
तेव्हा मी मुंबईत एका पेपरमध्ये पत्रकारिता करत होते. असेन २२-२३ वर्षांची. म्हटलं तर सगळं छान चाललं होतं. पण तरीही सतत असं वाटत राहायचं की आपण फार वरवरचं काम करतोय. या पत्रकारितेतून आपल्याला खरा समाज कळतोय का? आपल्याला कळते आहे ती समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची फक्त माहिती. त्यांच्या भावभावना, त्यांची सुख-दुःखं, त्यांची स्वप्नं यापासून आपण फार दूर आहोत... एके दिवशी या जाणिवेने चांगलाच जोर धरला आणि मी नोकरी सोडून एखादं वर्ष कुठल्या तरी सामाजिक कामाच्या ठिकाणी घालवायचं ठरवलं. पण कुठे जायचं?
तेव्हा भटके-विमुक्त विकास परिषदेच्या यमगरवाडी प्रकल्पाबद्दल आणि गिरीश प्रभुण्यांबद्दल बरंच ऐकलं होतं. प्रभुण्यांनी लिहिलेलं ‘पालावरचं जिणं' हे भटक्यांबद्दलचं पुस्तक वाचलं होतं. वाटलं, यांनाच विचारू काय करता येईल ते. फोन केला आणि त्यांना भेटायला चिंचवडला त्यांच्या घरी गेले. त्यांना म्हटलं, “मला एक वर्षभर अनुभव घ्यायचाय. पुढे काय करेन माहिती नाही. बहुतेक पत्रकारिताच करेन. पण आता स्वतःच्या कोषातून बाहेर पडावंसं वाटतंय.” माझं म्हणणं ऐकल्यावर ते म्हणाले, “ये की मग यमगरवाडीत राहायला.” मीही तयार झाले.
***
प्रभुणे यांच्या पुस्तकात वाचलं होतं तेवढंच मला भटक्या-विमुक्तांबद्दल माहिती होतं. यमगरवाडीत या मुला-मुलींसाठी आश्रमशाळा आणि वसतिगृह आहे असं ऐकलं होतं. तेवढ्या माहितीवर एके दिवशी मी यमगरवाडीला निघाले. सोबत प्रभुणे आणि आणखीही काही कार्यकर्ते होते. जाताना त्यांच्या चर्चा कानावर पडत होत्या. कुठल्या तरी गावी कोणत्या तरी पारध्याला ‘आत' टाकल्याचं सांगितलं जात होतं. अमुकतमुक माणूस सध्या कुठे असतो, काय करतो वगैरे चौकशी सुरू होती. मग प्रभुणे मला त्यांच्या बोलण्याचे संदर्भ समजावून सांगत होते. थोडं थोडं कळत होतं. बरंचसं कळतही नव्हतं.
आम्ही यमगरवाडीला पोचलो तेव्हा रात्र झाली होती. सगळीकडे सामसूम होतं. त्या मिट्ट काळोखात त्या प्रकल्पाचं कॅरेक्टर काय आहे हे कळत नव्हतं. प्रभुण्यांनी मला मुलींच्या वसतिगृहात सोडलं. तिथल्या ओसरीवर सगळीकडे मुली झोपल्या होत्या. अस्ताव्यस्त आणि कुठली तरी लढाई लढल्याप्रमाणे थकल्या-भागलेल्या. त्या मुलींच्या रांगेत एका टोकाला मीही माझं बेडशीट अंथरलं आणि झोपून गेले. सकाळी जाग आली ती मुलींच्या कलकलाटाने. उजाडलं होतं आणि मुलींची अशक्य भांडणं चाललेली होती. मी उठण्याआधीच त्यांना माझ्याबद्दल समजलेलं होतं. आणि त्यांनी माझं बारसंही करून टाकलेलं होतं- ‘माई'.
यमगरवाडीत येऊन ठेपले होते खरी, पण इथे करायचं काय याची काहीच कल्पना नव्हती. मी मुलींच्या वसतिगृहात राहणार असल्याने या मुलींसोबत राहणं, त्यांचं निरीक्षण करणं आणि त्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे ‘काम' आपसूकच तयार झालं. सुरुवातीला वाटलं, नुसतं मुलींच्या सोबत राहून आपण करणार तरी काय आणि आपला वेळ तरी कसा जाणार? पण लवकरच अशी शंका आपल्या मनात आली होती हेही मी विसरून गेले आणि मुलींमध्ये पुरती गुरफटले.
आजवर मी माझ्या माझ्या जगात वाढले होते. त्यात भलेही अनेक जातीपातींचे मित्र-मैत्रिणी-सहकारी-ओळखीपाळखीचे होते, तरीही ते बरेचसे माझ्यासारखेच होते. आजवर आपण अगदी कोषातच जगत आलोय याची लख्ख जाणीव मला या मुलींनी करून दिली.
मी अशा मुली आजवर कधीच पाहिलेल्या नव्हत्या. त्यातली प्रत्येक मुलगी म्हणजे जणू वावटळ होती. अस्ताव्यस्त नि चरबरीत केस, अस्वच्छ आणि फाटलेले कपडे, तोंडात कायम शिव्या आणि अंगात प्रचंड ताकद. त्यातल्या बऱ्याचजणी कायम हमरातुमरीवरच आलेल्या असायच्या. समोरच्या मुलीचा आणि तिच्या सगळ्या खानदानाचा उद्धार करण्यात पटाईत. त्या पारधी भाषा आणि मराठी अशी काही मिळून-मिसळून बोलायच्या की सुरुवातीला ‘त्या भांडताहेत' या एका गोष्टीशिवाय मला काहीच कळायचं नाही. असं वाटायचं, की आजच या पोरींना कुणी तरी मनाविरुद्ध त्यांच्या घरातून उचलून आणलं असावं. पण खरं तर मी तिथे गेले तेव्हा मुलींचं वसतिगृह सुरू होऊन आठ-दहा वर्षं होऊन गेली होती. एवढी वर्षं या मुली अशा गोंगाटात, अस्वच्छतेत, भांडणतंट्यात कशा काय राहू शकतात, असा तद्दन उथळ प्रश्न माझ्या मनात सुरुवातीला सतत यायचा. पण हळूहळू भटके-विमुक्त म्हणजे काय हे जसजसं मला समजू लागलं तसतशी मला पडलेल्या-न पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपसूक मिळू लागली. मुलींची वेगवेगळी रूपंही मला तिथे भेटू लागली.
तसंही भटक्या-विमुक्तांचं जग समजून घेण्यासाठी या मुलींच्या वसतिगृहापलीकडे जाण्याचीही गरज नव्हती.
