आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

कावळ्याबगळ्याची गोष्ट

  • महाश्वेतादेवी
  • 14.06.26
  • वाचनवेळ 19 मि.
kavala bagala story

चहाचा कप आणि पावाचा तुकडा खाली ठेवून मोहिनी म्हणाली, “कावळ्याबगळ्या ऐक, चहा ठेवलाय इथं. मी नंतर ऐकून घेणार नाही हं, तो गार झालाय वगैरे आणि हे बघ, त्यांनी त्यांची बंडी अन्‌‍ लुंगी धुण्याची गरज नाही, मी चांगला साबण लावून घासून धुवेन.”

ती बोलत होती आपल्या नवऱ्याशी, किती वर्षं झाली होती त्यांच्या लग्नाला ते तिला आठवतही नव्हतं. मोहिनी साधारण तीन वर्षांची होती, तेव्हा तिनं आपली मण्यांची माळ काढून सदानंदाच्या गळ्यात घातली होती. धालेश्वरी नदीकाठच्या उत्तरूनी जत्रेतल्या त्या प्रसंगाने बरीच खळबळ उडाली होती.

“बघा-बघा! आदल्या जन्मात ती नक्कीच त्याची बायको असली पाहिजे. एरवी कधी माळ काढायची झाली, तर नाही म्हणते; पण तिनं स्वत:च घातली हो माळ सदाच्या गळ्यात.”

“बघा तरी ते कसे अगदी जात आणि घराणं सगळ्या बाबतींत अनुरूप आहेत.” 

आठ वर्षांच्या सदानंदला मोठ्यांच्या बोलण्याचा अर्थ कळतही नव्हता. त्यानंही माळ काढली आणि परत मोहिनीच्या गळ्यात घातली. 

ते पाहून, म्हाताऱ्या बायकाही आश्चर्याने थबकल्या. 

“पाहिलंत ना! कलियुगात दैवी गोष्टी घडत नाहीत असं म्हणतात. ते जर खरं असेल, तर अशा शुभ प्रसंगाला असं...”

बायांच्या डोळ्यांत अगदी पाणी आलं. मोहिनीच्या आईला त्या म्हणाल्या, “मित्रांच्या घरच्या मुलीने बासूंच्या मुलाला वरमाला घातली. त्यांची वयंही जुळताहेत. तुम्ही किती भाग्यवान! तुमची मुलगी त्याच घरात पडणार खात्रीने.”

मुलाच्या आईने धाडकन प्रश्न केला, “मुलांच्या लहरींवरून आपण कधीपासून लग्नं ठरवायला लागलो?”

पण इतर बायांनी तिला ओरडून गप्प केलं. उत्तरूनी जत्रेत घडलेली ही घटना म्हणजे फक्त देवाचीच करणी असू शकते. कुणीतरी सूचना केली, “त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करा!” एकजण ओरडून म्हणाली, “खडीसाखरेचा खडा फोडा आणि त्यांना एकमेकाला भरवायला सांगा.” 

मोहिनीला आणि सदानंदला काहीच कळलं नाही. 

हेही वाचा - द्वंद्व

बऱ्याच काळानंतर, सदानंद जेव्हा वीस वर्षांचा झाला आणि जमीनदाराच्या इस्टेटीत, तागाच्या गारुड्या मोजण्याचं काम करू लागला, त्यावेळी त्यानं आईला सांगून टाकलं. “माझ्या लग्नाची काळजी कशाला करतेस? मी तर माझ्या स्वप्नातली वधू बघून ठेवली आहे, नाही का? मी तिला, माझ्या स्वप्नात पाहिलंय आणि तूही तुझ्या डोळ्यांनी तिला पाहिलंच आहेस. मी मोहिनीबद्दल बोलतोय.”

त्याच्या वडिलांची अजिबात हरकत नव्हती. मोहिनीचे वडील त्याच जमीनदाराच्या इस्टेटीवर दुसऱ्या ऑफिसात मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांना मीठ, रॉकेल, साखर आणि कपडे एवढं वगळता काहीच विकत घ्यायला लागत नव्हतं!

त्याची आई म्हणाली, “ते तिला चांगली सजवून-मढवून पाठवतील, अशी अपेक्षा करते. ती सुंदरच आहे, पण तिचं नाक जरा बसकंच आहे. उगाच इकडेतिकडे भटकण्यात ती वेळ घालवत नाही, वचावचा बोलत नाही, स्वयंपाक करता येतो तिला...”

आणि अशाप्रकारे त्यांचं लग्न पार पडलं. शेजारी-पाजारी म्हणाले, “वधू-वरांनी स्वत:च, स्वत:चं लग्न जमवलं होतं, हे लग्न होणारच होतं.”

मोहिनीला अजून आठवत होतं-भलं मोठं लाटणं आणि पोळपाट, भांडीकुंडी, कपडे, खीर, दही, मिठाई, फळफळावळ, भाज्या एवढं सगळं उचलायला दहापेक्षा जास्त माणसं लागली. 

जमीनदाराने तिच्या वडिलांकडे आणि सासरी, दोन्हीकडे मासे पाठवले, उत्तमोत्तम तंगइल साड्या आणि कुंकवाचा शिडकावा असलेली नाणी. 

