दिसायला तो एकदम देखणा नसला तरी चांगलाच बळकट, उंच व चपळ होता. शेपटी वर उभारून तो चालायचा तेव्हा पिळदार स्नायूंच्या लहरी त्याच्या लाल केसांखालून उठून दिसायच्या. अनावश्यक चरबीचा एक औंसही त्या स्नायूंना झाकत नव्हता. मी पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा त्याने माझं लक्ष वेधून घेण्याचं कारण सर्वसामान्य गावठी कुत्र्यांमधे नसलेला एक उद्धट अहंकार त्याच्या चालीतून ओसंडत होता. माणसाला घाबरून पळण्याची किंवा बिचकण्याची त्याला गरजच वाटत नव्हती. एक कान ताठ व एक पडलेला, चेहऱ्यावर जुन्या लढतीचा एक मोठा व्रण आणि पिवळट-पिंगट सतर्क जळते डोळे यामुळे त्याचा चेहरा मला धूर्त लढवय्यासारखा वाटला. मी त्याला नाव दिलं- लाल्या!
खरं म्हणजे मी त्याच्या आस्तित्वाकडे दुर्लक्ष करणंच माझ्या प्रतिष्ठेसाठी योग्य राहिलं असतं; पण तो व मी समोरासमोर शत्रू म्हणून उभे ठाकलो होतो.
गडचिरोलीच्या जंगलात ‘शोधग्राम' नावाची वस्ती बांधून आम्ही जेव्हा राहायला गेलो तेव्हा आजूबाजूच्या खेड्यांतील आदिवासींच्याशिवाय त्या गावांतील कुत्रीदेखील आम्हाला भेट द्यायला लागली. त्यांच्या गावात मिळत नसणारं शिळं, जास्तीचं अन्न त्या कुत्र्यांना आमच्या वस्तीवर मिळायला लागलं. आदिवासी अतिशय साधे होते. भीक व चोरी हे प्रकार आदिवासींमधे कधीच घडत नव्हते; पण त्यांची कुत्री या दोन्ही बाबतींत वस्ताद होती.
पण मला त्या कुत्र्यांचा राग त्यांनी शिळं अन्न खाल्ल्यामुळे नव्हता. आमच्याकडे एक पॉमेरियन नर व मादी होती. त्यांना या गावठी कुत्र्यांनी इजा करण्याचा किंवा चावल्यामुळे हायड्रोफोबिया नावाचा भयंकर रोग होण्याची भीती होती. त्यामुळे मला आमच्या वस्तीत ही गावठी कुत्री नकोशी होती. दगड मारून मारून वारंवार हाकलल्यावर इतर कुत्र्यांनी शोधग्रामचा नाद सोडला, पण लाल्या मात्र हटायला तयार नव्हता.
शेजारच्या गावातील त्याच्या मालकाला मी निरोप पाठवला : ‘तुमचं कुत्रं सांभाळा.' त्याने हात वर केले. ‘माझं कुत्रं माझ्या घरी राहतच नाही. माझा त्याच्यावर काही ताबा नाही.'
लाल्याशी मलाच निपटावं लागणार होतं.
लाल्या घराच्या आसपास दिसला की मी दगड उचलून त्याच्यावर भिरकावू लागलो; पण सहसा माझा नेम नीट लागेना. क्वचितच माझा दगड त्याच्या शरीराच्या दिशेने योग्य रीतीने जात असला तर मूळ जागेवरून हलून अगदी सहजपणे तो माझा नेम चुकवायचा. त्याहूनही चीड आणणारी बाब म्हणजे माझ्या दगड फेकण्याकडे तो अगदी तुच्छतेने बघायचा. शारीरिक स्पर्धेत मी त्याच्यापुढे कमी सिद्ध होत होतो.
आमची पॉमेरियन कुत्री दिसायला विलक्षण गोड होती. तीन वर्षांपूर्वी तिला आणली तेव्हापासून ती घरातच वाढली व कुटुंबाचा एक भागच झाली. आमची मुलं आनंद व अमृत, तशीच ही मिता. आम्हाला मुलगी नव्हतीच. सकाळी बिछान्याशेजारी बसून ती आमच्या उठण्याची वाट बघायची. पांघरुणाखाली हालचाल सुरू झाली की पटकन येऊन हात-पाय चाटायची, आमचं बोट उगाच तोंडात धरून दातांनी हलकेपणे चावायची. आमच्या टेबलशेजारीच जेवायची. मी ऑफिसमधे किंवा दवाखान्यात गेलो तरी सतत माझ्यासोबतच यायची व माझ्या शेजारी बसून राहायची. मी उठलो की उठायची, बसलो की बसायची. पेशंटच्या आजाराची माहिती विचारल्यावर त्याला तपासायला मी खुर्चीवरून उठून तपासणी टेबलाजवळ गेलो की खोलीतल्या खोलीत मितादेखील माझ्यासोबत तेवढा प्रवास करायची. मालकाच्या अगदी जवळ राहण्याची जणू तिची ड्युटी लागली होती. अनेकदा मी तिला घरीच थांबण्याची सक्ती केली. पण संधी मिळाली की ती माझ्या शेजारी हजर! शेवटी मी तिची इमानदारी व प्रेम स्वीकारलं होतं. त्यामुळे मनातून सुखावलोही होतो.
