
गेले काही दिवस केरळमध्ये एक विषय जोरदार चर्चेत आहे. विषय धार्मिक प्रथेशी नि परंपरेशी संबंधित असल्याने दोन्ही-तिन्ही बाजूने लोक अहमहमिकेने बोलत आहेत. केरळमधील अनेक जुन्या देवस्थानांमध्ये पुरुष भाविकांनी शर्ट न घालता उघड्या अंगाने मंदिरात जाण्याची सक्ती आहे. पोट-छाती झाकलेली असेल तर त्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश करता येत नाही. ही प्रथा आता सोडावी आणि पुरुषांवर शर्ट काढण्याची सक्ती करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यावरून तिकडे बराच वादंग माजला आहे.
या वादाच्या कंगोऱ्यांकडे वळण्याआधी केरळचा इतिहास बघायला हवा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून केरळमध्ये कम्युनिस्ट आणि काँग्रेस या दोनच पक्षांचा वरचष्मा राहिलेला आहे. तिथे भाजप फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यामुळे केरळी समाज हा देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे, असा समज कुणाचाही व्हावा. या राज्यात प्रबोधन आणि सुधारणांचा मोठा वारसा आहे आणि कम्युनिस्टांमुळे निधर्मी विचारांचाही प्रभाव आहे; पण तरीही मुळात तो समाज कमालीचा धार्मिक आणि देवभोळा आहे, हेही खरं आहे. चर्च आणि मशिदींप्रमाणे इकडे मंदिरांचं आणि प्राचीन देवस्थानांचं प्रस्थ मोठं आहे. यातील बहुतेक मंदिरांमध्ये जुन्या-पुराण्या प्रथा अजूनही चालू आहेत. पुरुष भाविकांना शर्ट काढून दर्शन घ्यावं लागण्याची सक्ती त्यातील एक.
केरळमध्ये नारायण गुरू नावाचे मोठे बंडखोर समाज सुधारक होऊन गेले. आपल्या महात्मा फुलेंच्या तोडीचं काम त्यांनी केलं. ते ज्या इळावा समाजाचे होते तो समाज शूद्र समजल्या जाणाऱ्या वर्णातला होता. पण त्यांना अन्य समाज अतिशूद्रांसारखी अस्पृश्यतेची वागणूक देत होता. पूर्वीच्या काळी दलितांवर जी कामं करण्याची सक्ती केली जात असे, तशी सक्ती या समाजावर कधी केली गेली नाही, तरीही हा समाज अस्पृश्य मानला गेला. त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. या आणि अन्य अन्यायांविरोधात नारायण गुरू यांनी बंड केलं आणि सर्व जातिधर्मांना मुक्त प्रवेश देणारी पर्यायी मंदिर चळवळ उभारली. शाळा काढल्या. नाकारलेल्यांना ज्ञानाचे दरवाजे खुले केले. असं बरंच काही केलं.
नारायण गुरुंनी स्थापन केलेल्या मंदिरं आणि संस्थांमध्ये नंतरही समाज सुधारणेची कास धरून ठेवली गेली. हल्लीच श्री नारायण गुरू धर्म संघम ट्रस्टचे धार्मिक प्रमुख स्वामी सच्चिदानंद यांनी एका जाहीर कार्यक्रमात शर्ट-सक्ती प्रकरणाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ही प्रथा सोडून दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन हेही उपस्थित होते. त्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला आणि सच्चिदानंद यांचं म्हणणं नारायण गुरू यांच्या शिकवणुकीला धरून आहे, असं म्हटलं.