आज, या आठवणी शिळ्या झाल्या होत्या. पोचे आलेल्या ॲल्युमिनियमच्या पेल्यातून चहा पिता पिता मोहिनी स्वत:शीच म्हणाली, “पाण्याचा पेलासुद्धा उचलताना माझा हात किती दुखायचा! प्रत्येक पेला शुद्ध काश्याचा होता. आता असले पेले असतात का कुणाकडे?”

कुणी जर तिला विचारलं, “तू कुणाशी बोलते आहेस?” 

“कावळ्याबगळ्याशी.”

नवराबायकोतलं संभाषण सोळा वर्षांपूर्वीच थांबलं होतं. ते एकमेकांशी अदृश्य अशा कावळ्याबगळ्याच्या माध्यमातून बोलायचे.

संभाषण असं संपलंही नसतं. त्यांच्या मुलाने घर सोडलं आणि या दु:खामुळे मोहिनीला स्वत:शीच बडबडण्याची सवय लागली. त्यामुळे भांडणं उद्भवली. बरीच दु:ख, बरीच भांडणं.

सदानंदने सुचवलं, “चल, मी तुला डॉक्टरकडे नेतो. तू फारच बडबड करायला लागलीयेस. इतकी की, लोकांना वाटतं तुला वेडच लागलंय.”

मोहिनी रागाने भरभरली होती.

सगळी चूक तिची एकटीचीच होती का? भारत-पाकिस्तान घडलं तेव्हा तिनं त्याला घर सोडायला सांगितलं होतं का? त्याचा तो तथाकथित जबाबदार पुतण्या, त्याला मालमत्तेच्या विक्रीचं सगळं तिनं हाताळायला सांगितलं होतं का? कितीतरी लोकांचं या कॉलनीत पुनर्वसन झालं होतं. त्यांची आयुष्य सुधारली, पण मोहिनीच्या आयुष्याचं काय? आणि त्यांची मुलं घर सोडून का गेली होती? तो या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार होता का?

सदानंदने मान खाली घातली.

त्याच्या पुतण्याने मालमत्ता विकून टाकली होती. त्याच्या सल्ल्यावरून सदानंद धंद्यात पडला होता. आता त्याच्या पुतण्याचं राणाघाटला स्वत:चं घर होतं, तर सदानंद अजूनही धुबुलियापलीकडच्या एका कॉलनीत राहात होता.

शाळेतलं शिक्षण पूर्ण होण्याआधीच मुलांना नोकऱ्या मिळाल्या होत्या आणि ती घर सोडून गेली होती. मोठा मुलगा तागाच्या गिरणीत कामाला होता आणि चांगलं कमावत होता. बायको, मुलगी, मुलगा आणि नईहाटीतलं घर.

धाकटा मुलगा गुंडच होता. एकेकाळी तो बॉम्ब विकून पैसे मिळवायचा. आपल्या वडिलांना सांगायचा की, तो ‌‘बिझिनेस' करतोय.

ट्रान्झिस्टर, सदानंदचं घड्याळ आणि मोहिनीची कर्णफुलं घेऊन तो मुंबईला पळाला. तिथंही तो ‌‘बिझिनेस'मध्येच होता. स्थानिक मुलीशी त्यानं लग्न केलं होतं. एकदा, आपल्या आईवडिलांना त्याने थोडे पैसेही पाठवले.

धाकटा मोहिनीला जीव की, प्राण होता. दरदिवशी, सदानंद केष्टोनगरला बसने जायचा. आजही तो जात होता. कोठीबाहेर बसून तो फॉर्म भरून द्यायचा आणि एखादा अडाणी अशील भेटलाच, तर मालमत्तेच्या वादाची प्रकरणं घ्यायचा.

वडील बाहेर असताना, मुलगा आईजवळ आपल्या स्वप्नांबद्दल बोलत बसायचा. त्याला कुठला असा हलकासलका धंदा नव्हता करायचा. वडिलांसारखं तो घरी परतताना शेवग्याच्या शेंगा घेऊन येणार नव्हता. बाबांना एखादं-दुसरं अशील मिळवणं जमायचं, पण त्यांनी जरी केस जिंकली तरीसुद्धा, त्यांना काय मिळायचं? जास्तीत जास्त तर टोपलीभर चिंच, नाहीतर थोडाफार गूळ.

हेही वाचा - पर्रा

“आणि तू कशाप्रकारचा धंदा करणार रे?”

“गावठी बंगाली बोलू नकोस हां.”

“का? मातृभाषा म्हणजे कशी आईच्या दुधासारखी असते.”

किती विचित्र! किती विचित्र! मोहिनीने जी भावना बोलून दाखवली, तीच आता सरकारतर्फे सगळीकडे ओरडून सांगितली जातेय की, मातृभाषा ही आईच्या दुधाप्रमाणे महत्त्वाची आहे म्हणून.

धाकट्या मुलाचं नाव ठेवलं होतं मनोरंजन. पण अलीकडे बहुतेक त्याला मनोजकुमारच म्हणायचे. मोठा मुलगा, सुखरंजन, आता नुसताच रंजन होता.

धाकटा म्हणायचा, “मी मोपेड चालवणार, गॉगल्स घालणार; माझ्या पाकिटातून झटक्यात हजार रुपये काढणार आणि तुझ्या हातात ठेवणार, काय!”

