मी पूर्वीच्या रशियामध्ये वेगवेगळ्या लहानसहान गुन्ह्यांबद्दल शिक्षा भोगली होती. चोरी, गुप्तहेरी वगैरे प्रकारचे ते गुन्हे होते. शेवटच्या गुन्ह्याची सजा म्हणून मला सैबेरियात पाठवण्यात आलं. मॉस्कोच्या पाडावानंतर पाच वर्षं सैबेरियात कैद राहून मी आपल्या गावी परत आलो तेव्हा माझे कोणीही आप्तजन तिथे नव्हते. फक्त लहानसं पडीक व ढासळलेलं घर होतं. त्याचं छप्पर त्या भग्न वास्तूवर कसंबसं ठेवलेलं वाटत होतं. माझी म्हातारी आई माझ्या गैरवर्तणुकीच्या धक्क्याने मी येण्यापूर्वीच मरण पावली होती. माझा एकुलता एक तरुण मुलगा गाववाल्यांच्या दूषणांचा उबग आल्याने आपल्या आईला सोडून दूर कोणत्या तरी शहरात नोकरीच्या शोधात निघून गेला होता. तो कुठे गेला याची कोणालाही काहीही माहिती नव्हती. काही दिवसांनी माझ्या बायकोला हृदयविकाराचा झटका आला होता, आणि कोणाचीही मदत न मिळाल्यामुळे तिचाही मृत्यू ओढवला होता.
सैबेरियातून परतल्यावर या सगळ्या बातम्यांमुळे माझ्यावर जणू वज्राघात झाला. माझं अस्तित्वच नष्ट होत चाललं आहे, असं मला वाटायला लागलं. साधारण वीस वर्षं लोटली या गोष्टीला. सजा भोगल्यानंतर कामधाम नव्हतं. स्वतःचीच लाज वाटत होती. शरमेची बोचणी घालवण्यासाठी मी चर्चच्या उपक्रमांचा आधार घेऊ लागलो. उर्वरित जीवन ईश्वरकार्यात आणि संयमाने घालवण्याचा मी निर्धार केला. प्रीमियर गोर्बाचेव्हचं पतन व रईसा गोर्बाचेव्हचं निधन या घटनांनंतर रशियात चर्चचं पुनरुत्थान व्हायला सुरुवात झाली. भाविकगण आता मोठ्या संख्येने चर्चमध्ये येऊ लागले होते. मी माझं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि मॉस्कोचा बिशप पॅट्रिआर्च याला वारंवार विनवणी करत होतो, की त्याने मला अंतिम सुधारणेचा मार्ग दाखवावा, माझ्या गुन्ह्यांच्या माफीसाठी त्याने परमेश्वराची प्रार्थना करावी आणि माझ्या विवेकबुद्धीची टोचणी दूर करण्याचा मार्ग सुचवावा. (बिशप पॅट्रिआर्च म्हणजे मॉस्कोच्या ऑर्थोडॉक्स चर्चचा बिशप- पॅट्रिआर्च किरिल.) दयाळू पॅट्रिआर्चनी माझी मनधरणी ऐकली आणि चर्चचे रहिवासी व तिथे उपासनेसाठी येणारे भाविक यांना मदत करण्याच्या कामावर माझ्या इच्छेनुसार माझी नेमणूक करून टाकली.
आता मी चर्चच्या प्रांगणातच राहू लागलो. कुणालाही मदत करण्याची एकही संधी हातातून निसटू नये असा माझा सतत प्रयत्न असायचा. बाहेरून येणाऱ्या उपासकांना मी सामोरा जायचो. त्यांच्या व्यथा जाणून घ्यायचो. त्यांच्याशी बोलून त्यांच्या जखमांवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करायचो. लवकरच चर्चमध्ये माझा आपला असा एक गोतावळा तयार झाला. तशी माझी कुवत अशी होती कितीशी! तरीही प्रत्येक येणारा-जाणारा मनुष्य- विशेषतः रविवारचं प्रवचन ऐकायला येणारा प्रत्येकजण- मला शोधायचा, माझी विचारपूस करायचा.
