कोकणातलं पर्यटन कायमच आनंददायी असतं. लांबच लांब पसरलेले समुद्रकिनारे, वळणावळणांचे रस्ते, दुतर्फा गर्द झाडी, खाड्या, किल्ले, जुनी देवळं, टुमदार कौलारू घरं आणि खास कोकणी चवीचे विविध खाद्यपदार्थ! अतिशय शांत, रमणीय परिसर म्हणून कोकणात आवर्जून भटकंती केली जाते. पण कोकण म्हणजे नुसतं समुद्रावर भटकणं, आंबे-फणस-काजू खाणं किंवा माशांवर ताव मारणं नाही. या प्रदेशात पर्यटनाच्या लौकिक व्याख्येत न बसणाऱ्या काही जागाही विखुरलेल्या आहेत. त्यांतली काही निसर्गनवलं आहेत, उदाहरणार्थ- गरम पाण्याचे झरे, बारमाही धबधबे, शिवपिंडीमधून येणारा सिंहनाद. याचबरोबर सड्यावर लांबच लांब परिसरात पसरलेल्या कातळावर खोदलेली गूढ, चमत्कारिक शिल्पंही कोकणात पाहायला मिळतात.
कशी असतात ही कातळशिल्पं? तर, कातळावर ठराविक मापाची खोदलेली चौकट असते आणि त्यामध्ये कोरलेले काही आकार दिसतात. पण ही कातळशिल्पं मंदिरातल्या कोरीवकामांप्रमाणे दिसत नाहीत. त्यांचा उठाव काहीसा कमी असतो. इंग्रजीमध्ये याला ‘पेट्रोग्लिफ’असं म्हटलं जातं. या शब्दाचं मूळ ग्रीक भाषेत आहे. ग्रीक भाषेत ‘पेट्रो’ म्हणजे खडक आणि ‘ग्लिफ म्हणजे कोरीवकाम. खडकावर केलेलं कोरीवकाम म्हणून ‘पेट्रोग्लिफ’.
कोकणाची भौगोलिक रचनाच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की तिथे कुठल्याही गावाला जायचं असलं तरी चढ-उताराच्या रस्त्यानेच जावं लागतं. कोकणातली बरीचशी गावं एखाद्या टेकडीच्या पायथ्याशी वसलेली असतात. बऱ्याच वेळा गावाच्या दिशेचा मुख्य रस्ता डोंगरावरून जातो आणि मग एक छोटासा घाटरस्ता, ज्याला स्थानिक भाषेत ‘घाटी’ असं म्हणतात, ती घाटी उतरून आपण एका छोट्याशा, टुमदार, कौलारू घरं असलेल्या गावात जाऊन पोहोचतो. जवळजवळ प्रत्येक गावाला एखादा तरी डोंगराचा सडा, म्हणजेच डोंगरावरील पठाराचा भाग असतोच असतो. अनेकदा या सड्यावरच त्या गावच्या ग्रामदेवतेचं सुंदर कौलारू देऊळ असतं. उंचावरून हा देव आपल्या गावचं रक्षण करत असतो अशी स्थानिकांची श्रद्धा असते. सततच्या ऊन-पावसाच्या माऱ्यामुळे सड्यावरचा कातळ काहीसा काळपट रंगाचा झालेला दिसतो. अशाच कातळावर आपल्या पूर्वजांनी खोदकाम करून काही चित्रं कोरून ठेवलेली पाहायला मिळतात.
मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर अशा प्रकारचं कोरीवकाम केलेलं पाहण्याची आपल्याला सवय असते. परंतु संपूर्णपणे उघड्यावरची, कातळावर खोदलेली ही खोदचित्रं हा मोठा औत्सुक्याचा आणि अभ्यासाचा विषय आहे. पुरातत्त्व अभ्यासक आणि इतिहासतज्ज्ञ यांना अनेक वर्षांपासून या शिल्पांची भुरळ पडली आहे. ही अभ्यासक मंडळी जसजसे शोध घेऊ लागली तसतसं हे एकेक नवल समोर येऊ लागलं.
हेही वाचा - कोकणातला कातळखजिना
कोकणात अनेक ठिकाणी कातळशिल्पांचा आढळ आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये ही कातळशिल्पं मोठ्या प्रमाणावर दिसतात. रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत अशी २८० पेक्षा जास्त खोदचित्रं सापडली आहेत. कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाटा, निवळी फाट्याजवळ गावडेवाडी, भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर ही आणखी काही प्रमुख ठिकाणं.
