
अमेरिकेतल्या अनधिकृत भारतीयांना परत पाठवलं गेल्याच्या बातम्या आपण नुकत्याच वाचल्या. त्यांत पंजाबमधल्या लोकांचं प्रमाण मोठं होतं. अनधिकृत एजंट्सच्या बोलण्याला भुलून अमेरिका-कॅनडाला जाण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी इथली तरुण पिढी आणि त्यांना या मार्गाकडे ढकलणारी गावा-गावातली परिस्थिती, यांचं भेदक चित्रण करणारी, अस्सल पंजाबी मातीतली कथा.
रात्री प्यायलो नसतानाही पहाटेच जाग आली. तौबा ! तौबा ! आता मला पाप लागणार. सकाळी सकाळी हे काय तोंडात आलं माझ्या? संतांना कळलं तर? त्यांना तर आपल्या मनात काय चाललंय तेही कळतं. मी तर संतांसमोर न पिण्याची शपथ घेतली आहे. आजवर मी कधी कुठली शपथ मोडलेली नाही. माझ्यावर संतांची कृपाच होती म्हणायची. आता आजही त्या कृपेचा आणखी थोडा प्रसाद मला मिळेल अशी आशा आहे.
रजई पांघरूनही थंडी हाडांपर्यंत जाते आहे. रजई पायांखाली घेऊन मी पडून राहिलो आहे. रात्री स्वप्नात माझी मुलगी पुनीत विमान चालवत होती. स्वप्न ‘एअर फ्रान्स'च्या विमानाचं पडलं होतं, दारूचं तर नव्हतं. कोण जाणे!
मी चार-पाच वर्षं प्यायलीही चिकार. ठेकेदाराकडे काम करत होतो. सतत नशेत असायचो. अर्ध्या रात्रीत जाग यायची. शरीर मोडून आल्यासारखं व्हायचं. लस्सी हवी वाटायची. या घरात लस्सी कुठली ! मग काय, मी सकाळी प्यायला सुरू करायचो. माझी बायको बख्शिंदर कौरची खरी दुर्दशा व्हायची. तिने वैतागून मला ठेकेदाराकडचं काम सोडायला लावलं. तिच्या भावांचा वट होता तिथे. मग काय करणार! दारू मिळाली नाही तर मी स्पिरिटही प्यायचो. काकांचे, म्हणजे आमच्या वडिलांचेच उपकार की ते मला संतांकडे घेऊन गेले.
रात्री खिडकी उघडी राहिली होती. तिथून वारा येत राहिला असणार. या खुळ्या पांघरुणंही घेत नाहीत नीट. धाकटी तर झटकूनच टाकते. त्यांच्या अंगावर रजई घालतो. आज यांना गुरुद्वारात घेऊन जायचं नाहीये. ज्या दिवशी माझं विमान असेल त्याआधी यांना नमस्कार करायला घेऊन जाईन. तिकडे गेलो की पहिला पगार पाठवेन. त्यातून इकडे गुरुद्वारात अखंड पाठ ठेवतील.
रात्री पडल्या पडल्या कधी विमानाचं स्वप्न पडतं, तर कधी संतांचं दर्शन होतं, शुभ्र पांढरी वस्त्रं, शुभ्र पांढरी दाढी, डोळ्यांत चमक, तेजस्वी चेहरा... कुणीही त्यांच्यासमोर नतमस्तक होणारच. माइयासारख्या रात्रंदिवस पिणाऱ्या माणसाची दारू सुटणं शक्य तरी आहे का? पण संतांच्याच कृपेने मी पुन्हा कधीही दारूला तोंड लावलं नाही, दर संक्रांतीला नमस्कार करायला जातो. तिथे किती भक्त जमलेले असतात! मुंगीलाही शिरायला वाव नसतो. पाच एकरांत गुरुद्वाराची इमारत उभी आहे. या भागातले जितके लोक कॅनडा, अमेरिका, इंग्लंडला गेलेले आहेत ते सगळे लाखोंचा दानधर्म करतात, बख्शिंदरही रात्री हेच म्हणत होती.
