कोकण आणि गोवा भागातील काही गावांमधून नुकतीच राखणदार यात्रा काढण्यात आली. निसर्ग आणि लोकसंस्कृतीविषयी सजग असलेल्या १८ जणांनी १२ गावांतून १२० किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा पूर्णं केली. स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवणं हे या यात्रेचं उद्दिष्ट होतं. विकासाच्या नावाखाली कोकणाला ओरबाडू देणार नाही, असा निर्धार करत हे यात्रेकरून पुढच्या टप्प्यात कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांत फिरणार आहेत. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मल्हार इंदुलकर यांच्याशी साधलेला संवाद..
राखणदार यात्रा म्हणजे नेमकं काय?
कोकणातील लोक निसर्गाला देव मानतात. इथलं जंगल क्षेत्रही मोठं आहे. अनेक गावांमध्ये देवराया (देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल) आहेत. या निसर्गाचं संरक्षण गावातील ग्रामदैवतं करतात अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. आधी नैसर्गिक आपत्ती आली की त्यापासून बचावासाठी राखणदाराचा धावा केला जायचा. अलीकडच्या काळात मात्र मोठ्या उद्योगपतींनी, बिल्डर्सनी आणि काही राजकारण्यांनी एकत्र येत कोकणातल्या जल-जंगल-जमिनीची नासधूस करायचं ठरवलं आहे. या लोकांपासून गावं सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही राखणदार यात्रा काढली आहे. राखणदार ही कुणी व्यक्ती किंवा देवता नाही, ती एक प्रवृत्ती आहे – निसर्गरक्षणाची प्रवृत्ती. ज्या गावांमध्ये आम्ही जातोय त्या प्रत्येक गावात काही न काही समस्या आहेत. त्या समस्यांची चर्चेतून आणि संघटित लढ्याच्या माध्यमातून सोडवणूक करण्याचं काम आम्ही राखणदार यात्रेतून करतोय.
ही यात्रा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं?
कोकण आणि गोवा भागात अलीकडे अनेक विकास प्रकल्प येऊ घातले आहेत. या प्रकल्पासाठी जल, जंगल आणि जमिनीचा ऱ्हास करण्याचं काम सुरू आहे. इथल्या स्थानिक लोकांना शहरी जीवनशैलीचं आमिष दाखवून त्यांच्या जमिनी बळकवायच्या, त्या जमिनीवर रिसॉर्टस, मॉल उभे करायचे आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना इथे मौजमजा करायला खुली सूट द्यायची असे प्रकार अलीकडे सर्रास घडत आहेत. यासंदर्भात आम्ही दिल्ली काबिज केली, आता गोवाही ताब्यात घेऊ असं भांडवलदार लोक म्हणतायत. दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. विकासाची नवी व्याख्या करत असताना कोकणी लोकसंस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये वाढीस लागली होती. यासंदर्भात गावकऱ्यांचं म्हणणं समजून घेणं, त्यांचा संघर्ष नेमका काय आहे ते पाहणं, कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभारणं, एकत्र येऊन चर्चा करणं आणि या चर्चेतून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणं असं राखणदार यात्रेचं स्वरूप आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर पर्यावरणीय आव्हानाच्या विरोधात स्थानिक मंडळी देत असलेला हा संघटित लढा आहे.
जल-जंगल-जमिनीची नासधूस होतेय म्हणजे नेमकं काय घडतंय?
रायगड-रत्नागिरी भागातील बऱ्याच लोकांनी नोकरीसाठी पुण्या-मुंबईचा रस्ता धरलाय, तर सिंधुदुर्गमधील लोक नोकरीसाठी गोव्याला जायला प्राधान्य देतात. गोव्याचं मोपा विमानतळ जवळ असल्याने त्याच्या आसपासच्या ४०-५० किलोमीटर गावांतील जमिनी विकसित करण्यासाठी मोठे उद्योगपती पुढाकार घेत आहेत. दोडामार्ग-गोवा-कर्नाटक सीमारेषेवरच्या जमिनीला मोठी मागणी आहे. दिल्लीवरून गोव्याचा विमानप्रवास अगदी एक ते सव्वा तासाचा असल्याने इथल्या जमिनी घेण्याकडे लोकांचा वाढता कल आहे. शेतजमिनीतील पिकांमधून जास्त पैसे मिळणार नाहीत हे समजल्यानंतर अलीकडे हे लोक आपल्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकू लागले आहेत. घरात कुणी बेरोजगार असेल तर हे पैसे घेऊन शहरात छोटा-मोठा उद्योग-व्यवसाय करण्याचा प्रयत्न ते करताहेत. आसपासच्या शहराच्या ठिकाणी गेल्यानंतर हाताशी चार पैसे येतात आणि चैन म्हणून चार गोष्टी करण्याची इच्छा लोकांना होते. लग्न चांगलं करायचं तर मोठं घर बांधण्याकडे लोकांचा कल असतो. लोकांना स्थानिक दलालांच्या मार्फत या सगळ्या गोष्टींचं आमिष दाखवून त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचं काम अलीकडे सर्रास सुरू आहे. औद्योगिकीकरण, पर्यटन, बांधकाम, मॉल संस्कृती रूजवण्याच्या भांडवलदारांच्या या खटपटीला सामान्य कोंकणी माणूस बळी पडत असल्याचं आम्हाला जाणवत होतं. यामुळे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत असल्याचं लक्षात आल्यामुळेच आम्ही राखणदार यात्रा काढायचं ठरवलं.
