आम्ही कोण?

आम्ही कोण आणि हे वेब पोर्टल कशासाठी

गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल स्वरूपात वाचन करणा-या वाचकांची संख्या वाढते आहे. विशेषतः विशी-तिशीतली तरुण पिढी याच माध्यमातून मिळणा-या मजकुरावर पोसली जातेय. पण या माध्यमांमध्ये फुटकळ आणि बिनमहत्त्वाच्या मजकुराचाच जास्त भडिमार होत असेल, तर या पिढीचं आणि एकुणातच अर्थपूर्ण आणि सखोल वाचन करू इच्छिणा-या वाचकांचं भरण-पोषण कसं होणार? म्हणूनच डिजिटल माध्यमातही चांगली माहिती आणि समतोल विश्लेषण उपलब्ध असायला हवं, या हेतूने आम्ही मितानिन फाउंडेशनमार्फत हे नवं फीचर्स पोर्टल सुरू करतो आहोत. हे पोर्टल चालवण्याचं काम युनिक फीचर्समधील पत्रकार करणार आहेत.

या पोर्टलवर वाचकांना बातम्यांच्या पलीकडील आवाका देणा-या नोंदी, पत्रकार आणि अभ्यासकांचे लेख, आखोदेखी सांगणारे ग्राऊंड रिपोर्ताज, मोलाचं काम करणा-या माणसांविषयीची माहिती, कँडिड मुलाखती, एकेका विषयाचा माग घेणा-या लेखमालिका आणि आणखीही बरंच काही वाचायला मिळेल. महाराष्ट्रातील तरुण पत्रकार, विविध विषयांतले युवा अभ्य़ासक, विविध सामाजिक क्षेत्रांत काम करणारे संस्थाचालक, तरुण कार्यकर्ते अशा सर्वांना आपापलं म्हणणं-अनुभव-गा-हाणी-सल्ले-सूचना मांडण्यासाठी हे पोर्टल हक्काचं व्यासपीठ बनेल, अशी आशा आहे. त्यातून एरवी माध्यमांमध्ये न दिसणारे विषय, प्रश्न आणि माणसं समाजासमोर यावीत, असा आमचा प्रयत्न आहे.

पोर्टल टीम

Suhas Kulkarni Image

सुहास कुलकर्णी

मुख्य संपादक
gauri-kanetkar Image

गौरी कानेटकर

संपादक
preeti-chhatre Image

प्रीति छत्रे

सहसंपादक
mrudgandha-dixit Image

मृदगंधा दीक्षित

संपादक (आऊटपूट)
yogesh-jagtap Image

योगेश जगताप

संपादक (इनपूट)
mayur-patare Image

मयूर पटारे

संपादकीय व तांत्रिक सहाय्यक

आमच्यासोबत काम करायचंय?

महाराष्ट्रभरातील तरुण पत्रकार मंडळींना त्यांचं म्हणणं, त्यांना जाणवणारे मुद्दे, त्यांना सतावणारे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं, हाही युनिक फीचर्स पोर्टल उभारण्यामागचा एक महत्त्वाचा हेतू आहे. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या गावाखेड्यातले-शहरातले काही प्रश्न समाजासमोर मांडावेत असं वाटत असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. आपण एकत्र विचार करून, विषय ठरवून, त्याचे कंगोरे तपासून हे प्रश्न लेख स्वरूपात पोर्टलवर मांडू शकतो. असे विषय शोधण्यासाठी, त्याची खोदाखोद करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि लिहिण्यासाठी पत्रकारांना मार्गदर्शन करणं हेही आम्ही आमचं काम मानतो.

mitanin-foundation-logo

मितानिन फाउंडेशन

मितानिन फाऊंडेशन ही तीसहून अधिक वर्षं पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी ना नफा तत्त्वावर सुरू केलेली संस्था आहे. समाजाभिमुख पत्रकारिता टिकवून ठेवणं आणि अशा पत्रकारी दृष्टी आणि कौशल्यांच्या आधारे देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करणं ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टं आहेत. हे वेब पोर्टल त्याच उद्दिष्टांना धरून काम करणार आहे.

