आम्ही कोण?
ललित 

अगोचर

  • प्रशांत खुंटे
  • 01.02.25
  • वाचनवेळ 18 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
agochar

‘आजचा दिवस अखेरचा असेल तर? तर, मी काय करेन? मी सकाळचा चहा घेईन आणि कदाचित संध्याकाळी सूर्यास्त पाहीन.' डोंगरात एक छानसा दगड पाहून त्यावर मी निवांत बसलो तेव्हा हे वाटलं. उद्देश नसलेला तो दिवस कदाचित हाच असू शकतो. कधी कधी अचानक वाटतं, मी मेलोय की काय? विशेषत: मी सलग कुणाकुणाला फोन करतो. रिंग जाते. लागोपाठ प्रतिसाद येत नाही. एक बीझी असेल, दुसराही कसा असू शकतो? असं वाटून मन म्हणतं, ‘कदाचित तू मेलाय, नि तुला खबरही नाही!' मग वाटतं, ‘कदाचित ते वेगळ्या अवकाशात आहेत. तू तिथे मेलाय' हे अधिक योग्य. असं भान येतं, पण हुश्श वाटत नाही. उलट वाटतं, चांगलंच आहे की गायब होणं. तू आहेस असं तुला सतत वाटतं, पण कायम नाहीस हेच खरं! बॅकसीटवर बैस. खिडकीतून पाहा, झाडं-गावं मागे मागे धावतात तसाच तूही जात जा उलट उलट. रिव्हर्स मोडमध्ये. पुढे चल. ही भावना मला डोंगरातल्या खडकावर बसून आली.

बुद्धासारखा कुशीवर लवंडलेला आडवा डोंगर, वर निरभ्र पोकळी. ‘माणसाला डोक्यावर छप्पर नसतं' ही संवेदना मेंदूत उतरता उतरता मी अति लहान झालो नि मला दिलं गेलेलं एक संबोधन आठवलं. भीमबाई म्हणायची, “हे पोरगं आघुचर है.” आम्ही गरीब होतो तेव्हाची ही आठवण. वडील गवंडीकाम करायचे. आई गोधड्या शिवायची. एक गोधडी शिवायला आईला पंधरा दिवसांचे श्रम पडत. त्याचे तिला तीस रुपये मिळत. अशा कष्टांतून आईने घरात एक-एक भांडं जमवलं. आई एक पाय दुमडून एक पसरून गोधडी शिवतीये. सुई टोचू नये यासाठी तिच्या बोटांना चिंध्यांची गुंडाळी आहे. तरी गोधडीच्या खालच्या पदरातून खच्चकन सुई बोटात घुसते. टचकन रक्ताचा पूर्णविराम वर येतो. इतक्या दुरूनही शिळेवर बसून मला ते चित्र दिसतंय. माझ्या खांद्यांना जणू पंख फुटलेत. मी मरून भूतकाळात विहरतोय. आदी-मध्य-अंत ना इथे दिशा. केवळ तो रक्ताचा लाल ठिपका. आईच्या कष्टांचं बिंब. ते माझं अन्न. त्यावर माझं पोषण झालं.

सुम्म उन्हं पडलीयेत. भीमबाई आईशी गप्पा मारत बसलीये. जाड्याभरड्या आवाजात भीमबाई आंबेडकरांवर तिने रचलेली गाणी गातेय. ‘नवकोटाचा राजा' असं काही ती आंबेडकरांना उद्देशून गातेय. मला आंबेडकरांची तसबीर दिसते, टाय-कोटातली. भीमबाई आंबेडकरांच्या कोटाबद्दल गातेय का? की असंख्य पददलितांच्या राजाचं चित्र ती रेखाटतेय? मला बोध होत नाही. भीमबाईचं पानाने रंगलेलं तोंड, तिच्या नाकातल्या केसांत चिकटलेले तपकिरीचे कण, सुरकुतलेली चामडी असलेला जाड गळा. गाताना उरोजांवरून हलणारं मंगळसूत्र नि काळी दुपदरी पोत. कुरळ्या-काळ्या-चंदेरी केसांवरचा नऊवारी सुती साडीचा पदर दिसतो.

