आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

अभिषेक अनिता पुरुषोत्तम - तरुणांमधील सकारात्मक बदलाचा वाटाड्या

  • योगेश जगताप
  • 09.06.26
  • वाचनवेळ 8 मि.
team tarunai

एनएसएस, श्रमसंस्कार शिबिर, युवा छावणी असे शब्द तुमच्या ऐकण्यात आले असतील. कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येकाला याविषयी थोडीफार कल्पना असतेच. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून अशा शिबिरांची आखणी केलेली असते. अभिषेक अनिता पुरुषोत्तम आणि त्याचे सहकारी मागील १० वर्षांपासून ‘तरुणाई’ नावाने अशीच शिबिरं घेत आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो मुलांशी त्यांचा संपर्क आलेला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही ही मुलं एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्यांचं नेटवर्क महाराष्ट्र आणि इतर राज्यांत पोहोचलं आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि पर्यावरण ही ‘तरुणाई’ची युवकांच्या संदर्भातील कामाची चतु:सूत्री आहे.

अभिषेक बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातल्या हिवरा आश्रमचा. आई-वडील दोघेही शिक्षक. त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण गावात, तर बारावीपर्यंतचं अकोल्यात झालं. हिवरा आश्रमात सर्व जाती-धर्माची मुलं शिकण्यासाठी येत. इथल्या सलोख्याच्या वातावरणाचा परिणाम अभिषेकच्या जडणघडणीत झाला. पुढे पदवी शिक्षणासाठी तो पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला आला. राज्यशास्त्राचं शिक्षण घेणारा अभिषेकला आसपासच्या घडामोडींविषयी सजग होता. स्त्री पुरुष समानता, रोजगार, शेती आणि पर्यावरणातले प्रश्न, आरोग्य आणि शिक्षणव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याला रस होता. याचदरम्यान त्याला कॉलेजमधील एनएसएसचं व्यासपीठ मिळालं. या कॅम्पमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी घेण्यात येणाऱ्या गोष्टी त्याने जवळून अनुभवल्या. रक्तदान शिबिर, लिंगभाव कार्यशाळा, पथनाट्य, अनाथ-अपंग आणि वंचित लोकांसोबत संवाद अशा अनेक उपक्रमात त्याने भाग घेतला. पुढे एनएसएसच्याच माध्यमातून तो आसाममध्ये २५ दिवसांच्या ‘ज्ञानसेतू’ उपक्रमाला गेला. प्रयोगातून शिक्षण ही ज्ञानसेतू शिबिराची मध्यवर्ती कल्पना होती. यामध्ये गणित आणि विज्ञान हे विषय छोट्या कृतीतून, खेळातून शिकवले जायचे. तरुण मुलांच्या बुद्धीला चालना देणारं अशा प्रकारचं काम महाराष्ट्रातही सुरू करायला हवं, असं त्याला वाटू लागलं.

team tarunai

पदवीच्या तिसऱ्या वर्षाला असताना अभिषेक कॉलेजच्या एनएसएस विभागाचा विद्यार्थी प्रतिनिधी झाला. याच काळात त्याने महाराष्ट्रभरातील सामाजिक कामात सक्रिय असणाऱ्या ५०हून अधिक संस्था, एनजीओ यांना भेट दिली. संस्थांच्या कामांचा उपयोग तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी कसा करता येईल हा त्याचा भेटींमागचा उद्देश होता. वैभव निमगिरे, वैभव सोनावणे, युनूस सय्यद, प्रवीण वानखेडे हे त्याचे मित्र त्याच्या सोबत असायचे. आपण पुण्यात आलो, त्यामुळे आपल्याला हे नवं जग खुलं झालं. पण ग्रामीण, दुर्गम गांव-खेड्यातील मुलांपर्यंतदेखील ही संधी पोहोचवायला हवी असं त्याला वाटत होतं.