“करच तू असं. आम्ही या घराची दुरुस्ती करू. तुझ्या वडिलांवरही खूप ताण येतोय, किती वर्षं नुसतं राबताहेत. घरात मात्र पूर्वीसारखं नाही...मला काहीच जमेनासं झालंय ना, सॉ-मिलमधनं कोळशाची पावडर जमा करणं आणि नागूल बनवणं.” 

“मग तू करतेस का तरीही?”

“मला काही घेता यावं म्हणून. मीठ, तेल...”

पण मुडागच्छमधल्या एका डीलरने मनोरंजन ऊर्फ डॅनीला त्याची तिजोरी फोडताना ओळखलं. न डगमगता, तो मेंढरांच्या कळपावर बॉम्ब फेकून तिथून पळाला. काही दिवस इथं तिथं लपून राहिला आणि अखेरीस एके रात्री घरी आला. अन्‌‍ सकाळी निघूनही गेला होता, ट्रान्झिस्टर, वडिलांचं घड्याळ आणि आईची कर्णफुलं यांच्यासकट.

जेव्हा सदानंद पोलिसांकडे मुलाची केस घेऊन गेला, तेव्हा त्याला लांबलचक बोलणी ऐकून घ्यावी लागली.

“काय हे! तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाचा मुलगा, एक गुंड! तुम्ही त्याला चांगली शिस्त लावायला हवी होती...!”

सदानंद घरी आला आणि शांतपणे बसून राहिला. 

आणि मोहिनीने आपल्या रडण्याने शेजाऱ्यांचीही झोप उडवली होती.

“जा, कलकत्त्याला जा. त्याचा फोटो छापा पेपरात. तुमचा मुलगा निघून गेला, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही का?”

कसंनुसं हसून सदानंद म्हणाला, “त्याने त्याचा मार्ग निवडला आहे. मी त्यात बदल करू शकत नाही. आता तू घर जरा तपास आणि बघ त्याने काही चोरीचा माल ठेवलाय का मागे. आपण त्या वस्तू झाडाजवळच्या तळ्यात फेकून देऊ या.”

“तुम्ही त्याला शोधणार नाही का?”

“त्यात काही अर्थ नाही.”

“तुम्ही कलकत्त्याला जाणार, की नाही?”

“कसा जाणार मी? तुला समजत नाही का, तो जर सापडला, तर तो पोलिसांच्या हाती जाईल. त्याला ठारही मारतील. जिथं आहे, तिथं त्याला राहू दे.”

“माझ्या हृदयाला भेगा पडताहेत हो.”

तेव्हापासून मोहिनी अखंड स्वत:शीच बोलत आली आहे. तिचा मुलगा आपल्या स्वप्नात तिला वाटेकरी करून घ्यायचा! भात आणि मसालेदार आमटीच्या जेवणानंतर, मायलेक तासन्‌‍तास बोलत बसायचे. मोहिनीला माहीत होतं, त्या नुसत्याच गप्पा आहेत. पण कल्पनेनंच तिला बरं वाटायचं की, घर दुरुस्त झालंय, सदानंद आणि मोहिनीला फार कष्ट करावे नाही लागत, घरात भाताची साठवण आहे, शिवाय तेल, मसाले, मीठ, घासलेट.

मुलगा आणि ही स्वप्नं दोघेही हरवले होते आता.

तिची वेदना पाहून, सदानंद म्हणाला, “लोकांनी आपल्याला वेडं समजावं असं वाटतंय का तुला? चल, तुला मी डॉक्टरकडे नेतो.”

त्यानंतर अर्धा तासभर मोहिनी आवाजाच्या वरच्या पट्टीत जात्रामधल्या ट्रॅजिडीक्वीन सारखी ओरडत होती.

“मी काय भारत-पाकिस्तानसाठी जबाबदार आहे का? मी तुम्हाला आपली जन्मभूमी सोडायला सांगितलं होतं का? तुम्ही सगळं तुमच्या पुतण्याच्या हवाली करून निघून का आलात? आणि असं होऊनही, बाकी प्रत्येकाचं आयुष्य व्यवस्थित आहे आणि मीच तेवढी अजून अशा अवस्थेत का म्हणून आहे? स्वर्गात जुळलेलं लग्न म्हणे! आपण इथे आलो तेव्हा आपल्या सगळ्या मौल्यवान चीजवस्तू मागे ठेवून आलो आणि तुम्ही मला वेडी ठरवता! खूप बोललं म्हणजे वेड लागलं असं होतं का?”

सदानंदने विनवण्या केल्या, “मी आता याहून जास्त सहन नाही करू शकत. माझ्या आता आणखी चिंध्या करू नकोस. बोलायला आता तुझ्याशिवाय कुणीच नाही आणि तूही मला खोडून काढते आहेस!”

मोहिनी म्हणाली होती, “ठीक आहे! माझे शब्द एवढे टोचत असतील, तर मी बोलणारच नाही.” 

हेही वाचा - जहाजवाली टाकी

त्या रात्री मोहिनी म्हणाली, “मी फक्त कावळ्याबगळ्याशी बोलतेय, दुसऱ्या कुणाशी नाही. आपल्याकडचं तेल संपलंय आणि कंदीलही दुरुस्त करायचाय.”

सदानंदाने मोठ्या काकुळतीला येऊन विचारलं होतं, “उत्तरूनीच्या जत्रेत काय कावळ्याबगळ्याने मला माळ घातली होती का? काही दिवसांपूर्वी, मी आजारी होतो तेव्हा, कावळ्याबगळ्याने जाऊन डॉक्टरला आणले होते का?”

