आम्ही कोण?
आडवा छेद 

एआयच्या विरोधात अमेरिकन रस्त्यावर

  • निळू दामले
  • 02.09.26
  • वाचनवेळ 4 मि.
ai nilu damle

सध्या ७० टक्के अमेरिकन नागरिक एआयला नकार देत आहेत. डेटा गोळा करून त्याचा वापर करणाऱ्या कंपन्यांना अमेरिकन जनता आपल्या गावात यायला मनाई करत आहे. इलिनॉय, ओहायो, टेक्सास, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, मेन, न्यूयॉर्क, व्हर्जिनिया, न्यूजर्सी या राज्यांतले एआयचे प्रस्तावित प्रकल्प थांबवण्यात आले आहेत. नव्या प्रकल्पाना सरकारं परवानगी देत नाहीयेत. या वातावरणाचा एक परिणाम असा की, या उद्योगातून लोक आता पैसे काढून घेऊ लागलेत.

एआयवर (डेटा मायनिंग, प्रोसेसिंग इत्यादी) अमेरिकन सरकार ट्रिलियन डॉलर खर्च करायचा विचार करत होतं. एआयमधे गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी निवडणुकीत अब्जावधी डॉलर ओतले. माध्यमांचा, सरकारी संस्थांचा, वापर करून एआय उद्योगाने एक एआय गारूड तयार केलं. एआय म्हणजे सारं काही अशा वेडाने अमेरिका पछाडली. सर्व समस्यांवर अक्सीर इलाज, एआय. खेळ स्पर्धेत भरपूर पदकं हवीत? एआय. उपचार चांगले व्हायला हवेत? एआय. तंगड्या दुखत आहेत? एआय. केस गळत आहेत? एआय. बद्धकोष्ठ झालंय? एआय. कॉलेजेसना सांगण्यात आलं एआय शिकवा. भाषा, इतिहास, कला, साहित्य इत्यादी सारं बंद करा. पोरं आणि त्यांचे आईबापही वेड लागल्यासारखं एआय-एआय करू लागले.  

एआयमुळे किती नोकऱ्या नव्याने निर्माण होतील, एकूण रोजगार किती वाढेल याबद्दल अजून खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. किती रोजगार जातील आणि किती नव्याने होतील, याचा अंदाजही अजून आलेला नाही. दुसऱ्या बाजूला एआय उद्योगामुळे नुकसान किती होईल त्याचा अनुभव मात्र अमेरिकन जनता आत्ताच घेतेय. जिथे जिथे एआय प्रकल्पांची उभारणी सुरू झालीय तिथे निसर्गाचा नाश होतोय. एआय प्रकल्प खूप पाणी पितो. प्रकल्पाच्या आसपासच्या लोकांना पाण्याची टंचाई भासू लागलीय. एआय खूप वीज वापरतो. अमेरिकेत वीज महाग होतेय, विजेची टंचाई निर्माण झालीय.

हेही वाचा - ‘एआय’ जगाचं किती पाणी खातंय?

अमेरिकन माणूस म्हणतोय की अगदी मूलभूत अशी पाण्याची समस्या आधी सोडवा. नंतर एआयची क्रांती करा. अमेरिकेत सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवतेय. नद्यांची पात्रं कोरडी पडलीत. पाऊस लहरी झालाय. पाणी जमिनीत मुरत नाही. भूगर्भातली पाण्याची पातळी खालावत चाललीय. पाण्याचा उपसा जितका होतो तितकी पुन्हा भरपाई होत नाही. त्यात या खूप पाणी पिणाऱ्या प्रकल्पाची भर. पाणी ही अमेरिकेची खरी समस्या आहे.

कोलोराडो नदीवरचं हूव्हर धरण जागतिक पर्यटनाचं केंद्र आहे. पण पर्यटक तिथे पोचतात तर जलाशय रोडावलेला दिसतो. कोलोराडो खोऱ्यात आणि जलाशयात पाणीसाठा ४० टक्क्याच्या खाली घसरलाय. कोलोराडो नदी ७ राज्यातल्या ४ कोटी लोकांना पाणी पुरवते. कोलोराडो खोऱ्यातले लोक एआय प्रकल्पाला विरोध करत आहेत. सरकारने कोलोराडोतल्या पाण्याचं रेशनिंग सुरू केलंय. 