पॅट्रिआर्च हे सर्व जाणून होता. मानवी चुका माफ करणारा तो कनवाळू बिशप माझी सर्वोच्च आत्मिक बैठक उजळून टाकत होता. मला त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्याच्यामुळेच तर मी तिथे येणाऱ्या दुःखी
माणसांच्या जखमांवर फुंकर घालू शकत होतो. तरीही माझी आई, बायको आणि मुलगा यांच्या विरहाने माझ्या मनावर झालेला भयंकर घाव भरून निघत नव्हता. वास्तविक, आजही त्यासाठी मी स्वतःला अपराधी मानतो आहे आणि अहोरात्र पश्चात्तापाने पोळतो आहे. कधी कधी भल्या पहाटे मी चर्चच्या बाहेरच्या कमानीत लटकलेल्या छोट्या घंटेची दोरी खेचून काही वेळ ती वाजवत राहायचो. ते अशासाठी, की घंटेच्या अखंड आवाजात काही वेळापुरता तरी मला माझ्या गुन्ह्यांचा विसर पडावा. पण हे करत असताना मी आणखी एका अपराधाचा धनी होत होतो. तो म्हणजे सकाळच्या असेम्ब्लीच्या आधी वाजणाऱ्या या घंटेमुळे अनेक सहकाऱ्यांची झोपमोड व्हायची आणि ते माझ्यावर रागवायचे. आपला गुन्हा कबूल करतानादेखील जगाला परेशान करणारा हा गुन्हेगार अजबच आहे असं त्यांना वाटायचं; पण मी सर्वोच्च धर्मगुरूची मान्यता असलेला पर्यवेक्षक आहे हे सर्वांना ठाऊक होतं. त्यामुळे माझ्याविरुद्ध तक्रार करण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. सुदैवाने आठ-दहा वेळा असे घंटानाद केल्यानंतर माझी अस्वस्थपणे घंटा वाजवण्याची सवय आपसूकच नाहीशी झाली.
एके दिवशी सकाळी... तो रविवार नव्हता- साधारण अकरा वाजले होते, तेव्हाची गोष्ट. सगळीकडे निवांत होतं. इतक्यात चर्चचा बारा फूट लांबीचा लाकडाचा हायड्रोलिक दरवाजा उघडला. काही कबुतरं फडफडत इकडून तिकडे गेली. एक धट्टाकट्टा मनुष्य, त्रस्त आणि परेशान दिसणारा- हॉलमध्ये दाखल झाला. तो असा अचानक आला त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. उभा चेहरा, रुंद कपाळ, भांग न पाडता मागे वळवलेले पांढरे व करडे लांब केस. फिकट खाकी सूटमध्ये तो चांगलाच स्मार्ट दिसत होता. पांढऱ्या व निळ्या चेक्सचा टाय त्याच्या व्यक्तिमत्त्वात भर घालत होता. दिसायला आकर्षक असूनही तो माणूस एखाद्या काटलेल्या पतंगाप्रमाणे किंवा घायाळ हरणाप्रमाणे त्या भव्य चर्चमधील बाकांच्या रांगांमधून वाट काढत, अडखळत अडखळत वेदीजवळ येऊन पोहोचला. मी तिथेच उभा होतो. माझी दोन्ही मनगटं त्याने आपल्या हातांत पकडली. बराच वेळ काहीही न बोलता तो माझ्या डोळ्यांत पाहत राहिला. त्याच्या नजरेत एक खास चमक होती. त्यामुळे माझ्या मनात आश्चर्यमिश्रित कुतुहूल जागं झालं.
अखेरीस मीच त्याला विचारलं, “काय झालं? तुम्ही इथे?”
“हो.- का बरं? मी इथे येऊ शकत नाही का? किंवा, मी इथे असायला नको का?”