समोर आई एक-एक जुना शर्ट, फ्रॉक, साडी निगुतीने सैल करतेय. ती फडकी शेणाने सारवलेल्या जमिनीवर अंथरतेय. आई जणू आता जगाचा नकाशा शिवून जोडून टाकेल. पार्श्वसंगीताला भीमबाईची गाणी. सगळी ठिगळं एक होऊन उबदार गोधडी बनेल... नि एवढ्यात पंख सैल सोडून खाली खाली तरंगत येत पाय लांबवत मी जमिनीवर धडकतो. पसरलेल्या चिंध्यांत माझा पाय अडकतो. वीण उचकटते. दोऱ्याच्या गुंडीला ठोकर बसते. दोरा उलगडत गुंडी पळते. हा अपराध. तो पाहून भीमबाई गाणं थांबवून मला म्हणते- “आघुचर!”

वडिलांच्या गवंडीकामावरून शेजारचे एकजण आम्हा भावंडांना ‘थापी' चिडवायचे. ते गृहस्थ वायरमन. त्यांच्या घरात टी.व्ही. नवनव्या गाण्यांच्या रेकॉर्ड्‌‍स त्यांच्याकडे असत. वडील पायजमा-सदरा घालत. ते गृहस्थ पँट-बुशशर्ट. असा माणूस वडिलांवरून मला थापी म्हणायचा. माझा संताप व्हायचा. वडिलांच्या सायकलीवर सिमेंट-वाळूने माखलेलं पोतं असे. त्यात त्यांची हत्यारं असत. त्यातली थापी पाहूनही मला राग यायचा. सात-आठ वर्षांचं पोर. राग कसा काढणार? मोठ्या माणसांना उलटूनही बोलता येत नाही. त्यामुळे असेल, माझ्या अंतर्गात्रांत अस्वस्थता भिनली असेल. मी सतत पळत असे, धडपडत असे. मी मायबाप-घर-गरिबीचं लांच्छन यापासून पळत होतो का? माणूस स्वतःपासून किती पळणार? अशा पळण्यातूनच मला ज्ञान झालंय- कष्टकऱ्यांच्या लेकरांना हिणवू नये. माणसाच्या मनावर दारिद्र्‌‍याच्या खुणा कायम भळभळत राहतात. हिस्टेरिकल होतो मग आपण. ‘पैसा झाला मोठ्ठा' यासारख्या बडबडगीतांचा बालमनावर भलता अर्थ उमटत असावा. माझी सल मलाही कळत नसावी. त्यामुळे असेल, पळता-धडपडता माझ्याकडून घरात सांडलवंड व्हायची. मग बोलणी बसायची. भीमबाईने या वागण्याला ‘अगोचर' नाव दिलेलं. पोरगं आहे तिथे नाहीच. अजूनही माझं चित्त मी आहे तिथे क्वचितच असतं. मी एक ऐंद्रिय नि दुसरा सेंद्रिय. संरचनेत भेसळ नसलेला एकजण माझ्यासह वावरतो, अदृश्य रूपात.

आत्ता मी या डोंगरात बसलोय. वारा अंगाशी येतोय. शर्टाची कॉलर हवेने फडफडतेय. आभाळ मिटल्या डोळ्याने धरणीवर वाकलंय; पण मी इथे नाही. दुसराच कुणी ढगांच्या गाईला वासरू बनून लुचतोय. मला स्थिती येतेय. दूरच्या पळसाची भगवी फुलं पाहून वाटतं, भिख्खूंचा संघ बुद्धाला घेरून बसलाय. असं म्हणतात, एक दिवस तथागतांकडे एक माणूस आला. बुद्ध शिष्य आनंदसोबत झाडाच्या छायेत बसलेले. ती व्यक्ती जवळ येऊन म्हणाली, “जे कथन करता येत नाही ते ऐकवाल?” तथागतांनी स्मित केलं, डोळे मिटले. तो माणूसही डोळे मिटून बसला. काही तरी स्निग्ध त्या दोघांत पाझरू लागलं. ‘शब्देविण संवादु' अशी स्थिती गती. भंते आनंद या दृश्याकडे विस्मयाने पाहतोय, जसा मी ढगांना पाहतोय. त्या शांत सरोवरात खडा मारून मी विचारलं, “तथागत, अशा संवादास मी लायक आहे?” ती व्यक्ती बुद्धाशी नि:शब्द संवादून तृप्त. त्या माणसांत काही तरी काठोकाठ भरलं नि डोळ्यांतून पाझरू लागलं. बुद्धाचे मिटले डोळे अजूनही मिटलेलेच. मला नि भंते आनंदनाही काहीच बोध होत नाही नि दूर कुठून तरी भीमबाईच्या गाण्यांचे जाडेभरडे सूर येताहेत. भीमबाईला मरून कित्येक वर्षं झाली, तरी ती नि:शब्द गाणी कुठूनशी ऐकू येतात. भीमबाईचा एक पोरगा खूप दारू प्यायचा. तोही गल्लीबोळांत भेलकांडत काही तरी गात भटकायचा. तोही मेला. तरी या क्षणी मला तोही दिसतोय.