मिताला जोड म्हणून एक नर पॉमेरियन- टीपू- आणला होता. चांगला देखणा, पांढरा शुभ्र, केसाळ असा तो मर्द होता. मिताप्रमाणे तो आमच्या अंगाखांद्यावर वाढलेला नव्हता. तो थोडा बाहेरख्यालीही होता. पण नराच्या जातीस हे चालायचंच, म्हणून त्याची ही वृत्ती व मधे मधे बाहेर भटकण्याचं आम्हाला विशेष वाटत नव्हतं.
गेल्या एक-दोन दिवसांपासून लाल्या आमच्या घराशेजारी जास्तच घुटमळत होता. त्याच्या दिशेने फेकलेल्या दगडांकडे अधिकच बेगुमानपणे दुर्लक्ष करत होता. टीपू त्याच्या अंगावर धावून जाण्याचा वारंवार प्रयत्न करत होता; पण लाल्याने दात विचकले की घाबरून परत येत होता. तिसऱ्या दिवशी कारण माझ्या लक्षात आलं. मिता हीटवर आली होती.
मिताचं मेटिंग टीपूसोबतच व्हावं असा माझा आग्रह होता. तरच तिची पिल्लं चांगल्या दर्जाची पॉमेरियन होतील. त्यासाठीच तर टीपूला पाळला होता. टीपूही आपल्यापरीने मिताला खूष करण्याचे व दुसऱ्या कुत्र्यांना तिच्या आसपास न फिरकू देण्याचे सर्व प्रयत्न करतच होता. त्याच्या प्रणयाराधनाला माझा आशीर्वादच होता.
एका काळ्याभोर रात्री मी जेवण करून दुलई पांघरून झोपलो होतो. बाहेर विलक्षण थंडी पडली होती. जंगलातून क्वचित प्राण्यांचा एखादा अस्पष्ट आवाज ऐकू यायचा. बाकी सगळी विराट शांतता. अचानक टीपूचं जिवाच्या आकांताने भुंकणं ऐकू यायला लागलं. ते भुंकणं नेहमीचं नव्हतं. नक्कीच काही तरी मोठा धोका होता. दुलईमधून बाहेर पडलो व दाराबाहेर व्हरांड्यात आलो. दिव्याचं बटन दाबलं. समोर अंगणात लाल्या व मिता एकमेकांना लागले होते. टीपू चारी बाजूंनी भुंकून भुंकून निषेध दाखवत होता; पण तो हतबल होता. मिताने नर म्हणून लाल्याचा स्वीकार केला होता.
एक विलक्षण तिडीक माझ्या डोक्यात उठली. मिताचा उच्चवर्णीय घरंदाजपणा, तिच्यासाठी आणलेला टीपू, तिला शुद्ध पॉमेरियन पिलं व्हावी ही माझी अपेक्षा, सर्वांवर पाणी फिरलं होतं. लाल्याने डाव साधला होता व माझ्याच अंगणात ती दोघं आनंदात मश्गूल होती.
साप निघाले तर मारण्यासाठी दाराजवळ कायम ठेवलेली काठी उचलून मी “हाऽऽऽ र्राऽऽ माऽऽ रा...” असं काही तरी ओरडत मिताला वाचवायला धावलो. लाल्या पळायला लागला; पण मिताला आता त्याच्यापासून सुटका नव्हती. दोघांचं शरीर मागल्या बाजूने जुळलेलं होतं. ती केकाटत त्याच्या मागे ओढली गेली. मी त्वेषाने काठी उगारून धावत होतो. लाल्या जबरदस्त ताकदीने मिताचं ओझं ओढत पळत होता. गवत, झुडपं, दगड यांतून मिता त्याच्या मागे फरफटत होती, किंचाळत होती. मला अजूनच चीड येत होती. त्यांच्या जवळ पोहोचून मी एक रट्टा लाल्यावर हाणलाच. गर्रकन मागे वळून त्याने जबडा वासून माझ्याकडे उडी घेतली. मिता मधे ट्रॅप झाली असताना मी त्याला मारण्याच्या प्रयत्नाने त्यालाही विलक्षण संताप आला होता. मिताचं ओझं त्याच्या मागे चिकटलेलं असल्याने त्याची उडी माझ्यापर्यंत पोहोचली नाही. पण त्याच्या त्वेषाने व रौद्र रूपाने बिचकून मीच दोन पावलं मागे हटलो. लाल्या पुन्हा मिताला घेऊन पळत सुटला. मी जोराने मागे धावलो; पण दम लागला, छातीत दुखायला लागलं. रागाने धुमसतच, पण हरल्यामुळे चडफडत मी घरी परतलो. छातीच्या दुखण्याचीही काळजी निर्माण झाली होती. दार बंद करून घेतलं.
टीपू बाहेर केविलवाणा भुंकत होता. मिता रात्री केव्हा घरी परतली मला कळलंच नाही. ‘हलकट! व्यभिचारी लेकाची!' मी चडफडलो.
त्या ऋतूमधे मिता लाल्याच्याच मागे पागल राहिली. घरंदाज टीपूच्या तुलनेत त्या गावरान लाल्यामधे तिने काय पाहिलं होतं कोण जाणे! तिला कोंडून ठेवण्याचे, रागावण्याचे, मारण्याचे, फक्त टीपूलाच तिच्यापर्यंत पोहोचू देण्याचे माझे सर्व उपाय तिने निष्फळ ठरवले. टीपू जवळ आला की ती नकार द्यायची. वेड्यासारखी लाल्यालाच प्रतिसाद द्यायची. एरवी पूर्णपणे मला वाहिलेलं तिचं इमान या निसर्गाच्या सादीसमोर हतबल होतं. लाल्यासमोर मी हरलो होतो.
