भल्या पहाटे घरचे लोक रोजच्यासारखेच गाढ झोपेत होते. विश्वा चुपचाप उठून अंथरुणाजवळ ठेवलेल्या कुबड्यांच्या आधाराने लंगडत दारापर्यंत पोहोचला आणि अगदी हळूच दरवाजा उघडून गल्लीत आला. धीम्या चालीने हॉटेलजवळ पोहोचल्यानंतर चहा पिऊन त्याने तिथे बसलेल्या लोकांशी बोलत काही वेळ घालवला आणि मग तो घरी परतला. त्यानंतर तोंड वगैरे धुऊन त्याने डाव्या पायाला कृत्रिम पाय जोडला. पुन्हा घरातून बाहेर पडून तो ऑटोरिक्षाने सहा किलोमीटर दूर असलेल्या अशोका सर्कलला पोहोचला.
‘माझा नकली पाय घासला गेलाय. चालताना खूप त्रास होतो. शक्य तितक्या लवकर हा बदलायला हवा,' असं विश्वाने आतापर्यंत कित्येक वेळा घरच्या मंडळींना सांगितलं होतं; पण त्याच्या बोलण्याकडे कुणी लक्षच देत नव्हतं.
दोन भाऊ, वहिनी आणि त्यांची मुलं यांच्यासोबत विश्वा एका जुन्या घरात दिवस ढकलत होता. मातीच्या भिंती आणि वर कौलं असलेलं हे घर त्यांच्या पूर्वजांकडून त्यांना वारसाने मिळालं होतं. जवळच त्यांची मोठी बहीण सुकन्या भाड्याच्या एका लहानशा घरात तिच्या एकुलत्या एका मुलासह राहत होती. ती विधवा होती. तिचा मुलगा दहावीत शिकत होता.
मोठा भाऊ शिवन्ना शहरातील बाजाराबाहेरच्या फुटपाथवर केळी विकत असे. दुसरा भाऊ हातगाडीवर भाजी विकण्याचं काम करी. सुकन्या गारमेंटमध्ये काम करत असे. या सर्वांनी उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे मार्ग शोधले होते. एका मर्यादेपर्यंत हे सगळे समाधानी होते, पण सर्वांचं लक्ष विश्वाच्या मिळकतीकडे होतं.
अशोका सर्कलला पोहोचल्यानंतर विश्वा रस्त्याच्या कडेला आपल्या ठराविक जागेवर कृत्रिम पाय काढून ठेवून त्याच्यासमोर बसत असे आणि तिथून येणाऱ्या-जाणाऱ्यांसमोर हात पसरून भीक मागत असे. या ठिकाणी त्याला अनेक सोयी उपलब्ध होत्या. चहा विकणारी मुलं तिथे दिवसभर फिरत असत. त्यांच्याकडून चहा विकत घेऊन तो पीत असे. भूक लागली की तो रेस्तराँतून चहावाल्या मुलांकरवी दाल-रोटी मागवून घेई. सर्कलजवळच सार्वजनिक शौचालयही होतं.
हेही वाचा - कावळ्याबगळ्याची गोष्ट
सर्कलच्या आसपास बसणाऱ्या लोकांशी त्याने मैत्री केली होती. कधी कधी तो उदास होई, तेव्हा ज्या व्यथा तो घरच्यांना सांगू शकत नसे त्या या लोकांना सांगे. एखाद्या दिवशी त्याची अशोका सर्कलला जाण्याची इच्छा होत नसे. त्या दिवशी घरच्यांसोबतच राहावं असं त्याला वाटे; पण घरचे लोक यासाठी परवानगीच देत नसत. त्याच्या कुठल्याही म्हणण्याकडे लक्ष न देण्याची त्यांना जणू सवयच लागून गेली होती. सणासुदीलादेखील ते त्याच्यासाठी नवे कपडे शिवत नसत. फक्त नवे कपडे शिवून देण्याचं आश्वासन देत असत.
ऊन असो की पाऊस, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा वेळ अशोका सर्कलमध्येच घालवी आणि अंधार पडू लागला की आपली दिवसभराची कमाई सांभाळून नेऊन शिवण्णाच्या हाती देई. तो घरी परतला की सुकन्याही हळूच तिथे पोहोचे. विश्वाची मिळकत तिन्ही भाऊ-बहीण मोठ्या आनंदाने आपसात वाटून घेत.
