आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

आईची आई

  • गाओ झिंगजिआन
  • 12.07.25
  • वाचनवेळ 10 मि.
aaichi aai story

जपान्यांच्या हवाई हल्ल्यापासून वाचवण्यासाठी माझी आई मला लिंगलिंग इथे घेऊन गेली. तिथे नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या घरासमोर आजही कुत्र्यांची पिलं बुडताना दिसतात. त्या पिलांच्या अंगावरची लव नदीकाठच्या वाळूत इतस्तत: पसरलेली दिसते. माझी आईसुद्धा या नदीत बुडाली. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात ती तेव्हा सामुदायिक शेतीवर स्वयंसेवक म्हणून काम करत होती. रात्रीपाळीचं काम संपवून ती नदीवर हातपाय धुण्यासाठी गेली तर पहाटे नदीकाठी तिचं प्रेतच सापडलं. त्यावेळी ती फक्त एकोणचाळीस वर्षांची होती. ती सतरा वर्षांची असताना कोणातरी कवीच्या स्मृतिप्रित्यर्थ काढलेल्या कविता संग्रहांत ती आणि तिचे मित्र यांच्या कविता मी पाहिलेल्या आहेत. या सर्वांनी ‘पापविमोचन' चळवळीत भाग घेतलेला होता. पण या कविता ‘क्यू युआन'च्या कवितांइतक्या काही चांगल्या नव्हत्या.

तिचा धाकटा भाऊपण बुडूनच मेला. तारुण्यसुलभ हिरोगिरीमुळे की, देशभक्तीच्या आवेशामुळे म्हणा, तो संरक्षण प्रबोधिनीत हवाईदलात दाखल झाला होता का? हे नक्की सांगता येत नाही. ज्यादिवशी तो प्रबोधिनीत दाखल झाला त्याचदिवशी तो आपल्या मित्रांबरोबर ‘गान' नदीवर पोहायला गेला. त्याने मोठ्या उत्साहात उंचावरून सरळ नदीच्या मध्यभागी सूर मारला. त्यावेळी त्याचे सगळे मित्र त्याच्या पँटच्या खिशातील पैसे ढापून आपापसांत वाटून घेण्यात गढले होते. पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आलं की, काहीतरी अघटीत घडलं आहे. ते सगळे नदीच्या दिशेने धावत सुटले. पण काही उपयोग झाला नाही. तो नदीत बुडालाच. त्याने स्वत:हून ते संकट ओढवून घेतलं होतं तर कोण काय करणार! तो बुडाला तेव्हा तो फक्त पंधरा वर्षांचा होता आणि त्या दु:खामुळे माझ्या आईची आई खूप खचून गेली.

आईच्या आईचा मोठा मुलगा म्हणजेच माझा मोठा मामा अगदी साधा मुलगा होता. देशभक्ती वगैरे असल्या कल्पना त्याच्या डोक्यात कधीच नव्हत्या. एका सभ्य कुलीन घराण्यात त्याचा जन्म झाला होता. त्यामुळे वेश्यागमन किंवा कुत्र्यांची झुंज लावण्यात त्याला रस नव्हता, तर अत्याधुनिक बनण्याचा त्याला छंद होता. तो सूट आणि टाय वापरत असे. त्यामुळे तो त्याच्या काळांतील तरुणांमध्ये फॅशनेबल म्हणून गणला जाई. त्याला फोटो काढण्याचा छंद होता. त्याचा कॅमेरापण अत्यंत आधुनिक होता. तो जाईल तिथले फोटो काढायचा आणि स्वत:च धुवायचा. कीटकांचं छायाचित्रण करण्यात त्याला खूप रस होता. त्याने काढलेल्या कीटकांच्या झुंजींचे फोटो आजतागायत माझ्या आजोळी जपून ठेवलेले आहेत. पण तोही ऐन तारुण्यातच मेला. माझ्या आईने मला सांगितलं की, सुरुवातीला त्याचा आजार अगदी मामुली होता. परंतु एकेदिवशी त्याने हावरटासारखा अंडं घातलेला ताटभर फोडणीचा भात खाल्ला. त्यामुळे त्याचा आधुनिक बनण्याचा षोकही निरर्थकच होता. कारण आधुनिक औषधांचा त्याला गंधही नव्हता.

