आम्ही कोण?
अनुभव 

दिंडी चालली चालली

  • मीना प्रभु
  • 03.03.25
  • वाचनवेळ 1 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
meena prabhu served as a docter in vari

आपल्या रसाळ आणि अभ्यासपूर्ण प्रवासवर्णनांनी मराठी साहित्यात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या लेखिका मीना प्रभु यांचं नुकतंच निधन झालं. पंढरीच्या ‘वारीची डॉक्टर' बनून सेवा अर्पित करताना आलेली उत्कट अनुभूती प्रभु यांनी ‘अनुभव’ मासिकाच्या दिवाळी अंकासाठी शब्दबद्ध केली होती. तो लेख इथे पुनर्प्रकाशित करत आहोत.

ज्ञानदेव. श्री शारदेच्या गळ्यातला कंठमणी. त्यांचेच सहचर अधिकारी तुकाराम. दर आषाढात या दोघांच्या पालख्या पुण्यात यायच्या. तो एक दिवस एरव्हीचं व्यवहारी पुणं भक्तिरसात बुडून जायचं. ज्ञानेश्वर पादुका चौकात त्या थांबायच्या आणि त्या प्रचंड गर्दीत माझ्या माऊलीचा हात धरून मी माउलींच्या दर्शनाला जायची. त्यांचा प्रसाद म्हणून कपाळभर बुक्का लावून परतायची

लहानपणी अनेकदा घेतलेला हा अनुभव मोठेपणी यायचा. अपुरा वाटायचा. मनाला परत-परत वाटे की, पालखीसंगे एकदातरी जाऊन यायला हवं. वर्षानुवर्षं नुसती इच्छा होती कधी जायला जमलं नव्हतं. वास्तव्य परदेशी. आठ महिने थंडी सोसल्यानंतर नवसासायासानं आलेला तिकडचा गुलछबू उन्हाळा सोडून इकडच्या आषाढी चिखलात कोण येतं? एकादशी कधी आली नि गेली ते समजण्याचीदेखील मारामार. दरवर्षी संधी हुकत होती. यंदा ती साधली तीही परदेशामुळेच.

पुस्तकांच्या निमित्तानं मी भारतात निघाले आहे समजल्यावर विद्या सापत्नेकर मला लंडनमध्ये म्हणाली, “वा, यावेळी अगदी एकादशी गाठते आहेस. विश्वास वारकऱ्यांच्या वैद्यकीय शिबिरासाठी भारतात जातोय. नेहमी तू वारीला जायचं म्हणत असतेस. यंदा जमव.”

तिचा नवरा डॉ. विश्वास सापत्नेकर हा एक थोर गृहस्थ आहे. त्याला येत नाही किंवा तो करत नाही अशी गोष्ट नाही. पाच बहिणींमधला एकुलता एक बंधू म्हणजे खरं तर लाडोबा-वेडोबा असावा. पण हा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा कवनातला, तिन्ही लोकी झेंडा लावणारा निघाला. हवेत उडणं, पाण्यात बुडणं कशाची भीती म्हणून नाही. मेडिकल कॉलेजमध्ये असताना त्यानं स्कूबा डायव्हिंगवर प्रभुत्व मिळवलेलं. ते दुसऱ्यांनाही शिकवलं. पण ते केवळ मजा म्हणून वापरलं नाही. सामाजिक बांधीलकीमधून पंधरा वर्षांपूर्वी स्कूबा डायव्हिंग करून आर.डी.एक्स्‌‍. वसईच्या खाडीतून उपसून काढून त्यानं पोलिसांना मदत केलेली. सर्जन झाल्यावर ठाण्यातल्या स्वतःच्या नर्सिंग होममध्ये अपघात, मारामाऱ्यांमधून येतील त्या अत्यवस्थ रूग्णांना बरंही केलेलं. मोठं हॉटेलही घातलेलं. शेतीचे प्रयोग करून पाहिलेले आणि पंधरा वर्षांपूर्वी परदेशात राहायला जाऊन कॉस्मेटिक सर्जरीमध्ये तिकडे नावही मिळवलेलं.

पण गेली तेवीस वर्षं चालू असलेली त्याची आषाढी वारी अबाधित राहिली ती वैयक्तिक पुण्यासाठी नसून सामाजिक कल्याणासाठी. इतक्या वर्षांत त्यानं आषाढीला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं नाही. विटेवरचा पांडुरंग लाखो वारकऱ्यांच्या रूपात त्याला वाटेवर येऊन भेटत असतो. वर्षंभर औषध कंपन्यांकडून, डॉक्टर मित्रांकडून इंजेक्शनं, गोळ्या, बँडेजेस, प्लॅस्टरची सामग्री, मलमं, तेलं नि पातळ औषधं गोळा करायची आणि रस्त्याकडेला तंबू ठोकून वारकऱ्यांसाठी मोफत रुग्णसेवा द्यायची हा वसा जवळजवळ पाव शतक अखंडित चालला आहे.

या सेवाभावी संस्थेत अनेक डॉक्टर मनोभावे काम करतात. वर्षानुवर्षं त्यांची माणसं जोडलेली आहेत. कुणी वैद्यकीय पेशातले. कुणी केवळ मदतीची तीव्र इच्छा असणारे. त्यांनी माझीही त्यांच्यात जिम्मा करून घ्यावी असं वाटत होतं. पंढरीच्या वाटभर त्यांची शिबिरं होतात. त्यात एकदातरी भाग घ्यायची मला इच्छा होती.

यंदा सगळ्यांनी वारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात भेटायचं ठरलं होतं. दिवसभर उद्योग सांभाळून शिबिरासाठी रात्री प्रवास करायचा, शनिवारी सकाळी कामाला जुंपून घ्यायचं. दोन दिवस योगदान दिलं की रविवारी रात्री परतायचं. सोमवारी पुढचा नित्याचा आठवडा सुरू. रात्री नऊ-साडेनऊला निघणार होतो. चार तासांची वाट. पहाटेला मुक्कामाला पोहोचलं की मिळाल्यास दोन-तीन तास झोप. मग काम. दरवर्षीप्रमाणे.

पण यावर्षी आम्ही ताटकळलो. विश्वास आणि त्यांचे सहकारी यांना पुण्यात यायलाच पहाटेचे तीन वाजून गेले. औषधं गोळा करण्यात ठाण्याहून निघायला उशीर झाला होता. घाटात पावसानं चांगलंच बडवलं. डॉक्टरांना स्वतःच पेशंट व्हायचं नसल्यानं मिनिबसची गोगलगाय झाली होती. तीन वाजता एकदाचे भेटलो आणि एक चिंता मिटली.

आता लगेच आगेकूच. पुढे काय घडणार या उत्सुकतेनं मला शाळेची ट्रिप खोळंबल्यासारखं कधी एकदा निघतोयसं झालं होतं. पण पहिला अर्धा तास फक्त बसवर सामान रचण्यात गेला. नाना आकाराची आणि प्रकाराची बोचकी वर चढत होती. त्यात तंबूंचे लांब लोखंडी दांडे, प्लॅस्टिक शीट्सच्या मोठ्या गुंडाळ्या, औषधांचे चौकोनी पेटारे, लिनिमेंटचे -कफ सिरपचे शिसे, कापसाच्या वळकट्या, प्लॅस्टरची भुकटी होती आणि आमच्यासाठी घेतलेल्या तिखटमिठाच्या पुऱ्यांचा हाराही हेाता.

पुरुषवर्ग धडाडा कामाला लागलेला. बायका चहा पीत यंदा कोण आलं, कोण नाही, का नाही याची चर्चा करत होत्या. घोट घोट चहा घशाखाली घालून बरोबर साडेतीन वाजता पंचवीसेक जणांच्या आमच्या पथकानं प्रस्थान ठेवलं. पुण्याच्या उपनगरातली सावळी शांतता ‘पुंडलीऽक वरदा हाऽरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाऽराम. ज्ञानेश्वर माउली की ऽऽजय'च्या दमदार गजरानं ढवळून निघाली. अपरात्री हा नाम-जागर करण्यात मी मनःपूर्वक सहभागी झाले आणि आतापर्यंतच्या उत्साहात आणखी भर पडली. आमची दिंडी निघाली.