एक धार्मिक प्रमुख आणि एक राजकीय प्रमुख अशा दोघांनी शर्टसक्ती विरोधात भूमिका घेतल्यामुळे हा विषय एकदम चर्चेत आला. बदलत्या काळाप्रमाणे जुन्या प्रथा सोडून द्यायला हव्यात असं मत मांडत असतानाच काही मंदिरांमध्ये पुरुषांना पँटवर धोतर गुंडाळायला लावण्याची आणि स्त्रियांना सलवार कमीजवर साडी नेसायला लावण्याची सक्ती केली जाते तीही नाकारायला हवी, असं मत सच्चिदानंदांनी व्यक्त केलं. पूर्वीच्या काळी तथाकथित निम्न जातींना मंदिरात येण्यापासून मज्जाव करण्यासाठी पुरुषांनी उघड्या अंगाने आणण्याची सक्ती करण्यात आली होती. ब्राह्मण पुरुष जानवं घालत असल्याने आणि इतरांना तसा अधिकार नसल्याने त्यांच्यात भेद करण्यासाठी ही युक्ती शोधून काढली होती, असा सच्चिदानंद यांचा दावा आहे. आता जातीच्या आधारे कुणालाही मंदिर प्रवेश नाकारता येत नसल्याने या प्रथेचा पुराणमतवाद्यांना काही उपयोग नाही, असं त्यांचं म्हणणं.
स्वामी सच्चिदानंद हे इळावा समाजातील आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचं इळावा समाजाचं धार्मिक-सामाजिक नेतृत्व करणाऱ्या श्री नारायण गुरू धर्म प्रतिप्रालन समिती (एसएनडीपी) यांनीही समर्थन केलं आहे. मात्र केरळमधील नायर या दुसऱ्या मोठ्या समाजाच्या नायर सर्विस सोसायटीने त्याला विरोध केला आहे. त्यांच्या पाठीशी इतरही काही घटक गोळा होत आहेत.
उघड्या अंगाने दर्शन घेण्याचा जानव्याशी आणि जातिभेदाशी काही संबंध नाही. वरिष्ठ, वयोवृद्ध, ज्येष्ठ आणि देवासमोर समोर उघड्या अंगाने लीन होण्याची पूर्वापार पद्धत आहे. या पद्धतीचा भाग म्हणून पूर्वीचे राजे रजवाडेही देवालयात मूर्तीसमोर उघड्या अंगाने जात. देव सर्वोच्च आहे ही त्यामागची भावना होती, असं या मंडळींचं म्हणणं आहे. शिवाय आपल्या प्रथांचं पालन करण्या-न करण्याचा अधिकार भाविकांकडे असावा; राजकारण्यांनी किंवा इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी या गटाची भूमिका आहे.
हा वाद आत्ता उफाळून आलेला असला तरी हे सगळं आताच पहिल्यांदा घडतंय असं नाही. खुद्द नारायण गुरुंनी स्थापन केलेल्या तलास्सेरी इथल्या जगन्नाथ मंदिरात शर्टाची सक्ती होती. ती मंदिर प्रशासनाने विचारपूर्वक हटवली तेव्हा खुद्द भाविकांनीच ती नाकारली आणि त्यामुळे पुन्हा शर्ट सक्ती सुरू झाली. मंदिरं ही संघर्षाची जागा बनू नये म्हणून मंदिर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला, पण त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. येत्या काळात ही सक्ती दूर केली जाईल, असंच ते म्हणत आहेत.
