आम्ही कोण?
लेखमालिका : चतकोर शतकाच्या पाऊलखुणा

प्रवास हिंदुत्वाच्या संकल्पनेचा

  • श्रीनिवास जोशी
  • 13.10.26
  • वाचनवेळ 32 मि.
pravas hindutvachya sankalpanecha

भारतात अनेक धर्म आणि पंथ आहेत. यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ज्यू-पारशी-ख्रिश्चन आहेत, बौद्ध-जैन-शीख आहेत, आदिवासी आहेत. प्रत्येक धर्मातही अनेक प्रकार आहेत. हिंदूंचाच विचार केला, तरी त्यात वेद मानणारे आहेत, वेद न मानणारे अवैदिक आहेत. आत्मा आहे असं मानणारे आत्मवादी आहेत, आत्मा नाही असं मानणारे अनात्मवादी आहेत. एकच ईश्वर आहे असं मानणारे एकेश्वरवादी आहेत, ईश्वर अनेक रूपांमधून व्यक्त होतो असं मानणारे अनेकेश्वरवादी आहेत. देव म्हणून निसर्गाची पूजा करणारे आहेत, देव म्हणून पशू-पक्ष्यांची पूजा करणारे आहेत, देव मानवरूपात अवतार घेतात यावर श्रद्धा ठेवणारे आहेत.

मुसलमानांमध्येही सुन्नी आहेत, शिया आहेत, अहमदी आहेत, बोहरा आहेत आणि खोजा आहेत. बौद्ध धर्मात महायान, हीनयान आणि थेरवादी बौद्ध आहेत. जैनांमध्ये श्वेतांबर आणि दिगंबरपंथीय आहेत. शीख धर्मामध्येही खालसा, निहंग, उदासी आणि नामधारी असे प्रकार आहेत. लिंगायत, कबीरपंथी, रविदासी अशा पंथांची तर गणनाच नाही. असे भिन्न भिन्न लोक एका भूमीत राहत आहेत. त्यांच्या भाषा समान आहेत, त्यांचा इतिहास समान आहे. या साऱ्यांचे पूर्वज याच मातीमध्ये जन्मले आहेत आणि याच मातीमध्ये मिसळून गेलेले आहेत.

हे झालं धर्मांचं आणि पंथांचं. वंशाचं तर बोलायलाच नको. आजचं विज्ञान वंश नावाची बायॉलॉजिकल संकल्पनाच मानत नाही. सगळेच वंश इतके मिसळून गेले आहेत की शुद्ध असा एकही वंश नाही. बोलायचंच असेल, तर वंश ही एक सामाजिक संकल्पना आहे, असं समजून जे बोलायचं ते बोला, अशी आजच्या विज्ञानाची भूमिका आहे. आता मानववंशशास्त्राऐवजी मानवशास्त्र असंच म्हटलं जातं.

तरीही विविधतेबद्दलची चर्चा म्हणून किती वंशांचे लोक भारतात राहतात याविषयी बोलता येईल. सर हर्बर्ट रिजली यांनी १८९१च्या सेन्ससमध्ये नोंदवलं आहे, की भारतात इंडो-आर्यन, द्रविडियन, माँगोलॉइड, माँगोलो-द्रविडियन, सायथो-द्रविडियन आणि टर्को-इरेनियन असे वंश आहेत. बी. एस. गुहा या मानवशास्त्रज्ञांनी १९३१च्या सेन्ससमध्ये नोंदवलं, की भारतात मुख्यत्वेकरून सहा वंश आहेत. नेग्रिटो, प्रोटो ऑस्ट्रेलॉइड, माँगोलॉइड, मेडिटरेनियन, वेस्टर्न ब्रॅकिसेफॅलस आणि नॉर्डिक.

नव्याने झालेल्या डीएनए संशोधनातून हार्वड युनिव्हर्सिटीने दाखवून दिलं आहे, की भारतीय वंशाचे बहुतेक सगळे लोक दोन प्रकारच्या वंशवेलींच्या मिश्रणातून जन्मलेले आहेत. एक म्हणजे ॲन्सेस्ट्रल नॉर्थ इंडियन आणि दुसरी, ॲन्सेस्ट्रल साऊथ इंडियन. ॲन्सेस्ट्रल नार्थ इंडियन ही वंशवेल मध्यपूर्वेतले वंश, मध्य आशियामधले वंश आणि युरोपियन वंश यांच्या एकत्र येण्यातून तयार झाली आहे आणि ॲन्सेस्ट्रल साऊथ इंडियन ही वंशवेल अंदमानी वंशवेलीशी दूरचं नातं सांगते. मानवशास्त्रज्ञ काहीही म्हणत असले तरी हिंदू धर्मातील सवर्णांचं असं म्हणणं होतं, की भारत ही मूलतः आर्यभूमी आहे आणि आम्ही सारे आर्य आहोत. थोडक्यात, आर्य इथले मूळ रहिवासी आहेत आणि बाकीचे परके आहेत.

या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्र म्हणजे काय आणि भारतभूमीमधील राष्ट्र कुणाकुणाचं आहे याची आधुनिक चर्चा साधारणपणे १८८०नंतर सुरू झाली. न्यायमूर्ती रानडे यांनी अशी भूमिका घेतली, की ‘भारतात बहुसंख्य हिंदू आहेत हे खरं असलं, तरी या देशात इतरही अनेक लोक राहत आले असल्यामुळे ब्रिटिशांनी नव्याने एकत्र बांधलेल्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणता येणार नाही. त्यामुळे त्याला हिंदी राष्ट्र म्हटलं जावं.'

याच वेळी, म्हणजे १८८४ साली इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली. ही राजकीय संघटना स्वतःला नॅशनल म्हणजे राष्ट्रीय म्हणवत होती. त्यामुळे तिला हे नव्याने बांधलं गेलेलं राष्ट्र नक्की कुणाचं आहे याविषयी भूमिका घेणं आवश्यक होतं. त्याआधी हिंदुस्थानी किंवा इंडियन हे शब्द इथल्या लोकांबद्दल व्यवहारात होते. नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसला सगळ्याच धर्म आणि पंथांचं प्रतिनिधित्व करायचं असल्याने तिने ‘भारतीय राष्ट्रवाद' ही संकल्पना मांडली. याने दोन गोष्टी साध्य झाल्या. एक म्हणजे हे राष्ट्र केवळ हिंदूंचं नाही, तर भारतवर्षात राहणाऱ्या सर्वांचं आहे हे सांगितलं गेलं. शिवाय यात ‘भारतवर्ष' या प्राचीन हिंदू संस्कृतीने या भूभागाला दिलेल्या नावाचा उल्लेख असल्यामुळे प्राचीन हिंदू संस्कृतीलाही न्याय दिल्यासारखं झालं. आजही आपल्या संविधानात आपल्या राष्ट्राचा उल्लेख ‘इंडिया दॅट इज भारत' असा केला गेलेला आहे.

काँग्रेसने भारत या नावाचा प्रसार सुरू केल्यावर जसजशी चळवळ वाढत गेली तसतशी भारत, भारतवर्ष, भारतमाता अशी नावं जास्त जास्त वापरली जाऊ लागली. यामुळे मुस्लिम अस्वस्थ होऊ लागले. १९०६ साली मुस्लिम लीग स्थापन झाली. या वेळी मुस्लिम नेत्यांनी हिंदुस्थान हे नाव वापरायला सुरुवात केली. त्यांना भारतवर्ष किंवा भारतमाता या नावांपेक्षा हिंदुस्थान हे नाव जास्त ‘सेक्युलर' वाटलं.

हेही वाचा - आपली संतप्त सार्वजनिक संस्कृती

यात काही हिंदू विचारवंतांचं म्हणणं पडलं, की मुसलमान लोक हिंदू हा शब्द कुत्सितपणे वापरतात. यामुळेच दयानंद सरस्वती यांनी आपल्या धार्मिक आणि सामाजिक उत्थानाच्या चळवळीसाठी आर्य समाज हे नाव स्वीकारलं होतं. काँग्रेसचा राष्ट्रवादही संपूर्णपणे राजकीय राष्ट्रवाद होता. धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद आणणारे पहिले विचारवंत होते लोकमान्य टिळक. त्यांनी गणेशोत्सवाला आणि शिवजयंती उत्सवाला प्रोत्साहन तर दिलंच, शिवाय ‘हिंदू कोण' या प्रश्नावर एक श्लोकही रचला.

