्यांच्या हद्दीवर काही वृक्ष दिसत होते. बाकी सगळीकडे चहा एके चहा! वाटेत एका ठिकाणी एक हरिण दिसलं- स्पॉटेड डिअर तथा चितळ. त्यावरून इथल्या प्राणिजीवनाचा विषय निघाला. आयेशच्या सांगण्यानुसार अजूनही काही भागांत विपुल प्राणिजीवन आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्याने आपल्याकडच्या वहीतली आकडेवारी वाचून दाखवली. त्यात हत्तींची संख्या सुमारे तीन हजार लिहिलेली होती. मी एके ठिकाणी वाचलेलं आठवलं, की श्रीलंका हा हत्तींचा देश आहे, आणि हत्तींची एकूण संख्या सुमारे २०,००० असावी. आयेशने अभिमानाने आणि तत्परतेने हा आकडा नोंदवून ठेवला. त्याने सांगितलं, की साऱ्या जगात कुठे नसलेलं असं हत्तींचं अनाथालय श्रीलंकेत ‘पिनावला' इथे आहे. मी त्याला ऐकवलं, की भारतात, पुण्यात प्राण्यांसाठीचं अनाथालय आहे, तेव्हा तो खजील झाला. श्रीलंकेत, विशेषत: हत्तींच्या अनाथालयातही हत्तींच्या शेणापासून कागदनिर्मिती केली जाते, ही गोष्ट मात्र फारच गमतीशीर वाटली.
पोलोन्नारुवाला पोचलो. पोलोन्नारुवा राजवटीचा काळ म्हणजे श्रीलंकेतील कृषी क्षेत्रासाठी सुवर्णकाळ होता. त्याचं श्रेय मुख्यत: विजयबाहू राजाकडे जातं. त्याने अभियांत्रिकी करामतच म्हणता येईल असं प्रचंड मोठं सरोवर निर्माण केलं. त्याला नाव दिलं ‘पराक्रम समुद्र'. त्याचं उर्वरित काम राजा पराक्रमबाहूच्या कारकिर्दीमध्ये झालं. त्या सरोवरातून कालवे काढून शेतीला पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे शेतीची भरभराट घडून आली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलोन्नारुवा कालखंडात बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा मिलाफ घडवून आणला गेला. दक्षिण भारतीय स्थापत्यशास्त्राला अनुसरून दगडी हिंदू मंदिरं बांधण्यात आली. त्याचबरोबर बौद्ध धार्मिक स्थानं आणि प्रचंड मोठ्या राजवाड्याचं बांधकाम विटांचा उपयोग करून केलं गेलं.
पोलोन्नारुवापासून जवळच उंच डोंगरावरील राजवाड्याचे अवशेष पाहण्यासाठी सुमारे १२०० पायऱ्या चढून जावं लागतं. ते अवशेष पाहिल्यावर राजवाड्याच्या अतिभव्यतेची कल्पना येते. दोन मजल्यांपर्यंतच्या जाडजूड भिंती शिल्लक उरल्यात. त्यातील काही भिंतींची जाडी १० फुटांपेक्षा जास्त होती. या राजवाड्यात सुमारे १००० दालनं किंवा खोल्या होत्या असं सांगितलं जातं.
भोजनोत्तर एक ‘बाटिक' कारखाना व विक्रीघर पाहायला गेलो. तिथे बाटिकची सर्व प्रक्रिया पाहायला मिळाली. या ठिकाणी एक बाई आमच्यापैकी इच्छा असलेल्या एकेकाला त्याला शोभेल असा ड्रेस घालून किंवा नेसवून दाखवायला लागल्या. पाहता पाहता आमच्यातल्या अनेकांनी विविध प्रकारचे कपडे नेसवून किंवा घालून घेतले. त्या सर्वांना एका छोट्या स्टेजवर उभं करून फोटो काढण्यात आले. धम्माल मजा आली! परिणामी, त्या ‘मॉडेल्स'पैकी बहुतेकांनी ते कपडे विकत घेतले! किमती बऱ्याच होत्या. दुकानदारीचा (सेल्समनशिप) हा प्रकार आम्हाला आवडला.
हेही वाचा - सीएसटी स्टेशनची हेरिटेज टूर - मुंबईवरची प्राचीन कविता
त्यानंतरचं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे कँडी. पोलोन्नारुवानंतरची श्रीलंकेची राजधानी. सिंहली भाषेतलं मूळ नाव होतं ‘खंड उड राट'! त्याचा अर्थ टेकड्यांनी वेढलेलं गाव. त्याचं ब्रिटिशांनी केलेलं सुटसुटीत नाव कँडी. श्रीलंकेच्या मध्यभागी असलेल्या पर्वतावर ते वसलेलं असल्यामुळे विषुववृत्तीय पट्ट्यातलं असूनही मस्त उत्साही थंड हवामान. कँडीला जाताना वाटेतली हिरवाई, डोंगरदऱ्या आणि धबधबे यामुळे प्रसन्न वाटतं. कँडीच्या परिसरात सर्व बाजूंनी वेढलेल्या आणि चहाच्या मळ्यांमुळे हिरव्यागार झालेल्या टेकड्या दिसतात. मधोमध विस्तीर्ण जलाशय असून त्यामध्ये जलविहाराची सोय आहे. हवामानाच्या दृष्टीने ब्रिटिशांना अतिशय आवडणारं राजधानीचं हे शहर. तरीही दर्यावर्दी ब्रिटिशांनी नंतर समुद्रकिनारी कोलंबो इथे राजधानी वसवली. आज नवी राजधानीही कोलंबोजवळच आहे.
