ओशो सांगतात,
एका माणसाने एकदा झेन गुरूंना विचारलं, “हे तुमचं झेन फार अवघड असतं का समजायला?”
“नाही. अगदी सोप्पं आहे.” असं म्हणत झेन गुरूंनी एक दगड उचलला आणि म्हणाले, “असा विचार कर की आता आपण बसलेलो असताना अचानक झाडीतून वाघ आला, तर हा दगड उपयोगी पडेल की नाही आपल्याला?”
तो माणूस म्हणाला, “अर्थातच. आपण हा दगड मारून त्याला जायबंदी करू शकतो. किमान आपल्याला उठून पळायला, झाडावर चढायला वेळ तरी मिळेल दगड फेकल्यावर.”
गुरू म्हणाले, “म्हणजे दगड खूपच चांगला आहे म्हणायचा.”
त्या माणसाने मान डोलावली.
गुरू म्हणाले, “आता हाच दगड मी तुझ्या डोक्यात घातला तर?”
तो माणूस त्या कल्पनेने थरकापून 'अरे बापरे' म्हणाला आणि गुरू म्हणाले, “म्हणजे दगड वाईट आहे, असं म्हणायचं का?”
तो माणूस म्हणाला, “नाही. त्याचा उपयोग आपण कसा करतो, त्यावर तो चांगला की वाईट ते ठरेल. त्याचा अंगचा असा कोणताही गुण नाही काठिण्यापलीकडे.”
गुरू म्हणाले, “आपलं मन या दगडासारखं असतं. आपण वापरू तसं ते वापरता येतं. आता कळलं?”
तो माणूस म्हणाला, “कळलं. चांगल्या मनाने झेन आत्मसात करता येतं.”
गुरू म्हणाले, “नाही कळलं तुला.. काम नसताना दगड घेऊन फिरायचं नाही, एवढंच पुष्कळ.”