वेदांना जो ज्ञानाचा मुख्य स्रोत मानतो, साधनेचे अनेक मार्ग आहेत असं जो मान्य करतो आणि उपासनेच्या बाबतीत आणि ईश्वरी रूपांच्या बाबतीत जो कडक नियम ठेवत नाही तो हिंदू.

प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता।

उपास्यानामनियमश्चैतद् धर्मस्य लक्षणम्॥

वेदांना ज्ञानाचा मुख्य स्रोत मानणं, साधनेचे अनेक मार्ग आहेत हे स्वीकारणं आणि उपासनेच्या बाबतीत आणि ईश्वरी रूपांच्या बाबतीत कडक नियम न ठेवणं ही सनातन धर्माची मुख्य लक्षणं आहेत.

धर्ममेनं समालम्ब्य विधिभिः संस्कृतस्तु यः।

श्रुतिस्मृतिपुराणोक्तैः क्रमप्राप्तैरथापि वा॥

या धर्माचा आश्रय घेऊन जो मनुष्य श्रुती, स्मृती आणि पुराणांमध्ये सांगितलेल्या आणि आणि परंपरेनेही प्राप्त झालेल्या विधी आणि संस्कारांद्वारा सुसंस्कृत होतो, जो श्रद्धा आणि भक्तीने युक्त होऊन आपापल्या कर्तव्यकर्मात म्हणजे स्वधर्मात तत्पर राहतो, तसंच जो शास्त्रात सांगितलेल्या सदाचाराचं आणि शीलाचं पालन करतो तोच खऱ्या अर्थाने सनातन हिंदू.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेद मानण्याबरोबरच टिळकांनी परंपरा पाळण्यावरही भर दिला. हिंदुत्व हा शब्द पहिल्यांदा १८९२ साली चंद्रनाथ बसू यांनी आपल्या ‘हिंदुत्व - हिंदूर प्राक्रित इतिहास' या बंगाली पुस्तकात वापरला. पुढे १९२३ साली वि. दा. सावरकर यांनी आपल्या ‘हिंदुत्व : हिंदू कोण आहे?' या पुस्तकात हिंदुत्व हा शब्द एक राजकीय विचारसरणी म्हणून वापरला. त्यामुळे टिळकांना ‘हिंदुत्वाचे जनक' म्हटलं जात नसलं तरी या साऱ्या चलनवलनाची सुरुवात त्यांच्या चळवळीपासून झाली असं म्हणता येतं.

काँग्रेसने राजकीय राष्ट्राची संकल्पना रुजवायला सुरुवात केल्यावर टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती असे उत्सव सुरू करून तिला पहिल्यांदा सांकृतिक रूप दिलं. पुढे सनातन हिंदूंची लक्षणं सांगून आणि गीतारहस्य लिहून तिला धार्मिक आयामही दिला. असं असलं, तरी राष्ट्राच्या संकल्पनेतून त्यांनी इतर धर्मीय आणि मुसलमानांना वगळलेलं नव्हतं. ही गोष्ट टिळकांनी महंमद अली जीना यांच्याबरोबर १९१६ साली केलेल्या लखनऊ करारावरून स्पष्ट होते. या कराराद्वारे टिळकांनी मुसलमानांसाठी वेगळे मतदारसंघ मान्य केले आणि त्या बदल्यात मुसलमानांनी काँग्रेसबरोबर स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचं मान्य केलं.

हे सगळं घडत असताना सावरकर काळ्या पाण्याची सजा भोगत होते. हिंदू राष्ट्राबद्दल त्यांचे विचार सुरू होते. अंदमानवरून परत आल्यावर १९२३ साली त्यांनी हिंदुत्व विचाराची मांडणी केली.

टिळकांची व्याख्या मुख्यतः ‘वेद मानणारा तो हिंदू' अशी होती. सावरकरांनी हिंदू या संकल्पनेची व्याप्ती वाढवली. त्यांनी लिहिलं-

आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।

पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदू रीति स्मृतः॥

ज्या व्यक्तीच्या मातृभूमीचा विस्तार सिंधू नदीपासून ते हिंद महासागरापर्यंत आहे, भारत ज्याची पितृभूमी आणि भारत हीच ज्याची पुण्यभूमी आहे तो हिंदू.

भारत ही पितृभू असणं म्हणजे पूर्वज भारतामध्ये जन्माला आलेले असणं आणि भारत ही पुण्यभू असणं म्हणजे तीर्थक्षेत्रं भारतामध्ये असणं. थोडक्यात, जो भारतात जन्माला आलेला आहे, ज्याचे पूर्वज भारतात जन्माला आलेले आहेत आणि नांदलेले आहेत आणि ज्याची तीर्थक्षेत्रं भारतात आहेत तो हिंदू.

या काव्यात्म व्याख्येनंतर सावरकर हिंदूंची इतर काही लक्षणं सांगतात. सर्व हिंदू एका जातीचे, म्हणजे वंशाचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एका वंशाचे म्हणजे एका रक्ताचे. कॉमन ब्लड! हिंदू हा एक वंश आहे असं सावरकर सांगतात. सावरकरांची ही व्याख्या सुंदर आहे. बायॉलॉजीच्या दृष्टीने पाहता भारतात अनेक वंशांचं मिश्रण झालेलं आहे हे आपण पाहिलं. त्यामुळे सावरकरांनी वंश ही संकल्पना धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक पातळीवर नेली असं म्हणता येतं. या भारतीय वंशात कोण कोण आहेत हे सांगताना सावरकर सांगतात, की संन्यासी, आर्यसमाजी, शीख, आर्य-अनार्य म्हणजे आयर-नायर, ब्राह्मण-चांडाळ, दाक्षिणात्य-गौड, राक्षस-यक्ष, वानर-किन्नर, जैन-जंगम या सर्वांचं रक्त एकच आहे.

हेही वाचा - पिढ्यांचा प्रवाहो चालला..

सावरकर सांगतात, की सर्व हिंदूंची संस्कृती एकच आहे. संस्कृती म्हणजे काय हे सांगताना सावरकर म्हणतात, की आमचा इतिहासाचा ठेवा एक आहे. यात वेद येतात. वेद हे आमच्या इतिहासाचं पहिलं प्रकरण आहे. यानंतर येतात रामायण आणि महाभारत. या दोन काव्यांमध्ये सर्व भारताला एकत्र बांधून ठेवण्याचं सामर्थ्य आहे, असं सावरकर म्हणतात. याशिवाय, भारताचं सर्व प्राचीन साहित्य संस्कृतमध्ये आहे. इतर सर्व भारतीय भाषांना संस्कृतपासून पोषण मिळतं. या अर्थाने संस्कृत ही फक्त भाषा नसून तिला मंत्राची प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, असं सावरकर सांगतात. याशिवाय, जैन लोकांचं आदिपुराण, लिंगायत लोकांचं बसवपुराण, शिखांचं विचित्रनाटक ही सर्व भारतीय लोकांची संपत्ती आहे, असं सावरकर नमूद करतात. भारतातील ललितकला आणि वास्तुशिल्प हा आपल्या वंशाचा ठेवा आहे आणि या निर्मितीमध्ये वैदिक आणि अवैदिक अशा सर्व लोकांचा हातभार लागलेला आहे, असंही सावरकर मोकळेपणाने सांगतात.

यानंतर सावरकर कायदा आणि सामाजिक संस्था यांच्याकडे येतात. या गोष्टी काळाच्या ओघात बदलत गेल्या तरी त्यामागचं मूळ तत्त्व कायम राहिलं आहे, असं सावरकर नमूद करतात. दसरा, दिवाळी आणि रक्षाबंधन असे सर्व सण हा भारतीय संस्कृतीचा अनुपम आविष्कार आहे आणि यांच्याबरोबरच जगन्नाथाची रथयात्रा, भारतभर साजरा होणारे वैशाखी उत्सव असं सगळं मिळून एक सांस्कृतिक जीवन स्पंदन पावत राहते, असं त्यांचं म्हणणं आहे. हे सर्व घटक मिळून जी संस्कृती तयार होते ती हिंदू संकृती. हिंदू-हिंदूंमध्ये जशी समानता दिसून येते, तशी हिंदू आणि इंग्रज किंवा हिंदू आणि अरब यांच्यात दिसून येत नाही. इतर समूहांच्या तुलनेत वेगळेपण दिसून येणं असा राष्ट्रीयत्वाचा अर्थ आहे, असं राष्ट्रीयतेच्या चर्चेच्या शेवटी सावरकर म्हणतात.

