मे महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. तेहरानहून आम्ही सकाळच्या ११च्या विमानाने इस्फाहानला पोहोचलो. इस्फाहान, मध्य इराणमधलं एक शहर. कोणे एके काळी हे शहर जगातल्या निवडक मोठ्या शहरांपैकी एक होतं. पर्शियन साम्राज्याच्या काळात इस्फाहानची सर्वाधिक भरभराट झाली. त्या काळात या शहराला मानाचं स्थान होतं. हे शहर पाहून प्रगत युरोपियनही आश्चर्यचकित होत असत. आता ते इराणमधलं सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ मानलं जातं. पर्शियन लोक अभिमानाने ‘इस्फाहान नस्फेजहान' (इस्फाहान म्हणजे अर्धं जग) असं म्हणत. अशा या ‘अर्ध्या जगा'त आम्ही आता भटकणार होतो.
विमानतळापासून इस्फाहान २०-२५ किलोमीटरवर आहे. आमचे गाइड अब्बासी आम्हाला न्यायला आले होते. इस्फाहान शहरात शिरल्यावर अब्बासींनी टॅक्सी प्रथम ‘पोले खाजू' या पुलावर नेली. हा पूल जगातील सर्वांत सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण पुलांपैकी एक मानला जातो. प्रथमदर्शनी हा पूल आहे की नदीवरचा राजवाडा आहे असाच प्रश्न पडतो. या दोन मजली पुलाचं सौंदर्य काही औरच आहे. पहिल्या मजल्यावर रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कमानी, पुलाच्या मध्यभागी राजाला बसण्यासाठी एक अष्टकोनी जागा. या जागेच्या छतावर मनोहारी चित्रकारी आहे. तळमजल्यावरही कमानी आणि रस्ता आहे. इथे गरज पडल्यास नदीचं पाणी अडवताही येऊ शकतं. नदी दुथडी भरून वाहत होती. नदीकाठच्या पायऱ्यांवर अनेकजण गप्पा मारत बसलेले होते. तळमजल्याला आतल्या बाजूला बसण्याची जी जागा होती तिथे काहीजणांनी संगीत-नृत्याची मैफल जमवली होती. माणसांच्या गर्दीमुळे ‘पोले खाजू' जिवंत वाटत होता. याच नदीवर पुढे ‘से-ओसे' पूल आहे. से-ओसे म्हणजे तेहतीस. या पुलाला पाण्यालगत तेहतीस कमानी आहेत. या कमानींतून पाणी वाहतं आणि वरील कमानीदार पुलावरून मुख्यत्वे माणसांचीच रहदारी असते. त्यावरून माणसं चालत, सायकलवरून वा फार तर मोपेडवरून जाऊ शकतात. हे जुने पूल माणसांच्या रहदारीकरताच आहेत. इतर मोठी वाहनं यावरून जात नाहीत. त्यामुळे या पुलावरून चालताना चालण्याचा मनसोक्त आनंद मिळतो. या नदीवर असे नवे-जुने मिळून एकूण ९ पूल आहेत.
इस्फाहानमधली आमची पहिली संध्याकाळ ही अशी नदीकाठी गेली. नदीकाठही सुशोभित होता. जिथे-तिथे फुलांचे ताटवे. नदीकाठाने चालायला सुंदर, छोट्या पायवाटा होत्या. नदीत मध्यभागी अनेक कारंजीही होती. सगळा आसमंत नटलेला वाटत होता. वारा भणाण वाहत होता. मे महिना असूनही थंडी वाजत होती. दोन्ही नदीकाठांवर फुलांनी नटलेल्या बागा होत्या. आम्ही पूल पार करून कधी या काठी, तर कधी त्या काठी असं खूप फिरलो. संध्याकाळ झाली तसे पोले खाजू, से-ओसे दोन्ही पुलांवर दिवे लागले. दिवसा देखणे दिसणारे पूल आता दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाले आणि अधिकच सुंदर दिसू लागले. त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, दिवे लागलेला नदीकाठ- डोळे या दृश्यावर खिळून राहिले होते. पोले खाजूवर राजाला बसण्यासाठी एक अष्टकोनी सज्जा बांधला आहे. दिवसा त्यावरील नक्षीकाम मोहवतं आणि रात्री सोनेरी प्रकाशात या सज्जामुळे पोले खाजूचं रूप अधिकच खुलतं.