या कातळशिल्पांचं प्रयोजन काय होतं, ती कोणी आणि का खोदली हे अजून न उलगडलेलं कोडं आहे. मात्र, या भागात एक पुरातन संस्कृती नांदत होती इतकं नक्की म्हणता येतं. या चित्रांमध्ये मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी; पक्षी, मानवी आकृती, भौमितिक रचना यांच्या सोबतच गोपद्म आणि लज्जागौरी यांचं केलेलं अंकन आश्चर्यचकित करणारं आहे. प्राण्यांचे आकार जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. मुख्यत्वे कोकणात आढळणारे प्राणी इथे खोदलेले असणार असं गृहीत धरलं, तर मग काही ठिकाणी हत्ती आणि वाघ यांचंही अंकन का केलं गेलं असा प्रश्न पडतो. याचा अर्थ असा होतो, की ज्या काळात ही चित्रं खोदली गेली त्या काळात या परिसरात हत्ती आणि वाघ मोठ्या संख्येने आढळत असणार. मगर, कासव आणि मासे यांची चित्रंसुद्धा खोदलेली आढळतात. एका स्थानिक समजुतीनुसार ही खोदचित्रं पांडवांनी वनवासात असताना खोदलेली होती. ती चित्रं आपल्या पशुधनाच्या रक्षणासाठी तत्कालीन शेतकरी किंवा मेंढपाळ यांनी खोदली असावीत असंही काही स्थानिक सांगतात.
प्राण्यांपेक्षाही या सर्व खोदचित्रांमध्ये मानवी चित्रांचं अंकन तुलनेने अधिक आहे. काही ठिकाणी माणसाच्या शरीराचा आकार दिसतो, हात अगदी शरीराला चिकटलेले दिसतात. या आकृतीचं डोकं मात्र काहीसं उंच आणि निमुळतं दिसतं. कुणा परग्रहवासीयाचा सहज भास व्हावा इतकं हे चित्र हुबेहूब खोदलेलं आहे. एका चित्रात डोक्यापासून कंबरेपर्यंतचा मानवी देह दिसतो आणि त्यात सहा चक्रं खोदलेली दिसतात. योगक्रियेमध्ये असलेल्या षट्चक्रांचं हे सांकेतिक अंकन केलं असावं असं वाटतं. अर्थात हा सगळा समजुतीचा भाग आहे, चित्र पाहून केलेला केवळ अंदाज आहे. हे चित्र तेच आणि तसंच असेल असं नाही. यापेक्षा वेगळं आणखी एखादं स्पष्टीकरणसुद्धा असू शकेल. तज्ज्ञांद्वारे याचा जितका अधिक अभ्यास होईल तितके विविध निष्कर्ष त्यातून निघण्याची दाट शक्यता आहे.
या खोदचित्रांत भौमितिक आकारही खोदलेले आढळतात. मुख्यत्वे गावडेवाडी आणि निवळी फाटा इथे या भौमितिक रचना खोदलेल्या दिसतात. अशा रचनांनाही आधी चारही बाजूंनी चौकट खोदलेली आहे आणि आतमधे विविध भौमितिक आकार खोदलेले आहेत. चौकोन, त्रिकोण, उभ्या आणि आडव्या समांतर रेषा, सापाची नक्षी अशा प्रकारचे विविध आकार या एकाच चौकटीत खोदलेले आढळतात. त्यामुळे एकंदर ते गावोगावी आढळणाऱ्या विद्युतमंडळाच्या तारांसारखं नक्षीकाम दिसतं. त्यांचंही प्रयोजन अजून तरी अनाकलनीय आहे.