मध्यभागी एक छोटं अंगण मोकळं सोडून बाजूने षट्कोनी आकारात खोल्या बांधलेलं आणि त्या खोल्यांबाहेर आतल्या अंगणात उतरणारा मोठा व्हरांडा असलेलं हे वसतिगृह होतं. त्यात जवळपास पाच-सहा मोठ्या खोल्यांमध्ये शंभरेक मुली राहत होत्या. या खोल्यांमध्ये भिंतीच्या कडेने या पोरींच्या ट्रंका ओळीने लावलेल्या असायच्या. शंभर ठिकाणी पोचे आलेल्या, पत्रे फाटलेल्या अन् रंग उडालेल्या या छोट्या ट्रंका पाहिल्या तेव्हाच माझ्या मनाला पहिला चटका बसला. इतक्या लहान ट्रंकेत एका मुलीचं सगळं जग सामावू शकतं? पण वरवर अस्ताव्यस्त दिसणाऱ्या या मुलींनी आपला संसार या ट्रंकेत अगदी निगुतीने भरलेला असायचा. कपड्यांचे दोन-दोन जोड, टॉवेल, वेणीफणीचं साहित्य, साबण-तेल-पावडर असं काहीबाही. ते इतकं कमी होतं, पण तरीही मुलींसाठी अतिशय मोलाचं असणार. कारण ते सामान पुन:पुन्हा लावताना त्या त्यात पूर्ण गुंगून जात.
पाच-सहा वर्षांच्या मुलींपासून ते चौदा-पंधरा वर्षांपर्यंतच्या सगळ्या मुली या वसतिगृहात होत्या. काही सख्ख्या बहिणी, काही चुलत-मामे-आत्ये वगैरे, तर काहींमध्ये नाती जवळची नसली तरी गाववाल्या असल्याने एक कंपू तयार झालेला. काहींचे गट इथे आल्यावर जुळलेले. मग अशा गटांत वेगवेगळ्या जातींच्या मुलींचीही एकमेकींसोबत घट्ट नाती तयार झालेली. पण बाकी त्या मुलींमध्ये त्यांची त्यांची जात डोकावत राहायची. त्यात काही पारधी होत्या, कैकाडी होत्या, काही मसणजोगी होत्या. मुलांच्या वसतिगृहात आणखी अनेक जाती-जमातींची मुलं शिकत होती, पण मुलींमध्ये मात्र अजून या दोन-तीनच जाती मुलींना शिकण्यासाठी वसतिगृहावर पाठवू लागल्या होत्या. त्यातही सर्वांत जास्त होत्या पारधी पोरी. त्यामुळे त्या वसतिगृहाला त्यांचंच कॅरेक्टर होतं. पारधी पोरी इतक्या ॲग्रेसिव्ह, की त्या थोड्या असत्या तरीही साऱ्यांना पुरून उरल्या असत्या असं वाटायचं. लक्ष देऊन पाहिलं की या मुलींचं दिसणंही वेगळं वाटायचं. ना बारीक ना जाड. गोऱ्या आणि धारदार. त्यांच्या वागण्या-बोलण्यातही एक धार असायची मग मुलगी पाच वर्षांची असो किंवा पंधरा. त्यांच्या एकमेकींशी बोलण्यातून आणि विशेषतः भांडण्यातून मला हळूहळू प्रत्येकीच्या घरची परिस्थिती कळू लागली आणि साहजिकच भटक्या-विमुक्तांच्या जगण्याची परिस्थितीही. या मुलींपैकी अनेकींचे वडील किंवा आई-वडील जेलमध्ये होते किंवा पोलिसांच्या भीतीने रानोमाळ भटकत होते. काही मुलींचे जन्म जेलमध्ये झाले होते. त्यातल्या एकीचं नावच त्यामुळे ‘झेल्या' पडलं होतं. कुणाच्याच आई-वडिलांना ना स्वतःचं गाव होतं, ना पक्कं घर, ना काही नोकरी-धंदा. त्यांच्या खानदानातली शिकणारी ही पहिलीच पिढी होती. डोक्यावर हक्काचं छप्पर आणि दोन वेळेला खायला अन्न मिळणारीही ही पहिलीच पिढी होती. यातल्या अनेक मोठ्या मुलींनीही आजवर एका पालातच दिवस काढलेले होते. पोलिसांचा ससेमिरा चुकवत त्याही एका गावाहून दुसऱ्या गावाला फिरलेल्या होत्या. मिळाली तर शिकार, नाही तर उपाशी राहून त्यांनीही दिवस काढले होते. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, आपला जीव तगवणं हेच बहुतेक या मुला-मुलींचं बेसिक इन्स्टिंक्ट होतं. भांडणात कायम वरचढ राहणं हा जणू त्या बेसिक इन्स्टिंक्टचाच एक सोपा आविष्कार.
इथे यमगरवाडीत राहणं हे त्यांच्या दृष्टीने जीव जगवण्याचाच एक भाग होता. संस्था भटक्या-विमुक्तांच्या पुनर्वसनासाठी काम करत होती. आणि त्या दृष्टीने ही नवी पिढी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणं संस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं. ही पिढी शिकली तरच पुढे बदल होण्याची शक्यता निर्माण होईल, असं साधं गणित संस्थेने मांडलं होतं; पण या मुलींसाठी मात्र ते इतकं सोपं नव्हतं. शिकायला हवं अशी इच्छाच त्यांच्यात नव्हती. आणि कशी असेल? शिक्षणाची संधी नसणं हा काही त्या मुलींना पडलेला प्रश्न नव्हता. खरं तर गरिबी हादेखील त्यांच्या दृष्टीने दुय्यमच प्रश्न आहे असं मला वाटायचं. समाज म्हणून तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला स्थिरता नसणं, अस्तित्वच नसणं, खाण्याचेच नव्हे तर जगण्याचेही वांधे असणं म्हणजे काय हे मला त्या मुलींकडे बघून पहिल्यांदा समजलं. इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रेम दिलं होतं. त्यामुळे रात्री झोपेतून उठवून आपल्याला कुणी हुसकून लावणार नाही, असा दिलासा त्यांना मिळालेला होता, पण मनावरचं दडपण पूर्णपणे गेलं असणं शक्य नव्हतं. त्यांचं आजचं अस्तित्वच अंधारात बुडालेलं होतं. भविष्य म्हणजे काय हे समजून घेणंही जिथे त्यांच्यासाठी अवघड होतं तिथे उद्याच्या आशेने अभ्यासात वगैरे स्वतःला झोकून देणं या मुलींना शक्य होत नव्हतं.
ही सगळी परिस्थिती माझ्यासाठी अतर्क्य होती. भटक्यांचं आयुष्य असं असतं हे मला याआधी माहिती होतं पण त्यातली ही जीवघेणी गुंतागुंत माहिती नव्हती. शिवाय माहिती असणं आणि त्याची जाणीव होणं यातला फरक घुसमटवून टाकणारा होता.
हळूहळू माझी या मुलींशी ओळख होत गेली, त्यांच्याशी गप्पा होऊ लागल्या, तशी मी त्यांच्या आयुष्याच्या आणखी खोलात, आणखी काळोखात जाऊ लागले. त्यांचं जग आणि त्यांचं इथलं वागणं कधी कधी इतकं अंगावर यायचं की मला विचार करण्यासाठीही त्यांच्यापासून थोडं लांब जावं लागायचं. दिवसभर मी त्यांच्या गलक्यामध्ये सामील असायचे, पण वेळ मिळाला की एखादं झाड पकडून स्वतःशी विचार करत बसायचे.