एआयचा उपयोग आहे हे तर खरंच आहे. माहिती गोळा करण्याचा वेग, विश्लेषण करण्याचा वेग, नवं ज्ञान तयार करण्याचा वेग एआयने प्रचंड वाढवला. ज्ञानाची सर्व क्षेत्रं अधिक समृद्ध झाली. माणसाचं दैनंदिन जीवनही प्रचंड सुकर आणि सुखी झालं.

एआयचे दुष्परिणाम दिसू लागले. अगदी मोजक्या क्षेत्रांतल्या अगदी मोजक्या व्यक्तींची बौद्दिक क्षमता वाढली. नव्वद टक्के जनता मेंदूचा वापर करेनाशी झाली. मापन, गणन, विश्लेषण, क्रिएटिविटी या गोष्टी सामान्य माणसाच्या जीवनातून गायब होऊ लागल्या. 

दोष एआयचा नाही. दोष एआयचे उद्योग उभारणाऱ्यांचा आहे. ज्यांना ज्ञानाच्या कक्षा वाढवायच्या आहेत ते लोक एआयचा विकास करत नाहीयेत. केवळ पैसा हेच उद्दिष्ट असलेले धनिक एआय उद्योग उभारत आहेत. उदा. ईलॉन मस्क. मेटासारख्या कंपन्यांना आता लहान मुलांना नादी लावून त्यांचं आयुष्य नासवण्याच्या आरोपाला आता तोंड द्यावं लागत आहे. कला जाणिवांचा प्रसार करण्याऐवजी त्या बोथट करण्याकडे एआयच्या मनोरंजन शाखेचं लक्ष आहे.

दुसरं म्हणजे दुनियेला निर्बुद्ध करणारा एआय हा उद्योग फार म्हणजे फार गुंतवणूक खाणारा आहे. एआयवाले आणि एआयच्या परिणामांचे बळी असे दोन वर्ग समाजात तयार होऊ घातलेत. एआयवाले अतीधनिक आणि पोटभरू निर्बुद्ध बळी अशा फळ्या समाजात पडत आहेत.

हेही वाचा - भारत : एआय डेटा डम्पिंग ग्राऊंड बनण्याच्या उंबरठ्यावर?

पुन्हा तेच. दोष एआयचा नाही. एआयमधला विकास ही समाजातली आधुनिक क्रांती आहे. एआयचा गैरवापर हा प्रॉब्लेम आहे.

साधनांचा वापर आणि वाटप महत्त्वाचा असतो. आज बेकारी, अज्ञान, आरोग्याचे प्रश्न, उपासमारी या समस्या जगाच्या साठेक टक्के नागरिकांना भेडसावत आहेत. त्या सोडवण्याला अग्रक्रम हवा की सेलफोन, कंप्यूटर, सिनेमा, टीव्ही, विमानप्रवास यांच्यावर अधिक पैसे गुंतवायला हवेत? एआयचा वापर अलीकडे शस्त्रांची मारक क्षमता वाढवण्याकडे होऊ लागलाय. माणसं जगवण्यापेक्षा मारण्याकडे एआयचं लक्ष अधिक आहे. 

अमेरिकेत एआय नको असे फलक जागोजागी, व्हाईट हाऊससमोरही लागलेत. अमेरिकन समाजाचे निर्णय एके काळी जनता घेत असे. अमरिका स्थापन झाली तेव्हा टाऊन हॉल हा अमेरिकन समाज जीवनाचा आत्मा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास अमेरिकेचा ताबा बाजाराने आणि धनिकांनी घेतला. ईलॉन मस्क याच्यासारखा मानसिक आणि बौद्धिक तोल गेलेला माणूस अमेरिकेची धोरणं ठरवतो, अमेरिकन सरकारचा भाग होतो ही घटना अमेरिकेतल्या वातावरणाची निदर्शक आहे.

अशा परिस्थितीत, धनिकांनी प्रचंड पैसा बाजारात लोटला असताना, माध्यमांनी लोकांना वेडं केलं असताना, लोकांनी आपल्या पातळीवर एकत्र येऊन एआयला विरोध केला. ही फार मोठी गोष्ट आहे.

हे सारं लिहीत असताना भारतात विशाखापटनम, हैदराबाद, बेंगलोर, नवी मुंबई या ठिकाणी धडाधड डेटा सेंटर तयार होत आहेत, सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे. स्थानिक लोक अस्वस्थ आहेत, पण काही करू शकत नाहीत अशी स्थिती आहे.

