"माझं काहीतरी चुकलंय असं मला वाटतंय!'' मी म्हणालो.
''पण तुझं नक्की काय चुकलंय ते तर सांगत नाहीस मग सल्ला काय देणार?''
''तेच तर कळत नाही पण भूतकाळाचं ओझं वाहाणं हे एक अवघड काम आहे, बघ!''
''हे तुझं असलं बोलणं माझ्या डोक्यावरून जातं!'' त्याच्या डोक्यावरून हात मागे नेत मित्र म्हणाला.
''समजा मी ती सगळी हकीकत तुला सांगितली तरी तू मला पटेल असं काही बोलशील असंही नाही!''
''मग माझा फुकट वेळ का खातोस?''
''ते ही खरंच, काय करावं?''
''चल. एखादा पिक्चर टाकू!''
''मूड लागत नाही.''
''म्हणून माझा मूड खराब करतोस की काय?''
''तसं नाही, चल, आपण कुठं तरी कुणी ओळखीचं भेटणार नाही अशा ठिकाणी जाऊ, एक दोन किंवा तीन चार पेग मारू. तू ऐक, मी बोलतो.''
''ठीक आहे, चल!'' मी ऐकतो,
मी मित्राला सांगू लागलो, ''मी स्कूटरवरून निघालो होतो. खास कारण काहीच नव्हतं. माझ्या बऱ्याच गोष्टींना कारणं देता येत नाहीत. म्हणजे काय की मी पेपर वगैरे वाचत असतो. एकदम वाटतं बाहेर पडावं. पायीच हिंडावं. मग मी चालू लागतो. कधी वाटतं स्कूटरवरून जावं. मी स्कूटर काढतो. बहुदा बाहेरही काही घडत नाही. मी अर्ध्या पाऊण तासानं घरी परततो. कधी कुणाकडे अचानक टपकतो. तिथंही काही फार घडतं असं नाही पण मनातून खात्री असते, हे निरर्थक नाही.
तसंच काही वेळेस वाटतं इकडे जाऊ नये. स्कूटरवरून जाऊ नये. अमक्याशी बोलू नये. मनातून असं खूप तीव्रतेनं वाटलं की ते मी एकतो. बरेचदा फायदा होतो, कधी काहीच घडत नाही. पण ह्या वाटण्याकडे दुर्लक्ष केलं तर तोटा ठरलेला.
आज मी खरंतर देवाला निघालो होतो. गणपतीला नमस्कार करावा, म्हणावं, ''मला सुखात ठेवतोस, थँक्स!'' आणि परतावं. वाटेतच नेहमीच्या रस्त्यानं न जाता दुसऱ्या रस्त्याने जावं असं वाटू लागलं. त्यात बऱ्यापैकी आच होती. असं वाटणं मी कधीही दुर्लक्ष करून सोडून देत नाही; पण तेवढ्यात स्कूटर रिझर्व्हला आली. पेट्रोल भरून घ्यावं नि मग रस्ता बदलावा, म्हणून मी त्या 'वाटण्या'कडे दुर्लक्ष करून तसाच पुढे निघालो. तर पुढे जाऊ नये, हे वाटण्याची तीव्रता अधिक वाढली. चप्पल चावली असतांना तिथं लावलेली चिकटपट्टी निघावी आणि चप्पल त्याच जागेवर पुन्हा पुन्हा घासावी तसं 'जाऊ नये' हा विचार सतावू लागला; पण पेट्रोलपंप समोर दिसत होता. पंपावर गर्दी होता. माझ्याकडे पाचशेची नोट होती. चिल्लर काहीच नव्हती. गर्दीत घुसाघुशी. भारतात रांग म्हणून कुणी लावत नाही, असे विचार, मोडीवरून वाद, हवा भरायचा पंप नादुरुस्त ह्या प्रकरणात 'रस्ता बदल' हा धोका विसरलो आणि पुढं जाऊ लागलो. नंतर हा रस्ता सोडायचा विचार आठवला. कंटाळा केला. तसाच पुढं निघालो. आता वाटतं, चुकलो. वाटेत एक देऊळ होतं. या रस्त्यानं जातांना तिथंही मी घुसायचो. पुजारी ओळखीचे झाले होते. चार शब्द बोलून नमस्कार उरकून निघायचो. स्कूटर थांबवायच्या आधीच देवळाच्या दाराबाहेरच्या परिसरात गर्दी दिसली. त्या गर्दीकडे जायला हवं तेवढं लक्ष गेलं नव्हतं. तरी एक वेडी व्यक्ती त्या गर्दीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असावी, इतपत कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात नोंदवलं गेलं.
देवळासमोर स्कूटर थांबवून मी आत शिरलो. नमस्कार केला. आपण नेहमी बऱ्याच गोष्टी करतो. दुसरेही त्याच गोष्टी करतात पण ते नक्की काय कसं करतात, ह्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असतं. देवाचा नमस्कार ही त्यातलीच बाब. देवळातून बाहेर पडून स्कूटरकडे वळलो आणि ती वेडी समोरून आली. भेसूर हा शब्द लगेच आठवला. कुणाला तरी काही तरी सांगत असावी; असे हातवारे करून बोलत होती.
दोन दात पडलेले, आधीच मोठे असलेले पाणीदार डोळे विस्फारलेले. अंगावर एकही कापडाचा तुकडा नाही. बेंबीच्या वर कमरेला एक सुतळी बांधलेली, उभार स्तन आणि नंतर ते दृश्य नजरेसमोर आणलं तेव्हा खटकलेली एक गोष्ट म्हणजे, तिच्या डोक्यावरचे अस्ताव्यस्त पसरलेले केस सोडले तर अंगावर एकही केस नव्हता. ती गोष्ट मला भूतकाळातल्या कुठल्या तरी घटनेचं स्मरण करून देत होती पण नक्की कुठली गोष्ट ते आठवेना.
तिच्या अंगावर शाईचे ओघळ होते. ती पाठमोरी वळली तेव्हा पाठीवर जखमांच्या खुणा होत्या. स्वत:भोवती गिरकी मारून हातातली काठी हवेत उडवून तिनं माझ्यावर नजर रोखली. ती हसली. त्या नजरेत, त्या हसण्यात ओळख होती की तो भास होता? ती बोलू लागली. काय ते कळत नव्हतं पण बोलत होती. पोरंबाळंच नव्हे तर त्यागर्दीत बाया बापेही होते. सगळे तिच्याकडे कुतूहलानं बघत होते. पोरांच्या प्रत्येक टोळक्याला असतो तसा त्या टोळक्याचाही एक नेता होता. हा जोरजोरात 'नागडी' आणि 'येडी' अशा दोन घोषणा आळीपाळीनं देत होता. 'नाऽऽगडी', 'येऽऽडी' असा शब्दातल्या पहिल्या अक्षराचा सूर वाढवून त्या घोषणा चालू होत्या. त्याच्या मागून त्याचे अनुयायी त्या घोषणा देत होते. तिचं तिकडे लक्षच नव्हतं. बरं त्या वानरटोळीला ओरडूनही काही उपयोग नव्हता. त्यामुळे फक्त गर्दीचं लक्ष माझ्याकडे वळलं असतं एवढंच.
ती पुढं सरकली. तिचे शब्द मलाच उद्देशून होते. ती माझ्याकडेच येत होती. मी स्कूटरला किक मारली, स्कूटर गीअरमध्ये टाकली. आपण त्या गावाचेच नाही असं दाखवत देवळाच्या प्रांगणातून बाहेर पडलो आणि थोडं पुढे जाऊन वेग वाढवला. मागे वळून न पाहता थेट घरी पोहोचलो. बायकोला चहा करायला सांगितला. पंखा लावून आरामखुर्चीत पहुडलो. चहा बरोबर ॲस्प्रोच्या दोन-तीन गोळ्या तोंडात टाकल्या आणि झोपून गेलो. नंतर दोन आठवडे त्या देवळाकडे मी फिरकलोच नव्हतो. त्या शब्दांनी मला तिची ओळख पटवली होती. मी चांगलाच हादरलो होतो.