***
एकदा अशीच एका झाडाखाली तंद्री लागलेली असताना संध्याकाळ झाली आणि मला माझ्या नावाच्या हाका ऐकू आल्या. गेल्या दहा दिवसांत मला थोडा जास्तच लळा लावणाऱ्या दोन-तीन पोरी सुसाट वेगाने धावत माझ्याकडे आल्या आणि त्यांनी विचारलं, “माई, काय करताव?” ‘तुमचाच विचार करतेय', म्हटल्यावर त्या मस्त लाजल्या आणि मला त्यांच्या बरोबरीने पळवत एक मजा दाखवायला घेऊन गेल्या, वसतिगृहाच्या दुसऱ्या टोकाला. धापा टाकत तिथे पोचल्यावर मला दिसलं, त्या उजाड माळरानावर दोन हरणं निवांत चरत होती. खरोखरचीच मजा!
आम्ही एका झाडाखाली बसून त्या हरणांकडे पाहत राहिलेो. आम्ही म्हणजे मी. पोरींना हे दृश्य नेहमीचंच. उलट, त्या माझ्या चेहऱ्याकडे पाहून मला मजा वाटली ना हे चाचपत होत्या. लहान पोराला एखादी गंमत दाखवल्यावर आपण त्याच्याकडे पाहतो तसंच. माझ्यासारख्या शहरी पोरीला कशात मजा वाटेल हे त्यांना बहुतेक आजवरच्या अनेक पाहुण्यांमुळे चांगलंच माहिती असावं. थोडा वेळ गेल्यावर एक पोरगी हळूच म्हणाली, “आपण आता इथे यमगरवाडीत आहोत म्हणून. आमच्या गावी असतो तर आत्तापर्यंत या हरणांचं कालवण आमच्या ताटात असतं!” मी उडालेच. पारधी म्हणजे पारध करणारी, शिकार करणारी जमात, हे माहिती असूनही मला चांगलाच धक्का बसला. समोर हरणं बागडताहेत, उड्या मारताहेत आणि या हरणांसारख्याच अवखळ पोरी त्यांची मजा बघायची सोडून हरणांच्या शिकारीच्या गोष्टी करताहेत, हे मला कसं पचावं?
या पोरी मात्र ‘हरणाचं मटण खाऊन किती दिवस झाले' असं म्हणून चुकचुकत होत्या. मी असं काही खात नाही म्हटल्यावर त्यांनी माझ्याकडे अगदी दयेने पाहिलं. पारधी आणि एकूणच भटका-विमुक्त समाज अट्टल मांसाहारी. त्यातही पारधी म्हणजे हरिण, मोर, ससे आणि उडत्या पाखरांची शिकार करणारी मंडळी. पण इथे यमगरवाडीच्या वसतिगृहात मांसाहार परवडणं शक्य नसल्याने फक्त भाकरी-भात-भाजीचं जेवण असायचं. त्यामुळेच इथे मटण खाता येत नाही याचं या पोरींना कमालीचं दुःख होतं. मोकळ्या शेतात बागडणारी हरणं पाहताना मला मजा येत असली, तरी मुलींच्या दृष्टीने ते शिकार आजूबाजूला असताना नुसतं हातावर हात चोळत बसण्यासारखं होतं. मग पोरींच्या गप्पा हरणाच्या आणि मोराच्या शिकारीवर आल्या. हरिण नाही तर नाही, माईंना तित्तर मारून दाखवायचा आणि पुढच्या वेळी आई हरणाचं कालवण घेऊन आली की तेही खाऊ घालायचं, असं त्यांनी ठरवलं. माझ्याकडून ‘खाईन' असं वदवून घेतल्यावरच त्या माझ्याबरोबर वसतिगृहाकडे येण्यासाठी निघाल्या. नंतर लवकरच हरणाच्या कालवणाची मेजवानी मिळालीच!
***
आता मी वसतिगृहात रुळू लागले होते. माझं स्वत:चं रूटिन बसत चाललं होतं. संपूर्ण संथ आणि निरुद्योगी रूटिन. मी जागी असायचे त्या १५-१६ तासांमधले साधारण १०-१२ तास तर ऐकण्यातच जायचे. आजवर आपण आयुष्यात कधीच कुणाचं एवढं ऐकलेलं नाही, असा शोध मला त्या वेळी लागला. किंवा खरा शोध वेगळाच. सांगण्याजोगं काहीही नसताना आजवर आपणच किती बोलत होतो हे जाणवलं आणि ऐकण्यातली मजा घेता येऊ लागली..
पण ही मजा निखळ नव्हती. दिवसभर काहीही श्रम न करता केवळ या पोरींचे आणि इथल्या कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकूनच मला थकूनजायला व्हायचं. एकीकडे मी प्रभुण्यांचं ‘पालावरचं जिणं' वाचत होते. ते जेव्हा जेव्हा यमगरवाडीत येतील तेव्हा तेव्हा त्यांच्याशी बोलून भटक्या-विमुक्तांसोबतचं काम वगैरे मी समजून घेत होते. दुसरीकडे तो इतिहास मुला-मुलींच्या थेट अनुभवांतून मला भिडत होता. पारधी कोण, कैकाडी कोण, मसणजोगी कोण, गोपाळ कोण, मरीआईवाले कोण यातले फरक मला कळू लागले होते. कोणती आडनावं कोणाची, कोणती गावं कोणाची हे लक्षात येऊ लागलं होतं. त्यांच्या समस्यांमधले फरक कळू लागले होते आणि त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमधले फरक समजू लागले होते. चेहऱ्याकडे बघून माणूस कोणत्या जमातीतला आहे हे ओळखणंही थोडंफार जमू लागलं होतं. आडनावांवरून त्यातल्या पोटजातीही लक्षात येऊ लागल्या होत्या.
हळूहळू मुलींमधल्या एक-दोघींबरोबर माझी थोडी खास मैत्रीही झाली. त्यातलीच एक गीता. गीता पारधी होती, आणि पारधी असणं म्हणजे काय ते सगळं तिच्याकडे बघून लिहून काढावं अशीच ती होती. धारदार, मनस्वी आणि प्रचंड तापट. वसतिगृहात तिला सगळे घाबरून असत. कधी थोडंस्सं काही तरी कारण मिळेल आणि तिचा स्फोट होईल हे कळायचं नाही म्हणून. एकदा अशाच कुठल्या तरी कारणामुळे गीता बिथरलेली होती. अशा वेळी आपणहून तिच्याशी बोलायला जाण्यात अर्थ नाही हे एव्हाना मला कळलं होतं अर्थातच दोन-चार ठेचा खाल्ल्यानंतर! एकदा अशाच चुकीच्या वेळी मी तिच्याशी बोलायला गेल्यावर तिने नुसत्या डोळ्यांनीच मला चार हात लांब थोपवलं होतं. पण एक बरं होतं, अजून तिने मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं नव्हतं. उलट, माझ्याशी बोलायला ती उत्सुक असायची. त्याचं कारण एकच- मी तिचं ऐकून घ्यायचे. त्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ होता. आणि मी तिला कधीही उपदेश करायचे नाही. कारण तो माझा घासच नव्हता.
त्या दिवशी पहिल्यांदा ठिणगी उडाली. त्या वेळी गीता बराच वेळ भांडत, धुमसत होती. मी तिच्याशी काहीच बोलायला गेले नाही. फक्त तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात स्वयंपाकघरातल्या ताईंना सांगितलं, “मी आंब्याखाली बसायला चालले आहे. कुणी विचारलं तर सांगा.” आंब्याला टेकून मी गार वाऱ्यात मस्त झोपले. जाग आली तेव्हा गीता बाजूला बसलेली होती. इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता आपसूक तिची गाडी ‘काय झालं' यावर आली.
