ही गोष्ट असेल आठ वर्षांपूर्वीची.
माझ्या सात वर्षांच्या लेकाला इतिहासकालीन पुण्याची सफर घडवण्यासाठी मी पुण्यात आले होते. दगडूशेठ गणपती, केसरीवाडा, शनिवारवाडा अशी एकेक महत्त्वाची ठिकाणं बघत आम्ही दोघं जिवाचं पुणं करत होतो. सकाळ मस्त मजेत घालवल्यावर उन्हाच्या वेळी राजा केळकर म्युझियम बघू, असं ठरवून आम्ही तिकडे पोचलो. तिकिटं काढून आत गेल्यावर लक्षात आलं, म्युझियम बघण्यासाठी त्या वेळेस त्या वास्तूमध्ये फक्त आम्ही दोघंच आहोत. आत शिरताच पेशवेकालीन कपडे, दागदागिने, युद्धसाहित्य बघून माझा मुलगा हरखून गेला. त्या वस्तू बघण्यात तल्लीन होऊन गेला. पहिलं दालन पार करून आम्ही दुसऱ्या दालनात शिरत असतानाच अचानक एकटेपणाची चाहूल माझ्या मनाचं दार ठोठावायला लागली. का कोण जाणे पण आपण इथे एकटेच आहोत, ही एरवी क्षुल्लक वाटणारी बाब खूप महत्त्वाची बनली. लक्ष विचलित झालं. म्युझियममधल्या त्या पुरातन वस्तू आणि तिथलं निर्मनुष्य वातावरण माझ्या अंगावर येऊ लागतं. आत्ता, इथे, या क्षणाला मला काही तरी होईल अशी भीती मनात पिंगा घालू लागली. आपल्याला चक्कर आली तर? किंवा आकडी, नाही तर अर्धांगवायूचा झटका? तर काय करायचं? नाही नाही ते विचार एकामागून एक मनावर आदळायला लागले.
काही तरी वेगळं होतंय हे जाणवेपर्यंत भीती टोकाला कधी गेली आणि माझा ताबा घेऊन बसली ते मलाही समजलं नाही. तोवर काळजातली धडधडही वाढलेली होती. आता पुढे काही तरी घडणार आहे, या विचाराने सगळं अंग ताणलं गेलं होतं. मला लवकरात लवकर कुणाची तर मदत हवी होती. पण कसली मदत? आणि कुणाची? हे सगळं सांगणार कुणाला? बरोबर होता फक्त माझा छोटा मुलगा. सांगावं का त्याला, की मला काही झालं तर पटकन पळत जा आणि बाहेरून कुणाला तरी घेऊन ये मदतीला. पण अजून मला काहीच झालं नव्हतं. वाटलं, लहान आहे लेकरू माझं. कशाला त्याला आधीच घाबरवायचं? माझ्यातल्या आईने मला थांबवलं. पण मन? ते कुठलं शांत होतंय! उलट, भीती आणि प्रचंड भीती, एवढीच भावना चौफेर जाणवायला लागली. जणू चारही बाजूंनी ती माझ्यावर चालून येत होती. नेमक्या त्याच वेळी लेकाच्या कुतूहलाने भरलेल्या प्रश्नांना ऊत आला होता. त्याला थातुरमातुर उत्तरं देताना खरं तर मेंदू कामच करत नव्हता. कसंबसं तग धरत मी संग्रहालय दर्शन संपवलं. बाहेर आले ती अंधाऱ्या गुहेतल्या प्राणांतिक संकटातून कसंबसं वाचल्याची जाणीव घेऊन.
बाहेर आल्यावर मी त्याचा विचारही केला नाही. हे काय होतं? कशाची भीती होती ती? आपल्याला शारीरिक तर काहीच झालेलं नव्हतं. मग प्राणांवर बेतेल असं वाटावं एवढ्या आपण का घाबरलो? खरंतर या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं होतं. कारण झालं ते अतर्क्यच होतं. पण ते कुणाला कसं सांगावं तेही न समजल्यामुळे मी ते डार्क सीक्रेट आत ढकलून टाकलं- स्वतःही विसरून जायचं ठरवत. अळीमिळी गुपचिळी.
पण तसं व्हायचं नव्हतं. तसे छोटे-मोठे प्रसंग वारंवार घडू लागले. कमी-अधिक तीव्रतेचे पण गांगरून टाकणारे. प्रत्येक वेळी मनावर तीव्र घाव होत होते; पण मला त्याचा पत्ता नव्हता. त्या घावाने होत असलेली जखम चिघळत चालली होती. छोट्या छोट्या प्रसंगांत मला भीती वाटायला लागली, छातीत धडधड सुरू व्हायला लागली तसं घरच्यांच्याही ते लक्षात आलंच; पण यात काही गंभीर असेल असं कुणालाच वाटलं नाही- माझ्यासकट. ‘उगीच राईचा पहाड करू नकोस हं,' असं नवरा म्हणाला तेव्हा माझीही प्रतिक्रिया साधारण तशीच होती. त्यामुळे या प्रकाराकडे मी दुर्लक्ष करत राहिले.