आता प्रश्न असा येतो, की भारतातले इतर धर्मीय आणि हिंदू यांचं रक्त एक आहे आणि भारतीय म्हणून त्यांची संस्कृतीसुद्धा एक आहे, हे मान्य करूनही सावरकर त्यांना हिंदूराष्ट्रीय म्हणत नाहीत, याचं कारण काय?

इथे सावरकर पुण्यभूमीची संकल्पना मांडतात. पुण्यभू म्हणजे काय हे सांगताना सावरकर म्हणतात, की पुण्यभू म्हणजे होलीलँड. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक किंवा अवतार प्रकटला, ज्या भूमीत त्याने धर्माचा उपदेश केला, ज्या भूमीला त्याच्या निवासाने पुण्यत्व आले ती त्या धर्माची पुण्यभू. हिंदूंची पुण्यभू भारत, ज्यू आणि ख्रिश्चन लोकांची पॅलेस्टाईन आणि मुसलमान लोकांची अरेबिया. या अर्थाने बघायला गेलं तर सावरकर म्हणत आहेत, की जैन, बौद्ध, शीख आणि आदिवासी यांची पुण्यभू भारत असल्याने ते सर्व हिंदू आहेत. हिंदुस्थानात ज्यांचे धर्म निर्माण झाले ते सर्व हिंदू. थोडक्यात, आपली हिंदुत्वाची संकल्पना नुसती धार्मिक नसून ती मूलतः राष्ट्रीय, वांशिक आणि सांस्कृतिक आहे, असं सावरकर म्हणतात. आपल्या हिंदुत्वाचा पाया हा धार्मिक आणि आध्यात्मिक नसून बुद्धिवाद आहे, असं ते निक्षून सांगतात. याच अर्थाने, सावरकर म्हणतात, की आपल्या हिंदुत्वाची संकल्पना ‘हिंदू धर्म' या धार्मिक संकल्पनेपेक्षा विशाल आहे.

असा सगळा विचार झाल्यावर सावरकर भारतातील मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी अशा लोकांना आपल्या राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेच्या बाहेर काढतात. जे हिंदू नाहीत ते ‘न-राष्ट्रीय' आहेत. सावरकरांनी केलेली राष्ट्रीयत्वाची चर्चा बघितली तर त्यांना मुसलमानांना हिंदू राष्ट्रीयतेमध्ये सामावून घ्यायचं नव्हतं, हे स्पष्ट होतं. मुसलमान हे एक वेगळं राष्ट्र आहे असं त्यांचं मत होतं. आपलं मत पटवून सांगण्यासाठी त्यांनी खूप मोठी चर्चाही केली आहे. त्यातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे : एक म्हणजे मुसलमानांच्या मनावर धर्माचा मोठा पगडा आहे. दुसरं म्हणजे इस्लाम हा धर्म राष्ट्रवादाच्या विरोधी आहे. इस्लामी धर्म, जगाची विभागणी ‘मुस्लिम देश' आणि ‘शत्रू देश' अशी करतो. ज्या देशात मुसलमान जास्त आहेत तो इस्लामी देश आणि ज्या देशात बिगर मुसलमान जास्त आहेत तो शत्रू देश.

तिसरं म्हणजे मुसलमानांचा हिंदूंवर विशेष राग आहे. ख्रिश्चन आणि ज्यू हेसुद्धा इस्लामप्रमाणे एकाच पवित्र ग्रंथावर विश्वास ठेवणारे आहेत. ज्यू बायबल, ख्रिश्चन बायबल आणि कुराण हे पवित्र ग्रंथ जवळजवळ एकसारखे आहेत. त्यामुळे मुसलमान ज्यू आणि ख्रिश्चन लोकांना किताबी म्हणून जवळचे मानतात, या उलट हिंदूंना ते काफिर मानतात. चौथं म्हणजे आपण जेते आहोत, हा मुसलमान समाजाचा समज आहे. आपण या देशावर अनेक शतकं राज्य केलं आहे. त्यामुळे आपण श्रेष्ठ आहोत, असा या लोकांचा समज आहे. पुन्हा एकदा हिंदूंना जिंकून घेण्यासाठी मुसलमान आपली लोकसंख्या वाढवत आहेत. मुसलमानी मनोवृत्तीचं वर्णन सावरकरांनी असं केलेलं आहे.

सावरकर लिहीत होते तो काळ १९२० ते १९४०चा होता. त्या काळात आणि नंतरच्या तीन दशकांमध्येही मुसलमानी मनोवृत्ती असा काही वेगळा प्रकार या जगात आहे हे गृहीत धरून अनेक विद्वानांनी त्याविषयी चर्चा केलेली आहे. या विद्वान लोकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अ. भि. शहा, हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर असे अभ्यासक होते. आपल्या ‘सावरकर ते भाजप : हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख' या पुस्तकात हिंदुत्ववादी विचारवंत स. ह. देशपांडे यांनी ही सगळी चर्चा संकलित केलेली आहे.

मुस्लिम मनोवृत्ती नावाचा प्रकार मुख्यतः कुराणच्या शिकवणुकीतून आणि नंतरच्या इतिहासामधून निर्माण झाला आहे, असं या लोकांचं मत होतं. डॉ. आंबेडकर यांचं मत असं, की इस्लाम आणि राष्ट्रवाद हे दोन प्रकार एकत्र नांदू शकत नाहीत. कुराण, मानवी जगाची ‘दार-उल-इस्लाम' आणि ‘दार-उल-हर्ब' अशी विभागणी करतो. ‘दार-उल-इस्लाम' म्हणजे इस्लामची जमीन आणि जी जमीन इस्लामची नाही ती ‘दार-उल-हर्ब' म्हणजे युद्ध करायची जमीन! जिथे इस्लाम आहे तिथे शांतता, बाकी सगळ्या ठिकाणी युद्ध!

इस्लाममधील ‘उम्माह' या संकल्पनेचाही बाबासाहेब उल्लेख करतात. उम्माह म्हणजे मुसलमानांमधील बंधुत्व. या जगातले सगळे मुसलमान धार्मिक बंधुत्वाच्या धाग्याने बांधले गेलेले आहेत, असं कुराण सांगतं.

दार-उल-इस्लाम आणि उम्माह या दोन संकल्पनांमुळे इस्लामचं आणि आधुनिक राष्ट्रवादाचं जमत नाही, असं आंबेडकर म्हणतात. मुसलमान पहिल्यांदा इस्लामशी बांधलेला असतो, उम्माहशी बांधलेला असतो आणि नंतर तो जिथे राहात असतो त्या राष्ट्राशी.

हेही वाचा - राज्यव्यवस्था आणि भ्रष्टाचार अनादी काळाचं अद्वैत

इस्लामची श्रद्धा आहे, की पैगंबर महंमद हे अखेरचे प्रेषित आहेत. याचा उल्लेख करून अ. भि. शहा म्हणतात की याचा अर्थ असा, की कुराण हा परमेश्वराचा अखेरचा शब्द आहे, त्यात बदल करता येत नाहीत. याचा दुसरा अर्थ असा की इस्लाम हा परिपूर्ण धर्म आहे. त्यामुळे मुसलमानाने इस्लामचेच कायदे पाळले पाहिजेत असं इस्लाम सांगतो- मग तो कोणत्याही देशाचा नागरिक असो. याशिवाय, शस्त्राच्या जोरावर इस्लामचा प्रचार करण्याची इस्लामची अनुज्ञा आहे, हेसुद्धा अ. भि. शहा अधोरेखित करतात. कुराणमधील त्या संदर्भातल्या आयतीसुद्धा अ. भि. शहा दाखवून देतात. उदा. सुरह १२ आयत ९५.

मुस्लिम सत्यशोधक समाज स्थापन करणारे हमीद दलवाई हे स्पष्टवक्ते समाजसुधारक होते. त्यांनी टीका केली आहे, की मुस्लिम बुद्धिवादी हा प्रकारच मुस्लिम समाजात अस्तित्वात नाही. बुद्धिवादावर विश्वास ठेवून धार्मिक रूढींविरुद्ध उभे राहायची हिंमत मुस्लिम बुद्धिवाद्यांमध्ये नाही. दलवाईंचा दुसरा मुद्दा असा, की भारतातील मुस्लिम प्रश्नाला भारतात ‘इस्लामी राज्य येणं', हेच उत्तर मुसलमानांच्या मनात आहे.

