आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

जंगल रात्र

  • श्री. द. महाजन
  • 14.12.25
  • वाचनवेळ 13 मि.
dajipur wildlife

आपली राहण्याची व्यवस्था कुठं आहे?” पहाटेपासून उठून दिवसभर जंगलातल्या भटकंतीमुळे दमलेल्या चारपाचजणांनी विचारलं.

“आता आणखी कुठंपर्यंत चालायचंय कोण जाणे. पाय बोलायला लागलेत. थोड्या वेळात अंधारही पडेल.” सीमाताई म्हणाल्या. त्यांच्या कडेवर दोन वर्षांचा बबलू असल्यानं त्या काळजीतच होत्या. मुलं जवळच वाहत्या पाण्यात खेळत होती. तात्या, नाना, दादी कुठल्या तरी झाडाला टेकून पाय पसरून बसले होते. तरुण मुलंमुली दृष्टीच्या टप्प्यातच पण इकडंतिकडं रेंगाळली होती.

“कायऽऽऽय, इथं, या जंगलात?” चढा आवाज. काळजीचा सूर. दोन-तीन पुरुषी आणि एकदोन बायकी आवाज एकदम मोठ्या सुरात ऐकून आजूबाजूचे दहाबाराजणही जवळ येऊन चौकशी करू लागले. कारण दादांनी शांतपणे, हसतहसत उत्तर दिलं होतं की, “हे काय, राहण्याच्या जागी तर आपण आलो आहोत.”

ठिकाण-दाजीपूरचे अभयारण्य. स्थळ - वाघाच्या पाण्याजवळील घनदाट जंगल. दिवस-२५ एप्रिल, १९८२. वेळ - संध्याकाळी ६चा सुमार!

आम्ही ज्या ट्रकनं आलो होतो तो ट्रक तर सकाळीच सामान उतरवल्याबरोबर परत गेला होता. दुसऱ्या दिवशी आम्हाला न्यायला परत येणार होता. परत जाण्यासाठी वाहनही नाही आणि आपण तर मुख्य रस्त्यापासून खूप आत, (सुमारे १२-१३ कि.मी.) दाट जंगलात आलो आहोत. जवळपास वाडी-वस्ती काही नाही. एखादं मंदिर नाही की साधी झोपडीसुद्धा नाही. शेलारमामानं दोर कापल्यावर सिंहगडावर मावळ्यांची मन:स्थिती काय झाली असेल त्याची बऱ्याचजणांना चांगलीच कल्पना आली! तरीही सचिननं धीर एकवटून विचारलं की, “आपण तंबूबिंबू तरी आणले असतील ना?” सुरेशनं त्याच्या नेहमीच्या हसतमुख स्टाइलनं सांगितलं की, आपण उघड्यावरच झोपायचं आहे. तुम्हांला सांगितलं होतं ना की, प्रत्येकाने लाइट बेडिंग आणि ब्लँकेट आणायचंय?” त्यानं विचारलं. “इथंच खडे, गोटे, काटक्याकुटक्या उचलून जागा साफ करायची आणि आपापली पथारी पसरायची.” असं सांगितल्यावर तर मंडळी हबकलीच. कित्येकांच्या तोंडचं पाणीच पळालं.

