दर्शनसिंगला वेड कसं नाही लागलं कोणास ठाऊक! बापाचा घरातच मृत्यू ओढवला, तर आई गावात शाबूत राहिलेल्या त्या गुरुद्वारात जाऊन राहायला लागली... आणि शाहनीने एकाच वेळी दोन जुळ्या मुलग्यांना जन्म दिला. दर्शनसिंगला समजेनासं झालं की हसावं की रडावं? नशिबाने एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताने काढून घेतलं.
आज़ादी आली आहे किंवा येते आहे असं ऐकलं होतं, पण लायलपूरपर्यंत ती कधी पोहोचेल हे काही कळत नव्हतं. सगळे हिंदू आणि शीख लपतछपत गुरुद्वारात जमा होत होते. शाहनी रात्रंदिवस कण्हत होती. दिवस भरायला आले होते. पहिलं बाळंतपण होतं.
दर्शनसिंग दररोज दंग्याच्या नवनवीन बातम्या घेऊन घरी यायचा. बाप धीर द्यायचा : “काही नाही होणार बेटा. काहीही होणार नाही. आतापर्यंत एका तरी हिंदूच्या वा शिखाच्या घरावर हल्ला झाला आहे का?”
“गुरुद्वारावर तर झाला आहे ना भापाजी? दोनदा आग लागली आहे!”
“आणि तुम्हा लोकांना तिथेच जाऊन जमा व्हायचं आहे!”
भापाजींच्या अशा बोलण्यावर दर्शनसिंग गप्प व्हायचा, पण जो तो गुरुद्वारात राहायला जात होता हेही खरं होतं.
“एकत्रित झाल्याने हिंमत येते भापाजी. आपल्या गल्लीत तर आता कोणीही हिंदू किंवा शीख उरलेला नाही. बस, फक्त आपणच आहोत- एकटे!”
आणि दहा-पंधरा दिवसांपूर्वी ती घटना घडली. रात्रीच्या वेळी अंगणात भापाजी पडल्याचा आवाज आला आणि सगळे झोपेतनं उठले. असं झालं होतं, की दुरून गुरुद्वाराच्या दिशेकडून ‘बोले सो निहाल'च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. त्यामुळे भापाजींची झोपमोड झाली व काय झालं ते पाहायला ते छतावर गेले. मग वरून खाली यायला लागले. जिना उतरताना पाय घसरला, आणि बस, अंगणातली उभी कुदळ डोक्यात घुसली.
हेही वाचा- दोन सरहद्द कथा
भापाजींचे अंत्यसंस्कार कसेबसे पार पाडले. जी काही पुंजी होती ती एका उशीत भरली आणि बाकीच्या तिघांनी गुरुद्वारात जाऊन आश्रय घेतला. गुरुद्वारामध्ये भयग्रस्त लोकांची वाण नव्हती. सगळे एकत्र होते म्हणून हिंमत वाटत होती. दर्शनसिंगला आता भीती वाटेनाशी झाली. आता तो म्हणायला लागला, “आम्ही एकेकटे थोडेच आहोत? आणि कोणी नसलं तरी वाहे गुरूच्या जवळ तर आहोत ना?”
गुरुद्वारात दिवसभर तरुण सेवादारांचा (सेवेकऱ्यांचा) जथ्था कामात मग्न असायचा. लोकांनी घरांमध्ये जेवढं काही पीठ, डाळ, तूप वगैरे होतं ते गोळा करून गुरुद्वारात आणलं होतं. दिवसा व रात्री लंगर (अन्नछत्र) चालायचं. पण असं किती दिवस चालणार, हा सवाल सगळ्यांच्या मनात होता. लोकांना अशी आशा होती की सरकार काही तरी मदत पाठवेल.
“कोणतं सरकार?” एखादा विचारायचा. “अंग्रेज तर निघून गेले.”
“इथे पाकिस्तान तर बनला आहे, पण पाकिस्तानचं सरकार अजून बनलेलं नाही.”
“हो. पण असं ऐकलं आहे, की सगळीकडे मिलिटरी फिरते आहे आणि त्यांच्या संरक्षणाखाली शरणार्थींचे काफिले बॉर्डरपर्यंत पोहोचवून देताहेत.”
“शरणार्थी? शरणार्थी म्हणजे कोण?”
“रेफ्युजी!” (निर्वासित)
“हा शब्द तर आधी कधीच ऐकला नव्हता.”
दोन-तीन परिवारांना अनिश्चितता व ताणतणाव सहन होईना. ते एक जथ्था बनवून गुरुद्वारातनं बाहेर पडले. “आम्ही स्टेशनवर जातो आहोत. गाड्या जाताहेत असं ऐकलं आहे. इथे तरी केव्हापर्यंत बसून राहायचं?”
“हिंमत तर करावीच लागेल ना भाई! वाहे गुरु खांद्यावर बसवून नाही घेऊन जाणार आपल्याला!”
त्यातल्या एकजणाने गुरुवाणीचा संदर्भ दिला : “नानक नाम जहाज़ है, जो चढ़े सो उतरे पार।”
असे काही लोक गुरुद्वारातनं अधूनमधून निघून जायचे तेव्हा वातावरणात पोकळीचा बुडबुडा निर्माण झाला आहे असं वाटायचं. मग कोणी तरी बाहेरनं यायचा व बाहेरच्या बातम्यांनी हा बुडबुडा फुटून जायचा.
“स्टेशनवर तर खूपच प्रचंड कॅम्प बनला आहे.”
“लोक भुकेने मरताहेत, आणि खाऊन खाऊनदेखील! रोगराई पसरते आहे.”
“पाच दिवसांपूर्वी एक ट्रेन इथनं गुजरली. त्यात तसूभरसुद्धा जागा नव्हती. लोक डब्यांच्या छपरांवरही दाटी करून बसले होते.”