शेवटी ते पंधरा दिवस संपले. मिता थंड झाली. पुन्हा नॉर्मल झाली. लाल्याकडे ढुंकून पाहीनाशी झाली. माझ्या मागे घोटाळायला लागली. एकदा तर मी लाल्यावर दगड मारला असताना ती पण लाल्यावर धावून गेली. ती पुन्हा माझ्या कह्यात आल्याची माझी खात्री पटली. ‘काय पण हिचं प्रेम!' मी विचार करत होतो. ‘ज्या लाल्यासोबत गेले पंधरा दिवस हिने बेभान संसार मांडला होता, निसर्गाची ऊर्मी संपल्याबरोबर तो आता हिला अगदी परका झाला!'
लाल्याचाही मितामधला इंटरेस्ट संपला होता, पण शोधग्राम हे आपल्या हक्काचं घर आहे या थाटात तो आता इथे राहू लागला होता, वावरू लागला होता. मला असला घरजावई नको होता. इथे प्रभुत्व फक्त माझं चालणार होतं. आताच त्याला कायमचा धडा शिकवण्याचा मी निश्चय केला.
नागपूरला गेलो व एका बंदुकीच्या दुकानातून एअर गन विकत आणली. लाल्या मरावा अशी माझी इच्छा नव्हती; पण त्याला थोडी इजा व्हावी, धाक बसावा व त्याने शोधग्रामला येणं सोडावं एवढाच माझा आग्रह होता. तशी हलकी बंदूक मी दुकानदाराला मागितली. त्याने ८०० रुपयांची चांगली एअरगन मला काढून दिली. छऱ्यांची दोन पाकिटं विकत घेऊन मी मोठ्या खुषीत परतलो. आता बघतो त्या लाल्याला!
मी पूर्वी बंदूक कधीच हाताळली नव्हती. त्यामुळे बंदूक चालवताना पायांत अंतर घेऊन उभं कसं राहावं, नेम कसा धरावा, बंदुकीचा दस्ता छातीजवळ खांद्यावर कसा धरावा, हात न हलता ट्रिगर कसं दाबावं हे सर्व मी शिकू लागलो. मी छर्ऱ्यावर छर्रे प्रॅक्टिसमधे घालवत होतो. झाडाच्या बुंध्याला, टेलिफोन व विजेच्या खांबांना, कुंपणाच्या खांबांना सर्वांना नेम मारण्याचे माझे प्रयत्न सुरू झाले. नेम बरोबर लागला की अंतर वाढवून मी जास्त दुरून पुन्हा नेम धरत होतो. माझ्या पत्नीला, राणीला माझा हा भलताच नाद मुळीच आवडला नाही. “काय वेड घेतलंयस डोक्यात?” ती म्हणाली. पण माझी दोन्ही मुलं, आनंद व अमृत आपल्या वडिलांमधील या नवीन बदलाने भारावून गेली होती. बापाला सतत सल्ले देणं, नवे नवे नेम सांगणं, व छर्रा बरोबर लागल्यास टाळ्या वाजवून प्रोत्साहन देणं हा कार्यक्रम प्रचंड उत्साहाने पार पाडत होती. लवकरच माझा नेम नीट बसायला लागला.
लाल्या बिचकू नये म्हणून या काळात मी त्याच्यावर बार टाकण्याचा मोह कटाक्षाने टाळला होता. माझ्या या प्रयोगांकडे तो पूर्ण तुच्छतेने बघत पण सतर्कपणे पन्नास-साठ फूट अंतर राखून पडून असायचा. आपल्याच विरुद्ध ही सर्व तयारी सुरू आहे याची त्याला कल्पना नसावी. माझी तयारी आता पूर्ण झाली.
लाल्या अंगणासमोर जरा कमी अंतरावर बसलेला पाहून मी आज त्याच्यावर बार टाकायचा कार्यक्रम आटोपायचं ठरवलं. आनंद-अमृत दोघांनी मला शुभेच्छा दिल्या व आवाज न करता खिडकीतून बघण्याच्या मोक्याच्या जागा त्यांनी घेतल्या. मी एअरगन लोड केली. दार हळूच उघडलं. व्हरांड्यात येऊन पोझिशन घेऊन उभा राहिलो. लाल्या जमिनीवर डोकं टेकून अंग ताणून पडलेला होता. मी बरोबर नेम धरला. ‘छर्रा याच्या शरीरात कुठे शिरावा?' मी विचार केला. त्याचा जीव घेण्याची गरज नव्हती. म्हणून त्याचं डोकं सोडून मी त्याच्या फऱ्यावर नेम धरला. लाल्या अजूनही बेखबर होता. आयुष्यभर तो या बेसावध क्षणांबद्दल पस्तावा करणार होता. पुन्हा मिताचं नाव काढणार नव्हता.