मोहिनीने दीर्घ सुस्कारा सोडला आणि उत्तरली, “मी कावळ्याबगळ्यालाच सांगणार, तोच सर्वांत चांगला मार्ग आहे. एकदा तोंड उघडलं की, मला बोलणं थांबवता येत नाही. माझं आयुष्य पूर्णपणे कोलमडून पडलंय. आता दुसरं काय आहे बोलायला?” 

त्या दिवसापासून मोहिनी गप्पच झाली. सदानंदलाही या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागलं. सोळा वर्षं अशीच गेली. एकेदिवशी संध्याकाळी सदानंद घरी आला आणि म्हणाला, “कावळ्याबगळ्या, तांदळाचे दर खूप वेगाने वाढताहेत. आज क्लबमधल्या बिरेनने मला विचारलं, तुझ्या एवढ्या जमिनीचं तू काय करणार? तू त्याला काही हिस्सा विकत का नाहीस? ”

“कावळ्याबगळ्याला माहीत नाही का, ते बेकायदा आहे म्हणून?”

“कावळ्याबगळ्याला हेसुद्धा माहीत आहे का की, एकदा बिरेनची नजर पडली की, तो जमीन या ना त्या मार्गाने हडप करणारच. त्याच्यासारख्यांचं राज्य आहे आजकाल. आपणही मग काही मिळवू की, नाही. तो जे देऊ करेल ते आपण मान्य करू.” 

“कावळ्याबगळ्याला वाटेल ते त्याने करावं. तिथल्या घरी आपण राजासारखे राहिलो आणि सगळं काही हरवून बसलो. मी तेव्हा काही म्हटलं का?”

सदानंद म्हणू शकला असता, “तिथल्या घरी आपल्याकडे वीस बिघे जमीन होती, चार खोल्यांचं घर होतं, एक नांगर, एक बैल आणि एक गाय-इतरांकडे असायचं तसं. पण ते ‌‘राजासारखं' राहणं मात्र आठवत नाहीये.” 

त्याऐवजी, तो हळुवार शब्दांत म्हणाला, “कावळ्याबगळ्या, आता मी ७४ वर्षांचा आहे. अशी किती राहिलीत आणखी? थोडा पैसा मिळाला आपल्याला तर आपल्या गरजा भागतील. आपण जर घर दुरुस्त करू शकलो, तर एखादी खोली भाड्याने देता येईल. त्यांनी जर जमीन हडप केली, तर पोलीस त्यांना विचारायला जाणार नाहीत.”

मोहिनी म्हणाली, “कावळ्याबगळ्या, पोस्ट ऑफिसात पैसे ठेवताना, माझीही सही हवी आहे.” 

“ठीक आहे.”

बिरू चॅटर्जी मोपेडवरून आला. जमीन जवळजवळ हमरस्त्यालगतच होती. बिरूला तिथं दुकानं उभारून भाड्याने देता आली असती. त्याच्या वडिलांनी आणि त्यानं अशाच मार्गानं बरीच जमीन हस्तगत केली होती. हे तर वयस्क जोडपं होतं, त्यांच्याकडे फारसं व्यवहारचातुर्य नव्हतं, त्यांचे मुलगेही दूर होते.

“काका! मला सांगा, तुम्हाला किती पाहिजेत?”

“तुलाच सध्याचा दर माहीत!”

मोहिनी म्हणाली, “का म्हणून? तुम्ही विकता, तोच दर द्या. आम्हाला पाल १६,०००द्यायला तयार आहे.”

बिरूने गडगडणारं हास्य केलं. “कावळ्याबगळ्यानं सांगितलं, काय तुम्हाला?” त्याने थट्टा केली.

मोहिनीने मान हलवली. 

“कावळाबगळा ही खासगी बाब झाली. तिचा इतर कुणाशी संबंध नाही. तुला जर पैसे द्यायचे नसतील, तर बिरू आम्हां दोघांनाही ठार मार आणि घे सगळी जमीन ताब्यात. तुला काहीच खर्च करावा लागणार नाही.”

“मला असं म्हणायचं नव्हतं, काकी. तुम्ही दोघेही मला काका-काकूंसारखे. तुम्ही दोघांनी विचार करा, एवढीच विनंती. मला तेवढं परवडणार नाही.”

बिरूने ५०००रुपयांची तयारी ठेवली होती. पण मोहिनीच्या आग्रहापायी, तो शेवटी १०,००१ रुपयांना तयार झाला. या खेळात त्याने त्यांना १४००० रुपयांना फसवलं होतं. तरीही त्याला वाटत होतं, की आपल्यावरच यांनी मात केली.

ते पोस्ट ऑफिसात पैसे ठेवायला गेले. जॉईंटली सह्या केल्या. पोस्ट मास्तरशी त्यांची चांगली ओळख होती.

अचानक मोहिनीने भलतीच मागणी पुढे केली. 

“मी कावळ्याबगळ्याला विचारतेय, घरदुरुस्तीचं काय?”

“त्याला फार पैसा लागेल. कावळ्याबगळ्याला माहीत नाही का हे?”

“मी माहिती काढलीये, त्यासाठी १,५००रुपये लागतील.”