उपनगरच म्हणण्याजोग्या कँडीजवळच्या पॅरेडेनिया नामक ठिकाणी विस्तीर्ण रॉयल बोटॅनिकल गार्डन आहे. ते पॅरेडेनिया बोटॅनिकल गार्डन या नावानेही ओळखलं जातं. १८व्या शतकात श्रीलंकेच्या त्या वेळच्या राजांनी हे उद्यान निर्माण केलं. उद्यानाची प्रवेश फी फारच ‘भारी' होती. किती? तर १५०० रुपये! अर्थात हे श्रीलंकन रुपये. भारतीय चलनात त्याचे होतात ६०० रुपये. लहानपणापासून कानावर पडत आलेलं एक विधान आठवलं- लंकेत सोन्याच्या विटा असतात, पण एका वेळच्या ‘हजामती'ला एक वीट द्यावी लागते!
उद्यानाची पांढरीशुभ्र प्रवेशद्वाराची इमारत शोभिवंत आहे. पण त्यापेक्षाही आम्ही सुखावून गेलो ते चार-पाच ‘उर्वशी' नावाच्या भरभरून फुललेल्या अतिसुंदर वृक्षांमुळे. मूळच्या म्यानमारच्या या वृक्षाचं इंग्रजी नाव आहे ‘जॅपनीज डान्सिंग डॉल्स ट्री'. त्याच्या नारिंगी-लाल तजेलदार फुलांचा आकार कल्पनातीत चमत्कृतिपूर्ण आहे. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या नाचणाऱ्या बाहुल्या वाटणारी अनोखी फुलं!
आत गेल्या गेल्या विस्तीर्ण आकाराच्या हिरवळीमुळे आपण डोळे विस्फारून पाहतच राहतो. कारण ही हिरवळ नेहमीप्रमाणे चाकोरीबद्ध आकाराची आणि सपाटीकरण करून केलेली नाही; काहीशी अनियमित, साधारण लंबगोल वाटणाऱ्या आकाराची आणि चढ-उताराच्या जमिनीवर केली गेली आहे.
या बागेत प्रचंड मोठ्या आकाराचे कडुलिंबाचे वृक्ष पाहायला मिळाले. बागेतच केवळ नाही तर इतरत्रही, अगदी समुद्रकिनाऱ्याजवळही कडुलिंबाचं अस्तित्व खटकत होतं. कारण कडुलिंब हा उष्ण व कोरड्या हवेतला वृक्ष आहे. आपल्याकडे तो पर्जनछायेच्या, कमी पावसाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. मुंबई परिसरात, कोकणात तो अभावानेच आढळतो. पुणे, नगर, सोलापूर भागात महाकाय वृक्षसुद्धा सर्वत्र दिसतात. असो. अधिक अभ्यासाची गरज मनोमन नोंदवून ठेवली.
‘कैलासपती'चे भरभरून फुललेले, फळांनी लगडलेले वृक्षही लक्ष वेधून घेत होते. हा मूळचा वेस्ट इंडिजचा वृक्ष आहे. याचं इंग्रजी नाव ‘कॅनन बॉल ट्री', तोफगोळ्याचं झाड. मोठमोठी, गोल गरगरीत, कठीण कवचाची फळं मुख्य खोडालगतच आखूड फांद्यांना लटकलेली दिसतात. त्या फळांचा उपयोग तर शून्यच; पण एखादं फळ पडून फुटलं तर त्याच्या गराचा कमालीचा घाण वास पुढे काही दिवस येत राहतो. त्याच्या फुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण चमत्कारिक रचनेमुळे आपल्याकडे त्याला शिवलिंगी, कैलासपती, गौरीपती, नागलिंगम अशी नावं दिली गेली. त्याला धार्मिक महत्त्वही प्राप्त झालं आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या आणखी एका परदेशी वृक्षाची भर पडली!
धूप, गर्जन, अंजनी, जंगली बदाम अशा दक्षिण भारतातही दिसणाऱ्या वृक्षांची वाढ इथे उत्तुंग वृक्षांच्या रूपाने दिसत होती. आंब्याच्या मोठमोठ्या वृक्षांना आंबे लागलेले दिसत होते. श्रीलंकेत सर्वत्र आम्रवृक्ष फळांनी लगडलेले असल्यामुळे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक वृक्षाचं फक्त वनस्पतिशास्त्रीय नाव आणि इंग्रजी नाव (असल्यास) लिहिलेल्या पाट्या साधारण डोळ्यांच्या पातळीवर लावलेल्या होत्या. वनस्पतिशास्त्रीय नावांची सर्व अक्षरं कॅपिटल टाइपमध्ये लिहिलेली होती. ही अगदीच चुकीची पद्धत आहे. नियमानुसार प्रजातिनामाचं फक्त पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये असण्याची आवश्यकता आहे. त्यांना पत्र लिहून कळवायला पाहिजे इतकी ती नियमबाह्य गोष्ट आहे.
