20 तारखेला दिल्ली व्यापून टाकलेल्या हजारो पोरांनी एकाच दिवशी अनेक गोष्टी घडवून आणल्या.
कोणत्याही प्रस्थापित पक्षाने किंवा बड्या नेत्याने आवाहन न करता देशभरातील मुलं-मुली उत्स्फूर्तपणे दिल्लीत पोहोचली. दिल्लीच्या आसपासच्या राज्यांतून तर आलीच, शिवाय दूरदूरहून देखील आली. स्वखर्चाने आली. जेवण्याखाण्याची सोय आहे का, वगैरे न बघता आली. एरवी आंदोलनांना-भाषणांना-सभांना माणसं गोळा करावी लागतात. त्यांची खाण्या-पिण्याची सोय करावी लागते. वाहनं पुरवावी लागतात. वर पैसेही द्यावे लागतात. अनेक सभा-आंदोलनांवेळी हे दिसून आलं आहे. आपण अमुक ठिकाणी का आलेलो आहोत, हेही अनेकांना माहीत नसतं. राजकीय पक्षांनी लावून ठेवलेल्या या सवयीपासून आता सुटका नाही, असं वाटू लागलं होतं. पण दिल्लीत उत्स्फूर्तपणे पोहोचलेल्या पोरांनी ही गोष्ट हद्दपार केली. शेकडो-हजारो बाईट्समधून ही गोष्ट लख्खपणे कळली. राजकीय पक्षांच्या कमिटेड कार्यकर्त्यांनाही एवढी स्पष्टता नसते. पण पंधरा-सतरा वर्षांच्या नवयुवकांपासून तीस-बत्तीस वर्षांच्या तरुणांपर्यंत सर्वांकडे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्ट उत्तर होतं. आंदोलनापलीकडच्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, हेही त्यांना पक्कं माहीत होतं. याचा अर्थ गेल्या महिन्याभरातील जंतरमंतरवरील आंदोलनांमुळे मुलांची तयारी जोरदार झाली होती. आंदोलन-चळवळींमुळे मुलांचे मेंदू तेज होतात, ही गोष्ट काल-परवा विशेषत: जाणवली.
राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनांचा आपल्याकडे एक पॅटर्न झाला आहे. एकतर तोंडपुजलं जायचं-बोलायचं किंवा पक्षसंघटनेत स्वत:ची ताकद दाखवण्यासाठी शक्तिप्रदर्शन करायचं, हा तो पॅटर्न. तेवढे हेतू पूर्ण झाले की बस्तान गुंडाळायचं आणि चालू पडायचं. पक्षांना समाधान की आंदोलन झालं, कार्यकर्त्यांना आनंद की आपण विनातोटा झळकलो. काँग्रेस तर इतका थोर पक्ष आहे की मीडियासमोर फोटो काढून झाले की मंडळी लगोलग घरी परततात. हा पक्ष महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यचळवळीत आंदोलन करणारा आहे, याची जवळपास कोणतीही लक्षणं उरलेली नाहीत. त्यातल्या त्यात राहुल गांधींच्या काळात अलीकडे एनएसयूआय-युवक काँग्रेस काहीतरी करू पाहत आहेत, एवढाच काय तो अपवाद.
पक्षांच्या दिखाऊ आंदोलनांना गेल्या महिन्यात झुरळांनी पूर्ण फाटा दिला. व्यासपीठावरूनचं बोलणं, मीडियासमोरचं बोलणं, त्यांचं अडखळणं, त्यांचं आक्रमक होणं, पोलिसांच्या पाया पडणं किंवा त्यांना जाब विचारणं, हट्टीपणा करणं किंवा चलो छोड दो असं म्हणत लवचिकता दाखवणं हे ‘रॉ'असलं तरी प्रामाणिक होतं. राजकीय पक्षाचा बनचुकेपणा त्यांच्यात नव्हता. अभिजित दिपकेवर अनेक हेत्वारोप झाले, त्याचा भूतकाळ उकरून काढला गेला, त्याच्या अमेरिकेतून परत येण्याबद्दल आणि आंदोलनाला सहजी परवानगी मिळण्याबद्दल अनेक संशय पेरले गेले. पण पठ्ठ्या या साऱ्या प्रचाराला पुरून उरला. आपल्या उद्दिष्टापासून ढळला नाही. अशी कमिटमेंट तरुण मुलांमध्ये अभावानेच आढळते.