माझ्या आईच्या मृत्यूनंतर बऱ्याच दिवसांनी माझ्या आईच्या आईचा मृत्यू झाला. ती तिच्या मुलांपेक्षा खूपच दीर्घायुषी होती. तिची सगळी मुलं तिच्या आधीच गेल्यामुळे ती निराधारच झाली. अशा अवस्थेत ती एका वृद्धाश्रमातच मेली.

मी आता ‘चू' घराण्याच्या राजधानीत येऊन पोचलो आहे. त्या घराण्याचा नि माझा काहीच संबंध नाही. त्यामुळे माझ्या मनांत ‘चू' घराण्याबद्दल कुठलाही किंतू नाही. तर मग मी सरळ ‘चू' घराण्यातील राजांना मुजरा करून मोकळा झालो. याच राज्यांत माझ्या आईच्या आईनं चिरविश्रांती घेतली आहे. तर ते ठिकाण शोधून काढण्यात मला काहीच प्रत्यवाय दिसत नाही. तिने मला हाताला धरून देवळासमोरच्या बाजारात नेलं होतं. आणि मला खूप-खूप आवडणारा एक भोवरा घेऊन दिला होता. तिच्या निधनाची बातमी मला माझ्या आत्याकडूनच कळली होती. ही आत्यापण फार काळ जगली नाही. तिलाही जाऊन आता खूप वर्षं झाली आहेत. माझे सगळेच नातेवाईक कसे काय हे जग सोडून गेले आहेत? मला समजत नाहीय की मीच म्हातारा झालोय की हे जगच खूप जुनं आहे.

मी जेव्हा या सगळ्याचा विचार करतो तेव्हा मला असं जाणवतं की ही माझी ‘नानी' वेगळ्याच जगांत वावरत होती. तिचा भूताखेतांवर विश्वास होता. तिला नरकाची भयंकर भीती वाटत होती. म्हणून ती आयुष्यभर पुण्याचा संचय करत राहिली. जेणेकरून तिला स्वर्गात जागा मिळावी. ती ऐन तारुण्यातच विधवा झाली होती. जेव्हा माझे ‘नाना' वारले तेव्हा ते बरीच मोठी संपत्ती तिच्यासाठी ठेवून गेले होते. प्रेताभोवती जशा माशा घोंघावतात तशी पिशाच्च योनीतील माणसं तिच्याभोवती फेर धरत आणि तू तुझी सगळी संपत्ती आम्हाला देऊन टाक म्हणजे तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतील, असं तिला ते म्हणत आणि त्यांनी तिला घरातील चांदीची नाणीसुद्धा विहिरीत टाकायला उद्युक्त केलं होतं. खरं म्हणजे त्या पिशाच्चांनी विहिरीच्या तळाला बारीक जाळीच्या चाळण्या लावून ठेवल्या होत्या. आणि ती सगळी नाणी या चाळण्यांत जाऊन पडत होती. नंतर ते सगळे मद्यप्राशन करून धुंद झाले आणि त्यांनी सगळी नाणी परत विहिरीतून बाहेर काढून इतस्तत: फेकून दिली, असंही नानी सांगत असे. पुढे तिला आपली सगळी घरंही विकावी लागली. आणि आता फक्त तिच्याजवळ जमिनीच्या कागदपत्रांची पेटी तेवढी शिल्लक राहिली होती. पण त्या जमिनीवर तिला नि माझ्या आईला केव्हाच पाणी सोडावं लागलं होतं. कारण ही जमीन कुळांना कसायला दिली होती. नंतर त्यांनी ‘जमीन सुधारणा' कायद्याबद्दल ऐकलं तेव्हा माझ्या आईला त्या जमिनींच्या जुन्या कागदपत्रांची आठवण झाली. आणि तिने ती सगळी कागदपत्रं आजीला जुन्या पेटीतून बाहेर काढायला सांगितलं. तेव्हा त्यांना सुरकुत्या पडलेल्या पिवळ्या कागदांची बंडलं त्या पेटीत सापडली. त्यांनी ती घाईघाईने बाहेर काढली आणि स्टोवर धरून जाळून टाकली. कारण रेडगार्डस्‌‍ची धाड पडली असती तर त्या दोघींनाही तुरुंगातच जावं लागलं असतं.