मी तेव्हा शाळेत होतो. पांड्या सोनाराच्या धाबळीवर निघालो होतो. बरोबर कोल्हापूऱ्याचा बाळू आणि बंड्या काळे होते. बाळूचं आडनाव कोल्हापुरे असलं तरी मी ऐकत होतो तेव्हापासून ते नावाच्या आधीच म्हटलं जात होतं. धाबळीवर बाळू आणि बारक्यांना तोटा नव्हता, त्याचा परिणाम म्हणजे रोज सकाळी आम्ही शाळेला बरोबर निघायचो. दहालाच घरातून बाहेर पडायचं. अर्धा पाऊण तास धाबळीवर घालवायचा मग शाळेकडे प्रयाण, हा आमचा नियम होता. धाबळीला ढाबळ म्हणणारा मी एकटाच. तसं ढाबळीच्या परिसरात शुद्ध भाषा बोलणाराही मी एकटाच होतो.
पुण्यातल्या धाबळीवर मी पहिल्यांदा दाखल झालो तेव्हा मी सातवीत होतो. मला कबुतरांचं अतोनात वेड. आमच्या मुंबईत बघाल तिथं कबुतरं. जरा मोकळी जागा दिसली की तिथं एखादा पारवा नाहीतर कबुतर बसून घुमायला सुरुवात करणार. अगदी छोट्या जागेतही आधी एखादी मादी येऊन बसायची. मग खाट् खाट् पंख वाजवत नर यायचा. त्या तेवढ्या जागेत मागं पुढं वळत, गळा फुगवत तो घुमायला सुरुवात करायचा. मादीच्या पाठीवर पाय ठेवून जुगायचा प्रयत्न करायचा. घसरायचा. कार्यभाग साधला नाही तर तोल सावरत, पंख फडफडवत जवळच्या तारेवर जाऊन बसायचा. मग परत यायचा. मादी ही वेळ साधून उडून जायची. नाही गेली तर रावजी परत यायचे. अशावेळेस बहुदा ते दोघं चोचीत चोची घालून गुळण्या भरायचे.
सुरुवातीला मुंबईतल्या सभ्य वस्तीत माझा असा समज करून देण्यात आला होता की तो नर ही आई आहे; आणि मादी हे पिलू. तो मादीच्या पाठीवर पाय ठेवू लागला की जवळपासचे वडीलधारे माणूस दुसरीकडे बघत असे. पांड्याच्या धाबळीवर बाळ्याने माझा भ्रमनिरास केला; किंवा त्यांच्या भाषेत म्हणजे अंड्यातून बाहेर काढलं. माझं वक्तव्य ऐकून मोठ्याने हसत तो म्हणाला, ''च्यायचं येडं बामण काय म्हणतंय बघ! ए बंड्या, हे म्हणतंय काय ते बघ!'' माझं काहीतरी चुकलंय हे मला उमगलं. ''ए येड्या, त्याच्यायला त्ये मुकं घेत्याती लेका; त्याशिवा चढायला मिळंल का त्येला!'' असं म्हणत बंड्याच्या हातावर त्यानं टाळी दिली. शब्दाच्या शेवटी 'य' आला तर बाळ्या काय किंवा बंड्या काय तो उच्चारायचे कष्ट घेत नसत. शाळेत आणि घरी मला फार काळजीपूर्वक बोलावं लागत होतं, त्याला कारण ह्या पोरांच्या संगतीनं - बघा, त्यांच्या सहवासात राहून बिघडतोय याची जाणीव त्यातून घरच्या लोकांना होत असे.
पांड्यांच्या ढाबळीवर मी दाखल झालो तेव्हा पहिले सहा महिने बाळ्याच माझा गुरू होता. अनेक बारकावे त्यानंच मला समजावून दिले होते; पण नंतर हळूहळू बाळ्या आणि काळ्या माझे भक्त बनले. पुणं वेगळं आहे, हे मी ऐकून होतो पण आई-वडील नसल्यामुळं मी शिक्षणासाठी पुण्याला पाठवला गेलो तेव्हा मुंबई एवढी पुण्यात धावपळ नाही, ट्राम नाही; टांगे आहेत पण 'मागं चाबूक' ओरडल्यावर वळून शिवीगाळ करणारे बग्गीवाले नाहीत, ह्यापेक्षा कबुतरांच्या थव्यामुळे, त्यातल्या फरकामुळे मुंबई आणि पुण्यातला फरक माझ्या लक्षात आला. बग्गीच्या मागं मुंबईत लटकून जाता येत असे पण अशावेळी ज्याला ती संधी मिळत नसे; तो बग्गीवाल्याला 'मागं चाबूक' अशी सूचना द्यायचा. बग्गीवाल्याचा चाबूक लांब असला तरी आमच्यापर्यंत पोचत नसे. आपली गल्ली संपेपर्यंत किंवा बग्गीवाला बग्गी थांबवून उतरेपर्यंत आम्ही मागे लटकायचो. पुढं ही 'मागं चाबूक' आरोळी बर्फाच्या आणि गुळाच्या गाड्यांसाठी आम्ही पुण्यात वापरू लागलो.
मी आत्याच्या घराच्या माडीवर उभा होतो. वरून एक कबुतरांचा थवा - याला पुण्यात तेव्हा 'पर्रा' म्हणायचे, उडत चालला होता. ह्या थव्यात वेगवेगळ्या रंगाची पंचवीस - तीस कबुतरं होती. तो पर्रा आकाशात गोल गोल घिरट्या मारत होता. थोड्यावेळानं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं तो थवा एका घराच्या छपरावर उतरला. मग एक एक दोन दोन करत ती कबुतरं त्या घराखालच्या अंगणात उतरली असावीत. ती कुठं उतरतात, हे नक्की दिसत नव्हतं. शेवटचं कबूतर दिसेनासं झालं आणि मीही घरात शिरलो.
मुंबईला अशी चित्र विचित्र रंगाची कबुतरं कमी आणि पारवेच जास्त. कुणी त्रास दिला किंवा कसला मोठा आवाज झाला तर ती आकाशात उडत आणि परत जमिनीवर येत पण अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास गोल घिरट्या मारत हिंडतांना त्यांना मी कधीच बघितलं नव्हतं. दिवाळीत फटाक्यांच्या आवाजानं ती क्वचित उडत पण ते थवे प्रचंड होते. २०-२५ कबुतरांचे नव्हते. सकाळी आणि संध्याकाळी मात्र आकाशात खूप उंचावरून पारव्यांच्या जोड्या उडत उडत चाललेल्या दिसत. ते काळे ठिपके नाहीसे होईपर्यंत मी तिकडे बघत राहायचो.
पुण्यात एकही पारवा नसलेला रंगीबेरंगी कबुतरांचा थवा एका विशिष्ट परिघात अर्धा पाऊण तास घिरट्या घालत होता. मी पेशवे पार्कमधे जाऊन शेपटीचा पिसारा फुललेली शोभिवंत कबुतरं बघत असे. त्या छोट्याशा पिंजऱ्यात ती एका दांडीवरून दुसऱ्या दांडीवर उडून बसत, तेव्हा त्यांचा पंखांच्या टाळ्या वाजल्यासारख्या आवाज होई. त्यांना कबुतरवाले 'लख्खे' असं म्हणत. पांड्यानं एक लख्ख्याची जोडी गम्मत म्हणून ठेवली होती. त्या मोरासारख्या पिसाऱ्यानं ती फार उंच उडू शकत नसत. पांड्यानं त्यांच्या पायात चांदीचे पैंजण घातले होते. पण लख्खे बघण्यात गंमत नव्हती.