या सर्व कातळशिल्पांमध्ये अत्यंत देखणं शिल्प राजापूरजवळ बारसू गावी असलेल्या ‘तारव्याचा सडा’ इथे पाहायला मिळतं. राजापूरहून देवाचे गोठणेला जाऊ लागलं की १० कि.मी. वर बारसू/बारसव नावाचं गाव लागतं. इथून डावीकडे जाणारा एक रस्ता आहे. तयार रस्त्याने अंदाजे दीड कि.मी. गेलं की आपण एका देखण्या आविष्कारापाशी येऊन थांबतो. तिथे एका काळ्या खडकावर अंदाजे ५० फूट लांब आणि २० फूट रुंद अशी खोदचित्र चौकट आहे. दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि मधे एक मानवी आकृती या दोन वाघांना थोपवून धरते आहे, असं चित्र खडकात खोदलेलं आहे. पण खरं आश्चर्य पुढेच आहे. हेच चित्र जर विरुद्ध बाजूने जाऊन पहिलं तर एक मोठं गलबत समुद्रातून चाललेलं दिसतं. त्याला शिडं आहेत आणि खाली पाण्याच्या हलणाऱ्या लाटा, त्यात पोहणारे विविध मासे, असं सर्व दाखवलेलं आहे. दोन वाघांच्या मधल्या मानवी आकृतीच्या छातीवर लज्जागौरीचं चिन्ह अगदी ठसठशीतपणे कोरलेलं आहे. हे कुठल्या धार्मिक विधीचं शिल्पांकन असेल का? किंवा हे ठिकाण कुठल्या देवतेचं स्थान असेल का? सगळा तर्काचा भागच म्हणावा लागेल. परंतु इतकं सुंदर, इतकं अद्भुत आणि आखीव-रेखीव खोदचित्र पाहून थक्क व्हायला होतं. गणपती पुळ्याला जाताना लागणाऱ्या निवळी फाट्यावर असंच आणखी एक खोदचित्र होतं; परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपलं आहे. याचा कोणालाही ना खेद ना खंत. किमान या उर्वरित चित्राचं तरी आता जतन व्हायला हवं. हा अगदी दुर्मिळ ठेवा आहे.
हेही वाचा - सूर्यमंदिराची अनोखी कहाणी : कनकादित्य
राजापूर-आडिवरे रस्त्यावर सोलगाव फाटा आहे. इथून आत १० कि.मी.वर ‘देवाचे गोठणे’ नावाचं छोटंसं गाव आहे. गावात भार्गवरामाचं सुरेख मंदिर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी ब्रह्मेंद्रस्वामींना हे गाव आंदण दिलं होतं. या मंदिरात एक सुंदर पोर्तुगीज घंटा टांगलेली पाहायला मिळते. या मंदिराच्या समोर एक पायवाट डोंगरावर जाते. डोंगरावर गेलं की काही अंतर उजवीकडे चालून गेल्यावर एक आश्चर्य सामोरं येतं- एक कातळशिल्प. अंदाजे २० चौरस फुटाच्या एका चौकोनात एक मानवी आकृती कोरलेली आहे. पण आश्चर्य असं, की या मानवी आकृतीच्या पोटावर जर होकायंत्र ठेवलं तर ते चुकीची दिशा दाखवतं. या आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होतात आणि ती विचित्र असल्यामुळे होकायंत्र चुकीची दिशा दाखवतं. हे कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग याच ठिकाणी असं का खोदलं गेलं असेल? आज प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्या काळीसुद्धा ज्ञात होती का? मुळात त्या काळी होकायंत्रं होती का? हे सगळे प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात. एक मात्र खरं, की या खोदचित्रामागे काही ना काही संकेत नक्कीच आहेत, मात्र ते आपल्याला आता अजिबात समजत नाहीत. परंतु यावर काही संशोधन झालं आणि ते संकेत समजले तर मात्र एक मोठा खजिनाच आपल्यासमोर उघड होईल. या कातळशिल्पाच्या जवळ एक छोटं पाण्याचं कुंड दिसतं. नुकतंच संशोधकांना इथे एक मोठं भुयार सापडलं आहे. बाहेरून तरी ते खूपच खोलवर गेलेलं दिसतं. त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेतला जाणार आहे.
कातळचित्रांचं स्वरूप, त्यांचा आढळ आणि त्यांच्यासंबंधी स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या विविध दंतकथा हादेखील मोठा संशोधनाचाच विषय म्हणावा लागेल. रत्नागिरीचे उत्साही संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी अत्यंत चिकाटीने या खोदचित्रांचा, त्यांच्यातील साम्यं आणि विविधता यांचा अगदी बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांनी लोकांमध्ये याविषयी जागृती निर्माण केली आणि स्थानिक लोकांनासुद्धा या शोधकार्यात सामावून घेतलं. त्या-त्या प्रदेशात राहणारी म्हातारी मंडळी, गुराखी यांच्याकडून त्यांना माहिती काढण्याच्या कामात मदत झाली. त्यामुळे अगदी दुर्गम भागातली खोदचित्रंही त्यांनी शोधून काढली. एकंदर १० ठिकाणांचा त्यांनी शोध लावला, जिथे त्यांना तब्बल ८६ खोदचित्रं सापडली. त्या सर्वांची त्यांनी एक सूचीही तयार केली. त्यांनी स्थानिक आमदारांमार्फत विधिमंडळातसुद्धा या कातळशिल्पांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. परिणामी, राज्य सरकारकडून आता अशा कातळशिल्पांसाठी काही निधी राखून ठेवला जातो. हे दोन संशोधक खेड्यापाड्यांत जाऊन शाळांमध्ये मुलांना व्याख्यानं देतात आणि आपल्या परिसरात असा काही ठेवा असल्यास तो शोधायला सांगतात. आश्चर्य म्हणजे गुहागर तालुक्यातल्या एका शाळेच्या पटांगणातच असं एक कातळशिल्प आढळून आलं.