कोल्हापूरमध्ये आम्ही दहाबारा निसर्गप्रेमी समविचारी मंडळींनी ‘निसर्गमित्र' हा नेचर क्लब स्थापन केला. तब्बल तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. असेल १९७५चा एप्रिल किंवा मे महिना. त्यावेळी आजच्यासारखं निसर्गमंडळाचं पेव फुटलं नव्हतं. पर्यावरण, निसर्गसंवर्धन हे शब्द क्वचितच ऐकू यायचे. दक्षिण महाराष्ट्रातला आमचा पहिलाच नेचर क्लब असावा. सुरुवातीलाच विद्यापीठ हायस्कूलमध्ये एक निसर्गप्रदर्शन भरवलं. कोल्हापूर परिसरात पक्षीनिरीक्षण व वनस्पती-परिचय सहली त्याचप्रमाणे निसर्गविषयक व्याख्यानं, स्लाईड शोज, शिबिरं असे कार्यक्रम सुरू झाले. त्यातूनच अशी कल्पना निघाली की, जंगलात रात्रीच्या मुक्कामाचं शिबीर आयोजित करायचं. पहिलं शिबीर दाजीपूरच्या जंगलात. शाळा-कॉलेजच्या परीक्षा झाल्यावर एप्रिलमध्ये घ्यायचं ठरलं. दाजीपूर अभयारण्य नुकतंच झालं होतं. त्यावेळी अगदी आतमध्ये ‘कोअर एरिया'त सुद्धा रात्रीच्या मुक्कामाची मुभा होती. सांगोवांगी निरोप गेल्यावर सुमारे पंचेचाळीस एक जणांनी नावं नोंदवली. वयाची किंवा कसलीच अट नसल्यामुळे ७० वर्षांच्या आजोबा-आजींपासून ते दोन वर्षांच्या मुलासह त्याच्या आईपर्यंत असा संमिश्र ग्रुप होता. शेवटी कोल्हापूरहून सकाळी निघालो त्यावेळी चारपाच जण गळाले होते. चाळीसएक शिबिरार्थी आणि आम्ही नऊदहा जण संयोजक विषयतज्ज्ञ आणि स्वयंसेवक मिळून पन्नासजण राधानगरीपर्यंत बस आणि काहीजण कारमधून सकाळी ९ पर्यंत पोहोचलो. तिथून एका मोठ्या उघड्या ट्रकमधून स्वयंपाकासाठी मोठी भांडी, तपेली व शिधा घेऊन निघालो.

राधानगरी ते दाजीपूरचा वळणावळणाचा रस्ता. एका बाजूला जलाशय. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली असली तरी अधूनमधून पाणी दिसत राहतं. सुरुवातीला धरणाच्या भिंतीजवळ वृक्षतोडीमुळं उघडंवाघडं निकृष्ट जंगल. पण शेळपपासून बरं जंगल. त्यानंतर सुप्रसिद्ध ‘सुरंगीचं रान' आणि उगवाई मंदिराची देवराई. दाजीपूर गावानंतर कच्चा रस्ता. बऱ्यापैकी चढ. अवघड वळणं, दाटी वाढत जाणारं निमसदाहरित जंगल. डाव्या बाजूला ‘पाटाचा डंग'नावाचं सदाहरित जंगल. लालमातीच्या धुळीचे लोटच्या लोट उडवीत, हाडं खिळखिळी करत ट्रक जेव्हा वाघाच्या पाण्याजवळ पोहोचला तेव्हा आम्ही सर्वजण ‘रेड इंडियन' झालो होतो. केस, कपडे, हात, पिशव्या, सर्व लाल धुळीनं माखलेल्या!

वाटेत फळांनी लगडलेली कोकमची झाडं दिसल्यावर आम्ही थोडावेळ थांबलो. पिकलेले, अर्धवट पिकलेले जांभळे, लाल कोकम आंबट असले तरी फार छान लागतात. एकदम फ्रेश वाटतं. कित्येकांना माहिती नव्हतं की, हीच फळं, बिया काढून टाकून उन्हात वाळवली की, आमसुले तयार होतात. थोडं अंतर चालत जाऊन पाय मोकळे करावेत, जरा पक्षीनिरीक्षण करावं, काही वनस्पतींचीही माहिती सांगावी असं ठरलं. नाहीतरी ट्रकमध्ये दाटीवाटीने बसून किंवा उभे राहून प्रवास करणं सुखाचं नव्हतंच. उतरल्याबरोबर दादांनी लालबुड्या बुलबुल आणि खाटिक पक्षी दाखवले. रस्त्याकडेला रामेठा, धायटी आणि पांगळीची झुडुपं सर्वत्र दिसत होती. रामेठा पिवळसर फुलांच्या गोंड्यांनी फारच देखणा दिसत होता. त्याला दातपाडीही म्हणतात म्हटल्यावर बऱ्याचजणांना गंमत वाटून त्याबद्दल ते प्रश्न विचारू लागले. मग त्यांना मी सांगितलं की, काही वैद्य इंजेक्शन न देता दात काढण्यासाठी त्याच्या पानांच्या रसाचा वापर करीत. नारायण पेठेतील वैद्य माधव शेंडेंच्या ‘शूलरहित दंतोत्पादन' केंद्राची माहितीही सांगितली. धायटीच्या लांबट लालभडक फुलांचा आयुर्वेदिक आसव करण्यासाठी उपयोग करतात ही माहिती कापसे मॅडमनी दिली. पांगळीच्या फुलांचा बहर केव्हाच संपून गेला होता. वाळलेले तुरे काही झुडपांवर दिसत होते. “हे सर्पदंशावर उतारा म्हणून वापरतात म्हणतात ते खरं आहे का हो?” आदमनं विचारलं. एकंदरीत बहुतेकजणांना झाडापक्ष्यांविषयी कुतूहल निर्माण झाल्याचं जाणवत होतं.