आज तो उडणारा पर्रा बघून मला एक साक्षात्कार झाला. पुण्यात उंच उडणारी कबुतरं होतीं. मग मी रोज सकाळी अभ्यासाच्या वह्या पुस्तकांसह उन्हात बसून, अभ्यास करायच्या निमित्तानं माडीवर बसून ती कबुतरं न्याहाळू लागलो. त्यांची नि माझी काही वेळा चुकामूक व्हायची. कधी ती उशिरा उडायची. कधी मी माडीवर यायचो तेव्हा ती उतरत असायची. उडताना त्या थव्याचे बदलते आकार, पुढं एकटंच जाणारं एखादं तेज कबुतर, हवेत गिरक्या मारून पुन्हा सरळ उडू लागणारं एखादं गिर्रेबाज कबुतर, यांच्यासह वळणारा तो थवा. उतरताना पंखांचा ताणून 'व्ही' आकार करत टाचणारी (हे मागून कळलं) कबुतरं. कबुतरांच्या जगातली परिभाषा मी तेव्हा आत्मसात केली, ती अजून विसरलेलो नाही. मधून कधीतरी कबुतरबाजारात कडेला जाऊन उभा राहतो पण आता मी तिथं शोभत नाही. तरी त्याचं संभाषण ऐकतो. एखाद्या कबुतरावरून त्याच्या मालकाच्या परवानगीनं हात फिरवतो नि परततो; पण आता पूर्वीसारखं त्यांच्यातलं होणं जमत नाही. तेव्हा बालगंधर्वचा - महर्षी शिंदे पूल नव्हता. आता त्याच्या खालूनही बरंच पाणी वाहून गेलंय.
एक दिवस कशी कोण जाणे बत्ती पेटली. कुणीतरी त्यांना मुद्दाम उडवतंय हे लक्षात आलं. कारण ती ज्या पत्र्यावरून उडायची, तिथं एक माणूस ती उडत असताना काळं फडकं लावलेला बांबू उंच करून हलवत असलेला दिसला. मग मी आमच्या गच्चीवरून घराच्या पत्र्यावर चढायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सायकलचे टायर वर फेकणारी मुलं दिसली. त्यांचा नि ह्या कबुतरांच्या उडण्याचा संबंध असावा, हे ही लक्षात आलं. मी तिकडे बघत असतानाच रव्या वर आला. हा रवींद्र माझा आत्तेभाऊ. खाली माझ्या नावानं बरीच हाकाटी झाली असणार; आल्या आल्याच त्यानं विचारलं, ''ए बहिरट! ऐकू येत नाही का?''
मी त्याच्याकडं बघितलं. ''कशात रमला होतास एवढा?'' मी काय सांगावं ह्याच्या विचारात पडून म्हटलं,''तिथं काहीतरी झालंय, खूप आरडाओरडा चाललाय!'' तिकडे पाहात रव्या म्हणाला, ''ते नेहेमीचच आहे. पोपट्याची कबुतरं आहेत तिथं! खाली उतर. उद्या जाऊ या तिथं!'' मग आम्ही खाली गेलो. त्या संध्याकाळी बोळाच्या तोंडाशी उभं राहून मी पोपट्याची ढाबळ बघितली. मी पुढं जावं की परतावं. याचा विचार करीत असतानाच कुणीतरी विचारलं, ''काय रे, काय पायजेल!'' मी नकारार्थी मान हलवली. ''खबुत्रं पाह्यला आलास का?'' मी होकारार्थी मुंडी हलवली. त्यानं हातानंच जवळ बोलावलं. ''बामणाचा दिस्तोस?'' मी गप्प उभा होतो. अशातऱ्हेनं मी पोपट्याच्या धाबळीत प्रवेश केला होता.
कबुतरांनी डार्विनला आकर्षित केलं होतं. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या ''ओरिजिन ऑफ स्पेसीज'' ह्या ग्रंथात पारव्यांनी खूप जागा व्यापली आहे; हे मला पुढं महाविद्यालयात प्राणिशास्त्र शिकतांना कळलं. आपण अज्ञानात जगतो. आखलेल्या चौकटीच्याबाहेरही जग असतं ते लक्षात येत नाही. त्यामुळे शाळेत मला डार्विन, उत्क्रांतीवाद वगैरे आडवे आले नाहीत. कळली ती फक्त ढाबळीतली कबुतरं.
पोपट्याच्या ढाबळीवर मी कडेकडेनं पोहणारा मानद सदस्य होतो. तिथल्या माणसांनी मला आपलं म्हटलं नव्हतं. मी ही नवखा, बुजरा असा होतोच पण कबुतरांच्या बाबतीत अज्ञानी आहोत ह्याची जाणीव मला तिथं झाली. माझ्या अंगाखांद्यावर मध्यमवर्गी - कनिष्ठ मध्यमवर्गी बामणी ठसे होते. माझं बोलणं, कपडे, स्वच्छता आणि टापटीप यांवरून ढाबळीवरच्या नव्या ओळखीत पहिला प्रश्न ''बामणाचा पोर इथं (हे बहुदा ''हितं'' असं उच्चारलं जायचं) काय करतो?'' हा असे. त्यामुळं मला बुजल्यासारखं वाटायचं. ब्राह्मणातील इतर मुलं जे करीत नाहीत ते आपण करतोय, ह्यामुळं थोडा अभिमानही वाटत असे. मात्र हा अभिमान ब्राह्मणांत व्यक्त करायची सोय नव्हती.
माझं बामणेपण प्रस्थापित झाल्यावर साहजिकच मी कुणाचा कोण, याची चौकशी होत असे. कारण या भागात मी नवाच. मग आत्याच्या यजमानांकडे राहातो, हे सांगावं लागे. बाबुराव तसे मालदार इसम पण आपण त्यांचे आश्रित हे मी विसरू शकत नव्हतो. इथं मला सोडतानाच माझ्या अगदी गरीब-आर्थिक आणि स्वाभाविक - मामानं ते माझ्या मनावर ठसवलं होतं. ''शिक्षण एवढाच वर यायचा मार्ग मी तुला दाखवू शकतो. मी तर कर्मदरिद्री; म्हणून तुला बाबुरावांच्या पदरी घालतोय. उंडगेपणानं वागू नकोस; वगैरे.'' पण बाहेरच्यांना हे ठाऊक असायचं कारण नव्हतं. बाबुरावांचा नातेवाईक, ''अरे बापरे!'' असा एक भीतियुक्त आदर मलाही थोडासा चिकटायचा, जेणेकरून मी परक्यात जमा व्हायचो. मला ती मंडळी आपला म्हणणंच शक्य नव्हती. त्यांचे विनोद मला बघून थांबत. माझ्यासमोर तोंडातून शिवी गेली तर सुरुवातीस पोपट्या जीभ चावायचा. त्यामुळं तिथं एकात्म होणं तसं अवघडच होतं.
पुढं मी पांड्याच्या ढाबळीवर जाऊ लागलो. एकदा असाच कधीतरी नंतरच्या काळात पोपट्या भेटला होता. ह्या मंडळींनी आपलं म्हणायला हवं तर अधनं मधनं शिव्या पेरून बोलायला हवं, हे तो पर्यंत मला उमगलं होतं. मी पोपट्याशी चर्चा करतांना ''मग साल्याला.'' असं म्हटलं होतं. पोपट्या चपापला. ''तू बामणाचा, तुझ्या तोंडी शिव्या शोभत न्हाईत!'' तो म्हणाला, मग थोडं थांबून तो म्हणाला, ''पांड्याची खबुत्रं एकदम भारी पण पांड्या लयी ब्याकार! तुला भिग्डवला त्यानं, कधी पांड्या आडवा आला तर मला सांग!''
पोपट्या घरातनं पळून गेला तो पांड्यामुळंच. ते खूप नंतर. पण तेव्हाही तो मला म्हणाला, ''तू पांड्याचा नाद सोड, वंगाळ हाये भडवा!'' ते खरं होतं. पोपट्या सरळ होता. हौस म्हणून चार गंडे खबुत्रं त्यानं पाळली होती. पांड्या हा खबुत्रांचा धंदा करणारा माणूस होता. २५-३० गंडे कबुतरं ठेऊन होता. त्याच्याकडं नवी पिल्लं वाढायला लागली की त्यांना खूप मागणी यायची. त्याकाळात १५-२० रुपयाला एक एक बच्चा विकला जायचा.
