आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

तेजोनिधी लोहगोल

  • सुचेता कडेठाणकर
  • 09.05.26
  • वाचनवेळ 6 मि.
heat gobi desert

पृथ्वीच्या ज्या भागात आपण राहतो, त्या भागात आपण सूर्याच्या प्रखर तेजापासून आणि उष्म्यापासून सहजी बचावू शकत नाही. पण तरीही विचार करून बघा, सूर्याचा आणि आपला संबंध रोज किती वेळा आणि कसा येतो? सकाळचा आणि संध्याकाळचा सौम्य सूर्य आपण एन्जॉय करतो, पण जसा सूर्य डोक्यावर येतो तसतसा सूर्याचा आणि आपला संबंध आपण शक्यतो येऊच देत नाही. त्यामुळे सूर्य ही काय चीज आहे याचा उघडावाघडा अनुभव मुद्दाम घेतल्याखेरीज शहरी माणसाला येण्याची शक्यता फार फार दूरची. कारण त्याच्याशी होणारा आमना-सामना टाळण्यातच आपण व्यस्त असतो.

खरं तर अगदी 'आऊट इन ओपन' म्हणतात तसं स्वतःला सूर्याच्या ताब्यात दिल्यावरच पंचमहाभुतांमधल्या या तेजाच्या शक्तीची कल्पना आपल्याला येते. मी स्वतःला असं संपूर्णपणे निसर्गाच्या ताब्यात कायम देत आले आहे. सह्याद्रीमध्ये फिरताना, गड-किल्ले आणि रानवाटा तुडवताना सूर्याची आणि उन्हाची साथसंगत कायमचीच राहिली आहे. पण असं उन्हातान्हात भटकताना आणि घामाच्या धारा लागलेल्या असतानाही मध्येच एखादा वाढलेला जुना वड दिसतो किंवा जांभूळ दिसतो. गर्द दाट हिरव्या रंगाची कित्येक वेगवेगळ्या प्रकारची झाडं सह्याद्रीतल्या फेऱ्यांत हमखास कुठे ना कुठे दिसतातच. त्यामुळे उन्हाची आणि सूर्याच्या जाळणाऱ्या उष्णतेची झळ काही काळ लागली, तरी इथे फिरताना सावलीची शाश्वती असते. आत्ता नाही तरी अजून काही अंतरावर, काही वेळातच कुठे ना कुठे सावली मिळणार आणि मग तापलेल्या शरीराला थंडावा मिळणार हे माहीत असतं. कुठे ना कुठे एखादा झरा असणार, एखादा ओहोळ किंवा छोटासा धबधबा असणार आणि मग तहानेने कोरडा पडलेला घसा ओला करता येणार अशी खात्री असते. मिळणारी ही खात्री लाखमोलाची असते. कारण त्यातून तुम्हाला कडक उन्हात फिरण्याचं बळ मिळत असतं.

पण मी चीनच्याही पल्याड असलेल्या मंगोलियातील गोबीच्या वाळवंटातून तब्बल बावन्न दिवस चालले, तेव्हा सूर्य ही काय चीज आहे आणि त्याचं तेज म्हणजे काय हे आयुष्यभरासाठी मला कळून चुकलं.

हेही वाचा - उष्णतेच्या लाटा : आपत्ती व्यवस्थापन का होत नाही?

गोबी हे आशियातलं सर्वाधिक लांबीचं वाळवंट आहे. दिवसा उन्हाने भाजून काढणाऱ्या आणि रात्री हाडं गोठवून टाकणाऱ्या या सोळाशे किलोमीटर वाळवंटात मी दिवसांमागून दिवस चालत होते. इथे अगदी क्षितिजापल्याडपर्यंत, अगदी तुमची दृष्टी थकेल इथपर्यंत तुम्ही बघू शकता, इतकं इथलं वातावरण स्वच्छ असतं. अर्थात इथे बघायला वाळूखेरीज दुसरं काही नसतं हा भाग वेगळा. पण बघायला कोणताच आडपडदा नसतो. दृष्टी काही नाही. डोक्यावर तापणारा सूर्य आणि पायाखाली त्याच अडवणारं मध्ये काहीच नाही... डोंगर, झाडं, इमारती असं काही सूर्याने तापवलेली वाळू, सूर्य येणार पहाटे साडेपाच वाजता आणि जाणार साधारण रात्री आठ वाजता. तोवर तितक्याच समान तीव्रतेने हा तेजोनिधी लोहगोल आपलं तेज सांडत राहणार. आपण त्याच्या तेजात न्हाऊन निघतोय, अशी सुखद कल्पना करत स्वतःला समजावत राहणार, हे असं सारखं सारखं रोज रोज होणार.

