यंदाच्या जानेवारीत अरुणाचल प्रदेशात एका वेगळ्याच कारणाने जाण्याचा योग आला. निमित्त होतं तिथल्या तेझू या गावातील काही शाळांमध्ये दहावीच्या मुलांना दोन महिने मोफत गणित शिकवण्याचं. या कामासोबतच या भागात बऱ्यापैकी भटकताही आलं. एकूणच ईशान्येकडचा हा बराचसा भाग डोंगर-दऱ्यांनी व्यापलेला आहे. कुठेही नजर गेली तरी शिवालिक पर्वतरांगांधल्या कमीत कमी सात-आठ डोंगररांगा एकामागोमाग एक दिसतातच. हे डोंगर कायम हिरव्यागार शाली तरी पांघरून असतात, नाही तर ढगात हरवलेल्या दिसतात. ब्रह्मपुत्रा ही इथली मुख्य नदी आणि दिबांग, लोहित, सुबसुनी, कामेंग, तिरप या उपनद्या आहेत.
अरुणाचलची लोकसंख्या खूपच विखुरलेली आहे. इथे अनेक प्रकारच्या जाती-जमातींचे लोक राहतात. त्यातील बऱ्याच लोकांचं तिबेटी लोकांशी साम्य दिसतं, तर काही लोक ब्रह्मदेशातील लोकांसारखे दिसतात. मध्य भागात ‘आदी' जमातीचे लोक, तर ईशान्य भागात ‘मिश्मी' जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. आग्नेयेकडच्या तिराप भागात ‘वांचो', ‘टांगसा' जमातींचे लोक राहतात. या सर्व जमातींतील लोकांचं राहणीमान साधारण सारखंच आहे.बहुतेकांचं उदरनिर्वाहाचं साधन शेती हेच आहे. जोडीला शिकार करणं, जंगलातील वस्तू गोळा करणं हे पूरक व्यवसाय.
अरुणाचलमधील जिल्हे साधारण जमातींनुसार केलेले आहेत आणि त्यांना तिथल्या नद्यांची नावं देण्यात आली आहेत. अरुणाचलच्या पूर्वेला लोहित आणि दिबांग जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे मिश्मी लोक राहतात. (तेझू गाव लोहित जिल्ह्यात येतं.) फेब्रुवारी महिन्यात मिश्मी लोकांचे दोन महत्त्वाचे सण असतात. १ फेब्रुवारीला ‘इदू मिश्मी' या लोकांचा ‘रे' हा सण असतो. लोअर दिबांग जिल्ह्यातल्या रोइंग इथे तो साजरा केला जातो. तो काही आम्ही पाहू शकलो नाही. १४-१५ फेब्रुवारीला लोहित जिल्ह्यातल्या ‘दिगारू मिश्मी' आणि ‘मिझू मिश्मी' लोकांचा ‘ताम्लाडू' हा सण मात्र आम्हाला पाहता आला. दोन दिवसांचा हा उत्सव म्हणजे वर्षातला त्यांचा सगळ्यात मोठा सण. तेझूध्ये खास ‘ताम्लाडू ग्राऊंड' नावाचं मैदान आहे, तिथे उत्सवाच्या वेळी मोठा मांडव घातला जातो. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जातात.
मैदानात देवाच्या धार्मिक कार्यासाठी तमाला हाकन, तुम्या तमालय आणि टाका झोंग अशा जागा आहेत. त्यात एक त्रिशूळाच्या आकाराचं एक हत्यार आहे, त्यांच्या देवाचं प्रतीक म्हणून. कारण तिथे देवाची मूर्ती अशी नसतेच. त्यातल्याच एका जागेत मिथुनचा बळी दिला जातो. तिथेच त्याचं मांस शिजवून प्रसाद म्हणून वाटलं जातं. तिथे मिश्मी लोकांचं एक घरही बांधलेलं आहे (ओळख म्हणून). उत्सवाच्या ठिकाणी नृत्य, गायन, फॅशन शो वगैरे अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.