उंच-सखल परिसराच्या एका टेकाडावरच्या पठारावर चढून गेलो. समोर मध्यभागी एक महावृक्ष दिसला. उंचच उंच सरळ वाढलेलं धिप्पाड खोड; पन्नासएक फुटांपर्यंत शाखाविरहित. त्यावर शाखा-उपशाखा आणि हिरव्यागार पर्णशोभेने नटलेला. नाव वाचून मी मोठ्याने ओरडून सगळ्यांना बोलावून घेतलं. ड्युरियो झेबॉथिनस. सामान्य इंग्रजी नाव ड्युरियन. याची खाद्यफळं असतात. पण आत्ता फुलं-फळं नसलेला भव्य वृक्षराज हा मूळचा जावा, सुमात्रा, बोर्निओ परिसरातला रहिवासी. वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासात याला मोठंच आगळंवेगळं स्थान आहे. त्याच्या जवळच त्याच्याशी उंचीची स्पर्धा करणारे सूचिपर्णी वृक्षजातींचे दोन वृक्ष होते. एक म्हणजे ‘ख्रिसमस ट्री'ची एक दुर्मिळ दक्षिण अमेरिकन जात आणि दुसरा अगॅथिस रोबस्टा नामक उत्तर अमेरिकन जंगलाचा रहिवासी. थोडं खाली उतरून पुढे गेल्यावर विस्तीर्ण हिरवळीच्या मधोमध एखादं हिरवं टेकाड वाटावं असं प्रचंड मोठं अजब झाड दिसलं. हा ‘विलो'चा एक दुर्मिळ प्रकार आहे. तिथे लिहिलेल्या माहितीफलकावरून समजलं त्याचं नाव- ‘जायंट जावा विलो ट्री'. विलोचं वनस्पतिशास्त्रीय प्रजातिनाम ‘सॅलिक्स'. भारतातली सॅलिक्सची खूप ठिकाणी आढळणारी जात म्हणजे वाळुंज.
हेही वाचा - तेजोनिधी लोहगोल
जगातल्या विविध देशांतून आणून लावलेल्या वृक्षजातींची एकूण संख्या समजल्यावर आम्ही आश्चर्यचकितच झालो. किती? तर सुमारे चार हजार! त्यातले काही वृक्ष जगभरातल्या मान्यवर नेत्यांच्या हस्ते लावले गेल्याचीही नोंद आहे. त्यामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट पंचम जॉर्ज, ग्रीसचा राजा, रशियाचा झार आणि आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा समावेश आहे.
आशियातल्या सर्वांत मोठ्या असलेल्या या जगप्रसिद्ध उद्यानात पामच्या म्हणजे ताडामाडाच्या कुळातल्या सुमारे २०० जाती आहेत. त्यातल्या काहींची लागवड ‘ॲव्हेन्यू ट्रीज' म्हणून केली गेलीय. उदाहरणार्थ, ‘रॉयल पाम ॲव्हेन्यू', ‘पामिरा पाम ॲव्हेन्यू', ‘कॅबेज पाम ॲव्हेन्यू' आणि ‘डबल कोकोनट ॲव्हेन्यू' अशी रस्त्यांची नावं आहेत. डबल कोकोनट ही काही नारळाची जात नाही. न्यूझीलंडजवळच्या सिचिलिस बेटावरच्या या पामवृक्षाची बी ही जगातली सर्वांत मोठी बी समजली जाते. दोन मोठी शहाळी एकमेकांना जोडली गेल्यासारखं याचं फळ दिसतं. त्याचं वजन जवळजवळ ३० किलो इतकं असू शकतं! त्याच्या जवळच रुद्राक्षाचं झाडही पाहायला मिळालं. त्याला चकचकीत निळसर फळंही लागलेली होती. म्यानमारच्या महाबांबूची प्रचंड उंच बेटंही लक्ष वेधून घेत होती. त्याचं शास्त्रीय नावच मुळी बांबुसा जायगॅन्शिया. या हिरव्यागार गुळगुळीत बांबूची जाडी एक फुटापेक्षा जास्त आणि उंची शंभर फुटांहून अधिक आहे! आसाममध्येही हा बांबू आढळतो. त्याच्या कांडाच्या पोकळीत पाणी साठवतात; इतकंच काय, भातही शिजवतात हे मी पाहिलेलं होतं.
पॅरडेनिया गार्डनमधला जगभर गाजलेला आहे तो ‘ऑर्किड गार्डन'चा विभाग. त्याला ऑर्किडेरियम म्हणतात. त्यामध्ये एक फेरफटका मारून आलो. तिथे फारच थोडी ऑर्किड्स फुललेली होती, वैचित्र्यपूर्ण आकारांनी आणि रंगसंगतीने नटलेली होती. जगातलं हे सर्वांत मोठं ऑर्किड गार्डन आहे. त्यातल्या सर्वांत मोठ्या आकाराची फुलं असणाऱ्या जातीविषयी वाचून माहिती होतं. ते कुठे दिसतंय का म्हणून आमच्या नजरा भिरभिरत होत्या, पण ते पाहायला मिळालं नाही.
आणखी दोन गमतीदार झाडं पाहायला मिळाली. छोटेसेच वृक्ष. त्यापैकी एकाचं नाव आहे ‘कँडल ट्री', अर्थात मेणबत्तीचं झाड. त्याची लांब फळं हुबेहूब मेणबत्तीसारखी दिसतात. दुसऱ्या झाडावर काही पिवळ्या-तांबड्या रंगाचा शिडकावा असलेली, थेट हॅटच्या आकारासारखी दिसणारी फुलं दिसत होती; मात्र अगदी कृत्रिम वाटणारी ही ‘नेपोलियन हॅट फ्लॉवर्स!' त्यापलीकडे एक भला मोठा वृक्ष आपल्या मोठ्या, काहीशा गोलसर पानांमुळे लक्ष वेधून घेत होता. जवळ जाऊन, माना वर करकरून पाहिलं तर पानं कमळाच्या पानांसारखी दिसत होती. बुंध्यावरचा फलक तेच सांगत होता- फायकस निम्फीफोलिया. वड-पिंपळाचा सख्खा भाऊ. जणू ‘कमळपानी पिंपळ'च म्हणा ना!