पुन्हा ट्रकमध्ये बसून आम्ही पुढे निघालो. रस्त्याकडेच्या चिलरच्या काटेरी फांद्यांपासून जपण्याची सर्वांना सूचना दिली गेली. आता मातीचा रंग जास्तच लाल आणि जंगलाचा रंग अधिकाधिक गडद, काळपट हिरवा झाला होता. कित्येक झाडांची पोपटी, काहींची तांबूस पालवी लक्ष वेधून घेत होती. काही वृक्ष मोहरलेले होते तर काहींची फळं तयार झाली होती. आता तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर वाकून एकमेकांत मिसळून हिरवा बोगदाच तयार झाला होता. त्यातल्या पिकलेल्या जांभळाच्या, लेंडी जांभळाच्या फांद्या पिकलेल्या जांभळांनी लगडलेल्या होत्या. शेखर, राहूल, मकरंद, सचिन, वैशाली आणि विशाखा सर्वांनी वरच्या फांद्या पकडून जांभळं ओरबाडायला सुरुवात केली. बहुतेकांनी यथेच्छ जांभळं खाल्ली. सर्वांच्या तोंडावर, टोप्यांवर आधीच धुळीमुळे लाल झालेल्या कपड्यांवर, हातांवर जांभळे डाग पडल्यामुळे सगळ्यांना विदूषकी कळा आली!

मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा अकरा वाजायला आले होते. भर उन्हाळा असूनही हवेत सुखद गारवा होता. वृक्षवेलींच्या दाट छताखाली उन्हाचे कवडसे अभावानेच दिसत होते. जमिनीवर वाळलेल्या पानाफुलाकाटक्यांचा जाड थर पसलेला होता. इतक्यात वाळलेल्या पाचोळ्यामध्ये सरसर-झरझर आवाजामुळं सगळ्यांंचं लक्ष तिकडं वेधलं गेलं. एक मोठी पिवळी-बदामी धामण अतिशय चपळाईनं नागमोडी वळणं घेत डावीकडच्या दरीकडे निघून गेली! धामण बिनविषारी साप असल्याचं बहुतेकांना माहीत असलं तरी, तिचं रूप आणि चपळाई डोळ्याचं पारणं फिटवणारी असली तरी, बऱ्याचजणांच्या छातीत धस्स झालंच!

ट्रकमधून सामान उतरवल्यावर, एखादा तास चक्कर मारण्याचं, निसर्ग- भ्रमंती (नेचर ट्रेल) करायचं ठरलंच होतं. जेवायला अजून अडीच तीन तास आहेत म्हटल्यावर मंडळींनी लाडू, चिवडा, भडंगाच्या पिशव्या काढल्या. पाण्याच्या बाटल्या, दुर्बिणी घेऊन सर्वजण उत्साहाने निघालो. हवेत ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्याचं जाणवत होतं. अंजनी, पारजांभूळ, पिसा, काटेकुंबळ, माकडलिंबू, तमालपत्र अशी सदाहरित वृक्षांची दाटी, अंजनीच्या छोटेखानी सदाहरित वृक्षांचा बहर केव्हाच ओसरून गेलेला, पण एखादं झाड निळ्या-गुलाबी फुलांच्या झुपक्यांनी लक्ष वेधून घेत होतं. पिसाचं झाड फारच देखणं. त्याची झुपक्या-झुपक्यांची लांबट टोकदार पानं, कोवळी मखमली पालवी आणि लालचुटूक, वाटाण्याएवढी फळं. पारजांभळाच्या वाळलेल्या तांबूस मोहराचा आणि अगदी छोट्या चकचकीत जांभळ्या-काळ्या फळांचा सडा जमिनीवरच्या पालापाचोळ्यात पडलेला. तमालपत्राचं झाड तर पाहतच राहावं इतकं सुंदर! तळापासून तीन शिरा असलेली हिरवीगार पानं आणि फांद्याफांद्यांच्या टोकांना लाल कोवळी पालवी. “मसाल्यात वापरण्यासाठी गळून पडलेली वाळलेली पानंच चांगली असतात बरं का.” झाडावरची पानं तोडली जाऊ नयेत म्हणून मी सांगितलं. बायकामुलींनी खालची पानं गोळा करायला सुरुवात केली. त्यांचा मंद सुवास हवेत भरून राहिला होता.

