आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

डॉ. गोपाल पालीवाल: मधमाश्यांचं विश्व जगणारा माणूस

  • अनिकेत लिखार
  • 19.06.26
  • वाचनवेळ 8 मि.
dr gopal paliwal

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड हे एक छोटंसं खेडेगाव. याच गावात जन्मलेले डॉ. गोपाल पालीवाल लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून होते. त्यांनी दोनदा एमबीबीएससाठी प्रयत्न केला, पण प्रवेश मिळाला नाही. पण हे अपयश मनाला लावून न घेता त्यांनी वर्धा येथील जानकीदेवी बजाज महाविद्यालयातून पदवी मिळवली आणि १९८७ मध्ये नागपूर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण होताच त्यांना वर्धा जिल्ह्यातील दत्तापूर येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात एका संशोधन प्रकल्पात सामील होण्याची संधी मिळाली. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय ठरणार होता. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (DST) प्रायोजित केलेल्या या प्रकल्पाचं उद्दीष्ट होतं ग्रामीण भागातील लोकांना विज्ञानाचा फायदा करून देण्याचे विविध मार्ग शोधणं. डॉ. तारक काटे यांच्या दिशादर्शनाखाली आणि अमृतराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालीवाल यांनी पाच वर्षं अत्यंत निष्ठेने काम केलं. याच दरम्यान पालीवाल यांचा जंगली मधमाश्यांशी पहिल्यांदा संबंध आला. 

पुढे या प्रकल्पाच्या कालखंडात त्यांनी आपलं पीएचडी संशोधनही पूर्ण केलं. त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता 'आग्या मोह माशी' अर्थात Apis dorsata या जंगली मधमाशीची चेतासंस्था आणि प्रजननसंस्था. संशोधनादरम्यान त्यांना दर महिना अवघा एक हजार रुपये स्टायपेन्ड मिळत असे. पण ते म्हणतात, "त्या मधमाश्यांनी मला संयम राखायला शिकवलं." 

dr gopal paliwal

१९९४ मध्ये त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डी. बी. टेंभरे यांनी शैक्षणिक मार्गदर्शक म्हणून त्यांना वैज्ञानिक दृष्टी दिली, तर अमृतराव घाडगे यांनी जमिनीवरची व्यावहारिक शहाणपणाची शिदोरी दिली. घाडगे हे महात्मा गांधींचे सहकारी होते आणि त्यांना मधमाश्यांसंबंधित कामाचा ४० वर्षांचा अनुभव होता. या दोन गुरूंच्या एकत्रित शिकवणीने माझं जीवन आणि विचार घडवले, असं डॉ. पालीवाल आजही अभिमानाने सांगतात.

संस्था उभारण्याचं ध्येय

पीएचडीनंतर डॉ. पालीवाल यांना पुण्यातील केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्थेत नोकरीची संधी होती, अनेक महाविद्यालयांत अध्यापनाचे पर्याय होते. पण त्यांनी ते सगळं नाकारलं. डॉ. माधव गाडगीळ, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. तारक काटे आणि मोहन हिराबाई हिरालाल या चिंतनशील व्यक्तिमत्त्वांनी त्यांना एकच मंत्र दिला: ‘संस्था उभारा, मधमाश्यांचं संवर्धन करा. हे कार्य संघटनेशिवाय दीर्घकाळ टिकणार नाही.’ या उपदेशाने प्रेरित होऊन त्यांनी १९९४ ते १९९७ या काळात ऑक्सफॅम फेलोशिप स्वीकारली. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावात देवाजी तोफा यांच्यासोबत त्यांनी तीन वर्षं वास्तव्य केलं आणि आदिवासींसोबत मिळून मधाचं काम उभं केलं.