‘सह्य्रादी मानव सेवा मंच' ही छोटीशी कागदी पाटी काचेला डकवलेली आमची मिनीबस पुढे आणि मागे एक ट्रॅक्स. मिनीबसच्या टपावर मोठं सामान बांधलेलं. ट्रॅक्सचा मागचा कप्पा लहानसहान चीजांनी खच्चून भरलेला. आमची प्रत्येकी एकेकच पिशवी तरी वैद्यकीय सामानच इतकं की आमच्या मिनीबसमध्ये हलायला जागा नव्हती. दरेकाच्या पायाशी कसली ना कसली पेटी, डबा नाहीतर पाण्याचे महाकाय बुधले घुसवलेले. बस निघाली आणि हलवून पोत्यात बटाटे भरावेत तसे सगळेजण जागच्या जागी मुरून बसलो.

नुकतीच सर येऊन गेलेली. पहाटेच्या ओल्या अंधारात गाडी जात होती. रिकामे रस्ते. पुण्याचं असं रूप कित्येक वर्षांत दिसलं नव्हतं. किती बदललं पुणं. रस्त्यांच्या मानानं अव्वाच्या सव्वा वाटणाऱ्या, अनोळखी उंच इमारती भराभर मागे पडत होत्या. वेगळ्याच गावातून जात असल्याची भावना दाटली. मग बाहेरची नाराज नजर परतली आणि आत फिरायला लागली. बसल्या जागी जो तो विसावायचा प्रयत्न करत होता. कुणी बाकाच्या सापटीत, सामानाच्या ढिगावर लेटून दिलेलं. कुणी बसल्या बसल्या अंगाचं वळं केलेलं. कुणाचं ओझं लगतच्या खांद्यावर. अशा इच्छाशयनी लोकांचा मला नेहमीच हेवा वाटतो. पाठ नीट टेकली गेली नाही तर झोप माझ्याकडे ढुंकून बघत नाही.

सगळ्या निद्रावंतांना एक अपवाद. स्वतः डॉ. सापत्नेकर. आज सकाळीच लंडनहून विमानानं आलेले. सबंध दिवस धावपळीत गेलेला. तेव्हा आपल्या भावानं झोपून थोडी विश्रांती घ्यावी अशी त्यांच्या दोन बहिणींची रास्त अपेक्षा होती. पण बरेच दिवसांनी भेटलेला भाऊराया ऐकत नव्हता. मिनीबसच्या बंद दाराला टेकून तो त्या दोघींशी घरगुती गप्पा मारण्यात, मागच्या कँप्सच्या आठवणी काढण्यात रंगलेला. गमतीजमतीत बुडलेला. झोप अशक्य.

आम्ही पुणे-सोलापूर मार्गावरून अकलूज गाठणार होतो. शक्य तेवढं मोठ्या रस्त्यावरून गेल्यावर शेवटी ज्ञानेश्वरांच्या पालखीचा रस्ता सोडून आडबाजूनं जायचं. पालखीमागे अडकलो तर तीन तासांची निश्चिंती. खिडकीतून वाऱ्याचे झोत येत होते. हळूहळू फटफटत होतं. भरल्या आकाशात पहाटेचे रंग उमलत नव्हते. साडेसहाच्या सुमाराला मळकट ढगांतून पाणचट सूर्य बाहेर आला. कितीतरी वेळ त्याला तेजच चढेना-

आता रस्त्यावर माणसाला माणूस दिसत होतं. इंदापूरनंतर बस उजवीकडे वळली आणि एक टिळामाळावाला एकांडा म्हातारा हाती पताका घेऊन हळूहळू चालताना दिसला. का कुणास ठाऊक, मला एकदम गहिवरून आलं. कित्येक वर्षांत वारकऱ्यांचं दर्शन झालं नव्हतं. सगळी निष्ठा, सगळं भाविकपण, भाबडेपण त्याच्या रूपात एकवटल्यासारखं वाटलं मला.

लगेचच पुढे वारकऱ्यांची दिंडी दिसली. इतक्या रामप्रहरीही झपाझप निघालेली. वयस्कर खेडुत प्रजा. काळीसावळी हडबडीत माणसं. एकही फोपसं, जाडं नाही. चालून चालून हाडाळलेले पाय. गालांची उंच उमटलेली हाडं आणि चोपलेली पोटं. कपाळी काळा बुक्का. अधून मधून पुरुषांच्या हातात भागवतधर्माची भगवी पताका, बायकांच्या डोक्यावर फूटभर उंचीचं तुळशी-वृंदावन. त्याच्या देवळीमध्ये विठोबा-रखुमाईच्या इवल्याशा दोन मूर्ती. वरच्या ओझ्याला हात न देता बाया लगालगा कशा चालत होत्या तेच नवल. कुठे मधूनच बांधीव पथकं. गांधी टोपीत नि पांढऱ्या पोशाखात शिस्तबद्ध वाटणारी. टाळ-मृदंगाच्या गजरात-‘जयजय रामकृष्ण हरी'त रंगून गेलेली.

दिंड्यामागून दिंड्या मागे पडत होत्या. मध्ये थोडंफार अंतर असलं तरी सलगच पाहता पाहता एकीमध्ये माणसांचा खूप मेळावा दिसला. मोठ्या आवाजात भजन चाललेलं. पोलिस मोटारींना रस्त्याच्या कडेला काढत होते. एका मोठ्या गाड्यावर सजवलेली तुकारामबावांची पालखी दिसली. आत ताजी फुलं वाहिलेली चांदीची चिमुकली पावलं. पालखीच्या दोन्ही बाजूंना माणसं चालताहेत पण आमची उंच बस शेजारून जाताना अगदी छान दर्शन झालं. मन फुलून आलं. भागवत-भक्तिमंदिराच्या त्या कळसाकडे पाहून आपोआप हात जुळले.

पालखीपुढेही काही दिंड्या होत्या. सर्वांत पुढे रिंगणाचा पांढराशुभ्र साजरा घोडा. सुटाच. छत्रं-चामरं घेतलेले भालदार-चोपदार त्याच्याबरोबर आदबीनं चाललेले. त्याच्यापुढे मात्र एकही दिंडी जायची नाही हा दंडक. असलेच तर काही एकांडे वारकरी.

सूर्य वर यायला लागला. उजेड वाढला. दुतर्फा वारकऱ्यांचा वावर दिसायला लागला. कुणी मधल्या ओढ्या-ओहोळात उतरून अंघोळी करताहेत. कुणी बायाबापड्या ओली लुगडी, धोतरं लांबच लांब वाळत घालताहेत. बाजूच्या हिरवाईवर त्यांचे लाल, निळे, पिवळे, पांढरे पट्टे उठलेले. कुठे दोघीतिघी ती हातात धरून वाऱ्यावरच वाळवताहेत. कुठे तीन दगडांवर चहाचं पाणी चढलंय. चूल फुंकून बाई जिकिरीला आलीय, पण वर निघताहेत नुसतीच धुराची भेंडोळी. तीन आठवडे असं उघड्यावरच जीवन कंठायचं?

अकलूज येईतो आठ वाजून गेले. गावाच्या जरा बाहेर, एका माधुकरी-आश्रमात आमची उतरण्याची सोय होती. भोवताल रम्य. रस्त्यापासून गोल, वळत येणारी पायवाट. उजवीकडे छोट्या बंगल्यासारखं दिसणारं लाल विटांचं देऊळ. डावीकडे खोल्या. समोर मोठं जेवणघर. जरा पुढे खूपच मोठं सभागृह. परिसर हिरवाचार. त्यात जाईजुई,प्राजक्त आणि रातराणी रसरसलेली. बघूनच प्रसन्न वाटलं.