“नाही नाही, असं काही नाही. मी इथे असू शकतो तर तुम्ही का नाही असू शकत?”
“मी मिखाइल तिमोफेयेविच कलाश्नीकॉफ, एक शेतकऱ्याचा मुलगा आणि प्रशिक्षित शिकारी. ‘अफ्तोमात कलाश्नीकॉफ' रायफलचा संशोधक.”
“मला माहीत आहे कलाश्नीकॉफ. मी तुम्हाला ओळखतो. आणि तुमची ही एकच कामगिरी नाहीये. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीलाच नाझींच्या हल्ल्यांत सरहद्दीवर तुम्ही तुमच्या साथीदार फौजींसह गंभीर जखमी होऊन इस्पितळात दाखल झाला होतात. शत्रुसैन्याने केलेल्या गोळीबारामुळे तुमच्या चेहऱ्यावर झालेल्या खोल जखमांचे व्रण आजही दिसून येत आहेत. ‘रशियन बंदुकी इतक्या कुचकामी आहेत की त्यांनी आम्ही आमचा स्वतःचा बचावदेखील करू शकत नाही' असा आक्रोश रशियन शिपाई सतत करायचे. तेव्हा तुम्ही एका बंदुकीचा शोध लावला होता; पण ती बंदूक कमकुवत ठरली. मात्र, तुम्ही चिकाटी सोडली नाही. १९४७मध्ये तुमचे अथक प्रयत्न सफल झाले, आणि तुमच्या रायफल एके-४७ मुळे रशियाचं नाव साऱ्या दुनियेत एवढ्या उंचीवर गेलं की तसं दुसरं उदाहरण इतिहासात शोधूनही सापडणार नाही.”
थोडा वेळ थांबून मी म्हटलं, “तुमच्याबाबत इतकी तपशीलवार माहिती तर देशातल्या खूप लोकांना असेल. परंतु, शूरवीर महाशय! मला सांगा, तुम्ही असे घाबरलेले का दिसताय? आम्ही वर्तमानपत्रांत आणि टीव्हीवर तुम्हाला पाहिलं आहे ते क्रेमलिनमध्ये लेफ्टनंट जनरलच्या गणवेशात बेडरपणे भाषण देताना. रायफलने आकर्षक आविर्भावात अचूक नेम धरताना आम्ही तुम्हाला पाहिलं आहे. तुमच्या छातीवर किती तरी मेडल्स आणि स्टार्स सजवलेले पाहिले आहेत. तुमच्या हास्यात सळसळत्या पिकांचं स्मितहास्य आणि तुमच्या डोळ्यांमध्ये पर्वतांवरील उन्हाची चकाकी अनुभवली आहे.”
मी त्याच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. मग हलक्या आवाजात त्याला विचारलं, “काय मामला आहे जनरल, बोला. असे विझलेले व उदास का दिसताय?”
“तुम्ही बरोबर बोललात. मला अलीकडे स्वतःलाच वाटतंय, की मी खूप थकतोय, सुस्तावलोय.” एवढं बोलून तो गप्प झाला.
मी बराच वेळ गप्प राहिलो. इतक्या थोर माणसासमोर आणखी काही बोलण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. अखेर माझा दर्जा तरी असा काय होता! आणि मग तोच बोलायला लागला. संकोचाने व सावकाश म्हणाला, “चर्चमध्ये कसं यायचं किंवा चर्चमध्ये येण्यासाठी काय करायला पाहिजे, मला माहीत नाही. इथल्या रीतिभाती काय असतात मला माहीत नाहीत. बस, मी आलो आहे.”
“अहो, सगळ्यांनाच ठाऊक आहे, तुम्ही जुने कम्युनिस्ट आहात. कट्टर, अधर्मी, नास्तिक. पण चर्च ही जागा फरार लोकांसाठी नाही!” त्याच्यासमोर मी काही तरी बोलू शकतो असं आता मला वाटायला लागलं.
“मी फरार नाही. तुम्ही जे कोणी असाल, मला पॅट्रिआर्चकडे घेऊन चला.”