‘का करू नये! त्यांच्या आशीर्वादाने परक्या मुलुखात कमाई करतात.'
बख्शिंर अजूनही घोरत पडली आहे. तिला तिथली दूध घातलेली खीर खूप आवडते. पासपोर्टचे पैसे द्यायला गेलो होतो त्या दिवशी ही अखंड प्रार्थनेचा नवस बोलून आली होती. तिथे अशा, कोण जाणे किती प्रार्थना होतात. साखळी तुटत नाही. गेल्या जोडमेळ्यात एकशे एक प्रार्थना केल्या गेल्या. त्यांपैकी एकवीस अखंड प्रार्थना एकट्या जौहनसिंग शेरगिलच्या होत्या.
तो खरोखर ‘शेर' आहे. मी दोन वर्षांपासून पाहतोय त्याला. तो सहज बोलता बोलता चाळीस-पन्नास हजार दान करतो. सहा महिन्यांपूर्वी साडेपाच लाखांच्या स्कॉर्पिओ गाडीची किल्लीच त्याने संतांच्या पायाशी ठेवली. नव्या लंगर हॉलचा सगळा खर्च त्यानेच केला. आधी वाटलं, हा साला ठग असणार. इथे खायची ददात पडली आहे. कष्टाचा इतका पैसा कुणी असे दान करतं का? मग छोट्या संतांनी माझं शंकानिरसन केलं, ‘कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंडमधले भाईबंद पाठवतात. गुरुमहाराजांच्या कृपेने कुणी ना कुणी जातच असतं तिकडे. मग इमानदारीने कमावलेल्या आपल्या पैशाचा दहावा हिस्सा गुरूद्वाराला भेट म्हणून देतात, वाहेगुरु, इनपर कृपा रखे!'
मी कधी तरी बख्शिंदरला हे बोलून बसलो, तर ही गुरुद्वाराच्या चकराच मारायला लागली. आता हिचं घोरणं थांबेना. साली रात्रभर डोकं खात होती. हिच्या मागण्या संपतच नव्हत्या. “मला हे पाठवा-ते पाठवा. मुलींसाठी...“ आता तरी ऊठ की गं. प्रार्थना सुरू होऊन तासभर तरी उलटला असेल. ना हिला चिमण्यांची चिव-चिव ऐकू येते, ना कावळ्यांचे काव काव, जाऊ दे, झोप आरामात. हिला कुठे माझ्याबरोबर गुरुद्वारात यायचंय?
अर्थात, प्रसादानंतरच सरदार जौहनसिंग शेरगिलकडून पासपोर्ट आणि तिकीट मिळणार आहे. पण मला आधी जायचंय. महापुरुषांची प्रवचनं पण ऐकणार आहे. नंतर कोण जाणे कधी संधी मिळेल. गुरुचरणांच्या सेवेशी हजेरीही लावायची आहे. त्यांच्या सेवेत असतानाच तर माझ्या डोक्यात प्रकाश पडून हे प्रकरण पुढे गेलं होतं.
बख्शिंदरची धावपळ कामी आली आणि संतांनी माझ्यासारख्या काही भक्तांची एजंट शेरगिलशी गाठ घालून दिली.
तो पौर्णिमेचा पवित्र दिवस होता.
‘भक्तांनो, गुरू ग्रंथसाहेबाच्या सेवेशी असताना जे बोलायचं ते खरंच बोलायचं. आम्ही अमेरिकेसाठी दहा लाखांचं दान घेतो. आठ लाख तर आमचाच खर्च असतो. गुरू भक्तांकडून बस हा खर्चच तेवढा घेणार. बाकीचे दोन लाख गुरुचरणी ठेवा.'