मितानिनमार्फत चालवले जाणारे काही उपक्रम

कष्टकरी अभ्यास केंद्राचाच भाग म्हणून पुण्यातील कष्टकरी वस्त्यांमधील वाचकांसाठी जानेवारी २०२१ पासून सलाम पुणे हे द्वैमासिक काढलं जातं. हे मासिक वस्त्यांमधील सुमारे १० हजार घरांमध्ये मोफत वितरित केलं जातं. या अंकात कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय हाताळले जातात. एकेका व्यवसायातील प्रश्न, त्यासंबंधीच्या कैफियती, दैनंदिन जगण्यातील समस्या, नागरी सुविधांशी संबंधित भेडसावणारे प्रश्न, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था-संघटनांची ओळख, धडपड्या-संघर्षशील माणसांच्या यशकथा असा विविधांगी मजकूर या अंकात असतो. शासनाच्या कल्याणकारी योजना व बिगरशासकीय संस्थांचे उपक्रम यांचीही उपयुक्त माहितीही अंकात असते. याशिवाय आरोग्य, आहार, कायदा, रोजगार वगैरे महत्त्वाच्या विषयांवर सल्लामसलत करणारे लेखही अंकात असतात.

सलाम पुणे Blog
salaam-anka image salaam-anka image

युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम

पत्रकारितेतील तरुण विद्यार्थ्यांना समाजाभिमुख पत्रकारितेची दृष्टी देण्यासाठी युनिक स्कूल ऑफ जर्नलिझमचे अनौपचारिक कोर्स चालवले जातात. समाजातील विविध विषय-समस्या-प्रश्नांवर चर्चा, प्रत्यक्ष पत्रकारी लिखाणाचा सराव, लेखनकौशल्य विकसित होण्यासाठी प्रयत्न आणि अनुभवी पत्रकार-अभ्यासकांचं मार्गदर्शन यांद्वारे सजग पत्रकार घडवण्याचा प्रयत्न या वर्गात केला जातो. हे वर्ग युनिक फीचर्सच्या पत्रकारांच्या मदतीने सर्वस्वी विनाशुल्क चालवले जातात.

महाराष्ट्र अभ्यास केंद्र

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, राज्यातली कर्ती माणसं, समकालीन विचार व चळवळी, महाराष्ट्राचे प्रश्न आणि विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेले घटक यांचा पत्रकारी कौशल्य वापरून अभ्यास करण्याचं काम या केंद्रामार्फत केलं जातं.

शहरी कष्टकरी अभ्यास केंद्र

महाराष्ट्रातील 50 टक्के लोकसंख्या शहरात राहते. त्यापैकी सुमारे 40 टक्के लोक वस्त्यांमध्ये राहतात. त्यात गरीब, कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या वर्गाचा अभ्यास करणं, त्यांना उपयुक्त ठरेल अशा माहितीचं आदानप्रदान करणं आणि त्यांच्यासाठी हक्काचं माध्यम उपलब्ध करून देणं ही या केंद्राची उद्दिष्टं आहेत.

आमचे संचालक

anand-awadhani

आनंद अवधानी

आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.

Suhas Kulkarni Image

सुहास कुलकर्णी

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत. 'युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम' आणि 'सलाम पुणे' हे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात

mukund-kulkarni

मुकुंद कुलकर्णी

मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.

gauri-kanetkar

गौरी कानेटकर

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणा-या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.

आमच्या सहसंस्था

unique-features-news-logo

युनिक फीचर्स ही तेव्हा तरूण असलेल्या मुलांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था. अर्थपूर्ण सामाजिक पत्रकारिता करण्यासाठी ही मुलं १९९० साली एकवटली. आपलं जगणं, आपल्या पलीकडचं जगणं, आपला आसपास, त्यातले प्रश्न, समाजासमोर सहजी न येणारे प्रश्न यांचा माग काढत ही संस्था पत्रकारिता करत राहिली. आपल्या समाजात पारंपारिक कारणांमुळे मागे राहिलेले समाजघटक, स्वातंत्र्योत्तर काळात विकासाच्या लाटेत उपेक्षित राहिलेले समूह यांचे प्रश्न समजून घेऊन मध्यमवर्गीय वाचकांना सांगण्याचं काम या संस्थेने केलं. केवळ प्रश्न न मांडता त्या प्रश्नांवर काम करणारे-उत्तरं शोधणारे कार्यकर्ते, संस्था यांना समाजासमोर आणण्याचं काम युनिक फीचर्स गेली ३५ वर्षं करत आलं आहे.