हेही वाचा - अपने होने पे मुझको यकीन आ गया!
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही इस्फाहानमधलं एक चर्च पाहायला गेलो. शहराच्या या भागाला ‘आर्मेनियन क्वार्टर' असं म्हणतात. साधारण ४००-५०० वर्षांपूर्वी सफाव्हिद घराण्याच्या राजांसोबत आर्मेनियाहून अनेकजण पर्शियात आले आणि इथेच स्थायिक झाले. आम्ही पाहिलेल्या आर्मेनियन चर्चमध्ये ४०० वर्षांपूर्वीची अनेक चित्रं आहेत. ही चित्रं अगदी उत्कृष्ट तऱ्हेने जतन केलेली आहेत. चर्चचा परिसर सुरेख व शांत होता. या चर्चला मशिदीसारखाच घुमट होता आणि त्या घुमटाच्या मध्यभागी क्रॉस होता. दोन संस्कृतींचा असा मेळ पाहून मजा वाटली. ‘आर्मेनियन क्वार्टर'चा एकंदर परिसरच अतिशय सुबक, रेखीव व नीटस होता. तिथले अगदी लहान रस्ते पाहून लहानपणी उज्जैनला पाहिलेल्या जुन्या गल्ल्या आठवल्या; पण इथे सगळीकडे स्वच्छता होती; रस्त्यावर घाण, कचरा अजिबात नव्हता.
या गल्ल्यांमधून फिरताना एक सुरेखसं हॉटेल दिसलं. सहज म्हणून आत डोकावलो, तर तो जुन्या काळातला ‘हमाम' होता असं कळलं. सकाळी गर्दी नसल्याने मालकाने आम्हाला आत एक चक्कर मारायला परवानगी दिली. इथल्या हमामची रचना खास असते. ते भूलभुलैयासारखे असतात. एका खोलीतून दुसरी खोली, मग तिसरी, असे कोड्यासारखे ते उलगडत जातात. एकुणात, ‘आर्मेनियन क्वार्टर' हा भागही आम्हाला खूपच आवडला.
दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. परतीच्या वाटेवर गाइडने एका टेकडीवरचं एक अग्निमंदिर दाखवलं. आम्ही वरपर्यंत नाही गेलो. इथले गाइड्स आवर्जून ही मंदिरं दाखवतात. त्यांना आपल्या प्राचीन परंपरेची आठवण आहे हेच यातून दिसतं. आमच्या रस्त्यालगत एक नदी वाहत होती. नदीच्या काठाला दोन्ही बाजूंना तीन किलोमीटर अंतरापर्यंत घर बांधायला सरकारची परवानगी नाही. त्यामुळे नदीकाठी झाडी होती. काही ठिकाणी शेतीही होती. पाणी कमी असल्याने ते विचारपूर्वक वापरण्याचा कल इथे दिसला.