“कावळ्याबगळ्याने त्यापुढचा विचार केलाय का?”

“कावळ्याबगळ्या, मी नेहमीच नेटक्या घरात राहण्याचं स्वप्न पाहिलंय. मला हवा नवा पलंग, प्यायच्या पाण्यासाठी काश्याचे पेले. माझ्या या इच्छा जर अपुऱ्या राहिल्या, तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मला ते नकोय.”

“कावळ्याबगळ्याला हे कुणी सांगितलंय?”

“कावळाबगळा काय कधी हरिसभेला गेला नाही का? तिथंच त्यानं ते ऐकलं असेल. बिरेनच्या वडिलांना रेडिओचं दुकान हवं होतं. बिरेननेही इच्छा पूर्ण केली.”

“कावळ्याबगळ्या, मी कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही.”

“ऐक रे, कावळ्याबगळ्या, घराची दुरुस्ती झाल्यावर मी नव्या देवघरात लक्ष्मीची मूर्ती बसवणार. मुलांना कधीही...”

“त्रास सहन करावा लागणार नाही!”

“कावळ्याबगळ्या, मलांडीच्या घरावरून उद्या केष्टोनगरला जा. मलांडी अगदी कुशल कारागीर आहे.”

हेही वाचा - दोन सरहद्द कथा

त्या भागातल्या लोकांना हे कावळ्याबगळ्या प्रकरण चांगलंच माहीत होतं. ते बऱ्याच काळापासून तिथं राहात होते. नवीन आलेल्यांनी आणखी दूरवर आपली घरं बांधली होती, तर मूळच्या कॉलनीतले लोक होते तिथंच राहिले होते.

मलांडी आला.

“तुम्हाला हे घर पाडून परत नव्याने बांधायचंय का?”

“तुला वाटतं का ते मला परवडेल म्हणून?”

“मीच बांधलं आहे हे घर. बघ, मी उभारलेल्या मातीच्या भिंती तशाच भक्कम आहेत. इथं तर मातीच्या भिंती जास्त घट्ट आणि भक्कम बनल्या आहेत काळाच्या ओघात.”

“मला टिनच्या जुन्या शीट हव्यात.”

“जुनं टीनसुद्धा...”

“आणि यावेळी मला व्हरांडा थोडा वाढवायचाय.”

“मुलं येणारेत का घरी?”

मोहिनी हसली. ती म्हणाली, “कावळाबगळा अंडी घालतात, पिल्लांना वाढवतात. सगळ्या पक्ष्यांचं असंच असतं. एकदा का त्यांनी डोळे उघडले आणि ती उडायला शिकली की, मग स्वत:ला हवं तसं ती करतात, मलांडी. ती परत आपल्या घरट्याकडे फिरकत नाहीत.”

या म्हाताऱ्यांना केवळ स्वत:साठीच घराची दुरुस्ती कशाला हवी आहे, मलांडीला आश्चर्य वाटलं. यात काहीच व्यावहारिक नाही. असा किती काळ त्यांना याचा आनंद लुटता येणार आहे? 

मोहिनीला जणू त्याचे विचार समजले आणि ती म्हणाली, “मनूचे वडील एवढ्या वर्षांमध्ये किती कष्टांमधून गेले आहेत. तुम्ही आम्हाला गरीब लोक म्हणून ओळखता. पण एकेकाळी हा मनुष्य काथ्याच्या बिछान्यावर झोपत होता, हिवाळ्यात लोकरी कोट अन्‌‍ शाल वापरत होता...ते असो, एकदा नीट बघून घे आणि सांग, तुला काय हवं ते.”

“तुम्हाला जमिनीचे किती मिळाले?”

“अं ऽ, लाखभर मिळाले!”

“तुम्ही मला किती द्याल?”

“त्यांना घरी येऊ दे. बोल आणि ठरव.”

मलांडीने उसासा टाकला.

“अवतीभवती पडलेल्या वस्तूंवरून वाटतं, डोकं जागेवर असलेला कोणीही चोर तुमच्या किंवा माझ्या घरात घुसण्याचा विचारसुद्धा करणार नाही. आजकाल कितीतरी लोक घरं बांधतात. पण ते बांधतात ती असतात कोंदट खुराडी. मला काही काम मिळत नाही. बिरू-बाबू आणि त्यांच्या मित्रांनी माझ्याकडून त्यांचं क्लबहाऊस बांधून घेतलं, पण त्यांनी मला दिलेली रक्कम...मी तुमचं घर अगदी नव्यासारखं करून देईन...”

मलांडी इकडे-तिकडे लगबग करत होता. मोहिनी त्याच्यामागे लागून घाई करत होती. सदानंद आता लॉटरी विक्री केंद्रावर नोकरी करत होता. सध्या लॉटरी या प्रकाराची ‌‘चलती' होती. आता मोहिनीच्या संवादांनी वेगळा नूर धारण केला होता. 

“हे बघ, कावळाबगळ्या! किमती खाली असतानाच तांदूळ घेतला, तर काहीही न करता तो नंतर नफ्यात विकून टाकता येतो.”

“ऐक, कावळ्याबगळ्या, चोर जर तांदूळ चोरायला घरात शिरले, तर या वयात त्यांना मी पळवून लावू शकणार नाही.”

“मग कावळ्याबगळा स्टेशनरीचं दुकान का टाकत नाहीत? या वयात केष्टोनगरपर्यंत जाण्याची गरजच काय?”