हेही वाचा - मानसिक आजारांमुळे वाढतंय देशातील आत्महत्यांचं प्रमाण
एक वेळ अशी आली की दुर्लक्ष करणं अशक्य होऊन बसलं. रोज तोच प्रश्न भेडसावू लागला. हे काय वेडे विचार येताहेत मनात? कसली एवढी भीती वाटते आहे आपल्याला? आणि का? भीती, चिंता, काळजी या भावना आपल्या सगळ्यांमधेच कमी-अधिक प्रमाणात असतात; पण त्या भावनांनी मन काबीज केलं तर आपण आपले राहत नाही. फारच क्लेशदायी असते ती अवस्था. पण नेमकं काय होतंय याची आपल्याला जाणीव नसते. आणि तशी जाणीव झाली तरी ते कबूल करायला आपण कुठे तयार असतो? मग साहजिकच आपण त्याच त्या चक्रात घुटमळत राहतो किंवा अविचारी प्रवाहात भरकटल्यासारखे वाहवत जातो. माझंही तेच झालं होतं. पण व्यवहार थोडेच चुकणार आहेत? मन कितीही दमलं-भागलं तरी तुमचं आयुष्य काही थांबून राहत नाही. त्यामुळे आतल्या उलथापालथी बाहेर समजू न देण्याची शिकस्त करत तोंडावर हसू घेऊन मी जगत होते.
मन कासावीस, मन उदास उदास
मन मनातच घेते, एक झाकोळला श्वास
आला अंधार दाटून, जाई काळीज फाटून
काळ्याकुट्ट सावल्यांनी, गेले आकाश दाटून
पावसाच्या सरी आल्या, तरी शुष्क अंतरंग
कुणा ठावे कसे झाले, इंद्रधनूही बेरंग
मन एकाकी नि:शब्द, मन अस्वस्थ निरंत
मन दमले थकले, कधी थांबेल आकांत?
हे दोन चेहऱ्यांचं आयुष्य जगत असताना हे असं का होतंय याचा शोध मात्र मी मनातल्या मनात घेत होते. एका क्षणी अचानक काही तरी चमकलं. लक्षात आलं, की या सगळ्याची सुरुवात एका बेसावध क्षणी झालेली असणार.
तेव्हा माझं रूटिन चारचौघांसारखं सुरू होतं. घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहली, पार्ट्या, जिम, योगा... आयुष्य कसं मस्त चाललं होतं! थोडाफार ऑफिसमधला, थोडा घरगुती, थोडा मुलांचा असा स्ट्रेस होता. पण तो कुणाला नसतो? पण एक दिवस अचानक माझ्या आयुष्यात वादळ आलं. कोणाशी तरी काही तरी बोलत असताना मी मधेच अडखळू लागले. ओठावर असणारे शब्द काही केल्या आठवेनासे झाले. अर्थात त्यातही काही विशेष नव्हे. आपल्या सगळ्यांनाच होतं की असं खूपदा. असं एक-दोनदा घडलं आणि परत सगळं सुरळीत झालं. आणि एक दिवस जिममध्ये व्यायाम करत असताना खूप अस्वस्थ वाटू लागलं. नक्की काय होतंय समजत नव्हतं आणि व्यक्त तर त्याहून करता येत नव्हतं. आपल्याला बोलता येत नाहीये, शब्द सुचत नाहीयेत, आवाज फुटत नाहीये असं लक्षात येत होतं. विचित्र दिसत असू का आपण? हसतील सगळे. म्हणतील, हा काय बावळटपणा आहे! असं सगळं झरझर मनात येऊन भीती वाटायला लागली. लोकांसमोर थांबायला नको. बाहेर जाऊ, थोड्या फेऱ्या मारू, जरा बरं वाटलं की पुन्हा आत येऊ, असं म्हणत मी बाहेर गेले. येरझाऱ्या घालायला लागले. अस्वस्थता कमी-जास्त होत होती. थोड्या वेळाने बरं वाटतंय असं म्हणून आत जाणार तर परत तेच. दाराशी गेलेलं पाऊल पुन्हा थबकलं. नको, बाहेरच थांबू. पुन्हा फेऱ्या. तेवढ्यात आतून काही तरी अनावर झालं आणि वाटलं, नाही, आत गेलंच पाहिजे. हे इथे असं अडकून राहणं बरं नाही. आहे-नाही ती शक्ती एकवटून, मनाचा हिय्या करून मी जेमतेम आत शिरले आणि....
लक्षात आलं, की आपण कुठल्या तरी गाडीत आहोत. आसपासचे लोक आपली काळजी करताहेत. त्यांच्या बोलण्यातून हळूहळू कळायला लागलं की मधल्या काळात मला आकडी येऊन गेली आहे. न्युरॉलॉजिस्ट, रेडिऑलॉजिस्ट, एमआरआय, सीटी स्कॅन असे वेगवेगळे भीतिदायक शब्द माझ्याभोवती रिंगण घालू लागले होते. एका विचित्र, न सांगता येणाऱ्या भीतीशी ही माझी पहिलीच भेट होती. सगळ्या तपासण्या, हॉस्पिटलायझेशनमधून निदान झालं, न्युरोसिस्टिसारकॉसिस या लाखात एखाद्याला होणाऱ्या आजाराचं. अर्थात त्याआधी मला भेटलेल्या भीतीने मनातल्या मनात मला ब्रेन टीबीपासून कॅन्सरपर्यंत अनेक आजार होऊन गेलेले होते. कालांतराने हा आजार बराही झाला. मेंदूमध्ये ज्या ठिकाणी वाचेचं केंद्र असतं, त्या डाव्या भागात पुढच्या बाजूला दोन ठिकाणी आलेली सूजही नाहीशी झाली; पण जाताना बहुतेक एक अनामिक भीती मनात रुजवून गेली. खोल कुठे तरी आतल्या आत..