थोडक्यात बोलायचं, तर सावरकर, आंबेडकर, शहा, कुरुंदकर आणि दलवाई या सगळ्यांची मुसलमानांविषयीची मतं जवळजवळ एकसारखी आहेत; परंतु एक मोठा फरक म्हणजे ‘मुसलमान कधीही बदलणार नाहीत' असं सावरकरांचं म्हणणं आहे आणि ‘मुसलमान बदलू शकतात' असं बाकीच्या लोकांचं म्हणणं आहे. हा फरक फार मोठा आहे. मुसलमान आधुनिकतेला आपल्या कवेत घेऊ शकतो, असं या विचारवंतांचं म्हणणं आहे.

मुस्लिम समाजात आधुनिक मन निर्माण करणारी प्रभावी चळवळ असती तर फाळणी टाळली जाऊ शकली असती, असे कुरुंदकर लिहितात. हमीद दलवाई लिहितात, की एक छोटा बुद्धिवादी वर्गदेखील समाजाला इष्ट वळण लावत असतो, सनातनीपणाविरुद्ध लढत असतो, नव्या कल्पना आणि नव्या जीवनमूल्यांचा सतत स्वीकार करत असतो.

मुसलमानांना उदारमतवादी व्हायला सांगत असतानाच हे तिघंही विचारवंत हिंदू समाजालाही आधुनिक व्हायला सांगताना दिसतात. हिंदू समाज सनातनी झाला, तर मुसलमान अधिक सनातनी होतील, असं हे तिघंही ठासून सांगताना दिसतात. कारण ८५ टक्के जनता मनाने आधुनिक होण्याची प्रक्रिया घडत असतानाच १५ टक्के लोक आपोआप आधुनिक होत असतात, असं कुरुंदकर म्हणतात. ते पुढे लिहितात, की भारतीय सेक्युलॅरिझमचा खरा प्रश्न भारतीय संविधानाच्या चौकटीत मुस्लिम जमात कशी बसवायची हा नसून ८५ टक्के समाज मनाने सेक्युलर कसा करावा, हा आहे. भारतात सेक्युलॅरिझमला खरा अडथळा बहुसंख्याकांचा आहे. बहुसंख्याकांच्या सनातनी मनोवृत्तीचा आहे. दलवाई लिहितात, की हिंदूंनी आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे. हिंदू सनातनीपणावर आघात होऊन त्याचा नाश झाला तर मुसलमानांच्या सनातनीपणालाही जोराचा धक्का बसेल.

आजची परिस्थिती पाहिली, तर ट्रिपल तलाक कायद्याला मुस्लिम स्त्रियांकडून पाठिंबा मिळतो आहे. १९९० साली मुसलमान समाजातला फर्टिलिटी रेट ३.७ होता. तो आता २.३पर्यंत खाली आला आहे. १९९३ पासून ते २०२१ पर्यंतचे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे पाहिले तर मुसलमान स्त्रियांमध्ये संततिनियमनासाठीची साधनं वापरण्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. हे सगळं पाहता हे विचारवंत मुस्लिम समाजाबद्दल योग्य विचार करत होते असं वाटून जातं.

इथे गंमत अशी, की सावरकर स्वतःही हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी मोडून टाकण्याच्या विचारांचे होते. ते स्वतः नास्तिक होते किंवा फार तर अज्ञेयवादी होते असं म्हणता येईल. सावरकर सर्व धर्मग्रंथांना संग्रहालयात बंद करून ठेवण्याचा सल्ला देतात. त्यांचं हिंदुत्व विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आहे. ‘गाय हा उपयुक्त पशू आहे', हे त्यांचं विधान सगळ्यांनाच माहीत आहे. सावरकरांचं हिंदुत्व समतेचा पुरस्कार करणारं आहे. जातिभेदाच्या चार बेड्या आहेत त्या तोडून टाकल्या पाहिजेत असं सावरकर म्हणत. व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी अशा या चार बेड्या त्यांना तोडून टाकायच्या होत्या. परंतु सावरकरांची समता मानवतेच्या दृष्टिकोनातून आलेली नव्हती, असं त्यांचे टीकाकार म्हणतात. त्यांना हिंदूंचं संघटन करायचं होतं म्हणून त्यांना जातीयवाद नको होता. मुसलमानांच्या विरोधात हिंदू एकगठ्ठा उभा राहायचा असेल तर जात संपली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या दृष्टीने संघटन महत्त्वाचं होतं. पुढे, कितीही प्रयत्न केले तरी ‘जात' जात नाही, असं लक्षात आल्यावर १९३५च्या ‘किर्लोस्कर'मध्ये त्यांनी लिहिलं की ‘उच्चनीचतेची भावना हीच जातिभेदाची विषारी नांगी आहे. ती तोडली की जातिभेदातील विखार संपेल. मग बाकीचा जातिभेद राहिला तरी चालेल.'

इथे आपण लक्षात घ्यायला हवं, की महात्मा गांधी हे कुठल्याही परिस्थितीत जातिभेदाच्या विरोधात होते. तीच गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची. शहा, कुरुंदकर, दलवाई तसेच गांधीजी आणि डॉ आंबेडकर हे सगळे कुठल्याही परिस्थितीत जातीच्या विरोधात होते. जात संपल्याशिवाय समाज खऱ्या अर्थाने एक होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आंबेडकरांनी लिहिलं आहे-

"Hinduism and social union are incompatible. By its very genius, Hinduism believes in social separation, which is another name for social disunity... It is a menace to liberty, equality, and fraternity."

 (हिंदू धर्म आणि सामाजिक ऐक्यभाव या एकमेकांच्या बरोबर न राहू शकणाऱ्या गोष्टी आहेत. जातीय भेद हाच हिंदू धर्माचा खरा स्वभाव आहे. जातीय भेद हे सामाजिक विघटनाचंच दुसरं नाव आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्या विरोधात जाणारा हा सर्व प्रकार आहे.)

आणखी एका ठिकाणी आंबेडकर म्हणतात-

"Hindu Society as such does not exist. It is only a collection of castes. Each caste is conscious of its existence. Its survival is the be -all and end-all of its existence."

(हिंदू समाज नावाची एकसंध गोष्ट अस्तित्वातच नाही. हिंदू समाज हे फक्त अनेक जातींचं कडबोळं आहे. इथे, आपण वेगळे आहोत, ही भावना प्रत्येक जातीत अत्यंत खोलवर रुतलेली आहे. जातीचं वेगळेपण टिकवणं हेच जीवनाचं कारण आहे आणि तेच जीवनाचं अंतिम ध्येयसुद्धा आहे.)

हेही वाचा - कोंडी फोडणारी युवा चळवळ आज उभी राहील?

जातीचं जातपण टिकवणं हेच मानवी जीवनाचं अंतिम साध्य अशी भावना सर्वत्र आहे, असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. याउलट जात राहील परंतु त्यातील विष काढून टाकता येईल, असं सावरकर म्हणत होते. या भूमिकेचा दुसरा अर्थ असा, की सावरकरांना सामाजिक न्यायापेक्षा आणि मानवतेपेक्षा हिंदू राष्ट्रीयत्व महत्त्वाचं वाटत होतं.

सावरकरांच्या जीवनदृष्टीमध्ये व्यक्तीपेक्षा राष्ट्र ही गोष्ट मोठी होती. राष्ट्राच्या वेदीवर व्यक्तिवादाचा बळी गेला तर मानवी आयुष्याचं सोनं होतं, अशी ही भूमिका आहे. सावरकरांना व्यक्तिवाद समाजाची प्रगती व्हावी म्हणून हवा आहे. समाजातली व्यक्ती बुद्धिवादी झाली, मुक्त होऊन विचार करणारी झाली तर समाज प्रगत होत जातो हे त्यांना मान्य आहे. परंतु, एकदा प्रगती साधली की अशा प्रगत व्यक्तीने आपलं व्यक्तित्व राष्ट्रासाठी अर्पण करावं अशी सावरकरांची अपेक्षा आहे.

सावरकर आपल्या विचारसरणीमध्ये अनेक विरोधी गोष्टी आणत राहतात, अशी टीका आंबेडकर करतात. हिंदू आणि मुसलमान ही दोन राष्ट्रं आहेत असं प्रतिपादन सावरकर करतात. सावरकरांप्रमाणेच आंबेडकरसुद्धा हिंदू आणि मुसलमानांचं सामाजिक आणि ऐतिहासिक वेगळेपण मान्य करत होते. पण मग, मुसलमान हे वेगळं राष्ट्र आहे, तर त्यांचं राष्ट्र त्यांना देऊन टाका, अशी भूमिका आंबेडकरांची होती. सावरकरांचा मात्र मुसलमानांना त्यांचं वेगळं राष्ट्र द्यायला विरोध होता. असे अनेक अंतर्विरोध सावरकरांच्या विचारसरणीमध्ये आहेत असं आंबेडकर म्हणतात. सावरकरांच्या विचारसरणीवर आंबेडकरांनीच नाही तर महात्मा गांधींनीही टीका केली होती.