आणखी एक सुंदर कातळशिल्प आहे देवीहसोळ या गावी. राजापूरच्या पुढे असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नाव असलेल्या गावावरून साधारण ९ कि.मी. अंतरावर देवीहसोळ येतं. इथे आर्यादुर्गा या देवीचं सुंदर मंदिर आहे. अनेक कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबांची ही कुलदेवता आहे. या मंदिराच्या अलीकडे आणि मंदिराला लागूनच रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे १५ चौरस फुटांची एक चौकट आखलेली दिसते. या संपूर्ण चौकटीला आता चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेलं आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. या चार भागांमध्ये विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यातल्या काही समजतात, काही मात्र अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी एक गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेलं असतं. देवीहसोळच्या जवळच भालावली नावाचं गाव आहे. या गावात नवदुर्गेचं मंदिर आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमीला देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव असतो. त्या वेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी या देवीच्या भेटीला येते. या दोन्ही देवींची भेट या कातळशिल्पावरच होते हे एक नवल म्हणायला हवं. या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध असलेल्या खोलगट भागात फुरसं नावाचा विषारी साप येतो आणि दिवसभर तो तिथेच बसून असतो असं स्थानिक सांगतात. या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंत १०० मीटर अंतर आहे. इथे सर्वत्र विविध कातळशिल्पं खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. काही कातळशिल्पं अर्धवट सोडलेली आहेत, मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी खोदलेली आहेत.
हेही वाचा - माझ्या कोकणातला लाल-तांबडा
या कातळशिल्पापासून जेमतेम २०० मीटर अंतरावर एक कातळात खोदलेली मोठी विहीर आहे. ती बघण्यासारखी आहे. अंदाजे ४० फूट खोल या विहिरीला उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातळशिल्पाच्या आसपास अशी विहीर आढळणं हेदेखील एक वैशिष्ट्य आहे. आपल्या भटकंतीमध्ये या कातळशिल्पांचा शोध घेताना ही बाब ध्यानात ठेवण्याजोगी आहे. बऱ्याच ठिकाणी या कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे २०० मीटर त्रिज्येच्या परिसरामध्ये एखादी खोल दगडी विहीर आढळते. हा काही नियम नाहीये, परंतु याचं प्रमाण खूपच आहे. शिल्पं खोदणाऱ्या लोकांसाठी केलेली ही सोय होती का? उत्तर अवघड आहे. परंतु आपल्या भटकंतीदरम्यान अशी विहीर दिसली (स्थानिक याला ‘पांडवांची विहीर’ म्हणतात) तर थांबून त्या परिसरात शोध घ्यावा. कदाचित काही खोदशिल्पं मिळू शकतील. कातळशिल्पं दिसली तर त्याच्या आजूबाजूचं गवत काढून जागा स्वच्छ करावी पण चुना-खडूने ती चित्रं रंगवू नयेत. शक्यतो पावसाळा संपल्यावर असा शोध घेणं सोपं जातं. कारण ही चित्रं खडकावर खोदलेली असल्यामुळे त्यावर गवत उगवत नाही, परंतु बाजूच्या मातीमध्ये गवत उगवलेलं असल्यामुळे ही खोदचित्रं उठून दिसतात. या खोदचित्रांचं कुठल्याही प्रकारे नुकसान न करता किंवा त्यावर कचरा न करता जमेल तसा उंचावरून त्यांचा फोटो घ्यावा.
याचबरोबर हेदेखील लक्षात ठेवायला हवं, की कोकणातील प्रत्येक सडा काही शिल्पांकित नाही. मात्र, जागरूक राहून आणि डोळसपणे भटकंती केली तर अशी काही अद्भुत नवलाई आपल्यासमोर उलगडेल आणि कोकणातल्या भटकंतीला एक नवीन मिती मिळेल.
(मुशाफिरी, दिवाळी २०१६च्या अंकातून साभार)
