आम्ही कोण?
ले 

फिजिक्सचा शिक्षक जेव्हा सायकलवरून पेपर टाकतो..

  • किरीट कोकजे
  • 03.06.26
  • वाचनवेळ 9 मि.
speaking wheels kirit kokje

लहानपणापासून मला खेळाची आवड होती. मी टेबल टेनिससह इतरही अनेक खेळ खेळायचो. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण आठवीत असतानाच मी सीओईपीमध्ये प्रवेश घ्यायचं नक्की ठरवलं होतं. तिथूनच इंजिनीयर होण्यापेक्षा मला तिथल्या रोईंग क्लबचं आकर्षण होतं. बोर्डाच्या परीक्षेच्या वेळीही मी खेळात व्यत्यय येऊ दिला नाही. उलट खेळामुळे अभ्यासातलाही उत्साह वाढायचा. अभ्यास भरपूर करायचो आणि खेळायचोही भरपूर. मी घरच्यांना सांगायचो, ‘मी मार्क्स आणतो, पण मला खेळू द्या.’ आठवीत असताना मी सिधये सरांच्या क्लासला जायला लागलो. सिधये सर माझ्यातल्या खेळाडूच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. अभ्यासाइतकाच खेळही महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाल्याने मला मोठा आधार मिळाला.

पुढे मी इंजिनीयर झालो, सिधये सरांच्याच क्लासमध्ये इंजिनीयरिंगचे विषय शिकवायला लागलो आणि काय झालं कुणास ठावूक बघता बघता माझा खेळ थांबलाच. ठप्प. घर आणि क्लास यात गुंतून गेलो. स्वतःकडे दुर्लक्ष झालं. वजन वाढत गेलं. एकदा तर मला आठवतं, क्लासची लिफ्ट बंद पडली. तीन मजले चढून जायचे म्हटल्यावर टेन्शनच आलं. अगदी धापा टाकत मी तो जिना अक्षरशः सर केला. आपण एकेकाळी खेळाडू होतो, यावर माझाच विश्वास बसेना.

हे प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही. पर्सनल आयुष्यातही काही अडचणी आल्या. ट्रॉमा आला. त्यातून डिप्रेशन आलं. लोकांमध्ये मिसळणं आवडेनासं झालं. जवळपास आठ वर्षं या दुष्टचक्रात अडकून पडलो. वजन तर १०८ वर गेलं. यातून बाहेर पडायला पाहिजे हे कळत होतं, पण पडता येत नव्हतं. शेवटी निराशेच्या गर्तेतून वर येण्यासाठी मी समुपदेशक सरोज भडभडे यांना भेटलो. त्या माझ्याशी छान बोलल्या. माझ्या आधीच्या आयुष्याबद्दल ऐकल्यावर मला म्हणाल्या, ‘‘तू स्पोर्ट्‌स पर्सन आहेस. तू असा भकास कशाला बसलायस. खेळ तर पुन्हा सुरू कर. मग बघू काय होतं..’’

त्यांचं म्हणणं बरोबर होतं. त्यांनी मला मेडिटेशन करायलाही सुचवलं होतं. पण शांत बसलो की माझंच आयुष्य माझ्या अंगावर यायचं. त्यापेक्षा खेळ सुरू करणं हा चांगला पर्याय होता. पण खेळायला जायचं तर माणसं भेटतील, ते मला नको होतं. डिप्रेशन असलेल्यांना एकटेपणा आवडतो. माणसांमध्ये मिसळताना न्यूनगंड येतो. मग काय करायचं? कळत नव्हतं. पण एके दिवशी अचानक एक नवा मार्ग सापडला. झालं असं की तेव्हा आमच्या घरी सकाळी साडेआठला पेपर यायचा. मला तर सकाळी लवकर पेपर वाचायला आवडायचं. ‘सकाळी लवकर का पेपर टाकत नाही,’ असं विचारल्यावर पेपरवाला म्हणाला, ‘काय करणार माणसं मिळत नाहीत. तुमच्याकडे कुणी मुलं असतील तर मला सुचवा.’ त्याचं उत्तर ऐकून मला काय वाटलं माहीत नाही, मी त्याला म्हटलं, ‘‘चल, मी टाकतो पेपर.’’

