ओव्हर
वायरलेसवरून बोलता बोलता बुझारत सिंहला अशी सवय झाली होती, की कुठलंही बोलणं संपवता संपवता तो 'ओव्हर' म्हणून थांबायचा. आम्ही त्याच्याजवळ उभे होतो. म्हणाला, "तिकडची चारपाई ओढून घेऊन आपण बसा ना! ओव्हर!!"
आम्ही चारपाई ओढून घेतली. गोपीनं हलक्या, दबक्या आवाजात मला म्हटलं, "बुझारत सिंह... हे काय नाव आहे?"
मी खांदे उडवले. म्हटलं, "आता आहे तर आहे..." बुझारत सिंह बराच वेळ वायरलेसवर बोलत होता.
"चार धट्टीकट्टी माणसं त्याच्या पाठीवर बसवा आणि पळवा साल्याला... आपोआप ठीक होईल." मग तिकडून काहीतरी बोलणं झालं. या दरम्यान त्याने बॅटरी पेटवली. मग म्हणाला, "पायांना दोरी बांधून काठीचा वापर करत पळवा त्याला! कमीत कमी कोसभर तरी पळवा. ओव्हर..." मग थोडा वेळ ऐकलं. मग म्हणाला, "अरे, उपाशी ठेवून काही होणार नाही! मरून जाईल! उगीचंच! मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. ओव्हर..."
तो दुसऱ्या कुठल्या तरी कॅम्पमधल्या कुठल्या तरी बिथरलेल्या उंटाला काबूत आणायच्या युक्त्या सांगत होता. मी आणि गोपी मोठ्या संयमाने, धीर धरून कंदिलाच्या दुसऱ्या बाजूला त्याचं बोलणं संपण्याची वाट बघत होतो. ही जागा पोचीनापासून सुमारे ४० किलोमीटर दूर होती. आम्ही एका फिल्मचं शूटिंग करण्यासाठी पोचीनाला गेलो होतो. हिंदुस्थान-पाकिस्तानच्या बॉर्डरवर वाळवंटात एक छोटीशी चौकी आहे. मोठी सुरेख जागा आहे. मुलांच्या चित्रकलेच्या वहीत, क्रेयॉन रंगाने रंगवलेल्या घरासारखं ते घर वाटत होतं. कच्च्या घरासारखं रंगरूप आहे. आत विटा आहेत. वर मातीने लिंपलेलं आहे. बराकीसारख्या दोन खोल्या आहेत. एका भिंतीत एक मोठा चौकोन कापलेला आहे. त्यात बंदूक लटकावून एक फौजी पूर्ण गणवेशात उभा असतो. उगीचच... बाकी सगळे ढोपरापर्यंत कच्छा आणि बनियनमध्येच उन्हात इकडे तिकडे हिंडत असतात किंवा एकमेकांना सरसूच्या तेलाने मालीश करतात आणि डंटर पेलतात. आमची हिरॉइन तिथे पोचल्यामुळे बिचाऱ्यांना कपडे घालणं भाग पडलं. भागंपट्टी करावी लागली.
आमच्या डायरेक्टरसाहेबांनी खूप शोधाशोध करून ही जागा निवडली होती. कुठेही उभे रहा. कुठल्याही दिशेला बघा. दूर दूरपर्यंत हेलकावे घेणारं वाळवंट नजरेस पडतं आणि वारा हळुवारपणे हात फिरवत त्याच्या सुरकुत्या, वळ्या साफ करत राहातो.
या चौकीपासून सुमारे दोन फर्लांग अंतरावर एक सिमेंटचा दगड लावलेला आहे. त्याच्या एका बाजूला 'भारत' लिहिलंय आणि दुसऱ्या बाजूला 'पाकिस्तान', असे दोन दगड दोन- दोन फर्लांगाच्या अंतरावर लावलेले आहेत. मधे रिकामी ओसाड जमीन, वाळू आहे, माती आहे. कुठे कुठे थोडी ओरखडे उठल्यासारखी हिरवी झुडपं आहेत. शेळ्या-मेंढ्या ती ओरबाडत राहतात.