खट्ट! मी ट्रिगर दाबल्याबरोबर योग्य आवाज झाला व एकदम झटका लागल्यासारखा लाल्या उसळला नि सुसाट पळत सुटला. पोरं उत्साहाने धावत घराबाहेर आली. ‘त्याला नक्कीच जिव्हारी जखम झाली असावी', त्यांचा कयास होता. जिम कॉर्बेटच्या शिकारी कथा ते दोघं बऱ्याचदा वाचत. लाल्याच्या रक्ताचा सडा व जखमेतून ठिपकणाऱ्या रक्ताचा माग बघायला ती दोघं धावली. किंचित लंगडत लाल्या नाहीसा झाला. रक्ताचा मागमूसही नव्हता!
“रक्त जरी सांडलं नाही तरी त्याला मुका मार जिव्हारी लागला असावा,” मी सांगितलं. “पुन्हा इकडे येण्याची तो हिंमत करणार नाही.” मोठ्या संतोषाने मी एअरगन ठेवली. झोपाळ्यावर बसून पुस्तक वाचत बसलो. माझ्या मर्जीविरुद्ध माझ्या कुत्रीला बिघडवणाऱ्या लाल्याला मी कायमचा धडा शिकवला होता.
दोन तासांनी लाल्या पूर्वीच्याच डौलदार चालीने शोधग्रामच्या उकिरड्यावर शिळं अन्न धुंडाळताना दिसला. कोणत्याही जखमेचं चिन्ह त्याच्यावर नव्हतं. माझी एअरगन फक्त चिमण्यांना मारणारी असावी. लाल्यासारख्या कुत्र्यावर तिचा मार निरुपद्रवी ठरला होता.
‘एअरगनने मेला नाही तरी चार-दोनदा छर्ऱ्याचा मार बसला तर तो नक्कीच इकडचा नाद सोडेल.' मी विचार केला. दुसऱ्या दिवशीपासून मी लाल्यावर पाळत ठेवू लागलो. तो शोधग्राममधे कुठेही बसलेला आढळला की मुलं धावत येऊन मला बातमी द्यायला लागले. मी ताबडतोब माझी एअरगन लोड करून तिकडे धावू लागलो; पण मला येताना दुरूनच बघून तो पसार व्हायचा. बातमी लागल्यावर निघायला उशीर होऊ नये म्हणून मी एअरगन लोड करूनच घरात ठेवायला लागलो. असं करणं सुरक्षित नव्हतं. चुकून ट्रिगर दाबला गेला तर घरातच गोळी सुटायची. पण लाल्यावर सूड घेण्यासाठी मी हाही धोका स्वीकारला होता. मुलं तर प्रचंड उत्साहात होती. मी बंदूक घेऊन निघालो की ती माझ्या मागेच असायची. पण त्यामुळे लाल्या सावध व्हायचा. माझं काम बनेना.
मी घरांच्या व झाडांच्या आडोशाने हळूहळू पुढे सरकून त्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करायला लागलो. पण हे जनावर महाबेरकी होतं. त्याला हमखास माझ्या हालचालीचा सुगावा लागायचा व तो जागा सोडायचा. नक्कीच त्याला वास येत असणार. म्हणून मी वाहता वारा त्याच्याकडून माझ्याकडे येईल अशा दिशेने जाऊन त्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला; पण अगदी वेळेवर तो डोकं उचलून थंड नजरेने माझ्याकडे बघायचा. तुच्छतेने डोकं हलवून क्षणात हलायचा. पळत्या लाल्यावर टाकलेले माझे सर्व बार वाया गेले. हा लाल्या माझ्या वरताण निघाला होता.
मी आता जिद्दीलाच पेटलो होतो. घराच्या आत लपून खिडकीच्या आतून मी त्याच्यावर नेम धरण्याचा प्रयत्न करायला लागलो. ही चाल यशस्वी झाली. लाल्याला आणखी एकदा माझा छर्रा लागला; पण छोटासा खडा लागावा यापलीकडे त्याच्यावर परिणाम झाला नाही. ‘याचं कातडं गेंड्याचं असावं!' मी चडफडलो. पण माझं दुर्दैव इथेच संपलं नाही. लाल्या आता चांगलाच सावध झाला होता. माझ्या घराच्या शंभर फूट आत तो येईना. मी दुरूनही नेम धरला तरी, कसा कोण जाणे, त्याच्या टेहेळणीतून ते सुटायचं नाही. नेमक्या वेळी तो बरोबर माझ्या दिशेने पाहायचा. नजरानजर व्हायची. ‘काय ही कटकट!' असं माझ्याकडे बघून तो जागा बदलायचा.
‘याला अतींद्रिय शक्ती असावी!' मी विचार करू लागलो. दिवसेंदिवस माझा आत्मविश्वास ढळायला लागला होता. तो मेला नाही, जखमीही झाला नाही, व आता तर माझ्या हल्ल्याला निरुपद्रवी कटकटीपलीकडे तो मोजत नव्हता. एका गावठी भिकारी कुत्र्याने मला इतकं क्षुद्र समजावं हे मला असहनीय झालं होतं. त्याने निदान मला घाबरावं, भिऊन पळावं, एवढा तरी माझा मान राखावा अशी माझी किमान अपेक्षा होती.