अधूनमधून कधी तरी सुकन्याच्या मुलाला काही गरज पडली की तो अशोका सर्कलला त्याच्या मामाला भेटायला येत असे आणि त्याच्याकडून काही ना काही उकळल्याशिवाय तिथून हटत नसे.
संध्याकाळी विश्वा घरी परत येई तेव्हा घरात एखाद्या सणाचं वातावरण पसरे. खरं तर तो जन्मापासून अपंग नव्हता. तो अगदी लहान असतानाच त्याचे आई-वडील मरण पावले होते. बहीण-भावांनी त्याचं पालनपोषण केलं असल्यामुळे तो त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असे. जाण आल्यावर तो कामाच्या शोधात बाहेर पडला. काही दिवस इकडे-तिकडे फिरल्यानंतर अखेर एक दिवस तो खासगी बसस्टँडकडे वळला आणि तिथेच हमालाचं काम करू लागला.
एक दिवस तो बसच्या टपावर सामान ठेवत होता. याची काहीच कल्पना नसलेल्या ड्रायव्हरने बस सुरू केली. अचानक धक्का बसल्यामुळे विश्वा बसच्या टपावरून खाली पडला आणि त्याचा पाय चालत्या बसच्या मागच्या चाकाखाली सापडला.
साधारण तीन वर्षांपूर्वीची घटना असेल ही. बसमालकाने विश्वाला एका खासगी रुग्णालयात भरती केलं. त्याच्या उपचारांचा सारा खर्च मालकानेच उचलला. अनेक दिवस विश्वा या रुग्णालयात राहिला. तिथून डिस्चार्ज मिळताना बसमालकाने शिवण्णाच्या हाती चाळीस हजार रुपये ठेवले.
बसमालकाने जे पैसे दिले होते त्यातून शिवण्णाने सर्वांत आधी घराची दुरुस्ती केली. उरलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्याने सुकन्याला दिली. पण सुकन्या तेवढ्यावर संतुष्ट नव्हती. बसमालकाने दिलेल्या रकमेतून आपल्याला योग्य वाटा मिळाला नाही, अशी तिची तक्रार होती. शिवण्णाने आपल्याशी दगाबाजी केली, या जाणिवेने सुकन्या अजूनही कधीमधी अश्रू ढाळत असे.
हेही वाचा - द्वंद्व
विश्वाच्या अपंग असण्याचं कुणालाही दु:ख नव्हतं. विश्वा हमालाचं काम करत असतानाही आपल्या मेहनतीची सारी कमाई अगदी प्रामाणिकपणे शिवण्णाच्या हवाली करत असे.
स्वत:जवळ तो एक पैसाही लपवून ठेवत नसे. त्या वेळीही ती रक्कम तिन्ही भाऊ-बहीण आपसांत वाटून घेत असत.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवस विश्वा घरीच बेकार बसून होता, पण फुकटचं खाणं त्याला अजिबात आवडत नसे. मात्र, पुढे काय करावं हे काही त्याला सुचत नव्हतं. एकेका पैशाला तो मोताद झाला होता. आणखी काही दिवस आपण घरीच राहिलो तर घरचे लोक आपल्याला हाकलून देतील, अशीही भीती त्याला वाटू लागली होती. याच विचारातून एक दिवस त्याने अशोका सर्कल गाठलं होतं.
काही दिवसांपासून एक गोष्ट विश्वाच्या डोक्यात सतत येत होती. ‘मरेपर्यंत याने आपल्या सांगण्यानुसार वागावं आणि कायम अविवाहितच राहावं' अशी घरच्यांची इच्छा असणार, हा विचार त्याला छळत होता. शिवण्णाला एक मुलगी होती, जी खरं तर अगदी लहान होती. पण तरीही शिवण्णाला तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली होती. घरच्यांना खरंच त्याच्या भविष्याची काळजी असती तर त्यांनी त्याच्या लग्नाबद्दल विचार केला असता आणि एका अपंगाला मुलगी द्यायला कुणीही तयार होणार नाही, असं ते कधीही म्हणाले नसते.