हेही वाचा - कार्यालयीन मानसिक आरोग्य: इकडे आपलं लक्ष आहे?
खरं तर अशा गंभीर आजाराशी सामना करणारी मी काही पहिलीच नव्हे. अनेकांच्या आयुष्यात अशा घटना घडतात. काहीजणांना तर याहूनही भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्यातले बरेचजण अशा घटनांचा आपल्यावर होणारा परिणाम योग्य रीतीने हाताळू शकतात; पण काहीजण त्या गुंत्यामध्ये खोल ओढले जातात. त्यांच्याही नकळत. मी त्यांतलीच एक. साधारण दोन वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या आजाराचा, त्या वेळेस आलेल्या अनुभवांचा कळत-नकळत माझ्या विचारांवर, माझ्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. आपल्याला अचानक काही तरी होऊ शकतं याची भीती माझ्याही नकळत आत दडून बसली होती. त्याचा बहुधा आता स्फोट होऊ लागला होता. दबून आणि दडून राहिलेल्या भावनांचा उद्रेक. परिणाम, प्रचंड भीती, तगमग आणि अस्वस्थता.
आणि मग हे भीतीने ग्रासलेलं, चिंतेने वेढलेलं, अपराधी भावनेने गुदमरलेलं, काळजीने व्यापलेलं माझं मन कधी वेडंपिसं झालं, भेदरून गेलं त्याचा माझा मला पत्ताही लागला नाही.
हळूहळू हे विनाकारण भीती वाटण्याचे, धडधड होण्याचे प्रकार वाढायला लागले. घरचेच काय, पण मीही स्वत:वर वैतागू लागले. चिडचिड झाली; पण परिस्थितीत बदल झालाच नाही. उलट, आता तर एकटेपणाचीही भीती वाटायला लागली. घराबाहेर पडताना मी एकटी असेन तर हाताचे तळवे ओलावायला लागले. आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला लागल्याचं लक्षात यायला लागलं. लिफ्टमधला दोन-चार मिनिटांचा एकटेपणाही घसा कोरडा करून टाकू लागला. लिफ्टमधला तो छोटासा अवकाश, त्या चार भिंती, तिथल्या आरशात दिसणारं माझंच भेदरलेल्या रूपातलं प्रतिबिंब मला आणखी भिववू लागलं. प्रत्येक वेळी लिफ्टमध्ये पाय ठेवताना कधी एकदा या बंदिस्त कपाटातून बाहेर पडते अशी घालमेल व्हायला लागली. कोणत्याही प्रकारचा एकटेपणा मी टाळायला लागले. एकट्याने गाडी चालवणं टाळायला लागले. गाडी चालवताना आपल्याला काही झालं तर, या विचाराने स्टिअरिंग व्हीलवरची पकड सुटायला लागली. योग्य वेळी आपण ब्रेकवर पाय दाबू शकू का, याबद्दल खात्री वाटेनाशी झाली. मॉलमधल्या शॉपिंग रॅक्सच्या अवतीभवती फिरतानाही गुदमरल्यासारखं होऊ लागलं.
साधं महिन्याचं वाणसामानही एकटीने आणणं कठीण होऊन बसलं, तेव्हा मात्र मी हतबद्ध झाले. स्वतःला दटावलं- हा काय वेडेपणा? यात न जमण्यासारखं काय आहे? हे काम माझं मलाच करायला हवं, असं उसनं अवसान आणून एके दिवशी घराजवळच्याच सुपरमार्केटमध्ये गेले; पण हे अवसान लवकरच ओसरलं. सामान घेत रॅक्सच्या रांगांमधून जशीजशी पुढे जायला लागले तसतसं पायांतलं बळं कमी होऊ लागलं. विचारांवरचा ताबा सुटला. त्या रांगांमधून विचार बेछूट धावायला लागले. विचारांची पावलं नेमकी चुकीच्या दिशेने पडू लागली. ती माझ्या विचारांमधली भीतीच सगळ्या रॅक्समधून माझ्याकडे झेपावत येत होती. आसपासचं सगळं जग माझ्या दृष्टीने स्तब्ध झालं होतं. त्या भल्या थोरल्या सुपरमार्केटच्या प्रशस्त दालनात माझा जीव कोंडू लागला. जणू या जगात मी एकटीच होते. माझ्या मदतीला यायला कोणीही नव्हतं. आणि भीती तर चहुबाजूंनी चाल करून येत होती.
माझं जगणं पावलोपावली अवघड होऊ लागलं. असुरक्षिततेच्या जाणिवेने मन अस्वस्थ होऊन गेलं. आपल्याला काही तरी होईल, ही निरर्थक, अतार्किक भीती हेच आयुष्याचं सत्य बनून गेलं. मी घराबाहेर पडेनाशी झाले. एकटेपणाची भीती वाटतेय आणि गर्दीही नकोशी झालीय, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडणं त्रासदायक होऊ लागलं. समारंभात आपल्याच माणसांमध्ये मिसळण्याची भीती वाटायला लागली. स्वत:ची लाजही वाटू लागली. उत्साहाने सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून वागण्याचा स्वभाव आपला. मग काय होतंय हे? टापटिपीत राहण्याची, छान तयार होऊन घराबाहेर पडण्याची आपल्याला आवड. मग हे काय असं वैराग्य आल्याप्रमाणे राहणं? हरवून बसले आहे का मी माझं ‘मीपण'? स्वतःचं ‘मीपण' हरवणं म्हणजे स्वतःचा पराभवच, असं मानून मी आणखी गलितगात्र होत गेले.