“मी विचार करेन यावर, कावळ्याबगळ्या.”

बिरूचं दुकान ताबडतोब सुरू झालं. ते उघडलं त्या दिवशी सदानंदाच्या घरीही मिठाईचा बॉक्स आला. दुकानाचं नाव होतं लाली. दिवसभर रेडिओ दुरुस्ती चालायची आणि बांगलादेशी टीव्हीचे कार्यक्रम बघायला लोक गर्दी करायचे.

हेही वाचा - काळोखाच्या लेकी

घराची दुरुस्ती हळूहळू सुरू झाली. मलांडीने आणखी दोघांनाही बरोबर घेतलं. ताजमहाल बांधतोय अशा पद्धतीनं मन लावून त्यांचं काम चालू होतं.

१५०० रुपये पुरेसे नव्हते. त्याचे २००० झाले. पण व्हरांडा मोठा करण्यात आला. भिंतींना चुन्याचा गिलावा करण्यात आला आणि काही जुने टिनचे पत्रे मिळवणंही मलांडीने जमवलं.

अंगणात तुळशीवृंदावन होतं. 

प्रथमच मोहिनीला आपलं स्वप्न साकार झालं असं वाटलं. ती हळुवारपणे म्हणाली, कावळ्याबगल्या, एप्रिल-मे येऊ दे, मी तुळस लावीन. व्हरांड्यालगत मी लावेन जास्वंद, झेंडू, पूजेसाठी दुसऱ्यांच्या घरची फुलं कशाला आणायची?”

सदानंद मंद हसला.

घर नव्याने लावल्यावर, मोहिनीचं रूपांतर जणू सर्वशक्तिमान देवीत झालं. अतीव दयाभावाने ती म्हणाली, “कावळ्याबगळ्याकडून त्याला खात्री मिळू दे की, आयुष्यातले कष्ट फार काळ राहणार नाहीत. ”

“कावळ्याबगळ्याला काही सांगायचंय का?”

“माझं ऐकून ठेव, कावळ्याबगळ्या. हे खडतर जीवन फारकाळ असं नाही राहणार.”

तुळशीवृंदावन बांधता बांधता मलांडीच्या मनात प्रश्न उभा राहिला, हे दोघे म्हातारा-म्हातारी थेट परस्परांशी बोलत का नाहीत?”

घर दुरुस्त करण्याच्या क्षमतेमुळे मोहिनीमध्ये एकतऱ्हेचा अवास्तव आत्मविश्वास जागा झाला होता. घर आता नव्यासारखंच झालं होतं. म्हणजे आता सदानंदाला घराच्या जवळपास नोकरी शोधता आली असती, मग ती केवळ १०० रुपयांची का असेना. कशाला या वयात केष्टोनगरपर्यंत जायचं? वाटेवरून जाताना बस उडत असते नुसती! त्याची हाडं मोडतील एखादवेळेस. अगदी हाडकुळा झाला होता तो अलीकडे.

बिरू मुख्य घासलेट डिलर आणि रेशन दुकानदार होता. त्याशिवाय, पंचायत प्रमुखावरही त्याचा प्रभाव पडायचा.

मोहिनी त्याच्याकडे गेली.

“बिरू! धन्यवाद, माझं घर नीट झालं. आता, गळतीची भीती नाही की, साप येण्याची पण. आता...”

“हं, काय?”

“मनूच्या बाबांसाठी तुम्ही नोकरी मिळवून देऊ शकलात, तर तुमच्या एखाद्या दुकानातसुद्धा...

“तुम्ही मागायचं फक्त.”

“मागतेच आहे मी!”

“काकांच्या या वयात...म्हणजे कदाचित त्यांना जमेलही. त्यांना लालीमध्ये बसू द्या. मी लॉटरीची तिकिटं विकायला सुरुवात करतोच आहे. ‌‘लाली लॉटरी' पण काकी, तुम्हाला जर हे हवं असेल, तर थोडा खर्च करावा लागेल.”

“कुठून आणू मी, तो पैसा आता बिरू?”

“का? पोस्ट ऑफिसमधल्या तुमच्या गंगाजळीचं काय?”

“ओ, त्याबद्दल!”

“मरताना काय तुम्ही तो बरोबर घेऊन जाणार आहात का?”

बिरू हसला, त्या म्हाताऱ्याला करू दे जा-ये, पार केष्टोनगरचा प्रवास करू दे त्याला. तो मेला, की त्याची विधवा असहाय्य होणारच आहे. मग त्याला...

मोहिनीसुद्धा हसली.

“नाही बिरू! मी तो पैसा बरोबर घेऊन जाणार नाहीये आणि तूही घेऊन जाऊ शकणार नाहीस. बघ, तुला काही करता आलं तर.”

“प्रयत्न करतो. वचन मात्र देऊ शकणार नाही. अनेक तरुण बेकार असताना म्हाताऱ्यांना नोकरी मिळणं सोपं नाही म्हटलं. मी या अनेक तरुणांना काम मिळवून दिलंय. माझ्या या धंद्यावरच ते जगतात.”

“ठीक आहे, बिरू, मी निघते.”