आठ लाख रुपये ऐकून मला तर धापच लागली. इतकी रक्कम कुठून जमवू? बख्शिंदरच्या आई-वडिलांपुढे हात पसरावे लागले. या बाईचं काही सांगता येत नाही. हिची रूपं काही कमी आहेत का? झोपली असली तरी हिची भीती वाटते मला. पण पैशाची जुळवाजुळव करायला हिने खूपच धावपळ केली. नाही तर मला कोण पैसे द्यायला बसलंय! इच्छा नसूनही मी धाकट्या बहिणीला, हरकंवलला फोन केला. तिने तीन लाख रुपये पाठवले. मग जरा माझाही धीर वाढला. मी अमेरिकेला जाण्याचा पक्का निश्चय केला. हा एक शेवटचा प्रयत्न करून पाहणार. महिनाभर मी, काका आणि बख्शिंदर भुताने झपाटल्यासारखे झालो होतो. संतांच्या भरवशावर आठ लाख रुपये आणि पासपोर्ट एजंटच्या हातात सोपवून आलो. इतक्या रकमेच्या नुसत्या उल्लेखानेच कापरं भरतं बाबा! तरी मी एकटाच नव्हतो. त्या दिवशी दोनशेजणांनी पैसे भरले असावेत.
त्याचा विचार करकरून रजईतही हुडहुडी भरली आहे. एकदा या कुशीवर, एकदा त्या कुशीवर, असं दोन तास चाललंय. मला आता उठायला हवं. थंडी तर काय अशीच राहणार. संतवाणी चुकायला नको. बख्शिंदरलाही उठवतो. मुलींनाही वेळेवर शाळेत पाठवायचंय.
मी गुरांकडे गेलो. नशीब आज धुकं नाही पडलं. मी झाडाची एक काडी तोडली आणि व्हरांड्याजवळ बसून ती चावायला लागलो. ट्रॅक्टर घ्यायचा म्हणून एकदा विकलेले बैल पुन्हा घेताच आले नाहीत. घेऊन तरी काय करायचं? शेती? बैलांच्या पुठ्ठ्यावर प्रेमाने हात फिरवणाऱ्याने तर बाज धरली आहे.
‘बिच्चारा कमनशिबी चाचा सिंगारा सिंह!'
हा बिचारा धावाधाव करून जनावरांना भरपूर चारा घालायचा, शेत नांगरणाऱ्याला खायला घालायलाच हवं ना. काकी पण सतत म्हशीला चारापाणी करत राहायची. घरात कधीही दूधदुभत्याची कमतरता नव्हती. आता तीन-चार गोठ्यांत मिळून एकही धडधाकट जनावर नाही. खाली शिंगं वळलेल्या दोन म्हाताऱ्या म्हशी तेवढ्या आहेत. या म्हशीही बख्शिंदरच्या भावांनी दिलेल्या, असल्या 'बक्षिसां'मुळेच तर या बाईचा इतका ठमठमाट असतो. आज हिचा मूड जरा बरा वाटतोय.
स्वयंपाकघरातून भांडी आपटण्याचे आवाज येत नाहीयेत. नाही तर सकाळी सकाळी हिचं वाईटसाईट बोलणं ऐकून घ्यावं लागतं. आता प्रार्थना करते आहे वाटतं.
घ्या, आता काकांना ढास लागली. काकीचीही बिचारीची हीच अवस्था आहे. एक हात गुडघ्यावर ठेवते आणि दुसरा कंबरेवर. बिचारी आई माझी, कुबडी होऊन बसली. काही हरकत नाही म्हणा. आता मी अमेरिकेला जाईन. सर्व दुःखं दूर होतील. आता चहा प्यावा, परसाकडला जाऊन यावं.
‘मला नाही जमत आता शेतात हगायला.'
बख्शिंदरचं हे बरोबरच आहे. आज टॉयलेट असतं तर इतक्या थंडीत बाहेर यावं लागलं नसतं. शिवाय आता ही शेतंही आमची नाहीत. मी कुंपणावर बसलोय खरा. भले शेजारचे येऊन आया-बहिणी काढोत. हरदेव सिंहला बोलताही येत नाही. गावातली ही सर्वांत बडी पार्टी आहे. पूर्वी तर हे साले स्वतःला मुखिया म्हणवून घ्यायचे. आता ससाणेवाले झाले आहेत. यांच्या बंगल्यावर ससाण्याच्या आकाराची टाकी बांधलेली आहे ना. हे लोकांना कर्ज देतात. मग त्यांच्या जमिनी हडप करतात. काकांनीही यांच्याकडेच जमीन गहाण टाकली होती. फक्त ते ती सोडवू शकले नाहीत. हे मालक झाले त्याचे. त्यांना काय दोष देणार! आपलेच जिथे...
