आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

सीएसटी स्टेशनची हेरिटेज टूर - मुंबईवरची प्राचीन कविता

  • शर्मिला फडके
  • 20.06.26
  • वाचनवेळ 9 मि.
csmt mumbai

छत्रपती शिवाजी टर्मिनस... सीएसटी स्टेशन. एके काळचं व्हिक्टोरिया टर्मिनस किंवा व्हीटी स्टेशन. अष्टौप्रहर धडधडणारं मुंबईचं हृदय. आधीच्या पिढीने याचा उल्लेख कायमच ‌‘बोरीबंदर' म्हणून केला. पिढ्या बदलल्या, नावं बदलली, पण बदललं नाही ते या इमारतीचं भव्य, डौलदार सौंदर्य. मुंबईची गर्दी वाढली; गजबज, कोलाहल, बकालपणाही वाढला; पण युनेस्कोचा हेरिटेज दर्जा लाभलेल्या सीएसटीच्या प्राचीन इमारतीची शान, देखणेपण जराही उणावलं नाही.

या इमारतीचं आगळं, गॉथिक वास्तुवैभव, तिचा आकाशात उंचावर विराजमान झालेला विशाल घुमट ज्याने मान उंचावून कौतुकाने अनेकदा नजरेत भरून घेतला नसेल असा माणूस विरळाच. रोजचा गर्दीतला लोकल प्रवास करणारा स्थानिक मुंबईकर असो वा बाहेरून मुंबईत येणारा पर्यटक असो, इथल्या प्लॅटफॉर्मवर किंवा बाहेरच्या डी. एन. रोडवर पाऊल ठेवताना त्याला जाणीव होते ती या इमारतीच्या भव्यतेची आणि देखणेपणाचीच. हे देखणेपण आलिशान आधुनिक भपक्यातून आलेलं नाही. खानदानी, पिढीजात दागिन्याला असतं तसं हे अस्सल अभिजात सौंदर्य १३० वर्षांहून पुराण्या असलेल्या या वास्तूमधे भरून राहिलेलं आहे. 

सीएसटी स्टेशनच्या इमारतीचा जो भाग हेरिटेज म्हणून घोषित झाला आहे त्याची ‌‘गाइडेड टूर' भारतीय रेल्वे प्रशासनातर्फे डिसेंबर २०१२मध्ये सुरू झाली. त्यामुळे या इमारतीच्या आगळ्या वास्तुवैभवाचं ज्यांना आकर्षण आणि कुतूहल होतं (ज्यात अर्थातच मीही होते) त्यांना त्याची जवळून, तपशिलात ओळख करून घेण्याची संधी मिळाली.

सीएसटी स्टेशनालगतच उजव्या बाजूला मध्य रेल्वेच्या मुख्यालयाची इमारत आहे. तिथल्या लोखंडी प्रवेशद्वारातून आत शिरताना आपण एका जगप्रसिद्ध हेरिटेज इमारतीत प्रवेश करतो आहोत असं अजिबातच जाणवत नाही. आजूबाजूला फोर्टमधला नेहमीचा मानवी कोलाहल भरून असतो. लखलखीत, तापलेल्या उन्हात तळपत असणारा फुटपाथ; फेरीवाले, ट्रॅफिक पोलिस, वाहनांच्या कर्कश्श आवाजाची गजबज. आपण आत पाय ठेवतो तो पॅसेजही काहीसा अंधारा आणि जुनाट. एक मुलगी येते आणि आपल्याला हातातल्या बॅगा-पिशव्या तिथल्या एका धूळभरल्या (बहुधा ब्रिटिशकालीन) लाकडी मांडणीवर ठेवायची विनंती करते. आपण साशंकतेनेच तिचं म्हणणं ऐकतो. ती मुलगी आपली ‌‘टूर गाइड' असते. इमारतीत नीरव शांतता भरून राहिलेली असते. मध्य रेल्वेत काम करणाऱ्या बाबूलोकांची वर्दळ बहुधा पॅसेजमधल्या मोठमोठ्या लाकडी दरवाज्यांआड बंदिस्त असावी. 