पांड्याकडं मी जायला लागलो त्याला बाळ्या कारणीभूत होता. पोपट्याच्या ढाबळीवर माझी नि बाळ्याची ओळख झाली होती. बाळ्या नेहमी दूर उभं राहून कबुतरं पाहात असे. तो ठराविक जागी उभा असे. तिथून तो जरा का पुढं सरकला, तर कुणी ना कुणी त्याला डाफरायचं. ढाबळीवर एखादी गोष्ट नीट घडली नाही तर त्याचं खापर बाळ्याच्या माथी फोडलं जायचं. बाळ्याचा पायगुण चांगला नाही, असा एक समज होता. का कोण जाणे मला सगळे दयगुणी (दैव गुणीचा अपभ्रंश) समजत.
आता विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की यात बाळ्याचा काही दोष नव्हता; पण काही काही माणसांचं नशीबच गांडू असतं. अशा गांडू नशिबानं बाळ्या जन्माला आलेला जन्मजात पांडू होता. आपलं नशीब त्यानं मान्य केलेलं होतं. तो स्वत:च तसं म्हणायचा. तो कितीही अपमान त्यामुळं पचवू शकत होता. ''बाळ्या, तू स्साला ऐकून घ्यायला नको होतंस. मी असतो तर एक ठेऊन दिली असती'' असं त्याला म्हटलं की तो म्हणायचा, ''तुला ठावं हाय; मग उगाच भांडण कशाला व्हाडवायचं? गप बसलं की त्ये पन थोडी तान तान करतंय नि गप बसतंय!'' हे खरं होतं. बाळ्यावर कुणी खेकसला की तिसराच कुणी म्हणे, ''जाऊ द्या मालक, बाळ्याच तो, दुसरं काय करनार किंवा घडनार?'' ''जे जे होईल ते ते पाहावे'' हे तत्त्व बाळ्यानं त्या वयातच आत्मसात केलं होतं. दुसऱ्यावर अन्याय झालेला बाळ्याला खपत नसे पण ज्याची बाजू घेऊन तो बोलायचा, तोच म्हणे ''बाळ्या, नाट लावू नको, भडव्या! त्याच्या बाजूनं बोल.'' मग बाळ्या खिन्न हसे. बाळ्याला परिस्थितीनंच तसं हसायला शिकवलं होतं.
बाळ्या असा सर्वांपासून दूर असे. तर बाबुरावांचा पाव्हणा, बामण म्हणून मला पोपट्याच्या ढाबळीवरच्या आतल्या वर्तुळात समावेश नव्हता. त्यामुळं खरंतर बाळ्या नि मी एकमेकांजवळ आलो. त्या काळात मी शुद्ध मराठी, तेही पुस्तकी मराठी बोलायचो. ढाबळीवरची बोली आणि कबुतरांसंबंधित परिभाषा ह्यांचा मला गंधही नव्हता. एक गंडा खबुत्रं म्हणणे चार कबुतरं, हा हिशोब मला ठाऊक नव्हता. त्यामुळं ते माझ्याशी जे बोलत, ते बरेचदा मला कळत नसे. ''च्यायला, हे बामण खुळं दिसतंय'' ही प्रतिक्रिया पहिले पंधरावीस दिवस मी ऐकली पण तोपर्यंत बाळ्या आणि मी मित्र झालो. मग पर्रा म्हणजे चार; खुटाड म्हणजे ''आऽऽ! आऽऽ!'' करतांना हातात धरून जिला पंख फडफडवायला लावलं जातं अशी मादी; ही बहुदा अंडी घालत नसे. ह्या वांझ माद्या पर्रा परत ढाबळीकडं आकर्षित करायला वापरल्या जात. तसंच नव्या नराला मादी जोडेपर्यंत त्याच्याबरोबर अशा माद्या ठेवल्या जात. ढाबळीवर खुराडी दोन प्रकारची असतात, ही माहितीही हळूहळू माझ्या लक्षात आली होती. माझ्या ज्ञानात अशी भर पडत असताना बाळ्याची आणि माझी जवळीक घडली होती.
एक दिवस डोळ्यावर ऊन येतं म्हणून मी सावली शोधली. सगळेजण हळूहळू माझ्याकडे विचित्र नजरेनं बघू लागले. ते आधी माझ्याही लक्षात आलं नव्हतं. हवा चालली होती; म्हणजे कबुतरं हवेत फिरत घिरट्या घालत होती. छापीवाला छापी हलवत होता. छापी साधारपणे काळं कापड उंच बांबूच्या टोकाला लावून केली जाते. दुसरा हवेत टायर फेकत होता. टायर फेकून जोरात शिटी वाजवणं ज्याला जमलं तो वट राखून असे. विशेषत: तोंडात बोट न घालता नुसती जीभ मुडपून जो जास्तीत जास्त कर्कश शिटी वाजवेल, तो बहाद्दर जरा छाती फुगवून हिंडायचा. रंग्या आणि विल्या हे छापी बहाद्दर होते. सुदाम शिट्टी मारत टायर फेकत होता, अशावेळी मी जागा बदलली होती.
ढाबळीवर अशा किरकोळ किरकोळ गोष्टींना फार महत्त्व असतं. कोण कुठं उभा होता, कुणी कोणत्या रंगाचे कपडे घातले, कोण कुणाशी बोलला; ह्या सर्व गोष्टींचा एखाद्या चांगल्या वा वाईट घटनेशी संबंध जोडला जात असे. त्यावरून त्या माणसाला शिव्या किंवा ओव्यांचा धनी बनवण्यात येत असे. शिंकणं, खोकणं ह्या गोष्टी वर्ज्यच असत. तुम्ही एखाद्या दिवशी छापी हलवतांना कबुतर पडलं तर पुन्हा छापी हातात येणं अवघडच. अशा घटना विसरायला देखील बराच वेळ लागतो. समजदार पोरं एक दोन आठवडे मग गायब व्हायचीच पण पुन्हा परतल्यावर छापीला हात लावायला धजत नसत. कबुतर पडणं म्हणजे महापाप.
मी जागा बदलून सावलीला आलो, तेव्हा बाळ्यातलं आणि माझ्यातलं अंतर कमी झालं. मी तिथं निवांत उभा राहून हवा पाहात होतो तर दोघं तिघं जण माझ्याकडे बघून हातवारे करताहेत, असं थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं. तेवढ्यात दंगल झाली. पोपट्याचा पर्रा दुसऱ्या, बहुदा हौदवाल्याच्या पर्ऱ्यात मिसळला. दोन वेगवेगळ्या ढाबळीची कबुतरं एकमेकांत मिसळत, तेव्हा त्याला दंगल किंवा कुस्ती म्हणण्यात येत असे. कुस्ती झडली की बाळ्याला दूर जायला सांगायचे, तशा ह्या खुणा असाव्यात असा माझा समज झाला. दरम्यान माडीवरून वशा ओरडला. हा पर्रा खूप मोठा असून तो बहुदा साहेबरावाचा असावा. साहेबराव हे कबुत्रातलं मोठं प्रस्थ होतं. त्याच्याकडे ४० गंडे कबुतरं होती. हौदावरच्या ढाबळी पोपट्याच्या जवळपास म्हणजे पाच-सहा गंडेच कबुतरं होती. वशाच्या बातमीनं ह्या घटनेस फार महत्त्व प्राप्त झालं होतं.