दुपारच्या जेवणानंतर आम्ही ‘हश्त-बेहश्त' हा राजवाडा पाहिला. ‘हश्त' म्हणजे अष्ट. मुस्लिम धर्मात स्वर्गाला आठ आणि नरकाला सात दारं असतात असं मानलं जातं. ‘हश्त-बेहश्त' म्हणजे आठ स्वर्ग. राजाच्या मुला-मुलींना खास खेळण्यासाठी बांधलेला हा राजवाडा. राजकन्या, राजपुत्रांना स्वर्गात असतील अशा सर्व गोष्टी इथे उपलब्ध होत्या. दुमजली राजवाडा, आतले दोन अष्टकोनी महाल, मनमोहक बागा, कारंजी यांच्या मध्यभागी उभा असलेला राजवाडा! स्वर्ग कुणी पाहिलाय? पण असलाच तर तो असाच असावा, असा विचार मनात येऊन गेला. राजवाड्याजवळच ‘चेहेल सोतून' हा आणखी एक राजवाडा आहे. ‘चेहेल सोतून' म्हणजे चाळीस खांबांचा राजवाडा. प्रत्यक्षात राजवाड्यात वीस खांब आहेत, पण पाण्याच्या तलावात त्याची प्रतिबिंबं पडून एकूण चाळीस खांब दिसतात. राजधानीत आलेल्या खास पाहुण्यांचं स्वागत बादशहा या राजवाड्यात करत असे. राजवाड्याला अनेक दालनं आहेत. त्यातल्या मधल्या आणि मोठ्या दालनात मोठमोठी, जवळजवळ पंधरा-वीस फूट लांब आणि रुंद अशी चित्रं लावलेली आहेत. यांतील एका चित्रात गायन-वादन करणारे कलावंत आहेत, नृत्यांगना आहेत. यात नोरुजच्या आधीचा बुधवार साजरा करताना दाखवला गेला आहे. तुर्की सुलतानाला शहा अब्बासने दिलेल्या मेजवानीचं एक चित्र आहे. एका चित्रात होळी पेटवली आहे आणि एक तरुण तिच्यावरून उड्या मारताना दाखवलेला आहे. या झोराष्ट्रियन प्रथा सतराव्या शतकातही पाळल्या जात होत्या हेच यावरून स्पष्ट होतं. यातील एक चित्र तर आपल्या इतिहासाशी निगडित आहे. शेरशहा सुरीने हुमायूँचा पराभव केल्यानंतर तो १५४४ मध्ये इराणच्या म्हणजे तेव्हाच्या पर्शियाच्या शहाकडे आश्रयाला आला होता. त्या भेटीचं हे चित्र आहे. चित्रात हुमायूँच्या मागे भारतीय लोक आणि शहासोबत पर्शियन माणसं दाखवली आहेत.
हेही वाचा - भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते
राजवाड्यातच एक मोठं कारंजंही आहे. आम्ही गेलो तेव्हा ते बंद होतं. पूर्वीच्या काळी पाहुणे आले की या पाण्यात उत्तमोत्तम अत्तरं घातली जात आणि अशा सुगंधित कारंज्यामुळे सारा आसमंत सुगंधी होत असे, असं आमच्या गाइडने सांगितलं. आता कारंज्याऐवजी तिथली फुलांनी बहरून गेलेली बाग पाहुण्यांचं स्वागत करत होती.
इथून जवळच ‘चाहार बाग' हा प्रसिद्ध रस्ता आहे. हा रस्ताही अतिशय वेगळा आहे. जाण्याचा रस्ता, येण्याचा रस्ता आणि त्यांच्या मधोमध एक विसाव्यासाठीचा सुशोभित रस्ता असे याचे तीन भाग होतात. रस्त्यावर अंतराअंतराने झाडं लावलेली आहेत, कारंजी आहेत, बसायला गोलाकार बाकं आहेत. एखाद्या परीकथेत असावा असा हा रस्ता सुंदर दिसतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकसारख्या दिसणाऱ्या एकमजली इमारती आहेत. त्यांत दुकानं आहेत. दुकानांमध्ये खरेदी करत फिरा आणि दमलात तर या मधल्या रस्त्यात बसून विश्रांती घ्या; इतरांची खरेदीची लगबग बघा. इथे आम्ही ‘होनार बाजार' पाहिला. पूर्वी ‘होन' किंवा ‘मोहोरा' सोन्याच्या असत. हा सोन्याचांदीचाच बाजार होता. बाजारचं कमान असलेलं सुंदर नक्षीदार दारच इतकं सुरेख होतं! दुपार असल्याने बाजार बंद होता, पण ते दार पाहूनच आम्ही हरखून गेलो.