त्यादिवशी संध्याकाळी, मोहिनीने आल्याचा चहा आणि थोडे मुरमुरे सदानंदसमोर ठेवले आणि त्याला म्हणाली, “कावळ्याबगळ्या गरम असतानाच पिऊन घे. शिवाय आता केष्टोनगरला जाणं बंद.”

सदानंद काहीच बोलला नाही. चहाचे घुटके घेत राहिला शांतपणे. मग म्हणाला, “ठीक आहे. कावळ्याबगळ्याला कळू दे की, मी पुढल्या महिन्यापासून केष्टोनगरला जाणार नाही. कंपनीने सांगितलं आहे की, मला आठवड्यातून फक्त एकदा तिकिटं आणायला जावं लागेल. ते म्हणाले की, मी दोनदा ५००० रुपयांची आणि २००० रुपयांची तिकिटं विकलीत. म्हणून मग मला आता ती घरूनच विकता येतील.”

मोहिनी चकितच झाली. तिच्या इच्छा खरोखरच पुऱ्या होत होत्या का?

कावळ्याबगळ्याने आता या बुधवारीच नवीन देवघर आणायला हवं.

बुधवारी नवीन देवघर आलं. लक्ष्मीची मूर्ती बारोदो जत्रेतून आणलीच होती. लाकडी घुबड, तिच्या सासूच्या पायांचे ठसे, सर्व काही ठाकठीक बसवण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदाच मोहिनी कसर लागलेली टसरची साडी नेसली. शेजाऱ्यांना याप्रसंगी बोलावण्यात आलं. ‌‘मी, नव्या देवघरात लक्ष्मीच्या मूर्ती स्थापना करतेय. कृपया यावे. गांगुलीची सून नैवेद्य करेल”, ती म्हणाली.

तिच्या नव्याने दुरुस्त झालेल्या घराचा हेवा करणारे शेजारी म्हणाले, “आम्ही नक्की येऊ बरं.”

हेही वाचा - आईची आई

सदानंद गुरुवारी कामावर गेला नाही.

“मी कावळ्याबगळ्याला विचारतेय, बरं वाटतंय ना त्याला?”

“मला कसंतरीच होतंय कावळ्याबगळ्या.”

मोहिनीने आपला हात त्याच्या कपाळावर ठेवला. ताप तर नव्हता. 

“कावळ्याबगळ्या, आराम करू दे त्यांना आजच्या दिवस. उद्या आम्ही डॉक्टरकडे जाऊ.”

“कावळ्याबगळ्या, डॉक्टरला दाखवण्याची काय गरज?”

“पडू दे त्यांना शांतपणे, कावळ्याबगळ्या. ते कधी आराम करतच नाहीत. वय होत चाललं आता त्यांचंही अखेरीस.”

कावळ्याबगळ्यांनो भलं होवो तुमचं. आता हे घर प्रसिद्ध बनलंय कावळ्याबगळ्याचं घर म्हणून. दोघांचं जेवणही आता इथंच होतं असं दिसतंय.

“मी कावळ्याबगळ्याला दिवसातून लाखवेळा तरी हाक मारते. पण जेवणाचं म्हणाल, तर मूठभर तांदूळ असतात फक्त.”

कावळ्याबगळ्या जाऊन पूजेच्या तयारीला लाग. 

पूजाही छानच झाली. स्वस्तातल्या अगरबत्तीच्या वासाने वेढलेली आणि लामणदिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेली लक्ष्मीची मूर्ती खरोखरच तेजस्वी दिसत होती. 

गांगुलींची सून म्हणाली, “मावशी, तुम्ही आता वीजपण घेऊन टाका.”

“ते फार खर्चिक आहे.”

“खर्चिक? का? तुमच्या घरासमोर तर आला आहे विजेचा खांब. तुम्हाला फक्त तिथून वायर घ्यावी लागेल. 

मोठ्या गांगुलीबाईंनी सूचना केली, पूजेसाठी तुम्ही आता नवीन भांडीही घ्या. तुम्ही तुमची जमीन विकलीये, घरदुरुस्ती केलीये, थोडा पैसा बाजूला टाकलाय, आता तुम्ही लक्ष्मीची पूजा अशा हलक्यासलक्या उपकरणांचा वापर करून नाही करू शकत. मी स्वत:ही काही स्टेनलेस स्टीलची भांडी विकत घेतलीत.

मनोरंजनच्या बालमित्राच्या आईने टिप्पणी केली, हे फारच छान. म्हणतात ते खरंच आहे. ‌‘मन चंगा, तो काठ में गंगा.”

मोहिनी थोडं हसली आणि म्हणाली, “मला जसं जमेल तसं बघते, दीदी.”

सदानंदने दुरूनच पूजा न्याहाळली, प्रसाद खाल्ला. रात्री तो म्हणाला, “कावळ्याबगळ्या, खिचडी चांगली होती. पूर्वी तिथल्या घरी बनवायचो आपण तशी. तिने ती छानच केली होती.”

मोहिनी म्हणाली, “अरे कावळ्याबगळ्या, एकाला सांग आता झोप म्हणून. मला झोप येतेय. साप चावल्याप्रमाणे माझं शरीर ताठर बनलंय.”

“झोपू दे तिला, मग.”

मोहिनीला गाढ झोप लागली. 

अगदी गाढ. 

बेहुलाला लग्नाच्या रात्री लागली होती तशी गाढ झोप...लोखंडी कड्या-कुलपातल्या त्या खोलीवर पहारा देताना झोपली होती ती. झोप लागली तेव्हा तिला बेहुलाची आठवण का बरं झाली अचानक?