या मेंढ्या आणि उंट मुक्तपणे दोन्ही बाजूंना फिरत राहतात. त्यांना पाहून धर्म किंवा मुलूख कशाचाच पत्ता लागत नाही. तसा तर त्यांच्या मालकांना बघूनही लागत नाही. पण त्यांच्याशी बोलून विचारपूस तरी करता येते. यांच्याबाबतीत तेही नाही. आम्हांला तीन दिवसांची परवानगी मिळाली होती. तंबू लावायचीही परवानगी दिली गेली होती. एक अडचण होती. मुलं नैसर्गिक गरजांसाठी इकडे तिकडे छोट्या उंचवट्याआड जात होती, पण मुली मात्र वैतागल्या होत्या. एक कच्ची - पक्की जागा होती, पण तिथे दरवाजा किंवा पडदा नव्हता.
"अहो, इथे वाळवंटात येऊनच लढाया करतात. वाळू सगळ्यांसाठी उपयोगी पडते. इतकं पाणी इथे कुठून मिळणार?"
"मग न्हाण्याधुण्यासाठी नि खाण्यापिण्यासाठी कुठून पाणी येतं?"
"पाइप लाइन आहे साहेब! पण कंट्रोल 'जेसलमेर'मधे आहे. इथे येई येईपर्यंत कमी कमी होत जातं. पुरं पडत नाही, म्हणून मग पाण्याचे टँकर मागवावे लागतात. ठेकेदारांचाही धंदापाणी होतो."
एक तंबू आम्ही मुलींना त्यांच्या सोईसाठी दिला होता. बाटल्यांतून पाणी मिळत होतं. आमच्याकडे 'बिसलरी'चा स्टॉकही भरपूर होता. आमची हिरॉइन... तिला आम्ही डीम्पीजी म्हणत होतो. तिने चित्रपटांमधून अनेक वेळा बंदूक चालवली होती. गोळ्या घातल्या होत्या, परंतु खऱ्या बंदुकीमधून खरी गोळी कधी मारली नव्हती. तिने भिंतीतल्या खाचेत उभ्या असलेल्या शिपायाला विचारलं,
"यात गोळ्या आहेत?"
"आहेत बाईसाहेब!'
"पाहू?"
शिपाई खाली उतरला. भिंतीला लावलेल्या खोक्यावर पाय ठेवून डीम्पी वर चढली. समोर सुरेख वाळवंट पसरलेलं... जमिनीवर घातलेलं अतिशय सुरेख बेडकव्हर. दूरवर उजवीकडे खजुरांची दोन हिरवी झाडं. त्याच्या जवळपास चार-सहा बैठी घरं.
"तिकडे कोण राहातं?" खुणेने डीम्पीजींनी विचारले.
"मेंढपाळांची घरं आहेत."
"गाव आहे?"
"गावच समजा."
"नाव काय?"
शिपायाने काहीशा संकोचाने इकडेतिकडे पाहीलं. अनेक शिपाई हिरॉइनच्या मागे येऊन दरवाजाशी उभे होते. सगळे हसत होते. त्यांच्यात एक सिनिअरही होता. म्हणाला, "जी... नाव असं काही नाही. सगळे 'पोचिनाचं शेपूट' असं म्हणतात." खरखरती हास्याची एक तीक्ष्ण लकेर उमटून विरून गेली.
"मीही बंदूक चालवू शकते?"
त्याने काहीशा संकोचाने म्हटलं, "हां जी... चालवा!"
"आणि बॉर्डरच्या तिकडच्या बाजूने कुणी चालवली तर?"
"कोणी चालवणार नाही. एक गोळी आम्ही नमस्कार- चमत्कारासाठी (सलाम-दुआ) चालवतो."