असं म्हणतात, की पॅरिसचा ‘शाँ एलिझी' हा वैभवशाली रस्ता ‘चाहार बाग'वरच बेतलेला आहे. चाहार बाग रस्त्यावरचं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे ‘हॉटेल अब्बासी' ही चार-पाचशे वर्षांपूर्वीची वास्तू. ही खरं तर पूर्वीची सराई (कॅरॅव्हान) होती. सराई म्हणजे धर्मशाळा. येणारे-जाणारे व्यापारी, प्रवासी या ठिकाणी राहत. मध्यभागी घोडे, उंट बांधण्याची जागा आणि आजूबाजूला माणसांना राहण्याकरिता खोल्या असत. या धर्मशाळेचं आज एक आलिशान हॉटेल बनलं आहे. त्यात जुन्या ‘सराई'चा ढाचा जसाच्या तसा ठेवला गेला आहे. हे हॉटेल संपूर्ण इराणमधील नावाजलेलं हॉटेल आहे. इथली सजावट, रंगसंगती केवळ अप्रतिम. पर्शियन कलेचा आविष्कार इथे ठायी ठायी पाहायला मिळतो. एखाद्या राजवाड्यातच आपण आलो आहोत असं वाटतं. आवर्जून पाहण्याची गोष्ट म्हणजे जिथे पूर्वी घोडे, उंट बांधत असत तिथे, म्हणजे हॉटेलच्या मधल्या भागात आज प्रसिद्ध रेस्तराँ आहे. सभोवातली बाग आहे. तिथे बसून पूर्वी ही वास्तू कशी असेल याचा विचार करत चहा पिण्याची मजा काही औरच आहे.
आम्ही एक १३०० वर्षांपूर्वीची प्राचीन मशीदही पाहिली. ही मशीद इस्फाहानच्या जुन्या बाजाराजवळ आहे. मशिदीचं नाव आहे ‘जामे अतिक़'. टप्प्याटप्प्याने बांधलेली प्रचंड मोठी मशीद, तिचे चार प्रचंड मोठे दरवाजे आणि मध्यभागी भलं मोठं प्रांगण. या मशिदीत एका वेळी हजारो माणसं नमाज़ पढू शकतात. मशिदीत प्रवेश केल्यावर समोरच या मशिदीची प्रतिकृती ठेवली आहे आणि माहितीही दिली आहे. कारण वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या बादशहांनी यात नवीन गोष्टींची भर घातली आहे. (या मशिदीत जाताना ‘चादोर' घालावी लागली नाही.)
मशिदीत अनेक दालनं, सुंदर कमानी आहेत. नमाज पढण्यासाठीच्या अनेक ओवऱ्याही आहेत. तिथल्या एका अंधाऱ्या दालनात आम्ही शिरलो. दालनाच्या एका खिडकीवर संगमरवराची पातळ फरशी बसवलेली होती. त्यामुळेच आत मंद प्रकाश येत होता. उन्हाळ्यातली गरम हवा आणि थंडीच्या दिवसांतला गारवा बाहेरून आत येऊ नये म्हणून केलेली ही खास सोय होती. आत थंड वाटत होतं. ईश्वराचं ध्यान करताना चित्त विचलित होऊ नये म्हणून ही काळजी. दालनात सगळीकडे शांतता होती. या शांततेचा मोह पडला क्षणभर. वाटलं, आपणही इथे बसून देवाची प्रार्थना करावी. ती गूढ, अंधारी आणि शांततेने भारलेली आणि भरलेली दालनं आमच्या कायम लक्षात राहतील.
इस्फाहान शहराची खरी शान म्हणजे ‘नक्श-ए-जहाँ'किंवा ‘मिदान-ए-इमाम' हा चौक. पश्चिम आशियातला हा सर्वांत मोठा चौक आहे. मात्र, याच्या लांबी-रुंदीपेक्षा इथल्या सौंदर्याने, देखणेपणाने हा चौक उठून दिसतो. सफाव्हिद घराण्याचा शहा अब्बास याने सोळाव्या शतकात हा चौक बांधला. साधारण ४००-५०० वर्षांपूर्वी शहा अब्बासने आपली राजधानी काझविन इथून इस्फाहानला हलवण्याचं ठरवलं. हे शहर निर्माण करताना त्याच्या मनात काही विचार होते. त्याला अशी जागा हवी होती, जिथे राजसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता एकत्रित आली असेल. त्याच विचारांचं प्रतिबिंब या चौकात पडलं आहे.