‘वाटला त्याहून पोहोचायला जास्त वेळ लागला. तयारीसाठी आता फक्त अर्धा तास.' विश्वासनी आल्याआल्याच सूचना केली. ‘लगेच निघूया. आपल्याला नातंपुतं गाठायचं आहे.'

मग एकच घाई उडाली. पुरुष सगळे त्या मोठ्या हॉलमध्ये. आम्हां सहा- जणींना एक मोठीशी खोली. तिथल्या सतरंजीवर आपापली बोचकी टाकली. आन्हिकं उरकली. चहा-पोह्यांची न्याहरी झाली आणि परत बस गाठली. पुन्हा एकदा पालखीचा रस्ता टाळून गाडी पालखीच्या पुढे निघाली. अर्ध्या तासात नात्यापुत्याला पोहोचलो. डॉ. सापत्नेकर, डॉ. जोशी अशी मुरब्बी माणसं बारीक नजरेनं आता रस्ता धुंडाळत होती. त्यातल्या त्यात सपाट अशी रस्त्याची कड निवडायची आणि डेरेदाखल व्हायचं. सुदैवानं एका सहकारी डेअरीच्या अंगणात बरीशी जागा दिसली. शेजारी डोळे तपासणीचं हंगामी केंद्र. तेही पूरकच.

मिनीबस आणि ट्रॅक्स भिंतीशी लागल्यावर सामान उतरवण्याची घाई उडाली. तीन चौकोनी बूथ, एक मोठा तंबू आणि एक लहान तंबू एवढं उभारायचं. विनय नाफडेसारखे सराईत विजेच्या चपळाईनं हलत होते. आधी लोखंडी पट्ट्यांचा एक सांगाडा तयार करायचा. त्याच्या कांब्या ठराविक ठिकाणी जाणाऱ्या. कडेला त्रिकोनी सांधे. ते जुळवून घेऊन तंबूचा सांगाडा उभा राहिला. आता त्याच्यावर प्लॅस्टिकची शीट्स पसरायची. वारं तुफान सुटलेलं. शीट्स जाग्यावर राहीनात. शिडांसारखी फुगली की सगळा तंबू त्या बाजूनं कलायला लागे. बांधलेल्या गाठी सुटून प्लॅस्टिकचे शेव फडफडायला लागत. अखेरीस खोऱ्यानं जमिनीत थोडं खणून खांब पुरावे लागले. त्यांना दगड बांधून गदगदणं कमी झाल्यावर आमचा वैद्यकीय संसार थाटला.

सर्वांत पुढे ‘सह्याद्री मानव-सेवा मंच' फलक लावलेले तीन उभे बूथ. तपासणीसाठी रुग्ण प्रथम तिथं जाणार. त्यांच्या मागे दोन तंबू. पुढच्यात शिरेतून सलाईन देण्याची व्यवस्था असलेला ‘वॉर्ड' आणि मागच्यात बँडेजिंग, ड्रेसिंग करायची ‘ओ.पी.डी.'

एव्हाना रस्त्यावरून वारकरी जायला लागले होते. आमचे तंबू जुळताना पाहून ते गर्दी करायला लागले. मी एका बाजूलाशी उभी. त्यातला एक म्हातारा माझ्यापाशी येऊन म्हणाला, “माउली, सुईनं पाणी घ्याचं आंगात.”

काळाभोर रंग. चेहऱ्यावर ठोकणं, तो ज्याला भेटायला जातोय त्या विठोबासारखाच दिसणारा. त्याच्या बेधडकपणाचं मला किंचित नवल वाटलं. रोगीही हाच आणि डॉक्टरही हाच?

“बाबा, इकडे या छोट्या बूथमध्ये डॉक्टर बसतील. तुम्ही त्यांना दाखवा. त्यांना गरज वाटली तर ते सुई देतील वा पाणी भरतील. शिरेतलं इंजेक्शन उगीचच घ्यायचं नसतं. त्यातून जंतू जातील तर तुम्हाला त्रास होईल.” माझं विलायती वैद्यक बोलत होतं.

भोवतीची परिस्थिती इंट्राव्हीनस काय साधं दंडातलं इंजेक्शन द्यायलाही योग्य नव्हती. निदान मला तसं वाटत होतं. इंग्लंडमध्ये अनेक वर्षं अनिस्थिशियाची प्रॅक्टिस केल्यानं मी इंट्राव्हीनस विभाग मागून घेतला होता. अतिशय आजारी, ज्यांना औषध-गोळ्या अपुऱ्या पडतात त्यांच्यासाठी सलाइनचा हा खास राखीव उपचार. दिवसाभरात दहापाच जणांवर करावा लागेलसं वाटलं होतं.

तीन बूथमध्ये बसलेले तीन डॉक्टर आता भराभर रोगनिदान करून त्यांना गोळ्या-इंजक्शनं देत होते वा योग्य तिथं पाठवत होते. समोर किंचित उंचशा रस्त्यावरून वारकऱ्यांचा महापूर चाललेला. त्यातले काही आमच्या केंद्राकडे वळत होते. बूथपुढच्या रांगेत उभे राहून डॉक्टरांकडून गोळ्या इंजेक्शनं किंवा शिरेतल्या बाटलीचा कागद घेत होते आणि काम झालं की तडक त्या प्रवाहात सामावून जात होते. त्यांच्या लांबलचक रांगांनी आमचा तळ भरून गेला.

माझ्याकडे पहिला रुग्ण आला तो तोच पहिला विठोबा.

‘माऊली, चिठ्ठी घ्या. सुई द्या.' तो मला म्हणाला.

त्याच्या हाती खरंच आय.व्ही.ची. चिठ्ठी होती. मी आमच्या ‘वॉर्ड'कडे पाहिलं. वर वाऱ्यावर फडफडत उडणारं निळं प्लॅस्टिक. खडागोटा उचलून साफसूफ केलेल्या खालच्या जमिनीवर तसलंच दुसरं अंथरलेलं. तंबूच्या आडव्या काठ्यांना ओळीनं आय.व्ही.सेट टांगलेले. इतक्या माणसांच्या गदारोळानं आजूबाजूला धूळ उडते आहे. इथं रोग्याला झोपवायचं?

“या माऊली, इथं अशा आडव्या व्हा. डॉक्टर तुम्हाला पाणी भरतील.” एका सराईत स्वयंसेवकानं सांगितलं.

“पोटात लई मुरडा भरतोय. ढाळ व्हत्यात. माऊली, त्याचंबी औषध टाका आत.”

“हां, हां, तसं लिहिलंय माउली.” तो पुढे म्हणाला, “माउली सगळं देतील.”

इथं सगळ्यांचं संबोधन एक. नाव एकच. माउली. डॉक्टरनं रुग्णाला, रुग्णानं डॉक्टरला तीच हाक मारायची. अतिशय मजा वाटली त्याची. त्या ‘माउली.'च्या पाखरीखाली आम्ही सगळे एक झालेलो. नकळत माउली बनलेलो.

पण इतका विचार करायला तेव्हा वेळच नव्हता. पहिली माउली जमिनीवरच्या निळ्या प्लॅस्टिकवर आडवी झालेली. हातात सीरिंज घेऊन मी शेजारी उकिडवी बसले. डॉक्टर असल्याची खूण म्हणून डोक्यावर लाल अक्षरातली पांढरी पातळ टोपी फक्त. ‘सह्याद्री मानव सेवा मंच.'