आमच्या थोरल्या काकांनी, चरणसिंहांनी आमच्या काकांना, म्हणजे वडलांना तीन एकर शेत दिलं आणि स्वतः सहा एकर घेतलं. साल्याने म्हाताऱ्याला आपल्याजवळ ठेवून घेतलं होतं. थोरली काकीही एक कैदाशीणच आहे. तिनेच बाबांना हलू दिलं नाही. त्यांच्या वाटचे तीन एकरसुद्धा हडपले. त्यांचं सगळं काकांनी सहन केलं. पण निसर्गापुढे कुणाचं काय चालतंय! त्या वर्षी बटाट्याचं पीकही भरघोस आलं. ढिगाने कुजलं. कुजके ढीग बघून आग आग व्हायची. काकांनी तेव्हा प्रथम अंथरूण धरलं.
‘काका, हिंमत सोडू नका... उठा. काही तरी उपाय शोधू या' मी तेव्हाही आजच्यासारखाच उत्साही मन:स्थितीत होतो.
मी मोठा आहे. आम्ही थोरल्या काकांच्या मुलांचं पाहून वडिलांना काका आणि आईला काकी म्हणतो. आधी आमचं एकत्र कुटुंब होतं. चांगलं प्रेमळ कुटुंब होतं.
मग कोण जाणे. या दोन भावांना काय धाड भरली थोरल्या काकाने जमिनीचे वाटे केले. तो लवकरच कुटुंबीयांसोबत इंग्लंडमधे स्थायिक झाला. कदाचित आपापसातली कटुता कमी झालीही असती, पण पाच-एक वर्षांनी आल्यावर त्याने भलतंच रूप दाखवलं.
हवेलीची (गोठ्याची) जागाही हडप केली. आम्हाला आमची गुरं घरातच बांधण्याची वेळ आली. तो त्या जागेवर दोन वर्ष मोठा बंगला बांधत होता, बंगल्यावर विमानाची टाकी बांधली. गावात ससाणेवाल्यानंतर हा दसऱ्या क्रमांकाचा बंगला आहे. या बंगल्याकडे पाहिलं की संताप संताप होतो माझा. आत्ताही मी बंगल्याच्या दिशेलाच पो टाकला आणि मोटरवर हात धुऊन निघालो.
आता नजर जाईल तिथपर्यंत ससाणेवाल्याची शेती आहे. तेव्हा आमच्या मदतीलाही हेच आले होते. तेव्हा उद्ध्वस्त पिकं पाहून काकांचा तर धीरच सुटला होता. मी त्यांना उभं केलं. त्यानंतर त्यांना पराभूत झालेलं नाही पाहिलं. आता आजारपणातही माझ्यासाठी पैशांची जमवाजमव करण्याची धावपळ ते करत बसले आहेत. तसंही गावातले सगळे आमच्या मसंदागल्लीला फुकट बसून खाणाऱ्यांची गल्ली म्हणतात. पण खरं तर आमचं कुटुंब काटकसर करणारं होतं आणि मेहनतीही. इथे घरी बख्शिंदर आम्हाला कधी कंजूस कुटुंब म्हणते, तर कधी उघड्या-नागड्यांचं. या सालीला काय माहिती की आमच्या कुटुंबाने किती मेहनत केली आहे! काका-काकींना कायमच शेतातल्या मातीसोबत माती झालेलं पाहिलेलं आहे. आम्हा तीन बहीण-भावांनाही कामाची किती आवड होती! पण नशिबाच्या फेऱ्याने आम्हाला हल्लक करून टाकलं होतं. काकांना मी धीर द्यायचो खरा, पण काहीच सुचत नव्हतं. मग बहुतेक कुणी तरी इंग्लंडला थोरल्या चरणसिंह काकापर्यंत ही बातमी पोहोचवली. त्याचं पत्र आल. त्याने मला परदेशी जाण्याचा ट्राय मारण्याबद्दल लिहिलं होत. एजंटशी बोलून कळवायला सांगितल होतं. पत्र आलं त्या दिवशी काका घरी नव्हते. ते नुकसानभरपाईच्या कामासाठी तहसीलदाराकडे गेले होते. मी त्यांच्यासाठी थांबलो नाही. मुकुंदपूरला जाऊन छोकर ट्रॅव्हल्सवाल्या एजंट गुरजंट सिंहशी बोलणीही करून आलो. संध्याकाळी काकांना कळल्यावर ते भडकले. “ओएलजिंदर, गप्प रहा की! भिकेचे डोहाळे लागलेत का? चरणसिंहावर माझा अजिबात विश्वास नाहीये. इतकी वर्ष झाली परदेशी जाऊन, कधी चौकशी केली त्याने आपली?”