दुसऱ्या दिवशी सर्व सरकारी पाहुण्यांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला सर्वजण खास त्यांच्या पारंपरिक पोषाखात उपस्थित असतात. पुरुषांचा पोषाख म्हणजे गुलाबी रंगाचं, मोठेमोठे गोंडे लावलेलं जाकीट, गळ्यात गुलाबी शबनमसारखी बॅग, तलवारीसारखं ‘डाव' नावाचं एक हत्यार आणि काळ्या रंगाचा मफलर. त्या शबनमचा पट्टा नाण्यांपासून बनवलेला असतो, त्यामुळे साहजिकच जड असतो. (मूळ मिश्मी पुरुषांच्या पोषाखात कमरेखाली काहीच घातलं जात नसे, पण आता त्यांनी तो सुधारला आहे.) स्त्रिया भरपूर जड जड सोन्या-चांदीचे दागिने घालून येतात. त्यांच्याही गळ्यात एक शबनम आणि डाव असतेच. त्यांचा पोषाख म्हणजे मेखला (मुख्यत्वे घरीच हातमागावर विणलेलं लुंगीसारखं गुंडाळण्याचं वस्त्र), वर खास विणकाम केलेला आखूड ब्लाऊज आणि डोक्यात केसांना बांधायला चांदीचा जड नाण्यांनी बनवलेला पट्टा. त्यात एक लांबच लांब नक्षीदार चांदीचा आकडा असतो. इथल्या दोर्लियांग गावचा निस्सांसो नावाचा विद्यार्थी सध्या पुण्यात शिकतो आहे. त्याच्या घरी त्याच्या ८० वर्षांच्या आजीच्या हातातही आम्ही डाव पाहिली.
हेही वाचा - तेजोनिधी लोहगोल
या कार्यक्रमात एका वक्त्याने सांगितलं, की मूळचे मिश्मी लोक खूप श्रीमंत आहेत. (त्याची प्रचिती स्त्रियांचे पोषाख बघून येतच होती.) ते आत्मनिर्भर आहेत. पण मुख्यत: मिश्मी पुरुषांनी अफूचं व्यसन सोडण्याचं त्यांनी आवाहन केलं. विरोधाभास म्हणजे स्थानिक संस्कृतीला अनुसरून सर्व पाहुण्यांचं तांदुळाची बिअर देऊन स्वागत केलं जात होतं.
२० फेब्रुवारीला अरुणाचलचा स्थापनादिन सरकारी इतमामात साजरा केलेला अनुभवायला मिळाला. या दिवशी मिश्मी, गालो, आदी, सियांग, मोनपा, बिहू, तिराप या जमातींची पारंपरिक नृत्यं पाहायला मिळाली. कलाकारांचे रंगीबेरंगी पारंपरिक पोषाख, वेगवेगळे दागिने, नादमधुर ठेक्याची गाणी आणि नयनमनोहर नृत्यं यांनी मन सुखावूनगेलं. त्यातलं तवांगचं मोनपा नृत्य विशेषकरून आवडलं.
इथल्या कोणत्याही जमातीची स्वतःची अशी वेगळी लिपी नाही; फक्त बोलीभाषाच. जेव्हा इथली मुलं शाळेत जायला लागतात तेव्हा त्यांच्या डोक्यात भाषेचा खूप गोंधळ झालेला असतो. त्यांची एक बोलीभाषा, शाळा इंग्रजी माध्यमाची आणि एकमेकांशी बोलायला हिंदी भाषा, त्यामुळे त्यांचे बरेच हिंदी शब्द मिश्मीमिश्रित असतात. त्यांचे उच्चारही वेगळे असतात. वर्गात त्यांच्यापैकी कोणी काही विचारलं, तर ते मी दोनदा परत विचारून समजून घ्यायचे आणि मग त्यांचं शंकानिरसन करायचे. मुलांनाही माझं हिंदी समजलं का म्हणून परत परत विचारायचे. पण आठवड्याभरात त्या भाषेची, उच्चारांची कानांना सवय झाली. कधी एखाद्या शब्दाचा अर्थच पटकन कळायचा नाही. एकदा एकाने मला विचारलं, “आप तेझू में कहा बैठे हैं?” (याचा अर्थ ‘तेझूत कुठे राहता?' असा होतो.) तिथला तात्यांग नावाचा एक वकील शिक्षणानिमित्त १० वर्षं पुण्यात राहत होता. तो आमच्याशी बोलताना म्हणाला,“मैं १० साल पूने में बैठा था' तेव्हा त्याचा अर्थ मात्र लगेच कळला.