नव्याने काहीच घडलेलं नव्हतं. कुणी तरी काही तरी चोरलं, पण आळ हिच्यावर आला, वगैरे वगैरे.. पण तिने कष्टाने शांत केलेलं आयुष्य ढवळून काढायला एवढासा दगडही पुरेसा असायचा. खरं तर तिच्या आयुष्यात जे घडून गेलेलं होतं ते ऐकलं तर ही पोरगी एवढी शांत कशी, असं कुणालाही वाटावं. मला तर तसं वाटायचंच. मी स्वतःच इतकी लहान होते की हे सगळं माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. तिचे वडील दरोडा आणि खुनाच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये जन्मठेप भोगत होते. आईने गीताएवढ्या पोराबरोबर राहायला सुरुवात केली होती. आणि आता वसतिगृहातल्या तीन लहान बहिणींची जबाबदारी आपल्यावरच, ही भावना गीताला आतून पिळवटून काढत होती. या मला समजलेल्या काही गोष्टी. तिने मला न सांगितलेल्या किंवा तिलाही न कळलेल्या आणखी किती तरी गोष्टी असणार.
मला कळत होतं की गीताला मानसोपचारांची गरज आहे. ते इथे मिळणं शक्य नाही. इथे ते कुणाला कळणंही शक्य नाही. त्यामुळे तिची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. मला एवढंच माहिती होतं, की मन मोकळं केल्याने माणसाच्या भावनांचा, दुःखांचा निचरा होतो. ही एकच थेरपी मी गीतावर वापरून पाहू शकत होते. मी आणि गीता अनेकदा सलग आठ-आठ तास झाडाखाली बसून असायचो. तीही फार घडाघडा बोलायची नाही. उलट, भावनातिरेकामुळे तिचे शब्द अडखळायचे, एकमेकांत मिसळायचे. मराठीत व्यक्त होता येईनासं झालं की ती सरळ पारधी भाषेत बोलायला लागायची. तुटक तुटक बोलायची. मी फक्त ऐकत राहायचे. तिचं ऐकताना कधी कधी मी इतकी अस्वस्थ व्हायचे की ऐकण्याचं काम सोडून मीही बोलू लागायचे. मला वाटायचं, की तिला आत्ता, या क्षणी सांगितलं पाहिजे की ती एक ग्रेट मुलगी आहे. ती ज्या हिमतीने जगते आहे ते येरा गबाळ्याचं काम नव्हे. मी असं काही बोलले की ती अजब चेहरा करून ते ऐकायची. मला समजायचं, आजवर कुणीही तिचं असं कौतुक केलेलं नाही. मी बोलत असायचे ते मनापासून; पण याचा उपयोग थेरपी म्हणून झाला तर किती बरं होईल, असंही एका बाजूला वाटायचं.
हळूहळू मला लक्षात येत होतं, की इतर अनेक कटकटींबरोबरच आणखी एक गोष्ट गीताला त्रास देत होती तिचं शरीर. शरीरात होणारे बदल तिला स्वस्थ बसू देत नव्हते. आपलं कुणी तरी असावं, आपल्यावर कुणी तरी धसमुसळं प्रेम करावं; इथे वसतिगृहात करावा लागणारा अभ्यास, ध्येयाचा पाठपुरावा, नोकरीची स्वप्नं वगैरे सगळं सोडून कुणाबरोबर तरी पळून जावं, असं तिच्या मनात एकीकडे सुरू असणार. आजवर तिने पाहिलेलं जग तेवढंच तर होतं पोटाची आणि शरीराची भूक भागवण्यासाठी तडफडणं. आनंद कशात, तर हरिण मारून त्याचं फक्कड कालवण खाण्यात आणि दुसरं, शरीरसुख घेण्यात. ही आदिम भावना तिलाही हतबल करत असावी. दुसरीकडे, ‘यमगरवाडी ही संधी मानून शिका- मोठे व्हा' असं म्हणण्ऱ्यांची फौज सतत तिला उपदेश करत होती. हा उपदेश तिच्या मनात अपराधी भावना तयार करत असणार. काहीही न कळणारा अभ्यास करत, ओलावा नसलेल्या जगात स्वतःच्या बळावर लढत राहण्यापेक्षा एखाद्या पारधी पोराबरोबर मोलमजुरी करून स्वैर आयुष्य जगणं तिला कधीही जास्त मोहात पाडत असणार, असं मला वाटायचं. पण या द्वंद्वाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. शाळा शिकून पुढे काही तरी भलं घडेल, अशी पोकळ आश्वासनं तिला मिळत राहायची. तेवढ्या आधारावर ती कसा दिवस ढकलत असेल याचं मला आश्चर्य वाटायचं.
आमची ही सेशन्स सुरू असताना ती खूप वेळ शांत बसलेली असायची. कधी तिचा चेहरा पिळवटायचा, तर कधी कोणत्या तरी निर्धाराने चमकायचा. मला वाटायचं, चला, आजच्या दिवसापुरती तरी ही लायनीवर आली! आता उद्याचं उद्या बघू. आणि तेवढ्यात ही म्हणायची, “माई, तुम्ही बघाच, उद्या तुम्ही उठण्याआधी या झाडाला लटकून मी जीव देते की नाही.”
ती असं काही करणार नाही हे माहिती असूनही माझ्या छातीत धस्स व्हायचं. तिच्या काळजीपेक्षा हे मी सहन करू शकेन का, हाच विचार माझ्या मनात यायचा. सकाळी मरगळलेल्या अवस्थेत का होईना, ती एकेक कामं उरकताना दिसली की मी हुश्श करायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने आमचं बोलणं सुरू व्हायचं. अनेकदा गीताच्या बहिणी आमची ताटं वाढून आंब्याखाली आणायच्या. हे असं वनभोजन हा आजवर माझ्या दृष्टीने ‘आणखी काय हवं' असं म्हणायला लावणारा आनंद होता. पण गीताशी बोलत असताना मोकळं रान, भन्नाट वारा, आंब्याची सावली, सूर्यास्ताच्या चाहुलीमुळे बदललेला आकाशाचा रंग वगैरे आनंदाच्या शहरी कल्पनांचा मला पूर्ण विसर पडलेला असायचा. ही मुलगी एकदा मोकळी हसू दे, त्याशिवाय हा दिवस काही पुढे जात नाही, असं वाटत राहायचं. गीता आणि तिच्यासारख्या मुलींचं पुढे काय होईल, या एकाच प्रश्नाने मला तेव्हा व्यापून टाकलेलं असायचं. हळूहळू गीता शांत व्हायची. पुन्हा तिचं रूटिन सुरू व्हायचं. मग माझ्याशी गप्पांचं प्रमाणही कमी व्हायचं. कधी तरीच खुषीत असली की ती मला म्हणायची, “मी तुम्हाला किती त्रास देते ना! आता मी पळूनच जाते रुक्मीसारखी.” मी तिला म्हणायचे, “बाई, तू इथून गेलीस तर मला काही कामच उरणार नाही. दिवसभर मी करू काय? हरणं मारू?” यावर ती खळखळून हसायची आणि मला एक झप्पी द्यायची. हे तिचं रूप बघून प्रसन्न वाटायचं. पण हे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही नेमका त्याच वेळी मनात यायचा.