जवळजवळ पंधरा वर्षांनी मी माझ्या मूळ पेशात शिरत होते. ज्या शिक्षणासाठी आयुष्यातली पाच वर्षं तन-मन-धन वेचून खर्चली होती, कित्येक वर्षं ज्याची कास परदेशात धरली होती पण लिखाणाच्या आणि भ्रमंतीच्या पाठीमागे लागून ज्याच्याकडे पाठ फिरवली होती तो आज असा आव्हान देत उभा होता. ते आव्हान पेलेल ना मला? रुग्णाला नकळत ज्या कौशल्यानं मी पूर्वी शिरेत सुई सरकवत असे ते इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे माझ्या हातातून निसटून तर नाही ना गेलं? शीर व्यवस्थित सापडणं, तिच्यात सुई स्थिर ठेवणं हे विशेष कसबी काम. मला ते नीट जमेल ना? सुई दोनतीनदा तर नाही खुपसावी लागणार?

क्षणभर विचलित झाले पण क्षणभरच.

“चला, माउली, पाय सरळ सोडा. हाताची मूठ घट्ट वळा. हं, ही पाहा शीर वर आली. आता एकच सुई बरं का.” स्पिरिटचा बोळा ताणलेल्या कोपरावर घासत, मदतनीसानं दंड आवळून फुगवलेल्या शिरेवर टिचक्या मारून ती आणखी फुगवत मी म्हणाले.

ते आश्वासक उद्गार इंजेक्शन घेणाऱ्या माउलीसाठी होते की देणाऱ्या? पण याने काम झालं. काल संध्याकाळीच मी शेवटचं इजेक्शन दिल्याच्या सहजतेनं जमलं. चटकन सीरिंज सोडवून घेऊन सलाइन सेटचं टोक सुईशी जुळवलं आणि उठून वरची चिकटपट्टी घेतली. खाली बसून ती नीट चिकटवली. सुई शिरेत आहे ना ते पाहिलं नि पुन्हा उठले.

तोवर आमच्या तंबूशी हातात चिठ्ठ्या घेऊन शिरेतल्या इंजेक्शनासाठी पंचवीस-तीस माणसं उभी राहिलेली. एवढ्या फौजेला सलाइन लावायचं? पण आता चौकशी करायला वेळ नव्हता. सगळेजण मी, मी करत, एकमेकांना ढकलत इंजेक्शनला उभे. तेव्हा आधी त्यांची रांग लावली नि कामाचा रगाडा सुरू केला. रांगेतल्या पहिल्याला आत घ्यायचं, निळ्या प्लॅस्टिकवर आडवं करायचं आणि उकिडवं बसून शीर पकडायची. त्याची चिकटपट्टी लावून होईतो दुसऱ्यानं हात ताणलेला. वीस मिनिटांच्या आत आमचा वॉर्ड इथून तिथून भरून गेला.

माणसाला केवढ्या जमिनीची गरज असते या टॉलस्टॉयच्या प्रश्नाचं हे ठोस उत्तर होतं. आठवड्याच्या बाजारात विकाऊ घोंगड्यांच्या गुंडाळ्या ठेवाव्यात तसे लोक खेटलेले. बाया-बापड्या, तरुण-म्हातारे एकालगत एक पसरलेले. वरच्या दांडीवर अडकवलेल्या बाटलीतून जीवनरसाचा थेंब थेंब प्रत्येकाच्या शिरेत उतरतोय. अर्धा तास तसंच राहायचं. मग सुई ओढून काढून मी त्यांना मोकळं केलं की उशाशी असलेलं आपलं बोचकं उचलून ‘माउली येतो' म्हणत माझा निरोप घेत होतेे. वाहत्या वारकरी नदीत पुन्हा शिरत होते.

भोवतालची दयनीय परिस्थिती मला सारखी टोचत होती. स्वच्छतेचं नाव नाही. सगळीकडे धूळ, कचरा. मधूनच पावसाची सर शिवरल्यावर पायांनी आणलेला चिखल. इंजेक्शनची सुई त्याच्यापासून दोन इंचांवर. वारकरीही बापडे तसेच. खरी अंघोळ म्हणावी अशी त्यांना कधी घडली होती कोण जाणे. ताणलेल्या हातावर स्पिरिटचा बोळा फिरवला की, तो काळाभोर होई. अस्वच्छ त्वचेत सुई घालताना अंगावर शहारा उमटे. पण त्या बिचाऱ्यांचं कशाकडे लक्ष नव्हतं. आतापर्यंत औषध मिळालं नव्हतं. माउलीच्या कृपेनं ते भेटलं यातच सगळं पावलं.

लोकांचे लोटच्या लोट येत होते. रांगा लावणाऱ्यांना न जुमानता पुढे घुसत होते. कुणाला ताप चढलाय वा चक्कर आली म्हणून अगोदर घेतल्यास अडाणी कालवा करत होते. आधीच अडचणीच्या असलेल्या आमच्या जागेवर अतिक्रमण करत होते. कितीही विनवलं तरी मागे हटत नव्हते. आमचा पंचवीस गुणिले वीसफुटी वॉर्ड केव्हाच भरला होता. तिथं एकावेळी तीस-बत्तीस तरी रुग्ण आडवे. याची सुई आत जाईतो दुसऱ्याची पिशवी रिती होते आहे. हिच्यात अँटिबायोटिक टाकायचं आहे तर तिच्यात व्हिटॅमिन्स. त्या पाण्याचा रंग पिवळा झाला की, सगळ्या माउल्या तेच औषध सलाईनमध्ये मागताहेत. मग त्यांच्याही पिशव्यांत इंजेक्शनांच्या कुप्या रिकाम्या होताहेत. एकाची पट्टी होईतो दुसरी त्याच्या जागी निजते आहे आणि दर रुग्णाबरोबर किमान दोन वेळा चवड्यांवर उटारेटा करून माझे पाय भरून येताहेत.

तरी थकायला, विसंबायला वेळ नाही. यंत्रासारखी ऊठबस. मेंदूतल्या काही संवेदनाच फक्त सजीव. बाकीच्यांचा जगाशी संबंध संपलेला. अर्जुनाला पक्ष्याचा डोळा दिसतो तशी ताणलेल्या कोपरावरची शीर फक्त दिसतेय मला. हडकुळ्या हातावर कुठं टचटचीत वर आलेली. बघून आनंद व्हायचा. हडकुळेपणाचा नव्हे. माझं काम सोपं असण्याचा. ती चरबीत रुतलेली असली की, अधिक वेळ खाणार का, एका खेपेत जमेल ना हे प्रश्न हैराण करताहेत. पण पुढचा रुग्ण मला पुढं पुढं ढकलतोय. त्याच्याबरोबरची माणसं मागून रेटताहेत.

तंबूच्या बाहेरही इतर उपचार चालले होते. तिथले वारकरी तर शेकड्यांनीच मोजावेत.

“आपल्या शिबिरात रुग्णांची इत्थंभूत चौकशी करायचा इरादाच नसतो. फक्त वारकऱ्यांसाठी जमेल तितकी सेवा आपण उपलब्ध करून देत असतो.” विश्वासनी मला सांगितलं होतं. “वारकऱ्यांना सगळ्यात गरज आहे ती चालत राहण्याची. त्यासाठी त्यांना तात्पुरतं तरी ठीक करायचं. त्यांच्या आजाराची मुख्य कारणं तीन.

बारा गावचं दूषित पाणी पिऊन पुष्कळांची पोटं बिघडतात. त्यांनी होणाऱ्या वांत्या-जुलाब, पावसापाण्यात राहिल्यानं ताप-खोकला आणि पायांसाठी लिनिमेंट-बँडेजेस.”

“इतक्या जणांच्या पायांची तक्रार का?” मी विचारलं होतं.

“एरवी कष्टांची सवय असली तरी त्यांचं एवढं चालणं होत नसतं. पाय भयंकर दुखतात. त्यामुळे गेली काही वर्षं आम्ही चोळण्यासाठी लिनिमेंट द्यायला लागलो. ते फारच लोकप्रिय ठरलं. त्या बाजूला सर्वांत अधिक गर्दी. खोकल्याच्या औषधाचंही तसंच. तेही आम्ही पिंपानं आणतो. माझ्या दोन बहिणी त्यांची व्यवस्था बघतात. त्या दोघी वारकऱ्यांच्या सर्वांत लाडक्या.” ते हसत हसत म्हणाले.