speaking wheels kirit kokje

आणि खरोखरच वडिलांनी मला बक्षीस म्हणून घेऊन दिलेली जुनी सायकल दुरुस्त करून घेतली आणि पहाटे पेपर टाकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी दीड तास पेपर टाकले. क्लासची लिफ्ट बंद पडल्यावर टेन्शनमध्ये येणारा मी त्या दिवशी पहिल्याच फटक्यात अनेक इमारती चढलो, उतरलो. घरी आलो, तेव्हा चांगलाच दमलो होतो. पण कितीतरी दिवसांनी मला बरं वाटलं, फ्रेश वाटलं. मग मी हे काम सुरूच केलं. अगदी वक्तशीरपणे मी सगळे पेपर टाकायचो. त्यामुळे वाचक पेपरवाल्याला विचरू लागले, ‘‘हा नवीन पोऱ्या कोण आहे?’’ त्यावर त्यांनीही हसून उत्तर दिलं, ‘अहो, पोऱ्या नाही, इंजिनिअर आहेत ते.’’ त्यानंतर मी पेपर टाकायचो त्यापैकी अनेक घरातल्या लोकांनी माझ्याशी ओळख करून घेतली. हा कोण इंजिनीयर आपल्याकडे पेपर टाकतोय, हे त्यांना बघायचं होतं.

दरम्यान, पेपर टाकत असताना मला एक गृहस्थ सकाळी खांद्यावर सायकल घेऊन इमारतीतून बाहेर पडताना दिसायचे. रस्त्यावर आले की सायकलवर टांग मारून निघून जायचे. भल्या पहाटे हे सायकलवरून कुठे जातात, याबद्दल मला उत्सुकता वाटायची. एकदा मी त्यांना न राहवून विचारलं, तर कळलं त्यांचा सायकलिंगचा ग्रुप आहे आणि ते रोज सकाळी सायकल चालवतात. सायकलिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. आणखीही बरीच माहिती मिळाली. तोवर या सगळ्याबद्दल मी पूर्ण अनभिज्ञ होतो.

दरम्यान मला पेपर टाकून सहा महिने होऊन गेले होते. सायकलिंग, जिने चढ उतार आणि फक्त घरचं जेवण यामुळे माझं वजन १०८ वरून आधी ८० आणि मग नंतर ६८ वर आलं होतं. मुख्य म्हणजे डिप्रेशनही गायब झालं होतं. सायकलिंगची किमया मला पटली होती. मनात आलं, आता या सायकलिंगच्या स्पर्धांमध्येही भाग घेऊन बघावा.

हेही वाचा - साइकिल बड़ी नामी चीज़ है!

माझा पहिला सायकलिंग इव्हेंट होता ड्युएथलॉन! सायकल आणि धावण्याची स्पर्धा अशी ही स्पर्धा होती. मी माझी जुनी सायकल घेऊन तिथे पोहोचलो. बघतो तर तिकडे सगळ्यांच्या भारी भारी गिअरवाल्या रेसर सायकली. पण म्हटलं, ‘असू देत, जुनी तर जुनी, गावठी तर गावठी. आपल्याला कुठे पहिला नंबर काढायचाय. आपल्याला मजा आल्याशी कारण.’ आणि झालंही तसंच. मला फार मजा आली. मुख्य म्हणजे त्या जुन्या सायकलीसह मी त्या स्पर्धेत सहावा आलो. तिथे अतुल गोडबोले, हिरेन पटेल, प्रशांत तिडके अशा इतर अनेक अॅथलिट्सशी माझी ओळख झाली. त्यांच्यामुळे मला सायकलिंगचं जग कळलं. प्रशांत तिडके तर पुढे माझे गुरूच बनले.

त्यानंतर मी लोणावळा चॅलेंज या सायकल स्पर्धेत भाग घेतला. ती माझी पहिली सायकल सेंच्युरी, म्हणजे १०० किलोमीटर सायकल राइड. माझ्या एका मित्राची, शौनक लिमयेची सायकल घेऊन गेलो. तीही साधी हायब्रिड सायकल होती. पण माझ्या सायकलपेक्षा चांगली. त्या स्पर्धेत तर मी चक्क पहिलाच आलो. त्यामुळे आत्मविश्वास आणखी बळावला. दिव्या ताटे, प्रशांत जोग अशा आणखी नव्या लोकांशी ओळखी झाल्या.

त्यानंतर या मंडळींमुळे मला सायकलिंगमधली बीआरएम (Brevet de Randonneur Mondiaux) ही संकल्पना कळली. बीआरएम हे लांब पल्ल्याचे, विनास्पर्धा सायकलिंग इव्हेंट्स असतात. म्हणजे साधारणपणे १०० ते अगदी १२००-१५०० किलोमीटर एवढ्या लांब पल्ल्याचे. अशा स्पर्धांमध्ये कोण पहिलं आलं, कोण शेवटचं आलं याला महत्त्व नसतं, तर तुम्ही ठरलेल्या वेळेत ठरलेलं अंतर पूर्ण करता की नाही एवढंच महत्त्वाचं असतं.