"अच्छा आणि दोन चालवल्या तर?"
हेही वाचा - जहाजवाली टाकी
"सिग्नल आहे. कुणाला यायचं असेल तर येऊ द्या. तिकडून कुणाला पाठवायचं असेल, तरी ते दोन गोळ्या झाडतात." एक तीक्ष्ण लकेर ओढत निघून गेली. सगळेच्या सगळे पुन्हा हसले आणि ते हसू तिथेच चिपकून राहीलं. डीम्पीजीनं तिकडच्या चौकीला एक सलाम डागला. रिकाम्या वाळवंटात गोळीचा आवाज घुमला आणि तरंगत त्या बाजूला गेला. गोपी अडवानी माझ्याजवळ उभा होता. अचानक कापू लागला. त्याचे ओठ थरथरले आणि डोळे भिजले.
"काय झालं?" मी विचारलं.
शरमिंद्या आवाजात तो म्हणाला, "काही नाही. त्या बाजूला सिंध आहे... माझं गाव..." आणि बाहेर निघून गेला. गोपीला खूप लोक युनिटमध्ये गोपीबेबी म्हणून चिडवतात. अतिशय संवेदनशील. भावुक. आईबद्दल बोलणं निघालं, की लगेच डोळे भरून येतात. सिंधमधला आहे. फाळणीनंतरही तीन-चार वर्ष तिथल्याच शाळेत शिकला होता, पण हिंदुस्थानातील मुजाहीर तिथे पोचल्यानंतर परिस्थिती आणखीनच वाईट झाली आणि याला पळून यावं लागलं. आता अचानक सिंध इतक्या जवळ बघितल्यावर त्याचं मन भरून आलं.
त्या दिवशी तो पुन्हा दिसला नाही. रात्री तंबूतही नव्हता. डायरेक्टरनी एकदा विचारलंही. मी गडबडीने म्हटलं, "तब्येत ठीक नाही. मी त्याला तंबूत आराम करायला सांगितलंय." मला काळजी वाटू लागली होती. त्या बाजूला तर गेला नसेल? दुसऱ्या दिवशी सकाळीही नव्हता. त्यानंतरच्या दिवशी दोन वाजल्यानंतर भेटला. कळलं, तो खरोखरंच त्या बाजूला गेला होता. पण, थोडंसं दूर गेल्यावर तो भरकटला. चुकला. तो म्हणाला, "वाळवंट कुठूनही पाहीलं, तरी एकसारखंच दिसतं. एक टेकाड चढून गेलं तर पुढे तेच टेकाड लागतं. वाटतं, हेच तर मागे सोडलेलं टेकाड आहे. एकच मार्ग होता. मी माझ्याच मागे ठेवलेल्या पाऊलखुणा बघत बघत परत यायचं. वळून पाहिलं, तर त्याही मिटून गेल्या होत्या. मी खरोखरंच घाबरलो होतो. सलेमानचं भलं होवो. अल्लाहनेच त्याला पाठवलं."
"तो कोण आहे?"
"ऐक तर! सांगतो. वाळवंट जसजसं गरम होऊ लागलं, तसतसं वाटू लागलं, वाळवंट माझ्यावर नाराज होऊ लागलंय. म्हणतंय... माझा बिछाना खराब का करतोस? पळ इथून..." इतकं मोठं आहे ते ! आणि मी एवढासा... मी अंगरखा काढून डोक्याला गुंडाळला. काही वेळाने दूरवरून गाण्याचा आवाज आला. खूप दूरवरून... कुणी तरी मांड गात होतं... "पधारो हमारे देश..." मला कुणीच दिसलं नाही. मी अंगरखा सोडून फडफडायला सुरुवात केली. त्याने कुठून मला बघितलं, कुणास ठाऊक? पण, मी ज्या टेकडाखाली उभा होतो, त्याच टेकाडावर तो मला दिसला.'