त्या दरवाज्यांचं कोरीवकाम, पॅसेजला समांतर असणारा इमारतीच्या आवारातला बगीचा, बाजूला ठेवलेल्या जुन्या वाफेच्या इंजिनांच्या प्रतिकृती वगैरे मागे टाकत आपण पुढे चालत राहतो. एका संगमरवरी शिल्पाच्या घडीव स्तंभात एक मोठा लाकडी कोरीव नक्षीकामाचा दरवाजा बसवलेला दिसतो. त्या दरवाज्यातून आपण आतल्या हॉलसारख्या मोकळ्या भागात येतो. पुढे वळसेदार, प्रशस्त दगडी जिना दिसतो; शिवाय एक पुतळाही. तिकडे पाहत असतानाच गाइड मुलगी अचानक सांगते- “वर बघा.” आपण बघतो, आणि वरचं दृश्य पाहून वासलेला आपला ‌‘आ' बराच वेळ तसाच राहतो. वरच्या अनेक फुटांवरच्या उंच पोकळीतून अद्वितीय वास्तुसौंदर्याचा धबधबा आपल्यावर अक्षरश: कोसळत असतो. सीएसटी इमारतीच्या अंतर्भागातील मध्यवर्ती घुमटाखाली आपण उभे असतो आणि भर दुपारच्या मुंबईतला लख्ख सोनेरी प्रकाश त्या अप्रतिम नक्षीदार, भव्य घुमटाच्या भोवती लावलेल्या पारदर्शक, रंगीत काचांमधून पाझरताना दिसत असतो. 

भानावर आल्यावर आपली पावलं आपोआप समोरच्या जिन्याकडे वळतात. इमारतीच्या इंडो-सारसेनिक वास्तुकलेचा सलामीचाच नमुना इतका सुंदर, तर पूर्ण इमारत किती देखणी असेल याची उत्सुकता आता मनात मावत नसते.   

हा जिनाही अद्भुत. बाजूच्या भिंतीत बसवलेल्या त्याच्या दगडी पायऱ्या बाहेरच्या बाजूला साडेआठ फूट अधांतरी आहेत. प्रत्येक पायरी प्रशस्त, रुंद आणि एकसंध. जिन्याचे सोनेरी कोरीवकामाने झळाळणारे घडीव, लोखंडी कठडे; निळसर, तपकिरी ग्रॅनाइटच्या भिंती; कोनांमध्ये, भिंतींच्या झरोक्यांमध्ये कौशल्याने बसवलेल्या स्टेन ग्लासेसचे रंगीबेरंगी कवडसे... डोळे दिपवून टाकणारं हे सौंदर्य बघायची आपल्या नजरेची तयारीच नसते! लाखो लोकांच्या रोजच्या कोलाहलामधे सदैव बुडालेल्या या इमारतीच्या पोटात इतका खजिना दडलेला आहे हे आपल्याला आजवर जाणवलं कसं नाही याचंच आश्चर्य वाटत राहतं. दगडी जिन्यावरून घुमटाच्या जवळ जाण्याकरता एकेक पायरी चढत असताना बाजूच्या भिंतीवर भारतीय रेल्वेच्या जडणघडणीला कारणीभूत असणाऱ्यांचे कृष्णधवल, सेपिया फोटो दिसतात. आजच्या सीएसटी स्टेशनाच्या स्थापनेतले, पर्यायाने भारतीय रेल्वेच्याच इतिहासाचे काही प्रमुख टप्पे आपण ओलांडत असतो. भारतातील महत्त्वाच्या रेल्वे जंक्शन्सची शतकापूर्वीची, आता निवांत वाटणारी दृश्यं; जुनं बोरीबंदर स्थानक आणि इतरही स्थानकं, तेव्हाची सिग्नल व्यवस्था, पूर्वीच्या ‌‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे'च्या म्हणजेच जीआयपीआरच्या प्रतिकृती... जणू त्या रेल्वेगाडीच्या खिडकीतून आपण बाहेर डोकावून पाहत आहोत आणि नजरेसमोरून शतकभरापूर्वीचा काळ संथगतीने मागे सरकतो आहे. 

हेही वाचा - तर मी मुंबई पाहिलीच नाही!