दुसरीकडे, गुरूवायूर या प्रसिद्ध देवस्थानात स्त्रियांना साडी नेसल्याखेरीज प्रवेश नव्हता. पण उत्तरेकडील भक्तांचा ओघ वाढला तसा २०१३ मध्ये सलवार कमीज घालून येणाऱ्या स्त्रियांना प्रवेश दिला जाऊ लागला. याचा अर्थ जनरेट्यामुळे किंवा बदलत्या काळाला प्रतिसाद म्हणून प्रथा बदलल्या जाण्याची प्रक्रिया आधीपासून सुरू आहे. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाची प्राचीन मंदिरं आणि त्रिवेंद्रममधील पद्मनाभ स्वामींच्या मंदिरासारख्या अन्य महत्त्वाच्या मंदिरात उघड्या अंगानेच प्रवेश दिला जातो. मंदिरात मूर्ती समोर उभं राहिलं की मूर्तीचं तेज पुरुषांच्या छातीतून शरीरात प्रवेश करतं, तर स्त्रियांच्या भालप्रदेशातून (म्हणजे कपाळातून) प्रवेश करतं, असा जुना समज आहे. त्यामुळे ही सक्ती केली जात असल्याचं सांगितलं जातं. पण या समजाला कोणताही धार्मिक किंवा शास्त्रीय आधार नाही, असं विरोधकांचं म्हणणं आहे. देव आणि भक्ताचं नातं हे शर्टासह किंवा शर्टाविना तयार होत नाही, ते श्रद्धेतून तयार होतं. त्यामुळे शर्ट न घालण्याचं समर्थन करणं फिजूल आहे, असं म्हटलं जातंय.

उघड्या अंगाने मंदिरात जाण्याची प्रथा मान्य नसलेले अनेक भाविक केरळमध्ये आहेत. ही मंडळी मंदिराच्या बाहेरूनच देवदर्शन करण्याचा सत्याग्रह करत आहेत. जोवर शर्ट काढण्याची सक्ती हटत नाही, तोवर मंदिरात प्रवेश करणार नाही असा प्रण घेतलेलेही आहेत. त्यांच्यामते सच्चिदानंद यांनी घेतलेली भूमिका आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेला पाठिंबा यामुळे ही प्रथा लवकरच संपेल आणि देवदर्शन सुलभ होईल.
हा गदारोळ सुरू असताना भाजपने मात्र अजून या वादात जाहीर भूमिका घेतलेली नाही. एकीकडे हा पक्ष इळावा या समाजात चंचूप्रवेश करण्यासाठी धडपडतो आहे. (या समाजाची हिंदूंमधील लोकसंख्या २५ टक्के आहे.) त्यामुळे या समाजाचं मत विनाशर्ट प्रवेशाची सक्ती हटवावी, असं असेल तर पक्ष त्या भूमिकेच्या विरोधात जाण्याची हिंमत करेल असं वाटत नाही. दुसरीकडे, भाजपची मूळ भूमिका ही धार्मिक प्रथा परंपरा टिकवून ठेवण्याची असते. त्यामुळे त्यांचा स्वाभाविक कल ‘आहे ते चालू द्या’ असाच असणार. तशी भूमिका घेतली तर नायर समाज त्यांच्या बाजूने येईल, पण इळावा समाजाचा पाठिंबा त्यांना गमवावा लागेल. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लाखो भक्तांनी विरोध केल्यानंतर त्यात सुरात सूर मिळवून भाजपने केरळमधील कम्युनिस्ट आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांची गोची केली होती. त्यातून त्यांनी परंपरावादी मतदारांची सहानुभूतीही मिळवली होती. पण आत्ताच्या ताज्या वादात भाजपची स्वत:चीच कोंडी होण्याची शक्यता असल्याने त्यांनी त्यात उडी घेतलेली दिसत नाही.
एकीकडे देव-धर्म आणि परंपरेचा पगडा आणि दुसरीकडे नारायण गुरूंचा सुधारणावादी, परिवर्तनवादी प्रभाव अशा दोन प्रवाहांची टक्कर सध्या केरळात बघायला मिळते आहे. या वादाचा शेवट समन्वयाने होतो की त्यातून संघर्ष घडतो हे येत्या काही दिवसांत कळणार आहे.

ता.क. : स्वामी सच्चिदानंद यांच्या आवाहनानंतर एर्नाकुलम जिल्ह्यातील चेरई येथील गौरीश्वर मंदिराच्या प्रशासनाने पुरुषांनी शर्ट न घालण्याच्या प्रथेला रामराम ठोकला आहे. हे मंदिरही श्री नारायण गुरुंनी स्थापन केलं होतं, हे विशेष.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.