"कीथा पीओ आंचे साई?"
"काय सांगू, त्या वाळवंटात त्याच्या तोंडून सिंधी ऐकून असं वाटलं, जसं काही आईने उचलून मांडीवर घेतलंय." त्याने विचारलं, "कुठून येतोयस?"
"पोचिना" मी सांगितलं. त्याने उंटावर बसवलं आणि उंट दौडवला.
"कुठे? सिंधला?"
"नाही, मियां जलाड नावाचं गाव आहे. पोचिनाच्या मागे. तिथेच सलेमानचं घर आहे."
"मग तो कुणीकडचा होता? इकडचा? की तिकडचा?"
गोपी म्हणाला, 'तो तिकडून पळालेला एक खूनी आहे. आपल्या प्रेयसीच्या कुणा दुसऱ्या प्रियकराचा खून करून पळून आला होता आणि 'मियां जलाड'मधे येऊन आश्रय घेतला होता. ज्या स्त्रीने आश्रय दिला होता, तिच्याशी तीन वर्षानंतर त्याने लग्न केलं. आता त्याला दोन मुलं आहेत. मोठी होताहेत.
"पुन्हा परत गेला नाही?"
"जातो, पण गुरुवारी तिथे जातो आणि शुक्रवारी परत येतो."
"आता का जातो?"
"आपल्या प्रेयसीला भेटायला. त्याच मुलीला... आता तिचंही लग्न झालंय. तिलाही दोन मुलं आहेत."
थोडं थांबून गोपीने पुन्हा सांगायला सुरुवात केली. "मी सांगितलं, मी तिथलाच आहे, तर लगेच म्हणाला, चल! आत्ता घेऊन जातो तुला! तुझं गाव दाखवून आणतो."
एकदा मन म्हणालं, 'जाऊया.' मी म्हटलं, "आत्ता... इतक्या रात्री?"
तो म्हणाला, "अरे साईन, मा भलेइ रस्तो भुलजी वनजां, पर मेहंजी उंटनी को ना भूल जान्दी." म्हणजे, मी रस्ता विसरू शकेन, पण माझी उंटीण विसरणार नाही. सरळ तिच्या दारासमोर उभी राहील."
"कुणाच्या?" मी विचारलं, तर उत्तर त्याच्या बायकोने दिलं.
"एक रांड तिथेही आहे याची... बॉर्डर पलीकडे.."
"आणि तुला वाईट नाही वाटत?"
"मी तर सांगितलं त्याला, तिलाही इकडे घेऊन ये. आम्ही दोघी इथे एकत्र राहू!"
काय कमालीची सीमा आहे आमची! वर्तमानपत्रात वाचलं, की वाटतं, जशी काही अग्नीरेखा रेखलेली आहे. रक्ताची धार वाहाते आहे.
दुसऱ्या दिवशी आमचा हिरो बन्नोजी म्हणाला, "यार! रम काही चालत नाही बुवा! कसं का होईना, व्हिस्कीची सोय कर! इंडियन का मिळेना..."
पोचिनाच्या खाली एक गाव आहे. ऐकलं होतं, तिथून इंडियन व्हिस्की पाकिस्तानात स्मगल केली जाते आणि त्या बदल्यात तिथून चांदी येते. दोन्ही बाजूंच्या पोलिस चौक्यांची दरमहा बैठकही होते. दोन्ही बाजूचे प्रबंधक भेटतात. किती मेंढ्या तिकडून इकडे आल्या आणि किती उंट पकडले गेले, यांचा हिशेब होतो. त्यांच्या आपापसातील अदलाबदलीची व्यवस्था होते... कधीकधी संध्याकाळी, आपापसात दारू बिरू, पार्टीसुद्धा होते.