हेही वाचा - एकाकीपणापासून एकान्तापर्यंत
पण हे सगळं आतल्या आत. बाहेरून आपलं सगळं नीट चाललं आहे, हे दाखवण्याच्या प्रयत्नांत माझी खूप तारांबळ होऊ लागली. उत्साही असल्याचं नाटक करताना खूप दमछाकही होत होती. त्यातल्याच एका हळव्या क्षणी माझ्या मनाने स्वतःशी कबुली दिली, जे चाललंय ते बरोबर नाही. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत हवी- मानसोपचारतज्ज्ञाची! परत मन थोडंसं हललं. मानसोपचारतज्ज्ञ? माझ्यासाठी? हा मी स्वत:च स्वत:ला दिलेला धक्का पचायला थोडा वेळ लागला; पण एकदा ते पटल्यावर घरच्यांना माझ्या घालमेलीबद्दल आणि त्यासाठी मी ठरवलेल्या उपायाबद्दल सांगणं तितकंसं जड गेलं नाही. उलट, पाठीवर पडलेल्या आश्वासक थापटीमुळे डोळ्यांतून आसवांना आणि ओठांतून हुंदक्यांना वाट मोकळी झाली. आपल्या माणसांच्या स्पर्शातून, नजरेतून आणि शब्दांमधूनही ‘तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या साथीला आहोत आणि आपण या काळ्या छायेतून बाहेर पडणार आहोत', हा विश्वास मला मिळाला आणि दूरवर आशेचा किरण दिसू लागला. ‘मानसोपचारतज्ज्ञाकडे नक्की जा; पण त्याचबरोबर समुपदेशनाचा मेरुमणी असलेल्या गीतेमधले काही लोक तुला अर्थासकट समजावतो. मनाच्या निसरड्या क्षणी ते आठव. त्यांचं पठण कर', असं सांगत घरातलं वडीलधारं माणूस मला धीर देत होतं.
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्।
अभ्यासाने तु कौतेय वैराग्येण च गृह्यते॥
हा गीतेमधल्या आत्मसंयमयोगातील लोक त्यांनी माझ्या मदतीसाठी दिला.
आम्ही डॉक्टरकडे गेलो. मला होणारा त्रास मी त्यांना शक्य तितक्या सविस्तर, त्यातल्या बारकाव्यांसह मोकळेपणाने सांगितलं. माझ्या न्युरोसिस्टिसारकॉसिस आजाराविषयी समजल्यावर त्यांनी मला एक तपासणी करून घ्यायला सांगितलं. त्यांच्या अपेक्षेनुसार त्यात काही विसंगती होत्या. होऊन गेलेल्या आजाराचा बारीकसा व्रण राहिला असल्यामुळे हे सारं घडत होतं. ‘या व्रणामुळे मेंदू तुला जे संदेश देतो आहे त्यामुळे तुझा गोंधळ उडतो आहे. या गोंधळाचा परिणाम म्हणजे तुला होत असलेली एंग्झायटी,' असं डॉक्टरांनी निदान केलं. काळ हेच याला उत्तर आहे. तो व्रण गेला की पूर्ण बरी होशील, असा दिलासाही त्यांनी दिला व अँटीएंग्झायटी गोळ्या सुरू केल्या. डॉक्टरांकडून बाहेर पडले. अजून बरी झाले नसले तरी आपल्या अतार्किक वाटणाऱ्या भीतीमागे काही तरी कारण आहे, त्याचं काहीएक निदान आहे हे समजलं. याचा अर्थ आपण आज ना उद्या बरे होऊ शकतो. ही जाणीवही मला दिलासा देणारी होती. डॉक्टरांच्या या भेटीमुळे आणखी एक झालं. घरच्यांना माझी तडफड माहीत असली तरी अजून मित्र-मैत्रिणींना सांगण्याचं धाडस मला होत नव्हतं; पण डॉक्टरांकडून कारणमीमांसा ऐकल्यावर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले. गेले काही दिवस कसे काढले हे सांगितल्यावरही मन थोडं शांतावलं. खूप दिवसांनी मोकळा श्वास अनुभवला.