आणि आणखी एक किडा डोक्यात शिरायचा- गीता म्हणतेय ती रुक्मी आता कुठे असेल?
***
हे रुक्मी प्रकरण मी इथे येण्याच्या आधीपासून ऐकत आले होते. या रुक्मीमुळेच यमगरवाडीचं मुलींचं वसतिगृह सुरू झालं, असं मला प्रभुण्यांनी सांगितलं होतं. इथे आल्यावरही तिच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. त्या अंगावर काटा उभा करणाऱ्या होत्या. पण इथे अगदी पाच-सहा वर्षांच्या मुलीही काऊ-चिऊची गोष्ट सांगावी इतक्या सहजतेने त्या मला सांगायच्या. रुक्मी लहान असताना तिच्या बापाने तिच्यासमोरच तिच्या आईचा खून केला. बाप शिक्षा भोगायला गेला आणि कुणी तरी तिला इथे आणून सोडलं. मग हळूहळू इतर पारधी मुली इथे शिकायला येऊ लागल्या. आणि मग इतर भटक्या जमातींतल्याही. रुक्मी काही वर्षं इथे शिकली. एकदा शाळेतल्या शिक्षकांनी तिला इतकं मारलं की ती जी पळून गेली ती अजून परतली नव्हती. त्याला आता पाच-सहा वर्षं होऊन गेली होती. ती कुठे गेली, काय करते कुणालाही नक्की माहिती नव्हतं, पण तिच्याबद्दलच्या खऱ्या-खोट्या बातम्या मात्र यमगरवाडीपर्यंत येत असायच्या. त्यातल्या बऱ्याचशा वाईटच असायच्या.
एकदा मी कशासाठी तरी पुण्याला गेले होते. तिथून रात्री परत आले. शाळेच्या आवारात पोचते ना पोचते तोच पोरींची एक झुंड माझ्या अंगावर चालून आली. “माई, कोण आलंय ओळखा!” मला काहीच अंदाज येईना. पोरींनीही काहीएक न सांगता साडी नेसलेल्या एका मुलीसमोर आणून मला उभं केलं. म्हणाल्या, “ही रुक्मी!”
मी पाहतच राहिले. आजवर रुक्मीचा विषय निघाल्यावर माझ्या मनात जे चित्र उभं राहायचं त्यापेक्षा ही किती वेगळी होती! ती तेव्हा सोळा-सतरा वर्षांची असेल, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला काही केल्या तिच्या वयाचा अंदाज बांधता येत नव्हता. तेव्हा मीही लहानच होते, पण तरीही एखाद्या पोक्त बाईसारखं मला वाटलं, हे काय होतंय या मुलींचं? सगळ्या करपून चालल्या आहेत. किती मोठी वाटते आहे ही! आणि किती सोसलंय हिने! रुक्मीला माझ्याबद्दल माहिती असायचं कारणच नव्हतं, पण मला मात्र ती खूप जवळची वाटत होती. जणू भटक्या-विमुक्तांमधल्या बाई जातीविषयी न बोलताही सगळं सांगून जाणारी एक आदिम बाई!
रुक्मी परत आली आणि मधूनमधून आमच्या गप्पा सुरू झाल्या. या सगळ्याच मुली किती सहजपणे माझ्याशी बोलत होत्या! ही अचानक इथे टपकलेली बाई कोण आहे, तिला आपण आपल्या आयुष्यातलं किती आणि का सांगावं, तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही, असे कोणतेही प्रश्न त्यांना पडत नव्हते. त्यांच्याशी माझ्या भरपूर गप्पा व्हायच्या याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा हा मोकळा स्वभाव. पण एक होतं, आपल्या आयुष्यातली कोणतीही माहिती त्या बिनधास्त सांगायच्या; पण आपण काय विचार करतो आहोत, काय ठरवतो आहोत वगैरे मात्र फारच कमी वेळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडायचं.
रुक्मी आता पुढे काय करणार याची मला उत्सुकता होती. तिने आपलं पुढचं आयुष्य तरी बरं जगावं असं मला वाटायचं. ते जणू समजल्यामुळेच तिच्या मनात अनेक गोष्टींबद्दल अपराधी भावना असेे. त्याबद्दल मी तिला विचारत कशी नाही असं तिला वाटायचं. एकदा ती आपणहून विषय काढून ती म्हणाली, “माई, तुम्ही माझ्याबद्दल इथे खूप काही ऐकलं असेल ना, की ही कुणाबरोबर तरी पळून गेली होती. मग आणखी कुणा-कुणाबरोबर राहिली. तिचं चालचलन बरं नाही.. ही धंदा करते..” मी तिला म्हटलं, “नाही बुवा, असं कुणी मला म्हणालं नाही. आणि तसं काही तू केलं असशील तरी त्याने मला काही फरक पडत नाही.”
एवढा विश्वास तिला पुरेसा असावा. हळूहळू ती मोकळी होऊ लागली. ती बोलत असताना सारखं मनात यायचं, हिचं आयुष्य आपल्या वाट्याला आलं असतं तर आपण काय केलं असतं? इतक्या धीटपणे परिस्थितीला सामोरं जाण्याची तर सोडाच, पण आत्महत्या करण्याचीही हिंमत आपण दाखवू शकलो नसतो. कोणत्याही आधाराविना, प्रेमाविना रुक्मी आजवर जगत आली होती. पूर्ण अधांतरी. फक्त स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर. वडिलांनी तिच्या डोळ्यांदेखत तिच्या आईचा खून केला तेव्हा तिला काय वाटलं असेल? तिने आणि तिच्या भावाने म्हणे आईचं डोकं पुन्हा धडाला लावायचा खूप प्रयत्न केला. ते जमेना म्हटल्यावर दुसरं कुणी घरात येईपर्यंत दोघं तसेच आईच्या प्रेतापाशी रडत बसले. हा प्रसंग रुक्मी आयुष्यात कधी विसरू शकेल? तो न विसरता जगणं तिला कसं जमलं असेल? शिक्षकांनी मारलं म्हणून ती वसतिगृहातून पळून गेली, म्हणून तिच्यावर ‘ती अशीच'चा ठपका ठेवण्यात आला. पण इतक्या लहान मुलीला कोणाचाही आधार नसलेल्या जगात पळून जावं असं का वाटलं असेल, याचा शोध कुणी घेतला की नाही काय माहीत! इथून पळून गेल्यावर तिने काय काय सोसलं असेल? कुठे राहिली असेल? काय खाल्लं असेल? कुणी त्रास दिला असेल? कुणी मदतीचा हात दिला असेल?
उत्तरं नसलेले असे लाखो प्रश्न माझ्या मनात घोंघावत असायचे, पण रुक्मीचा चेहरा शांत असायचा. मी तिच्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठी होते खरी. पण तिला माझ्या आजवरच्या सुरक्षित आयुष्याची कहाणी कळली असती तर तीच मला ‘बच्ची' म्हणाली असती.