या यात्रेचा मार्ग कसा होता? यात्रेत नेमकं काय घडलं?
सिंधुदुर्ग आणि गोवा भागातील काही गावं राखणदार यात्रेसाठी निश्चित करण्यात आली होती. यात्रेची सुरुवात कणकवली येथील कणकुंबीच्या माऊली देवी मंदिरापासून करण्यात आली. पुढे केरी, विर्डी, कारापूर, दोडामार्ग, भेडशी, कुडासे, शिरवळ, झोळंबे, तांबोळी, बांदा, विलवडे असा यात्रेचा मार्ग होता. अनेक गावांमध्ये आम्ही सातेरी देवी, माऊली, भूमिका देवी आणि शांतादुर्गा या ग्रामदेवतांच्या मंदिरात एकत्र जमलो. एकूण १२० किलोमीटरच्या टप्प्यातील ही गावं. हा प्रवास आम्ही १८ लोकांनी मिळून १३ ते १६ जून या ४ दिवसांत पूर्ण केला. गावामध्ये गेल्यानंतर संपूर्ण गावातून फिरणं आणि लोकांना पत्रक देणं हे काम आम्ही पायी चालत करायचो. प्रत्येक गावातील शंभर ते दीडशे लोक आमच्यासोबत फिरायचे. गावातील लोकांना माहिती सांगून झाल्यानंतर मंदिराच्या ठिकाणी चर्चेसाठी लोक एकत्र जमायचे. ही चर्चा झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या गावात आमच्या वाहनाने जायचो. रात्रीच्या वेळचा मुक्काम मंदिरात किंवा लोकांच्या घरी असायचा. नाष्टा, जेवणाची सोयही त्या त्या गावांतील कार्यकर्ते करायचे. पर्यावरणावर आणि कोकणी माणसाच्या अस्तित्वावर घाला येऊ नये यासाठी जागरूक असलेल्या या मंडळींमुळेच आमची यात्रा यशस्वी ठरली.
यात्रेत पूर्णवेळ सहभागी असलेले साथीदार कोण होते?
प्रसाद गावडे (कोंकणी रानमाणूस), अविनाश उषा वसंत, सत्यजित चव्हाण, विनीत विचारे, अक्षय सावंत. ऋषिकेश पाटील, फिजा मकानदार, ऐश्वर्या सावंत, सागर नानोसकर, राजीव नावथे, रोहित पेडणेकर, लक्ष्मण शेर्लेकर, भालचंद्र परद, जगदीश गावडे, ऋषिकेश पाळंदे, सोमेश काणेकर, कृष्णा गुणाजी सावंत आणि मी असे आम्ही १८ जण चार दिवसांच्या राखणदार पदयात्रेत सहभागी होतो.
ज्या गावांमध्ये तुम्ही गेलात तिथल्या समस्या नेमक्या काय होत्या?
कणकुंबी हे ठिकाण म्हणजे म्हादाई नदीचं उगमस्थान. या ठिकाणी नदीचं पात्र वळवून ते मलप्रभेला जोडलं जात आहे. त्यासाठी पाण्याच्या पात्राखालून बोगदा करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याचे गंभीर परिणाम गावकऱ्यांवर होणार आहेत. नदीपात्रातील संरक्षक कठडे मोडकळीस आले आहेत.
त्यापुढील विर्डी हे सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेलं गांव. या गावात सातेरी देवीचं मंदिर आहे. या गावापासून केरी हे गाव सहा किलोमीटर अंतरावर तर दोडामार्ग साधारण २५ ते २७ किलोमीटर अंतरावर आहे. या गावापासून गोवा जवळ असल्याने इथल्या बहुतांश तरुणांनी तिकडेच नोकरी पकडली आहे. गोव्यात सरकारी नोकरी सहज मिळेल, लाईफस्टाईल चांगली असेल असा विचार तरुण करतायत. अनेकांनी गावातील जमिनी विकल्या असून गोव्यातच स्थायिक व्हायचं ठरवलं आहे. अनेकांचं नाव गावच्या मतदान यादीत नाही. खरं तर हे गाव पर्यटन व्यवसायासाठी पूरक आहे. पण सध्या तिथे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. फक्त वझर धबधबा परिसरात लोक दारू पिऊन धिंगाणा घालतात. गोव्याहून ड्रग्ज घेऊन गावात येतात. एकुणातच व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले तरुण गावासाठी धोकादायक बनले आहेत. कोडासे गावातील तिलारी नदीच्या आसपास असंच पार्टी कल्चर जोर धरत आहे. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांचा बाहेरच्या लोकांवरील रोष वाढत आहे.