मी काकांना मुकुंदपूरच्या एजंटला भेटून आल्याबद्दल सांगत राहिलो, पण ते नाही, नाही करत राहिले. पिकं उद्ध्वस्त होऊन पडली होती. काका हा जुगार खेळायला तयार होत नव्हते. आमच्या गावात जन्मलेला प्रत्येकजण बाहेर जाण्यासाठी पासपोर्ट तयार ठेवून बसला होता. जे कोणे एके काळी आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगायचे तेदेखील परदेशी गेले. त्यांच्या नंतरच्या पिढीने जमीन गहाण टाकली आणि ते एजंटांमार्फत बाहेर सेटल झाले. गावात महालांवर महाल बांधले. पण काकांना कोण समजावणार? मग एके दिवशी कोण जाणे, त्यांच्या मनाने काय घेतलं, की कुणी सल्लागार भेटला. त्यांनी जमीन ससाणेवाल्याकडे गहाण टाकली आणि रक्कम एजंटच्या हातावर ठेवली.
छोकर एजंटने आम्हा तेराजणांना इंग्लंडमधे प्रवेश मिळवून दिला. शिखांच्या गल्लीतली दोन मुलंही होती. ती तर इंग्लंडला पोहोचताच छू-मंतर झाली. आम्ही सहाजण पोलिसांच्या तावडीत सापडलो. चार महिने तुरुंगात होतो. त्यानंतर त्यांनी डिपोर्ट केलं. थोरला काका तुरुंगात भेटायलाही नाही आला.
म्हणून तर आज हा विमानवाला बंगला पाहून माझा जळफळाट झाला. मी मातीने भरलेली चप्पल बंगल्याच्या बाहेरच्या ओट्यावर झटकली. या बंगल्यात भय्ये राहतात. जागा आमची...! हे साले मजा करतात!
तेव्हाही आतासारखीच परिस्थिती होती. गुरजंट सिंहाने आम्हाला पार कफल्लक करून टाकलं होतं. आम्हाला कधी दिल्लीला घेऊन जायचा, कधी मुंबईला. मी दोन-तीन वर्षं दिल्ली-मुंबईच्या चकरा मारत राहिलो. त्या खडूस जाटाचं काय जाणार होतं? खर्च आम्हीच करायचो. परक्या शहरात महिनोन्महिने अडकलेले आम्ही उपाशीपोटी मेलो असतो तरी त्याला त्याचं काय होतं? तो तर ट्राय मारायला लावायचा. काकाचं रोमरोम कर्जात बुडलं. ससाणेवाल्याकडे दोन-चार कनाल जमीन गहाण ठेवली जायची. आडत्याचं बँकेचं व्याज चुकतं केलं जायचं. इतकं करूनही मी इंग्लंडला जाऊ शकलो नाही.
पण भज्जीची कृपा! चला, एकदा तरी त्याने दलदलीतून बाहेर काढलं. मला दुबईला घेऊन गेला. आपल्या माणसांपेक्षा हा परका भला निघाला.