चौकात ‘अब्बासी मशीद' आहे. या मशिदीचं प्रवेशद्वार म्हणजे पर्शियन कलाविष्काराचा उत्कृष्ट नमुना आहे. ऐंशी फूट उंचीच्या या दरवाज्यावरील नाजूक मोझाइक काम पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं. कमानीच्या मध्ये मधमाशीच्या पोळ्यासारखी कलाकुसर केलेली दिसते. ही नक्षी बारीक बारीक तुकडे जोडून बनवली आहे हे खरंच वाटत नाही. नक्षीच्या मध्यात एक पुष्पपात्र आणि त्याच्या बाजूला मोर आहेत. सोबत निळ्या पार्श्वभूमीवरचं पांढऱ्या रंगातलं फार्सी लिपीतलं सुलेखन मन मोहून टाकतं.
या चौकाचे मुख्य वास्तुविशारद महम्मद रेझा इस्फाहानी हे होते. चौकातली मशीद बांधताना त्यांना एक अडचण आली. मशिदीचं प्रवेशद्वार आणि मिनार बाहेरच्या चौकाच्या रेषेतच यायला हवे होते; पण ती मक्केची दिशा नव्हती आणि मशिदीचा मिहराब तर मक्केकडे तोंड करूनच असायला हवा. तेव्हा त्यांनी मूळ चौकाच्या रचनेला धक्का न लावता मशिदीत आत जाणारी वाट ४५ अंशांनी वळवली. भिंतीवरील नक्षीकाम पाहत आत जाताना ही गोष्ट आपल्या लक्षातही येत नाही. इथल्या घुमटात शिया मुस्लिमांचे बारा इमाम चितारलेले आहेत. या घुमटातून आत जाताना त्यांचे आशीर्वाद तुम्हाला आपोआपच मिळतात असं मानलं जातं.
‘नक्श-ए-जहाँ' चौकात आणखी एक मशीद आहे. या मशिदीला ‘शेख लोत्फोल्ला मशीद' असं म्हणतात. ही मशीद शहा अब्बासचे सासरे शेख लोत्फोल्ला यांच्यासाठी खास बांधण्यात आली. या मशिदीला मिनार नाहीत. ही मशीद मुख्यत्वे राजस्त्रिया वापरत असत असं म्हणतात. ही मशीदही मोझाइक कलाकुसरीने संपन्न आहे. सफाव्हिद काळात मोझाइक कामात पिवळ्या रंगाच्या टाइल्सचा समावेश होऊ लागला. यातून निर्माण झालेली मनमोहक रंगसंगती इथे दिसते; मग तो मशिदीचा दरवाजा असो, भिंती असोत वा पायांखालील वाट. कुठे पाहावं, काय पाहावं, आणि किती पाहावं... डोळे तृप्त होत होते.
या मशिदीलाही अब्बासी मशिदीसारखाच दिशेचा प्रश्न होता. या मशिदीतून आत जाताना तर आपण जवळजवळ १८० अंशांनी फिरतो, पण भिंतीवरील आणि छतावरील कलाकुसर पाहण्यात ते लक्षातही येत नाही. आम्ही मशिदीच्या आत गेलो मात्र, आतला गाभारा पाहून प्रत्यक्ष देव भेटल्याचाच आनंद झाला. इतकी सुंदर मशीद मी आयुष्यात पहिली नव्हती. मोझाइकच्या कलाकुसरीने भरलेल्या गोल भिंती, त्यांवर पार घुमटापर्यंत नक्षीकाम केलेलं. या गाभाऱ्याला सोळा खिडक्या होत्या. त्यांना काही ठिकाणी वेलबुट्टीच्या जाळ्या होत्या, तर काहींना रंगीत काचा लावलेल्या होत्या. मशिदीच्या घुमटाच्या अगदी मधोमध छोटा निळा मोर होता. मोराचा देखणा पिसारा घुमटाच्या आतल्या भागातून खाली उतरत होता. मोझाइक काम केलेली मोरपिसं घुमटापासून खाली मोठी मोठी होत जाणारी. पाहून स्तिमित व्हायला झालं. मी मोराकडे पाहत गोल गोल फिरत होते. मोर व त्याचा देखणा पिसारा यांवरून डोळे हलत नव्हते. हात जोडले आणि या साऱ्या कलेला, कलाकारांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या अप्रतिम सौंदर्याला मनोमन सलाम केला.