dr gopal paliwal

तिथे त्यांनी आदिवासी बांधवांना मध संकलनाच्या शास्त्रशुद्ध पद्धती शिकवल्या. उत्पादन कसं वाढवायचं, त्यावर प्रक्रिया कशी करायची, ते बाजारात कसं न्यायचं, या संपूर्ण साखळीवर त्यांनी काम केलं. त्यांच्या या प्रयत्नांनी या विषयाचा पाया मजबूत झाला आणि २००० साली त्यांनी ‘सेंटर फॉर बी डेव्हलपमेंट’ या संस्थेची स्थापना केली. गेल्या २५ वर्षांत त्यांनी झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांतील एकूण २९ जिल्ह्यांमध्ये काम केलं आहे. या कार्यामुळे सुमारे चार हजार आदिवासींच्या जीवनात बदल घडून आला. या संस्थेसोबत जोडलेले आदिवासी मधसंकलक आज दरवर्षी सुमारे १०० मेट्रिक टन मध गोळा करतात आणि त्यातून जवळपास तीन कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवतात.

आदिवासी बांधव: या कार्याचा आधारस्तंभ

मधसंकलनाचं काम मुख्यत: आदिवासी समुदाय करतात- वर्धा जिल्ह्यात वनी गोंड, यवतमाळमध्ये हलबा, मेळघाटमध्ये कोरकू, मध्य प्रदेशात बैगा, तर गडचिरोलीत गोंड-माडिया. 

आदिवासी समाज मध गोळा करण्यासाठी काही पूर्वापार चालत आलेल्या पद्धती वापरत असे. उंचावरच्या पोळ्यांपर्यंत पोहोचता यावं यासाठी झाडांच्या फांद्या छाटल्या जात. कधीकधी झाडं पाडलीही जात. मधमाश्यांना पळवून लावण्यासाठी आग लावली जाई. त्यातून त्यांच्या संपूर्ण वसाहती नष्ट होत असत. या पद्धतींमुळे जंगलाचंही मोठं नुकसान होत असे. हे थांबवण्यासाठी डॉ. पालीवाल यांनी मधमाश्यांना इजा न करता सुरक्षितपणे मध गोळा करण्याचं एक विशेष साधन विकसित केलं. याशिवाय संकलकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि बॉम्बे डाईंग कापडापासून बनवलेला संरक्षक पोशाख असलेलं विशेष किट तयार केलं. या संपूर्ण तंत्रज्ञानाला त्यांनी ‘सेवाग्राम निसर्ग टेक्नॉलॉजी ऑफ वाइल्डबी मॅनेजमेंट (SNTWM)’ असं नाव दिलं. 

संकलकांकडून मध आला की लगेच दोन चाचण्या होतात: अनिलीन क्लोराईड चाचणी आणि ओलावा चाचणी. संकलकांकडून आजूबाजूच्या जंगलातील झाडांची माहितीही घेतली जाते, कारण त्यावरून मधाची उत्पत्ती आणि सत्यता सिद्ध होते. शुद्ध मध ओळखण्याची एक सोपी घरगुती कसोटी डॉ. पालीवाल सांगतात: एक चमचा मध तोंडात घ्या, तो तोंडात जरा फिरवा आणि मग गिळून टाका. थोड्या वेळाने घसा खवखवला किंवा खोकला आला, तर तो मध खऱ्या अर्थाने शुद्ध आहे.

dr gopal paliwal

पालीवाल यांनी आदिवासी बांधवांना मधसंकलनाच्या शास्त्रशुद्ध पद्धती शिकवल्या- स्टेनलेस स्टील ड्रममध्ये कच्चा मध ५२ अंश सेल्सिअसला गरम करणं, ४० मायक्रॉनच्या फिल्टरमधून तो गाळणं. केवळ मध गोळा करण्याच्या शास्त्रोक्त पद्धती शिकवून ते थांबले नाहीत. मध उत्पादन कसं वाढवायचं, मधाचं पॅकेजिंग, ब्रँडिंग, विक्री या संपूर्ण साखळीवर त्यांनी काम केलं. एक शाश्वत सामाजिक उद्योग (Social Enterprise) उभा केला. त्यातून आदिवासींना सन्मानाने उत्पन्न मिळतं आणि मधाचं संवर्धनही होतं. 