एक दिवस माझा एक विद्यार्थी चोहान्सो याचं घर बघायला गेलो. त्याचं गाव टाफरागाव हे तेझूपासून १०- १२ कि.मी.वर होतं. दोन दुचाकींवरून त्याच्या घरी गेलो. एक अस्सल मिश्मी घर कसं असतं हे तिथे बघायला मिळालं. घर जमिनीपासून तीन-साडेतीन फूट उंचीवर बांबूंवर किंवा इतर लाकडी खांबांवर तोललेलं होतं. एका छोट्याशा शिडीवरून घरात चढून गेल्यावर खालच्या खांबांवर लाकडी पट्ट्या आडव्या टाकलेल्या दिसल्या. त्यावर मुख्यत्वे बांबूच्याच बारीक पट्ट्या मारून चटईसारखी व्यवस्था केलेली होती. भिंती आणि छप्परही बांबूचंच होतं. हल्ली काही ठिकाणी छपरासाठी पत्र्याचा वापर करतात. घरात रेल्वेसारख्या एकापाठोपाठ एक तीन खोल्या होत्या. बाहेरच्या खोलीत चक्क टीव्ही होता. मधली खोली म्हणजे स्वयंपाकघर. हा घराचा मुख्य भाग. इथे बरोबर मधोमध चूल, चुलीखाली पत्र्याचा ट्रे. ही चूल कायम धगधगती ठेवतात, कारण तिथे कायमच थंडी असते. चुलीमुळे घरात कायम ऊब राहते. चुलीच्या दोन फूट वर लोखंडी पट्ट्यांची एक टांगती जाळी दिसली. त्यावर काही वस्तू अथवा पदार्थ गरम करायला नाही तर वाळवायला ठेवतात. त्याही वर माळ्यासारखी एक जागा होती. तिथेही वर्षभराचे साठवणीचे पदार्थ ठेवतात. नंतरची खोली देवघर किंवा पाहुण्यांसाठीची खोली. इथे पण होमहवनासाठी खोलीच्या मधोमध जागा राखीव होती. त्या खोलीत बळी दिलेल्या प्राण्यांचे जबडे, मुखं लावलेली होती. मुखांना त्याच प्राण्याचं रक्त लावून आगीत भाजल जातं व जतन केलं जातं. यांची संख्या जेवढी जास्त तेवढा त्या व्यक्तीला त्या गावात मान.
तीन खोल्या ओलांडल्यानंतर घराच्या मागच्या बाजूला डुकरांसाठी खास जागा होती. एका बाजूला छोट्याशा तळ्यात मासे पाळलेले होते. कोंबड्या, बदकं, बकऱ्या, कुत्री, मांजरी तर असतातच. या लोकांना खाण्यासाठीकोणताही प्राणी, पक्षी वर्ज्य नाही. तरी त्यासाठीचे त्यांचे नियम ठरलेले आहेत. मिथुन मारला तर तो कमीत कमी ५० जणांमध्ये वाटून खायचा. तो गव्यासारखा मोठा प्राणी असल्याने ही वाटून खाण्याची पद्धत रूढ झाली असावी. मुलगी वयात येईपर्यंत तिने फक्त दोन पायांचे प्राणी आणि पक्षीच खायचे. घराच्या बाहेर आणखी एक छोटीशी उंचावर बांधलेली खोली होती. ती त्यांची साठवणीची खोली असते. या खोलीत मुख्यत्वे तांदूळ, मोहरी, बटाटे इ. सामान ठेवलं जातं. इथे कोणाच्याही घराला कुलूप हा प्रकार नसतो. एकमेकांवरचा विश्वास हेच कुलूप!