ही आईची आई फार जबरी होती. ती जरी सहजपणे बोलत असली तरी ती समोरच्या माणसाबरोबर भांडते आहे असंच वाटायचं. ती माझ्या आईजवळ राहायला तयार नव्हती. ती स्वत:च्या त्या जुन्या-पुराण्या घरी जेव्हा जायला निघाली तेव्हा आईला म्हणाली, की हा माझा नातू म्हणजे मी, खूप शिकून मोठा सरकारी अंमलदार होईल आणि मला घेऊन जायला मोटारगाडी घेऊन येईल, तेव्हाच मी इथं परत येईन. जेणेकरून हा माझी म्हातारपणी काळजी घेईल. पण तिला त्यावेळी हे माहिती नव्हतं की हा आपला नातू कुठल्याही सरकारी ऑफिसात असणार नाही तर उलट सांस्कृतिक क्रांतीच्या काळात याला ग्रामीण भागात शेतावर काम करायला सक्तीने पाठवलं जाईल. याच काळात निराधारांसाठी असलेल्या वृद्धाश्रमांत तिचं निधन झालं. या अंधाधुंदीच्या काळात ती जिवंत आहे की मेली हे आम्हा कुणाला माहिती नव्हतं. या काळात माझा धाकटा भाऊ आपण क्रांतिकारकांच्या घनिष्ठ संबंधांत आहोत असं भासवून खुशाल आगगाडीतून फुकट प्रवास करीत असे. असाच एकदा तो मग ‘नानी'च्या शोधार्थ निघाला. वाटेत अनेक वृद्धाश्रमांत जाऊन त्याने तिथल्या अनेक लोकांजवळ ‘नानी'ची चौकशी केली तर ते म्हणाले, की अशी कोणी व्यक्ती इथं राहत नाही. उलट त्यांनी त्यालाच विचारलं की, ती अभिजनांसाठी असलेल्या आश्रमांत राहते की सर्व सामान्यांसाठी असलेल्या आश्रमांत राहते? तेव्हा माझ्या भावाने त्यांना विचारलं की, अशा दोन संस्था कशासाठी आहेत? त्यांच्यांत काय फरक आहे? त्यावर त्यांनी त्याला कठोर शब्दांत सुनावलं की ज्या लोकांच्या प्रतिष्ठित जीवनाबद्दल कुठलीही शंका घेता येणार नाही. अशांसाठी ‘अभिजन वृद्धाश्रम' आणि ज्यांना कुणाचाही आधार नाही असे सर्वसामान्य जन यांच्यासाठी ‘निराधार आश्रम' आहेत. मग त्याने निराधारांसाठी असलेल्या वृद्धाश्रमात फोन केला तर कुणीतरी आणखीनच दरडावून विचारलं की, तुमचं नि त्यांचं नातं काय? तुम्ही कोण त्यांचे? तुम्ही कशासाठी चौकशी करता आहात? तेव्हा माझा भाऊ भयंकर घाबरला. कारण त्यावेळी तो नुकताच पदवीधर होऊन कॉलेजातून बाहेर पडला होता. त्याला अजून नोकरीपण लागलेली नव्हती. त्याला वाटलं की, आपण जास्त चौकशी केली तर आपलं शहरी नागरिकत्वही रद्द होईल. म्हणून त्यानं घाईघाईने फोन ठेवून दिला.