त्या संध्याकाळी बॉर्डरजवळच्या अशाच एका चौकीवर, मी आणि गोपी हवालदार बुझरत सिंहाच्याजवळ बसलो होतो. आपलं उंटाबद्दलचं, वायरलेसवरचं बोलणं, त्याने संपवलं होतं. वायरलेसवरूनच त्याने आमच्यासाठी व्हिस्कीची ऑर्डरही देऊन टाकली होती. आता तो घरून आलेल्या बायकोच्या चिठ्ठीबद्दल बोलत होता.
'मूर्ख आहे बावळट... काहीही लिहिते. आता आम्ही हिंदुस्थानचं रक्षण करायचं, की ठाकुराने बळकावलेल्या
तिच्या दोन विती जमिनीसाठी लढायचं? इथे पाहा ना... सगळी बॉर्डर उघडी पडलीय. दुश्मन कुठल्याही क्षणी आत घुसू शकतो. सरकारनी अणुबाँब तयार केले. आमच्यासाठी काय केलं? काड्यापेटीसुद्धा एक रुपयात झाली.'
त्याची विडी विझली होती. त्याने खाटेतून एक काडी तासून काढली. कंदिलाच्या वरच्या भागातून ती ज्योतीवर धरून विडी पेटवली. एक-दोन झुरके घेताच विडी पुन्हा विझली. त्याच वेळी गोपीने सिगरेट पेटवली. बुझरत हसून म्हणाला, "आपल्याकडे एक लाइटर असता, तर जीवनात काय मजा आली असती! आता बाँबमुळे विडी तर पेटवता येत नाही ना? ओव्हर..."
एल ओ सी
१९४८च्या झटापटीनंतर हिंदुस्थानच्या बॉर्डरलगत फौजांच्या वसाहती वसू लागल्या होत्या. बरॅकी पक्क्या झाल्या.
बंकरसुद्धा... १९६५ पर्यंत, पंधरा- सोळा वर्षांत एक परंपराच निर्माण झाली होती. फौजी तुकड्या तिथे यायच्या, थांबायच्या आणि प्रस्थान ठेवायच्या. बॉर्डरजवळच्या जीवनाने आपली अशी एक व्यवस्था तयार केली होती. दोन्ही बाजूच्या धुवांधार भाषणबाजी पाठोपाठ बंदुकांचं फायरिंग हा रिवाजच बनून गेला होता. सर्वसाधारणपणे असं घडायचं, जेव्हा कुणी मंत्री दौऱ्यावर यायचा, तेव्हा आसपासच्या इलाख्यात फौजी फायरिंग करायचे आणि कधीकधी कुठल्या तरी गावात घुसून शेळ्या-मेंढ्या घेऊन यायचे. मग रात्री कँपमध्ये मेजवानी व्हायची. काही सिव्हिलियन मारले गेले, तर वर्तमानपत्रांना सनसनाटी बातम्या मिळायच्या. पुढाऱ्यांना चर्चेसाठी सामग्री मिळायची. एल.ओ.सी. एखाद्या विद्युतभारित जिवंत तारेप्रमाणे, पेटलेली, फुललेली, धगधगलेली असायची.
कधीकधी या आपापसातील कुरबुरित, युद्धखोरीत थोडा खंड पडायचा, तेव्हा वाटायचं, आता ती प्रथाच नाहिशी झाली. रक्त गोठलं, रक्त गरम होण्यासाठी, सळसळण्यासाठी मग पुन्हा काही दिवस आतषबाजी करायची. रक्ताला उकळी फुटायची. काही इकडचे जवान मारले जायचे. काही तिकडचे. बातम्यांतून मोजदाद व्हायची. पाच इकडचे मारले गेले... सात तिकडचे... आणि जमाखर्चाचा हिशेब होऊन जायचा.