रुग्णांमधून फिरताना, त्यांची गर्दी हटवताना मला त्या उद्गारांचा पडताळा येत होता. बाहेर लाल कफ सिरपचा बुधला घेऊन सरला जोशी बसलेल्या. त्यांच्या पुढ्यात दिवाळीला पणत्या भरून ठेवाव्यात तसे छोटे प्लॅस्टिकचे पेले अर्धे भरून ठेवलेले. वेळेला चारसहा जण ते घशात ओतताहेत. बरोबरच्या सोबत्यांसाठी बाटलीतून भरून नेताहेत. शेजारी बसलेल्या नलूताई बडवे पंचपात्रीतून देवाच्या तीर्थासारखं पळीपळीभर लिनिमेंट हातावर घालताहेत. पुरुष नि स्त्रिया समोरच बसून, जांघेपर्यंत धोतरं वा लुगडी वर सावरून हातानं पाय रगडताहेत. क्वचित दुसऱ्यांचे रगडून देताहेत.

पण ही केवळ इकडून तिकडे हलताना दिसलेली क्षणचित्रं. आमच्या वॉर्डमध्ये रोग्यांचा ओघ अखंड घोंघावतोय. घारीच्या नजरेनं त्यांच्या हातांवर लक्ष ठेवावं लागतंय. कुणी वेडावाकडा हात हलवतंय का? कुणाचं सलाइन बाहेर जातंय का? कुणाची पट्टी घट्ट न दाबल्यानं रक्त गळतंय का? हे लोक तरी किती अडाणी? मी परत परत कोपर दुमडून ठेवायला सांगते आहे, शेजारी सगळेजण तेच करताहेत तरी हे अजागळासारखं वागणं का? रक्त ठिपकण्याची गरजच नाही मुळी.

‘मीना, जरा इकडे येणार का?'विश्वासची हाक कानी आली म्हणून मी डोकं वर केलं. शेजारच्या ओ. पी. डी. तंबूत अशीच लगीनघाई उडालेली. वारकऱ्यांना चपला घालून चालायची सवय नसल्यानं पायांवर भाजल्या पापडासारखे टचटचीत फोड आलेले. त्यांचे फुटून व्रण झालेले. ते बांधणं जिकिरीचं. नंतर त्यांच्यावर चालणंही जिकिरीचं. पण विश्वास माझं लक्ष दुसरीकडे वेधतात.

‘हे पाहा कॉलेस फ्रॅक्चर.' एका चांगल्या पिकलेल्या म्हातारीचा हात मला दाखवत ते म्हणाले, “ही सासवडच्या घाटात पंधरा दिवसांपूर्वी पडली. हात तेव्हा मोडला. पण वारीच्या ओढीनं ही गेले पंधरा दिवस तशीच चालते आहे.”

मी पुढे होऊन तिच्या हातावरून हात फिरवला. मनगटाजवळ झालेले हाताच्या हाडांचे तुकडे सुजेमधूनही लागत होते. पाहता पाहता विश्वासनी ते ओढून बसवले आणि तिला योग्य ते प्लॅस्टर घालून टाकलं. खरंच, धन्वंतरी असावा तर असा. या जागी एक्स-रे नाही, भूल देण्याची सोय नाही. पण त्यांनी लगोलग ते शक्य तितके जुळवून टाकले होते. प्लॅस्टरखाली बंदिस्त करून मोडक्या हाडाला भरून येण्याची संधी दिली होती. त्या माउलीच्या डोळ्यांतून कृतज्ञता वाहत होती.

मी पुन्हा वॉर्डमध्ये गुंतले. तासांमागून तास चालले होते. लगातार कामाची झिंग चढल्यासारखं झालं होतं. वैद्यकाला जीवनातून हद्दपार करून टाकल्यानं मी ज्याला मुकले त्याची कधीमधी वाटणारी हुरहूर अटीतटीनं भरून काढत होते. भोवताली बघ्यांची संख्याही भरपूर. माझ्या उठाबशा त्यांनाही दिसत होत्या. धावपळ दिसत होती. ‘माउली, लई हलका हात हाय बग तुझा.' असं कुणी उत्स्फूर्त बोललं की धन्य वाटत होतं. वाचकांचं पत्र आलं की वाटतं, तसं.

तासच्या तास निघून गेले. घड्याळ हाताला होतं हेही विसरून गेले होते. त्याचे काटे आज गळले होते. चार-साडेचारच्या सुमाराला कुणीतरी जेवायला चला म्हणून म्हटलं. पण जेवायला सवड झाली नव्हती, नव्हे भूक हरपल्यानं त्याची आठवण झाली नव्हती. मला फक्त एकच गोष्ट हवीशी वाटत होती. तुकारामबाबांची पालखी वाटेत भेटली होती पण ज्ञानोबा-माउलींचं अजून दर्शन व्हायचं होतं. ते व्हावंसं वाटत होतं. आणखी तासाभरानं मी रांगेतल्या लोकांना म्हणाले, “ती पालखी जेव्हा येईल तेव्हा मला सांगा.”

“आं, माउली. माउलींची पालखी मघाशीच गेली नव्हं का?”

“छे:, अशी कशी जाईल?”मी गोंधळून म्हणाले.

“खरंच गेली ती.” दोघाचौघांनी होकार भरला.

त्या पालखीबरोबर एवढा जमाव, एवढा हुतुतू हमामा, एवढा कोलाहल आणि तिच्यापासून केवळ वीसपंचवीस फुटांवर असलेल्या मला ती गेलेल्याची खबरबातही नाही? भारी जीव चुटपुटला. मी कुणाला तसं म्हटल्यावर एक म्हातारी उद्गारली.

“माउली, इतकी सेवा करताय नाही आमची? इथंच माउली आहे बघा.”

नाटका-सिनेमातलं वाक्य. पण ती बाई बोलली खरी. तिथं ते नाटकी वाटलं नाहीच उलट दिलासाही देऊन गेलं. फक्त ही सेवा क्षुल्लक होती. फारच अल्पकाळ टिकणारी होती. विश्वासच्या हातून होते ती खरी रुग्णसेवा. आता- पावेतो त्यांनी आणखी एक हाड सांधलं होतं. एका माणसाच्या नाकाच्या शेजारी आणखी एक भोक पडलं होतं. त्याला त्याच्या गांभीर्याची कल्पना देऊन गालावर पट्टी लावली होती. रोग्यांना प्रत्यक्ष पाहून, झटपट निदान करून औषधं, गोळ्या देत असताना, दिंडीतल्या आणखी कुणाला तसाच आजार आहे का विचारून जास्तीची औषधं बरोबर बांधून देत होते. इंजेक्शनची शिफारस करत होते. दरवर्षी परदेशातून धावत येऊन ही निष्काम सेवा करत होते.

‘आम्ही या महिन्यात एकूण तीन शिबिरं भरवतो. दरवेळी वारीच्या मागून पुढे जायचं. वारी अंगावरून वाहून गेली की आठ दिवसांनी ती पुन्हा गाठायची. गंमत म्हणजे लोक ‘फॉलो अप्‌‍'साठी येतात. नुसतं वारीतल्या वारीत नाही तर दरवर्षीच्या वारीत आवर्जून येऊन भेटतात. काय औषध दिलं, त्याचा कसा काय गुण आला ते सांगतात. मागच्या वर्षी एक म्हातारी मला म्हणाली, “माऊली, बुढ्ढ्ा व्हायला लागला तू आता. चष्मा आला. केसंबी पिकाया लागली की तुझी.” हसत हसत विश्वास म्हणाले, “मला नाही तरी तिला माझ्या वाढत्या वयाची जाणीव झाली होती.”