यानंतर काही वर्षांनी सर्व शैक्षणिक संस्थांमधून सैनिकी शिक्षण द्यायला सुरुवात झाली. आणि सगळ्या संस्था नि महाविद्यालय सैन्याच्या अधिपत्त्याखाली आली. जे कमनशिबी लोक होते त्यांचं नशीब आता उचकटलं. माझ्या आत्याची शेतावरच्या कामावरून सुटका झाली होती आणि ती परत तिच्या शहरातल्या कामावर रुजू झाली होती. त्याचवेळी तिनं मला कळवलं की दोन वर्षांपूर्वीच माझ्या ‘नानी'चं निधन झालं.

खूप प्रयत्नांनंतर मला कळलं की, दहा किलोमीटर अंतरावर पीचच्या बागा असलेल्या एका आडवळणी खेडेगावात तो आश्रम आहे. मग रणरणत्या उन्हात एक तास सायकल हाणत मी भटकत होतो तेव्हा मी त्या खेड्यातल्या एका इमारतीपाशी आलो तर तिथं पाटी होती ‘वृद्धाश्रम.' तो आश्रम एका लाकूड कापण्याच्या कारखान्याला लागून होता आणि त्याच्या आसपास कुठलीही पीचची झाडं नव्हती. त्या आवारांत दोन मजली खूप इमारती होत्या. पण तिथं कोणीही म्हातारी माणसं दिसत नव्हती. कदाचित कडक उन्हामुळे ती आपापल्या खोलीत जाऊन बसली असतील.

ऑफिसचं दार उघडच होतं आणि तिथे एका कोपऱ्यात खुर्चीत रेलून नि पाय टेबलावर टाकून एक इसम वर्तमानपत्र वाचण्यात गढून गेला होता. मी त्याला विचारलं की, निराधार लोकांसाठी हा वृद्धाश्रम आहे का? माझी ‘नानी' काही वर्ष अशा आश्रमात राहत होती.

त्याने वर्तमानपत्र खाली ठेवलं नि तो म्हणाला,“सगळं आता बदलून गेलंय. निराधार लोकांसाठी आता वृद्धाश्रमच नाहीत. फक्त नुसते वृद्धाश्रम आहेत. मी पुन्हा त्याला विचारलं नाही की, अभिजनांसाठी असलेल्या वृद्धाश्रम संस्था अजून अस्तित्वात आहेत का? मी फक्त त्याला विचारलं की, अशी अशी एक म्हातारी इथं राहत होती का, की जी आता जिवंत नाहीये. पण त्याच्याशी संवाद साधणं सोपं होतं. माझ्याबद्दल मला काहीही न विचारता त्याने सरळ मृतांची नोंद असलेलं रजिस्टर काढलं. त्यातल्या एका पानावर तो थबकला नि त्याने मला मृत व्यक्तीचं नाव विचारलन्‌‍.

“ती स्त्री होती का?”

‘‘हो” मी ठामपणे म्हणालो.

मग त्यानं ते रजिस्टरचे पान मला वाचता येईल अशातऱ्हेनं माझ्यापुढे सरकवलं. माझ्या ‘नानी'चं नाव तिथं होतं आणि वय पण जुळत होतं.

‘‘त्यांना जाऊन आता दहा वर्षं झाली.” सुस्कारा सोडत तो म्हणाला.

‘‘हो.” मी म्हणालो, ‘‘ह्या दहा वर्षांत तुम्ही इथंच काम करत आहात काय?”

त्याने होकारार्थी मान डोलवली.

मी पुन्हा त्याला विचारलं की, तुम्हांला आठवतं का ती कशी दिसत होती?

‘‘मी जरा विचार करून सांगतो.” मग तो खुर्चीच्या पाठीवर मान टेकवून म्हणाला, ""ती बुटकी, हडकुळी अशी बाई होती का?''