हेही वाचा - विकासाच्या स्वप्नासाठी पुन्हा आदिवासींचाच बळी
दोडामार्ग-सावंतवाडी पट्टा हा वन्यप्राण्यांसाठी संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. या भागातून लोहखनिज मिळवलं जातं. खाणकाम आणि रस्त्याच्या कामासाठी गेली अनेक वर्षं मोठाले डोंगर कापणं सुरू आहे. याशिवाय मोठाले रिसॉर्ट बांधण्यासाठी हजारो झाडं छाटण्यात आली आहेत. या सगळ्याचा परिणाम पावसाळ्यात दिसून येतो. डोंगर खचण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने या भागातील २५ गावांना इको-सेन्सिटीव्ह झोनचा दर्जा देण्यात आला आहे. विलवडे गावातील लोक डोंगर पोखरून काढल्या जाणाऱ्या क्रशरच्या विरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. कारापूर भागात बिल्डरच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीन महिने पूर्ण होतील.
कारापूरमधील आंदोलनाचा नेमका विषय काय आहे?
कारापूर हे उत्तर गोव्याच्या डिचोली तालुक्यातील एक निसर्गसंपन्न गाव आहे. या गावातील डोंगराचा टेबलटॉप पोखरून तिथे रियल इस्टेट साईट डेव्हलप करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या जमिनीवर स्थानिक मुणगेकार लोकांच्या कुळांची नावं होती. भाजप आमदार विश्वजीत राणे यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून ती नावं परस्पर कमी केली आणि ही जमीन अभिनंदन लोढा यांना हस्तांतरित केली. अभिनंदन हे महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे चिरंजीव आहेत. लोढा यांना कारापूरमध्ये भव्यदिव्य बांधकाम प्रकल्प उभारायचा आहे. या प्रकल्पामुळे गावच्या लोकसंख्येपेक्षा दुपटीने अधिक लोक या जागेत रहायला येण्याची शक्यता आहे. डोंगर उद्ध्वस्त केल्याने डोंगरावरील पावसाचं जे पाणी पिण्यासाठी आणि फळबागेसाठी वापरता येत होतं ते आता येत नाही. शिवाय बांधकाम साईटवरील दूषित सांडपाणी जवळच्या नदीत सोडलं जात असल्याने प्रदूषण वाढलं आहे. सध्या तरी बांधकाम साईटकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आलेला असून जागेभोवती पत्र्याचं कुंपण टाकण्यात आलेलं आहे. गावातील लोकांचा आवाज क्षीण करण्याचा प्रयत्न उद्योगपती आणि राजकारण्यांकडून चालला आहे. त्याविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते ७५ दिवसांपासून लढा देत आहेत. मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून या लढ्याला हवं तेवढं कव्हरेज मिळत नसलं तरी लोक टिकून आहेत. या सगळ्या घडामोडी कोकणाबाहेरही पोहोचायला हव्यात, असं आम्हाला वाटतं आहे.
राखणदार यात्रेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद कसा होता?
गावातील लोक स्वतःच्या जमिनीबद्दल जागरूक झाले आहेत. राजकीय लोकांसाठी आणि उद्योगपतींसाठी काम करणारे गावातील दलाल कोण आहेत हे त्यांना समजल्यामुळे त्यांच्याविरोधात ते उघड भूमिका घेऊ लागले आहेत. शिरवल गावातील गावकऱ्यांनी स्थानिक जमिनी बाहेरच्या लोकांना विकायच्या नाहीत असा ठराव केलेला आहे. या गावात लोकांनी उत्स्फूर्तपणे पदयात्रेत आणि चर्चेत सहभाग घेतला. दारोदारी जाऊन पत्रकं वाटली. पूर्ण यात्रेत सहभागी असलेल्या लोकांची सर्व सोय स्थानिक गावकऱ्यांनीच केली. यात्रेला संरक्षण म्हणून काही पोलिस सोबत होते. त्यांनी कसल्याही प्रकारचा विरोध न करता यात्रेला सहकार्य केलं. या यात्रेच्या संदर्भात राजकारणी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप कुठलीही भूमिका मांडली नाही.
या यात्रेचा पुढचा टप्पा नेमका काय असणार आहे?
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असणाऱ्या गावांमधील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी, मासेमारी करणारे लोक यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काम करण्याचा आमचा विचार आहे. राजकारणी आणि मोठ्या उद्योजकांनी कोकणाला उपभोगाचं साधन बनवायचं ठरवलेलं आहे. हे करताना गरजेचे नसलेले विकासप्रकल्प लादून कोकणचा उकिरडा केला जातोय. या प्रयत्नांना संघटितपणे विरोध करण्याचं काम आम्ही राखणदार यात्रेच्या माध्यमातून करत आहोत. शक्य त्या सर्व ठिकाणी आम्ही कृतिशील पद्धतीने आणि तीव्र विरोध करणार हे पक्कं आहे.
मल्हार इंदुलकर हे चिपळूणस्थित वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण विषयावर काम करणारे कार्यकर्ते आहेत. संपर्क - 7058826674