इतक्यात ‘बसलाय जणू' असे शब्द कानांवर पडले. भानावर येत पाहिलं, तर एक मेंढपाळ. त्याच्यामागे शेरडं. मी ‘हो' म्हणून फक्त हसलो. मेंढपाळ वाटेला लागला. बकऱ्या वाटेतली झुडपं हुंगत-चरत मेंढपाळामागे चालू लागल्या. मी पुन्हा क्षितिजाकडे पाहिलं. हा मेंढपाळ डोंगर उतरून खाली पोहोचेल. तिथून मी बसलोय तिथे त्याला क्षितिज दिसेल. मला दिसतंय ते क्षितिज दूर तिकडे. आपण पाहतो तिथून वेगळं क्षितिज दिसतं; पण क्षितिज असं काही नसतंच. क्षितिजही अगोचरच.

बुब्बुळं कपाळात जातात तेव्हा डोळ्यांत दिसतं. तेही एक क्षितिजच! माझी बुब्बुळं अशी अंतर्धानात गेलेली मी पाहू शकत नाही. पण आईने माझे डोळे पांढरे होताना मला पाहिलंय. तो रमजानचा महिना असावा. पहाटे फकीर डफ वाजवत गल्लीतल्या मुस्लिम घरांना सेहरीची वर्दी द्यायला येत. अंधारात डफ-खंजिरीचा तो स्वर भेसूर वाटायचा. फकिरांच्या गाण्याला त्या दिवशी मी भ्यायलो. पाच-सहा वर्षांचा असेन तेव्हाची गोष्ट. त्या काळी घरोघरी वीज नसे. रात्री झोपताना रॉकेलचा टेंभा विझला की गुडूप अंधार पसरे. मला जुलाब लागलेले. अंधारात मी परसाला बसलेलो. इतक्यात फकीर गात येऊ लागला. त्याला भिऊन मी पळून आलो. नंतरचं दृश्य आठवतं... मी आईच्या मांडीवर आहे. वडील दारूच्या नशेत अंधारात घोरताहेत. आईने शेगडी पेटवलीय. तव्यावर वीट तापवून ती माझ्या पोटाला शेकतेय. माझं त्राण जातंय. आई वडिलांना उठवतेय. नि क्षणात माझी बुब्बुळं कपाळात गेली. आई रडू लागली. या आठवणीत मी आई-वडिलांच्या मांडीवर तेव्हाच मेलो होतो. वडिलांनी बहुतेक धावपळ करून रिक्षा आणली. माझं मुटकुळं झालेलं शरीर आईच्या मांडीवर. बाकी काहीच का आठवत नाही आता? गर्भात गुडघे माथ्याला लावून जसा मी बेंबीचं केंद्र शोधत असेन तसा आईच्या मांडीवर त्या रिक्षात होतो. तेव्हाचं ते कलेवर पाहत. मी इथे पाय पोटाशी घेऊन बसलोय.

इतक्यात माझं लक्ष मेंढपाळाच्या मागे राहिलेल्या एका बकरीकडे गेलं. मेंढपाळ काही अंतर चालून गेलेला; पण त्याची एक बकरी माझ्याजवळच थांबून बेंबटू लागली. मी पाहिलं, तर तिच्या शेपटामागे चिकट-लेंड्यांसारखं रक्त लोंबतय. मी मेंढपाळाला ओरडून सांगितलं, “अहोऽ, हिला रक्त येतंय.” तो माझ्याकडे न पाहताच म्हणाला, “ती येलीय.” नि तो तसाच पुढे चालत राहिला. मेंढपाळाने छातीशी तिची पिल्लं धरल्याचं माझ्या लक्षातही आलं नाही. बकरीचं बे बे पार्श्वसंगीत ऐकत मी पुन्हा भुतात विरत गेलो.