हे खरं होतं, की घरच्यांच्या वागणुकीला कंटाळून कुठे तरी दूर पळून जाण्याचा विचार त्याने अनेकदा केला होता. मात्र, आपल्या रक्तपिपासू भाऊ-बहिणीला सोडून जायला त्याचं मन तयार होत नव्हतं. नेहमी तो एकच विचार करी, की हे लोक आपलं रक्त न शोषता एक क्षणही जिवंत राहू शकणार नाहीत. त्याला याची पुरेपूर खात्री होती, की आपल्या शरीरात रक्ताचा एखादा थेंब जरी शिल्लक राहिला तरी हे लोक तो शोषल्याशिवाय सोडणार नाहीत.
‘त्यांना माझं रक्त शोषण्याचा हक्कच आहे', असा विचार करून तो गप्प बसत असे.
रात्री आठ वाजण्यापूर्वीच विश्वा घरी परत येई. त्या वेळी घरचे सगळेच आतुरतेने त्याची वाट पाहत असत. ऑटोरिक्षा घरासमोर थांबताच मुलं धावत जात आणि विश्वाला रिक्षातून उतरण्यासाठी मदत करत. नंतर घरातील मोठे लोक हसऱ्या चेहऱ्याने त्याचं स्वागत करत. विश्वाचा सकाळचा चहा-नाश्ता आणि दुपारचं जेवण बहुधा बाहेरच होई, पण रात्रीचं जेवण तो सर्वांसोबत हसत-खेळत करत असे.
आयुष्य ठराविक साच्यात सुरू होतं. पण त्या रात्री एक वेगळी गोष्ट घडली. रात्रीचे आठ वाजले तरीही विश्वा घरी परतला नाही तेव्हा सर्वांचे चेहरे पडले. सर्वजण अस्वस्थ झाले. आम्हाला कंटाळून तो कुठे दूर तर निघून गेला नाही ना, अशी मनात शंका येऊनही ते आशेने त्याची वाट पाहत राहिले.
हेही वाचा - पर्रा
घड्याळाचा काटा आठच्याही पुढे सरकला. विश्वा तर घरी आला नाही, पण अशोका सर्कलजवळ संध्याकाळी साडेसात वाजता बाँबस्फोट झाल्याची बातमी येऊन पोहोचली.
ही बातमी ऐकून सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली. आता विचार करत बसायला वेळ नव्हता, त्यामुळे शिवण्णा व सोमू आपापल्या सायकलींवर बसून अशोका सर्कलकडे रवाना झाले.
अशोका सर्कलमध्ये बाँबस्फोट झाल्यानंतर वीज नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. शिवाय पोलिसांनी संपूर्ण भागाला वेढा घातला होता आणि कुणालाही आत जाण्याची परवानगी नव्हती. या भागात नेमकं काय संकट कोसळलं आहे याचीही कुणाला कल्पना नव्हती. एका क्षणात प्रत्येक वस्तू छिन्नविच्छिन्न होऊन इतस्तत: विखुरली होती. लोकांच्या शरीरांचीही अवस्था अशीच होती. या स्फोटात किमान २० लोक मरण पावल्याची आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाल्याची शंका व्यक्त केली जात होती.
जखमींना, ज्यांना घरदार होतं आणि जे बेवारस होते, सर्वांनाच जवळच्या रुग्णालयांमध्ये नेलेलं होतं, नेलं जात होतं. आणीबाणीच्या या वातावरणात कोणत्या जखमींना कोणत्या रुग्णालयात पोहोचवण्यात आलं आहे हे पूर्ण खात्रीने कुणीच सांगू शकत नव्हतं. इतकंच नव्हे, तर बाँबस्फोट झाला त्या वेळी तिथे हजर असलेल्या लोकांपैकी कोण जखमी झालं, कोण मरण पावलं हेदेखील कुणी सांगू शकत नव्हतं.
जखमींना कोणकोणत्या रुग्णालयात पोहोचवण्यात आलं आहे याची माहिती मिळवल्यानंतर शिवण्णा, सोमू, सुकन्या व तिचा मुलगा वेगवेगळ्या दिशांना धावले. त्यांनी रुग्णालयांमध्ये विश्वाला शोधलं, त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही कुठल्याही रुग्णालयात तो सापडला नाही तेव्हा निराश होऊन सारे घरी परत आले.