बागेत सर्वत्र सौंदर्यवर्धनासाठी, नेत्रसुखासाठी अगणित सुंदर सुंदर फुलझाडं, वेली आणि ताटवे यांची कलात्मक योजना केलेली होती. बोगनवेलीच्या तर असंख्य जाती विविध रंगांच्या फुलांची उधळण करत होत्या. लहान-मोठ्या जलाशयात निळी-जांभळी गुलाबी कमळं डुलत होती. बागेमध्ये बऱ्यापैकी पक्षिजीवन दिसत होतं. वटवाघळं आणि माकडं तर खूपच होती. पोपटांचे थवे इकडून तिकडे उडत होते. संपूर्ण बाग काही आम्ही हिंडून पाहू शकलो नाही. एक तर पाय बोलू लागले होते आणि दुसरं म्हणजे पोटात कावळे कोकलू लागले होते! अनेक ठिकाणी चहापाण्याची सोय होती. चहा-कॉफीपान करून बागेचा निरोप घेतला.
भोजनोत्तर आम्ही आमचा मोर्चा जगप्रसिद्ध ‘टेम्पल ऑफ टूथ'कडे वळवला. हे कँडीचं सर्वाधिक महत्त्वाचं अतिप्रसिद्ध ठिकाण. त्याला जागतिक वारसावास्तूचा गौरवही प्राप्त झालेला आहे. या मंदिरात महात्मा गौतम बुद्धांचा एक दात ठेवलेला आहे. तो अतिशय पवित्र मानला जातो. त्याबद्दल आयेश तर अतीव भक्तिभावाने रंगात येऊन बोलत होता- “या परिसरात मंदिरापेक्षा कमी उंचीवर कोणत्याही बांधकामाचा पाया खणायचा नाही. त्याच्यापेक्षा कोणत्याही बांधकामाची उंची जास्त असता कामा नये. त्यावरून किंवा त्याच्यापेक्षाही जास्त उंचीवरून विमान किंवा हेलिकॉप्टर उडवायचं नाही. पक्षीही त्यावरून उडत नाहीत! मूळ दात हस्तिदंती कुपीत, सोन्याच्या आवरणात गुंडाळून एका सुवर्णकमळात ठेवलेला आहे. ते कमळ सोन्याच्या मखरात बसवलं असून त्याच्यावर आणखी सात मखरांचं आवरण आहे. त्या मखराचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक जगभरातून येत असतात. जगप्रसिद्ध ताजमहाल आणि ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'ला जेवढे पर्यटक भेट देतात, त्याहून जास्त संख्येने दरवर्षी इथे येतात.” पाणी पिण्यासाठी आयेश थांबला. आमच्या ‘करमणुकीत' थोडासा व्यत्यय आला!
हेही वाचा - कातळशिल्पं : कोकणातलं दुर्लक्षित नवल
विभूतिपूजेच्या, मूर्तिपूजेच्या विरुद्ध असणाऱ्या, सर्वसंगपरित्याग केलेल्या महात्म्याच्या दंतावशेषाचं माहात्म्यकथन पुढे चालू झालं : “दर पाच वर्षांनी सगळी मखरं उलगडून, कुपी उघडून दाताचं दर्शन दुरून दिलं जातं. त्याचप्रमाणे एखादी अतिमहत्त्वाची व्यक्ती आली तर अधेमध्येही त्यांना दंतदर्शन घडवून आणलं जातं. गेल्या वर्षी तुमचे पंतप्रधान मोदीजी आले होते, त्यांनाही दात दाखवला होता.” आमचे दात दिसू नयेत याचा कसोशीने प्रयत्न करावा लागत होता. “त्या वेळी मोदीजींचं विमान चुकून क्षणभर दंतमखरापेक्षा जास्त उंचीवरून गेलं होतं. परिणामी, ते नादुरुस्त झालं, मोडून पडलं. इतकं, की त्याचे सर्व भाग सुटे करून दुसऱ्या विमानाने भारतात पाठवले गेले!”... आयेशच्या समाधीचा भंग पावला ते आम्ही कडक सिक्युरिटीच्या दरवाज्यापर्यंत पोचल्यामुळे.
विमानतळापेक्षा जास्त काळजीपूर्वक तपासणीच्या सोपस्कारानंतर पुढे खंदक ओलांडून आणि बऱ्याच पायऱ्या चढून मंदिर प्रांगणात पोचलो. मागे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दर्शनोत्सुक पावला-पावलावर नतमस्तक होत होते. भव्य, शुभ्र रंगाचं मंदिर. नक्षीदार सोनेरी महाद्वार. ठिकठिकाणी बुद्धाचे लहान-मोठे पुतळे. त्यांच्यापुढे दंडवत घालणारे भाविक. वाद्यांचा आणि प्रार्थनांचा कोलाहल वाटण्याजोगा गजर. मध्ये मध्ये स्वयंसेवक, मार्गदर्शक रस्ता दाखवत पुढे चलण्याची घाई करत असलेले. एखाद्या सम्राटाच्या राजवाड्याला लाजवेल असं सुशोभन आणि डोळे दिपवणारी रोषणाई. शेवटच्या पायरीनंतर अर्धलंबकाकृती ‘मून स्टोन' आणि त्यावर विविध भौमितिक आकृत्या. अखेर दर्शनवेळा संपल्यामुळे गाभाऱ्याचं सुवर्णद्वार बंद झालं आणि आमची सुटका झाली!