त्याच्या आवाजातली निकड लक्षात घेऊन मी त्याला पॅट्रिआर्च किरिलच्या खासगी खोलीपर्यंत घेऊन गेलो. दोघांनी एकमेकांकडे पाहून औपचारिकपणे हलकीशी मान झुकवली. हस्तांदोलनासाठी हात पुढे केले. मी लागलीच पॅट्रिआर्चचा निरोप घेणार होतो; पण त्याने मला खुणेने मागील सोफ्यावर बसायला सांगितलं. मला वाटलं, कदाचित काही तरी काम असावं. एरवी या महत्त्वाच्या आगंतुकाशी पॅट्रिआर्चने एकान्तात बातचीत करणंच योग्य झालं असतं.
मिखाइल कलाश्नीकॉव्ह पॅट्रिआर्चपेक्षा वयाने बराच मोठा होता. पॅट्रिआर्चने त्याच्याकडे रोखून बघत हलकेच म्हटलं, “बोला.”
“माननीय पॅट्रिआर्च, हा गुन्हेगार मिखाइल कलाश्नीकॉव्ह गुन्हा केल्याच्या तीव्र जाणिवेनिशी दोन वर्षांपूर्वी ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये गेला आणि पहिल्यांदाच त्याने आपल्या धर्मनिष्ठेचा वायदा केला. अशा प्रकारे ९१ व्या वर्षी माझा बाप्तिस्मा करण्यात आला.”
“आम्ही तुम्हाला ओळखतो मिखाइल. रशियात तुम्हाला न जाणणारा कोणी तरी असेल का? कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही अस्वस्थ आहात ते सांगा आता.”
“आज आपल्या सरहद्दीवर लढाईची भीती राहिलेली नाही. मी शोधलेल्या रायफलने लाखो माणसांची कत्तल झाली आहे. तेव्हा मला सांगायचं आहे ते हे, की इतकी वर्षं प्राणघातक एके-४७ बंदूक आणि इतर संहारक शस्त्रांच्या संशोधनांबद्दल मला तीव्र पश्चात्ताप वाटतोय. आपण गुन्हा केलाय अशी असह्य टोचणी मला लागली आहे. रात्री झोप येईनाशी झाली आहे. माझ्या हातून कोणत्याही निरपराध मनुष्याची कत्तल झालेली नाही, तरीही हे होतंय.”
पॅट्रिआर्च किरिलला मी पहिल्यांदाच इतकं गंभीर झालेलं पाहत होतो. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. काही वेळानंतर तो धीम्या आणि नम्र आवाजात म्हणाला, “मिखाइल, पश्चात्ताप आणि दयेचा दरवाजा कधीही बंद होत नसतो. खरं तर पश्चात्ताप गुन्हेगारांचे डाग धुऊन काढतो.”
“नाही पॅट्रिआर्च, नाही! माझी सदसद्विवेकबुद्धी रात्री मला झोपू देत नाही...”
“तुम्ही देशाचं संरक्षण केलं आहे कलाश्नीकॉफ. देवदूत तुमच्या स्वच्छ नियतीची साक्ष देतील. तुम्ही तुमच्या आत्म्यात शांतीचा शोध घेतलात तर अंतर्गत स्पंदनांनी तुम्हाला निश्चित मुक्ती प्राप्त होईल. परमेश्वर तुम्हाला शांती प्रदान करो. आमेन. तुमच्यासाठी सातत्याने प्रार्थना केल्या जातील.”
कलाश्नीकॉव्ह त्याच विझलेल्या अवस्थेत चुपचाप परत गेला.