लाल्यासोबतचं आपलं शत्रुत्व अजून एकजण विसरला नव्हता. टीपू अजूनही त्याचा राग करत होता. लाल्या दिसला की जिवापाड भुंकत होता. सुरक्षित अंतर राखून त्याच्यावर धावून जाण्याचा देखावा करत होता. पण लाल्या त्याच्याकडे अगदी बेगुमानपणे दुर्लक्ष करायचा. सर्व शत्रू काखोटीला मारून लाल्या खुशाल शोधग्राममधे भटकत होता. ‘याला खायला, झोपायला केव्हा फुरसत मिळते?' मी अचंबा करत होतो. लाल्या अजिंक्य भासायला लागला होता. ‘कोणासोबत भलत्याच स्पर्धेत पडलो आपण?' असे तात्त्विक विचारही मनात उठायला लागले.
एके दिवशी मात्र कहर झाला. आपला नेहमीचा स्थितप्रज्ञ बाणा सोडून लाल्याने टीपूवर हल्ला केला. त्याचा गळाच पकडला. टीपू केकाटत होता. लाल्या त्याला घोळसावत होता. ‘टीपू आज वाचत नाही.' आम्ही त्याला सोडवायला धावत जाताना मी विचार केला. सुदैवाने टीपू जिवंत सुटला, पण अनेक जखमा व कायमचा धसका घेऊन. आता लाल्यावर भुंकणंच त्याने सोडून दिलं.
आता मी पुरता पिसाळलो होतो. मिताला तर याने नासवलीच, पण आता टीपूवर हल्ला करण्याची मुजोरी! आता गनिमी कावाच कामी येणार, मी ठरवलं. “हा लाल्या शोधग्राममधे कोणावर विश्वास ठेवतो?” मी चौकशी केली. बळवंत सुर्वेच्या मुलीच्या हातून तो अन्न घेतो, रतन शहा पण त्याला गोंजारू शकतो ही मला बातमी कळली. अशा वेळी त्याला बेसावध गाठून त्याच्या गळ्यात साखळी बांधण्याची जबाबदारी मी त्यांना दिली. त्यांची लाल्याशी दुश्मनी नव्हती. म्हणून नाइलाजानेच हे नावडतं काम करण्याचं त्यांनी स्वीकारलं. मी योग्य बातमीची वाट बघू लागलो.
“लाल्याला साखळी बांधली!” पोरं एक दिवशी अचानक धावत येऊन मला बोलवायला आली. शोधग्रामच्या एका कोपऱ्यात कुत्र्यांचं भुंकणं, माणसांचं ओरडणं, पोरांचा कलकलाट सर्व एकत्र झालं होतं. बांबूचा जाड सोटा घेऊन मी निघालो. ‘आज मी पुरा बदला घेणार!'
लाल्याच्या गळ्यात साखळी अडकवून ती तारेच्या लोखंडी कुंपणाला बांधली होती. तो भुंकत होता. हिसडे मारून सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या बंदी अवस्थेत त्याच्या अंगावर धावून जाणाऱ्या टीपूला मात्र तो निव्वळ नजरेच्या धाकानेच दूर ठेवत होता.
“मारा त्याला!” मी ओरडलो. तिघं-चौघं त्याच्यावर तुटून पडले. लाल्या वेड्यावाकड्या उड्या मारून मार चुकवण्याचा प्रयत्न करत होता. विलक्षण ताकदीने तो हिसडे देत होता, पण त्याला सुटता येत नव्हतं. दंडुक्यांचे तीन- चार वार त्याला चांगलेच लागले. सुळे लाल झाले. चेहरा भेसूर दिसायला लागला. भुंकण्याचा आवाज घोगरा झाला. माझी माणसं यामुळे विरघळून किंचित हळू झाली.
“सोडू नका आज याला!” मी ओरडलो. इतक्या दिवसांचा माझा संताप गोळा झाला होता. हिशोब चुकता करण्याची संधी आली होती. मी दंडुका मारताच माझ्या दिशेने दात विचकत त्याने उडी घेतली. गळ्याला बांधलेल्या साखळीमुळे त्याची उडी मधेच रोखली गेली, पण त्याच्या नजरेतील विलक्षण विखार बघून मी क्षणभर स्तंभित झालो. अंगावर काटाच उभा राहिला. ‘हा सुटून माझ्यावर हल्ला तर करणार नाही?' मी या विचारातून सावरतो तोच ते लाल धूड अचानक तारेपासून दूर पळू लागलं. साखळीतून त्याने मान सोडवली होती व आम्हाला पुन्हा झुकांडी दिली होती. जिवाच्या आकांताने तो आमच्या डोळ्यांदेखत पळत नाहीसा झाला. तो जिवंत सुटल्याबद्दल मी चडफडलो तरी त्याला चांगलीच अद्दल घडवल्याचं पहिल्यांदाच समाधानही मला वाटत होतं. लाल्या आता पुन्हा इकडे फिरकण्याची हिंमत करणार नव्हता.
विजयाचं समाधान मिळाल्याने आता मी सुखावलो होतो. माझी बुद्धी व सर्व रिसोर्सेस पणाला लावूनही त्याच्या निसर्गदत्त बेरकी सुरक्षा कवचाला मी यापूर्वी भेदू शकलो नव्हतो. आज मात्र मी माझं वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलं होतं. माझ्या कुत्रीला माझ्यापासून दूर नेणाऱ्या त्या उनाड नराला मी कायमचं पळवून लावलं होतं! माझ्या हद्दीत मी दुसऱ्याचं आव्हान खपवून घेणार नव्हतो.