इतक्यात एखादा ट्रक सुरू व्हावा असा आवाज आल्यानं सर्वजण क्षणभर अवाक्‌‍च झाले. मधल्या मोकळ्या जागेतून एक प्रचंड मोठा पक्षी उडाला होता. मलबार पाइड हॉर्नबिल नावाचा दुर्मिळ पक्षी. त्याला मोठा काळापांढरा धनेश म्हणायला हरकत नाही. त्याच्या पंखांचा तो आवाज होता!

आसपासच्या टेकाडांवर भटकंतीमध्ये कितीतरी पक्षी आणि वनस्पतींची गाठ पडली. माहिती सांगण्यात आली. परतीच्या वाटेवर एका घळीमध्ये गच्च दाट झाडी होती. जमिनीवर गळून पडलेली पानं कोळशासारखी काळी दिसत होती. “ही ओंबळीची महावेल ओळखण्याची खूण. ही अनावृत्तबीजी वनस्पती आहे-म्हणजे काय तर बिया असतात, पण त्या फळात नसतात, उघड्याच असतात. नर आणि मादी वेली वेगवेगळ्या असतात. ह्या बघा खाली गळून पडलेल्या बिया.” मी माहिती दिली. दाट झाडी, त्यावर चढलेल्या अनेक प्रकारच्या वेली, महावेली. उक्षीच्या राक्षसी वेली उंच झाडावर चढलेल्या. त्यांच्या लोंबणाऱ्या फांद्यांना पिवळसर फुलाफळांचे घोसचे घोस लटकलेले. जवळपास विषुववृत्तीय वर्षावाचाच वाटावा असा एक छोटासा तुकडा. असं जंगल पाहिलं की, वसंतराव हरखून जात म्हणायचे की, “मला इथं एकटं सोडा. थोडावेळ शांतपणे जंगलात बसून ‘जंगल थरार' अनुभवतो आणि मग येतो.” आत्ताही ते तसं म्हणाले आणि आम्ही त्यांना सोडून मुक्कामाच्या जागी परतलो. थोड्या वेळानं तेही परतले.

शेजारच्या खळाळत्या ओढ्याचं पाणी डॉ. कारंडे यांनी आणलं. तीन-तीन दगडांच्या दोन चुली तयार करून डॉ. खांबे आणि डॉ. पुरोहितांनी पेटवल्या, येताना आसपासच्या काटक्या फांद्या-खाली पडलेल्या, वाळलेल्या गोळा करून आणल्याच होत्या. बायकामंडळींनी मस्त पिठलं भात बनवल्यावर झकासपैकी जेवण झालं. येताना चपात्या, भाकरी, ब्रेड, चटणी असं बरंच काही आणलंच होतं.