हेही वाचा - जेव्हा तरुण मुलं उलगडतात पुस्तकाची पानं… ‘नाशिक रीड्स’

हा विचार डोक्यात घेऊन तो मेळघाट येथील समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्याकडे गेला. तिथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या स्मिता पाटील २००५ पासून मेळघाटात ‘तरुणाई’ नावाने मुलांसाठी शिबिरं घ्यायच्या. मुलांना स्वतःच्या आवडीनिवडी ओळखायला शिकवणं, त्यांना सामाजिक प्रश्नांचं भान देणं, शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी त्यांना जागरूक करणं आणि लोकांशी संवाद करायला शिकवणं हे या शिबिरांचं उद्दिष्ट होतं. २०१२ ते २०१४ या काळात काही कारणांनी हे शिबिर बंद होतं. २०१६पर्यंत ‘तरुणाई’ची २० शिबिरं झाली होती. अभिषेक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून २०१६मध्ये हे शिबिर पुन्हा सुरू केलं. पुढे तीन-चार वर्षांत या तरुणांनी सहा-सात शिबिरं घेतली. या कामी लागणारी आर्थिक मदत कोल्हे दाम्पत्याकडून व्हायची. दरम्यानच्या काळात अभिषेकने पुण्यातून समाजसेवेचा डिप्लोमाही पूर्ण केला.

team tarunai

या शिबिरांचा तरुणांना उपयोग होतो, हे अभिषेकला स्वतःवरून आणि मेळघाटातल्या अनुभवांवरून लक्षात येत होतं. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्याच मुलांना मेळघाटला येणं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं घ्यायचं अभिषेक आणि ‘तरुणाई’च्या टीमने ठरवलं. विदर्भ-मराठवाड्यातील ज्या मुलांनी कोकणातील समुद्र पाहिला नाही, तो त्यांना पाहता यावा, सधन प्रदेशातील मुलांना दुष्काळ, रखरखता प्रदेश अनुभवता यावा, ग्रामीण-आदिवासी पाड्यांतील मुलांना शहरी भागातील मुलांशी बोलता यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी असा त्यामागचा विचार होता. व्यवस्थित नियोजन करून अभिषेकने हा विचार प्रत्यक्षातही आणला. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा भागांत आयोजित केलेल्या मागील ७ वर्षांतील शिबिरात जवळपास १२०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. यापैकी बरेच विद्यार्थी त्यांचं जिल्हयाचं ठिकाण सोडून पहिल्यांदाच बाहेर गेले. ‘तरुणाई’च्या आतापर्यंत झालेल्या ४१ शिबिरांमद्धे ४२०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला आहे.

team tarunai

‘तरुणाई’चं शिबिर नऊ दिवसांचं असतं. एका शिबिरासाठी ६० ते ८० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. १८ ते ३० वर्षं वयोगटातील मुलं शिबिरात येऊ शकतात. दरवर्षी फेब्रुवारी, जून आणि डिसेंबर या तीन महिन्यांत तरुणाईची शिबिरं होतात. शिबिरात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, करियर मार्गदर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन, संविधान जागरूकता, मानसिक आरोग्य, जोडीदाराची निवड, सामाजिक प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करतात. शिबिराचा भर प्रामुख्याने कृतीतून शिकण्याकडे असतो. मुलांकडून २० पेक्षा अधिक अॅक्टिविटी करून घेतल्या जातात. रोजच्या जगण्याशी आणि जीवनमूल्यांशी निगडीत या अॅक्टिविटी असतात. पत्र लिहिणं, सामाजिक रचना समजून घेणारे खेळ खेळणं, शेतात काम करणं, साफ-सफाई करणं, अवकाशदर्शन या आणि अशा प्रकारच्या अॅक्टिविटीमधून मुलं एकमेकांत मिसळतात. या अभिषेककडे शिबिरासाठी काम करणारी १८ स्वयंसेवकांची टीम आहे. शिबिरात आलेली मुलंच आता स्वयंसेवक म्हणून काम करू लागली आहेत.