हेही वाचा - गंगटोक आणि सिक्किम : काही नोंदी
इथल्या पदार्थांध्ये तेलाचा वापर कमी असतो. मसाले तर अजिबात वापरले जात नाहीत. भात, मांस, उकडलेल्याभाज्या हेच मुख्य जेवण. भाज्याही तिथेच आवारात लावलेल्या - लायपत्ता, कंद (गी, कच्छू ही त्यांची नावं), आलं, पालेभाज्या (झिलमिल, मानिमुनी, अगदी छोट्या फळांची आंबट चवीची तुपर्णा). इथे केळफूल जास्त करून भाजीसाठी वापरलं जातं. त्यामुळे केळी खूप कमी प्रमाणात दिसली. अननस भरपूर प्रमाणात पिकतो. अशा प्रकारे खाण्याच्या बाबतीत एकदम सुबत्ता असल्याने खाद्यपदार्थ विकत आणणं ही पद्धत इथे नाही. मुख्यत: मीठ तेवढं विकत आणावं लागतं. अन्नपदार्थ जसे स्थानिक तसेच या लोकांचे पोषाखही. रोजचे पेहराव, पांघरायच्या शाली, अशी अनेक वस्त्रं बायकाच घरी हातमागावर बनवतात. साध्यासुध्या आजारांवर, जखमांवर औषधोपचारदेखील घरगुती किंवा उपलब्ध औषधी वनस्पती वापरूनच केले जातात. बांबू हा इथल्या लोकांसाठी कल्पवृक्ष आहे. सर्वत्र बांबूच बांबू असतो. घरासाठी त्याचा वापर होतोच. पूजेसाठीही होतो. बॅग, सॅक, टोपी, सूप, भांडी, हत्यारं, अशा किती तरी वस्तू बांबूच्याच असतात. काही बांबूच्या कोंबाची भाजी करतात, लोणचं करतात. थोडक्यात काय, तर अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या बाबतीत हे लोक स्वयंपूर्ण आहेत.
या लोकांच्या हातात पैसा असतो तेव्हा त्यांचं प्राधान्य असतं शिकारीसाठी बंदूक खरेदी करणं. तिथे फिरताना असे बंदूकधारी खूप दिसले. एकदोघांना तर प्रत्यक्ष शिकार करतानाही बघितलं. बंदुकीनंतर प्राधान्य असतं दुचाकी अथवा चारचाकी गाडीला. आणि मग जमलंच तर आताच्या काळातलं सिमेंटचं घर बांधण्याचा विचार होतो.
प्रत्येक घरात अफूची शेती असते. इथल्या बहुतेक सगळ्यांनाच याचं व्यसन असतं. त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही. पावसाळ्यात इथे इतका पाऊस असतो की घराबाहेर पडणंही मुश्किल असतं. त्यातून विजेचा खेळ तर चालूच असतो. २४ तास वीज ही संकल्पनाच नाही जणू. त्यामुळे बाहेर पाऊस, घरात अंधार, उद्योग काही नाही. तेव्हा अफू घेऊन चुलीशेजारी पडून राहणं हेच सगळीकडे दिसतं. वर्षांतल्या इतर दिवसांतही या लोकांकडे शेतीशिवाय इतर कुठलाही जोडधंदा नसतो. या भागात उद्योगधंदे नसल्यामुळे सरकारी नोकरीशिवाय इतर नोकऱ्या उपलब्ध नसतात. फावल्या वेळात करमणुकीची फारशी साधनंही नसतात. त्यामुळेच व्यसनाधीनता खूप प्रमाणात असावी.
इथे वर्षातले सहा महिने तर पाऊसच असतो. सूर्यदर्शन झालं तर अहोभाग्यच समजायचं. आम्हाला दोन महिन्यांत फार तर सात-आठ दिवस पूर्ण दिवसभर सूर्य दिसला, बाकी वेळेस सदासर्वकाळ ढगाळ हवा. थंडी पण असतेच. आम्हाला तर अंगावर कपड्यांचे कितीही थर चढवले तरी कमीच वाटायचे. त्या लोकांचे कपडे पाहिले की आपण जरा जास्तच कपडे चढवले असं वाटायचं. पायांत मोजे नाही तर चप्पल पाहिजेच. गंत म्हणजे पाऊस पडत असेल तर कुणी छत्री वापरताना विशेष दिसायचं नाही; पण हेच जरा जरी ऊन वाढलं तरी लगेच छत्र्या बाहेर निघायच्या. आम्हाला मात्र ऊन पडलं की हायसं वाटायचं. आम्ही लगेच पांघरायला दिलेल्या वजनी दुलया उन्हात वाळत टाकायचो, कारण त्या धुणं शक्यच नसायचं. हवा कायम थंड असल्याने हात-तोंड धुवायला वापरायचं पाणीही खूपच थंड असायचं. ते पाणी वापरणं जरा कठीणच गेलं. अंघोळीसाठी एक बादली पाणी तापायला एक ते दीड तास लागायचा; तेही जर सलग वीज उपलब्ध झाली तर!