भोजनोत्तर विश्रांती, गप्पागमतीनंतर चहा झाल्यावर संध्याकाळच्या राऊंडसाठी बाहेर पडलो. वॉच टॉवरवरच्या बाजूला एक मोठी मोकळी जागा आहे. खरंतर आता कोरडा पडलेला हा एक उथळ तलावच आहे. १९६७च्या भूकंपाच्या वेळी जमिनीला पडलेली मोठी भेग बघणं हा एक अनुभवच होता. बाजूच्या झाडोऱ्यामधल्या लक्ष वेधून घेणाऱ्या मोठ्या टपोऱ्या पांढऱ्या फुलांची काटेरी वनस्पती म्हणजे ‘रौद्रवंती'. जवळच काटेकुंबळाच्या झाडावर पिवळसर झालेली बोराएवढी फळं काढायला निहाल पुढं झाला मात्र, जवळच्या मुलांनी एकच ओरडा केला - ‘साप, साप!' झाडाच्या फांद्यांना लपेटत अतिशय चपळ हालचाल करणारा लांब सडसडीत ‘हरणटोळ' होता तो. बिनविषारी. पिवळसर पोपटी हिरवा चमकदार, जणू फ्लोरोसंट रंगाचा अतिसुंदर साप. सर्वांना मनसोक्त पाहायला मिळाला. आकाशात घिरट्या घालणारे दोन गरुड पाहायला मिळाले. येताना तर स्वर्गीय मक्षाद (पॅराडाइझ फ्लायकॅचर) ह्या लांबच लांब पांढरी शेपटी असलेल्या दुर्मिळ पक्ष्याचंही दर्शन झालं. एकंदरीत मंडळी खुशीत होती. ‘खूप काही बघायला मिळालं.' ‘ज्ञानात भर पडली.‘ ‘मजा आली.' अशी वाक्यं कानावर पडत होती. वाटेत जंगलाच्या बाजूनं रस्त्याकडेनं भंदिरा नामक झुडपं मोठी पानं आणि लाल फुलांच्या तुऱ्यांनी लक्ष वेधून घेत होते.

परतल्यावर मात्र ‘ट्रान्स्फर सीन'झाला! अशा जंगलात उघड्यावर झोपायचंय ह्या कल्पनेनंच कित्येकांना कापरं भरलं. बऱ्याचजणांनी आपली नाराजी, राग, चिडचिड, पुन:पुन्हा व्यक्त केली. “हे असं काही आधी माहीत असतं तर आलोच नसतो.” असा अनेकांचा सूर होता आणि ते साहजिकच होतं. कारण जंगल म्हणजे भीती, काहीतरी भयंकर, त्यामधील क्रूर, हिंस्र श्वापदं, विषारी साप-विंचू, आपल्याला आख्खं गिळून टाकणारे अजगर अशी लहानपणापासूनच कल्पना करून दिलेली. त्यात हिंदी-मराठी सिनेमांनी भर घातलेली. खलनायकाच्या मागं लागलेला, त्याचा पिच्छा पुरवणारा पिवळाजर्द नाग अनेकांच्या डोळ्यांसमोर तरळून गेला असणार!“यहां जंगल का कानून नही चलेगा!' अशी नायिकेच्या वडिलांची आरोळी काहींच्या कानात घुमली असावी.

शेवटी आता दुसरा काही पर्यायच शक्य नाही अशी जेव्हा खात्री पटली तेव्हा सर्वजण रात्रीच्या पोटपूजेच्या उद्योगाला लागले. सकाळचं पिठल-भात उरलं होतंच. जंगलातून येताना उंबराचे दोडे (कच्ची फळं) आणले होते, त्याची मस्त भाजी केली. अनेकांना ती ऐकून सुद्धा माहीत नव्हती. जंगलातलाच कढीलिंब घालून केलेली कढी आणि काकडी-टोमॅटोची कोशिंबीर असा छान बेत- सर्वांनीच त्याच्यावर ताव मारला. जंगलात, मोकळ्या हवेत, मुख्य म्हणजे भटकल्यानंतर भूक जास्त लागते याचा सुखद अनुभव जंगलात झोपण्याच्या काळजीत असूनही बहुतेकांना आला. अपवाद फक्त नानांचा. का कोण जाणे, कदाचित्‌‍ जंगलात राहण्याच्या कल्पनेने त्यांचा मूड गेला असावा.