कसलं तरी प्रशिक्षण घ्यावं, काही तरी काम सुरू करावं आणि स्वतंत्र राहावं असं रुक्मीला वाटत होतं. त्यासाठी उस्मानाबादला जावं की थेट पुणं गाठावं अशी चर्चा सुरू होती. पण ती आल्यापासून मी पाहत होते, की तिची तब्येत ठीक नसायची. तापाची कणकण सतत तिच्यासोबत असायची. त्यामुळे तिच्या तपासण्या करून घ्यायला आम्ही उस्मानाबादला जाऊन आलो. तिथले डॉ. शहापूरकर खूप पूर्वीपासून यमगरवाडीच्या प्रकल्पाचे फॅमिली डॉक्टर होते. तपासण्यांचे रिपोर्ट्स आणायला आम्ही गेलो तेव्हा डॉक्टरांनी मला एकटीलाच आत बोलावलं. काहीही प्रस्तावना न करता ते म्हणाले, “रुक्मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.”
इतक्या जवळून एड्सशी भेट होण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. ही माहिती सिंक-इन व्हायला मला बराच वेळ लागला असणार. मी खूप वेळ नुसतीच बसून राहिले. डॉक्टरांना फक्त एवढंच विचारू शकले, “आता पुढे काय?” पण डॉक्टर शांत होते अन् बरेच आशादायीही. आता कुठे सुरुवात असल्याने काळजी घेतली तर ती व्यवस्थित जगू शकेल, फक्त तिला मूल होऊ देता कामा नये, असं त्यांचं म्हणणं पडलं. तेव्हा एचआयव्ही पॉझिटिव्ह आईकडून मुलाकडे रोग संक्रमित होऊ नये यासाठीच्या औषधांचे शोध लागले नव्हते. पुन्हा भेटण्याचं ठरवून मी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आले तेव्हा रुक्मी रडत होती. कसं कोण जाणे, काय झालंय हे तिला बरोबर कळलं होतं. कदाचित यमगरवाडीत परत येण्यापूर्वीच तिला हे माहिती असावं. यमगरवाडी येईपर्यंत मी तिच्यासमोर आशादायी चित्र उभं करत होते. एड्स झाला म्हणजे सगळं संपलं असं नव्हे, हे मी तिला सांगत होते. नंतर मला जाणवलं, की तिचं रडणं हे स्वतःच्या मृत्यूच्या भीतीपेक्षा आणखी एक बालंट घेऊन जगावं लागणार यासाठीचं होतं. पण ही बातमी अन्य कुणालाही सांगण्याची गरज नाही, असं प्रभुण्यांनी ठरवून टाकल्याने ती त्यातून लवकरच सावरली.
पण मला मात्र त्यातून बाहेर यायला बराच वेळ लागला. एड्स हे फक्त निमित्त. पण जगणं किती कठोर असू शकतं आणि जे समोर येईल ते धीराने सोसणं म्हणजे काय असतं हे असं माझ्यासमोर रुक्मीच्या रूपाने उभं होतं. ते मला पेलवत नव्हतं. रुक्मी पारधी समाजात जन्माला आली यात तिची काय चूक? पण चूक नसली तरी त्याची शिक्षा मात्र तिलाच भोगावी लागत होती. ती या समाजात जन्माला आली नसती तर ना तिला वसतिगृहाचा आधार घ्यावा लागता, ना तिथून पळून जावं लागतं, ना जगण्यासाठी धडपड करण्याच्या प्रयत्नात एड्सचा सामना करावा लागता. पारधी समाजाच्या आजच्या स्थितीमध्ये तिच्या प्रश्नांची मुळं होती. त्याचं ओझं मात्र तिला एकटीलाच पेलावं लागत होतं.
अशा अनेक मुली आणि त्यांच्या अगम्य कहाण्या. यमगरवाडीतल्या त्या वर्षभरात जवळपास सर्व मुलींशी माझी घट्ट ओळख झाली, त्यांच्या आई-वडिलांशी भेटी झाल्या. काही ना काही निमित्ताने पारध्यांची वस्ती असणाऱ्या गावांकडे फेऱ्या झाल्या. तिथे वसतिगृहात न आलेल्या विविध समाजांमधल्या मुली भेटू लागल्या. त्यांची परिस्थिती कळू लागली. प्रभुण्यांसोबत, इतर कार्यकर्त्यांसोबत पालांवर फिरताना कधी एखादी आई आपल्या छोटी पोरीला प्रभुण्यांकडे सोपवायची आणि म्हणायची, “हिला नेऊन टाका यमगरवाडीला. किमान हिला दोन वेळेला खायला तरी मिळेल.” पोरी वसतिगृहात पाठवल्या की त्यांना विसरून पुन्हा जगण्याची लढाई लढू लागणाऱ्या असंख्य आया मी त्या काळात पाहिल्या. वसतृिहातल्या मुलींची ही पार्श्वभूमी पाहिली की अशा भिरकावून दिलेल्या स्थितीत या हसतात तरी कशा, असा प्रश्न मला दर वेळी पडायचा. असे नवे नवे प्रश्न समजून घेता घेताच एक वर्ष संपलं.
***
मी यमगरवाडीहून पुण्याला परतले, पण या मुलींशी माझं नातं मात्र आणखी काही काळ चालू राहणार होतं.
त्याच वर्षी यमगरवाडीतल्या काही मुलींना पुण्यातल्या वसतिगृहांमध्ये शिकायला ठेवायचं ठरलं. काहींना सेवासदनच्या शाळेत, तर काहींना कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेत. सगळ्या मिळून 20-25 मुली. या मुलींना मी ओळखत होतेच. पण यमगरवाडीत त्या शंभरातल्या वीसजणी होत्या. पण इथे त्यांच्या ॲडमिशनसाठी फेऱ्या मारणं, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करणं, त्यांच्या वसतिगृहांची सोय लावणं, त्यांची खरेदी करणं यामुळे या पोरींशी जास्त जवळीक झाली. यमगरवाडीत मी पाहुणी होते. आता इथे त्यांची लोकल गार्डियन. तिथे त्या मला चाचपत होत्या, माझी मर्जी सांभाळत होत्या. आता इथे मी त्यांची हक्काची माई होते. मुख्य बदल झाला होता तो वातावरणात. यमगरवाडीला घरापासून लांब राहत असल्या तरी तुलनेने त्या एका सुरक्षित कोषातच होत्या. त्यांनी तिथे त्यांचं स्वत:चं असं एक जग तयार केलं होतं, आणि तेव्हा मीच त्यांच्या या नव्या जगाला एक्स्पोज झाले होते. पण इथे मात्र पहिल्यांदाच त्या इतर मुलींच्या संपर्कात आल्या होत्या. बाहेरचं जग त्या पाहत होत्या. भटके-विमुक्त हे नावही न ऐकलेल्या मुलींसोबत वावरत होत्या. त्यात ॲडजस्ट होणं त्यांना अवघड जात होतं, आणि त्यामुळे मलाही.