त्यानंतरच्या दिवशी ‘स्पाइस गार्डन' पाहायला गेलो. विस्तृत आवारात विविध मसाल्याच्या पदार्थांच्या वनस्पती काळजीपूर्वक लावल्या गेल्यात. पर्यटकांना पाहता येण्याच्या दृष्टीने त्यांची मांडणी करून त्याला एका सुंदर उद्यानाचं रूप देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. दर्शनी भागात एक निराळीच मांडणी पाहायला मिळाली. काही वृक्षांच्या भोवतीचं आळं असोल्या नारळाच्या आणि शहाळ्याच्या बाहेरच्या टरफल-तुकड्यांचा वापर करून आच्छादित केलेलं होतं. टाकाऊ वस्तूंचा असा कल्पकतेने केलेला वापर छान दिसत होताच.
दर्शनी भागातून पुढे जाताना सुरुवातीलाच कॉफीचं झुडूप आणि कोकोचा छोटेखानी वृक्ष दिसला. दोन्ही फळात होती. कोकोचं झाड फारसं कोणाला माहितीचं नव्हतं. मूळचं हे झाड आफ्रिकेतलं आहे. त्याचं फळ एखाद्या लांबट पोपईएवढं असतं. त्याच्या गरापासून कोको तयार करतात. जवळच एका वृक्षावर एक मोठा वेल वरपर्यंत चढलेला होता. बागेतल्या मार्गदर्शकाने सांगितलं, की तो व्हॅनिलाचा वेल आहे. त्याच्या फळांपासून व्हॅनिला इसेन्स मिळतो. त्याला त्याविषयी आणखी काही माहिती दिसत नव्हती. मी सर्वांना सांगितलं, की हा वेल म्हणजे ‘अमरी'ची ऊर्फ ऑर्किडची एक जात आहे. विश्वास बसायला अवघड गोष्ट. ‘ऑर्किडसी' कुलामध्ये हजारो जाती आहेत, त्यामध्ये ही एकमेव ‘वेलअमरी' आहे. वनस्पतिशास्त्रीय नाव ‘व्हॅनिला प्लॅनिफॉर्मिस'. त्याची फुलं इतर बऱ्याच ऑर्किड्ससारखी मोठी, सुंदर, दिखाऊ नाहीत. ती छोटीशी पिवळसर फुलं असतात. त्यांना शेंगांसारख्या दिसणाऱ्या करंगळीएवढ्या जाडीच्या फळांचे घोस लागलेले दिसत होते. त्या शेंगा नसून ती बोंड प्रकारची फळं असतात. त्यामध्ये शेकडो सूक्ष्म बिया असून व्हॅनिला द्रव्य फळं पूर्ण पक्व होण्यापूर्वी फळाच्या आवरणापासून मिळवलं जातं.
लवंगांचा लहानसा वृक्ष आणि जायफळाचा मोठा वृक्ष शेजारी-शेजारीच लावलेले, छान वाढलेले होते. लवंगा म्हणजे लवंग वृक्षाच्या वाळलेल्या कळ्या असतात. काही कळ्या तोडून एका बशीत ठेवलेल्या होत्या त्या मार्गदर्शकाने दाखवल्या. जायफळाच्या वृक्षाला लिंबाच्या आकाराची किती तरी बदामी रंगाची गुळगुळीत फळं लागलेली होती. त्यातलं एक फळ उभं कापून ठेवलेलं होतं. त्याचं बी म्हणजे जायफळ आणि बियांवरचं पातळ जाळीदार आवरण म्हणजे जायपत्री, ही गोष्ट अनेकांना नव्याने समजली. लवंगेच्या आणि इतरही अनेक वृक्षांच्या खोडांवर काळ्या मिरीचे वेल चढवलेले होते. त्याची पानं थेट विड्याच्या पानांसारखी दिसतात. दोन्ही एकाच प्रजातीमधले वेल आहेत. मिरवेलीला मोठ्या वाटाण्याएवढ्या हिरव्या फळांचे घोसही लागलेले दिसत होते. प्रत्येक फळात एकच बी असून बिया वाळवल्या की काळ्या मिऱ्या तयार होतात. रस्त्याकडेने जिरे, ओवा आणि बडीशेपेच्या वाफ्यांमधून मिश्र सुवास दरवळत होता. ही छोटी झाडं भरभरून फुललेली होती.
हेही वाचा - इस्फाहान : इराणमधलं अर्धं जग
पुढे गेल्यावर काही उत्तुंग धिप्पाड वृक्षांनी लक्ष वेधून घेतलं. हे सुंदर महावृक्ष दालचिनी आणि तमालपत्राचे होते. एकाच प्रजातीच्या दोन सारख्याच दिसणाऱ्या जातींचे हे सदाहरित वृक्ष असून दोन्ही जातींची पानं तमालपत्र म्हणून उपयोगी पडतात. दोन्हींच्या छोट्या फांद्यांच्या वाळवलेल्या साली म्हणजेच दालचिनी. बऱ्याच ठिकाणी इतर झाडांच्या सावलीत वेलदोड्याच्या नाजूक दिसणाऱ्या छोट्या झाडांची लागवड केलेली होती. त्यातील काहींना फुलं आलेली व फळं म्हणजे वेलदोडे आलेले पाहायला मिळाले. हाडजोडीचे वेल, गवती चहा, ‘इन्शुलीन प्लँट', ऑल स्पाइस प्लँट इत्यादी अनेक वनस्पती पाहत पाहत बाहेर पडलो. तिथे त्यांचंच ‘रानवेली' नावाचं रेस्टॉरंट होतं. तिथेच जेवण केलं.