पण वाळवंटामधले सूर्याचे प्रताप केवळ उन्हापर्यंतच किंवा ते ऊन शरीराला जाणवण्यापर्यंतच मर्यादित नसतं. सूर्यकिरण, उष्ण हवा, आणि वारा यांच्या मिश्रणाने निर्माण होणारा मृगजळाचा जो चमत्कार आम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून वाळवंटाने दाखवला त्याने सूर्याच्या एका अजब शक्तीशी ओळख झाली. वाळवंटात मृगजळ दिसतं ते सूर्यकिरणांच्या खेळामुळे दिसतं, ते खोटं असतं, हे सगळं माहीत असूनसुद्धा खऱ्या- खोट्याच्या सीमारेषेवरच्या या मृगजळाचा खूप खोल परिणाम माझ्या मनावर होत गेला. असण्या आणि नसण्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या मृगजळाशी पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यापासूनच मनामध्ये ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला होता. एकाच वेळी सगळं मिथ्या आणि खरंही वाटायला लागलं होतं. दूरवर दिसतंय ते पाणी असल्यासारखं वाटतं होतं, पण त्याच वेळेस ते पाणी नाहीये असंसुद्धा वाटतं होतं. मग ते खरंच पाणी होतं की नाही? सूर्याकडून फसवलं जाण्याचा हा अनुभव मला सर्वस्वी नवीन होता, आणि मग पुढे पुढे उन्हात चालून चालून मन आणि शरीर थकल्यानंतर बहुधा ते फसणंच खरं वाटायला लागलं होतं. मनावरचा हा संस्कार एवढा तडाखेबंद होता, की एखादी गोष्ट खरी असली तरी ती फसवीच वाटायला लागली होती. पायांमध्ये 'शूज' घातलेत पण पायांखालच्या वाळूची खरखर आणि उन्हाची रखरख इतकी थेट तळपायांपर्यंत पोहोचे, की आपण शूज न घालता अनवाणीच चालल्यासारखंच वाटू लागे. मग प्रश्न पडे- मी शूज घातले आहेत की नाहीत? थोडा वेळ थांबून, पायांना हात लावून बघितलं तर कदाचित कळू शकण्याची शक्यता वाटे. पण थांबूनसुद्धा कदाचित काहीच कळणार नाही, असंसुद्धा वाटे. मग थांबावं की राहू द्यावं, असा प्रश्न डोकं खाई. खरं तर काल रात्री झोपताना मी पायांमधून शूज काढलेच नाहीत, असं वाटे. पण, आज सकाळी निघताना मी पायांत शूज घातलेच नव्हते असंही वाटे, मग प्रश्न पडे-मी शूज काढलेच नाहीत की घातलेच नाहीत? न भूतो न भविष्यति असा हा गोंधळ डोक्यात माजण्याचं कारण सूर्याच्या उष्णतेमुळे तापलेलं डोकं. कारण यापूर्वी कधीच असा दिवसांमागून दिवस रणरणत्या वाळवंटात चालण्याचा अनुभव मी घेतला नव्हता.

हेही वाचा - शहरं का तापतात?