दोन्ही बाजूंचे बंकर फारसे दूर नव्हते. कधीकधी असंही व्हायचं, कुणी त्या बाजूच्या पहाडावरून माहियां गाऊ लागायचं,
'दो पत्तर अनारां दे
साढी गली लंग माहिया
हाल पुछ जा बमारा दे'
तर इकडचा शिपाई गाऊनच उत्तर द्यायचा,
'दो पत्तर अनारां दे
पहरे नहीं हट दे चनां
तेरे भेंडे भैडे यारा दे.'
समोरासमोरच्या टेकड्यासुद्धा दोन खांद्यांएवढ्या एकमेकींपासून दूर होत्या. थोड्या वाकल्या, तर एकमेकींच्या गळ्यातच पडतील! तिकडची अजान इकडे ऐकू यायची नि इकडची तिकडे.
मेजर कुलवंत सिंहने एकदा आपल्या ज्यूनियर कॅप्टन मजीदला विचारलं, "अरे, आपल्या बाजूने एकदाच बांग होते, मग अर्ध्या तासाने दूसरी कशी सुरू झाली?"
मजीद हसला आणि म्हणाला, "त्या बाजूची आहे सर! पाकिस्तानची वेळ अर्ध्या तासाने मागे आहे ना!"
"मग तुम्ही कुठली बांग झाली की नमाज पढायला जाता?"
"ज्या दिवशी जे सुटेबल असेल, त्या दिवशी त्या वेळेप्रमाणे... सर!" आणि तो सॅल्युट ठोकून निघून गेला.
कुलवंत मनाशीच म्हणत होता, "त्या तरण्याबांड कॅप्टन मजीदमध्ये काहीतरी खास असं आहे. किती थोड्या काळात आपल्याला तो खूप खूप आवडू लागलाय. त्याचं हसू असं काही बोलतं, जसं काही माझा हात धरूनच तो लहानाचा मोठा झालाय.
एकदा रात्री परवानगी घेऊन मजीद त्याच्या तंबूत आला. आला, तो टिफिन घेऊनच. "काय आहे?"
"गोश्त (बकरीचं मटण) आहे. घरी बनवलंय!" कुलवंतने आपला ग्लास तिपाईवर ठेवला आणि तो उभा राहिला.
"अच्छा... अचानक हे कसं काय?"
"आज बकरीद होती ना! कुर्बानीचं मटण आहे. खाणार ना?"
"हां! हां! का नाही?" कुलवंतने स्वतः टिफिन उघडला. मटणाचा एक तुकडा काढत म्हटलं. "मेक अ ड्रिंक फॉर योर सेल्फ!"
"नो सर!... थैंक्स सर!"
"कम ऑन... ड्रिंक बनव! आणि ईद मुबारक!" मटणाचा तुकडा हातात झुलवत त्याने तीन वेळा मजीदला गळामिठी घातली.
कितीतरी वर्षांपूर्वी फत्तो मावशी खिलवायची. मुश्ताकची अम्मी. सहरानपूरमध्ये असताना... "काळ्या वाटाण्याची उसळ आणि विस्तवावर भाजलेलं मांस कधी खाल्लं आहेस?"
"माझ्या बहिणीने पाठवलं आहे सर!"
"ती इथे आहे? काश्मीरमध्ये?"
"सर... इथेच आहे काश्मीरमध्ये... पण..."
"पण काय?"
"जरगुलला असते सर... त्या बाजूला..."
"अरे?" कुलवंत उजव्या हातात बोटी घेऊन चोखत होता आणि डाव्या हाताने त्याने व्हिस्की ओतून तो ग्लास मजीदला दिला.
"चिअर्स... आणि पुन्हा एकदा ईद मुबारक!"
हेही वाचा - पर्रा
चिअर्सनंतर कुलवंतने पुन्हा विचारलं, "मग तुझ्या बहिणीने टिफिन पाठवला कसा?"
मजीद काहीसा बेचैन झाला. कुलवंतने फौजींप्रमाणे कडक आवाजात विचारलं. "तू गेला होतास त्या बाजूला?"
"नो सर! नेव्हर! मुळीच नाही!"