भोजनोत्तर आयेशने तेथील मसाले व औषधविक्री केंद्रात नेलं. तिथल्या सर्वच गोष्टी प्रचंड महाग होत्या. त्यामुळे फारच थोड्याजणांनी जुजबी खरेदी केली. औषध विभागात सर्व प्रकारची आयुर्वेदिक अरिष्टंही विकायला होती. त्यातल्या ‘अश्वगंधारिष्ट'च्या बाटलीची किंमत होती २,४०० रुपये! भारतीय चलनात सुमारे १,००० रुपये. आपल्याकडे ते सुमारे २०० रुपयांना मिळतं. अर्जुनारिष्ट, अभयारिष्ट, हिंगाष्टक चूर्ण, सर्व काही उपलब्ध होतं. आयेशने माहिती पुरवली, की भारतीय आयुर्वेदाचा प्रसार श्रीलंकेत फार पूर्वीपासून झालेला आहे, पण त्यात काही बदल किंवा ‘सुधारणा'ही करण्यात आल्यात. पंचकर्मविधीची केंद्रंही इथे पाहायला मिळतात.
आता आम्ही श्रीलंकेच्या डोंगराळ भागाच्या अगदी मध्यवर्ती परिसरातून प्रवास करत होतो. हा भाग खरोखर पाचूसारखा हिरवागार आहे. सर्वत्र ‘क्लोरोफिल'चं अधिराज्य. भाताची शेतं, चहाचे मळे, नारळी-पोफळी-केळीच्या बागा, गुलाबाची आणि इतर फुलं, झाडांची उद्यानं, मध्येच एखादा जंगलाचा तुकडा किंवा सागा-फणसाची लागवड. काही डोंगरउतारांवर फक्त चहा एके चहाचे मळे. आमचं पर्वतारोहण चालू होतं. सर्वांत उंच नुआरा-इलिया शहर गाठायचं होतं. या भागात श्रीलंकेतील हस्तकला व्यवसाय आणि कुटिरोद्योग यांची चलती आहे. खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारचं त्यांना प्रोत्साहन आणि संरक्षण आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय सरकार कलाकारांकडून त्यांची उत्पादनं थेट विकत घेतं. त्यामुळे त्यांना सुयोग्य मोबदला मिळतो.
असाच एक लघुउद्योग पाहायला आम्ही गेलो. गावाचं नाव अंबलनगोडा. कारखान्याचं नाव ‘आर्यपाल मास्क फॅक्टरी'. मुखवटे तयार करण्याचा कारखाना. निरनिराळ्या प्रकारचे व आकाराचे मुखवटे तयार करण्याचं काम चालू होतं. हे मुख्यत: ‘सी मँगो' ऊर्फ कद्रू किंवा बालसा नामक वृक्षाच्या लाकडापासून केले जातात. हे लाकूड पिवळसर पांढरट रंगाचं, अतिशय हलकं आणि चिवट असतं. ‘सी मँगो' नाव ऐकून आम्ही चक्रावून गेलो. चौकशी केल्यावर तिथल्या लोकांनी तिथेच दाराबाहेर असलेला तो वृक्ष दाखवला. मध्यम आकाराचा हिरवागार सुंदर वृक्ष. पांढऱ्या शुभ्र तगरीच्या फुलांएवढी सुवासिक फुलं. लांबून एकदम आंब्यासारखी दिसणारी हिरवी गुळगुळीत फळं. पाहताक्षणी मी आणि परागने ते झाडं ओळखलं. याचं नाव ‘सुकाणू'. भारतात हा केरळ, दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण-पश्चिम तामिळनाडूत आढळतो. त्याची फळं अत्यंत विषारी असतात. पूर्वी विषप्रयोग करण्यासाठी ती वापरत असल्याचे दाखले इतिहासात आहेत.
आम्ही पुन्हा आत गेलो. किती तरी कारागीर चोहोबाजूंच्या टेबलांवर विविध प्रकारचे मुखवटे ठेवून काम करत होते. काहीजण ‘सुकाणू'च्या पातळ पट्ट्यांपासून मुखवट्याचा आकार कापून काढत होते. काहीजण त्यामध्ये डोळे, नाक, तोंडाचे आकार कोरून काढण्यात दंग होते. बाकीचे त्यांच्यावर रंगकाम करण्याच्या कामात गढून गेले होते. अधिकतर कर्मचारी महिला होत्या. आम्हीही समोर ठेवलेल्या नमुन्याबरहुकूम ब्रशने टिंबटिंबांचं रंगकाम करून पाहिलं. मजा आली!
या डोंगराळ भागात नुसते चहाचे मळेच नाहीत, तर चहाचे कारखानेही आहेत. डोंगराच्या अगदी वरच्या भागात सुप्रसिद्ध ‘लिप्टन टी फॅक्टरी' आहे. एका सामान्य कुटुंबातल्या स्कॉटिश माणसाने या भागात बस्तान बसवून चहाचे मळे विकत घेतले. पुढे ते ‘लिप्टनसाहेब' झाले. त्यांनी प्रचंड मोठी फॅक्टरी काढली. लिप्टन ब्रँडचा चहा नावारूपाला आला. त्यांचा पुतळाही एका शिखरावर पाहायला मिळतो, अशी माहिती आयेशने पुरवली. आम्ही मात्र खालच्या बाजूचाच एक कारखाना पाहायचं ठरवलं होतं.