काय अभद्र दिवस होता तो!
अख्खं गाव झाडाला लटकणारं भज्जीचं प्रेत पाहून बुचकळ्यात पडलं होतं. त्याला खांदा देणाऱ्यांच्यात मीसुद्धा होतो. पण त्याच्या मृत्यूवर अजूनही विश्वास बसत नाही. त्याने दहा-बारा वर्ष दुबईत घालवली. आपल्या वस्तीतल्या निम्म्या पोरांना तरी तो दुबईला घेऊन गेला असावा, तो कुणा ना कुणा शेखकडून व्हिसा आणायचा. गावातल्या कुणा ना कुणा पोराला दुबईला घेऊन जायचा. त्याला कंपनी सोडायला लावायचा. स्वतः दारू काढायचा, पुढल्याला त्याच्या विक्रीच्या कामी लावायचा. खजुराची दारू काढण्यात एकदम पटाईत होता. मला म्हणायचा, “पहिल्या धारेचा एक पेग मार आणि मग धंद्याची लाइन बदलून टाक.”
स्वतः मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. मला पाच महिन्यांची कैद झाली.
गावात सगळे त्याला ‘कोब्रा साप' म्हणायचे, त्याचं असं आत्महत्या करणं चक्रावून टाकणारं होतं. सदाराम काका आणि काकीची अवस्था बघवत नव्हती. त्यांची तेव्हा जी अवस्था झाली होती, तीच आता माझ्या घरात काका-काकीची होऊन बसली आहे. जगतायत तेही मेल्यागत. उलट्या डोक्याची बख्शिंदर रात्री म्हणाली, ‘आपल्या जाट जमीनदारांना वाचवलं कॅनडा, अमेरिका, विलायतीने. छोट्या भाईबंदांना अरबांनी. महाराज, आता चांगली नियत ठेवून जा.”
रात्री पुन्हा भज्जीचा विषय निघाला. कोण जाणे कसं, पण मी बाहेर जाण्याच्या विरोधात बोलून गेलो. ही आपलं भाषण घेऊन बसली. मी भज्जीला कसं विसरू, सांगा बरं. हेच ते झाड, ज्यावर त्याने गळफास लावून घेतला.
बख्शिंदरचं म्हणणंही बरोबरच आहे. मी उगीच भज्जीचं डोक्यात घेऊन बसायचो. आपल्याच कामात विघ्न आणतोय मी. संतांनी सांगितलं होतं, की नीट एक साधासुधा माणूस म्हणून जा. मला तर अमेरिकेला जायचंय, मला त्याच्याशी काय देणं-घेणं? मी झरझर पावलं टाकत घराकडे निघालो.
हा एक काळतोंड्या जिथे-तिथे आडवा येतो. आता हा माझं डोकं खाणार. फिरत असतो किसान युनियनचा प्रधान म्हणून. याला गावात कुणीही विचारत नाही आणि म्हणे, मी प्रधान, विजयी पैलवान! याला सगळे बाजा पैलवान म्हणतात. याचे कान डुकराच्या ओठांसारखे सुजलेले आहेत. डोकंही वाकडं, हा प्रत्येक गोष्टीत तोंड घालतो. भज्जीच्या अंत्यसंस्कारांनंतर आपला ‘आखाडा' जमवून बसला.
“ज्या जमातीत आत्महत्या होत असतील त्यांचं संकट किती गडद असेल । मनुष्य मंडईतल्या मालासारखा झालाय, त्याची कर्मही.”
अरे, शेजारच्याचा मुलगा गेलाय आणि हा भलतंच काही तरी घेऊन बसलेला.
“लग्न करून झटपट वेगळे होतात. संकटांचे पहाड कोसळतात, दुःख ऐकून घेणारं कुणी नसतं. ताण वाढतो. व्यसनांच्या आहारी जातात आणि मग...”
मी तर संतांचा आभारी आहे. टळलं संकट. आता याला कळता कामा नये, की मी अमेरिकेला चाललोय, नाही तर लगेच रस्ता अडवून म्हणेल, ‘दलजिंदर सिंह, आपण आपल्या देशाचा स्वर्ग बनवण्यासाठी का लढू नये?'