बेहुला केव्हा जागी झाली?

कण्हण्याच्या आवाजाने मोहिनीला जाग आली. मच्छरदाणी बाजूला सारून, घाईगर्दीने तिनं दिवा पेटवला. सदानंद, छातीवर हात धरून, वेदनेनं विव्हळत होता. कावळ्यांची कावकाव नुकतीच सुरू झाली होती. अजून पहाट व्हायची होती.

अस्वस्थ आणि भांबावल्या अवस्थेत, मोहिनीने विचारलं, “मी कावळ्याबगळ्याला विचारतेय, कुठं दुखतंय? का ते विव्हळताहेत एवढं?”

तिनं दार उघडलं आणि लालीच्या वॉचमनला हाक मारली. मग ती डॉक्टरकडे धावली. लवकर या, कृपा करा. त्यांना काय झालंय, मला तर कळतच नाहीये.

डॉक्टर पोहोचेपर्यंत, शेजारीपाजारी तिथे जमले होते. मोहिनीने विनंती केली, “त्यांना नीट तपासा, काय बिघडलंय त्यांचं, नीट बघा.”

हेही वाचा - एका शस्त्रडिझायनरचा मृत्यू

“मग ती त्याच्या अंगावर झुकली आणि म्हणाली, “मी कावळ्याबगळ्याशी बोलत नाहीये, मी तुमच्याशी बोलतेय. ऐकू येतंय का माझं बोलणं? तुम्ही बोलत का नाही? कुणाला शोधताय तुम्ही?”

डॉक्टर म्हणाला, “जरा बाजूला व्हा. मला बघू द्या.”

मोहिनी तिथं उभी होती, दु:खाने भरभरत, पदराचा बोळा तोंडात खुपसून. 

“हा जबरदस्त हार्टॲटॅक आहे...”

“कुणाबद्दल बोलताय तुम्ही, डॉक्टर?”

“त्यांचं ब्लडप्रेशर तपासलं नव्हतं का?”

“एकदाच.”

“डॉक्टर उभा राहिला आणि आजूबाजूला बघू लागला. मग म्हणाला, कुणाला तरी माझ्याबरोबर यावं लागेल.”

“का?”

“मी सर्टिफिकेट लिहून देईन. काल रात्री काय खाल्लं त्यांनी?”

“प्रसाद...”

डॉक्टरनं मान हलवली.

“रक्तदाब अचानकपणे वाढला असावा किंवा कदाचित तो हळूहळू वाढत गेला असावा...”

“ते गेले?”

प्रत्येकाला धक्काच बसला.

गांगुलीची बायको म्हणाली, “ते खरंच भाग्यवान. काहीच त्रास झाला नाही त्यांना, त्यांनाही काही त्रास दिला नाही, शांतपणे गेले अगदी.”

मोहिनी जमिनीवर कोसळली, जोरजोरात रडायला लागली.

“अरेरे, मी का बरं मोडला नियम? त्यांच्याशी कावळ्याबगळ्यामार्फत बोलायचं का विसरले मी? मुळात मी तसं बोलायला सुरुवात तरी का केली? कावळ्याबगळ्या! तुम्ही अजून तसेच असाल, ओरडत असाल. पण ते तर गेलेत आणि मला एकटीला मागं ठेवलंय त्यांनी. तुमच्यामार्फत आता मी कुणाशी बोलू? सांगाल मला?”

प्रत्येकाला वाटलं की, मोहिनी दु:खातिरेकात बुडून गेलीये. कुणीतरी तिथल्याच मुलांना बोलावलं. खोलीत अधिकच गर्दी झाली.

“तुम्ही कावळ्याबगळ्याच्या गोष्टीचा शेवटच केलात. माझ्याकडे काय उरलंय आता?”

प्रश्न अनुत्तरीतच आहे. सकाळ होते.

बाहेर पाखरांची किलबिल सुरू होते.

मोहिनी आपले हात कानांवर ठेवते.

“ओरडणं थांबवा तुमचं, कावळ्यांनो, तुमच्यामार्फत मी ज्याच्याशी बोलायचे ते माणूस मला सोडून निघून गेलंय. मला नाही सहन होत तुमचं ओरडणं.”

कावळे तरीही कावकाव करतात, कावळे कावकाव करतच राहणार.

आणि अशा रीतीने कावळ्याबगळ्याची गोष्ट संपते. 

पण आजची सकाळ मात्र खरोखरच सुंदर असते.

अनुवाद - नंदिनी आत्मसिद्ध

टीप :

 बेहुला : अशी कथा आहे की, बेहुला आणि तिचा नवरा लखिंदर लोखंडी कड्या-कुलपातल्या आणि एकही भोक नसलेल्या खोलीत राहिले आणि आपण सुरक्षित आहोत या भावनेने, बेहुलाला नकळत झोप लागली. तर ‌‘मनसा'या नागदेवतेने लखिंदरचा युक्तीने सर्पदंशाने मृत्यू घडवला. बेहुला उठली, तेव्हा उशीर झाला होता, तिचा नवरा वाचला नाही. 

(अनुभव, एप्रिल 2007च्या अंकातून साभार)

महाश्वेतादेवी

महाश्वेतादेवी







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results