लाल्याने रिकाम्या केलेल्या जागेवर दुसरी गावठी कुत्री येऊ नयेत म्हणून मी कायमचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं. प्रयत्नपूर्वक दोन अल्सेशियन पिलं मिळवली. त्यांना दररोज दूध, भात, अंडी द्यायला लागलो. त्यांची नावं मी ‘शेरा' व ‘सोनी' अशी ठेवली. माझे अल्सेशियन असे तगडे व्हावे की त्यांना पाहूनच दुसऱ्या कुत्र्यांना घाम फुटायला हवा होता. माझ्या हद्दीत कोणीच कुत्रा पुन्हा शिरकाव करू शकणार नव्हता!
शेरा व सोनी हळूहळू मोठी व्हायला लागली. तीन महिन्यांची झाली. बाहेरचे गावठी कुत्रे हद्दीत शिरले की त्यांच्यावर ही पिलं भुंकत धावून जायला लागली. माझ्या योजनेनुसार सर्व सुरळीत घडत होतं. मी रिलॅक्स झालो होतो.
आमच्या कंपाउंडच्या तारेबाहेर लाल्या पुन्हा फिरताना दिसला! तो पूर्वीसारखाच तंदुरुस्त झाला होता. आम्ही केलेल्या जखमांची कोणतीच निशाणी त्याच्या अंगावर शिल्लक नव्हती. फक्त त्याची सावधगिरी व संशयीपणा वाढला होता. तो कंपाउंडमधे शिरण्यापूर्वी सर्व परिस्थिती जोखून घेत होता. आमची लढाई पुन्हा सुरू झाली होती. पण या वेळी माझ्याकडे दोन अल्सेशियन पिलं होती!
तो कंपाउंडमधे शिरला की मी ‘छू-छू' म्हणून ओरडायचो. दोन्ही अल्सेशियन पिलं आणि मिता व टिपू भुंकण्याचा कलकलाट करून त्याच्यावर धावून जायची. त्याच्या थोडं जवळ पोहोचलं की पॉमेरियन कुत्री थांबून जायची, पण अल्सेशियन पिलांना भीती माहीत नव्हती. जर्मन शेफर्ड रक्त होतं! लाल्यावर जाऊन ती पडायची. पण अजून लाल्यापेक्षा ती लहान असल्याने त्याला इजा करू शकत नव्हती. पण लाल्या मुकाट्याने बाजूला व्हायचा व कंपाउंडच्या बाहेर निघून जायचा. ही मात्रा लागू पडली होती. अजून एक-दोन महिन्यांतच ही अल्सेशियन कुत्री लाल्याला भारी पडणार, फाडून टाकणार.
एक दिवशी शेरा-सोनी दोघंही लाल्यावर धावून गेली. आजपर्यंत त्यांना पाठ दाखवणाऱ्या लाल्याने आज अचानक त्यांच्यावर हल्ला केला. पहिल्यांदा तो शेराच्या म्हणजे नराच्या मागे लागला. शेरा पळत सुटला व एका ड्रेनेज पाइपच्या आत जाऊन लपला. सोनी अजूनही लाल्यावर तुटून पडत होती. लाल्याने आता तिच्याकडे मोर्चा वळवला. सोनीला हे अनपेक्षित होतं. लाल्यासमोर ती लहान होती. लाल्याचं रौद्र स्वरूप पाहून ती एकदम भेदरली. खाली बसली. लाल्याने तिच्या गळ्यावर समोरचा पाय ठेवला. सोनी शेपटी हलवत होती. कूं कूं करून ती गयावया करायला लागली. ती मादी होती, छोटी होती. लाल्याने तिला सोडून दिलं. लाल्या कंपाउंडच्या बाहेर जाईपर्यंत शेरा पाइपमधून बाहेर पडायला तयार झाला नाही. आज माझ्या दोन्ही अल्सेशियननी लाल्यासमोर शरणागती पत्करली होती. त्याचं प्रभुत्व मान्य केलं होतं. यापुढे ती लाल्याला आव्हान देतील याची शक्यता कमीच होती. माझा हाही डाव वाया गेला होता.
लाल्या आता पुन्हा नियमितपणे शोधग्रामला येत होता, फिरत होता, उष्टं- शिळं खात होता. तो माझ्या डोळ्यांत काट्यासारखा सलत होता, पण त्याच्यावर दगड भिरकावण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हतो. माझा पराभव मला फार झोंबत होतं. कुठे हा गावठी कुत्रा व कुठे मी! काही तुलनाच नव्हती. असल्या विषम मुकाबल्यात पडणंच मुळी मला शोभत नव्हतं. पण पडल्यानंतर हरणं तर अगदीच असहनीय होतं.
लाल्याच्या शारीरिक चिवटपणाचं व बेरकी स्वभावाचं मला कधी कधी विलक्षण आश्चर्य वाटत होतं. आदिवासी गावात आणि जंगलात इतर धोक्यांना व स्पर्धांना पुरून उरण्यासाठी हे गुण त्याला आवश्यकच होते. म्हणूनच ‘बलवान तेच जगतील' या निसर्गाच्या नियमानुसार तो टिकला होता, तगला होता. माझे सर्व उच्चवंशीय कुत्रे या बाबतीत त्याच्या पासंगालाही पुरत नव्हते. ‘त्याला पाळीव बनवता येईल का?' असे समझोत्याचे विचारही माझ्या अहंकाराशी द्रोह करून माझ्या मनात यायला लागले.