अंथरुणं घालायला सुरुवात झाली तेव्हा ‘खायला आधी, कामाला कधीमधी, झोपायला मधी'ह्या म्हणीतल्या ‘झोपायला मधी'ची सत्यता पटायला लागली! कडेला झोपायला फारसं कोणी तयार नव्हतं. दाजीपूरच्या अभयारण्यात वाघ, बिबटे, अस्वलं, रानडुकरं असे प्राणी आहेत त्याविषयीच्या भीतीमुळे एक प्रकारची भयाकुलता पसरलेली जाणवत होती. ही भीती कमी करण्यासाठी मी विचारलं, “हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी बनवलंय? अभयारण्याचं नाव काय आहे?” चारसहाजण उत्तरले, “गवा. गवा अभयारण्य.”

“बरोबर. दाजीपूर गवा अभयारण्याचे क्षेत्रफळ ५१ स्क्वेअर किलोमीटर आहे. (त्यावेळी होतं. आता वाढवून ते ३५० स्क्वे.कि.केलं आहे.) त्यामध्ये सुमारे २०० गवे म्हणजे रानम्हशी, रानरेडे आहेत.” आदमने माहिती पुरवली. मी सांगितले की, गवा हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे. अगदी गायी, म्हशी, शेळ्यांसारखा. मंडळींनी सुटकेचा निश्वास टाकला. काहीजण आडवे झाले. बाकीचेही तयारीला लागले. तेवढ्यात डॉ.खांबेंनी विचारलं, गव्याचं वजन किती असतं माहितीय का कोणाला? ७००-८०० किलो, ११००-१२०० किलो अशी उत्तरं आली. दादा म्हणाले, “अगदी बरोबर. सरासरी १००० किलो धरू या. गवा हे वेडं (म्हणजे मंदबुद्धी) जनावर आहे. तिकडून पाण्यावर आलेला गवा पाणी पिऊन परत तिकडे न जाता आपण झोपलोत या बाजूने गेला तर?ज्याच्या-ज्याच्या अंगावर पाय पडेल तो जबर जखमी होणार, कदाचित मरणारसुद्धा. कारण त्याच्या आपल्या पावलांपेक्षा लहान तळव्यावर, म्हणजे खुरावर पाचशे किलो वजन पडणार! तेवढ्यात मक्या म्हणाला, “अडीचशे किलो ना, कारण त्याला चार पाय असतात. एक हजार भागिले चार.” मी सांगितले की चालताना त्याचे एकावेळी दोनच पाय टेकलेले असतात! जसा आपला एकच. म्हणजे पाचशेच बरोबर आहे.” आडवे झालेले काहीजण पुन्हा जागेवरच उठून बसले! बायका तर अजून झोपण्याच्या मन:स्थितीतच नव्हत्या. त्यांना सर्पभयाने ग्रासलं होतं. साप कधीही आपल्याला चावायला येत नाही. आपलं रक्त हे त्याचं अन्न नाही. डासाचं आहे, त्यामुळे डास चावायला येणार. साप शक्यतो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. काही काळजी करू नका. आता सर्वांनी छान स्वस्थ झोपा. कितीही सांगितलं तरी डोळ्यांवर झापड आली असली तरी, मंडळींना काही सुरक्षित वाटेना. पोरंसोरं मात्र झोपून गेली होती.

शेवटी स्वयंपाकाला आणलेल्या लाकडातल्या उरलेल्या मोठ्या लाकडांची शेकोटी पेटवली. आम्ही एकदोघेजण आळीपाळीने सतत जागे राहतो. एखादा प्राणी दिसेल तेव्हा तो पाहायला सगळ्यांना उठवतो. अग्नीला सर्वच जनावरं, पशू घाबरतात. अग्निहोत्र, यज्ञसंस्था यांचा उगम ह्याच अनुभवावर आधारित आहे. आमच्यावर विश्वास ठेवा. कोणतीही काळजी करू नका. कसलीही भीती नाही. अशी वारंवार खात्री दिल्यावर सगळे झोपायच्या तयारीला लागले. दमल्यामुळे अखेर बहुतेकांना मध्यरात्रीपर्यंत छान झोपा लागल्या.