संक्रातीचा दिवस होता. गुरुद्वारामध्ये अहोरात्र पाठ चालू होता. खूपच शुभ घटिकेला शाहनीने जुळ्या मुलग्यांना जन्म दिला. त्यातला एक तर जन्मत:च कमजोर होता. तो वाचण्याची काही आशा नव्हती; पण शाहनीने नाभीच्या(नाडी) बळावर त्याला बांधून ठेवलं.
त्याच रात्री कोणी तरी सर्वांना सांगितलं, “रेफ्युजींना घेऊन जायला स्पेशल ट्रेन आली आहे. चला, निघून जाऊ या.”
गुरुद्वारातनं एक मोठासा जमाव रवाना व्हायला तयार झाला- दर्शनसिंगसह. शाहनी खूप अशक्त होती, पण आपल्या कोवळ्या बाळांच्या आधारावर निघायला ती राजी झाली. आईने मात्र तिथून हलायला नकार दिला.
“मी येईन बेटा, पुढच्या एखाद्या काफिल्याबरोबर येईन. तू सूनबाईला आणि माझ्या नातवांना सांभाळून घेऊन जा.”
दर्शनसिंगने आईला खूप आग्रह केला, पण मग गुरुद्वाऱ्याच्या ग्रंथींनी (पुरोहितांनी) त्याची समजूत घातली. सेवादारांनीही त्याला आश्वस्त केलं : “तुम्ही इथनं निघून जा सरदारजी. एकानंतर एक असे सगळेच बॉर्डरच्या पलीकडे पोहोचणार आहेत. बीबीजी आमच्यासोबत येतील.”
तेव्हा दर्शनसिंग सगळ्यांच्या बरोबर निघाला. एका झाकणवाल्या वेताच्या टोपलीत दोन बाळांना ठेवून टोपली डोक्यावर घेऊन निघाला. जणू काही आपल्या परिवाराला तो फेरीवाल्यासारखा घेऊन जात होता.
स्टेशनवर गाडी तर होती, पण गाडीत जागा नव्हती. छपरावर लोक जमिनीतनं उगवलेल्या गवतासारखे बसले होते, पण एक बिचारी अशक्त व दुबळी नवी नवी आई व दोन नवजात अर्भकांना पाहून लोकांनी त्यांना छपरावरच चढवून घेतलं व जागा करून दिली.
हेही वाचा- म्हादेव
सुमारे दहा तासांनंतर गाडीत जराशी हालचाल झाली. सायंकाळचा लालिमा पसरला होता. रक्तरंजित, तप्त, तांबारलेला चेहरा. शाहनीचा उरोभाग चोखून चोखून चिपाडासारखा झालेला. ती एका मुलाला ठेवायची तर दुसऱ्याला उचलून घ्यायची. मळकट-धुळकट कापडांमध्ये गुंडाळलेल्या दोन मुलांच्या थैल्या. असं वाटत होतं की कुठल्या तरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातनं उचलून आणल्या आहेत.
आणखी काही तास गेले. रात्र झाली होती. गाडी पुढे जात होती. दर्शनसिंगने पाहिलं की एका मुलाचे हात-पाय तर हलताना दिसत होते, अधेमधे त्याच्या रडण्याचा आवाजही येत होता; पण दुसरं मूल निपचित होतं. पिशवीच्या आत हात घालून पाहिलं तर ते केव्हाच थंडगार झालेलं होतं.
दर्शनसिंग ओक्साबोक्शी रडू लागला तेव्हा काय घडलं आहे ते आजूबाजूच्या लोकांनाही समजलं. सगळ्यांना वाटत होतं की शाहनीकडून त्या मुलाला घ्यावं. पण ती आधीच पाषाणवत झाली होती. टोपली ताब्यात घेऊन ती बसली होती. “नाही. भावाशिवाय दुसरा दूध पीत नाही.” खूप प्रयत्न केले गेले, पण शाहनीने टोपली सोडली नाही.
ट्रेन दहादा थांबली, दहादा चालू झाली.
अंधारामध्ये लोक अंदाजच करत राहिले.
“बस जी... खैराबाद गेलं..”
“हे तर गुजरनवाला आहे जी.”
“बस- आणखी एक तास. लाहोर आलं की समजा हिंदुस्थानात पोहोचलोच!”
लोक जोशात आले होते. ते घोषणाही देऊ लागले-
“हर हर महादेव!”
“जो बोले सो निहाल..”
गाडी एका पुलावर शिरली तशी लोकांमध्ये उत्साहाची लाट पसरली.
“रावी नदी आली जी...”
“रावी आली?- म्हणजे लाहोर आलंच!”
या कोलाहलात कोणी तरी दर्शनसिंगच्या कानात कुजबुजलं, “सरदारजी- मुलाला इथेच रावीमध्ये फेकून द्या- त्याचं कल्याण होऊन जाईल. नदीपार नेऊन करणार काय?”
दर्शनसिंगने हळूच टोपली दूर सरकवली आणि मग लगेचच पिशवी उचलली आणि ‘वाहे गुरू' म्हणून रावीमध्ये फेकून दिली.
अंधारात अस्पष्ट आवाज ऐकू आला- कोणत्या तरी मुलाचा.
दर्शनसिंगने घाबरून पाहिलं शाहनीकडे.
मृत मुलगा शाहनीच्या छातीला चिकटलेला होता.
पुन्हा एकदा मोठा कलकलाट झाला.
“वाघा- वाघा-!”
(अनुवाद - सुकुमार शिदोरे)
(अनुभव, ऑगस्ट २०१७च्या अंकातून साभार.)
गुलजार
गुलजार