वरती वशानं खुटाड फडकवायला सुरुवात केली. पोपट्याकडे एक निळी डुब्बाज मादी होती. तिला अनेक नरांबरोबर ठेऊनही तिनं कधी अंडीच दिली नाहीत. कधी तरी दिली तर कितीही दिवस उबवून त्यातून पिल्लू बाहेर येत नसे. अंडं फोडलं तर आत जीव धरलेला नसे; तरीही का कोण जाणे तिच्या मागे बरेच नर हिंडायचे. तेव्हा पोपट्यानं तिचं खुटाड केलं होतं. तिला वशानं फडकवताच पोपट्यानं खाली दाणे टाकायला सुरुवात केली. छापी भिंतीला विसावली. टायरं जमिनीवरून गोळा करून आडोशाला ठेवली गेली. कुस्ती संपली तसा पोपट्याचा पर्रा वेगळा झाला, घिरट्या मारत हळूहळू उतरू लागला. कुणीतरी चाणाक्षपणे त्यात एक कबुतर जास्त असल्याचं ताडलं. त्यानं ते पोपट्याच्या लक्षात आणून दिलं. पोपट्यानं सगळ्यांना शांत राहायची खूण केली. खरं तर त्याची गरज नव्हती.
या पत्र्यावर चार, त्या पत्र्यावर चार असं करत खबुत्रं उतरू लागली. बबरा चिर पर्रा आणि लाल दय्यर मात्र नेहेमीप्रमाणे त्यांच्या माद्यांसह थेट पाण्यावर उतरले. पाणी पिऊन होताच दोन्ही नर घुमू लागले. चुटीदार लाल जाळीच्या खांबावर बसून मान वाकडी करून पाण्याकडे पाहात होता.
सगळी पोरं भिंतीच्या कडेला श्वास रोखून उभी होती. सर्वत्र शांतता होती. सगळ्यात शेवटी निळा डुब्बाज टाचत टाचत पाण्याच्या कुंडीपासून थोड्या अंतरावर उतरला आणि ऐटीत पाण्याच्या दिशेनं पावलं टाकू लागला. एरवी पोपट्यानं त्याला उचलून घेतला असता; पण आज पोपट्याही खांबासारखा निश्चल उभा होता. एक तांबडा फाकती त्याच्या पर्ऱ्याबरोबर खाली उतरला होता. वशा जोंधळे फेकत जाळीच्या दारापर्यंत पोहोचला.
ढाबळ म्हणजे सर्वसाधारणपणे एक मोकळं अंगण, त्याच्या एका बाजूला दोन खुराडी आणि त्यात ठेवलेली आणि ज्यांची रोज हवा केली जाते अशी कबुतरं. छोट्या ढाबळीवर एक खुराडं, त्यात चार सहा जोड्या एवढाच पसारा असतो. पाण्याची दगडी किंवा कुंडी ही खुराड्यावर पालथी घालून ठेवलेली असते. मोठ्या ढाबळीवर दोन प्रकारची खुराडी असत, एक चौकोनी खोक्यात दोन कबुतरं मावतील असे कप्पे केलेलं फडताळ. ह्यात जोड्या ठेवल्या जात. हा एक प्रकारचा कैदखानाचा कारण सकाळ संध्याकाळ ह्यांना बाहेर काढलं जाई आणि हवा धरून ते तास दीड तास मोकळे असत. दुसऱ्या खुराड्यात बरेच नर एकटे ठेवले जात. हे खुराडं म्हणजे मोठं लाकडी कपाट असे, त्यात कबुतरांना नीट बसता यावं म्हणून दोन लाकडाचे तुकडे एकमेकांना काटकोनात ठोकून मग ते घराच्या उतरत्या छपरासारखे थोड्या थोड्या अंतराने एका खाली एक येणार नाहीत अशा पद्धतीनं खुराड्याच्या भिंतींना ठोकले जात. ह्या खुराड्याला बहुदा जाळीचं दार असे. ह्या सर्व प्रकारच्या असतील तेवढ्या खुराड्यांना वेढून पुढं थोडी जागा मोकळी उरेल अशी जाळी ठोकलेली असे. त्यात पाण्यानं घमेलं भरून ठेवलं की कबुतरं आळीपाळीनं अंघोळ करीत असत. ते बघायला मजा यायची. त्यापुढं अर्थातच मोकळं अंगण.
नवीन कबुतर उतरलं म्हणजे पडलं की त्याला पकडायचे दोन मार्ग असत. एक सोपा मार्ग म्हणजे दाणे टाकत त्याला जाळीच्या दारातून आत न्यायचं आणि मग जाळीचं दार बंद करायचं. हा काही राजमार्ग किंवा मर्दानी मार्ग मानला जात नसे. दुसरा मार्ग म्हणजे एखाद्या तरबेज भिडूनं स्थिर उभं राहायचं. कबुतर जवळ आलं की झाप टाकून पकडायचं. ह्यात काही वेळा झडप मारणाऱ्याच्या हातात कबुतराच्या शेपटाची पिसं तेवढी राहात आणि लांडं झालेलं कबुतर मालकाकडे परतायचं. अशा भुंड्या कबुतराला शेपटी फुटेपर्यंत माणसाच्या चेष्टेचा धनी व्हावं लागे. त्याला अर्थातच त्याची कल्पना नसे. त्याचबरोबर ते अभिमानाचा विषय ठरे.
कबुतर पडलेलं मी त्यादिवशी प्रथमच पाहात होतो. पोपट्याच्या ढाबळीवर कबुतर पडणं ही अपूर्वाई होती. ज्यांचे पर्रे मोठे असतात त्यांच्याकडे बरीच कबुतरं पडतात. छोट्या ढाबळीवर त्या मानानं कमी. त्यातही साहेबरावाचं कबुतर पडणं हे आश्चर्यच होतं. ह्याचं कारण त्याच्या पर्ऱ्यात एकतर तिथंच जन्मलेली कबुतरं असायची किंवा बच्चे म्हणून विकत आणून मग वाढवलेली कबुतरं असत. त्याच्याकडे पडलेल्या खबुत्रांना तो लगेचच बाजार दाखवत असे. वशा दाणे टाकत होता. पोपट्या अतिशय सावधपणे आवाज न करता बेताबेतानं पाण्याच्या दगडीजवळ पोहोचला. तो लाल फाकती - अशी कबुतरं साहेबरावाकडे खूप. संपूर्ण शरीराचा एकच एक रंग आणि शेपटाची पिसं फक्त पांढरी तो फाकती - दाणे टिपत इकडचा तिकडचा अंदाज घेत पुढं पुढं चालला होता. साहेबरावाच्या २५ गंडे खबुत्रात आणि शाळेच्या मैदानात वावरायची सवय असलेल्या त्या पाखराला इथं नक्कीच चुकल्या चुकल्यासारखं वाटत असणार. साहेबराव एका शाळेत वॉचमन म्हणून नोकरीला होता. शाळेच्या प्रचंड मैदानात एका कोपऱ्यात त्याचं घर नि घराला लागून त्याची ढाबळ होती. त्यामुळेच त्याला एवढ्या कबुतरांचा बारदाना बाळगणं जमत होतं.
साहेबरावाइतकी किंबहुना त्याच्यापेक्षा मोठी ढाबळ होती ती परबातची. प्रभात स्टुडिओशी ह्या ढाबळीच्या मालकाचा काहीतरी संबंध असावा. बहुदा तोही तिथं वॉचमन असेल किंवा इतर काही काम करीत असेल. ते कधी नीट कळलं नव्हतं. त्याच्याकडची बरीच कबुतरं प्रभातच्या चित्रपटांमधून पडद्यावर दिसत; पण स्टुडिओच्या मागं डोंगराच्या पायथ्याला ही ढाबळ होती. पुढं तिचं काय झालं? पेशवे पार्कच्या बाहेर कुणीतरी पाळलेले असे ठोकाड लख्खे इथंच होते. तेच बऱ्याच चित्रपटात वावरले होते. हे नुस्तेच ठोक ठोक असा पंखाचा आवाज करीत दहा-वीस फूट उंचीवर उडत जाऊन कुठं तरी आधाराला बसत. मग लगेच पाण्याकडे येत. त्यांच्या उडण्यात दम नव्हता.