speaking wheels kirit kokje

मला ही कन्सेप्टच फार आवडली. इथे स्पर्धा नव्हे, तर तुमचा सहभाग, तुमचा अनुभव, तुमचा प्रवास जास्त महत्त्वाचा. आयुष्यात इतकी स्पर्धा आणि स्ट्रेस असताना पुन्हा सायकलिंगमध्येही तो कशाला, हे मला फार आवडलं. त्यामुळे मी या बीएमआरमध्ये मनापासून भाग घ्यायला लागलो. त्यामुळेच आजवर मी किती बीएमआर इव्हेंट पूर्ण केलेत, हे आता मी मोजणंही सोडून दिलंय. त्यानंतर मी लंडन-एडिनब्रा-लंडन (एलईएल-१५०० किमी अंतर १२५ तासांत पूर्ण करायची असते.), पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (पीबीपी-१२४३ किमी अंतर ९० तासांत पूर्ण करायचं असतं.) असे दीर्घ पल्ल्याचे सायकलिंग इव्हेंट्स, तसंच अनेक ट्रायथलॉन (सायकलिंग-रनिंग-स्विमिंग) इव्हेंट्सही पूर्ण केले. त्यात Pune Randonneurs चे संस्थापक प्रशांत जोग यांनी मला खूप मदत केली, मार्गदर्शन केलं.

अर्थात अशा दीर्घ पल्ल्याच्या सायकलिंगसाठी किंवा ट्रायथलॉनसाठी ट्रेनिंगही खूप लागतं. सलग तीन दिवस रात्र न झोपता सायकल चालवणं ही सोपी गोष्ट नाही. तेवढंच नव्हे, तर अशा स्पर्धांसाठी मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं गरजेचं असतं, मानिसक कणखरपणा लागतो, घरच्यांचा, तुम्ही जिथे काम करता तिथल्या मंडळींचा पाठिंबा लागतो. मी जे काही वेड डोक्यात घेईन, त्यात माझी आई, ताई, जिजाजी पाठिशी असतात म्हणूनच मी हे सारं करू शकतो. एवढंच नव्हे, तर सिधये सर मी आठवीत असल्यापासून माझ्यामागे गॉडफादरसारखे उभे आहेत. ते आणि आमच्या क्लासमझले माझे सर्व सहकारी माझ्यावरच्या जबाबदाऱ्या वाटून घेतात म्हणूनच बीएमआरसारख्या इव्हेंट्समध्ये भाग घेऊन शकतो.

परदेशातल्या सायकलिंग इव्हेंट्समध्ये भाग घेण्याआधी आपल्याकडच्या स्पर्धांमध्ये सराव केलेला कधीही चांगला. पुण्यातील रँडोनियर्स क्लब २००, ३००, ४००, ६००, १००० किलोमीटर अशा स्पर्धांचं आयोजन करतो. तिथे तावून सुलाखून निघाल्यावर पुढच्या स्पर्धा करता येऊ शकतात. पण मला विचाराल, तर अशा कुठल्याही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा तो स्वतःच्या समाधानासाठी, स्पर्धा करायची तर ती फक्त स्वतःशीच. शिवाय अशा स्पर्धांमध्ये तुम्हाला भन्नाट अनुभव मिळतात, निरनिराळ्या देशातले लोक तर भेटतातच, पण स्वतःसोबतही दरवेळी वेगळे अनुभव मिळतात.

speaking wheels kirit kokje

त्यातले एक-दोन अनुभव सांगतो. मी पहिल्यांदाच फ्रान्सच्या पीबीपीमध्ये भाग घेतला होता. ४०० किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर माझी सायकल नादुरुस्त झाली. तिथे स्पर्धकांसाठी मेकॅनिक असतात. पण त्यालाही ती पूर्ण दुरुस्त करता आली नाही. आता पुढे काय करायचं हे कळत नव्हतं. मी तर अगदी रडकुंडीला आलो होतो. तेवढ्यात तिथे जवळच राहणारा मायकल नावाचा फ्रेंच माणूस भेटला. त्यांनीही माझी सायकल दुरुस्त होते का पाहिलं. पण त्यांना जमेना, शिवाय भाषेचा प्रश्न होताच. शेवटी मला ती राइट मध्येच सोडावी लागली. माझी निराशा पाहून मायकल मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याच्या घरी वर्कशॉपमध्ये मला त्याने सायकलचं तुटलेलं हँगर नव्याने तयार करून दिलं. मला घरी खाऊ-पिऊ घातलं. त्याच्या बागेत तयार झालेली फळं दिली. त्याच्याकडून कळलं की दर चार वर्षांनी होणाऱ्या पीबीपीसाठी तो आणि त्याच्यासारखे अनेक लोक चार दिवस सुट्टी काढतात आणि जगभरातल्या सायकली बघायला इथे येतात. सायकलिंगबद्दलची त्यांची आस्था पाहून मी तर थक्क झालो.