पहाटे झुंजूमुंजू झाल्यावर एकेकाला जाग यायला लागली. जो तो उठवल्यावर स्वत:कडे आणि सगळ्यांकडे काहीशा संशयाने, आश्चर्याने पाहू लागला. आपण भर जंगलात झोपलो होतो, आपण ‘आहोत', इतरही सर्वजण ‘आहोत' ह्या जाणिवेने काहीजण आनंदानं इतके बेहोश झाले की, आपल्या ह्या भावना कशा व्यक्त कराव्यात हेच त्यांना कळेना. आपण जंगलात झोपू शकतो, आपल्याला काहीही इजा झालेली नाही हा थरारक अनुभव केवळ अवर्णनीय होता. उठलेल्यांच्या बोलण्याने, काहींच्या तर ओरडण्याने एकएक करीत सर्वजण उठले. सर्वांत उशिरा उठलेल्या तरुणाईच्या तोंडून ‘वॉव', ‘अशक्य', ‘जबरी', ‘सही', ‘वंडरफूल' असे उद्गार निघू लागले!

रात्री कोणकोण किती-किती वेळ जागं होतं, काय-काय झालं, काय पाहायला, ऐकायला मिळालं यावर चर्चा सुरू झाली. रातकिड्यांचे, घुबडांचे आवाज याशिवाय कोणालाही काही ऐकू आलं नाही, काहीही दिसलं नाही हे स्पष्ट झाल्यावर तर अनेकांच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही. उन्हाळ्यात पाण्याच्या जागा जंगलात कमी-कमी होतात. तहान तर जास्तच लागते. त्यामुळे पाणी प्यायला एकही प्राणी कसा काय आला नाही?त्या ओढ्याचे नावच जर ‘वाघाचं पाणी'असं आहे तर तेथे वाघसुद्धा पाणी प्यायला नक्कीच येत असणार. काल रात्री का आले नसतील? अशा प्रश्नांच्या सरबत्तीला शेवटी आम्ही तिघाचौघांनी उत्तरे दिली. ‘आपण प्राण्यांना घाबरतो त्यापेक्षा ते आपल्याला जास्त घाबरतात. वाघ, बिबटे, लांडगे अशा प्राण्यांना क्रूर, हिंस्र श्वापद म्हटलं जातं ते सर्वथैव चुकीचं आहे. मांसाहारी प्राण्यांना भूक लागलेली असताना आपले स्वाभाविक भक्ष्य पकडून त्याला मारून खाणं ही हिंसा नाही. माणूस हे ह्या प्राण्यांचं स्वाभाविक भक्ष्य नाही. कोणत्या तरी सजीवाला, त्याच्या भागाला मारल्याशिवाय, खाल्ल्याशिवाय कोणताही प्राणी जगू शकणार नाही! जीवो जीवस्य जीवनम्‌‍। या वचनाचा अर्थ तोच आहे.'

‘आता आलं ना ध्यानात काल रात्री एकही प्राणी का दिसला नाही ते? आज ह्या जंगलात जगातील एकमेव क्रूर, हिंस्र प्राण्यांची (पन्नास एक जणांची) एक टोळी आली आहे हे समजल्यावर कोणता प्राणी तिकडे फिरकेल?' हे दादांचं वाक्य ऐकल्यावर मंडळी चक्रावूनच गेली!

काल रात्री आम्हां संयोजकांच्या नावानं खडे फोडणारे सर्वजण आता भरभरून बोलू लागले. ‘आम्हाला आज खरं कळलं जंगल म्हणजे काय ते. असं काही आत्तापर्यंत एक्स्पोजरच नव्हतं मिळालं कधी. जंगलातल्या मुक्कामाचा हा अनोखा अनुभव आम्ही जन्मात कधी विसरणार नाही. काल आम्ही जे बोललो त्याबद्दल क्षमा करा. पुन्हा असं शिबीर केव्हा घेणार? आम्ही नक्की येऊ. इतरांना सांगू. तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही.' असंच बरंच काही, बराच वेळ बोलतच राहिले.

चहा झाल्यावर सर्वांना नेहमीच्या मोकळ्या गवताळ माळावर गव्यांचा कळप दाखवला. तेव्हा सगळे इतके खूष झाले की विचारायचीही सोयच नाही!

(अनुभव, एप्रिल 2006च्या अंकातून साभार.)

श्री. द. महाजन







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results