असं असलं तरी पालीवाल यांच्या बोलण्यात कुठेही उपकारकर्त्याची भाषा येत नाही. उलट ते म्हणतात, की मीच आदिवासी बांधवांकडून बरंच काही शिकलो आहे. जंगलाची लय तिथली माणसं बाहेरच्यांपेक्षा अधिक जाणतात. 

डॉ. पालीवाल यांच्या मते मधाची योग्य किंमत ५०० ते ६०० रुपये प्रति किलो असायला हवी आणि त्यात विक्रेत्यांसाठी २० टक्के नफ्याचा वाटाही असावा. कच्चा मध प्रक्रियेपूर्वी व्यवस्थित साठवून ठेवण्यासाठी किफायतशीर मधगृहाच्या संकल्पनेचाही ते पुरस्कार करत आले आहेत.

हेही वाचा - मधमाशा पाहाव्या पाळून..

भारतीय बाजारात दिसणाऱ्या बहुतेक नामांकित मध ब्रँड्समध्ये Apis mellifera म्हणजे युरोपियन मधमाशीचा मध असतो. या माश्यांना लाकडी खोक्यांत ठेवून एका शेतातून दुसऱ्या शेतात नेलं जातं. याला स्थलांतरित मधुपालन म्हणतात. या माशा ज्या शेतांवर राहतात, तिथे तणनाशकं आणि कीटकनाशकांची फवारणी सुरूच असते. फुलं नसलेल्या काळात त्यांना साखरेचं द्रावण (लिक्विड फीड) दिलं जातं. परिणामी, या मधाचे औषधी गुण रानमधाच्या तुलनेत खूपच कमी असतात. वन्य परिसरात, नैसर्गिक झाडांचा मकरंद घेऊन तयार झालेला मध हा खऱ्या अर्थाने अमृत असतो. हा फरक ग्राहकांनी समजून घेणं गरजेचं आहे, असं पालीवाल सांगतात.

dr gopal paliwal

आग्या मोह माशीचं नैसर्गिक चक्र

Apis dorsata म्हणजे आग्या मोह माशी सहसा जंगलातच राहते. आवळा, बेहडा, कडुनिंब, करंज, मोहा या औषधी वृक्षांचा मकरंद चाखत राहिल्यामुळे तिचा मध नैसर्गिकरित्या अत्यंत गुणकारी बनतो. मार्च ते जून या चार महिन्यांत या माशा पोळी बांधतात. पावसाळ्यात जंगलात शिरतात, पण पोळं बांधत नाहीत. पाऊस थांबला की तूर, कापूस, मोहरी, सूर्यफूल, कोथिंबीर, कांदा फुललेल्या शेतांकडे त्यांचा प्रवास सुरू होतो. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात त्या सूर्यफूल आणि रब्बी पिकांचा मकरंद घेतात. मार्चमध्ये पळस बहरला की पुन्हा जंगलाकडे परततात. हे त्यांचं नियमित वार्षिक चक्र आहे.

मधमाश्या नसतील तर शेती संकटात

मधमाश्या केवळ मध देतात असं नाही. त्या फुलांचं परागीभवन करतात आणि त्यामुळेच फळं, भाज्या, तेलबिया यांचं उत्पादन वाढतं. जंगल आणि शेती या दोन्हींचा समतोल टिकवण्यात मधमाश्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पण मधमाश्यांचे अधिवास नष्ट होत चालले आहेत. शिवाय तृणनाशक, कीटकनाशक औषधांचा वापर वाढलाय. त्यामुळे जंगली मधमाश्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. "२०१० सालानंतर यात अधिक वाढ झालीय," पालीवाल सांगतात, "पूर्वी शेतांमध्ये, माळरानांमध्ये परागीभवन करणार्या कीटकांची रेलचेल असायची. नाऊ मेनी फील्ड्स हॅव बिकम बायोलॉजिकली सायलेन्ट. विशिष्ट जातीच्या मधमाश्या विशिष्ट प्रकारची फुलं आणि विशिष्ट अधिवासाच्या आधाराने वाढतात. यातला एक घटक जरी कमकुवत झाला तरी अख्खी परिसंस्था कोलमडू शकते. मधमाशा नसतील तर पिकांचं उत्पादन ३० टक्क्यांपर्यंत घसरू शकतं." 