फार माणसांत असलो की मी गोंधळून जातो. एकटा असल्यावरच मला सुख वाटतं. बकरीने ओरडून ओरडून मला बैचेन करायला सुरुवात केली. असं का होतं माझ्याशी? बकरीच्या शेपटाखालचा चिकट स्राव. तिच्या शरीरातून तो सुटेना. ती कण्हून तो पदार्थ-रक्त शरीराबाहेर सोडू पाहतेय. ओरडतेय. मला वाटलं, मी पुन्हा गजबजाटात आलोय. थोड्या वेळाने बकरी मेंढपाळ आला होता त्या उलट दिशेला गेली. मेंढपाळामागे का गेली नाही ही?

मला शांती आली. पुन्हा मी मनात पाहिलं. समोरच्या रानातले दगड दिसले. एका दगडावर बुरशीचे चट्टे दिसले. ते चित्रविचित्र आकार पाहून वाटलं, दगडांवर जागोजागी बुरशीच्या वसाहतीच आहेत. त्यातले अतीसूक्ष्म जीव कदाचित मला पाहतही असतील... असं वाटलं नि मनात जणू दीप उजळला. ही एक माझी फेवरेट भावावस्था आहे. ती कधीकधीच येते. सांजवाती-देवळातले मंद दीप पाहिले की मनात मंजूळ काही तेवतंय असं वाटतं. या भावनेच्या उलट कधीकधी मनात काही करपतंही. जसं- बेवारस मांजराच्या पिलांचं ओरडणं किंवा कुणाचंही रडणं मला फार फार अस्वस्थ करतं. हे सर्व मनात कुठून येतं?

अलीकडचीच एक गोष्ट. एका गावात एक बाई भेटल्या. त्यांचा तेरा वर्षांचा मतिमंद मुलगा जमिनीवर लोळत पडलेला. हे मूल तीन महिन्यांचं होतं तेव्हा बाईंचा नवरा अपघातात मेला. तेव्हापासून बाई गावातल्या बायकांची पोलकी शिवून या मुलाचं संगोपन करतेय. बाई म्हणाली, “हे पोरगं, मी नेलं तरच उंबऱ्याबाहेर येऊ शकतं.” म्हणजे आई नि उंबरा हेच त्या पोराचं गाव. पण बाई सांगते, “गावात दूर कुणी ल्हान पोरान्ला मारत असलं की हे रडतं. जनावराला मारलं की हे ओरडतं. त्याला कुणाला मारलेलं आवडत नाय. सगळं कळतं त्याला...” मला वाटलं, ते पोर म्हणजे एक बुद्धच. हातापायांचे वेडेवाकडे विक्षेप करत लोळणारा, भाषेतले शब्द बोलू न शकणारा, दु:खाचा आशय समजलेला. बुद्ध! त्या पोराचं ते अगोचर अस्तित्व मला अजूनी दिसतं. त्या मुलाची बुब्बुळं इतकी अस्थिर की त्याचं आधारकार्ड निघूच शकत नाही. मला कळत नाही, हे चांगलं की वाईट?

कुत्र्या-मांजरांना कुणी हाड हाड केलं की माझाही जीव तुटतो. मला वाटतं, ही सगळी माझ्यातील अगोचराची स्वभावलक्षणं. या विचारात मी पुन्हा भूत झालो. एक आठवण पलीकडून तरंगत ऐलतीरावर आली.

मी कार्यकर्ता बनून आदिवासी खेड्यांवर जायचो तेव्हाची गोष्ट. माझ्याकडे तेव्हा काळी राजदूत मोटरसायकल असायची. हेल्मेट घालून मी गावात धुडधुड आवाज करत शिरायचो. त्या आवाजाने आधी गावातली कोंबडी-बकरी दूर पळू लागायची. एखाद्या खोपटासमोर नागडी आदिवासी पोरं दिसायची. मी गाडी स्टँडवर घेऊन उतरताच ती पोरं भोकाड पसरून रडू लागायची. ते रडं असहायपणे पाहताना काळजाचं पाणी व्हायचं. कुठून आपण यांच्यासमोर आलो, असं व्हायचं. हेल्मेट घातलेला माणूस ती कदाचित पहिल्यांदाच पाहत असावीत. त्यांना मी राक्षस वाटायचो की काय कोण जाणे! म्हणून मी गावात जायला निघतानाच आल्पेनलिबेची भरपूर चॉकलेटं खिशात न्यायचो; पण ती पोरं चॉकलेटं घ्यायलाही भ्यायची. कधी कधी चॉकलेट घ्यायला विसरायचो. मग मी गावातील दुकानातून लिमलेटच्या गोळ्या घ्यायचो. त्या गोळ्या खूपच स्वस्त-चिकट असत. तो कमअस्सल खाऊ पोरांच्या हाती ठेवताना मला खूप अपराधी वाटायचं.