अर्थात, दुसरीकडे मनाला हे पक्कं माहीत होतं की अजूनही आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले नाहीत. हलकासा धक्काही आपल्याला डगमगवण्यासाठी पुरेसा आहे. त्याचा अनुभव लगेचच आला. एक दिवस एका प्रसन्न सकाळी मैत्रिणीबरोबर घरी व्यायाम करत असताना आपला हात वाकडा होत असल्याची जाणीव मला व्हायला लागली. आपल्याकडे मैत्रीण वेगळ्या नजरेने बघते आहे का हे मी आधी हळूच बघून घेतलं. वाकड्या हाताच्या आपण.... मनात धस्स झालं. परत एकदा मन भयग्रस्त. शेजारी व्यायाम करत असलेल्या मैत्रिणीला मी ओरडून सांगायला लागले, “बघ, बघ, माझा हात जड होतोय, वाकडा होतोय.” हे ऐकून आतल्या खोलीत असलेला माझा मुलगा घाबरून धावत आला. “मला गरम पाणी द्या. हात शेकू दे मला. हे काही तरी विचित्र होतंय.” मी मोठमोठ्यांदा सांगत होते. मैत्रीण आणि माझा मुलगा माझ्या सांगण्यानुसार मला मदत करत होते; पण ते सगळं करूनही मी कावरीबावरीच होते. ‘मला लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा,' असा धोशा आता मी लावला. माझी अस्वस्थता शिगेला पोचलेली होती. ते पाहून मैत्रिणीने मला तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांच्या तपासणीच्या खोलीत पोचताच माझी अस्वस्थता कमी व्हायला लागली. ‘तुम्हाला काहीही झालेलं नाही. तुमच्या हातातलं बळ पूर्णपणे शाबूत आहे', हे डॉक्टरांचे शब्द कानावर पडताच माझ्या श्वासाची गती मंदावली. चित्त थाऱ्यावर येऊ लागलं. जणू काही डॉक्टरांचे हे आश्वासक शब्द ऐकण्यासाठीच माझ्या मनाने हा खेळ मांडला होता. अनाहूतपणे आलेल्या विचित्र विचारांमुळे हे काहूर माजलं, हा विचार करण्याइतपत माझी बुद्धी भानावर आली. हातातलं बळ गेल्याची जाणीव मानसिक होती, शारीरिक नव्हतीच हे उमगलं. पुन्हा एकदा मी सुटकेचा निःश्वास टाकला.
या प्रसंगानंतर माझ्या समाधानासाठी म्हणा किंवा न्युरोसिस्टिसारकॉसिसचा काही शारीरिक परिणाम खरंच माझ्या मेंदूच्या त्या भागावर अजूनही उरला आहे का हे तपासण्यासाठी म्हणा, पुन्हा एकदा एमआरआयही केला. त्यात सगळं ठीकठाक असल्याचं लक्षात आलं; पण तरीही भीती काही पाठ सोडायला तयार नव्हती. बंजी जम्पिंग, स्काय डायव्हिंगसारखे साहसी अनुभव घेणारी, थोडीशी डेअरडेव्हिल स्वभावाची मी आता भीतीच्या विळख्यातून बाहेर येऊ शकत नव्हते.
विचारांचा वेडा किडा एकदा का आपल्या डोक्यात वळवळायला लागला की त्याचा कधी इच्छाधारी नाग बनेल, फणा काढून तो कधी आपल्याला विळखा घालेल आणि अजगरासारखा तो विळखा आवळत आवळत आपल्याला गुदमरवून टाकेल हे आपलं आपल्यालाच समजत नाही, अशी माझी स्थिती झाली होती. कधी कधी त्या नागाला चुचकारत वेळीच वश करून टोपलीत बांधून टाकण्यात मी यशस्वी होत असे, नाही असं नाही. पण त्याहून जास्त वेळा त्या काळ्याकभिन्न फण्याच्या छायेने मी आक्रसून जात असे. कधी ही भीती अविचारी आणि अतार्किक असल्याचं मनाला समजत असे, तर कधी त्याच भीतीमुळे घुसमटून मी भर सिनेमागृहातून सिनेमा सोडून घराकडे चालू पडायचे. कधी एखाद्या लग्नसमारंभात गर्दीला घाबरून नवऱ्याचा हात घट्ट पकडून एखादी खुर्ची पकडून बसायचे.
हेही वाचा - मेडिटेशन : महसूस करो रुह का एहसास
हे सगळं चालू असताना एकीकडे या त्रासातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही सुरू होताच. मी मित्रपरिवारात वावरत होते. घरी येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करत होते. सहलींना जात होते. कधी काही तरी मिळवल्याचा आनंद घेत होते, तर कधी भीतीने थिजून जात होते. दोन पावलं पुढे, एक पाऊल मागे! स्थैर्य आणि अस्थिरतेचा पाठशिवणीचा खेळ मनात सुरू होता. कधी या खेळात जग इतकं सुंदर आणि सुरक्षित वाटायचं की त्यामुळे माझ्या वागण्यात झालेला चांगला बदल सगळ्यांना कळून यायचा; पण कधी कधी तेच जग इतकं भकास, व्याधिग्रस्त आणि असुरक्षित वाटायचं की त्याची छायाही माझ्या डोळ्यांमध्ये दिसून यायची. जगाच्या या दोन रूपांतलं खरं रूप कोणतं? सत्य कोणतं? आभास कोणता? खऱ्याची आणि भ्रमाची पारख करायची तरी कशी? पुन्हा एकदा मी त्याच गुंत्यात अडकत चालले होते.