team tarunai

शिबिरात सहभागी झालेली मुलं नंतर वेगवेगळ्या सामाजिक कामांतही स्वयंस्फूर्तीने योगदान देतात. वर्षभर वेगवेगळे उपक्रम जोमाने सुरू ठेवण्यासाठी अभिषेकने ‘टीम तरुणाई फाउंडेशन’ ही संस्था सुरू केली आहे. २०१९ला कोल्हापूर आणि सांगलीत पूर आला होता. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं. त्यावेळी लोकांना मदत करण्यासाठी तरुणाईचे ५० हून अधिक शिबिरार्थी प्रत्यक्ष ठिकाणावर पोहोचले. घर-परिसराची साफसफाई, परिसर निर्जंतुक करून देणं, अन्न-धान्याचा आणि जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा करणं अशी अनेक कामं या मुलांनी केली. मेळघाटातील भुलोरी गावात अचानक लागलेल्या आगीमुळे अनेक घरं उध्वस्त झाली होती. ही घरं पुन्हा उभी करण्याचं काम तरुणाईच्या स्वयंसेवकांनी केलं. कोरोना संकटाच्या काळात ‘टीम तरुणाई’ने ३० हजारहून अधिक लोकांना जेवण आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. अनेक गावांतील सार्वजनिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेचं कामही मुलांनी विनामोबदला केलं.

हेही वाचा - अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा : संभाजी ब्रिगेडचं रचनात्मक पाऊल

‘तरुणाई’मार्फत आयोजित रक्तदान शिबिरात ३०० हून अधिक रक्तदाते सहभागी झाले. ही मुलं दरवर्षी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण घेतात. ‘नवोदय’ उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील वंचित मुलांना मोफत शैक्षणिक मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं. कॉलेजवयीन आणि इतर मुलांचं समुपदेशनही केलं जातं. यासाठी अभिषेकने स्वतः मानसिक आरोग्य आणि समुपदेशनाचा डिप्लोमा कोर्स केला आहे. व्यसनांबद्दल जागृती हा अभिषेकच्या जिव्हाळ्याचा विषय. दारूमुळे उध्वस्त झालेले अनेक संसार अभिषेकने पाहिलेले असल्यामुळे तो व्यसनमुक्तीचं काम प्रभावीपणे करतोय.

team tarunai

शिबिरामधील हलाखीच्या परिस्थिती असलेल्या मुलांना मदत करण्यातही ‘टीम तरुणाई’चा पुढाकार असतो. निकिता नावाच्या एका मुलीच्या कॉलेज शिक्षणासाठी आवश्यक असणारी काही लाख रुपयांची मदत ‘तरुणाई’च्या मुलांनी चार दिवसांत उभी केली. ‘तरुणाई’मधील सहकारी युनूसला कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या उपचारांसाठी सहा लाख रुपये उभं करण्याचं कामही टीम तरुणाईने केलं. तरुणाई शिबिरात आल्यानंतर काही मुलांना त्यांचा लिंगभाव तसेच लैंगिक कल समजायला मदत झाली. त्यांनी ती इतर सहकाऱ्यांसमोर बोलूनही दाखवली. कॅम्पला येण्याआधी तंबाखू, बिडी, गांजा किंवा दारूच्या आहारी गेलेली मुलं प्रयत्नपूर्वक त्यातून बाहेर पडली. व्यसनमुक्त झाली. ६ ते १६ वर्ष वयोगटातील मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन पुण्यातील मानव्य संस्थेच्या मदतीने ‘मैत्री मनाची, ओळख शरीराची’ हा उपक्रम ‘टीम तरुणाई’ने राबवला. यासाठी विजायताई लवाटे यांच्या नावाने फेलोशिपही सुरू करण्यात आली. फेलोशिपच्या माध्यमातून दहा फेलोजनी पुण्यातील मुळशी तालुक्यात काम केलं. २०२३ ते २०२५ या काळात १६० शाळांमधील १० हजार विद्यार्थ्यांना फेलोजच्या मार्गदर्शनाखाली लैंगिक शिक्षण देण्यात आलं. याच उपक्रमावर आधारित एक कार्यक्रम पुस्तिकाही तयार करण्यात आली. या पुस्तिकेला राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे.