एकदा असाच खेडोपाडी फिरून मी रात्री संघटनेच्या ऑफिसवर आलो. ऑफिस म्हणजे ब्रायनभाऊचं घरच होतं. ब्रायनभाऊ संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता. त्याचं कुटुंब आॉफिसलगतच्या खोलीत असे. लगतच्या खोलीत आम्ही ‘पार्टटाइम' कार्यकर्ते कधीमधी राहायचो. हे ऑफिस एका पारशी माणसाने दान दिलेल्या जमिनीवर बांधलेलं. तिथे म्हणे पूर्वी कब्रस्तान होतं. समोर खाडीत वाढलेलं गचपण. दूर पलीकडे नगरपालिकेने बांधलेलं स्मशान. त्या स्मशानात प्रेत जळत असलं तरच तिथलं अस्तित्व जाणवे. बाकी अंधार गुडूप. आदिवासी कार्यकर्ते म्हणत, “कधी कधी रात्री खाली गाडलेली प्रेतं ऑफिसच्या छपरावर चढून टहलतात.” त्या दिवशी ब्रायनभाऊ ऑफिसवर नव्हता. मी एकटाच बाहेर काही तरी खाऊन आलो.

खाडीपलीकडच्या स्मशानात जळणाऱ्या प्रेताचा गंध इथवर येत होता. उबग आणणारी दमट हवा. मानेवर घाम सुकून चढलेली पुटं बोटांनी रगडत मी काही वेळ अंगणात बसलो. मग कंटाळून खोलीत दिवा विझवून झोपलो. नक्की सांगता येत नाही, ते स्वप्नच होतं की खरं. कारण मला सगळं अजूनही स्पष्ट आठवतं. मी बसलो होतो त्याच ओट्यावर एक आकृती बसलेली. तो एक धिप्पाड आदिवासी पुरुष होता. त्याचं टक्कल असलेलं डोकं खाली झुकलेलं. साईबाबासारखा पाय दुमडून तो हाताने पायाचा तळवा रगडत होता. अंगावर फक्त लंगोट. मी अंगणातला बल्ब लावण्यासाठी बटन शोधू लागलो; पण बटनापर्यंत हातच पोचेना. मी धडपडत बटनापर्यंत जायचा प्रयत्न केला. इतक्यात ती आकृती उठली. त्या धिप्पाड देहाने सणकन मला कानाखाली मारली. हेलपाटून मी जमिनीवर पडलो. जागा झालो तेव्हा मी गाल चोळत होतो. आत्ता कुणी तरी कानफटात लगावल्याची अपमानास्पद जाणीव लख्ख जाणवत होती. मी चॉकलेट्‌‍स न्यायला विसरतो, या अपराधाची ती शिक्षा असावी असं मला अजूनही वाटतं. नेणिवेने मला दिलेला तो अपराधबोध असावा. अगोचराने अन्यायाची मला दिलेली ती सजा असेल. या निर्णयापर्यंत येऊन मी उठलो. बकरी गेली त्या दिशेला चालू लागलो.

कबीर म्हणतात, ‘मैं जानूँ मन मरि गया, मरि के हुआ भूत। मूये पीछे, उठि लगा, ऐसा मेरा पूत॥' मला वाटतं, मन मेलं. मला नाही कशात रस; पण मन भूत बनून पुन्हा पुन्हा उठतं. तद्वत, मनातलं कुतूहल मला बकरीकडे खेचू लागलं. तिचं दूरहून येणारं बेंबटणं बोलावतंय असं वाटलं. आवाजाच्या दिशेने चालताना आयुष्यातला एक तुकडा मनातून वर सरकत आला.

साधारण पाच वर्षं मी रोज दारू प्यायलो. माझ्या स्वप्रतिमेपासून विसंगतसं. या काळात गालिबचा एक शेर राहून राहून माझा पाठलाग करायचा- न था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता, डुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता... मला या ओळीतला अर्थही नीटसा लागत नव्हता. सततच्या खजील अवस्थेत मला वाटायचं माझं असणंच दुःखद आहे.