हा आम्हाला लढाईचं सांगत बसायचा. स्वतःच्या दोन मुलांना पाठवलंय कॅनडाला. मुलीचं लग्न जुळवलं तेव्हा नवरा मुलगा मुलीच्या वयाला साजेसा आहे की नाही हेही पाहिलं नाही. याच्या साहेबाने सरकारकडून चेअरमनपद पटकावलं. बरं झालं, कटला! संतांकडे जायला विनाकारण उशीर झाला असता. कामात व्यत्यय आला असता.
माझीसुद्धा ही सवय चांगली नाही. कोण जाणे कुणीकडे वाहवत गेलो. मी सांगत होतो विमानवाल्या बंगल्याबद्दल. आता गुरुद्वारात पोहोचण्याचा तेवढा अवकाश आहे. आज तिथून पासपोर्ट, तिकीट घेऊन यायचं. आणि मग... फुर्र ! हेसुद्धा काय विमान आहे थोरल्या काकाच्या बंगल्यावरचं नेहरूंच्या काळातलं. मला सरदार जौहनसिंह शेरगिल सांगत होता, ‘सिंहसाहेब, एअर फ्रान्सची विमानं बघण्यासारखी आहेत. त्यातनं प्रवास करण्याची मजाच काही और आहे. आमच्या खास माणसांना आम्ही त्यातूनच पाठवतो.”
मला अमेरिकेला पोहोचू दे. उधारी फेडायला जास्तीत जास्त दोन वर्ष लागतील. पाच वर्षांनंतर थोरल्या काकाच्या शेजारी बंगला बांधणार. आधी ससाणेवाल्याकडून जमीन सोडवून घ्यायची आहे. बस्स, त्यानंतर बंगला बांधायचं काम करणार. थोरल्या काकाला असूया वाटली पाहिजे. बंगल्यावर एअर फ्रान्सचं विमान बनवणार, परिसरातली अशा प्रकारची पहिलीच टाकी असेल. टाकी पाण्याने भरली की विमानाच्या शेपटीकडून जसा धूर निघतो, तसा आमच्या विमानाच्या शेपटीकडून पाण्याचा फवारा उडेल. टाकीतलं पाणी संपलं की त्याचे पंख वर-खाली होतील.
माझ्या विमानाचा दुसरा हल्ला ससाण्याच्या टाकीवर होणार. मी सगळं उडवून देणार. मग हरदेव सिंह हात लावून पाहतील, की ससाण्याची टाकी तर उताणी होऊन पडली आहे.
बाहेरून यांचे भाऊ येतात तेव्हा लोकांना डॉलर दाखवत फिरत असतात. मी काय डॉलर आणणार नाही? धूळ उडवत कारने फिरत असतात. गळ्यात सोन्याची चेन, हातात कडं आणि बोटांत अंगठ्या घालून फिरतात. साले माज करतात! मी याहून अधिक सोनं माझ्या बायकोला आणून देईन. तिच्या साऱ्या तक्रारी दूर करेन. आहेस कुठे, म्हणेन तिला. म्हणजे सासुरवाडीकडच्यांनाही समजेल. उगीच कटकट करत असतात. त्यांचाही पुढचा मागचा हिशेब करायचा आहे. चार दिडक्या देऊन अरेरावी करतात!
मला ना, कधी कधी बख्शिंदरशी लग्न केल्याचाच पश्चात्ताप होतो. हिने आमची जत्राच मांडली आहे. सुखमनी आणि पुनीत नसत्या तर मी कधीच सोडलं असतं तिला. काकीने तर किती वेळा तिला सोडून दे म्हणून सांगितलं. पण लग्न करणं सोपं का आहे? या देशात खुशालचेंडू लोकांचं एक लग्नच मोठ्या मुश्किलीने होतं. सोडून देऊन... असो ! देश आपलाही आहेच. आम्हीही खोटं सांगितलंच होतं, “दलजिंदरला तर काय, इंग्लंडमधे केस सुरू होती म्हणून परतावं लागलं. आम्ही म्हटलं, जितके दिवस केस सुरू आहे तोवर दुबईला जाऊन येईल. याला एक दिवस इंग्लंडला तर जायचंच आहे.”