team tarunai

‘तरुणाई’च्या शिबिरात सहभागी झालेल्या ३६ तरुण-तरुणींनी म्हणजेच एकूण १८ जोडप्यांनी पुढे चांगल्या मैत्रीनंतर जात-धर्म न पाहता, घरच्यांशी योग्य संवाद साधून आंतरजातीय विवाह केले. अभिषेकला आता लहान मुलं आणि मोठ्या माणसांसाठी काम करायचं आहे. लहान मुलांसाठी त्याने ‘तोत्तोचान’, तर तरुण पालकांसाठी ‘इकिगाई’ या नावाने शिबिरांची आखणी केली आहे. लहान मुलांची दोन शिबिरं मागील वर्षभरात पार पडली असून त्यात २०० हून अधिक मुलं सहभागी झाली. पालकांसाठीची शिबिरं सहा महिन्यांत सुरू होतील असं अभिषेकचं म्हणणं आहे.

team tarunai

संवेदनशीलपणे विधायक काम करू इच्छिणाऱ्या हजारो मुलांचं नेटवर्क टीम तरुणाईच्या निमित्ताने महाराष्ट्रात उभं राहिलंय. शिक्षण आणि नोकरी करत सामाजिक भान जपण्याचं काम शिबिरार्थी करतायत. ‘तरुणाई’मध्ये सहभागी झालेले काहीजण प्रशासकीय सेवेत गेले. काहीजण व्यावसायिक झाले, तर काहीजण खाजगी नोकरी करताहेत. इतर शिबिरांच्या तुलनेत तरुणाईचं वेगळेपण काय असं विचारल्यावर अभिषेक सांगतो, ‘‘या शिबिरात मुलांना वेगवेगळे प्रयोग करायला मिळतात. प्रत्येकाला चुका करण्याची आणि ती सुधारण्याची संधी मिळते. शिबिरात झालेल्या साधक-बाधक चर्चेमुळे कुटुंब, शिक्षण, नातेसंबंध, करियर, सामाजिक प्रश्न याकडे कसं पाहावं याची स्पष्टता मुलांना येते. मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचं कौतुक होतं. लहान-मोठे, जुने-नवे असे सर्वजण एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करतात.’’

team tarunai

तरुणाईच्या काही कॅम्पला झारखंड, मध्य प्रदेश, गुजरातमधील मुलंही आली होती. या कॅम्पच्या प्रेरणेने कोकणात लोकनिर्माण, सोलापूरमध्ये कृतिशील तरुणाई शिबिर, तर आणखी एका ठिकाणी युवायन नावाने शिबिर सुरू झालं. या शिबिरांच्या आखणीतही अभिषेकने मोलाची भूमिका बजावली. तरुणाईचं काम पुढे नेण्यात पहिल्या टप्प्यात वैभव, प्रवीण, कैलास, स्नेहल, शिवा, युनूस यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यानंतरच्या टप्प्यात सुरज, मानसी, शेखर, अमित, समाधान, अनिल, विपुल हे हिरीरीने सहभागी झाले.

team tarunai

येत्या पाच वर्षांत अभिषेकला काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवायचे आहेत. त्यात तरुणांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी दोन आठवड्यांचा दर्जेदार उपक्रम राबवणं, मुलांना कृतिशील शिक्षण देणारी शाळा सुरू करणं, तरुणांना सामाजिक कामातील जबाबदारीची जाणीव करून देत त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देणं अशा काही कामांचा समावेश आहे.

वयाच्या तिशीत असलेल्या अभिषेककडे आज महाराष्ट्र आणि देशभरातील हजारो तरुणांचं आणि शेकडो सेवाभावी संस्था-एनजीओचं हक्काचं नेटवर्क आहे. त्याच्या एका हाकेवर मदतीसाठी धावणारी, झटणारी मंडळी आहेत. तरुणांमधील सकारात्मक बदलाचा वाटाड्या म्हणून अभिषेक आणि सहकरी करत असलेलं काम महत्त्वाचं आहे.

संपर्क – ९७३०८४३०५८

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results