ओशो सांगतात,
झेन गुरूच्या प्रवचनानंतर एक माणूस त्यांच्यापाशी आला आणि भाविकतेने लीन होऊन म्हणाला, गुरुदेव, तुमच्यात साक्षात दैवी शक्तीचा वास आहे.”
गुरू म्हणाले, “तुमचं बरोबर आहे.”
थोड्या वेळाने दुसरा माणूस आला आणि क्रोधाने म्हणाला, तुमची शिकवण सैतानी स्वरूपाची आहे.”
गुरू म्हणाले, “तुमचं बरोबर आहे.”
हा संवाद ऐकणाऱ्या शिष्याने गुरूला विचारलं, “गुरुदेव, हे दोघेही बरोबर कसे असू शकतात?”
गुरू म्हणाले, “या दोघांचीच नव्हे, तर माझ्याबद्दल हजार माणसांची हजार मतं असतील, तर ते हजारही जण आपापल्या जागी बरोबरच आहेत. त्यांना मी कळतो का? ते फक्त माझ्याविषयी त्यांची काय समजूत झाली ती सांगत असतात. त्यांची समजूत म्हणजे मी नाही.”
शिष्य म्हणाला, “पण मग तुम्ही यापैकी नेमके कोण आहात?”
गुरू म्हणाले, “मी यापैकी काहीही असण्याची गरजच काय? मी मी आहे. तेवढंच माझ्यासाठी पुष्कळ आहे. मला माझ्याविषयी कोणतीही समजूत करून घेण्याचं काहीच प्रयोजन नाही.”