पण लाल्याला पाळीव बनवणं आता अशक्य होतं. एक तर मोकाट जीवनाची चव त्याने चाखली होती. माणसाच्या गुलामगिरीची त्याला गरजच नव्हती. स्वत:ची शक्ती व विलक्षण धूर्तता यांच्या बळावर तो स्वतंत्रपणे जगण्यात यशस्वी ठरला होता. शिवाय आजवर त्याच्यावर मी इतके हल्ले केले होते की त्याने माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता. त्याला पाळण्याचा विचार मी नाइलाजाने काढून टाकला. त्याचं सहअस्तित्व मान्य करण्याखेरीज मला गत्यंतर दिसत नव्हतं.
मिता पुन्हा हीटवर आली होती. ती व लाल्या पुन्हा एकमेकांजवळ जाण्याच्या प्रयत्नात मला दिसू लागले. लाल्याचं एक समजू शकतो, पण मिताची ही बेशरम वृत्ती माझ्या आकलनाच्या पलीकडे होती. या वेळी तिला टीपूपासूनच पिलं व्हायला हवीत. मी तिला व टीपूला एका व्हरांड्यात एकत्र बांधलं; पण ती टीपूला जवळ येऊ देईना. बूड जमिनीला टेकवून ती घट्ट बसून राहायची. टीपू केविलवाण्यापणे कूं कूं करत तिच्याभोवती चकरा मारायचा, माझ्याकडे येऊन तक्रार केल्यासारखा भुंकायचा; पण ती याला दाद देईना. तिला तो गावरान धटिंगणच हवा होता. निसर्गाची कोणती शक्ती तिला ही निवड करण्यास भाग पाडत होती मला कळत नव्हतं. पण कुणा अदृश्य शक्तीने तिचा नर निवडला होता व तिला तोच स्वीकारार्ह होता.
पण काहीही झालं तरी या वेळी तिचं मेटिंग मला लाल्यासोबत होऊ द्यायचं नव्हतं. खालच्या दर्जाची संकरित पिलं मला नको होती. शिवाय तिच्यावरील माझ्या स्वामित्वाचाही प्रश्न होता. मी म्हणेन त्या नराकडूनच तिने पिलं होऊ द्यायला हवी होती. तिचा प्रतिरोध मी मोडून काढणार होतो.
तिच्या वृत्ती आता सैरभैर झाल्या होत्या. मी जवळ गेलो तरी तिचं वागणं नेहमीसारखं नव्हतं. माझा प्रभाव मागे पडला होता. कुठून तरी येणाऱ्या अदृश्य सिग्नल्सची ती आतुरतेने वाट बघत होती. कान व नजर टवकारून भिरभिरत होती. कुठून तिला निरोप येत होते कुणास ठाउक! कृष्णाची मुरली तिला बोलावत होती. तिचा स्वत:वरच ताबा नव्हता. तिची स्थिती बघून मला कीवही येत होती; पण त्याहून अधिक ईर्ष्या वाटत होती, राग येत होता.
संध्याकाळी मुलांनी बातमी आणली, “मिता घरून पळाली!” मी ताबडतोब व्हरांड्यात जाऊन पाहिलं. मिता नव्हती. तिने गळ्यातील पटट्यातून मान बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं व ती पसार झाली होती. रिकामा पट्टा आणि साखळी लोंबकळत पडले होते. “उनाड, व्यभिचारी मुलगी!” मी चडफडत उद्गारलो.
ती कुणाकडे गेली असणार हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती, पण ते दोघं कुठे असणार हे कळणं शक्य नव्हतं. रात्री अचानक मिताचा आवाज ऐकू आला. घरामागच्या शेतात मिता व लाल्याचा संसार सुरू होता. मी दोन दगड त्यांच्यावर भिरकावले. समोर लाल्या व मागे फरफटत मिता, दोघंही अंधारात निसर्गाच्या कुशीत पसार झाले.
“मिताला सोडवायला तू जाणार नाहीस?” मला आरामखुर्चीत अंग टाकताना पाहून मुलांनी आश्चर्याने विचारलं. “मरू दे तिला!” मी वैतागाने उद्गारलो. “तिची तीच लायकी आहे!”
लाल्यासोबत तृप्त होऊन रात्री केव्हा तरी मिता परतली. बराच वेळ दारावर तिने पंजा खरवडला, पण मी दार उघडून तिला घरात घेतलं नाही. वयात आलेली मुलगी रात्री उशिरा परत आली की बापाला काय वाटतं ते मी अनुभवत होतो.
आता शेवटचं जालीम अस्त्र मी उपसलं. लाल्याला अन्नातून विष द्यायचा निश्चय केला. कुत्र्यांना मारायचं विष बाजारात मिळत नव्हतं. ते फक्त नगरपालिकेत कुत्री मारण्याच्या विभागाकडे असतं असं कळलं. गडचिरोली नगरपालिकेकडे बऱ्याचदा मागणी केली. नगरपालिकाच ती! कोणतंही काम सरळ होईना. अनेक कारकुनांनी अनेक दिवस माझा विनंतिअर्ज तपासून शेवटी निकाल दिला, की हे जहाल विष अनधिकृत माणसाच्या हाती देता येणार नाही. ‘अरे, मी डॉक्टर आहे. याहून किती तरी विषारी द्रव्यं हाताळायचा, वापरायचा मला अधिकार आहे!' माझा तर्क वाया गेला. शेवटी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याला फोन करून, विशेष विनंती करून कुत्री मारायचं विष मी मिळवलं.