मला आलेलं हे बावरलेपण ओळखून माझे कुटुंबीय मला परत एकदा डॉक्टरांकडे घेऊन गेले; पण या वेळेस मात्र माझ्यामध्ये एक चांगला बदल झालेला होता. सायकिॲट्रिस्टकडे जाताना मी विनासंकोच गेले. माझा हातातली अपॉइंटमेंटची फाइल कोणाला दिसली तर दिसू दे या भावनेने. ताठ मानेने. माझ्या प्रश्नांची उत्तरं आणि उपाय मला इथेच मिळतील या निष्ठेने. या वेळेस डॉक्टरांनी मला औषधांच्या जोडीला विवेकनिष्ठ उपचारपद्धतीच्या कार्यशाळेत, म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीच्या (आरईबीटी) वर्कशॉपमधे सहभागी व्हायला सांगितलं. तथ्यातथ्यतेबाबतची मनाची होणारी गल्लत तर्कसंगत विचारांच्या माध्यमातून सोडवली तर नक्कीच उपयोग होईल, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. अल्बर्ट एलिसनी मांडलेल्या या उपचारपद्धतीचा मला खरोखरच उपयोग होऊ लागला. मनातल्या त्रासदायक भावनांमागे अतार्किक विचारांचा राक्षस दडलेला आहे. त्याच्याशी दोन हात करायचे असतील तर मनात येणाऱ्या विचारांकडे त्रयस्थपणेच बघायला हवं. असं त्रयस्थपणे बघितल्यावरच त्या वेड्या विचारांमधला फोलपणा मला समजेल. स्वत:च स्वत:शी बोलत त्या काल्पनिक भीतीच्या मुळावर मलाच घाव घालावे लागतील. कार्यशाळेत सांगण्यात आलेल्या डॉ. एलिस यांच्या तत्त्वांचा माझ्या मनावर पगडा बसला. मी जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक माझ्या मनातील भीतीला सामोरं जायला लागले. त्या भीतीला खोडून टाकू लागले. माझ्या मते आता सगळं ठीकठाक चालू होतं; पण माझ्या नकळतच अंतरंगात मात्र खोल दडलेलं भय दबा धरून बसलेलं होतंच. एखाद्या नाजूक, घसरड्या क्षणाची वाट बघत. अगदी छोटंसं कारणही पुरायचं आणि भीती माझ्या मनावर स्वार व्हायची.
इतकी वर्षं या चक्रात अडकल्यानंतर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसणं साहजिक होतं. मनाने नसले तरी शारीरिकदृष्ट्या मी तंदुरुस्त आहे, या माझ्या अभिमानाला तडा जाईल अशी घटना घडली. थोडीशी चक्कर आल्याचं निमित्त झालं आणि मला फिजिशियनकडे जावं लागलं. डॉक्टरांनी रक्तदाब तपासण्यासाठी मशिन काढताच माझी धडधड वाढली. जणू मी कोणत्या तरी परीक्षेला बसत होते, आणि त्यात नापास झाले तर तो माझा पराभव ठरणार होता. माझी ही घालमेल डॉक्टरांना जाणवली. त्यांनी मला शांत करण्याचा खूप प्रयत्नही केला; पण त्याचा परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी रक्तदाब पाहिला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मला काळजी दिसत होती. माझं राहणीमान, आहार, व्यायाम, माझं नियमितपणे धावणं, मॅरेथॉनमधे भाग घेणं, रोजच्या रोज योगासनं करणं; शिवाय नुकत्याच केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट्स बघता मला उच्च रक्तदाब असण्याची कोणतीच कारणं त्यांना दिसत नव्हती. तरीही मशिनवरचे आकडे वेगळंच दाखवत होते. १९०-१०० हे आकडे काळजीत टाकणारेच होते. आजपर्यंत कधीही विचलित न झालेला माझा नवराही थोडासा हबकला. माझी अवस्था तर कळपातून हरवलेल्या, एकट्या पडलेल्या, वाट चुकलेल्या पाडसासारखी झाली होती. मग मीच धीर करून डॉक्टरांना माझ्या एंग्झायटीबद्दल, मला होणाऱ्या त्रासाबद्दल आणि मानसिक उपचारांबद्दल सविस्तर सांगितलं. ते ऐकल्यानंतर डॉक्टर शांतपणे म्हणाले, “सर्व काही उत्तम असताना का हे शारीरिक आजार ओढवून घेत आहात? मानसिक आजाराचे परिणाम शरीरावर दिसू लागलेत याचा अर्थ तुम्हाला हे ओझं पेलवेनासं झालं आहे. मनावर ताबा मिळवा, नाही तर पुढे जाऊन शरीरावर आणखी दुष्परिणाम होऊ शकतात. रक्तदाबावरची औषधं मी तुम्हाला देईन, पण खरा उपचार तुमच्या मन:स्वास्थ्यातून मिळणार आहे.”
हा आघात प्रचंड मोठा होता. मन आणि शरीर ह्या दोन्ही बाजूंनी मी कमकुवत होते आहे, हे वास्तव होतं. त्या भीतीमुळे सगळं अस्तित्व कापून उठलं. रात्रभर झोप लागली नाही. मनात विचारांचं काहूर माजलं. काय करून घेतलं आहे मी माझ्या आयुष्याचं! कसं सावरू स्वत:ला? न थांबणारे विचार आणि त्याबरोबरच वाटणारी काळजी... भीती! हलकल्लोळ!