मायकल आग्रह करत असूनही त्या रात्री मला त्याच्याकडे राहणं शक्य नव्हतो. त्यामुळे मी ठरलेल्या ठिकाणी गेलो. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता माझी ट्रेन सुटणार होती, तर मायकल आणि त्याचा मुलगा सायकलवरून मला निरोप द्यायला आले. माझा हात हातात घेऊन मायकल म्हणाला, ‘‘चार वर्षांनी तू पुन्हा पीबीपीला यायचंस. मी तुझी वाट बघतोय.’’ माझ्या डोळ्यात पाणीच आलं.

मग मी खरोखरच चार वर्षांनी पुन्हा पीबीपीला गेलो, तेव्हा मायकल माझ्या नावाचा बोर्ड आणि घरची फळं घेऊन माझी वाट बघत होता. दुसऱ्या वेळी मी राइड पूर्ण करू शकलो. तो अनुभव सॉल्लिड होता. पण मायकलला भेटण्याचा अनुभवही तितकाच भारी होता असं मी म्हणेन.

लंडन-एडिनब्रा-लंडन राइडमध्येही वाटेत एकदा माझी पूर्ण एनर्जी संपली होती. नव्हे, मीच संपलो होतो. भयानक चढ होता. प्रचंड हीट होती. सायकल हातात धरूनच मी चाललो होतो. इतका अवघड टप्पा होता, की अनेक सायकलिस्ट चालत होते. आता पुढे शक्य नाही अशा ट्प्प्यावर आलो होतो. तिकडे भारतातून माझे कोच संतोष पवार सर मला सांगत होते की तुला जो कोणी रायडर दिसेल त्याच्याकडून सॉल्टटॅब घे. तुला आता त्याचीच गरज आहे. कार्बोहायड्रेटने तुझं काम होणार नाही. पण कुणाकडेच सॉल्टटॅब शिल्लक नव्हती. चेक पॉइंट १० किलोमीटरवर होता. तिथे पोचलो, तर दारातच एक व्हॉलेंटियर हातात सॉल्टटॅब घेऊनच उभी होती. मी ती घेतली. पुन्हा एकदा कोच सरांशी बोललो. त्यांनी सांगितलं, ‘‘तू वेल इन टाइम आहे, आता तिथेच तीन तास झोप काढ आणि मगच निघ.’’ मी तसंच केलं आणि स्पर्धा पूर्ण केली.

असे आणखी किती तरी अनुभव. एकूण काय, तर आपल्या महाराष्ट्रात असो, भारतात असो किंवा भारताबाहेर स्वतःला आजमावण्याचे अनुभव आणि असे माणसांचे अनुभव मला पुढच्या राइड्ससाठी प्रोत्साहन देत राहतात.

(किरीट कोकजे यांचे आणखी भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी स्पीकिंग व्हील्सचा पॉडकास्ट ऐका - https://www.youtube.com/watch?v=Khrjc6RLS-0.
या लेखसाठी स्पीकिंग व्हील्स, अमित गाडगीळ आणि किरीट कोकजे यांचे आभार)

किरीट कोकजे







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 6

चंद्रजीत पाटील03.06.26
सर... आपल्या अनुभवाचा नवोदित सायकलपट्टूंना निश्चित फायदा होईल

Avinash Hari Patil03.06.26
You are really inspiring person😊.

Narendra Deshmukh03.06.26
खूप छान लेख. स्वतःचे अनुभव इतरांसाठीही प्रेरणादायी केलेत तुम्ही या लेखातून. अभिनंदन किरीट!! 💐

उमेश वाघेला 03.06.26
जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर माणूस काय काय करू शकतो याचें हे उत्तम उदाहरण आहे असे म्हणता येईल. आपण इंजिनिअर आहोत म्हणून त्यापेक्षा खालच्या लेव्हलचे काम न समजता त्याला दुहेरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सायकल चालवणारे फार कमी लोक आहेत. ग्रेट सायकलिंग आणि ग्रेट सायक्लिस्ट! सलाम तुमच्या जिद्दीला!!

Shailendra Kamble03.06.26
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चड उतार असतात... खेळ मग तो कोणताही असो तो जोपासणे अत्यंत जरुरी आहे, हे तुमच्या अनुभवातून अधोरेखित होते. तुमची कारकीर्द सद्याचं धका धकी च्या आयुष्यात अनेकांना प्रेरणादाई आहे.

Sanjay Joshi03.06.26
किरीट मस्तच लिहले आहेस All the best,

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results