"मग?"
"माझे मेहुणे त्या बाजूला लेफ्टनंट कमांडर आहेत. बहिणच भेटायला आली होती."
कुलवंतने ग्लास उचलला. एक घोट घेतला. टिफिन बंद करून वळला आणि मजीदच्या समोर उभा राहिला.
"हाऊ डिड यू मॅनेज देंट?... कसा बंदोबस्त केलास?"
मजीद गप्प बसला. "काय विचारतोय? कसा बंदोबस्त केला होतास?"
थांबत थांबत मजीदने सांगितलं, "खाली गावात असे अनेक लोक आहेत, ज्यांची घरे या बाजूला आहेत आणि शेती त्या बाजूला. त्याचप्रमाणे त्या बाजूलाही असे काही लोक आहेत. त्यांच्या घरांची, कुटुंबांची, नातेवाईकांची वाटणी झाली आहे. घर त्या बाजूला.. शेत-जमीन इकडे..."
शब्दांपेक्षा मजीदच्या आवाजावर कुलवंतसिंहाचा जास्त विश्वास होता. थोडा वेळ गेल्यानंतर कुलवंतने थाळीत मटण काढून घेतलं, तेव्हा मजीद म्हणाला, "त्या बाजूचे कमांडर आपले दोस्त आहेत सर! आपलं एक आर्टिकल मी वाचलं, त्यामुळे मला कळलं!"
कुलवंतसिंहांचा हात थबकला. एक नाव लगेचंच त्यांच्या मनात तरळलं आणि जेव्हा मजीदने नाव सांगितलं, तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. "मुश्ताक अहमद खोकर... सहरानपुरचे."
कुलवंतचा हात कापू लागला. तो तंबूच्या खिडकीशी जाऊन उभा राहिला. बाहेरच्या बाजूने काही फौजी एकामागोमाग एक असे कॅम्प क्रॉस करत होते. मजीदने हळू आवाजात गंभीरपणे सांगितलं, "कमांडर मुश्ताक अहमद माझ्या बहिणीचे सासरे आहेत सर!"
"सासरे...? आं...? नसीमाच्या मुलाशी तुझ्या बहिणीचं लग्न झालंय?"
"जी..."
कुलवंत गडबडीने म्हणाला, "अरे म्हणजे तू...'यापुढे तो काही बोलूच शकला नाही. त्याचा गळा भरून आला. कुलवंतने ग्लास उचलला, तेव्हा वाटलं, तो काहीतरी गिळून टाकायचा प्रयत्न करतोय.
मुश्ताक आणि कुलवंत दोघंही सहारणपूरचे. कुठल्याशा काळात 'डून कॉलेज'मधे एकत्रच शिकत होते. दोघांनीही 'डून मिलिट्री अॅकॅडमी' मधून ट्रेनिंग घेतलं होतं. मुश्ताकची अम्मी आणि कुलवंतची बीजी, जीवश्च कंठश्च मैत्रिणी होत्या. मग मुलखाची वाटणी झाली. फौजेची वाटणी झाली. मुश्ताक आपलं कुटुंब कबिला घेऊन पाकिस्तानात निघून गेला. कुलवंत इथेच राहिला. दोन्ही घराण्यांचा त्यानंतर काहीच संबंध उरला नाही.
त्यानंतर काही दिवसांनी कुलवंतने आपला एक ज्युनिअर 'विश्वा' याला बरोबर घेतलं आणि कॅम्पपासून दूर एका पहाडाच्या आडून, वायरलेसवर मुश्ताकशी संपर्क साधला. आश्चर्याचे काही क्षण निघून गेल्यानंतर, दोघा मित्रांनी एकमेकांना पंजाबीतून, वेचून वेचून अशा निवडक शिव्या दिल्या, की बस्स! दोघांचंही मन मोकळं झालं. डोळे पाझरू लागले. जेव्हा श्वास थोडा थाऱ्यावर आला, तेव्हा कुलवंतने विचारले, "फत्तोमावशी कशी आहे?"