लाल फाकती पाण्यावर बसला. पोपट्याने झाप मारली. फाकतीच्या पंख्ाांची फडफड झाली. भुंडा फाकती कौलावर बसला, मान खाली करून त्यानं एकदा खाली बघितलं आणि तो उडून गेला. पोपट्यानं हाती लागलेली चार पिसं निराशेनं हवेत उडवली. ''च्या मायला, या बाळ्याच्या! भडव्याला लाता घालाया पायजेल!'' त्याची निराशा बोलली. तो बाळ्याच्या दिशेनं पुढं झाला. त्यानं बाळ्याच्या थोत्रीत मारण्यासाठी हात उचलला. सावध बाळ्यानं वेळीच पळ काढला. पोपट्याला आईवरून शिव्या देत तो पळून गेला. बोळाच्या तोंडाशी गेल्यावर बाळ्या वळला. त्यानं त्याच्या अर्ध्या चड्डीचा एक भाग वर केला; आणि तो ओरडला, ''पकडा!''
पोपट्या खवळला. ''भडवं फार माजलंय. हाती सापडलं तर कापून ठेवीन. मग टाळ्या वाजवत हिंडल, भीक मागत!'' असं म्हणत तो वळला. ''घ्या रे आवरून!'' असा त्यानं आदेश दिला. सगळे जण कामाला लागले. मी खाली मान घालून काहीसा हादरलेल्या मनःस्थितीत घरी निघालो. त्यानंतर बाळ्या परत पोपट्याच्या ढाबळीवर आला नाही पण एकदा शाळेत जाताना त्यानं मला अडवलं. आम्ही दोघं एकाच शाळेत होतो, हे आम्हा दोघांनाही ठाऊक होतं. पण शाळेचं तोंड पाहणं बाळ्याला कधीच महत्त्वाचं वाटलं नव्हतं. मी शाळेतल्या पाच वर्षांत फक्त एकदाच आजारी पडलो म्हणून शाळा बुडवली होती. त्यादिवशी शाळेच्या गणवेशात बाळ्याला मी प्रथमच बघितला. पोपट्या शाळेत येऊन काही करू शकत नाही, ह्या जाणिवेपोटी बाळ्या शाळेत येत होता. त्याला फी माफी होती. नापास होईल त्यावर्षी बाप फी भरायचा. पास झाला की पुढच्या वर्षी फी माफी मिळवायचा. बाळ्या मॅट्रिक झाला की कुठंतरी प्यून म्हणून चिकटवून द्यायचा बाळ्याच्या बापाचा बेत होता. बाळ्याला असं स्वातंत्र्य गमावण्यात रस नसला तरी नोकरी लागली की पगार मिळतो आणि पैशानं कबुतरं विकत घेता येतात, हे त्याच्या लक्षात होतं. तेव्हा आज ना उद्या मॅट्रिक फेल की पास व्हायचं ही त्याची महत्त्वाकांक्षा होती पण त्याला घाई नव्हती.
''बामणा, पोपट्या माझ्याबद्दल काय बोलला का?'' बाळ्यानं विचारलं. त्याची नजर सावधगिरीनं इकडं तिकडं बघत होती. पोपट्याची दहशत.
''नाय बा!''
''बरं झालं पीडा गेली. नस्ती पन्हवती. साला नाट लावायचा!'' असं त्या प्रसंगानंतर एकदाच पोपट्या बोलला होता. पोपट्याच्या त्या रौद्ररूपानंतर मी तिथं फारसा थांबत नव्हतो. दुरूनच हवा बघायचो; आणि मग शाळेचा रस्ता पकडायचो.
''शाळा सुटली की पांड्याच्या ढाबळीवर येतोस. दहा-बारा गंडे खबुत्रं हायती. साला, त्याच्या पुढं हा पोपट्या झाटुकलं हाय!'' पहिलं वाक्य प्रयत्नपूर्वक शुद्ध बोलून बाळ्या मूळ वळणावर गेला, मलाही पोपट्याकडे जाणं नको झालं होतं. त्याप्रसंगी मी बाळ्याच्या सर्वांत जवळ होतो. पण पोपट्या ''धरा रे!'' त्यानं असं ओरडल्यावरही मी काहीच हालचाल केली नाही, हे पोपट्यानं लक्षात ठेवलं असावं असं मला वाटत होतं. मी तसा दुरूनच पोपट्याची कबुतरं पाहात होतो. त्यामुळं मी बाळ्याचं आमंत्रण स्वीकारलं.
शाळा सुटली. बाळ्या नि बंड्या शाळेच्या दारात माझी वाट पाहात उभे होते. बंड्या ''लयी बाराचा'' हे त्याचं वर्णन मी बाळ्याच्या तोंडून ऐकलं होतं. बंड्या माझ्याशी नीट वागतो असं म्हटलं तेव्हा बाळ्या म्हणाला, ''एक तर ल्येका तू बामन, त्यात बाबूराव शिरस्तेदाराचा पावणा. तुला कोण काय करणार? तुझी तक्रार झाली तर ह्यांची काय गत व्हईल? तवा तुला त्रास देत न्हाय कुणी. त्या दिवशी तू माझ्याकडे येत व्होतास तवा पोपट्या तुला जाऊ नगस म्हनाला; तू ऐकलं का?''
""कधी?'' मी विचारलं.
"फाकती सुटलं त्या दिवशी!'' मी तो प्रसंग आठवला. ते लोक मी सावलीला निघाल्यावर हातवारे करत होते ते मला आठवलं. मी म्हणालो ''डोळ्यावर ऊन येतं म्हणून मी सावलीला चाललो होतो.''
''पण मी सावलीला व्हतो ना?'' मला त्या हातवाऱ्यांचं कोडं उलगडलं.
''दुसरा कोन असता तर पोपट्यानं आई माई... लय शिव्या दिल्या असत्या. तुला काय शिव्या दील? टाप न्हाई त्याची.''
बंड्या नि बाळ्या होते तिथं मी पोहोचलो. ते मसालेदार दाणे खात होते. भलतेच तिखट. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्यातले दोनच दाणे तोंडात टाकले होते. आम्ही चालू लागलो. समोरच्या गुऱ्हाळात शिरून मी पाणी प्यायलो. येता येता हातातले दाणे गुऱ्हाळवाल्याच्या पोराच्या हाती ठेवले. पांड्यांची ढाबळ नदीकाठी होती. बाळ्या नि बंड्या यांच्या संगतीत असल्यानं मला पांड्याच्या ढाबळीवर फार काळ परिघावर राहावं लागलं नव्हतं. एकतर पांड्या बाळ्याला नाट लावणारा मानत नसे. दुसरं म्हणजे बाळ्याला इकडची तिकडची बित्तंबातमी असे. पोपट्या घरातून पळून गेला तो बाळ्यानं पांड्याकरवी उगवलेला सूड होता. पवार नावाचा पांड्याचा मित्र होता. त्याच्या बहिणीचं आणि पोपट्याचं ग्याट म्याट आहे, हे बाळ्यानं पांड्याला सांगितलं. नुसतं सांगितलंच नाही तर सप्रमाण सिद्ध करून दिलं. पवाराला ते पांड्यानं सांगितलं. साधारण ही घटना मी पांड्याच्या धाबळीवर गेल्यानंतर महिना भरात घडली. आठवड्याभरानं पोपट्या बेपत्ता झाला.