राजकीय पक्षांच्या घोषणा, पोस्टर्स, फलक वगैरेही खूपच घिसेपीटे असतात. ठराविक भाषेतले, ठराविक चौकटीतले असतात. त्यामुळे तो सर्व व्यवहार बेजान असतो. त्यातून ना ऊर्जा तयार होते, ना त्याचा परिणाम होतो. पण तरुणांच्या गेल्या महिनाभराच्या आंदोलनात किती प्रकारच्या नावीन्यपूर्ण घोषणा, पोस्टर्स वगैरे रंगली याची गिनतीच नाही. मीम्स आणि रील्समध्ये माहीर असलेली ही पिढी किती तेज बुद्धीची आणि विचारांमध्ये स्पष्टता असलेली आहे, हे कळून आलं. अर्थातच ही डोकी लढवणारी मुलं थोडकी असणार हे उघड आहे, पण त्यांची चाललेली डोकी सत्ताधाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारी होती हे नक्की.
संसदेवरील मोर्चाला ज्या अमानुषपणे पोलिसांनी हाताळलं आणि मुला-मुलींना ठोकून-पिटून-सोलवटून-तोडून-रक्त काढून तुडवलं, त्याचा कोणतंही राजकीय ट्रेनिंग नसलेल्या या मुलांनी खूपच धीराने सामना केला. लाठीमार, अश्रुधूर आणि इतर आक्रमणांना ती निर्भयपणे सामोरी गेली. किती तरी ठिकाणी ही मुलं-मुली ‘मारा, मला मारा' असा गजर करताना दिसत होती. पोलिसांचा मार खायला कमिटमेंट लागते, धैर्य लागतं, मनाची तयारी लागते आणि शरीरावर ताबा लागतो. वीस-तीस वर्षांची मुलं ही नैसर्गिकरित्या प्रतिक्रिया देणारी असतात. तशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या असतीलही; पण ‘महात्मा गांधी अमर रहें।' आणि ‘जयभीम जयभीम' म्हणत सत्याग्रह करणारी मुलं बघितली, तेव्हा या पिढीला इतिहासातून काहीतरी सत्व मिळालं आहे हे कळून चुकलं.
आंदोलन शांततापूर्ण करण्याचा निश्चय करणं आणि पोलिसांनी हल्ला चढवल्यानंतर तो टिकवणं याला खूप मोठं आत्मिक बळ लागतं. खरं तर काल रस्त्यावर लाखो मुलं होती. त्यांनी जोरकस प्रतिकार करायचा ठरवला असता, तर पोलिसांची पळता भुई थोडी झाली असती. हजारो पोरांना पिटूनच संध्याकाळी पोलिस थकलेले दिसत होते. प्रतिहल्ला चढवला गेला असता तर एकतर पोलिसांचं नाक कापलं गेलं असतं किंवा त्यांच्यावर गोळीबाराची नौबत आली असती. पण आंदोलकांच्या शहाणपणामुळे दोन्ही गोष्टी टळल्या. थोडक्यात, पोरांनी सरकारची नाचक्की टाळली म्हणायची.
कालच्या आंदोलनात एक दृश्य मोठं सूचक होतं. तरुणांना पिटून काढणाऱ्या पोलिसांनी सेफ्टी गिअर, हेल्मेट्स वगैरे घातलेली होती. अनेकांनी रुमाल बांधून चेहरे झाकले होते. पण पोरं मात्र सर्वत्र सीसी टीव्ही असूनही आणि पोलिस फिल्मोग्राफी करत असूनही बिनधास्त फिरत होती, घोषणा देत होती, पोलिसांना जाब विचारत होती. हा निर्भयपणा आपल्या समाजातून पुरता बाद झाला होता. तो या पोरांनी पुन्हा प्रस्थापित केला.