जगातल्या सगळ्या चर्चमधल्या सगळ्या प्रार्थना मिखाइलच्या सदसद्विवेकबुद्धीची अस्वस्थता दूर करू शकतील का?... एक ना एक दिवस तो रात्री शांतपणे झोपू शकेल का?... तो निघून गेल्यानंतर- मी आणि बहुधा पॅट्रिआर्चसुद्धा- या विचारांमध्ये गढून गेलो होतो. अर्थात, कोणताही दिलासा सापेक्षच असणार. नाही तर एखाद्या शास्त्रज्ञ फौजीला झोपेच्या गोळ्यांबद्दल माहिती नसेल का? पण मला असंही वाटलं, की गुंगीच्या औषधाने एखाद्याला झोप लागेल, पण त्याची सदसद्विवेकबुद्धी शांत नाही होणार.
या गोष्टीला बरेच महिने झाले. अचानक २३ डिसेंबर २०१३ ला कलाश्नीकॉफच्या मृत्यूची बातमी आली. तीव्र गॅस्ट्रिक रक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला होता.
त्याचा मृत्यू ही एक अविस्मरणीय घटना होती. इतर अनेकांप्रमाणेच रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिनही शोकमग्न होते. ‘मी कलाश्नीकॉव्हच्या अंत्ययात्रेत सामील होणार' असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे मिखाइलच्या मरणाचं महत्त्व आणखीनच वाढलं. पॅट्रिआर्चसुद्धा दिवंगताला सद्गती मिळावी यास्तव प्रार्थना करायला जाऊन पोहोचला. दफनापूर्वी कलाश्नीकॉव्हच्या शवाला गुंडाळणं वगैरे कामांची व्यवस्था करण्यासाठी तो मला खास सोबत घेऊन गेला. त्याच्या कफन व दफन प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याची मला मिळालेली संधी म्हणजे मला माझ्यासाठी क्षमाप्राप्ती व मुक्तीची बाब वाटली.
त्या विधींमध्ये एक वेळ अशी आली, की जेव्हा अर्धा तास मी एकटा शवाजवळ होतो, मी बराच वेळ मिखाइलचा तेजस्वी चेहरा न्याहाळत राहिलो. तो माझ्याशी बोलतो आहे असंच मला वाटत होतं. त्याचे लांब केस रुंद कपाळावरून उजव्या भुवईपर्यंत उतरलेले दिसत होते. बंद डोळ्यांपर्यंत आलेली केसांची एक बट मला निहायत सुंदर वाटत होती. जवाहिरांची चोरी वगैरे गोष्टींचा सर्वस्वी त्याग करून मी विरक्त झालो होतो, हे खरं असलं तरी अचानक माझी जुनी प्रवृत्ती उफाळून वर आली. मी चहुबाजूंना चोरटी नजर फिरवली. माझ्याव्यतिरिक्त आसपास कोणीही नव्हतं. शवपेटीजवळ एका टेबलावर एक कात्री पडलेली मला दिसली. कोण जाणे माझ्या मनात काय आलं, मी झटकन त्याच्या सुंदर लांब बटेचा एक गुच्छ कापून कागदात गुंडाळला आणि माझ्या शर्टच्या खिशात ठेवून दिला. हे कृत्य केल्यावर मला जगज्जेता असल्यासारखं वाटायला लागलं!