या मुलींच्या वसतिगृहात दर रविवारी पालकांच्या भेटीचा वार असायचा. मुलींचे पालक दर रविवारी इथे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे लोकल गार्डियन म्हणून रविवारचे ते काही तास मला काढून ठेवावेच लागायचे. यमगरवाडीला मोकळ्या हवेत धुडगूस घालणाऱ्या या पोरी आठवडाभर बंद खोल्यांमध्ये राहून अक्षरशः वैतागायच्या. पण ही तडजोड फारच क्षुल्लक वाटावी अशी परिस्थिती या वसतिगृहांमध्ये होती. तशीही अशा ठिकाणी मुली-मुलींमध्ये भांडणं होतच असणार. पण या भटक्या-विमुक्तांच्या मुली म्हटल्यावर दोन्ही बाजूंनी समजुतदार-पणाचा आनंदीआनंद असायचा. आमच्या पोरी तर कायम इरेलाच पेटलेल्या असायच्या. जरा त्यांच्या शेपटावर पाय पडला की त्या चवताळून उठायच्या. इतर मुलींच्या दृष्टीनेही आमच्या पोरी म्हणजे आयतं गिऱ्हाईक होत्या. अनेकदा वसतिगृहातल्या मेट्रन्सनाही ‘मुलींची पार्श्वभूमी बघा आणि मग त्यांच्या बाबतीत जजमेंटल व्हा' हे सांगणं कळायचं नाही. ‘तुमचं सगळं बरोबर आहे हो, पण आम्ही तरी किती सहन करायचं?' असा त्यांचा धोशा असायचा. त्यामुळे प्रत्येक रविवार हा या गोंधळातच सरायचा.
घरची-यमगरवाडीची आठवण, त्यामुळे येणारी असुरक्षितता, दारिद्य्रातून येणारी हतबलता, अचानक शहरी शिक्षणाच्या स्पर्धेत आणून सोडल्याने उडालेली भंबेरी, आजवर ती स्पर्धाच अनुभवलेली नसल्याने येणारा न्यूनगंड, एकमेकींतली भांडणं, इतर मुलींकडून होणारी हेटाळणी, भांडकुदळ-चोरट्या म्हणून मारले जाणारे शिक्के आणि त्यांच्या वयानुसार जन्मणारी आकर्षणं, अशा भोवऱ्यात या मुली अडकल्याचं मला कळत होतं, पण त्यातून त्यांची सुटका करणं माझ्या हातात नव्हतं. कदाचित कुणाच्याच हातात नसावं. प्रवाहाच्या विरुद्ध त्या पोहत होत्या आणि मी फक्त काठाकाठाने चालत होते. मी सोबत आहे, असं म्हणणंही चुकीचं होतं. कारण मी पाण्यात उतरलेलीच नव्हते. दोन वर्षं त्यांची ती धडपड बघत राहणं यमगरवाडीतल्या दिवसांपेक्षाही कठीण होतं.
त्यातही काही मुलींनी परिस्थितीशी तडजोड केली आणि या नव्या वातावरणाशी जुळवून घेतलं, पण काहीजणींना नाहीच जमलं ते. आणि त्यात त्यांची काही चूक नाही आणि त्या कुठेही कमी नाहीत, हे मी त्यांना पुरेसं पटवू शकले की नाही कोण जाणे! बहुतेक नाहीच. कारण तसं असतं तर सीमासारख्या मुलीने अवघ्या तेराव्या वर्षी स्वतःला संपवलं नसतं.
यमगरवाडीत राहून आल्यापासून माझ्या डोक्यात हा किडा कायम वळवळत असायचा. या मनस्वी आणि आक्रमक पोरी. कुणी पळून जाणार नाही ना, कुणी आपल्या जिवाचं काही बरं-वाईट करणार नाही ना, अशी भीती कायम घर करून असायची; पण त्यांच्याशी तसं थेट बोलणं शक्यच नव्हतं. आणि थेट बोलण्याचा उपयोग तरी काय? आपण मुलींना किती समजून घेतो, त्यांना किती प्रेम देऊ करतो यानेच कदाचित काही फरक पडला असता. त्यातल्या काही मुली कायम काट्यावर आलेल्या असायच्या. त्यांच्याबद्दल मी थोडी जास्त जागरूक असायचे. त्यांच्याकडून फोन आला की उशीर न करता धावत-पळत शाळेत पोहोचायचे. त्यांच्या मेट्रन्सशी त्यांच्या चढ-उतारांबद्दल बोलत राहायचे. तसं वरवर तरी सगळं सुरळीत सुरू होतं. मुली हळूहळू रुळत होत्या, शिकायचा प्रयत्न करत होत्या.
पण जणू ती वादळापूर्वीची शांतता होती. त्या वादळाचा एकदा मोठाच झटका बसला. छाया वसतिगृहातून पळून गेली, तेही संध्याकाळी. त्यांच्या मेट्रन बाईंचा फोन आला तो वैतागूनच. तिला शोधा आणि परत आणू नका, एवढंच म्हणणं त्यांनी बाकी ठेवलं होतं. आता एवढ्या मोठ्या पुण्यात हिला शोधायचं तरी कुठे? माझं तर डोकंच चालेना. आम्ही कार्यकर्ते रात्रभर तिला शोधत फिरलो. एस. टी. स्टँड पालथे घातले, स्टेशनवर पाहिलं; पण चमत्कार व्हावा आणि छाया समोर उभी दिसावी, असं काही झालं नाही. शेवटी रात्री उशिरा भोसरीच्या एका संस्थेतून फोन आला, “पोलिसांनी एका मुलीला आमच्याकडे सोडलंय. तिने तुमचं नाव सांगितलं. येऊन खात्री करा आणि उद्या घेऊन जा.” तरी तिला बघेपर्यंत माझं मन थाऱ्यावर नव्हतं. आम्ही गेलो तेव्हा माझ्या मनात इतके उलटसुलट विचार येऊन गेले होते की तिला सामोरी जायला मीच घाबरत होते. तिच्यावर रागावून उपयोग नव्हता. रागावण्याचा मला अधिकारही नव्हता. पण तरीही माझ्या मनात प्रचंड काही तरी खदखदत होतं. तुला बाकीच्यांच्या काळजीची काही किंमत नाही का, असं तिला झडझडून विचारावं असं वाटत होतं. पण तिच्यासमोर गेले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काही तरी वेगळंच होतं. ना त्यात अपराधीपणा होता ना व्याकुळता होती. ना स्वतःची चिंता ना दुःख. फक्त आयुष्य उधळून लावण्याची तयारी. तिचं ते रूप बघून तिच्याशी बोलण्यासाठी गोळा केलेले सगळे शब्द मी विसरून गेले. हिच्या मनातल्या वादळाचा आपल्याला पत्ताही नसताना हिला कोणत्या आधारावर ‘असं वागू नको' असा पोकळ सल्ला देणार? आणि ते वादळ समजून घेतलं तरी ते थोपवण्यासाठी आपण काय करणार? मला प्रचंड हेल्पलेस वाटत राहिलं.