हेही वाचा - माणसाच्या माणूसपणाबद्दल
-आणि मग त्या भीतीमधूनच मुक्तीचा तो क्षण सापडला. आतल्या आत पक्क ठरवलं, आता हा क्षण सोडायचा नाही. दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. अर्धवट वयाच्या लेकाचं पालकत्व साद घालत होतं. गेली काही वर्षं माझ्या भरकटलेपणामुळे त्याला पुरेसा वेळ देता न आल्याची अपराधी भावना ती कसर भरून काढण्यासाठी उफाळून येत होती. त्याच्या पौगंडावस्थेत मला त्याच्याबरोबर असणं गरजेचं आहे, ही जाणीव मला गर्तेतून बाहेर पडण्यासाठी बळ देत होती. माझ्या या आजारामुळे घराचं घरपण हरवून गेलं होतं. ते परत मिळवून देण्याची प्रबळ इच्छा होत होती. मनात विचारांचा पूर लोटला होता. आणि सांगितलं तर जादू वाटेल कदाचित, पण विचारांना योग्य दिशा दाखवणारा तो नेमका क्षण मला गवसला. बराच वेळ प्रयत्न करूनही एखादी गाठ सुटत नसताना, नेमका धागा खेचल्यावर क्षणात निरगाठीची सुरगाठ व्हावी आणि पटकन गाठ सुटून जावी तसा. अर्थात मनाची गाठ सुटणं तितकंसं सोपं नव्हतं. निर्धार एका क्षणात करायचा होता, पण सुटकेसाठी अखंड प्रवास करायचा होता. नकारार्थी विचारांच्या डोहात खोल खेचलं जाणं मला चालणार नाही. आपले आपल्यालाच जोरात हात-पाय मारायला हवेत. या जीवघेण्या भोवऱ्याच्या ताकदीपेक्षा आपली इच्छाशक्ती अधिक बलशाली केली पाहिजे. मदतीचे हात, आशेचा किरण मी आता घट्ट पकडणार आणि या चक्रव्यूहातून कायमची सुटणार! माझ्या या निश्चयातच मला सोडवण्याची ताकद आहे, या जिद्दीने मी पुन्हा एकदा सायकिॲट्रिस्टकडे पोचले. हात-पाय गळून गेले असले, पाय खोलवर रुतले असले तरी या वेळेस मी संपूर्ण बाहेर पडणार- परत इथे न येण्यासाठी, ही खूणगाठ मनात पक्की बांधली. डॉक्टरांच्या सल्ल्याने कौन्सिलरचं मार्गदर्शन घ्यायला लागले. “नकारार्थी आठवणींचं गाठोडं जपून ठेवलं आहेस तू. जीवनातल्या छोट्या छोट्या आनंदांकडे बघ तरी. आपण कोणत्या आनंदासाठी पात्र आहोत की नाही हे का ठरवायचं? आनंद मिळतोय ना? मग दिलखुलास घ्यायचा. आवडतं ना आइस्क्रीम? मग खा मनापासून, आणि वारंवार, जाणीवपूर्वक काढत रहा जिभेवरच्या त्या थंडगार, मधुर स्पर्शाची, चवीची आठवण! जा, काही तरी स्वत:साठी खरेदी कर. सतत स्मरत रहा त्या खरेदीतून जमा केलेला आनंद. साठवत रहा या किरकोळ पण आनंदी आठवणी. इतक्या जमव, की ते आधीचं दु:खी आठवणींचं गाठोडं आपोपाप विरून जाईल आणि राहील फक्त उत्साह.” जिवाचा आटापिटा करून कौन्सिलरचा हा सल्ला अवलंबण्याचा प्रयत्न करायला मी सुरुवात केली. गरजेप्रमाणे वेळोवेळी त्यांना भेटत राहिले. या काळात विंदांच्या एका कवितेनेही माझ्या प्रयत्नांना बळकटी दिली. ती कविता मी मनातल्या मनात म्हणत राहत असे.
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर
संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर
आणि मग हळूहळू जाणीवपूर्वक माझ्या आयुष्यात संगीत आलं. हरवलेलं साहित्यप्रेम परत सापडलं. त्या शब्दसुरांच्या नादात मन डोलायला लागलं. माझ्यातलं मूळचं मीपण हळूहळू, ओझरतं का होईना पण गवसायला लागलं. मनाचा हिय्या करून हळूहळू मी माझ्या आयुष्यातल्या या नाजूक परिस्थितीबद्दल आणखी काही मित्र-मैत्रिणींकडे मन मोकळं करू लागले तेव्हा लक्षात आलं, या अशा दोलायमान मानसिक स्थितीतून जाणाऱ्या आपणच एकट्या नाही. आपल्यासारखे अनेकजण आहेत. बोललं पाहिजे त्यांच्याशी दिलखुलास. मोकळं व्हायला हवं एकमेकांशी बोलून. ज्याची-त्याची परिस्थिती, कारणं, तीव्रता वेगळी असेल; पण या आजारातून बाहेर तर पडायचंच आहे प्रत्येकाला. बाहेर पडण्याचे मार्गही वेगवेगळे असतील पण उद्दिष्ट एकच असलं पाहिजे. आपण एकटेच नाही, हा विचार धीर द्यायला लागला. परिस्थितीला सामोरं जाऊन विजय मिळवलेलेही अनेकजण भेटले. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि आत्मविश्वास बळावला.
आणि मग परतीच्या प्रवासातली महत्त्वाची वाटचाल सुरू झाली- सकारात्मक. आपल्याला मानसिक आजार झाला आहे, हे सत्य पचवण्यापासून डॉक्टर, त्यांची औषधं, कार्यशाळा, कौन्सिलरचं मार्गदर्शन, हे सगळं नि:संकोचपणे स्वीकारण्यापर्यंत. पण त्या वाटेवरच यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी सर्वांत महत्त्वाची होती ती स्वत:ची प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द.
