“मला फक्त एक संधी दे तुझ्या सेवेची. तुझ्या अंगावरील गोचीड, उवा असं सारं काढून तुला स्वच्छ ठेवीन. बस्स, एक संधी दे.” एक मेंढपाळ डोंगराच्या कड्यावर उभा राहून आकाशाकडे बघत मोठ्याने बडबडत होता. आपला धर्मदंड आणि भारदस्त पायघोळ झगा घालून मोझेस तिथून चालला होता. मेंढपाळाची बडबड त्याच्या कानी पडली. थांबून तो लक्षपूर्वक ऐकू लागला. “फक्त एक संधी.. मी तुला रोज अंघोळ घालीन, मसाज करीन, माझ्या मेंढ्या बघ, कशा चक्क आहेत ते! तुझे घर झाडीन, स्वयंपाक करीन..” मोझेसला कळेना हे काय सुरू आहे. त्याने हात वर करून ओरडून विचारलं, “काय आहे? काय बडबडतो आहेस?”, रुबाबदार मोझेसला बघून तो गांगरला, चाचरत म्हणाला, “मी देवाची प्रार्थना करतो आहे.” “अशी? ही प्रार्थना! देवाच्या अंगात गोचीडॽ भयंकर पाप आहे हे, अभद्र बडबड, बिनडोक बकऱ्या हा पापाचार आहे, एकदम चूप हो.”, मोझेस कडाडला.
“महाराज मला माफ करा, मी अडाणी. मला ठाऊक नव्हतं, आता नाही करणार हे पाप.. मला माफ करा,” असं म्हणून, स्वतःच्या थोबाडात मारत मेंढपाळ भेलकांडत पळू लागला.
“बरं झालं. एक पाप टळलं,” असं म्हणत मोझेस समाधानाने पुढे चालू लागला. थोड्याच वेळात खिन्न स्वरात आकाशवाणी झाली, “मोझेस, काय केलंस हे? अरे, मी तुला माझ्या भक्तांना एकत्र करण्यासाठी पाठवलं, तर तू माझ्या निस्सीम भक्ताला माझ्यापासून दूर केलंस?''
गुडघ्यावर बसत मोझेस म्हणाला, “पण, परमपित्या त्याची प्रार्थना..''
त्याचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी देव म्हणाला, “अरे, त्याची भाषा, त्याचे शब्द काय ऐकतोस? त्याचं मन बघ, ते जाण! मूर्खा प्रार्थना मनात असते, शब्दांत नाही,” आता माफीची वेळ मोझेसवर आली. तो उतारावरून धावत निघाला. त्याचा धर्मदंड हातातून निसटला. काटेरी झुडपात अडकून झगा फाटला. पण तो थांबला नाही. अखेर एका खडकाआड रडत बसलेला मेंढपाळ त्याला दिसला. मोझेसला बघून तो अधिकच जोराने रडू लागला, ‘माफ करा, माफ करा', म्हणत स्वत:च्या तोंडावर माती फेकू लागला. “अरे थांब दादा, तुझीच प्रार्थना योग्य आहे, तशीच सुरू ठेव. परमपिता तुझाकडून गोचिडि, उवा काढून घेण्यात खूश असेल तर तुमच्या मध्ये येणारा मी कोण?''
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.