आता गर्दी पातळ झाली. माउलींच्या पालखीमागच्या दिंड्या गेल्यावर रुग्णांचा ओघ रोडावला. मग आम्हीही पालं उचलायला लागलो. पुन्हा सकाळचे स्वयंसेवक सरसावले. त्यांनी एकेक गोष्ट चटपट उतरवली. त्यांच्या घड्या घालून नीट रचायला सुरुवात केली. खांब उपसून काढले. सामान बांधून पुन्हा बसच्या टपावर चढवणं चाललं होतं. भरून आलेल्या, जडावलेल्या पायांनी पण फुलपाखरी मनानं आम्ही लगत उभे होतो.

याच प्रांगणात बोधलेबुवांची दिंडी उतरली होती. आमच्यासमोर एका मोठ्या ट्र्रकच्या आडोशानं स्वयंपाक चालला होता. इथल्या सहकारी डेअरीतर्फे आज या दिंडीला भोजन होतं. त्याची गडबड उडालेली. एका पडद्याआड मोठ्याच्या मोठ्या हंड्यांमध्ये आमटी उकळत होती. शेजारीच भल्यामोठ्या काहिलीत भाजी परतणं चाललं होतं. ट्रकच्या बाजूला आडोशाच्या निळ्या प्लॅस्टिकखाली बायका चपात्या भाजत होत्या. चर खणलेला. त्याच्यावर आडवा जाड पत्रा. पांढऱ्याधोप पिठाचे बचकभर उंडे घेऊन चार-सहाजणी लाटताहेत. दोघीचौघी भाजताहेत. चपाती तुपावर परतल्याचा खमंग वास सुटलेला. मी जवळ जाऊन उभी राहाते तो त्यांच्यातल्या कुणी ओळखीचं हसू हसल्या. त्यातल्या काहीजणींना थोड्या वेळापूर्वी मीच सलाईन भरलं होतं. गंमत वाटली मला.

“काय चाललंय?” मी उलट हसून विचारलं.

“चपात्या करतोय माउली. खावा की आमच्या हातची एकादी.”

मघाशी मी त्यांना रसरूप अन्न दिलं होतं. आता त्या मला पूर्णब्रह्मरूपात देऊ पाहात होत्या. एव्हाना माझ्या पोटात हालचाल सुरू झाली असली तरी संकोचानं नको-नको म्हणत होते. पण त्यांचा आग्रह मनापासूनचा होता. अगदी तव्यावरची उतरून एकजण हातात घेऊन आली. नाही म्हणवेना. थोडी मी घेतली. बाकीची विश्वासकडे दिली. पै-पैशाएवढ्या तुकड्यांनी सगळ्या जिभांना चव आली.

तेवढ्यात कर्ण्यातून घोषणा व्हायला लागली. ‘सर्व पुरुष मंडळींनी पंगतीत बसून घ्यावे आणि सर्व स्त्रियांनी त्यांना वाढायला मदत करावी.'

लगेच चार शिस्तबद्ध पंगतीत माणसं जमिनीवर बसली. वाढण्याची वाट पाहू लागली. पण त्याआधी भोजन आयोजकांचा छोटा समारंभ होता. त्यांचे प्रमुख बोलायला उठले. त्यांनी दरवर्षी येणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंडीचं स्वागत केलं आणि अतिशय आश्चर्य म्हणजे आमच्या रुग्ण-सेवेचा अत्यंत भरभरून उल्लेख केला. एवढंच नव्हे तर, आमच्यातल्या अध्वर्यूंना जवळ पाचारण केलं. विश्वास आणि त्यांचे विश्वासू सहकारी पुढे होणं उचित होतं पण मलाही जोरदार आग्रह झाला. मीही गेले. सर्व दिंडीतर्फे त्यांनी दिलेले आभार आणि त्याचबरोबर मानाचं श्रीफळही स्वीकारलं. त्यांचा जेवणाचा आग्रह मात्र परतण्याची घाई असल्यानं मोडावा लागला तरी प्रसादाचा शिरा त्यांनी बरोबर बांधून दिलाच.

बस निघताना एक खूप वयस्क वारकरी पत्रावळभर जेवत असताना दिसला. खूप नवल वाटलं. कारण जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत मघा त्याला आमच्या वॉर्डात आणला होता आणि मीच त्याला सलाइन दिलं होतं. तो इतक्या लवकर असा टुणटुणीत होईलंसं वाटलं नव्हतं. याच्याबाबतीत ठीक असेल पण माझे काही इतरही रुग्ण जेवताना दिसले. अशा खात्यापित्या लोकांना सलाइनची खरंच आवश्यकता होती का?

मी विश्वासला तसं म्हटलं. ते हसले आणि म्हणाले, ‘एरवी नाही. पण हे वारकरी आधीच कुपोषणाचे बळी असतात. त्यांच्या शरीरातली शोषणशक्ती आणि प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. शरीर सुकलेलं असतं. त्यातलं पाण्याचं संतुलन होण्यासाठी, अगदी चटकन ताकद येण्यासाठी सलाइनसारखा रामबाण उपाय नाही. त्यात हवी ती पोषकद्रव्यं आपण घालत असतो. वारीसाठी इतरही काही सेवापथकं येतात, पण हे सलाइन प्रकरण फक्त आपणच हाताळत असतो. लोकांना त्याचा फार उपयोग होतो. म्हणून किती तुडुंब गर्दी होती ती पाहिलीत ना? आज तुम्ही किती सलाइन्स दिली असतील?'

‘किती?'

मी साधारणत: सकाळी साडेदहाला सुरुवात केली होती. साडेपाचपर्यंत म्हणजे सात तास सतत त्यात गुंतले होते. तासाला दहा म्हटली तर सत्तरेक लावली का?

“तुम्ही तीनशे सलाइन्स लावलीत?”

“तीनशे?” मी विश्वास न बसून विचारलं. इंग्लंडमध्ये मी तेवढी सात वर्षांतही दिली नसतील.

“होय. तीनशे.” आपण सलाइनच्या पिशव्या आणि सेट्स मोजून आणलेले होते. त्यातले तीनशे संपलेले आहेत. आता उद्यासाठी आणखी खरेदी करावे लागणार आहेत.

तीनशे? मी अजूनही स्वत:शी आश्चर्य करत होते. रुग्णागणिक किमान दोन म्हणजे मी सहाशे उठाबशा काढल्या होत्या. तरीच माझे पाय लोखंडी झाले होते.

परतताना बस नात्यापुत्यामधून गेली. पालख्या रात्रीच्या मुक्कामासाठी तिथं विसावल्या होत्या. सबंध गावाला त्यांच्या अस्तित्वाची लकाकी चढलेली. मुख्य रस्ता विजेच्या दिव्यांनी झगझगत होता. दुथडी फुललेल्या जत्रेसारखं वातावरण. खाण्या-पिण्याची, कपड्यांची, संसारोपयोगी वस्तूंची दुकानं ठेचून भरलेली. कर्ण्यावरून भक्तिगीतं वाजताहेत. वारकरी कुणी जेवताहेत, कुणी खरेदीत गुंतलेत तर कुणी कोंडाळं करून ‘कीर्तनाचे रंगी'नाचताहेत. आठ वाजत होते. आणखी तासभर हे सारं चालणार. नऊला सगळे चिडीचूप. उद्या पहाटे चारला उगवणारा त्यांचा दिवस सलग सोळासतरा तास चालणार होता. त्यात तीसेक किलोमीटर्सची वाटचाल जमेला धरलेली होती.