सामाजिक शास्त्राच्या दृष्टीला पत्रकारी शैलीची जोड देऊन एका शिस्तीत केलेल्या कामामुळे युनिक फीचर्स मार्फत प्रकाशित होणारं लिखाण व्देषमूलक, असहिष्णू किंवा हट्टीपणाकडे झुकलं नाही. घटना-घडामोडींकडे शक्य तेवढ्या तटस्थपणे, अलिप्तपणे पाहण्याची वृत्ती विकसित केल्यामुळे संस्थेच्या विश्वासार्हतेला आजवर कधी तडा गेला नाही.

महाराष्ट्रभर पसरलेली छोटी-मोठी दैनिकं, टीव्ही वाहिन्या, साप्ताहिकं-मासिकं, दिवाळी अंक आणि पुस्तकं अशा विविध माध्यमांमधून तर हे काम केलं आहेच, शिवाय त्यासाठी स्वतःची हक्काची माध्यमंही संस्थेने उभी केली आहेत. चोखंदळ वाचकांसाठीचं 'अनुभव' मासिक, किशोरवयीन मुलांसाठीचं 'पासवर्ड' हे नियतकालिक आणि सामाजिक पत्रकारितेचाच पाया असणारं 'समकालीन' प्रकाशन ही त्यातली काही माध्यमं. त्यामुळेच महाराष्ट्रातील विविध विषयांना-प्रश्नांना-संस्था-संघटनांना व्यासपीठ देऊ इच्छिणारं मितानिन फाउंडेशनचं हे फीचर्स पोर्टल चालवण्याची जबाबदारी युनिक फीचर्सने आनंदाने अंगावर घेतली आहे.

samakalin-logo

सामाजिक जबाबदारी, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचं संतुलन साधून चांगली पुस्तकं प्रकाशित करण्याचं आश्वासन देत युनिक फीचर्समधील पत्रकारांनी २००६ साली 'समकालीन' ही प्रकाशन संस्था सुरू केली. युनिक फीचर्सच्या पत्रकारितेला अधिक टिकाऊ-स्थायी रूप मिळावं या हेतूने पुढचं पाऊल म्हणून ही संस्था आकाराला आली. 'खरेखुरे आयडॉल्स' हे समकालीनचं पहिलं पुस्तक. समाजातल्या विविध प्रश्नांना आपल्या परीने उत्तरं शोधणारे कायर्कर्ते, उद्योजक, संशोधक हे आपल्या तरुण पिढीसमोरचे खरे आयडॉल्स असायला हवेत, म्हणूनच महाराष्ट्रातल्या अशा तगड्या २५ आयडॉल्सची ओळख या पुस्तकात करून दिलेली होती.

त्यानंतरच्या २० वर्षांत समकालीन प्रकाशनाने मोजकी, पण महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यात युनिक फीचर्सच्या, तसंच अन्य पत्रकारांनी लिहिलेल्या शोधलेखांची पुस्तकं, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे, एकनाथ आवाड, संपतराव पवार, नरसय्या आडम आदी सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील कार्यकर्त्यांच्या आत्मकथनांनाचा समावेश आहे. त्याचबरोबर अनिल अवचट-निळू दामले-सदा डुंबरे अशा युनिक फीचर्सच्या जीवलग पत्रकारांची निवडक पुस्तकं, रत्नाकर मतकरी, ना. धों. महानोर, निरंजन घाटे आदी प्रख्यात साहित्यिकांची पुस्तकं, सुभाष अवचट, सदानंद दाते, मिलिंद बोकील, नरेन्द्र चपळगावकर, डॉ. आनंद नाडकर्णी, मृदुला भाटकर अशा नामवंतांची पुस्तकं आजवर समकालीनने प्रकाशित केली आहेत. तसंच अलीकडे समकालीन प्रकाशनाने खास किशोरवयीन मुलांसाठी पुस्तकमस्ती हा विभागही सुरू केला आहे. त्यात शाळकरी मुलांसाठीच्या धम्माल कथा, आदिमानवाच्या कथा, विज्ञानकथा, गणितगोष्टी, भूगोलगोष्टी, शब्दांच्या गमतीजमती सांगणारी पुस्तकं अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे.

Select search criteria first for better results