उपनिषदांमध्ये विशद केलेल्या अद्वैत तत्त्वज्ञानावर गांधीजींचा विश्वास होता. ब्रह्म जर सगळ्या मानवांमध्ये विद्यमान असेल, तर धर्म कुठलाही असला तरी माणूस म्हणून आपण सगळे मूलतः वेगळे नाही आहोत, अशी उपनिषदांची भूमिका आहे. त्या दृष्टीने विचार करताना गांधीजींना माणसामाणसांमधला भेद मान्य नव्हता. गांधीजींच्या सर्वधर्मसमभाव तत्त्वज्ञानाचा पाया उपनिषदांतील विचारांमध्ये होता. सावरकर हिंदुत्वविचारांच्या स्वरूपात बहुसंख्यवाद मांडत आहेत अशी गांधीजींची धारणा होती. खरं तर सावरकरांनी आपले विचार खूप विस्तृतपणे मांडले आहेत. त्या सगळ्या विचारांची योग्य दखल या लेखाच्या मर्यादेत घेत नाहीये.

टिळक आणि सावरकर यांच्यानंतर आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वविचारांकडे येतो.

संघाच्या हिंदुत्वाचा विचार करताना पहिल्यांदा अर्थातच हेडगेवार येतात. हे संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक. यांची व्याख्या अगदी साधी होती. भारतात राहणारा तो हिंदू. स. ह. देशपांडे यांनी त्यांच्या ‘सावरकर ते भाजप : हिंदुत्व विचारांचा आलेख' या पुस्तकात बाळासाहेब देवरस यांचा संदर्भ दिलेला आहे. देवरस म्हणाले होते, की हिंदू हा शब्द वापरताना डॉ. हेडगेवारांनी तो कधीही विशिष्ट धर्ममताशी किंवा उपासनापद्धतीशी जोडला नाही. थोडक्यात, भारतीय संस्कृतीशी जोडले गेलेले सगळे लोक, मग ते कुठल्याही धर्माचे अथवा पंथाचे असोत, ते हिंदू आहेत, असं हेडगेवार मानत होते.

पुढे संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्राची पाच अंगं असलेली संकल्पना बनवली. भौगोलिक ऐक्य, वंशाचं ऐक्य, धर्माचं आणि जीवनमूल्यांचं ऐक्य, संस्कृतीचं ऐक्य आणि भाषेचं ऐक्य, या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की राष्ट्र तयार होतं, असा विचार गोळवलकर गुरुजींनी मांडला. म्हणजे सुरुवातीला गुरुजींची व्याख्या सावरकरांच्या व्याख्येच्या जवळ जाणारी होती; परंतु यात त्यांनी एक महत्त्वाचा बदल केला. त्यांनी लिहिलं, की जे लोक या चौकटीत बसत नाहीत त्यांनी आपलं स्वतंत्र राष्ट्रीयत्व सोडून देऊन हिंदू राष्ट्राचा धर्म, संकृती आणि भाषा यांचा स्वीकार केला पाहिजे आणि इथल्या राष्ट्रीय वंशाशी पूर्णपणे समरस झालं पाहिजे. त्यांनी तसं केलं नाही तर त्यांना आमच्या राष्ट्रीय जीवनात कोणतंही स्थान देता येणं शक्य नाही. जोपर्यंत ते स्वतःचं वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वेगळेपण राखण्याची इच्छा करत आहेत तोपर्यंत त्यांना पूर्णपणे परकीय समजलं जाईल.

गुरुजी पुढे म्हणतात, की अगदी राष्ट्रीय जीवन विकसित झालेल्या पाश्चात्त्य राष्ट्रांमध्येसुद्धा सगळ्या नागरिकांना राष्ट्रीय धर्म ‘मान्य' करावा लागतो. सांस्कृतिकदृष्ट्या आणि भाषेच्या बाबतीत तिथल्या राष्ट्रीय वंशाशी त्यांना इतकं एकरूप आणि एकजीव व्हावं लागतं की इथे परकीय लोक राहतच नाहीत, असं सगळ्यांना वाटू लागतं. वरील दोन वाक्यांमधील पहिल्या वाक्यात गुरुजी म्हणतात की सगळ्यांनी राष्ट्रीय धर्म ‘स्वीकारला' पाहिजे; परंतु दुसऱ्या वाक्यात ते म्हणतात की सगळ्यांनी राष्ट्रीय धर्म ‘मान्य' केला पाहिजे. याचा अर्थ काहीही मानला तरी वरच्या दोन वाक्यांतून गुरुजी भारत ज्यांची पुण्यभू नाही त्यांना हिंदू राष्ट्रीयत्व द्यायला तयार आहेत असं स्पष्ट होतं.

हेही वाचा - बकालतेचे पिऊन ॲसिड तरारलेली शहरे कृत्रिम

ही भूमिका संघाचे बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी जास्त स्पष्टपणे मांडली आहे. ते म्हणतात : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामान्यतः सावरकरांची व्याख्या मान्य केली आहे. त्याप्रमाणे आचरणही केलं आहे.... परंतु संघ सावरकरांच्या व्याख्येच्या आणखी पुढे गेला आहे. ज्याची ज्याची पुण्यभू भारताबाहेर आहे तो हिंदू नाही असं सावरकरांनी म्हटलं आहे..... संघ म्हणतो की मुसलमान, ख्रिश्चनही हिंदू होऊ शकतो. जो या देशाचा इतिहास, परंपरा व संस्कृती मानतो, या देशाला जो आपली मातृभूमी समजतो तो हिंदू. मग त्याची उपासना कोणतीही असो.'

हाच मुद्दा संघाचे एक सहकार्यवाह एच. व्ही. शेषाद्री यांनीही मांडला आहे. ते म्हणतात की, ‘संघाच्या दृष्टिकोनाप्रमाणे ‘हिंदू' ह्या शब्दाने केवळ धर्म नव्हे तर भारताचं राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व सुचवलं जातं. या व्यापक अर्थाने जी कुणी व्यक्ती राष्ट्रीय प्रवाहाशी एकरूप होईल ती ‘हिंदू', मग तिचा उपासनापंथ कोणताही असो.'

संघाच्या डॉ. श्रीपती शास्त्री यांनीही स्पष्ट केलं आहे की- ‘रा.स्व. संघ हिंदूंना हिंदुत्वाच्या (हिंदुनेसच्या) पायावर संघटित करण्याला बांधलेला आहे. हा देश आणि त्याची संस्कृती ह्यांवर पराकाष्ठेचं प्रेम यालाच हिंदुत्व हे दुसरं नाव आहे. हिंदू या शब्दाचा संघाचा अर्थ धार्मिक नसून राष्ट्रीय आहे. किंबहुना, इस्लाम व ख्रिस्ती धर्म ज्या अर्थाने धर्म आहेत त्या अर्थाने हिंदू हा धर्म नाही.'

१९४० च्या दशकात गोळवलकर गुरुजी एका बाजूला हिंदुत्वाची तत्त्वं मांडत होते, नुकत्याच झालेल्या फाळणीनंतर हिंदूंचं संघटन करत होते आणि त्याच वेळी नव्याने स्वतंत्र होऊ घातलेल्या भारतीय राष्ट्राच्या जीवनात पुरातन भारतीय संस्कृतीला मानाचं स्थान कसं असलं पाहिजे, हेसुद्धा सांगत होते. राष्ट्रीयतेमध्ये सगळ्यांना सामावून घ्यायची भाषा सुंदर आहे, परंतु गुरुजी जेव्हा संस्कृतीकडे येतात तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात.

भारतीय संकृतीची मूलतत्त्वे सांगताना गुरुजी म्हणतात, ‘परम सत्याची प्राप्ती हे जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे. अध्यात्म हा उत्कट नैतिक जीवनाचा आधार आहे. माणसाच्या मनात इतरांसाठी त्याग करण्याची आणि इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची प्रेरणा का निर्माण होते याचं उत्तर भौतिकवादातून मिळत नाही, ते उत्तर अध्यात्मशास्त्रात मिळतं. धर्माचा पाया मजबूत असेल तरच समाज संघटित होईल. वेदांच्या अध्ययनामुळे जीवनाच्या सर्व समस्या सुटतील आणि जगात सुख, शांती आणि तेज वगैरे गुणांचा फैलाव होईल.'