आश्रमात येऊन पोहोचलो आणि वाहत्या सुगंधानं भरघोस स्वागत केलं. सकाळी नुसती दिसलेली रातराणी आता घमघमली होती. जाईजुई या सुगंधी नदीत आकंठ बुडालेल्या. थंड वाऱ्याच्या मोरपिशी झुळका अंगाला कुरवाळत होत्या. नाकाला मोहवत होत्या. त्याच तंद्रीत भाजी-भाकरी नि लसणाची चटणी जिभेवर अमृत बरसून गेली. सापत्नेकर मंडळी एकाहून एक वरचढ गाणारी. त्याचां मासला बसमध्ये मिळाला होता. दरवर्षी रात्री तोही एक कार्यक्रम असतो. पण आता सगळेजण फार थकले होते. एकूण औषधांचा आढावा घेऊन उद्यासाठी आणखी आणणं आवश्यक होतं. उद्या सुरुवातही आजच्याहून आधी करायची होती. तेव्हा सगळेजण आपापल्या जागी गेले. अनोळखी जागेत, डासांच्या हल्ल्याला तोंड देत मीही कालच्या जागरातीचं उट्टं काढायच्या खटपटीला लागले.

आज सकाळपासूनच अंधारून आलं होतं. कालच्याहून आज पावसाची चिन्हं अधिक होती, नव्हे त्याचे शिडकावे सुरू झाले होते. भराभर न्याहरी उरकली आणि औषधांच्या याद्या तपासल्या. कापसाचे बोळे वळत बसलेला आमचा वैद्यकीय संसार बघून भोवतालचे लोक तिथंच सल्ल्यासाठी नि उपचारांसाठी यायला लागले. त्यांना हवं ते देऊन घाईनंच निघालो. औषधांसाठी गावात जाणं भाग असल्यानं यावेळी पालखी चुकवणं जमेना. पुढं रिंगण धरलेलं. ते पाहायची अतोनात ओढ. पण तिथंवर जाणंच अशक्य. तेव्हा बसमध्ये पाऊणतास अडकलो. तो वेळ गेला मात्र मजेत. काल रात्री हुकलेली गाणी आता सापत्नेकर बंधुभगिनींनी मनावर घेऊन म्हटली. आपकी फर्माईश चालली होती. साथीला टाळ्या वाजवून आम्ही दंगा मांडलेला.

शिबिराला वेळ होत होता. आम्ही जागचे हालतच नाहीसं पाहून खरेदी स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवून आम्ही बस उलटी वळवली. ते बिचारे पायी चालत कसेबसे दुकानाशी पोहोचले नि औषधं घेऊन कसेबसे परतले.

गाडी माळशिरसच्या दिशेनं पळत होती. पुन्हा रस्त्याकडेची जागा हेरणं चालू होतं. एव्हाना वारकरी जायला लागले होते म्हणून ती चटकन निवडणं भाग होतं. काल नाही म्हटलं तरी एका इमारतीच्या अंगणात थांबलो होतो. आज निखळ रस्त्याची कड. त्यातून पर्जन्यराजानं मनावर घेतलेलं. वरून पाणी, खाली रबरबीत चिखल. तेवढ्यात रस्त्याशी एक सलग लांब कड दिसली. तीच धरली. आधी कुदळी-फावड्यानं काटेरी झुडपं उखणावी लागली. मग एका बाजूला बसच्या आधारानं प्लॅस्टिकचं छत उभारून तंबू ठोकले. वाऱ्याच्या जोडीला आज पाऊस. मध्येच छताचा फुगा झाला की, वरच्या खोळीत साठलेलं पाणी पागोळ्यांतून भसासा ओते. बरोबर आणलेल्या रेनकोटचा आज खरा उपयोग होत होता.

बरोबर घेतलेल्या तिखट पुऱ्या दोन दिवस खाऊनही शिल्लक उरल्या होत्या. वाटलं, त्या वारकऱ्यांमध्ये वाटून टाकून बसमधली अडचण कमी करावी. टोपली घेऊन मनानं अवघडत मी त्यांच्यामध्ये उतरले. त्यांना कसं वाटेल कोण जाणे? पण म्हटलं दोघेचौघे तरी घ्यायला येतील. पाहते तो ‘माउली, माउली' करत त्यांनी जवळपास हल्लाच केला माझ्यावर. किती भुकेजले होते सगळेजण. एकेका पुरीसाठी होणारी हमरीतुमरी पाहून मन उदासलं.

दिंडीतून जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय दिंडीचे आयोजक करतात. त्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागते. मग त्यांची व्यवस्था ठीक होत असते. काल रात्री त्यांचं जेवण पाहिलं होतं. पण पुष्कळजण एकटे-सुटे आलेले. त्यांच्याजवळ जवळपास काहीच नव्हतं. वाटेवरच्या उदार धनिकांनी चालवलेल्या अन्नदानातून भागवायचं. त्यात पोटभर पोटात पडेलच असं नाही.

मी सलाईन सत्र सुरू केलं. चिखलामुळे कालच्याहून आज घाण अधिक वाटत होती. त्यात रुग्णांना झोपायला सांगणंही कठीण. मधून मधून पोत्यानं पुसून घेऊन स्वच्छतेचा बहाणा करत होतो. लोकांची रीघ तशीच. दोनेक तासांनी विश्वास एका स्त्री-रुग्णाला घेऊन आले. घसरून पडल्यानं तिच्या गुडघ्यामध्ये रक्तस्राव झाला होता. ते रक्त सीरिंजनं काढून टाकून त्यांनी तिला बँडेज बांधलं. परत ते ओ.पी.डी. ला धावले.

आणखी एखाद्या तासात माझ्याकडचे सर्व सलाइन सेट्स संपले. येताना भरपूर आणले होते. त्यातले काल बरेच संपले होते. सकाळी घेतलेलेही संपलेले. आता परत गावात गाडी पाठवायची कशी? सबंध रस्ता वारकऱ्यांनी उधाणलेला. पण अशा अडचणींना आमचं सेवापथक भीक घालणार नव्हतं. काहींना सलाइन प्यायला दिलं पण काहींना शिरेतून देणं आवश्यक म्हणून तातडीनं एक सायकलस्वार तिकडं रवाना केला.

तो धापा टाकत परतला तो अगदी योग्य वेळी. जुलाबांनी गळून गेलेले काही रोगी ताटकळत बसलेले होते. त्यांच्यामध्ये एक तरुण बाई होती. तिला मी सलाइन सुरू केलं. वीसेक मिनिटं झाली नि तिला त्याची जोरदार प्रतिक्रिया आली. ती थडथडा उडायला लागली. मी तिचं सलाइन लगोलग बंद केलं, पण ती एकदम अस्वस्थ झाली. तिला घाम फुटला, उलटी झाली आणि पाहता पाहता तिची नाडी लागेना. पूर्ण ग्लानीत गेली ती.

एकटी बाई. बरोबर कुणी नाही. मी लगेच प्रतिक्रिया-विरोधी औषधोपचारांना सुरुवात करून विश्वासना निरोप पाठवला. भराभर इतर डॉक्टर्स गोळा झाले. तातडीचे उपचार झाले. सुदैवाने ते लागू पडले. अर्ध्या तासात ती सावध झाली. तोवर माझा जीव मात्र उडून गेला होता.

‘ती आता खूप झोपेल.' विश्वासनी सांगितलं. ‘चालून चालून ही मंडळी इतकी थकलेली असतात की, अशी आपत्ती सहन करण्याची ताकद त्यांच्यात नसते. झोपू दे तिला. आपण निघण्यापूर्वी तिला थोडी कॉफी पाजू आणि तिची दिंडी शोधून तिकडे रवाना करू.'

तेवीस वर्षांच्या त्यांच्या अनुभवांचा मला किती आधार वाटला तेव्हा.

आमच्या पथकापैकी एका डॉक्टरांचे आईवडील वारीबरोबर चालत होते. ते आमच्या तंबूत आले. रीतसर सगळ्यांशी ओळखी झाल्या. अजूनही माझ्या बाईची तब्येत काळजी करण्यासारखी होती. मी जुजबी नमस्कार करून परत तिच्याकडे वळले.