कारखान्याच्या आवारात पाऊल ठेवताच एखाद्या कापड कारखान्यातल्याप्रमाणे खडखड, धडधड असे आवाज ऐकू येऊ लागले. स्त्री-पुरुष कामगारांची लगबग, गडबड सुरू होती. एका मध्यमवयीन महिलेने हसतमुखाने आमचं स्वागत केलं. कारखान्याचे विभाग क्रमवार दाखवून इंग्रजीतून माहिती द्यायला सुरुवात केली; नुकतीच तोडलेली चहाची पानं ते बाजारात दिसणारी चहापत्ती हे सगळे टप्पे सविस्तर दाखवले.
चहाचा कारखाना पाहून झाल्यावर घाटातून चढत खूप उंचीवरच्या थंड हवेच्या ठिकाणी पोचलो. गावाचं नाव जरासं चमत्कारिक वाटणारं- ‘नुवारा एलिया'. ‘नेल्लू' नावाच्या वनस्पतीवरून हे नाव पडलं आहे. श्रीलंकेचं सर्वोच्च पर्वतशिखर ‘पॉइंट पेड्रो' इथेच आहे. दुसरं उंच शिखर ‘अडॅम्स पीक'ही याच भागात आहे. त्याचं स्थानिक नाव आहे ‘श्रीपाद', म्हणजे ‘श्रीं'च्या पाऊलखुणांचं ठिकाण. हिंदू म्हणतात, ही शंकराची पावलं आहेत, तर बौद्धांच्या श्रद्धेनुसार ती रावणाची पावलं आहेत!
मुख्य म्हणजे रामायणात वर्णिलेलं ‘अशोक वन' या परिसरातच आहे. ते पाहण्याची प्रचंड उत्सुकता सर्वांनाच होती. हक्गल गावाजवळ हे स्थान आहे. मात्र, अशोकवन म्हणून जे काही दाखवण्यात आलं त्यामुळे आमची घोर निराशा झाली. एक तर इथे एकही अशोकवृक्ष नाही आणि वनही नाही! लाल फुलं येणारा अतिशय देखणा अशोक, ज्याला रक्ताशोक किंवा सीता अशोक म्हणतात, त्याचा पत्ताच नाही. एका वठलेल्या छोट्या वृक्षाखाली सीतेला ठेवण्यात आलं होतं असं लिहिलेलं दिसलं. तो अशोक वाटतच नव्हता. खरं तर सीतामाईला अशोकवनात पण अशोकवृक्षाखाली ठेवलंच नव्हतं, भरभक्कम मोठ्या ‘शिसवी'च्या वृक्षाखाली ठेवण्यात आलं होतं. तो वठलेला वृक्ष शिसवीचा असणं अशक्यच होतं. शिवाय वठलेला वृक्ष इतकी वर्षं न कुजता शिल्लक राहणंही शक्य नाही. ‘वन' म्हणण्याजोगी काही झाडीही तिथे दिसली नाही. ओबडधोबड, खडकाळ-मुरमाड आवार आणि त्यामागे वाहणारी ओढा म्हणण्याजोगी छोटी नदी. परिसरात काही थोडीच झाडं-झुडुपं, एक सीतामातेचं छोटं, बेंगरूळ मंदिर आणि बाजूला नव्याने बांधलेलं सीता-राम-लक्ष्मण यांचं मध्यम आकाराचं आणखी एक देवालय. बरं, जवळपास राजा रावणाचा राजवाडा, त्याचे अवशेष, काहीच नाही!
श्रीलंकेतील समुद्रकिनाऱ्याची काही मोजकी ठिकाणं पाहून पुन्हा कोलंबोला जाऊनच सहलीची सांगता होणार होती. प्रथम पूर्व किनाऱ्याजवळील ‘याला' या ठिकाणी गेलो. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची केवळ ५० मीटर. तिथे बॅक वॉटरच्या काठावरील ‘एलेफंट रिज' या ठिकाणी आम्ही उतरलो होतो. त्या नावावरून इथे रानटी हत्तींचा वावरही असावा असं वाटलं. जवळच ‘याला नॅशनल पार्क' आहे. तेथील जंगल सफारीला जाण्यासाठी भल्या पहाटे ४.३० वाजता उठायचं होतं. मी जाण्याचं टाळलं. नाही तरी मला ‘जंगल सफारी' हा प्रकार फारसा आवडत नाहीच. मला जंगलात पायी फिरायला आवडतं, पिंजऱ्यातून नाही! शिवाय ‘साखर झोपे'चा खेळखंडोबा! या ‘राष्ट्रीय उपवना'त हत्ती, बिबटे, अस्वलं, रानडुकरं, हरणं असे सर्व प्राणी आहेत. सकाळी सहा वाजता उठल्यावर सर्व आवरून, माझ्यासारख्या चुकारांना घेऊन कोवळ्या उन्हात फेरफटका मारला. ‘वृक्षपरिचय' कार्यक्रम केला. शिरीष, पांढरफळी, बोर, पिवळा कण्हेर, कडुनिंब, सिंहली आंबा, कांचन, आपटा, बेहडा, खोटा बदाम, धाम इत्यादी वृक्षांची नोंद केली. काजूची लागवड आणि इक्झोराच्या विविधरंगी फुलांची झुडुपं लक्ष वेधून घेत होती. दोन-तीन झाडं ओळखता आली नाहीत. त्यांपैकी एकाचं नाव स्वागतकक्षातील मुलीने सांगितलं, ‘नामिना'.