मिखाइल कलाश्नीकॉफच्या मृत्यूनंतर तीन आठवड्यांनी क्रेमलिनचं वृत्तपत्र ‘इझ्वेस्तिया'मध्ये छापलेल्या एका ठळक बातमीवरून मला समजलं, की मृत्यूच्या दोन महिने आधी कलाश्नीकॉफने पॅट्रिआर्चला एक पत्र लिहिलं होतं. ते असं होतं:
माननीय पॅट्रिआर्च किरिल,
माझं आंतरिक दुःख असह्य आहे. माझ्या नावाच्या बंदुका, तलवारी यांचा शोध मी आपल्या देशासाठी स्वसंरक्षणाची हत्यारं म्हणून लावला; पण ती शस्त्रास्त्रं आज फक्त रशियातच नव्हे तर जागतिक महायुद्धातील आमचा कट्टर शत्रू म्हणजेच शेजारच्या जर्मनीत आणि इतर देशांमध्येही विकली व खरेदी केली जात आहेत. या हत्यारांपैकी नव्वद टक्के हत्यारं नक्की नकली आहेत- ज्यांचा वापर दहशतवादीही करताहेत आणि बालसैनिकसुद्धा करताहेत. मी लहान होतो तेव्हा कुठे तरी वाचलं होतं, की कादर मुताल्लिकनी सांगितलं आहे की गुंतागुंतीची किंवा गोंधळ निर्माण करणारी प्रत्येक वस्तू अनावश्यक असते. जगाला फक्त साध्या, सरळ वस्तूंची गरज असायला पाहिजे. म्हणून त्याच वेळी मी जीवनाचं उद्दिष्ट ठरवलं, की देशाच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी गुंतागुंतीची नव्हे तर साधी आणि सोपी शस्त्रं बनवली पाहिजेत. परंतु, मी सातवीत असताना खेळण्यातल्या पिस्तुलासारखी पत्र्याची वस्तू शोधून काढण्याऐवजी दुसरा एखादा छंद जोपासला असता तर किती बरं झालं असतं, असं मला आता वाटतं. मी लॉनमोअर, गॅसकटर अशा यंत्रांचाही शोध लावू शकलो असतो. मात्र, माझ्या संशोधनाने लाखो माणसांचे जीव घेतले. माझा उद्देश कितीही चांगला असला तरी मला होणाऱ्या आत्मिक यातना आता माझ्या सहनशक्तीपलीकडे आहेत. आजही तोच अनुत्तरित सवाल माझ्यापुढे आहे : माझ्या बंदुकीने लोकांचे प्राण घेतले म्हणून माझ्यासारखा एक शेतकऱ्याचा, धर्मनिष्ठ, ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन मुलगा त्या सगळ्या मृत्यूंसाठी जबाबदार ठरवला जावा का? ते लोक दुश्मन असले तरीही? अकस्मात बाँब्सचा वर्षाव करून दोन लाख माणसांना ठार मारणाऱ्या हिटलरइतकाच मीसुद्धा वाईट आहे का?
फादर, हा सवाल जितका माझ्या मनाला चिरून जातो आहे, तितकंच मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, की जगन्नियंत्याने मनुष्यप्राण्यात द्वेष, लालच आणि आक्रमणाची लालसा का निर्माण होऊ दिली? नाही तर मी तरी हे विनाशकारी शस्त्र का बनवलं असतं?
मला रशियन शस्त्रास्त्रउद्योगाचा राजदूत मानलं जातं...
वृत्तपत्रात इथपर्यंतचा मजकूर मिखाइलच्या टाइप केलेल्या पत्रानुसार दिलेला होता. त्याच्या खाली पत्रलेखकाने आपल्या कापऱ्या हस्ताक्षरात पुढील मजकूर लिहिला होता :
‘पण मी आहे परमेश्वराचा गुलाम, डिझायनर मिखाइल कलाश्नीकॉफ.'
वृत्तपत्राने याबरोबरच अशीही बातमी दिली होती, की पॅट्रिआर्चने मिखाइलला या पत्राचं उत्तर पाठवलं होतं, ते असं:
जे हत्यार मातृभूमीच्या संरक्षणार्थ तयार होतं आणि ज्याचा उपयोग देशाचं लष्कर आपल्या सरहद्दींच्या आणि आपल्या संरक्षणासाठी करतं, त्याबाबत चर्चचा सुस्पष्ट असा दृष्टिकोन आहे. चर्च तुम्हाला गुन्हेगार ठरवणार नाही.
मिखाइलच्या केसांची कापलेली बट जतन करून किती तरी दिवस लोटले होते. आणि त्यावरून माझ्या सदसद्विवेकबुद्धीची मला टोचणी लागली होती, की हे माझ्या हातून घडलंच कसं? का?