नैराश्याने हळूहळू माझ्यावर पकड घेतलेली. झोप उडालेली. रात्रभर पुस्तक वाचून सकाळी सहाला डोळा लागायचा. सातला पुन्हा जाग. महिनोन्‌‍ महिने मी जागाच. झोपेच्या गोळ्या, मैलेोन्‌‍मैल चालणं, हिप्नॉटिझमचं शिबिर, त्यांचे आदेश देणारी सीडी ऐकणं, कशाचाच उपयोग झाला नाही. मग मला दारू सापडली. आधी नाइंटी, मग क्वार्टर, नंतर क्वार्टर-नाइंटी. प्रमाण वाढतच गेलं. एका मित्राने सांगितलेलं, “एकट्याने पिऊ नये.” मला ते पटलं. मग कसं कुणास ठाऊक हे सुचलं असेल, मी एकटाच बसून दोन पेग भरायचो. एक माझा, दुसराही माझाच. माझी मलाच सोबत. जणू कुणी अगोचर माझ्यासह प्यायला बसायचा.

दोन पेग पोटात गेले की मग अगोचर सहोदरच उरायचा. मी नसायचोच बहुतेक. मग मोबाइल हातात यायचा. कुणाकुणाला फोन-एसएमएस जायचे. हे सगळं बेरात्री. सकाळी उठल्यावर पाहिलं तर मेसेज डिलीट केलेले. ब्लँक कॉल्स. मी प्यायला बसण्याआधी माझ्यापासूनच फोन लपवायचा प्रयत्न केला, नेहमी कॉल्स जातात त्यांचे नंबर डिलीट केले; पण निष्फळ. ब्लॅक आऊट अवस्थेत, मला कुणाला कुणास ठाऊक काय मला सांगायचं असायचं. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे सकाळी प्रचंड भीती वाटायची. दिवसा मी त्या अपराधभावाने खचलेला असे. रस्त्यात कुणी मला एखादा पत्ता विचारला तर स्थळ दिसायचं, पण वाट सांगता यायची नाही. सतत हरवलेपणाची अवस्था.

त्या हरवलेल्या अवस्थेत एका ओळखीच्या मुलीने एसएमएसवर कसलीशी मदत मागितलेली. मी केली. पण तो नंबर फोनच्या लॉगलिस्टमध्ये वर असावा. त्या मुलीला मी बेरात्री एसएमएस केलाय याचा मला दोन दिवस थांगपत्ताच नव्हता. माझे जवळचे मित्र माझ्याशी तुटक, तुच्छतेने वागू-बोलू लागले तेव्हा मला पुसटशी जाणीव झाली. कदाचित त्या मुलीने घडला प्रकार त्यांना सांगितला असावा. मी फोनची हिस्टरी पाहिली तर त्या मुलीला मेसेज गेलेला- ‘मिस यू.' माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हादरलो.

मी कुणाला ‘मिस' करत होतो? जिला मी नीटसं ओळखत नाही, फारसा परिचय, भेटीगाठीही नाहीत तिला? कदाचित तो मेसेज मी मलाच केला असेल. पण तेव्हा मलाही नीटसा अर्थबोध झाला नाही. माझं समजू नये ते मित्रांना समजलंय, या भावनेने मी फारच घाबरलो. आता खोटं तरी काय सांगू? चुकीच्या वागण्याचं समर्थन तरी कसं देऊ? काहीच कळेना. मी मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो, पण शरमेमुळे ही घटना सांगितलीच नाही. फक्त झोप न येण्याबद्दल बोललो. त्यांनी विचारलं, “आत्महत्येचे विचार येतात का?” मी चटकन ‘हॅट' म्हणालो. माणसाच्या मनात आत्महत्येची भावना नेमकी कशी घर करते, हे एक कोडंच आहे. मी असा विचार करूच शकत नाही, अशी माझी समजूत होती... मला जगणं नकोसं वाटू लागलं, पण मरण्याची धमकही नव्हती.

मला वारंवार मृत्यूची स्वप्नं पडू लागली. आपण दोषी आहोत. आपल्या अपराधाला क्षमा नाही. मी कुणाकडे क्षमा मागूही शकत नाही. मुळात असा काय घोर अपराध झालाय हेही कळेना. मित्रांशी, अगदी आरशातही नजरेला नजर देऊन बोलता येईना. घाण वाटू लागली स्वत:ची. मला मरावंसं वाटू लागलं.