हेही वाचा - कॉकरोच आंदोलनाविषयी तरुण काय विचार करतात?
गेल्या महिन्याभराच्या आंदोलनात एक गोष्ट विशेषत्वाने जाणवत होती ती म्हणजे आंदोलनांचा मानवीय चेहरा. अभिजित दिपकेचं बोलणं, संवाद करणं, आंदोलकांचा कृतिविषयीचा कौल घेणं, पोलिस अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारणं, वेळ पडली तर त्यांच्या पाया पडणं, बोलतो त्याला पुरावे दाखवणं हे सगळं वेगळं होतं. ‘आंदोलनात असा पुचाटपणा चालत नाही, आक्रमक राहिल्याशिवाय कुणी कुणाचं ऐकत नाही', वगैरे त्याच्याबद्दल बोललं गेलं. पण त्याने आपली शैली सोडली नाही. हीच ती जेन झी शैली असणार, त्यामुळे ती हजारो-लाखो मुलांना आपलीशी वाटली. पोलिसांचा प्रसाद खाताना ‘तुम्हाला मुलं-बाळं नाहीत का? आम्हाला मारताना लाज वाटत नाही का?' वगैरे निर्मळ प्रश्न विचारणं हेही भारी. ज्यांनी प्रसाद दिला त्या पोलिसांचं संध्याकाळी टाळ्या वाजवून उपरोधिक स्वागत करणंही वेगळंच. पोलिस माना खाली घालून जात आहेत आणि आंदोलक टाळ्या वाजवून त्यांचा उपहास करत आहेत, हे दृश्य अपूर्व होतं!
सरकार नावाच्या व्यवस्थेला घाबरून असावं लागतं, ते मालक आणि आपण पामर ही भूमिकाही आपल्या अंगवळणी पडलेली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत ज्या पद्धतीने आंदोलनं हाताळली गेली, केसेस केल्या गेल्या, जेलमध्ये घातलं गेलं, त्यातून ही भावना आणखीनच गडद होत गेली. सरकार आणि सरकारी पक्ष जे ठरवेल ते मान्य करायचं, एवढंच जणू जनतेच्या हाती राहिलं. हे चित्र आता बदलणार नाही हेही जणू लोकांनी स्वीकारलं होतं. पण झुरळांनी ही सारी भीती, दडपण झुगारून दिलं आणि देश आपला आहे, आपली इच्छा महत्त्वाची ही बाब त्यांनी एका दिवसात ठळक करून टाकली, त्यासाठी त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते उपाशीतापाशी राहिले, छळ करून घेतला. मुख्य धारेतील माध्यमं सोबत नसतील तर आंदोलनं पसरत नाहीत, हा समजही त्यांनी तोडून मोडून टाकला. स्वत:च माध्यमं बनले, स्वत:चा आवाज बनले. जनतेच्या मनात भीती असते तेव्हा लोकशाही संकटात असते आणि जेव्हा लोकांचा सरकारवर आणि व्यवस्थेवर अंकुश असतो, तेव्हा लोकशाही जिवंत बनते. लोकशाहीला बांधून ठेवलेले साखळदंड मोकळे करण्याचा एक मार्ग कालच्या आंदोलनाने खुला झाला. देशावर जनतेची सत्ता प्रस्थापित करण्याच्या दिशेने तरुणांनी एक पाऊल टाकलं. तेही संविधानाच्या चौकटीत राहून.
पण तरीही कालच्या आंदोलनावर आक्षेप घेतले जातील, त्यामागे परदेशी हात असल्याचं सांगितलं जाईल. सरकारविरोधी व्यापक कट आहे, असंही म्हटलं जाईल. ज्यांना हे आक्षेप खरे वाटतील त्यांनी मार खालेल्या मुलामुलींचे चेहरे आठवावेत. बस!
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