ही मतं असायला हरकत काहीच नाही. परंतु, भारतीय अध्यात्म हा नैतिक जीवनाचा एकमेव आधार आहे असं मान्य केलं, तर त्याचा दुसरा अर्थ ज्यांच्याकडे भारतीय अध्यात्म नाही त्यांच्या समाजात नैतिकता नाही, असं समजायचं का? त्याग करण्याची प्रेरणा अध्यात्मातून निर्माण होत असेल तर तत्त्वज्ञानासाठी सॉक्रेटिसने विषप्राशन करून आपल्या जीवनाचा त्याग केला ती भावना कुठून आली, असं वाचकाने समजायचं? या बाबतीत पु. ग. सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे, की सत्यासाठी पराकोटीचा त्याग करायला तयार असणाऱ्या विभूती ही पाश्चात्त्य संस्कृतीने आधुनिक जगाला दिलेली देणगी आहे. गॅलिलिओ, कोपर्निकस, जिऑर्डिनो ब्रुनो, मारी क्युरी अशी किती तरी नावं सांगता येतील.

याशिवाय, गुरुजी म्हणतात की धर्माचा पाया मजबूत असेल तरच समाज संघटित होतो. हे मान्य करायचं म्हटलं तर हिटलरच्या जर्मनीत कुठल्या धर्मतत्त्वावर समाज संघटित झाला, असं आपण समजायचं? किंवा फ्रेंच राज्यक्रांतीनंतर लोकशाही तत्त्वांच्या आधारावर पाश्चात्त्य समाज संघटित झाले त्याविषयी आपण काय विचार करायचा असा प्रश्न उभा राहतो.

भारतीय संस्कृतीविषयी उदात्त मतं व्यक्त करत असताना पाश्चात्त्य संस्कृतीविषयी गुरुजी अतिशय प्रतिकूल विधानं करताना दिसतात. पाश्चात्त्य संस्कृती, भौतिकवाद, जडवाद आणि भोगवाद हे सर्व शब्द गुरुजी जवळजवळ एकाच अर्थाने वापरताना दिसतात. त्यांची काही वाक्यं बघितली तर आपल्या हे लक्षात येतं. उदा. साम्यवाद आणि लोकशाही यांचा जन्म भौतिकवादातून झालेला आहे. पाश्चात्त्य जीवन बहिर्मुख आहे. तिथे जास्तीत जास्त सुखोपभोग हेच जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. मनावर निरंकुश प्रभुत्व गाजवण्यास सर्व इंद्रियांना मोकाट सोडावं आणि अशा प्रकारे मनुष्य पशुवृत्तीचा गुलाम बनावा हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेचं सूत्र आहे. पाश्चात्त्यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील इतिहासातून स्फूर्ती घेणं हे गुलामवृत्तीचं लक्षण आहे. गीतेच्या सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी संपत्ती यांचं वर्णन आहे. त्याप्रमाणे पश्चिमेची प्रवृत्ती आसुरी आहे.

व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे पशुवृत्तीला आमंत्रण हे कसं मान्य करायचं? व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पशुवृत्तीच्या गुलामीचं समर्थन करत होते, असं नक्कीच म्हणता येऊ शकत नाही. डॉ. आंबेडकरांचं एक वाक्य आहे -

'Liberty cannot be divorced from equality, equality cannot be divorced from liberty. Nor can liberty and equality be divorced from fraternity.' 

(स्वातंत्र्य, समानतेपासून विलग करता येत नाही आणि समानता स्वातंत्र्यापासून विलग करता येत नाही; आणि स्वातंत्र्य आणि समानता या दोन गोष्टी बंधुभावापासून विलग करता येत नाहीत.)

डॉ आंबेडकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्यामधील वैचारिक फरकाचा हा तिढा सोडवायचा कसा?

हिंदुत्ववादी विचारवंत स. ह. देशपांडे ‘पाश्चात्त्य संस्कृती फक्त भोगवादी आहे' या गुरुजींच्या विधानाबद्दल लिहितात, निसर्गविज्ञान, समाजविज्ञान, तत्त्वज्ञान, विविध कला अशा अनेक क्षेत्रांत पाश्चात्त्य देशांनी आघाडी मारलेली आहे. ही क्षेत्रं म्हणजे मानवी मनाच्या आणि बुद्धीच्या शक्तीच्या आविष्काराची क्षेत्रं. ज्या समाजात बौद्धिक आणि मानसिक विकासाला पराकोटीचं स्थान दिलं गेलं आहे त्याला भोगवादी किंवा शरीरवादी कसं म्हणायचं? पाश्चात्त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील इतिहासातून स्फूर्ती घेणं हे गुलामवृत्तीचं लक्षण आहे, या वाक्यावरसुद्धा असेच आक्षेप घेतले जातात. सर्वांत मुख्य आक्षेप म्हणजे इटलीच्या मॅझिनीने घडवलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेकडून स्फूर्ती घेणारे सावरकर हे पश्चिमेचे गुलाम होते, असं म्हणता येईल का?

हेही वाचा - ध्येयवाद ते ध्रुवीकरण - प्रवास भारतीय पत्रकारितेचा

भारतीय संस्कृती महान आहे यात वाद असायचं काहीच कारण नाही. भारतीय संस्कृतीचा आध्यात्मिक पाया अतिशय उदात्त आहे हेसुद्धा मान्य करावंच लागेल. पण म्हणून अख्खी पाश्चात्त्य संस्कृतीच्या संस्कृती जडवादी आणि भोगवादी आहे असं कसं म्हणता येईल? तिथेही माणसंच राहत आहेत, त्यांच्यात जशा शारीरिक प्रेरणा आहेत तशाच उदात्त अशा आध्यात्मिक प्रेरणाही आहेत. अशा संस्कृतीला गुरुजी म्हणतात तसं नाकारता कसं येईल?

योगी अरविंद यांचं म्हणणं इथे जास्त महत्त्वाचं वाटतं. अरविंद म्हणतात, की भारतीय संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृती यांच्यात अत्यंत प्रगत पातळीवरचं संश्लेषण झालं पाहिजे, ‘सिंथेसिस' झालं पाहिजे. भारताने पाश्चात्त्य संस्कृतीमधल्या चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत.

त्यांची एकूण भूमिका अशी, की -

India should assimilate the West's strength-its scientific rigor, dynamic active energy and mastery over physical matter...

(पाश्चात्त्य संस्कृतीची विज्ञानावरची निष्ठा आपण स्वीकारली पाहिजे. त्यांची सतत काम करत राहण्याची ऊर्जा म्हणजे त्यांची डायनॅमिक एनर्जी आपण स्वीकारली पाहिजे आणि त्यांनी जड जगतावर कमावलेलं प्रभुत्व आपण स्वीकारलं पाहिजे. या विशाल शक्तीला जर पौर्वात्य संस्कृतीचा पाया असलेल्या अध्यात्माचं अधिष्ठान लाभलं तर संपूर्ण मानवजात एका उच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण होईल.)

पाश्चात्त्य संस्कृतीने उभारलेला व्यक्तिवाद ही जगाच्या वैश्विक उत्क्रांतीमधील, ‘कॉस्मिक इव्होल्युशन'मधील एक अतिशय गरजेचा टप्पा आहे असं योगी अरविंद सांगतात. योगी अरविंद यांची ‘द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' आणि ‘द रेनेसान्स इन इंडिया' ही पुस्तकं या दृष्टीने वाचण्यासारखी आहेत.

या संदर्भात स. ह. देशपांडे यांनी प्रसिद्ध राजकीय विचारवंत कार्ल पॉपर यांचं एक वाक्य उद्धृत केलेलं आहे. पॉपर म्हणतात, की ‘पाश्चात्त्य जगाचा एकूण नैतिक स्तरच उंचावलेला आहे, याचं कारण माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हे तत्त्व इथे खोलवर रुजलेलं आहे'. भारतात मात्र माणसाला नाही तर जातीला महत्त्व मिळतं, असं इथे स. ह. अत्यंत सूचकपणे व्यक्त करत आहेत. असो.