आम्ही टाफरागावच्या विवेकानंद केंद्राच्या शाळेलाही भेट दिली. ही शाळा १९७७ साली बांधली गेली. मुलींसाठी वसतिगृह असलेली ही पहिलीच शाळा. ही शाळा एका डोंगरमाथ्यावर आहे. वर जायचा रस्ता पूर्ण जंगलातून जाणारा आहे. पूर्वी तर आतापेक्षा दाट जंगल असणार. हत्तींचाही मुक्त संचार असायचा तेव्हा. केंद्रातल्या तीन महिला जीवनव्रतींनी (रेखा, अपर्णा आणि मंदाकिनी) खूप धैर्याने आणि कष्टाने ही शाळा उभी केली. त्या वेळी त्यांनाही हत्तीवरूनच प्रवास करावा लागे. तिथल्य मुख्याध्यापक मॅडमनी सकाळी तिथल्या १० वीच्या मुलींना तासभर गणितातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याविषयी विनंती केली. मीही ती आनंदाने स्वीकारली. त्या मुलींशी मी तासभर बोलले.
तेझूपासून ४० कि.मी. अंतरावरच्या सोनपूरची विवेकानंद केंद्राची शाळाही बघायला मिळाली. तिथेही मुलींचं वसतिगृह होतं. आम्ही तिथे गेलो त्या दिवशी शनिवार होता. दुपारी तिथल्या सहा-सात वर्षांच्या मुलींनी खेळ म्हणून गावचा बाजार मांडला होता. अनेक प्रकारच्या झाडांची पानं, फांद्या, फळं, फुलं गोळा केली होती. मातीपासून केक, बिस्किटं असे काही पदार्थ बनवले होते. खूप मजा करत होत्या. मी सगळ्यांचा एक छानसा फोटो काढला, त्यांना दाखवला. सगळ्या खूप खूष झाल्या.
इथे असताना व्हेरिएर एल्विन यांचं एक इंग्रजी पुस्तक वाचनात आलं- ‘फिलॉसॉफी फॉर नेफा'. त्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रस्तावना आहे. ईशान्येकडच्या राज्यांप्रति भारत सरकारचा दृष्टिकोन काय आहे, इथले काही सरकारी उपक्रम, इथल्या पायाभूत सुविधा कशा असाव्यात, इथल्या जमातीतील लोकांशी कसं वागावं इ. अशी बरीच माहिती त्यात आहे. आमच्या वास्तव्यात आणि हे पुस्तक वाचून असं जाणवलं की हे लोक त्यांच्या आहे त्या आयुष्यात अतिशय सुखी आहेत. आपण त्यांना फार तर अशा काही गोष्टी सांगाव्यात किंवा उपलब्ध करून द्याव्यात की ज्यामुळे त्यांना त्यांचं मूळचं आयुष्यच अधिक सुलभतेने घालवता येऊ शकेल.
हेही वाचा - भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते
याच विषयावर आधारित एक संस्था रोइंगला पाहिली-रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड्स एन्शन्ट ट्रॅडिशन, कल्चर अँड हेरिटेज. तिथे काही दिवस राहण्याची संधीही मिळाली. संस्थेचे सध्याचे सर्वेसर्वा विजय स्वामी मूळचे मंगळवेढ्याचे, पण गेली २५ वर्षं त्यांचं वास्तव्य अरुणाचलमध्येच आहे. संस्थेचा मूळ उद्देश हा आहे, की प्रत्येक देशातील नष्ट होत चाललेल्या कलागुणांचा, संस्कृतीचा अभ्यास करून, त्यातील साम्य अथवा भेद शोधून, त्यांचं पुनरुज्जीवन करता येणाऱ्या गोष्टी शोधून पुन्हा त्या लोकांसमोर आणणं. ही संस्था भारताबरोबरच आणखी दोन देशांत कार्यरत आहे. रोइंगमध्ये पाच एकरांच्या भव्य परिसरात सध्या संस्थेचं बांधकाम चालू आहे. अनेक परदेशी विद्यार्थीही तिथे संशोधनासाठी येत असतात.