आणखी अर्धा तास उलटला असेल. डॉक्टरांचे वृद्ध वडील परत माझ्याजवळ येऊन उभे राहिले. आता नाडी वगैरे ठीक चालत रुग्ण गाढ झोपली होती. मी त्यांना म्हणाले, “माफ करा मघाशी घाईत होते. आपल्याशी बोलू शकले नाही.”

“ते असू दे हेो.” ते मला हातानं थोपवत म्हणाले, “तुम्ही किती धडपडताय ते दिसतं आम्हाला. पुढे गेलो तर ही पहा रसरशीत ताजी जांभळं मिळाली. तुमच्यासाठी घेऊन आलोय मी.”

दोन मिनिटांची तोंडओळख झालेली माणसं अशी जिव्हाळ्यानं वागून का काळजाला हात घालतात?

साडेपाच वाजत आले. कालच्या अनुभवानं मी शहाणी झाले होते. माउलींची पालखी आज मी चुकवणार नव्हते. ती आली आली असा घोष झाला आणि मी हातातलं सगळं खाली ठेवून तंबूच्या बाहेर पळाले. समोर प्रचंड गर्दी. तिच्यातून दूरवरच्या सजलेल्या रथाचे कळस तेवढे दिसत होते. मग तरुण मंडळींचा मार्ग धरला आणि आमच्या मिनीबसच्या टपावर चढून गेले.

एका अचाट दृश्यानं माझं स्वागत केलं. जवळजवळ किलोमीटरभर सरळ गेलेला रस्ता माणसांनी फुललेला. अशी वाहती गर्दी आजवर डोळा कधी देखिली नव्हती. दूरवर पालखी. पुढे वीसपंचवीस दिंड्या. लोक नाचताहेत, टाळमृदंगांचा गजरावर गाताहेत. हसताहेत. आपापसांत खेळीमेळीनं बोलताहेत. मघा पुऱ्या वाटतानाच्या दैन्यावस्थेचा लवलेशही कुठं दिसत नव्हता. आमच्या तंबूत दिसलेली रुग्णावस्थाही त्यात लोपलेली. एका कैवल्यानंदानं सगळ्यांना घेरलेलं. त्याच्या तालासुरावर ओघ वाहतोय.

गेले कित्येक दिवस वाट चालताहेत हे लोक पण अजूनही उड्या मारण्याचा, खरा ‘धावा' येण्याआधीच धावत जाण्याइतका उल्हास त्यांच्यामध्ये आहे. पताका फडकावीत, डोक्यावरची वृंदावनं तोलत, गळ्यात मृदुंगाचं ओझं वागवत, हाती जडशीळ पितळी टाळ धरून ही मंडळी कशी चालली आहेत. आजच नव्हे गेली हजार वर्षं चालत आहेत. आमच्या संस्कृतीच्या जिवंत परंपरेची जागती खूण ही. तिचं सातत्य काही और आहे. पूर्वी वाटे की, शिक्षण वाढलं की लोकांचा या कष्टप्रद भक्तिमार्गाकडचा ओढा ओसरेल. वारकऱ्यांची सुशिक्षित नवी पिढी कशाला जाईल तिकडे? पण छे:. त्याच्याबरोबर उलटं चित्र दिसतंय. कुणी नेता आग्रह धरत नाही, कुठची ऐहिक लालूच नाही, कसलीही जाहिरात नाही तरी दरवर्षी वारकऱ्यांचा आकडा वाढतोच आहे. यंदा पंधरा लाखांवर जत्रा आहेसं मघा तंबूशी उभे असलेले पोलिस अधिकारी बोलत होते. एवढी गैरसोय पत्करून, एवढ्या हालअपेेष्टा काढून त्या सख्या पांडुरंगाला भेटायची तीव्र आस लागणं हे काय कोडं आहे?

‘त्या बड्या बंडवाल्यांत -ज्ञानेश्वर मागें पहिला' बी. कवींनी म्हटल्याप्रमाणे ज्ञानदेवांनी सामाजिक विषमतेविरुद्ध उभारलेलं ते बंड अजूनही कुणाला मोडता आलेलां नाही. सवर्ण-जातिहीन, गरीब-श्रीमंत, हिंदु-मुसलमान असे सगळे भेद काही काळापुरते तरी त्यात विसरले जातात. ही त्याची कमाई भरपूर आहे. मग ‘लौकिक पराक्रमाच्या प्रांताकडून अध्यात्माच्या अचेतन रेताडाकडे नेणारे टाळकुटे' म्हणून त्यांचा कितीही उपहास होवो.

माउलींच्या पालखीचा रथ पुढे-पुढे सरकत होता. रिंगणाचा श्वेताश्व त्याच्यापुढे. ते कौतुक जवळ यायला लागलं तशी मी बसवरून खाली उतरले. आम्ही सगळेजण कामाला स्थगिती देऊन रस्त्याच्या कडेनं उभे राहिलो. डॉक्टरांचं पथक बघून कधीकधी रथाला थोडा विश्राम देतात म्हणून आशेनं उभी होते.

पण यावेळी तसं काही झालं नाही. पानाफुलांच्या माळांनी डौलात सजलेला कळसदार रथ, फुलांनी ओथंबलेली चांदीची पालखी घेऊन आपल्याच वेगानं पुढं जात होता. अतीव इच्छा असूनही गर्दीमुळे मला जवळ जाता येईना. उभ्या आयुष्याचा दीपस्तंभ असलेल्या त्या माउलींच्या पादुकांवर मला डोकं टेकवता आलं नाही तरी त्यांचा ओझरता स्पर्शतरी व्हावासा वाटत होता. व्याकुळ झाले होते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्याचं मन कसं आसावत असेल याचा अनुभव, देवावर अजिबात विश्वास नसूनही येत होता. अखेरीस कसंबसं त्या रथाच्या बाजूला पकडलं. लटकलेच म्हणाना. वेगानं फरफटत शंभर पावलं तरी ओढली गेले. पण मला पादुकांपर्यंत जाता आलं नाहीच. आमच्या बसच्याही पुढे गेल्यावर हात सुटला आणि मी जमिनीवर पाय रोवले.

पादुकांवरच्या, प्रसाद म्हणून घेतलेल्या तुळशींपैकी काही विश्वासनी हसत हसत माझ्या हातात टाकल्या आणि माउलींचा बुक्का माझ्या कपाळी लावला.

अगदी आई लहानपणी लावत असे तसा.

(अनुभव दिवाळी २००६मधून साभार)


मीना प्रभु

मीना प्रभु यांनी अनेक रसाळ आणि अभ्यासपूर्ण प्रवासवर्णनं लिहीली आहेत. त्यांच्या देश-विदेशातील भटकंतीवरील पुस्तकांनी मराठी साहित्यात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 6

शरद बहाळकर06.03.25
प्रभुजींचे शब्द व लिखाण , प्रतिक्रीये साठी शब्दच नाही, आठवलं ' अप्रतिम' अतिउत्तम' ..""खूप रसाळ""
Neema Sanjeev Kulkarni04.03.25
खूपच भावपूर्ण लिखाण! मीना प्रभुंना विनम्र श्रध्दांजली.
S. Thatte04.03.25
फारच हृद्य लिहिलंय. वाचताना गळा भरून येतो आणि सगळी दृश्य डोळ्यापुढे उभी राहतात
रंजना फडणीस 04.03.25
माउली माउली रूप तुझं। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सुरेश दीक्षित 03.03.25
निशब्द...माऊली भेटीची अनुभूती देणारा लेख आहे हा...प्रत्येक वारीच्या वेळी हा लेख टाकत जा...वाचणार्‍यां प्रत्येकाला पांडुरंग भेटल्या सारखे वाटेल...राम कृष्ण हरी....
NATU VIKAS S.03.03.25
छान
See More

Select search criteria first for better results