उशिरा का होईना पण मी स्वतःच्या मनाची गरज ओळखलीच नसती तर? आपल्या मनाला मदतीची गरज आहे, हे सत्य मी पचवूच शकले नसते तर? डॉक्टर किंवा कौन्सिलरच्या उपचारांचा आणि मदतीचा मी मनापासून स्वीकारच केला नसता तर? उपचार तर पुढचे झाले, त्यांना भेटायलाही कचरले असते तर? लोक काय म्हणतील, या निरर्थक संकोचाने दबून गेले असते तर? या प्रश्नांंची उत्तरं जितकी सोपी आहेत तितकीच कटूही आहेत. मनावर आलेल्या सावटाच्या गर्तेत खोल रुतत जाणं, हेच माझं प्राक्तन बनलं असतं. परिस्थिती स्वीकारून तिला सामोरं जायचं ठरवलं की सुटकेची पहिली पायरी आपण ओलांडतो. तो क्षण महत्त्वाचा, आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा. जणू आपल्या पुनर्जन्माचा!
हेही वाचा - 'मर्द को दर्द नही होता' या दडपणाखाली पुरुष आतून तुटतोय?
हळूहळू मनावरचा तो सततच्या काळजीचा, हुरहुरीचा, विवंचनेचा पडदा कायमचा उठला; झाकोळलेलं मन स्वच्छ, स्वस्थ झालं आणि त्या निरभ्रतेच्या क्षणाला डोळे मिटून मी स्वत:लाच ठामपणे सांगितलं, ‘होय, गेली काही वर्षं मी मनाचा कल्लोळ बघितला, ते वादळ सहन केलं. परतीचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता; पण मी मदत मागताच मदतीचे अनेक हात धावून आले. माझ्या निश्चयाच्या आणि मिळालेल्या मदतीच्या बळावर एक दिवस मलाच मी सापडले. पूर्वीची मी. खरी मी! माझ्या डोळ्यांसमोर आत्ता येतं आहे डबक्यात साठलेलं गढुळलेलं पाणी, वाहत्या निर्झरातलं स्वच्छ खळाळतं पाणी. साठलेल्या पाण्यात शेवाळं जमणारच. व्हायचंय मला परत एकदा तो खळाळता उत्साही झरा. आज मी खंबीरपणे उभी आहे येणाऱ्या प्रत्येक आणि कोणत्याही संकटाला सामोरं जायला, ते स्वीकारायला. हे स्वीकारणं महत्त्वाचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं नव्हे. येणारा प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करायला माझं मन योग्यासारखं अविचल नाही. सुख-दु:खाची वळणं वाटेत येणार आहेतच. पुन्हा कधी तरी अधूनमधून ते काळे ढगही जमतील, त्यांच्यामुळे मी विचलित होईनही; पण त्या क्षणांविषयी आता मी तर्कसंगत विचार करू शकेन, वाटेतले अडसर दूर करू शकेन. मी स्वत:च माझ्या मनाला घातलेल्या अतार्किक दडपणाच्या विळख्यातून आता मी मुक्त आहे, स्वच्छंद आहे. जे व्हायला नको होतं ते होऊन गेलंय. आता पश्चात्तापाच्या त्या गुंत्यामधे अडकून हाताला काय लागणार आहे? सोडून दे. लेट इट गो. पूर्वी काही चुका केल्या असतील; पण आता मी माझं मलाच माफ केलं आहे. घडून गेलेल्या घटना, त्यांची कारणमीमांसा, तथ्यातथ्यता या गोंधळात अडकून पडण्यात मी माझं आयुष्यं कशाला दवडू? ना भूतकाळ ना भविष्य, मी हा आत्ताचा क्षण अनुभवणार आहे, संपूर्णपणे! हे आश्वासन आहे माझंच मला.
अजूनही मधेच काही निसरडे क्षण येतातही; पण आता मी पाय घट्ट रोवून उभी राहते. प्रत्येक वेळी स्वत:ला ठामपणे सांगते, ‘घे खोलवर श्वास. तुला काहीही होणार नाहीये. आणि झालं तर बघतील बरोबरचे किंवा आसपासचे लोक.' आणि तो नकोसा विचार झटकून टाकून, छानसं हसू लेऊन मी पुढे सरकते... माझ्या दिशेने येणाऱ्या सुख-दु:खांना सामोरं जायला. बिनधास्त, निर्धास्त; पण सावध आणि खंबीर पावलं टाकत. त्या काळोख वाटेकडे पाठ फिरवून.
ऐन माध्यान्हीच्या वेळी, नभ झाकोळे मेघांनी
सूर्यदेवाही ग्रासले, कृष्णछायेच्या करांनी
सावलीत काजळीच्या, कासावली सारी धरा
भय व्यापले ह्या गात्री, तगमग रंध्रा रंध्रा
स्तब्ध थबकला वारा, आर्त खिन्नता व्यापली
काळजातही काहूर, मति त्रस्त विद्ध झाली
एक किरण प्रखर, बहुसायासे निसटे
त्याचे झाले इंद्रधनू, आता सुख नाही थिटे
येता चाहूल सरींची, चित्ता फुटेल धुमारा
तन-मन शांत होता, फुले आनंदपिसारा
(अनुभव, दिवाळी २०१७च्या अंकातून साभार)