अर्थात छायाच्या बाबतीत हा धक्का तसा अनपेक्षित नव्हता. पुण्यातल्या शाळेशी जुळवून घेणं तिला काही केल्या जमलं नव्हतं. यमगरवाडी आणि इथल्या शिक्षणातलं अंतर भरून काढू शकेल इतकी ती हुशार नव्हती. तसं करण्याची इच्छाही तिच्यात नव्हती. त्यामुळे आला दिवस ढकलणं सुरू होतं, आणि तेच अंगावर येणारं होतं. शाळेत कधी अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे बोलणी खायची, तर कधी वर्गात लक्ष नसल्यामुळे. वसतिगृहावरही भांडणं, टोमणे, हेवेदावे सुरूच असायचे. त्यात तिच्या डोक्यात आणखी काय काय सुरू असेल हे तिचं तिलाच माहिती. मी भेटायला गेले की बाकीच्या मुली किमान थोडा वेळ तरी माझ्याशी आनंदाने गप्पा मारायच्या आणि मग तक्रारी ऐकवायच्या. छाया मात्र कायम रुसलेली-फुगलेली असायची. ‘मला यमगरवाडीला नेऊन सोडा' म्हणून मागे लागायची. दर वेळी तिची समजूत काढणं मला जमायचंच असं नाही. या पळून जाण्याच्या प्रकरणानंतर परत वसतिगृहात सोडल्यावर तर तिची रयाच गेली.
छाया असं करू शकते याची किमान कल्पना तरी होती. पण सीमा? या सगळ्या गोंधळात ती बऱ्यापैकी मानसिक संतुलन राखून असायची. तीही फारशी हुशार नव्हती, पण तिची धाकटी बहीण अभ्यासात चांगलीच तेज होती. वयाने लहान असल्याने ती शाळेत लवकर रुळली होती. या छोट्या बहिणीची काळजी हे सीमासाठी एक कामच होतं. सीमा तरी अशी कुठे मोठी होती? सातवीतच तर होती ती. तीही इतर मुलींसारखी भांडायची, रडायची, चिडायची; पण ते सगळं तेवढ्याच पुरतंच असायचं. तिला समजावून सांगितलं, की खुदकन हसायची आणि नव्याने जगू लागायची. त्यातल्या त्यात तिच्या बहिणीने समजावलं की तिची कळी खुलायची. बाकीच्या मुलींचे प्रश्न इतके होते की त्यात सीमाचं वागणं अगदीच नॉर्मल वाटायचं मला. ती असं करू शकेल असं कधी डोक्यातही यायचं नाही. पण आता लक्षात येतं, या मुलींच्या डोक्यात इथल्या जगाबरोबरच त्यांचं स्वत:चं पारधी विश्वही सतत फिरत असायचं. कधी तरी एखादीची आई भेटायला यायची आणि सगळ्या मुलींच्या घरादाराबद्दल माहिती देऊन जायची. या लहान पोरींसमोर काय बोलावं-काय बोलू नये, असे काही नियम त्यांच्या जगात नव्हतेच. कुठून कुठून बऱ्या-वाईट बातम्या त्यांना कळत राहायच्या. त्यांच्या डोक्यात मग तेच विचार चालू राहायचे. आपण इथे आरामात दोन वेळा पोटभर खाऊन राहतोय आणि तिकडे आई-वडिलांची उपासमार चालू आहे, याचं वाईट वाटून त्या जीव काढायच्या. कधी गावाकडे देवाची पूजाबिजा आहे आणि मी मात्र इथे तुरुंगात अडकून पडलेय, असं वाटून खंगत राहायच्या. सीमाच्याही डोक्यात असं काही तरी सुरू होतं, जे मला कधी कळलंच नाही.
एके दिवशी पहाटे पहाटे फोन आला, सीमा उंदीर मारण्याचं औषध प्यायली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. मी तिथे गेले तेव्हा ती कोमामध्ये होती. केवढीशी दिसत होती ती! एवढी लहान मुलगी आत्महत्या करू शकते? हिने काय विचार करून हा निर्णय घेतला असेल? त्या विचारांनी मी बधिर झाले. तिथे थांबून काहीच उपयोग नव्हता. मग मी थेट इतर मुलींकडे गेले. त्यांना याचा कितपत धक्का बसला असेल याची मला काळजी वाटत होती, पण सीमाच्या त्या अवस्थेपेक्षा मुलींच्या प्रतिक्रिया पाहूनच मी गळपटले. त्या निर्विकार होत्या... दुसऱ्यासाठी करण्याचं सगळं दुःख करून संपल्यासारख्या. स्वतःचा फ्रॉक फाटला तर दुसरीचा जीव घ्यायला तयार असलेल्या. पण जिवाभावाची मैत्रीण मृत्यूशी झुंज देत असताना शांतपणे ‘खायला काय आणलंत?' असा प्रश्न विचारणाऱ्या. त्यांच्या वागण्याचा अर्थ मला थोडा थोडा कळत होता.
मुलींना भेटून बाहेर पडताना फोन आला, सीमा गेली. ती वाचणार नाही याचा अंदाज आला होता, पण तरीही कुठे तरी मनात आशा होती. हे सगळं स्वप्न असावं असं वाटत होतं. सगळं रिवाइंड होऊन या मुली यमगरवाडीहून इथे आल्या तिथेच पुन्हा काळ येऊन ठेपावा असं वाटत होतं. त्याने असा काय फरक पडला असता माहिती नाही, पण सीमाला आणखी एक चान्स मिळायला हवा होता. पण आता तसं काहीही घडणार नव्हतं.
पुढचा दिवस पोस्टमॉर्टेम होऊन सीमाची बॉडी हातात मिळवण्यात गेला. त्या हॉस्पिटलमध्ये ताटकळताना बरोबर कार्यकर्ते होते, पण कुणाचीही एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. सगळे शांतपणे वाट पाहत होते.
खूप वेळाने सगळे सोपस्कार आटोपले आणि तिची बॉडी ओळखण्यासाठी आम्हाला मॉर्गमध्ये बोलावलं होतं. मी तर पूर्णपणे सुन्न झाले होते. रडणं तर लांबच. माझ्या मनात त्या वेळी बहुतेक सीमाचाही विचार नव्हता इतकी सुन्न. आत गेल्यावर सीमाचा चेहरा दिसला. ‘हीच ना?' या वॉर्डबॉयच्या प्रश्नावर मी यांत्रिकपणे मान हलवली. सोबतच्या कार्यकर्त्यांनी बॉडी ताब्यात घेतली आणि मी तिथून बाहेर पडले.
त्यानंतरही काही दिवस मुली वसतिगृहात शिकत होत्या. मी त्यांना भेटत होते, त्यांच्या अडचणी ऐकत होते. त्यांना समजावत होते, स्वतःलाही समजावत होते. ही एक पिढी कदाचित अशीच संपेल, पण त्याच्या पुढची पिढी वेगळी आशा घेऊन उगवेल, असं स्वतःला सांगत होते.
पुढे प्रभुण्यांनी चिंचवडला नवी शाळा आणि वसतिगृह उभारलं. मुली त्या शाळेत गेल्या, काही तिथल्याच कॉलेजात गेल्या. त्यामुळे आपसूकच भेटी कमी होत गेल्या. मीही आपल्या आपल्या कामात गुंतत गेले. कुणाकुणाकडून मुलींच्या फक्त बातम्याच कळत राहिल्या.
***
आपला समाज बघण्याच्या ओढीने मी यमगरवाडीला गेले होते. या मुलींमुळे मला माझ्यापलीकडचं, आजवर माझ्या दृष्टीने अस्तित्वातच नसलेलं एक जग दिसलं. या मुलींमुळेच त्या जगाशी माझं कायमचं नातंही जोडलं गेलं.
(टीप- २०१३च्या ‘अनुभव’ दिवाळी अंकातून साभार. लेखातील मुलींची नावं बदललेली आहेत.)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.