dr gopal paliwal

सध्या Apis florea ही छोट्या आकाराची मधमाशी शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. ती जंगलावर अवलंबून नसून शेत परिसर आणि उपनगरीय भागांत सहज राहते. मेथी, ओवा, कोथिंबीर या पिकांवर ती परागीभवनाचं काम चांगलं करते. ती कीटकनाशकांना तुलनेने अधिक ताकदीने तोंड देते. विशेष म्हणजे एका Apis florea वसाहतीतून नैसर्गिकरित्या पाच ते सहा नव्या वसाहती तयार होऊ शकतात. पण जंगलातून जनावरं चारत जाणारे लोक त्यांची पोळी मोडतात. यामुळे या बहुमूल्य वसाहती नष्ट होतात आणि मोठं नुकसान होतं.

दुर्लक्षित जाती, गंभीर संकट

भारतातील मधुपालन संशोधन आणि सरकारी धोरणं मुख्यत: Apis cerana आणि Apis mellifera या दोनच जातींभोवती फिरतात. खादी ग्रामोद्योग मंडळ, खादी विकास महामंडळ यांच्या योजनाही याच दोन जातींपुरत्या मर्यादित आहेत. Apis dorsata आणि Apis florea या महत्त्वाच्या जाती मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहतात. प्रत्येक मधमाशीची जात विशिष्ट वनस्पतींसोबत लाखो वर्षांत उत्क्रांत झाली आहे. या चारही जाती एकत्र मिळूनच जंगलातील अन्नसाखळी टिकवतात. आकडेवारी सांगते, की १९४२ च्या तुलनेत जगातील मधमाश्यांची एकूण संख्या ४५ टक्क्यांनी कमी झाली आहे. येत्या दहा वर्षांत ही घट आणखी वाढण्याचा अंदाज आहे आणि याचा थेट फटका शेती उत्पादनाला आणि अन्नसुरक्षेला बसणार आहे. हे धोक्याचं चित्र वेळीच ओळखणं आवश्यक आहे.

मधमाशीने दिली जगण्याची दृष्टी

"मधमाशी एक सामाजिक कीटक आहे. मधमाश्या परस्पर साहाय्याच्या भावनेने जगतात, एकत्र राहतात, संकटांना एकत्र सामोर्‍या जातात आणि सामूहिक कल्याणासाठी आयुष्य घालवतात. कदाचित माझं जीवनही त्यांच्यासारखंच बनलं आहे." - डॉ. पालीवाल यांचे हे शब्द केवळ त्यांच्या जीवनाचा नाही, तर एका संपूर्ण चळवळीचा सारांश सांगतात.

या कार्यात त्यांच्या पाठीशी सतत उभ्या राहिल्या त्यांच्या पत्नी डॉ. सुनीता पालीवाल. त्याही पीएचडीधारक असून संस्थेत मध गुणनियंत्रण तज्ज्ञ म्हणून काम करतात. मुकुंद उईके, मदन जांभूळकर, शशी जांभूळकर, रामप्रसाद ठाकरे, शशिकला बोलकर, सचिन खांदाटे आणि शेकडो आदिवासी संकलकांनी या कार्याला अमोल साथ दिली आहे. 

नाबार्ड (पुणे), पोलारिस फाउंडेशन (चेन्नई) आणि आयसीआयसीआय बँक (मुंबई) या संस्थांनी या मोहिमेला आर्थिक पाठबळ दिलं.