या मशिदीच्या बरोबर समोर ‘अल कापू' राजवाडा आहे. राजवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येणाऱ्या इमारतींपेक्षा ही इमारत एकदम वेगळी. सहा मजली उंच. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेल्यावर संपूर्ण ‘नक्श-ए-जहाँ' चौक नजरेसमोर येतो. चौकाचं सारं सौंदर्य इथून डोळ्यांत साठवता येतं. अरुंद जिन्याने वर जात आम्ही सहाव्या मजल्यावर पोचलो. हा खास संगीतासाठी बांधलेला मजला. या महालाच्या खास रचनेमुळे इथे गायलेलं संगीत घुमत असे. गायक-वादक खांबांच्या आडोशाला बसत असत. पोकळ भिंतीतून स्वर झिरपत असत आणि खालच्या मजल्यावरील शाही पाहुण्यांना ऐकू येत असत. शहा अब्बासला हा राजवाडा अत्यंत प्रिय होता. त्याच्या काळात समोरचं मैदान मोकळं असे. मैदानात ‘पोलो' खेळण्यासाठी तो इतर राजांना निमंत्रण देई. त्यासाठी बांधलेले संगमरवरी दगडातील दोन गोलपोस्ट आजही या मैदानाच्या दोन टोकांना उभे आहेत. या मैदानात घोड्यांच्या शर्यतीही होत असत. ‘नक्श-ए-जहाँ'च्या चारही बाजूंना असणाऱ्या एकमजली इमारतींत प्रेक्षक बसत असत. आज तिथे दुकानं आहेत. या इमारतींना कमानीदार ओवऱ्या आहेत. आज या ठिकाणी खास इस्फाहानमध्ये बनलेल्या अनेक वस्तूंची दुकानं आहेत.
हेही वाचा - फिनलंड: एक आगळा अनुभव
या सर्व इमारती सफाव्हिद काळातल्याच आहेत. चौकात पूर्वी इम्पीरियल बाजार भरायचा. शहा अब्बासच्या काळात इस्फाहान हे मध्यपूर्वेतील फार मोठं व्यापारी ठिकाणही होतं. शहरात तुर्की, जॉर्जियन, अर्मेनियन, भारतीय, चिनी आणि युरोपियन व्यापाऱ्यांची ये-जा असायची. शहा अब्बास इथेच आपल्या प्रजेलाही भेटत असे. त्या काळात दिवसा हा चौक कायम गजबजलेला असायचा.
आजही तो पर्यटकांनी गजबजलेला होता. त्या चौकात नुसतं निरुद्देश फिरणं हादेखील एक आनंददायी अनुभव होता. समोर फुलांचे गालिचे पसरलेले, थुई थुई नाचणारी पाण्याची कारंजी, आसपासच्या पुरातन इमारती, या साऱ्या गोष्टींवर पसरलेली मावळतीच्या सूर्याची सोनसळी झळाळी! एके काळच्या पर्शियन साम्राज्याच्या वैभवाच्या या खुणा... या शहराला ‘अर्धं जग' असं का म्हटलं जात असे त्याचं उत्तर तिथे फिरताना मिळालं होतं. जे जे पाहायला तुम्हाला जगात अनेक ठिकाणी जावं लागतं ते ते सर्व या एका शहरात सामावलेलं आहे आणि ते पाहायला दर्दी पर्यटकांनी एकदा तरी इस्फाहानला जायलाच हवं.
(मुशाफिरी, दिवाळी २०१६च्या अंकातून साभार)