थोडक्यात बोलायचं, तर एका बाजूला डॉ. आंबेडकरांच्या बुद्धिप्रामाण्यवादी जीवनदृष्टीतून पाहताना आणि दुसऱ्या बाजूला योगी अरविंदांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहतानाही गोळवलकर गुरुजींच्या विवेचनाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात.

शासन आणि धर्म यांच्यातील परस्पर संबंधांबाबत गुरुजींची भूमिका धर्मनिरपेक्षतेची नसून सर्वधर्मसमभावाची आहे. वरवर बघता गुरूजींची अशी वाक्यं वाजवी वाटतात. परंतु ती एकमेकांशी जोडून बघितली, तर मोठे प्रश्न उभे राहतात. ‘शासन सर्वधर्मसमभावाने वागणारे हवे,' या गुरूजींच्या वाक्यापुढे ‘देशातील सर्व धर्मांनी हिंदू धर्म हा राष्ट्रीय धर्म असल्याने तो स्वीकारला पाहिजे आणि मान्य केला पाहिजे' - हे वाक्य ठेवलं की भारतात सर्वधर्मसमभाव असला तरी भारतातील बहुसंख्यांच्या धर्माला जास्त महत्त्व दिलं जायला पाहिजे हे तत्त्व पुढे येतं. मग कसला सर्वधर्मसमभाव?

इथून पुढच्या वाटचालीत संघाने १९५६ साली सर्वधर्मसमभाव ही संकल्पना मागे सारून सर्वपंथसमभाव ही संकल्पना आणली. यात इस्लाम एक ‘व्यक्तिगत धर्म' म्हणून असायला हरकत नाही असं म्हटलं गेलं. संघाचं इथे असं म्हणणं आहे, की प्रत्येक भारतीय मुसलमान खरं तर पूर्वाश्रमीचा हिंदूच आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीशी एकरूप व्हायला त्याची काही हरकत असायचं कारण नाही. परंतु अशी एकरूपता साधायची असेल तर त्याने या संस्कृतीच्या पलीकडे जाणाऱ्या कुठल्याही संकल्पनेवर निष्ठा ठेवता कामा नये. इथे संघ, ‘उम्माह' म्हणजे ‘इस्लामिक ब्रदरहुड'विषयी बोलत आहे हे उघड आहे. म्हणजे भारतीय मुसलमानाने भारतीय संस्कृतीवर निष्ठा ठेवायची आहे, जगातल्या मुसलमानांच्या बंधुत्वावर नाही. वरवर पाहता हे वाक्यही एकदम योग्य वाटतं. परंतु, इथे गंमत अशी आहे, की उम्माह म्हणजे जगातल्या सर्व मुसलमानांमधले बंधुत्व हे इस्लाम धर्माचे मूलतत्त्व आहे. म्हणजे मुसलमान लोकांनी आपल्या धर्माच्या एका मूलतत्त्वाशी फारकत घ्यायची! संघाच्या या भूमिकेचा दुसरा अर्थ असा, की इस्लामला धर्म म्हणून सर्वधर्मसमभाव या संकल्पनेत प्रवेश नाही.

दुसरं असं, की सर्वपंथसमभाव या संकल्पनेत संघ इतर अनेक धर्मांना ‘पंथ' म्हणत आहे. इथे धर्म एकच आणि तो म्हणजे हिंदू ‘राष्ट्रीय' धर्म! बाकी शीख, जैन, बौद्ध वगैरे धर्मांना संघ हिंदू ‘संस्कृती'ची अंगं म्हणतो. हिंदू संस्कृती म्हणजे काय, तर हिंदू धर्माच्या तत्त्वांवर आधारलेली संस्कृती. ही भूमिका अर्थातच इतर धर्मांतल्या लोकांना मान्य नाही. हा संघप्रणित वर्चस्ववाद आहे असं हे अन्यधर्मीय म्हणताना आपल्याला दिसतात. म्हणजे पहिल्यांदा संघ धर्मनिरपेक्षतेवरून सर्वधर्मसमभावावर आला आणि मग सर्वपंथसमभावावर आला. इथे फक्त हिंदू संकृती आहे आणि बाकी सारे तिच्या आधाराने जन्मलेले पंथ आहेत, अशी एकूण भूमिका आहे. या प्रकारात हिंदुधर्मीय सोडला तर इतर सर्वधर्मीय लोकांना ‘पंथिक' म्हणून वावरावं लागतं. इथे टीकाकार म्हणतात, की हिंदू राष्ट्रीय धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म हे सगळे शब्दांचे खेळ आहेत. सगळा प्रोजेक्ट हिंदू धर्माचं वर्चस्व स्थापन करण्याचा आहे.

या विचारशैलीचे टीकाकार पुढे म्हणतात, की एकदा हिंदू धर्माला संस्कृतीच्या पदावर नेलं की बाकी सारे धर्म पंथ बनतात, खुजे बनतात. या साऱ्या धर्मीयांचं म्हणणं आहे, की ही संस्कृती श्रीमंत होण्यात आमच्याही धर्माचा, त्याने आणलेल्या जीवनशैलीचा आणि त्याने आणलेल्या समानतेच्या विचारसरणीचाही भाग आहे. ही संस्कृती घडवण्यात आमचाही वाटा आहे. तुम्ही आम्हाला या संस्कृतीच्या आधाराने वाढलेले पंथ का म्हणता आहात?

शीख म्हणा किंवा जैन धर्म म्हणा किंवा बौद्ध धर्म म्हणा, या सगळ्यांमध्ये माणसामाणसांमधील समानता अधोरेखित केली गेलेली आहे असं हे धर्म आवर्जून सांगतात. गोळवलकर गुरुजींच्या काळात संघाने भारतीय घटनेला विरोध केला होता. भारतीय घटना ही पाश्चात्त्य संकल्पनांवर आधारित आहे आणि ही घटना भारतीय संस्कृतीमधील उदात्त समाजविषयक आणि कायदेविषयक संकल्पनांचा आदर करत नाही, अशी भूमिका घेतली गेली. संघाचं मुखपत्र ‘ऑर्गनायझर'मधून तर ‘कुठे मनूसारखा ऋषी आणि कुठे आंबेडकरांसारखा खुजा घटनातज्ज्ञ', अशी टीकाही केली गेली होती. (ऑर्गनायझर, ११ जानेवारी १९५०).

आता काळाच्या ओघात संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रातःस्मरणीय मानलं आहे. बाबासाहेब हे आधुनिक ऋषी आहेत असं म्हटलं आहे. संघाने गांधीजींनाही प्रातःस्मरणीय मानलं आहे. संघाने आपल्या पूर्वीच्या अनेक भूमिकांमध्ये काळाच्या ओघात बदल केले आहेत. पूर्वी, भारतीय संस्कृतीमधील वर्णव्यवस्थेला पाठिंबा परंतु जातिव्यवस्थेला विरोध, अशी संघाची भूमिका होती. माणसाच्या गुणांवरून त्याचा वर्ण ठरवण्याची पद्धत प्राचीन भारतात होती आणि या पद्धतीमुळे सामाजिक न्याय आणि स्थिरता साधली जात होती, या वर्णव्यवस्थेमुळे आर्थिक स्पर्धा कमी होऊन समाज स्थिर राहत होता, अशी भूमिका संघाने घेतली होती. गुरुजी, दीनदयाळ उपाध्याय आणि एकनाथ रानडे हे सगळे संघाचे विचारवंत वर्णव्यवस्था इष्ट आहे पण जातिव्यवस्था अनिष्ट आहे अशी भूमिका मांडत होते. आता मात्र संघाने वर्ण आणि जात या दोन्ही व्यवस्था नाकारल्या आहेत.

२८ ऑगस्ट २०२५च्या रा. स्व. संघाच्या शतकपूर्ती समारंभात बोलताना सध्याचे सरसंघचालक म्हणाले आहेत, की ‘आता आधुनिक युगात मनुस्मृतीऐवजी नवीन स्मृती बनवली गेली पाहिजे'. संघाची स्त्रियांच्याबद्दलही भूमिकाही अशाच पद्धतीने बदलत चालली आहे. उदाहरणार्थ, पूर्वी हिंदू कोड बिलाला संघाने विरोध केला होता. तेव्हा स्त्रियांना बरोबरीचे वारसा हक्क द्यायला संघाचा विरोध होता. आता स्त्रियांना असे हक्क दिले जावेत अशी संघाची भूमिका आहे. आंबेडकर, गांधीजी, मनुस्मृती, वर्णव्यवस्था आणि स्त्रीचे समाजातील स्थान अशा अनेक बाबतींत संघ बदलत चालला आहे. आपल्या हिंदुत्वाच्या संकल्पना बदलत चालला आहे. काही लोक याला ‘पोलिटिकल कम्पल्शन्स'पुढे मान तुकवणं असं म्हणत आहेत, काही लोक याला ‘कोर्स करेक्शन' म्हणत आहेत आणि काही लोक याला काळाच्या ओघात स्वतःला उत्क्रांत करत जाणं असं म्हणत आहेत.