डॉ. गोपाल पालीवाल यांची कहाणी फक्त एका शास्त्रज्ञाची नाही, ती एका ध्येयवेड्या माणसाची कहाणी आहे, ज्याने करिअरच्या सोनेरी संधी नाकारून मधमाश्यांच्या संवर्धनासाठी आणि आदिवासींच्या उत्थानासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांचा संदेश स्पष्ट आहे — शेती टिकवायची असेल, पर्यावरण वाचवायचं असेल, तर मधमाश्यांना वाचवावंच लागेल. मधमाश्यांशिवाय शेती नाही, शेतीशिवाय जगण्याचा आधार नाही.

अनिकेत लिखार | 8698989383 | aniketplikhar@gmail.com

अनिकेत लिखार हे ग्रामीण आणि शेती क्षेत्रात रचनात्मक योगदान देणाऱ्या वासन संस्थेत काम करतात. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागातील गरीब शेतकरी, आदिवासी आणि महिलांचं जीवनमान उंचावणं हे 'वासन'चं ध्येय आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 12

Vijay Sidam27.06.26
छान अभ्यासपूर्ण माहिती व पालिवाल सरांचे या क्षेत्रातील मोलाचे योगदान जाणून घ्यायला मिळाले..

SUMANGALA GADPAYLE21.06.26
खुप छान माहिती आहे . गोपाल पालीवाल यांना पुढील प्रगती साठी खुप शुभेच्छा .

N I FDalvi21.06.26
Dr polwal cont no and postal adress my cont no ,8108061921 n Aniket likhar isdoing bestfor Adivasi wd b please tomeeting you sir nobel work pls call back

Mukesh Ratnakrrao Lutade21.06.26
अप्रतिम डॉक्टर गोपाल पालीवान यांना आम्ही जवळून ओळखतो आणि त्यांनी खरोखरच या क्षेत्रात खूप मोठं काम केलेले आहे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

Jadhav K M 21.06.26
खुप छान लिहिले आहे...माहिती पण महत्वाची आहे.... मधमाशी पालन हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय म्हणून विकसित करण्यास महाराष्ट्रात नक्कीच संधी आहे......

तुकाराम पांढरीपांडे21.06.26
अतिशय सविस्तर माहिती. डॅा. गोपाल व मी एमएससी व नंतर लगेच पिएचडीला नागपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात सोबत होतो. मी स्वतः हे मध गेले तीन, चार वर्षे वापरत आहे.

ravindranath mahajan21.06.26
Many, many thanks for such creative work. Your contribution to preserving nature and natural resources is awesome.

Dinesh Vaman Revankar21.06.26
Well done Sir, we r proud of you. Thanks

Dinesh Shinde21.06.26
मध माशी वाचवणे हे जगा मध्ये सर्वोत्तम काम . या मधमाशी वाचवण्यासाठी संपूर्ण जगाने पुढाकार घ्यावा त्यासाठी प्रयत्न व्हावे आम्ही शेतकरी तर प्रयत्न करणारच आणि मी तर करतोच .

श्रीकांत वसंत धामोरीकर 21.06.26
मध माशा व मध या संबंधीची सर्व समावेशक माहिती या लेखातून मिळते. मध माशा व त्यांचे परागीभवन यांचे शेतीसाठी असलेले महत्वाचे योगदान खरोखरच डोळे उघडणारे आहे.

राधाकिशन जाधव21.06.26
अतिशय उपयुक्त माहिती

अरुण कुलकर्णी 20.06.26
मधमाशां प्रमाणे अनेक जीव कळत नकळत मानवाला संदेश, शिकवण देत असतात. आम्ही कधीच त्याकडे लक्षपूर्वक पहात नाही. मुक प्राण्यांनी संकट प्रसंगी मानवाला मदत केल्याची उदाहरणे आहेत.

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results