मुश्ताकने सांगितलं, "आई खूप म्हातारी झालीय. एक नवस बोलली होती. 'ख्वाजा चिश्ती'च्या मजारीवर आपल्या हाताने चादर चढवायची आहे तिला! हा नवस कसा फेडता येईल, याची दिवसरात्र काळजी करते ती! राबिया काही मुलांना सोडून जाऊ शकत नाही. राबियाला काही तू ओळखत नाहीस..."
"ओळखतो. मजीदची बहीण आहे ती... होय ना?"
"तुला कसं माहीत?"
"मजीद माझा ज्युनिअर आहे."
"ओए..!" आणि मग पुन्हा एकदा लांबलचक शिव्यांची मालिका आणि डोळ्यांतून पाझरणारं पाणी...
"त्याची काळजी घे..." मुश्ताक भरल्या गळ्याने म्हणाला.
मग दोघांच्यात ठरलं, की मुश्ताक कसंही करून आपल्या अम्मीला वाघापर्यंत पोचवेल. तिथे कुलवंतची पत्नी संतोष घेऊन तिला दिल्लीला आपल्या घरी घेऊन जाईल. अजमेर शरीफची यात्रा घडवेल आणि सहरानपूरला जाऊन बीजीच्या घरी सोडून येईल. अम्मीसोबत तिचे काही दिवस मजेत जातील. मुश्ताकच्या छातीवरचा खूप मोठा बोजा हटला.
मग एक दिवस मुश्ताकचा निरोप आला, अम्मीला व्हिसा मिळालाय. कुलवंतने, संतोषने बॉर्डरवर कधी भेटायचं, ती तारीख निश्चित केली. सगळी तयारी झाली. मुश्ताकला कळवायचं तेवढं बाकी राहीलं होतं. त्याच दिवशी डिफेन्स मिनिस्टर एल.ओ.सी.वर येऊन थडकले. दोन्ही बाजूंनी बलप्रदर्शन सुरू झालं. कुलवंतला माहीत होतं, की हे वादळ एक-दोन दिवसांत ओसरेल. वायरलेसवर संपर्क झाला नाही, म्हणून काय झालं? खाली गावात जाऊन कुणाला तरी त्या बाजूला पाठवलं, म्हणजे झालं! मजीदला रस्ताही माहीत आहे. तरीही काळजी दूर झाली नाही. संतोष सांगायची, "आता बीजी रोज पोस्टातून फोन करते आणि विचारते, 'फत्तो येतीय ना? तू वाघावर पोचशील ना? तू ओळखशील ना तिला? की मी बरोबर येऊ?"
मजीदने बातमी आणली, "सर पाकिस्तानच्या बाजूने तपासणी खूप कडक झालीय'
कुलवंत चिडलेला होता. म्हणाला, "नतद्रष्ट पाकिस्तान मष्णात जावो! आता फत्तो मावशीचं काय होणार?"
सप्टेंबरमध्ये पहिल्याच दिवशी, पाकिस्तानी फौजांनी 'चम्म'वर चढाई केली आणि त्या एल.ओ.सी.च्या आत आल्या.
२८ ऑगस्टला हिंदुस्थानी फौजांनी 'हाजी पीर'वर कब्जा केला. त्याच दिवसाची बातमी, २८ ऑगस्ट १९६५...
सहरानपुरात फत्तो मावशी घुगऱ्या आणि मांस शिजवत होती. बीजीने काळे वाटाणे शिजवले होते. आणि एल.ओ.सी.वर.... अकरा फौजी शहीद झाले. त्यांच्यामध्ये एक मेजर कुलवंतसिंह होता.
(अनुवाद – उज्ज्वला केळकर)
(अनुभव, दिवाळी २००७च्या अंकातून साभार.)
गुलजार
गुलजार