हेही वाचा - जंगल रात्र
याला राष्ट्रीय उद्यान दक्षिणपूर्व किनाऱ्यालगत आहे. इथल्या पुळणी फारच छान व स्वच्छ आहेत, पण जास्त उताराच्या असल्यामुळे पोहण्यासाठी व समुद्रस्नानासाठी योग्य नाहीत. किनाऱ्यालगत खारफुटी जंगल नसल्यामुळे डिसेंबर २००४च्या सुनामीमध्ये किनारपट्टीचं प्रचंड नुकसान झालं. पुळणीवर जांभळ्या फुलांचे ‘मर्याद वेल' आणि पिवळ्या फुलांच्या ‘सागर अबई'चे वेल काही ठिकाणी पसरलेले दिसत होते.
यालाहून आम्ही श्रीलंकेच्या दक्षिण टोकाकडे निघालो. वाटेत ‘हिक्कादुआ' हे ठिकाण लागलं. इथे किनाऱ्याजवळ समुद्रात ‘कोरल रीफ' म्हणजे प्रवाळ खडकांच्या रांगा आहेत. तिथे एके ठिकाणी सागरकिनाऱ्यावर एक अजब प्रकार पाहायला मिळाला. इथले मच्छीमार समुद्रकिनाऱ्यापासून जवळच पाण्यात वाळूमध्ये उभारलेल्या बांबूवर बसून गळ टाकून मासे पकडत होते. ही त्यांची न्यारी पद्धत इतरत्र कुठेच पाहायला मिळत नाही. अशा मच्छीमाराचा एक अप्रतिम फोटो ‘डिस्कव्हरी' मासिकाच्या मुखपृष्ठावर छापून आला. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या प्रकाराला अतोनात जगप्रसिद्धी मिळाली. झालं! युरोप-अमेरिकन पर्यटकांची अशा मच्छीमारांचे आणि त्यांच्यासह फोटो काढण्याची रीघ लागली. परिणामी, ते धूर्त मच्छीमार आता त्यासाठी पैसे आकारू लागले. मासे न पकडता फोटोसाठीच केवळ तसा देखावा करू लागले. असा हा विलक्षण मासेमारीचा, नव्हे, वाटमारीचा प्रकार!
आमच्या श्रीलंका प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. कोलंबो शहराच्या दक्षिणेला आता नवीन राजधानीचं शहर वसवलं गेलंय- ‘स्त्री जयवर्धनेपुरा कोट्टे'. पुढे एक सुरेख आकृतिबंधाचं स्वच्छ निळ्याशार पाण्याचं सरोवर दिसू लागलं. सरोवरात मध्यभागी एक इमारत दिसत होती. बस थांबवण्यात आली. ती इमारत म्हणजे पार्लमेंट हाऊस असून तिथे जाण्यासाठी जलाशयात दोन पूल आहेत. कुठे गर्दी नाही, गलबलाट नाही. अशा नीरव शांततेच्या नयनरम्य ठिकाणी संसद भवनाची उभारणी करण्याची कल्पना सगळ्यांना फारच आवडली. त्या परिसरातल्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना मोठे, हिरव्या पोपटी पालवीने नटलेले नागचाफ्याचे उत्तुंग वृक्ष हारीने लावलेले होते. नागचाफा हा श्रीलंकेचा ‘राष्ट्रीय वृक्ष' आहे. त्याला सुंदर, मोठी, पांढरी सुवासिक फुलं येतात. आता फुलांचा हंगाम नव्हता, पण काही झाडांवर तुरळकपणे चार-दोन फुलं दिसत होती. बसमधून खाली उतरून सगळ्यांना जवळ जाऊन फुलांचं निरीक्षण करायला सांगितलं. पाच अतिशय नाजूक, तलम, शुभ्र पाकळ्या. फुलाच्या मध्ये अगणित पुंकेसरांचं सोनेरी कंकण! हे पुंकेसर वाळवले म्हणजे झालं नागकेशर तयार! संसद भवनाच्या सरोवरात श्रीलंकेच्या ‘राष्ट्रीय पुष्पा'चा मान मिळालेल्या निळ्या-जांभळ्या कमळांची फुलंही दिसली.
बसमध्ये बसून पुढे निघालो. आता रहदारी वाढलेली होती. आम्ही कोलंबो महानगरीत प्रवेश करत होतो. मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘चौपाटी' आणि ‘जुहू बीच'प्रमाणे इथे ‘गाल फेस' नामक चौपाटी आहे. कोलंबोमध्ये मोठ्या संख्येने भारतीय स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे इथे भेळ, वडापाव, पावभाजी, सामोसे असं सर्व काही मिळतं. कोलंबोमधून पुढे जात असताना वाढत्या रहदारीने आता मुंबई-पुण्याची आठवण यायला लागली होती. हवेमधलं प्रदूषण जाणवत होतं. संपूर्ण कोलंबो शहर दक्षिणोत्तर ओलांडून पुढे आलो. आणखी चाळीसएक किलोमीटर उत्तरेला विमानतळ.
एका अनोख्या अविस्मरणीय सहलीचा सांगता समय समीप आला होता. एकूण फक्त दहा दिवसांची सहल. डॉ. मीना प्रभू यांनी श्रीलंकेवर लिहिलेलं ‘अपूर्वरंग-१' हे पुस्तक त्यांनी मला नुकतंच भेट दिलं. त्यांनी सांगितलं, की संपूर्ण श्रीलंकादर्शनासाठी त्यांना तीन आठवडे लागले. आम्ही पुष्कळ काही पाहिलं, पण बरंच काही पाहायचं राहिलंय याची जाणीव आम्हाला आहेच. तरीही, सर्वांनी एकदा श्रीलंकेला अवश्य जाऊन यावं असं सांगावंसं वाटतं.
(मुशाफिरी, दिवाळी २०१९च्या अंकातून साभार)