पहिले साधारण वीस-बावीस दिवस असे कडाक्याच्या उन्हात काढल्यानंतर अचानक वाळवंटाने रंग बदलले. सूर्य गायब झाला. अंधारून आलं. काळे ढग आले आणि आणि आमच्या ध्यानी-मनी नसताना पाणी बरसू लागलं. खूपच हवाहवासा वाटणारा हा सुखद धक्का होता. कपड्यांनी स्वतःला पूर्णपणे झाकून घेऊनही जिथे सूर्यकिरण त्वचेपर्यंत तितक्याच तीव्रतेने पोचत होते, त्याच वाळवंटात मिळालेला हा थंडाव्याचा अनुभव अवर्णनीय, शब्दातीत होता. लहान मुलाने न मागता आई- बाबांनी आवडीचा खाऊ मनसोक्त द्यावा, तशी मनाची अवस्था झाली होती. शरीरात उसळलेला आगीचा डोंब त्या बरसलेल्या पावसाने शांत शांत केला. दुपारी सुरू झालेला पाऊस संध्याकाळ, रात्र झाली तरी सुरूच होता. एरवी रात्री तंबूमध्ये झोपल्यावरही घाम येत असल्याने बाहेरच झोपावंसं वाटे. त्या दिवशी मात्र माझ्यासह माझे सर्व सहकारी तंबूच्या छतावर पडणारे पावसाचे मोठे मोठे थेंब अनुभवत आपापल्या तंबूत गुडूप झोपी गेले होतो. एरवी दिवसभराच्या रखरखीनंतर स्वयंपाकघराच्या तंबूत जाऊन रात्रीचं जेवण करण्याची कोणालाच इच्छा नसे. सर्वजण त्या तंबूच्या बाहेर उघड्यावरच जेवत. त्या रात्री मात्र स्वयंपाकघराच्या तंबूत अगदी एकमेकांना खेटून, विस्तवाच्या भोवती सर्वजण आवर्जून बसले होते. हा पाऊस दुसऱ्या दिवशी सकाळी, दुपारी आणि रात्रीसुद्धा तसाच बरसत राहिला. तापमान एकदम कमी झालं. चक्क थंडी वाजू लागली. तिसऱ्या दिवशी सकाळी निघालो तेव्हा कपड्यांचे तीन-तीन थर प्रत्येकाच्या अंगावर. एकमेकांच्या नकळत प्रत्येकजण त्या दिवशी चक्क सूर्य दिसावा अशी मनोमन आशा करत होता. पावसामुळे भिजलेल्या वाळूवरून चालणं जड झालं होतं. शूजला वाळू चिकटून बसल्यामुळे शूजचं वजन वाढलं होतं. पाय अजूनच जड झाले होते. सततच्या त्या अंधाऱ्या वातावरणामुळे उत्साह वाटेनासा झाला होता आणि केव्हा एकदा ढगांचा पडदा सारून पुन्हा एकदा सूर्य आम्हाला दर्शन देतोय असं झालं होतं.

सगळंच गमतीचं... सूर्य असताना तसा त्रास आणि नसताना असा! युरोपीय देशांत सूर्याचं दर्शन फार काळ होत नसल्यामुळे किंवा सततची ढगाळ हवा असल्यामुळे भारतात येऊन सनबाथ करणारे परदेशी पर्यटक बघून मला पूर्वी मजा वाटायची, इतकी, काय सूर्याचं ऊन अंगावर घेण्याची ती हौस.. असं वाटायचं, पण केवळ तीन दिवस ऊन न मिळाल्यामुळे 'कोई मिल गया'मधल्या 'जादू'सारखे आम्ही सगळे 'धूप धूप' असं जेव्हा म्हणायला लागलो, तेव्हा या सनबाथमागची ओढ समजली.

सूर्याच्या उगवण्याबरोबर दिवस सुरू करायचा आणि मावळण्याबरोबर संपवायचा... रोजच्या जीवनातलं सूर्याचं स्थान 'गोबी'तील अनुभवानंतर इतकं मर्यादित राहिलं नाही हे मात्र खरं.

(मुशाफिरी दिवाळी, नोव्हेंबर २०१२च्या अंकातून साभार.)

सुचेता कडेठाणकर







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results