आता विश्वाच्या जिवंत असण्याबद्दल त्यांना शंका वाटू लागली होती. कारण कुठल्याही रुग्णालयात त्यांना विश्वा नजरेस पडला नव्हता आणि अद्याप तो घरीही परतला नव्हता. ‘तो वाचला असता तर आत्तापर्यंत घरी आला असता' असाच विचार सर्वांच्या मनात घोळत होता.
हेही वाचा - जहाजवाली टाकी
काहीही असो, सकाळी अशोका सर्कलला जाऊन तिथल्या प्रेतांमध्ये विश्वाचा शोध घ्यावा लागेल, याच निष्कर्षाप्रत सारे पोहोचले.
विश्वा जिवंत परत येईल याबद्दल त्यांना पूर्ण विश्वास होता. त्यामुळे दार उघडंच ठेवून ते त्याची वाट पाहत राहिले. सोबतच, जखमी किंवा मृतांमध्ये अचानक विश्वा दिसू शकेल, असा विचार करून ते टीव्हीवरील बातम्याही बघत राहिले.
रात्री दहाच्या सुमारास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बाँबस्फोटात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी सात लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली तेव्हा सर्वजण अवाक झाले. आधी ते विश्वाची वाट पाहत तो सहीसलामत घरी परत यावा अशी प्रार्थना करत होते; पण ही घोषणा ऐकून अचानक त्यांचा दृष्टिकोन बदलला. विश्वा मेलेला असायला हवा, अशी प्रार्थना ते आता करू लागले.
कुणी काही बोलत नव्हतं, पण मनातल्या मनात ते खूष होते. एवढी मोठी रक्कम मिळणार म्हणून मनोमन भविष्यातील योजनाही आखू लागले होते. सारी रात्र त्यांनी अशीच जागून काढली. सकाळी सर्वजण अशोका सर्कलला जाण्याची तयारी करत असतानाच अचानक घरासमोर एक ऑटोरिक्षा येऊन थांबली. आतून आधी एक अनोळखी माणूस उतरला आणि त्याच्या पाठोपाठ विश्वाही.
ज्या ठिकाणी बाँबस्फोट झाला होता तिथे विश्वाच्या घरचे लोक हजर नव्हते, त्यामुळे त्यांना बाँबस्फोटाचा अनुभव आला नव्हता. मात्र, आता समोर विश्वाला जिवंत पाहून त्यांना जणू आपल्या शरीरात बाँबस्फोट झाल्याची जाणीव झाली.
सर्वांनी रात्रभर जी स्वप्नं पाहिली होती ती क्षणभरात उद्ध्वस्त झाली. सर्वांनाच आतून एक कंप सुटला. विश्वाला पाहताच मुलं मात्र खूष झाली. सगळी ऑटोरिक्षाच्या दिशेने पळाली आणि विश्वाला बिलगली. विश्वाने खाली बसून मुलांना पोटाशी कवटाळलं आणि डोळ्यांतून वाहणारी आसवं थोपवण्याचा तो प्रयत्न करू लागला. ऑटोरिक्षापासून काही अंतरावर उभे असलेले विश्वाचे भाऊ, बहीण आणि वहिनी जड पावलांनी त्याच्या दिशेने आले.
विश्वा पूर्वी ज्या बसस्टँडवर हमालाचं काम करी तिथला एक हमाल बिलीगिरी हा विश्वाचा चांगला मित्र होता. आदल्या सायंकाळी विश्वा त्याला भेटल्यावर तो विश्वाला आपल्या घरी घेऊन गेला. विश्वा अशोका सर्कलवरून निघाल्यावर काही वेळात बाँबस्फोट झाला तेव्हा तो बिलीगिरीच्या घरी होता. बाँबस्फोटानंतर ऑटोरिक्षासेवा बंद झाल्यामुळे विश्वाला रात्र त्याच्या घरीच काढावी लागली.
“बरं झालं की नाही...? मी काल विश्वाला माझ्या घरी घेऊन गेलो आणि त्याचा जीव वाचला!” बिलीगिरी विश्वाच्या घरच्यांना आनंदाने सांगत होता.
पण विश्वाच्या घरचे लोक आपल्या स्वप्नांचे इमले कोसळताना पाहून हसणंच विसरून गेले होते.
(अनुभव, फेब्रुवारी २०१६च्या अंकातून साभार)
कन्नड लेखक : अदीब अख्तर
हिंदी अनुवाद : अदीब अख्तर
मराठी अनुवाद : कुमार