एक दिवस नशेत मी फेसबुकवर एका ओळीची सुसाइड नोटही लिहिली- ‘व्हेन आय डाय, नोबडी क्राय!' असं काही तरी असंबद्ध लिहिलेलं. सकाळी मित्रांचे फोन आले, तर मला कुणाशीही बोलावंसं वाटेना. पळून जावं, धरणीने पोटात घ्यावं असं झालेलं. असं पुन्हापुन्हा होऊ लागलं. एखाद्याशी बोलतोय नि मला त्याची प्रेतयात्रा दिसतेय. नशेत झोपलोय नि जागा होताना मला असा रस्ता दिसायचा, ज्यावरून आत्ताच प्रेतयात्रा गेलीय. मयतावर उधळलेली अवशेष फुलं पाहतच जाग यायची.

मला वाटतं, माझ्यातील एक अगोचरच मला ती वाट दाखवत होता. त्या अगोचरानेच मला या वाटेवर आणलं नि तोच पुढचा रस्ता दाखवत होता. त्यानेच मला जागं केलं. तो सांगायचा- ‘एरवी माणसाच्या आयुष्याला काय अर्थ असतो? जीव उडून जातो.' मी त्या उडत्या जीवाच्या शोधात दारूपासून दूर दूर चालत आलो. एका कुठल्या तरी क्षणाला मला त्यानेच हात दिला. माझ्यातल्या अगोचराने कोसळता कोसळता खाईत लोंबणारी पारंबी पकडली. दरीतून वर चढला तो कोण, मी की अगोचर?

मी बकरीमागे आलो. पिल्लांना जन्म दिला होता तिथेच ती घुटमळत होती. माझ्यामागोमाग मेंढपाळही पिल्लं घेऊन आला. त्याने छातीशी नायलॉनच्या पोत्यात धरलेली पिल्लं बकरीला दाखवली. ती पिल्लांजवळ गेली. हुंगलं. बें बें केलं. पुन्हा दूर गेली. मेंढपाळ तिला पिल्लं दाखवून पुन्हा वाटेला लागला. बकरीही मागोमाग चालू लागली. मी त्यांच्या मागे चालू लागलो. संध्याकाळ दाटून येत होती. मेंढपाळ झपाझप पावलं टाकत पुढे गेला, पण बकरी पुन्हा अडखळली. ती पुन्हा मागे जाऊ लागली. कधी झुडपांना ओरबाडत, कधी ओरडत ती अदृश्याशी काही बोलत असावी. आता डोंगरातल्या रानात केवळ मी नि बकरीच होतो. बकरी माझ्याकडे पाहायची. दोन पावलं चालून मागे यायची. पण ती कुणाला तरी साद घालत होती. कुणाला?

पिल्लं मेंढपाळाने नेलेली तिने पाहिलंय. मग ही काय शोधतीये? कुणी जवळ नसलं की मीही अनेकदा प्रकट बोलतो. जणू कुणी माझ्यासमोर बसलंय. पण भवती कुणी असल्याचा अदमास आल्यावर हा संवाद तत्काळ थांबतो. बकरीचं तसं नव्हतं. ती मुक्तपणे बडबडत होती. ही बडबड थांबवून तिने वाटेने घरी चलावं म्हणून काही तरी करावं असं वाटून मी यूट्यूबवरून बकरीच्या पिल्लांचे व्हिडिओ शोधले. त्या व्हिडिओंचा आवाज ऐकून बकरीने काही काळ प्रतिसाद दिला. पण तिला ते खरं नाही हे कळलं असेल. माणसालाच का कळत नाही काय खरं, काय खोटं? कदाचित खऱ्या-खोट्याच्या मधल्या अवकाशात, एका श्वासातल्या अर्ध्या श्वासात असतं ते अगोचर. ते दिसत नाही- जाणवतं. बकरीला ते जाणवत असेल का? ती माझ्या मागे येईना. तिला मी ‘खोटा' वाटत असेन.

बकरीच्या उदरातलं एक अस्तित्व बाहेर पडलं. तिला कदाचित पोटात काही वेळापूर्वी त्या अस्तित्त्वाचे श्वास जाणवत असतील. आता त्या अर्ध्या श्वासांची पोकळी जाणवत असेल. अगोचर पोकळी? गर्भात अस्तित्वाचं काहीच उरू नये? बकरी या भावनेनेच माझ्यासोबत यायला राजी नसावी. कुणास ठाऊक मीच नसलेल्यात अर्थ शोधत असेन. अखेर मानव हीच एकमेव अशी प्रजाती असावी, जी कायम आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यात हयात घालवते. बकरीच्या मनात तसलं काही नसेलही. तिला मन नसेलच, केवळ अस्तित्वच असेल. अस्तित्वाचा मागमूस कदाचित ती शोधत असली तर असली.