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Ashok kulkarni12.09.26
लेखामधील **तथ्य आणि दाव्यांची सत्यता** तपासण्यासाठी, लेखकाची वैयक्तिक मते आणि प्रत्यक्ष तथ्ये (Facts) वेगळी करून पाहणे आवश्यक आहे. हा लेख **अतिशयोक्तीपूर्ण/चुकीचे दावे, पर्यावरणाशी संबंधित वास्तविक चिंता आणि लेखकाची वैयक्तिक मते यांचा एक एकत्रित सांगड आहे.** यातील घटकांचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे: **१. तथ्यहीन आणि अतिशयोक्तीपूर्ण दावे** * **"७०% अमेरिकन नागरिक एआयला नकार देत आहेत / ९ राज्यांमध्ये प्रकल्प थांबवले आहेत":** **चुकीचे / अत्यंत अतिशयोक्तीपूर्ण.** संपूर्ण अमेरिकेत एआयवर बंदी घालण्यात आलेली नाही किंवा ७०% जनता रस्त्यावर उतरून सर्व प्रकल्प रोखत नाहीये. काही विशिष्ट भागांत स्थानिक लोक आवाज उठवत असले, तरी संपूर्ण अमेरिकेत एआय क्षेत्रातील गुंतवणूक प्रचंड वेगाने सुरूच आहे. * **"महाविद्यालयांना भाषा, इतिहास, कला आणि साहित्य बंद करून फक्त एआय शिकवण्याचे आदेश दिले":** **चुकीचे.** अमेरिकेत कोणत्याही शासकीय अथवा शैक्षणिक संस्थेने मानव्यविद्या (Liberal Arts) बंद करून फक्त एआय शिकवण्याचा असा कोणताही आदेश दिलेला नाही. * **"९०% जनता मेंदूचा वापर करेनाशी झाली":** **अतिशयोक्ती.** हे लेखकाचे स्वतःचे एक नाट्यमय भाष्य आहे, तो कोणताही सांख्यिकीय निष्कर्ष नाही. **२. वस्तुस्थितीवर आधारित (खरी) माहिती** * **एआयसाठी लागणारी पाणी आणि विजेची प्रचंड गरज:** **खरे आहे.** एआय डेटा सेंटर्सना प्रचंड प्रमाणात विजेची आवश्यकता असते आणि त्यांची सिस्टीम थंड ठेवण्यासाठी लाखो गॅलन पाणी लागते. त्यामुळे स्थानिक ऊर्जा यंत्रणा आणि भूगर्भातील पाण्यावर ताण येत असल्याच्या बाबी नोंदवल्या गेल्या आहेत. * **कोलोराडो नदी आणि पाणीटंचाई:** **खरे आहे.** कोलोराडो नदी आणि हूव्हर धरणातील पाणीसाठा तीव्र दुष्काळामुळे कमी झाला असून, तिथे पाण्याचे रेशनिंग सुरू आहे. या नैसर्गिक टंचाईला डेटा सेंटरसारख्या उद्योगांशी जोडून पाहाणे हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा विषय आहे. * **भारतात डेटा सेंटर्सची वाढ:** **खरे आहे.** विशाखापटनम, हैदराबाद, बेंगलोर आणि नवी मुंबई या भागांत डेटा सेंटर्सची उभारणी खूप वेगाने होत आहे. **३. वैयक्तिक मते आणि सामाजिक भाष्य** * ईलॉन मस्क यांच्यावरील टीका, मेटा (Meta) कंपनीचे लहान मुलांवर होणारे परिणाम, आणि एआयमुळे समाजात पडणारी दरी याविषयीची विधाने ही पूर्णपणे लेखक (निळू दामले) यांची **वैयक्तिक मते आणि राजकीय-सामाजिक विश्लेषण** आहेत. **निष्कर्ष:** लेखात मांडलेले **पर्यावरणीय आणि संसाधनांच्या तुटवड्याचे मूळ मुद्दे खरे आहेत**; मात्र ७०% लोकांचा विरोध, ९ राज्यांमधील संपूर्ण बंदी आणि महाविद्यालयांमधील शिक्षण बंद होण्याबाबतचे दावे **तथ्यहीन आणि अतिशयोक्तीपूर्ण आहेत.**

Select search criteria first for better results