मी नुसती मान डोलावतो. पण मग मी तिचा घरातला भिंतीवर टांगलेला फोटो आठवतो. तर त्यात ती खूप जाड अशी दिसते. तो फोटो काही दशकांपूर्वी काढलेला होता आणि त्यात मी तिच्याशेजारी उभा राहून भवरा फिरवत होतो. त्यानंतरचे तिचे फोटो उपलब्ध नसावेत. काही दशकानंतर माणसाचा चेहरा-मोहरा एकदम बदलून जातो. पण त्याच्या शरीररचनेत काही बदल होत नाही. माझी आई बुटकीच होती. तर मग ‘नानी' काही फारशी उंच नसणार!

‘‘ बोलायला लागली की ती मोठ्यानं बोलायची का?''

तिच्या वयाच्या फारच थोड्या बायका अशा असतात की, ज्या मोठ्यानं बोलत नाहीत, पण यात महत्त्वाचं काय आहे की तिचं नाव अगदी बरोबर आहे.

""तिनं कधी तुम्हाला सांगितलं नाही का? की तिच्या मुलीला दोन मुलगे होते. म्हणजे तिला मुलीकडून दोन नातू होते.”

""तू तिच्या मुलीचा मुलगा का?''

""हो.”

तो मान डोलावतो आणि म्हणतो की ती म्हणायची, ""तिला दोन नातू आहेत.”

""ती असं कधी म्हणायची नाही का, ते येतील आणि तिला घेऊन जातील.”

""हो. ती तसं म्हणायची खरं!”

""पण त्यावेळी मी शेतावर काम करत होतो.”

""हं, तो सांस्कृतिक क्रांतीचा काळ होता.”

माझ्याऐवजी तोच सांगतो “तिला अगदी नैसर्गिक मृत्यू आला.”

पण ज्यांना नैसर्गिक मृत्यू आला नाही ते सुद्धा मेले हे कसं काय? असं मी त्याला विचारत नाही. मी त्याला फक्त विचारतो, तिचं दफन कुठे केलं?

""तिचं दहन केलं. इथे प्रत्येकाचं दहनच केलं जातं. हे फक्त म्हाताऱ्यांच्या बाबतीतच खरं नाही तर, जेव्हा आम्ही मरू तेव्हा आमचंही दहनच केलं जाईल.” “शहरातली वस्ती इतकी वाढली आहे की, इथं मेलेल्यांना पुरायला जागाच नाही.”

मग मी बोलणं थांबवलं. नि त्याला एवढंच म्हणालो की, ""तिची राख तरी तुम्ही गोळा करून ठेवली आहे का?''

""हो. गोळा करून ठेवली आहे. परंतु इथं जे निराधार लोक राहातात ते मेल्यावर त्यांची राख एकदमच गोळा करून ठेवली जाते. प्रत्येकाची स्वतंत्रपणे नाही.”

""इथं सामुदायिक स्मशान आहे का?''

""च... ” काय उत्तर द्यावं त्याला कळत नाही.

दोष द्यायचा असेल तर नातू म्हणवून घेणाऱ्या मलाच द्यायला हवा. त्या तिऱ्हाईत माणसाला नाही. फक्त एकच गोष्ट मी करू शकतो की, त्या माणसाचे आभार मानायला हवेत.

मी वृद्धाश्रमातून बाहेर आलो. नि सायकलवर स्वार होऊन स्वत:शीच विचार करायला लागलो की, जरी इथं सामुदायिक स्मशानभूमी असती तरी ‘पुरातत्व' खात्याच्या दृष्टीनं तिला भविष्यकाळात काहीच महत्त्व राहाणार नाही.

सरतेशेवटी, जिने मला खूप खूप आवडणारा भोवरा विकत घेऊन दिला होता त्या माझ्या ‘नानी'चं जिथं दहन झालं त्या जागेपर्यंत मी जाऊन पोहोचलो होतो. हेही, नसे थोडके!

(अनुभव, जुलै २००७च्या अंकातून साभार)

मूळ लेखक - गाओ झिंगजिआन

अनुवाद - मधु साबणे 

गाओ झिंगजिआन







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results