जी.आय.पी. रेल्वे, म्हणजेच आताच्या सेन्ट्रल रेल्वेचं मुख्यालय असलेल्या या इमारतीचा आराखडा फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स या प्रख्यात वास्तुविशारदाने केला आहे. तळमजल्यावर मघाशी त्याचाच पुतळा आपल्याला दिसला होता. (या फ्रेडरिक स्टीव्हन्सचीच आणखी एक पण पूर्ण वेगळ्या शैलीत डिझाइन केलेली प्रसिद्ध इमारत सीएसटीला येणाऱ्याला नेहमी दिसते, ती म्हणजे समोरचीच मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाची इमारत.) १८६१ साली त्या वेळच्या मुंबई सरकारने ‌‘एलफिन्स्टन लॅन्ड प्रेस कंपनी'सोबत करार करून ‌‘मोदी-बे' नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंबई बेटावरच्या एका भागात भराव घालून त्यातल्या दोन तृतीयांश परिसरात जमीन उभारण्याचं काम सुरू केलं. त्यातल्या शंभर एकर जागेवर नवं भव्य रेल्वे स्टेशन बांधायचं ठरलं. इंग्लंडमध्ये मनाजोगती डिझाइन्स मिळाली नाहीत म्हणून मग जी.आय.पी.च्या संचालकांनी मुंबई सरकारच्या पी.डब्लू.डी. खात्यातील वास्तुविशारद फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांच्यावर ती कामगिरी सोपवली. टर्मिनसच्या इमारतीचं काम मे १८७८ मध्ये सुरू झालं. ते पूर्ण व्हायला दहा वर्षं लागली. मुख्यालयाच्या इमारत बांधणीवर सोळा लाख तीस हजार रुपये खर्च झाले, तर दहा लाख रुपये स्टेशनाच्या उभारणीकरता लागले. काम पूर्ण झालं तेव्हा स्टीव्हन्सना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठरलेल्या मोबदल्याव्यतिरिक्त पाच हजार रुपये बोनस म्हणून देण्यात आले. १८८१ साली लंडनला रॉयल अकॅडमीमध्ये या वास्तूची डिझाइन्स कौतुकाने प्रदर्शित करण्यात आली. फ्रेडरिक स्टीव्हन्स यांना या प्रकल्पाच्या कामात सीताराम खंडेराव वैद्य यांचं बहुमोल साहाय्य होतं. वैद्य हे साहाय्यक इंजिनियर होते, तर सुपरवायझर होते एम. एम. जनार्दन.

माहिती वाचत आपण तो लयबद्ध वळणाचा जिना चढून दुसऱ्या मजल्यावर येतो. त्यापेक्षा वर चढून जायला परवानगी नसल्याचं समजतं. वरच्या घुमटापर्यंत जाता येणार नाही म्हणून मन खट्टू होतं, पण क्षणभरच. दुसऱ्या मजल्यावरच्या सज्जामधूनही तो घुमट अगदी कवेत घेता येण्याइतका जवळ दिसत असतो. घुमटाला आठ हात (रिब्ज) आहेत आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने अप्रतिम कोरीवकाम आहे. सज्जाला अनेक खिडक्या आहेत. प्रत्येक खिडकीच्या तावदानावर स्टेन्ड ग्लास पद्धतीने ‌‘जीआयपी' असा कंपनीचा मोनोग्राम रंगवलेला आहे. खिडक्यांमधून बाहेर डोकावलं की विविध कोनांमधून हे कोरीव नक्षीकाम, शिल्पं दिसतात. त्यात वैशिष्ट्यपूर्ण वाटतात प्राण्यांचे नक्षीदार, दगडी मुखवटे. 

इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणात वापरलेल्या शिल्पाकृतींची डिझाइन मॉडेल्स जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य ग्रिफिथ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली. आर्ट स्कूलचे विद्यार्थी आणि गोमेझ यांनी ते काम केलं. प्रत्यक्ष घडाई इथल्या स्थानिक कारागिरांकडूनच करून घेण्यात आली. या माहितीचं विशेष कौतुक वाटतं, कारण ही घडाई बेहद्द सुंदर आहे. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे खिडक्यांच्या तावदानांवर, तसंच घुमटाच्या तळाशी केलेलं काचेवरचं विलोभनीय रंगकाम. जगातल्या काही अप्रतिम हेरिटेज स्टेन्ड ग्लास डिझाइन्सपैकी हे एक आहे. वेटिंग हॉलमधेही अनेक पेंटिंग्ज आहेत. या सजावटीचं श्रेय ‌‘सिनॉर गिबेलो' यांना जातं. 

संगमरवरी सजावटीचे चांदई कोपरे, घडीव पाषाणातले मनोरे, डौलदार घुमट, बाह्य भागावरची देखणी शिल्पं... खालच्या प्रवेशमंडपापासून ते वरच्या घुमटाच्या कळसापर्यंत हे सारं पाहत पाहत नजर या दिमाखदार दर्शनी भागावरून पाव मैल अंतर तरी फिरत राहते. अतिशय सफाईदारपणे काटेकोर आखणी करून बसवलेली गवाक्षं, त्यांची रंगीत तावदानं, भिंतीवर केलेलं नक्षीकाम, अनेक सज्जे, त्यांचे आधार, कमानी- सगळंच अपूर्व कलाकुसरीने नटलेलं!  

घुमटावर प्रगतीचं चिन्ह म्हणून एका भव्य मूर्तीचं शिल्प आहे. खालच्या प्रत्येक चांदईवर कृषी, अभियांत्रिकी, उद्योग, व्यापार इत्यादींची प्रतीकं असलेली वेगवेगळी शिल्पं आहेत. पश्चिमेकडील मुख्य प्रवेश एका भव्य लोखंडी फाटकामधून आहे. त्याच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर ब्रिटिश साम्राज्याचा प्रतिनिधी सिंह आणि भारताचं प्रतिनिधित्व करणारा, झेप घेण्याच्या पवित्र्यातला वाघ आहे. मुख्य रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला या स्टेशनच्या दर्शनी भागाची लांबी पंधराशे फूट भरते. 

या राजेशाही घुमटाची भव्यता मोबाइल फोनच्या स्क्रीनवर मावण्यासारखी नाही हे आपल्याला लगेच कळतं आणि मग फोटो काढण्याचा व्यर्थ खटाटोप टाळून आपण सज्जातून खाली डोकावतो. मघाशी खालून वर घुमटाकडे पाहत असताना जितके चकित झालो होतो, त्याच्या दहा पटीने आपण आता चकित होतो. इमारतीचा तिकीट खिडक्या असलेला भाग वरून स्पष्ट दिसतो. सीएसटी स्टेशनाच्या या भागात ओळीत असलेल्या तिकीट खिडक्यांच्या समोर रांगा लावून शेकडो माणसं उभी असतात. त्यांतल्या एकालाही मान वर करून हे अप्रतिम वास्तुसौंदर्य बघावंसं वाटत नाही याचं आपल्याला कमालीचं आश्चर्य वाटतं. पण मग जेव्हा आपण त्या गर्दीचा एक भाग असतो तेव्हाची आपली मनःस्थिती आठवते. तेव्हा लक्ष्य असतं फक्त ट्रेनमधली विंडो सीट पकडण्याचं, त्याकरता धावत ट्रेनमधे उडी मारण्याचं. 

तिकीट खिडक्या असलेल्या प्रांगणात इटालियन संगमरवराचा केलेला आलिशान वापर वरून पाहत असताना नजरेत भरतो. भारतीय नीलवर्णी लाव्हा दगडाच्या कौशल्यपूर्ण कमानीवर कोरलेली पाना-फुलांची नक्षी, फरसबंदीही वैशिष्ट्यपूर्ण देखणी. फरशीच्या भिंतीजवळच्या कडांवरही नक्षीकाम आहे आणि छतावर सोनेरी, निळसर रंग. 