विजय स्वामी आम्हाला रोइंगमधल्या एका अशा ठिकाणी घेऊन गेले जिथून प्रत्यक्ष दिबांग व्हॅलीला सुरवात होते. थेट चीनमध्ये पोचणाऱ्या या व्हॅलीच्या मार्गावरूनच विमानंही उड्डाण करतात. कारण या मार्गावर मधे कुठेहीउंच डोंगरांचे अडथळे नाहीत. तिथेच दिबांग नदीवर या व्हॅलीतील सर्वांत लांब ब्रिज बांधला गेला होता; पण काही वर्षांपूर्वी तो कोसळला. या नदीवरील तीनही ब्रिज असेच प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने कोसळले. आम्ही गेलो तेव्हा तिथे एक थेंबही पाणी नव्हतं. पण पावसाळ्यात मात्र इथे पाण्याचं रौद्र रूप पाहायला मिळतं असं कळलं. पावसाळ्यात पाण्याच्या आवाजापेक्षा या नद्यांमधून वाहत येणाऱ्या प्रचंड मोठ्या शिळा, दगड, गोटे, लाकडाचे ओंडके यांचाच आवाज अधिक भीतिदायक असतो.
रोइंगला जायच्या वाटेवरच भीष्मकनगर लागतं. तिथे ११ व्या शतकातल्या एका राजवाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. त्यात वापरलेल्या विटा एका पुरातन पद्धतीने (ठराविक प्रकारची माती, बदकाच्या अंड्यातील आतील बलक, चुना असं मिश्रण वापरून) बनवण्यात आल्या आहेत. म्हणून या राजवाड्याला पुरातत्त्व खात्याने प्राचीन वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. तिथे रुक्मिणीचा राजवाडाही आहे.
या प्रवासात बऱ्याच ठिकाणी मोहरीची शेतीही बघायला मिळाली. मोहरीच्या मोठ्या झुडपांची कापणी चालू होती. कापलेल्या मोहरीच्या शेंगा बैलाच्या पायांनी तुडवून वेगळ्या केल्या जातात. त्यातून मिळणारी मोहरी कमी पैशांत आसाममधे विकली जाते आणि तिथूनच परत जास्त पैसे देऊन मोहरीचं तेल आणलं जातं. कारण अरुणाचलमध्ये मोहरीच्या तेलगिरण्या खूप कमी आहेत.
रोइंगपासून ५३ किलोमीटरवप मायोदिया नावाचं ठिकाण आहे. हे अरुणाचलमधील सर्वांत कमी उंचीवरचं असं ठिकाण, जिथे बर्फ साठतो. तिथूनच हुनली नावाचं गाव दिसतं. त्यापलीकडे हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांचं दर्शन होतं. मायोदियापर्यंत पोचायला आम्हाला साडेतीन तास लागले. सगळा चढाचा रस्ता आणि हेअरपिन वळणं. वाटेत एका ठिकाणी एक गाडी बंद पडल्याने तासभर फुकट गेला. याच वाटेवरून जाताना अचानक आमच्या नॅनो गाडीसमोर एक बलदंड मिथुन येऊन उभा राहिला. आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली. त्याला त्याच्या वाटेने जाऊ दिलं. कारण त्याच्या एका छोट्याशा धक्क्याने आमचीगाडी दरीत कोसळायला वेळ लागला नसता.
रोइंगजवळच्या इदुली इथला चहाचा पूर्णपणे यांत्रिकीकरण केलेला कारखाना पाहिला. ९० एकर जागेत पसरलेल्या कारखान्यात फक्त ७० माणसं काम करतात. रोइंगपासून चार किमीवर नयनरम्य सॅली लेक आहे. तिथलं पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ होतं. पाण्यात आकाशातील ढगांचं प्रतिबिंब फारच सुंदर दिसत होतं.