ते जाऊ दे. पण अशा बाबींमुळं पांड्याच्या धाबळीवर बाळ्याचा वट होता. बंड्या तर त्या वयातही बाप होता. साप पकडणे, दगड मारून एका फटक्यात उंदीर मारणे, नदीवर खेकडे, मासे पकडणे, बगळ्यांची किंवा टिटव्यांची कवटं आणि पिल्लं आणून धाबळीत ठेवणे असे उद्योग तो करीत असे. त्यामुळेच पांड्या काही पोरांना अधनं मधनं नदीच्या काठच्या लव्हाळ्यात नेऊन काय करतो, हे बंड्यानं बघितलेलं होतं. बंड्या आमच्या पेक्षा बराच मोठा होता. पांड्या कुणावर तरी ढाबळ सोपवायचा. त्याचं एखादं ठराविक पोरगं घेऊन लव्हाळ्यात दिसेनासा व्हायचा. मग इकडं बंड्या सटकायचा तो थेट पांड्याचं घर गाठायचा. कुणीतरी हे पांड्याला सांगितलं. पांड्यानं ते निर्विकारपणे ऐकून घेतलं. त्या दिवसापासून त्यानं बंड्याशी थेट बोलणं बंद केलं होतं; बस इतकंच. आम्ही तेव्हा दहावीत होतो. आम्ही म्हणजे मी. बंड्याची शाळा सुटली होती. तो एका थिएटरवर डोअरकिपर म्हणून काम करत होता. त्यामुळं एखादा भारी इंग्रजी पिक्चर लागला की नेमक्यावेळी आम्हाला आत सोडायचा. तो सीन संपला की बाहेर. नाहीतरी संवाद कळत नसल्यानं बाकी चित्रपट बोअर व्हायचा. त्याबदल्यात त्याला मी तिकिटांचा हिशोब करून द्यायचो. पांड्यांच्या बायकोलाही तो मराठी चित्रपटाला घेऊन जायचा. ती एक वेगळीच कथा आहे.
ह्या सगळ्या प्रकरणात माझा पांड्याच्या धाबळीत सरळ समावेश झाला. पांड्या एका कंपनीत रात्रपाळी करायचा. दुपारी चारला किंवा रात्री बाराला त्याची ड्यूटी असायची. अशावेळी तो दुसरी हवा दोनला करी किंवा संध्याकाळी साडेपाचला. सकाळी कंपनीतून आला की चहा पिऊन तो ढाबळीवर येत असे. ढाबळीवरून दहाला घरी जाऊन सहाला थोडावेळ असतांना तो परत ढाबळीवर यायचा. थंडीत पाच साडे पाचलाच.
त्याची जी ठरलेली पोरं होती, त्यांना तो पाव मिसळ वगैरे देत असे. त्यांच्याकडूनच ढाबळ साफ करणे, खराट्यानं अंगण झाडणे वगैरे कामं करून घ्यायचा. मग त्यातल्या एखाद्याला घेऊन नदीवर आंघोळीला म्हणून जायचा. त्यांचे सर्व प्रकार उरकून परत यायला अर्धा पाऊण तास लागायचा. तोवर बाळ्या ढाबळीवर राज्य करी आणि बंड्या पांड्याच्या घरी. मी बाळ्याचा प्रधान होतो. आम्हाला शाळेत मेंडेलचे आनुवंशिकतेचे धडे होते. त्यामुळं कुठल्या नराला कुठली मादी लागू केली की कुठली पोरं होतील, हे मी सांगायचो आणि ते बरेचदा खरं व्हायचं. सुमारे पाच वर्षे धाबळीवर अवलोकन करून मी काही आडाखे बांधले होते. त्यामुळे कबुतरांची माझी पारख नावाजली जाऊ लागली होती.
रविवार-बुधवार कबुतरांच्या बाजाराला मी पांड्याबरोबर जायचो. पुढं पांड्या आणि त्याचा ठरलेला पोरगा, मागं मी आणि बाळ्या. कधीतरी बंड्या. बंड्या बरोबर असला की पांड्याला ऐकू जाईल अशा आवाजात बाळ्या विचारायचा ''तांब्या पालथा का रे?'' बंड्या मान हलवायचा. हे प्रकरण बाळ्यानंच एकदा ऐकवलं होतं. बंड्यानं मग इतर बाबी समजून दिल्या होत्या. पांड्या बायकोशी कसा वागला, वगैरे तो सांगायचा तेव्हा सुरुवातीला कसंसंच वाटे. पुढं बंड्या काय काय करतो, तेही ऐकायला सरावलो. बाजारातून आलो की पांड्याकडं मटण व्हायचं.
असं सगळं व्यवस्थित चाललं होतं. एसएससी, त्याकाळात अकरावीचं वर्ष होतं. मॅट्रिक ही परीक्षा तेव्हाही महत्त्वाची होती. त्याकाळात मॅट्रिकनंतर बँकेत नोकरी लागत असे; असा तो काळ. गणितासाठी मी क्लासला जात होतो. मॅट्रिकला चांगले मार्क मिळव, तुला कॉलेजात घालतो, असं बाबुराव म्हणाले होते. त्यांच्या मुलानं मॅट्रिकला धक्का खाल्ल्यानं ते नाराज होते. माझे कबुतरी उद्योग त्याच्या कानावर होते. मी बिडी पितो, असं त्यांच्या चिरंजिवांनी त्यांना सांगितलं होतं. तेव्हा ''तू मॅट्रिक व्हायचं बघ! वर्षाच्या वर्षाला तो नंबर काढतोय. बिडी पिऊन तुला हे जमणार असेल तर तूही बिडी पी!'' त्या बिचाऱ्यानं पुन्हा माझी चुगली केली नव्हती. तो बिडीही प्यायला नव्हता. तिसऱ्या प्रयत्नाला मॅट्रिक होऊन एका बँकेत चिकटला. त्याची बँक पुढं राष्ट्रीयकृत झाली. सुखानं जगला.
हे सगळं मला आठवतेय ते त्या वेडीच्या दर्शनानं. त्या वेडीच्या नग्न दर्शनानं माझ्या मनावर एक प्रचंड आघात झाला असावा; कारण तेव्हा कळलं नव्हतं. मी घरी गेल्यावर सोडसहालाच झोपी गेलो. मी ॲस्प्रो घेतलेलं तिनं बघितलं होतं. त्यामुळं तिनंही विचारलं नाही. जागा झालो तेव्हा पत्नी डोक्याला आणि मानेला उपडा हात लावून अंदाज घेत होती. माझ्या कपाळावर आणि मानेवर खूप घाम साठला होता; पण थंडीचे दिवस नसल्यानं त्या घामाला ताप उतरल्याचं चिन्ह असं शंभर टक्के मानता आलं नसतं.
""बरं वाटतंय ना?'' तिनं विचारलं. मला त्या प्रश्नावर उत्तर द्यायची इच्छा नव्हती. मी मान हलवली. त्यातून तिनं सोयीस्कर अर्थ काढला आणि ती व्हिक्सची बाटली घेऊन परतली. लग्न झाल्यानंतर माझं हे पहिलंच आजारपण होतं. ती जवळ येऊनही मी स्वस्थ पडल्याचा अर्थ माझं आजारपण गंभीर आहे, असा तिनं लावला होता. उद्या सकाळी पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरकडे जायला हवं, असं ती म्हणाली. मला खरं तर काहीच झालं नव्हतं. फक्त माझ्या मनःचक्षुसमोर ती वेडी दिसत होती. त्यामुळं माझ्या बायकोच्या जवळ येण्यानंही माझं नवरेपण जागलं नव्हतं. ती वेडी कुणी तरी होती; कुणीतरी म्हणजे माझ्या पूर्वायुष्याशी संबंधित कुणीतरी होती. त्या वेडाच्या भरातही ती जुनी ओळख तिच्या स्मृतीत जागली होती; म्हणून तर ती माझ्याकडे बघून ओळखीचं हसली होती. ती कोण? आमच्या नातेवाईकांमध्ये कुणी वेडं होऊन परागंदा झाल्याचं मला माहीत नव्हतं. मी सरळ शिकत गेलो होतो. मी कुणाला फसवाय बिसवायचा प्रश्न नव्हता. महाविद्यालय आणि विद्यापीठ अशा सहा वर्षात महाविद्यालयात मी फक्त दोनदाच मुलींशी बोललो होतो. ते ही दोन-तीन अर्धवट वाक्यं. त्यामुळं माझ्याकडून फसवलं जाऊन कुणी वेडं व्हायचा प्रश्न उद्भवतच नव्हता. तर ती वेडी कोण, असा विचार करताना ही कबुतरं फडफडली होती. त्याच वेडीमुळे बायको जवळ येऊन सुद्धा पाठ फिरवून मी झोपी गेलो होतो.
दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो. डॉक्टरकडे गेलोच नव्हतो. नंतर जेव्हा पत्नीला त्या वेडीबद्दल सांगितलं, तेव्हा तिनं फारसं लक्ष दिलं नव्हतं; तरी आमच्या सांसरिक आयुष्यात ती वेडी आता व्यत्यय आणू लागली होती.
जोपर्यंत ती वेडी कोण, याचा पत्ता लागत नाही. तोपर्यंत माझ्या आयुष्याची गाडी रुळावर येणार नाही; अशी माझी खात्री पटत चालली होती. एकदा तिनं चहा समोर आणून ठेवला. माझं मन चहात नव्हतं. थोड्यावेळानं ती म्हणाली, ""तुम्हाला बरं नाहीये का?''
""बरं नसायला काय झालं?'' मी वैतागून म्हणालो.
""उगीच त्रागा करू नका! दुखणं अंगावर काढणं बरं नाही!''
इथं मला दुखण्याचं मूळ सापडलं असतं तर मी दुखणं लगेच मनाबाहेर काढलं असतं, पण ती कोण? ""मी ठणठणीत बरा आहे!'' मी मनातले विचार बाजूला सारत म्हणालो.
""मग चहा तसाच का ठेवलाय?''
""अरेच्या, राह्यलाय का? हे पेपरात बघ काय आलंय, ते वाचता वाचता चहा प्यायलाच विसरलो!''
""तुम्हाला बरं असतं नि पेपरात काही छापून आलं असतं तर तुम्ही ते मोठ्यानं वाचून दाखवत आणखी चहा आणला असता!'' तिचं हे म्हणणं खरं होतं. तिच्याशी वाद घालून काही हाती लागणार नव्हतं.
१९६१सालच्या जुलै महिन्यातला तो दिवस होता. त्यादिवशी सकाळी पाऊस पडत होता. तसं बघायला गेलं तर गेले दोन तीन दिवस पाऊस थांबलाच नव्हता. नदीला भरपूर पाणी आलं होतं. पांड्याच्या ढाबळी जवळून ते पाणी भयानक वाटत होतं. पांड्या कबुतरांना दाणे टाकत होता. बरीच कबुतरं ते दाणे वेचायलाही तयार नव्हती. हवा करणं शक्यच नव्हतं. शाळेत गेलो. प्रार्थना झाली आणि सूचना देणारी यंत्रणा खरखरली.
''विद्यार्थ्यांना सूचना! सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी जायचं आहे. नदीला पूर वाढतो आहे. पुलापलीकडे राहणाऱ्या मुलांनी आपल्या गावातल्या मित्रांकडे जायचं आहे. आपण कुठल्या मित्राकडे जातोय, याची चिठ्ठी वर्गावरील शिक्षकांकडे द्यायला विसरायचं नाही. सूचना संपली.''
वर्गावरील शिक्षकांनी मुलांच्या जोड्या लावून दिल्या. शाळेच्या फाटकाजवळ मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, गायन शिक्षक आणि चित्रकलेचे शिक्षक उभे होते. नदीकडे जाऊ नका, चिठ्ठ्या दिल्या का, विचारत होते. पोलिसांची गाडी शाळेच्या दारात उभी होती. घरी पोहोचलो. रस्त्यात, घरात वातावरण तंग होते. खडकवासला धरण फुटल्याचं बोललं जात होतं. बाळ्याची शीळ आली. मी बाहेर गेलो. ""चल चक्कर मारू'' बाळ्या म्हणाला. मी, जिमखान्यावर राहणारा जोशी, आणि बाळ्या आत्त्याला सांगून निघालो. हा जोशी माझ्याकडे राहायला आला होता. काही लोक सायकलवर सामान घेऊन चालले होते. पोलिसांनी वाटेत अडवलं. लकडी पूल पाण्याखाली होता.
दुसऱ्या दिवशी सगळ्या चिखलातून वाट काढत शाळेपर्यंत गेलो. शाळेत बेघर लोक होते. वाटेत सर्व चिखल होता. अजून लकडी पूल ओलांडू देत नव्हते. बाबुरावांना रात्रीच ऑफिसमध्ये बोलावलं होतं. ते जोशीकडे निरोप पोहोचवणार होते. सगळं उद्ध्वस्त भयाण दृश्य विसरू म्हटलं तरी आज शक्य नाही. बाळ्याची हाक आली. नदीकाठच्या सगळ्या ढाबळी वाहून गेल्या होत्या. पांड्यानं सगळी कबुतरं सोडून दिली खरी पण त्यानंतर तो घर वाचवायला गेला नि वाहून गेला होता. पोलिस घराबाहेर पडा असं सांगायला आले तेव्हा बंड्या पांड्याच्या घरात होता. पोलिस म्हटल्यावर तो घाबरून कॉटखाली शिरला. पांड्याची बायको आडवं लावून दार उघडायला आली. पोलिसांनी ""धरण फुटलंय. घर सोड'', असं सांगितलं आणि तिला गाडीत बसवलं. एका पोलिसानं दाराला बाहेरून कडी लावली. तिनं खूप आरडाओरडा, केला होता म्हणे, पण लोकं घर सोडायला तयार होत नाहीत ह्या अनुभवामुळे पोलिस त्या लोकांकडे लक्षच देत नव्हते. पांड्याची बायको बंड्याच्या नावानं आक्रोश करत गेली होती.
नवं धरण झाली. नव्यानं पुणं वसलं. माझं शिक्षण संपलं. त्याला आता बारा वर्षे झाली आणि पांड्याची पत्नी - करेक्ट, ती पांड्याची पत्नी होती. बंड्यामुळे ती वेडी झाली होती आणि इतक्या दिवसांनी ती मला त्या जलप्रलयानंतर पहिल्यांदाच दिसली होती. तिनं मला बरोबर ओळखलं जातं. पुन्हा ती मला दिसली नव्हती. तिच्या हातचं मटण मी कितीतरी वेळा खाल्लं होतं. पुन्हा दिसली आणि तिनं ""बामणा'' म्हणून हाक मारली तर? हा प्रश्न हळूहळू पुसट होत गेला. पण तिच्यामुळे माझ्या आयुष्याचा एक कप्पा असा अचानक उघडला गेला.”
मी बीअर संपवली. माझा मित्र माझ्याकडे आश्चर्यानं बघत होता. तू हे असं आयुष्य जगत होतास? त्याच्या सुरात हेवा होता. आम्ही जवळ जवळ तीन साडेतीन तास तिथं बसलो होतो. आता लिहितांना बऱ्याच ठिकाणी कात्री लावलीय. त्याला सांगतांना सर्व शब्द मूळचे वापरले होते. एक-दोनदा माझ्या तोंडी ते शब्द ऐकून वेटरही दचकला होता.
""कमाल आहे च्यायला!'' मित्र म्हणाला. ""मी तर तुला चार चौघांसारखा सभ्य समजत होतो.'' ती कोण हे आठवल्यामुळं असेल, माझ्या मनावरचा भार हलका झाला होता. कदाचित तो बीअरचा परिणामही असू शकेल किंवा दोहोंचाही.
""हे तर काहीच नाही यार, रानड्यांच्या गोठ्यात जे जगलोय, ते ऐकवलं तर सगळी बीअर झटकन उतरेल...'' बिल देत मी म्हणालो; आणि सरळ घरी गेलो. त्या वेडीचं सावट दूर झालं होतं. आता माझ्यात आणि बायकोमध्ये ती डोकावणार नव्हती. घरी गेलो. दार लावून घेतलं. पांड्याच्या बायकोला मी तात्पुरता विसरलो. पुढं ती कधी दिसलीच नाही. दिसली असती तरी मी काय करणार होतो, हा प्रश्नच होता.
(अनुभव, दिवाळी २००४ च्या अंकातून साभार)