लोकशाही ही एक पाश्चात्त्य संकल्पना आहे आणि या लोकशाहीमध्ये केवळ वर्तमानकाळातल्या बहुमतापुढे पूर्वजांचं शहाणपण व्यर्थ ठरतं, अशी संघाची भूमिका होती. अशा लोकशाहीमध्ये व्यक्तिवादामुळे सांस्कृतिक राष्ट्रीयतेचा पराभव होतो, अशी संघाची भूमिका होती. राष्ट्रीयतेमध्ये व्यक्ती विरून गेली पाहिजे, अशी संघाची भूमिका होती. आज संघाला व्यक्तिस्वातंत्र्यवादी आंबेडकर स्वीकारावे लागत आहेत. पूर्वी संघाने ज्या ज्या संकल्पनांना विरोध केला होता त्यातल्या बहुसंख्य संकल्पना संघाला आज स्वीकाराव्या लागत आहेत.

संघाचे हिंदू जीवनमूल्यांविषयीचे विचार अंतर्विरोधांनी ग्रस्त होते म्हणून ही ‘कोर्स करेक्शन'ची वेळ आली आहे. स. ह. देशपांडे यांनी आपल्या ‘हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख' या पुस्तकात संघाच्या विचारांतील अंतर्विरोधांना ‘तात्त्विक अराजक' असं म्हटलं आहे. स. ह. म्हणतात, की हिंदुत्ववाद्यांनी काढलेलं प्राचीन भारतीय संस्कृतीचं चित्र स्वप्नरंजनात्मक झालेलं आहे. त्या चित्राचा आणि खऱ्या जगातील परिस्थितीचा काहीही संबंध नाही. वाद काहीही असले आणि कितीही असले तरी संघाचा राष्ट्रविचार खरं तर महत्त्वाचा आहे. योगी अरविंद यांनी आपल्या ‘फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' या ग्रंथातही ‘राष्ट्र-आत्मन' ही संकल्पना मांडली आहे. परंतु ही संकल्पना मांडताना अरविंद व्यक्तीचे महत्त्व कमी करत नाहीत. अरविंद म्हणतात, की संस्कृती ही स्थिर नसून एक जिवंत आध्यात्मिक चळवळ असते आणि राष्ट्राचा आत्मा ही चळवळ चालवत असतो. आपल्या ‘ह्युमन सोल' या ग्रंथात अरविंद म्हणतात, की समाज ही व्यक्तीच्या आध्यात्मिक उत्क्रांतीसाठीची सुपीक माती असते. कुठल्याही समाजाने व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणं चुकीचं आहे. व्यक्तिवादाचा अतिरेक जसा वाईट त्याप्रमाणे राष्ट्रवादाचा अतिरेकही वाईट, असं योगी अरविंदांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे.

अध्यात्ममार्गाने जावं तर अरविंद आणि गांधीजी संघाच्या विचारांवर असहमती दर्शवत आहेत आणि सेक्युलर मार्गाने जावं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी भूमिका मांडत आहेत. या सगळ्या विचारांच्या मंथनातून संघाच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेची विचारयात्रा सुरू आहे. संघाने गांधी आणि आंबेडकर यांच्याबद्दल पुनर्विचार केला, तसाच पुनर्विचार मुसलमानांबद्दलही सगळ्याच हिंदुत्ववादी संघटनांना करावा लागणार आहे.

मुसलमान कधीही बदलू शकत नाही, या भूमिकेवर सावरकरवादी आणि इतर हिंदुत्ववादी लोकांनीही पुनर्विचार करायला पाहिजे. कारण गेल्या तीस-चाळीस वर्षांत युनायटेड अरब अमिरात, कतार, इंडोनशिया, तुर्किए आणि मलेशिया या मुस्लिम देशांनी आधुनिक विज्ञानाला आपल्या कवेत घेऊन प्रचंड आर्थिक प्रगती केली आहे. या मुस्लिम देशांनी आपली परंपरा ‘रीइंटरप्रीट' केली आहे. या देशांनी विज्ञान, टेक्नॉलॉजी आणि ग्लोबलायझेशन या गोष्टींना आपल्या कवेत घेतलं आहे. आधुनिक उद्योजकता आपल्या अंगी बाणवली आहे आणि आपापल्या देशामधल्या न्यायव्यवस्थेसारख्या सगळ्या इन्स्टिट्युशन्स आधुनिक केल्या आहेत. या गोष्टी त्यांनी केल्या नसत्या तर त्यांची जी अतिप्रचंड आर्थिक प्रगती झाली ती झालीच नसती.

हा विषय इतका मोठा आहे की या विषयाच्या सगळ्या अंगांची चर्चा एका लेखाच्या मर्यादेत बसूच शकत नाही.

संघ आणि सावरकरवादी बोलताना उदात्त बोलतात आणि वागताना मात्र चाणक्यनीतीच्या गोंडस नावाखाली अत्यंत ‘सिनिकली' वागतात, असा आरोप केला जातो. या दुहेरी नीतीचा उल्लेख झाल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही. हा लेख मुख्यतः हिंदुत्वाच्या वैचारिक जडणघडणीवर केंद्रित केलेला आहे. हा वैचारिक इतिहास लक्षात घेतल्याशिवाय हिंदुत्ववादाच्या पुढच्या पाऊलखुणांचा वेध घेणं योग्य ठरणार नाही. हा इतिहास लक्षात न घेता चर्चा झाली तर ती फक्त राजकारणाची चर्चा ठरेल.

या लेखात भाजपने राजकारणात उतरवलेल्या हिंदुत्व विचाराची चर्चा केलेली नाही. तोसुद्धा एका वेगळ्या आणि विस्तृत लेखाचा विषय आहे. परंतु एक गोष्ट नक्की, की गेल्या पंचवीस वर्षांत हिंदू समाज सनातन धर्म आणि लोकशाही मूल्यं यांच्या संघर्षात सापडला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत जेन झी आणि मिलेनियल पिढ्या व्यक्तिवादी जीवनमूल्यांवर आपली मतं आधारून वाटचाल करत आहेत. हा देश सर्व धर्मांचा आहे असं ८१ टक्के युवक मानत आहेत, असं लोकनीती-सीएसडीएससारखे सर्व्हे सांगत आहेत. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत बाबरी मशीद प्रकरण, काश्मीर प्रश्न, पाकप्रणित आतंकवाद, भारतात झालेले विविध आतंकवादी हल्ले, गोध्रासारख्या दंगली असं सगळं झालं तरी भारतीय युवक ही मतं मांडत आहे. आजचा युवक जगभरच्या आधुनिक विचारांशी सोशल मीडिया आणि ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म्समुळे जोडला जात आहे त्याचा हा परिणाम आहे. हे विचार आता बदलत जातील अशी शक्यता नाही. गेल्या पंचवीस वर्षांत विविध धर्मीय एकमेकांत जास्त जास्त मिसळत आहेत. या परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादाला स्वतःला ‘रीइन्व्हेंट' करावं लागणार आहे.

शेवट करताना तीन गोष्टी मांडाव्याशा वाटत आहेत. एक म्हणजे सेक्युलर लोकांना आवडो ना आवडो, आज हिंदुत्व ही महत्त्वाची विचारधारा बनून राहिली आहे हे मान्य केलंच पाहिजे. हिंदूंचा एक दबावगट म्हणून संघाचं स्थान महत्त्वाचं आहे हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्ववाद्यांना आवडो, ना आवडो गांधीजींनी अधोरेखित केलेला उपनिषदांमधला वैश्विक बंधुत्वाचा विचार चिंतनात आणि आचरणातही स्वीकारल्याशिवाय हिंदुत्वाची कुठलीही संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबेडकरांच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्याला वळसा घालून भारत कुणालाही पुढे जाऊ देणार नाही.

(अनुभव, ऑक्टोबर २०२६च्या अंकातून साभार)

श्रीनिवास जोशी

श्रीनिवास जोशी नाटककार आहेत आणि गेली दोन दशके वैचारिक लिखाण करत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results