असं म्हणतात, भगवान महावीरांच्या अंगावर एकच वस्त्र उरलेलं. ते रानातल्या वाटेवर झुडपात अडकलं. वर्धमान या अवस्थेला पोचलेले की त्यांनी ते वस्त्रही सृष्टीला दिलं नि ते दिगबंर चालू लागले. केवळ शरीराचं अस्तित्व घेऊन चालणारा महावीर होऊन मीही वाटेला लागलो. भावनेला मी बकरीकडेच सोपवलं. वाटलं, येईल बकरी मागोमाग भावार्थ ओळखून.

तोवर तिकडून बकरीची मालकीण येताना दिसली. मी त्या बाईला म्हणालो, “अहो, ती येतच नाहीय.” बाई चित्रविचित्र आवाज काढत बकरीच्या दिशेने गेली. मी वस्तीवर पोचलो. वस्तीतल्या बोळातून मेंढपाळ इकडेच येत होता. तंबाखू मळत तो माझ्यासमोर येऊन थांबला. बकऱ्यांचं खांड त्याने जागेवर पोस्त केलं होतं. मला पाहत म्हणाला, “बोकडाचं काही खरं दिसत नाय. ते जगणार नाय. सारखं मान टाकतंय.” त्याने वार्ता सांगितली. बकरीचं एक नर पिल्लू अशक्त आहे. मी विचारलं, “तिने दूध नाही पाजलं का त्याला?” तो म्हणाला, “नाय, लगीच नाय पाजत बकरी दूध.” आम्ही बोलत होतो तोवर मालकिणीमागे बकरीही आमच्यापर्यंत पोचली. वस्तीतल्या घरातून एक बाई बाहेर येऊन थांबलेली. ती बाई बकरीकडे पाहून म्हणाली, “अशा अवस्थेत तिथे सोडून आल्लता व्हय? कुत्र्यांनी फाडून खाल्ली असती ना बकरी.” मी मनात म्हणालो, हे वाईट! हजारो वर्षांपूर्वी विमनस्क भटकणाऱ्या हिब्रू मेंढपाळांना देवदूताने शुभवार्ता दिलेली- ‘मुक्तिदाता येशू जन्मला आहे!' माझं मन त्या काळात भरकटून आलं. मी मनात म्हणालो, ‘मी कोकरू, तू मेंढपाळ. तूही मरतोस, मला मरण्यातलं सुख सांगण्यासाठी!'

गालिबची एक वेगळी ओळ मनात तरळली- क़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं, मौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूं... गालिब साहेब बुद्धाचा आशयच सांगू लागले- जगणं ही एक दुःखाची मालिकाच, माणसाने त्यापासून पळू नये... माझ्यातील अगोचराने मला हा आशय सांगितला.

बकरीची मालकीण मेंढपाळावर डाफरू लागली, “अशीच मागे एक बकरी सोडून आल्ता. धा हजाराचं नुकसान केलं.” माणूस सगळं पैशात पाहतो. मनात आलं, बकरी काही तरी अगोचर शोधत होती. तिच्या पोटात ते होतं. मग ते सृष्टीत पिल्लांसह आलं. बकरीचं एक पिल्लू अशक्त आहे, ते कदाचित मरेल. त्या मरणाऱ्या पिल्लाचं काही तिथे राहिलं असेल का?

जे मरत नाहीत त्यांना काही तरी अदृश्याची सोबत असते. माझ्यासोबतही असं काही अगोचर आहे. आईच्या गर्भात ते होतं, आता माझ्यासोबतही आहे. माझं नाव, गणगोत, मित्र, सगळं काळाच्या उदरात जाईल. चित्रातला एक-एक पिक्सल अदृश्य होत जातो नि सकल चित्रातून काही तरी सुंदर उरून मनावर उमटतं. तसा मी मरेन. अगोचर राहील... पण तेही नाही राहिलं तरी माझी हरकत नाही. 

प्रशांत खुंटे | prkhunte@gmail.com

प्रशांत खुंटे हे मुक्त पत्रकार असून समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results