१८८७ साली मुख्यालय आणि टर्मिनस स्टेशनचं नाव महाराणी व्हिक्टोरियाच्या सन्मानार्थ समारंभपूर्वक ‌‘व्हिक्टोरिया टर्मिनस' असं ठेवलं गेलं. १९२९ साली मुख्य उभारणीत फेरबदल करून टर्मिनस स्टेशन लोकल गाड्यांच्या वाहतुकीकरता राखून नव्या भागात लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी दुसरं स्टेशन उभारलं गेलं. कालांतराने हे व्हीटी स्टेशन जगातलं सर्वोकृष्ट कलात्मक रेल्वे स्टेशन म्हणून मान्यता पावलं. आज ताजमहालाच्या बरोबरीने ही सर्वाधिक फोटो काढली गेलेली इमारत आहे.

मुंबईतल्या भर रस्त्यावर असलेल्या या अभिजात वास्तुकलेबद्दलचं आश्चर्यमिश्रित कौतुक वाटत असतानाच एक मोठी खंत मनात दाटून येते. मुंबईच्या किती तरी अनवट कोपऱ्यांमध्ये, सिमेंट काँक्रीटच्या अवाढव्य इमारतींच्या गर्दीच्या फटींमध्ये जुनं अनोखं वास्तुसौंदर्य लपलेलं आहे. ते पाहायला जायला वेळ नाही, हे कारण आपण सहज पुढे करतो. पण सीएसटी स्टेशनच्या इमारतीचं हे रोजच्या वाटेवर खुलेपणाने पसरलेलं विस्तृत, रेखीव, सुडौल वास्तुवैभव... तेही बघायला कुणाकडे वेळ नाही? तरीही ते तिथेच असं शतकभराहून जास्त काळ स्थिरावून उभं असतं... येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाने बघावं याकरता. 

मनातल्या याच खंतीपोटी मी आमच्या गाइडला ‌‘ही टूर करायला रोज साधारणपणे कितीजण येतात?' असा एक प्रश्न विचारला. त्यावर गाइडने काहीसं अपेक्षित असणारंच उत्तर दिलं- “आर्किटेक्चरचे विद्यार्थी येतात, मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करणारे काहीजण येतात, सुट्ट्यांमधे काहीजण येतात. बाकी फारसं कुणी येत नाही. आणि येणाऱ्यांपैकी ९० टक्के परदेशी पर्यटक असतात.” ऐकून वाईट वाटलंच.

पश्चिमेकडच्या भव्य लोखंडी द्वारातून बाहेर येऊन आम्ही पुन्हा एकदा मध्य रेल्वे मुख्यालयाच्या इमारतीकडे वळून पाहिलं. पिवळ्या मालाड स्टोनमधे बांधलेली, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालेली ही देखणी गॉथिक इमारत संध्याकाळच्या उतरत्या उन्हात सोनेरी रंगात झळकत दिमाखात उभी असते. कलात्मक असली तरी ही फक्त शोभेची, दिखाऊ नाही; एखाद्या म्युझियमसारखी इतिहासात जगणारीही नाही. १३० वर्षांहून जास्त काळ ही वास्तू जिवंत आहे. 

आमच्या मागून एक मोठा लोंढा येत होता. कसला तरी मोर्चा होता. त्यातूनच वाट काढत घरी परतण्याकरता लगबगीने चालणारे मुंबईकर स्टेशनात हजारोंच्या झुंडीने घुसत होते. स्टेशन नेहमीसारखंच गजबजलेलं, गर्दीला आपल्या पोटात सामावून घेत ठाम उभं होतं.  

रोज चाळीस दशलक्ष माणसं या इमारतीच्या देखण्या फरसबंदीवरून ये-जा करतात. त्यांच्या पदन्यासाने या वास्तूचं हृदय धडधडत राहिलं आहे, सातत्याने. मुंबईत माणसं आहेत तोवर ही इमारत अशीच जिवंत राहणार आहे. 

मुंबईवर लिहिली गेलेली ही सर्वांत प्राचीन परंतु कधीही जुनी होऊ न शकणारी कविता आहे!

(सीएसटी हेरिटेज टूर सोमवार ते शनिवार- सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता दुपारी ३ ते ५ या वेळेत करता येते. प्रवेशशुल्क रु. २००/-)

(मुशाफिरी, २०१५च्या अंकातून साभार.)

शर्मिला फडके







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results