वृत्तपत्रात ती बातमी वाचल्यानंतर मी माझा शेजारी आणि बालमित्र इलिया सोविचच्या घरी गेलो. तो कलाकार होता तसाच ‘नॉव्हेल्टी'तज्ज्ञही होता. कलाश्नीकॉफच्या केसांची कापलेली बट त्याच्यापुढे ठेवून मी म्हटलं, “तू या गुन्हेगाराच्या- म्हणजे माझ्या- इच्छेखातर या केसांपासून एखादी विलक्षण वस्तू तयार करू शकशील का?”
इलिया सोविचने निर्विकारपणे केसांचा तो गुच्छ घेतला आणि काचेच्या एका लांबलचक डबीत व्यवस्थित ठेवला. तो माझा जुना शेजारी होता. त्याला हे माहीत होतं की मी जुना चोर आहे. पण सध्याचं माझं चर्चमधील मदतकार्य आणि माझी आत्मिक उपासना यांनी तो प्रभावित झालेला होता.
मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहत होतो. उजवा कान मधल्या बोटाने खाजवत त्याने उत्तर दिलं, “मला काही दिवस दे.” आणि तो कुठल्याशा विचारांमध्ये गढून गेला.
साधारण एक आठवड्यानंतर पहाटे माझ्या छोट्याशा खोलीच्या दरवाज्यावर थाप पडली. अजून उजाडलंही नव्हतं. मी बाहेरच्या दिव्याचा स्विच दाबला, तर तिथे इलिया सोविच उभा.
आम्ही एकमेकांना ‘सुप्रभात' म्हटलं. मी अजून पूर्णपणे जागा झालो नव्हतो, पण त्याला पाहून मला खूप आनंद झाला. मी त्याला हाताला धरून आत घेऊन आलो. सोफ्यावर बसताच सुहास्य मुद्रेने त्याने पोर्टफोलिओ बॅग उघडली आणि एक चौकोनी क्रिस्टल फ्रेम बाहेर काढून मला दाखवली. ती शानदार फ्रेम पाहून माझ्या पापण्यांवर रेंगाळणारी झोप उडून गेली.
क्रिस्टलच्या आत सफेद व करड्या केसांची ती बट एखाद्या मुक्तपणे सळसळणाऱ्या गव्हाच्या लोंबीप्रमाणे एके-४७ रायफलच्या पाच-सहा इंची देखण्या मॉडेलला मजबूतपणे अडकवण्यात आली होती. रायफलच्या नळीच्या भोकातून एक डेझीचं हसरं फूल डोकावत होतं. पार्श्वभूमीवर कलाश्नीकॉव्हचं जलरंगांतलं फिकटसं चित्र होतं. त्याच्या छातीवर एक शेत दिसत होतं, त्यातून रोटी उगवली होती. त्याखाली सोनेरी धातूच्या एका प्लेटवर फाइन कट स्वरोव्ह्स्की रत्नांनी सजवलेला मजकूर झळकत होता :
परमेश्वराचा गुलाम
डिझायनर मिखाइल कलाश्नीकॉव्ह
इलिया सोविचच्या कलाविष्काराने मी प्रचंड प्रभावित झालो. उत्स्फूर्तपणे त्याला म्हणालो, “इलिया सोविच, तू कलाक्षेत्रात चोरी अजिबात केलेली नाहीस. उलटपक्षी, ‘शांततेसाठी शस्त्र' ही संकल्पना फार चांगल्या प्रकारे सादर केली आहेस. आता माझं ऐक. ही विलक्षण भेटवस्तू मिलिटरी अकॅडमीला पेश कर. मृताची बट चोरली त्याला मी जबाबदार आहे. बेशक तू तसं लिही. आणि हो, त्यासाठी मला कोणाचीही माफी नाही मागायची. परमेश्वराचीदेखील नाही.”
(मराठी अनुवाद : सुकुमार शिदोरे)
(मूळ उर्दू कथा (‘एक हथियार डिझायनर की मौत') लेखक फ़े सीन एजाज यांच्या ‘वो दस और दूसरी कहानियाँ' या कथासंग्रहात समाविष्ट आहे.)