ते विष घेऊन आमचा माणूस शोधग्रामला परतला. लाल्याला शंका येऊ नये म्हणून गेले आठवडाभर आमच्या घरामागे आम्ही अन्न ठेवत होतो. आमच्या नकळत येऊन तो ते खाऊन जात होता. त्याला आमच्या घरी अन्न स्वीकारायची सवय झाली होती. आज संध्याकाळी त्या जागी विष टाकलेला दूध-भात ठेवला. आमच्या पाळीव कुत्र्यांनी चुकून ते विषारी अन्न खाऊ नये म्हणून सर्वांना बांधून ठेवलं. आमचा माळी दूर अंतरावर बसून लाल्या केव्हा विष खातो याची टेहेळणी करत बसला.
दोन तासांनी माळी घरात आला. “काय झालं रे?” आम्ही प्रचंड उत्सुकतेने विचालं. “काय सांगू साहेब, हा कुत्रा हाय का हैवान?” माळी उद्गारला. “लाल्याने त्या दूध-भाताजवळ जाऊन वास घेतलान्, तोंड लावलाच नाही, आन्मग येक पाय वर करून त्या दूध-भातावर दोनदा मुतला आन्चालला गेला!” माळ्याने सांगितलं.
या कुत्र्याच्या विलक्षण बेरकीपणापुढे मी हात टेकले. “जा, तो विषारी भात खड्ड्यात गाडून टाक!” मी माळ्याला सांगितलं आणि मुकाट्याने आपल्या कामाला लागलो.
लाल्या अजूनही तशाच बेदरकारपणे शोधग्राममधे राहत होता; पण त्याचं वेड आता माझ्या मानगुटीवरून उतरलं होतं. आता मी त्याच्याकडे दुर्लक्षच करत होतो. पण काही दिवसांनी लाल्याने टीपूवर पुन्हा हल्ला करून त्याला जखमी केलं. टीपू आजकाल तुषारच्या घरी राहत असे. तोच टीपूला सांभाळत होता. लाल्याने केलेला हल्ला तुषारला झोंबला व त्याने लाल्याला खतम करण्याचा विडा उचलला. सर्व प्रयत्न करून त्यालाही ते साधलं नाही तेव्हा लाल्याला मारणाऱ्याला १५१ रु.चं बक्षीस जाहीर केलं. माझ्या डोक्यावरचं भूत आता त्याच्या डोक्यावर पाहून आता मला गंमत वाटत होती.
बक्षिसाच्या लोभाने बऱ्याचजणांनी लाल्याला पकडण्याचा, मारण्याचा प्रयत्न केला. कुणालाच ते साधत नव्हतं. लाल्या मन मानेल तेव्हा त्याच्या गावात व मन मानेल तेव्हा शोधग्राममधे राहत होता. तो उघडपणे वावरत होता. आम्ही सर्व ते मुकाट्याने पाहत होतो. मी तर त्याचा नादच सोडला होता. “मला काय इतर महत्त्वाची कामं नाहीत? का म्हणून मी त्याच्या नादी लागू? एका गावठी कुत्र्याशी कसली प्रभुत्वाची स्पर्धा?”
“नायना, काम फत्ते! लाल्या खतम!” आनंद-अमृतने धावत येऊन बातमी दिली. “कसं झालं?” माझा विश्वास बसेना. आजपर्यंत किती तरी वेळा त्याने हुलकावण्या दिल्या होत्या. तलावाच्या पाळीवर रतन शहा व गुरू दोघं उभे होते. त्यांच्याजवळ जाड सोटे होते. लाल्या तिकडून जाताना दिसला म्हणून ते दोघं त्याच्या अंगावर धावले. तो पळाला, पण चुकून पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात पडला. तो पाण्यात पोहण्याच्या प्रयत्नात असताना रतन व गुरूला चांगली संधी मिळाली. रतनने एकच असा जबरदस्त रट्टा त्याच्या डोक्यावर हाणला की त्याची कवटीच फुटली.”
मेलेल्या लाल्याला बघायला सर्व पोरं धावली. आनंद-अमृतने आग्रह करूनही मी गेलो नाही. जावंसंच वाटलं नाही. त्यानंतर दोन-तीन दिवस मी व मुलं आपसात फार बोलत नव्हतो.
बराच वेळ छताकडे टक लावून बघत मग अमृत बोलला, “खरंच, लाल्यासमोर इतर सर्व कुत्री फिक्की होती. त्याच्यासारखा कुत्रा आपल्याकडेच असायला हवा होता!”
आपण किती विचित्र इच्छा बोललो, आता नायना आपल्याला रागावतील, अशा अपेक्षेने त्याने माझ्याकडे पाहिलं.
मी काहीच बोललो नाही.
लाल्या गेला. आपला शत्रू गेला. आता आपल्याला स्पर्धा उरणार नाही असं मला वाटलं. पण मनाने नवे लाल्या शोधले.
वर्षभरात मला पहिला हार्टअटॅक आला.
(चित्र – गिरीश सहस्त्रबुद्धे)
(अनुभव, दिवाळी २०१७च्या अंकातून साभार)
