आम्ही कोण?
काय सांगता?  

रामकृष्ण परमहंसांनी केली होती इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचीही उपासना

  • मुकुंद कुलकर्णी
  • 18.02.25
  • वाचनवेळ 2 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
ramkrushna paramhansa

विवेकानंदांचे गुरू श्रीरामकृष्ण परमहंस यांना आपण हिंदू धर्मातले योगीपुरुष म्हणून ओळखतो. त्यांचा आज जन्मदिन. पण त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचाही सखोल अभ्यास केला होता हे किती जणांना माहीत असेल?

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातल्या कामारपुकुर या छोट्या गावी १८३६ मध्ये जन्मलेल्या रामकृष्ण परमहंसाचं मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय. ते रूढार्थाने अशिक्षित होते. मात्र बंगाली भाषेतील गोष्टी आणि धार्मिक साहित्याने त्यांची समज प्रगल्भ केली. सात-आठ वर्षांचे असल्यापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक भावतन्मयता दिसू लागली होती. मोठ्या भावाला पुरोहित कार्यात मदत करण्यासाठी रामकृष्ण कलकत्त्याला आले. जात-धर्म भेदाभेद त्यांना तेव्हाही समजायचा नाही. त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कैवर्त समाजातील जमीनदारपत्नी राणी रासमणीर यांनी गंगाकिनारी बांधलेल्या काली मंदिरात त्यांनी पुजाऱ्याचं काम पत्करलं. त्यावेळच्या अतिकर्मठ वातावरणात हे मोठं धाडसाचंच काम होतं.

वयाच्या तिसाव्या वर्षी म्हणजे १८६६ मध्ये त्यांनी इस्लामची उपासना सुरू केली. तेव्हा ते अरब मुस्लिमांसारखा वेष करत. सातेक वर्षं इस्लामचा अभ्यास केल्यानंतर १८७३ मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माची सखोल उपासना सुरू केली. याचबरोबर हिंदू धर्मातील उपासनापद्धती, मधुरा भक्तीचंही त्यांनी आचरण केलं. अशाप्रकारे विविध उपसनांचा अभ्यास केल्यानंतर ‌‘सर्वांभूती एकच तत्व’ असल्याच्या निष्कर्षप्रत ते आले. हीच शिकवण त्यांनी लोकांना द्यायला सुरुवात केली.

याच दरम्यान १८८१च्या सुमारास विवेकानंदांची आणि त्यांची पहिली भेट झाली. विवेकानंदानी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. रामकृष्णांचा संदेश त्यांनी जगभर पोहोचवला. पुढे ‌‘श्रीरामकृष्ण मिशन‌’ची स्थापना करून त्याद्वारे समाजसेवेचं काम केलं.

१६ ऑगस्ट १८८६मध्ये वयाच्या ५०व्या वर्षी श्रीरामकृष्ण परमहंस यांचा मृत्यू झाला.

मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com

मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results