हेही वाचा - काठमांडूपल्याडचा नेपाळ
आम्ही अरुणाचलच्या पूर्व भागातही फिरलो. लोहित व्ह्यू पाँइंट इथून लोहित नदीचा अस्ताव्यस्त पसारा पाहायला मिळाला. सकाळी सात वाजता आम्ही या ठिकाणी होतो. थंडगार वारं आणि त्यातच भुरभुरणारा पाऊस यामुळे खूप मजा आली. तिथून परशुराम कुंडाकडे जाणारा मोठ्ठा पूल दिसत होता. तिथून साधारण २० किमीवर आहे हे परशुराम कुंड; एक सुंदर आणि पवित्र असं तीर्थस्थान. तिथला निसर्गरम्य परिसर मन मोहून टाकतो. तिथूनच जवळ वाक्रो येथील विवेकानंद केंद्रातर्फे चालवलं जाणारं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र बघितलं. इथे सध्या १५-२० वर्षे वयाच्या नऊ मुलींना एक वर्षासाठीचं हातमागावर वस्त्र तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. बहुतकरून शाली, मेखला, जाकीट असे कपडे इथे बनतात. अतिशय सुंदर पण तेवढंच कष्टाचं काम आहे हे. इथे या मुली शिकून, आपल्या गावी परत जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
वाक्रोत संत्र्याची शेती पाहायला मिळाली. वाक्रोच्या पुढे खास पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं कामलांग अभयारण्य आहे. आम्ही तिथे पोचेपर्यंत हवा एवढी ढगाळ झाली होती की तिथून काढता पाय घ्यावा लागला. तिथून पुढे चोखलामजवळचं ‘गोल्डन पॅगोडा' नावाचं बुद्धाचं सुंदर, स्वच्छ मंदिर पाहिलं. तिथली तितकीच सुंदर जपलेली बागही पाहायला मिळाली. इथेच नीलपंखी (इंडियन रोलर), नकल्या खाटिक (श्राइक), करड्या पाठीचा खाटिक, पांढरा धोबी, जंगली धोबी, पिवळा धोबी (यलो वॅगटेल), रक्तकंठी तिरचिमणी (रेड थ्रोटेड पिपिट) असे काही पक्षी पाहायला मिळाले. येताना तेझूच्या फेरीबोटीसाठी उभे होतो तेव्हा मोठे पाणकावळे (कार्मोरंट) आपले पंख पसरून बसलेले दिसले.
इथे अशी काही ठिकाणं बघायला जायचं असेल तर सकाळी लवकर निघावं लागतं. कारण संध्याकाळीपाचच्या सुमारासच काळोख पडायला लागतो. त्यामुळे दुपारनंतर कुठे जाण्यासाठी बस किंवा खासगी वाहन मिळत नाही. रस्त्यांवर दिवे नसतात. दोन गावांच्या मधे कुठे पेट्रोल पंपही लागत नाहीत. त्यामुळे संध्याकाळचा प्रवास फारसा कोणी करत नाही.
तेझूपासून २४० किमी अंतरावर पूर्वेला वालांग इथे १९६२ साली चीनचं युद्ध झालं होतं. इथे ‘हेल्मेट टॉप' नावाचं एक ठिकाण आहे. चीनच्या युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांची फक्त हेल्मेट्स तिथे शिल्लक राहिली होती, म्हणून या ठिकाणाला असं नाव देण्यात आलं. वालांगपासून पुढे ३३ किमी वर किभितू इथे लष्करी ठाणं आहे. त्यापुढे चीनची हद्द चालू होते. वालांगपासून किभितूला जायच्या रस्त्यावरच डाँग नावाचं एक ठिकाण आहे. इथल्या एका खूप उंच टेकडीवरून भारतातला पहिला सूर्योदय पाहता येतो. साधारण रात्री बाराच्या सुमारास वालांगहून निघालं तर गाडीने तीन-साडेतीन तासांत टेकडीच्या पायथ्याशी पोचता येतं. तास-दीड तास टेकडी चढून वर जायचं, की चारच्या सुमारास सूर्योदय पाहायला मिळतो.
वालांगमधल्या गेस्टहाऊसमधून दिसणारं पूर्ण वालांगचं दृश्य अतिशय सुंदर होतं. लोहित नदीचा पसारा, स्वच्छ- खळाळणारं आरस्पानी पाणी, समोरच्या झाडांवर नुकतंच साठायला लागलेलं बर्फ ... शब्द अपुरे आहेत वर्णनासाठी. तिथूनच जवळ गरम पाण्याचे झरे असलेलं एक ठिकाण बघितलं. शुभ्र, पांढरी, मऊ-मुलायम स्पर्श असलेली वाळू. त्या वाळूतून तयार झालेले अनेक आकार पाहून मन सुखावून गेलं नाही तरच नवल! इथे आम्ही झाडावरची संत्री तोडून खाण्याचा मनमुराद आनंद लुटला.
एकूण, अरुणाचलच्या दोन महिन्यांच्या काळात खूप काही नवीन बघायला, शिकायला, शिकवायला मिळालं. खूप लोकांशी ओळखी झाल्या. खूप पक्षी, झाडं, फुलं, फुलपाखरं बघायला मिळाली. अरुणाचलची नव्याने ओळख झाली. ज्ञानाने आणि अनुभवाने अधिक समृद्ध होता आलं.
(मुशाफिरी, ऑगस्ट २०१६च्या अंकातून साभार.)