मला दुबईहून डिपोर्ट केलं गेलं तेव्हा हे असलं काकीच काय, कुटुंबातले सगळेच बोलत होते. बख्शिंदर कौरच्या घरच्यांनी इंग्लंडमुळे तिचं माझ्याशी लग्न लावून दिलं होतं. दोन-चार वर्षं तर मी अशीच काहीबाही सांगून घालवली. जेव्हापासून या लोकांना सत्य परिस्थिती समजली आहे तेव्हापासून सगळे माझा दुस्वास करतात. बख्शिंदर तर बारीकसारीक बाबतीत मला बोलत असते. काही ना काही करून मी परदेशी जावं एवढीच हिची इच्छा आहे. सहा-एक वर्षांपूर्वी शिखांच्या गल्लीतला एक मुलगा, इंग्लंडला पोहोचण्यात यशस्वी झालेला, तो गावी आला होता. त्याच्या गप्पा ऐकून ही मला उचकवायला लागली. मी काही तरी करून ट्राय मारला असता. आधीचं कर्ज उतरलेलं नव्हतं. शिवाय मला हिच्यासोबत राहायचं होत.
हिच्या काही मैत्रिणी बाहेर आहेत, किंवा त्यांच्या घरचं कुणी ना कुणी बाहेर आहे. त्या इकडे मजा करत असतात. दिवसभर कानाला मोबाइल लागलेला असतो. सारख्या शहरात शॉपिंगला जातात. कुणी कारमधे फिरते, कुणी स्कूटर घेऊन. मला तिच्या बोलण्याचा संशय यायला लागला म्हणून तर मी बाहेर जायला तयार नव्हतो. हिने मागे लागून लागून माझ्याहून छोट्या केशरला ग्रीसला पाठवलं. उरलीसुरली जमीनही ससाणेवाल्याच्या नावे केली होती. ही माझ्या नावाने बोटं मोडत बसायची.
“एकदा गडी बाहेर सेट झाला की कुटुंब तरून जातं. इथे आयुष्यभर कितीही धडका मारल्या तरी चार दिडक्याही नाही साठत.” ही सतत मला इथे उपाशी मरणारे परदेशी जाऊन कसे लखपती झाले हे सांगत राहायची. त्यांच्या गाड्या, बंगले यांच्यावरून मला टोमणे मारायची. हिला दागिन्यांनी मढलेल्या, गाड्यांमधून फिरणाऱ्या आणि मोबाइलवर गुलुगुलु बोलणाऱ्या बाया दिसतात, बाकी काही नाही. केशर दोन-तीन वर्ष व्यवस्थित पैसे पाठवत राहिला. ही अखंड त्याचं कौतुक करायची. दोन्ही मुलींना इंग्रजी शाळेत घातलं. मग तो भारतात परतला. त्याने भुल्लखकडची मुलगी केली. त्याच्या सासुरवाडीच्यांनी भुल्लखमधेच त्याच्यासाठी एक घर बांधलं. तो म्हटला तरी की मलाही ग्रीसला घेऊन जाईल. मी पण ग्रीसला जाण्यासाठी मनाची तयारी केली होती. पण त्याचं एकही पत्र नाही आलेलं. कैक वर्षांत त्याच्या बायकोचं, तेजीचं, आम्ही तोंडही पाहिलेलं नाही. आता सकाळ-संध्याकाळ टोचून बोलणारी माझी बायको रात्री म्हणायला लागली, ‘ऐकलं का, आपण खूप नरक भोगला. आता अमेरिकेला गेलात की लक्षात ठेवा, माझं जाऊ दे, किमान आपल्या मुलींना तरी कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहावं लागता कामा नये.”
वस्तूंची यादीच सुरू केली. मला तर कित्येक शब्द उच्चारताही येत नाहीत. सुखमनी आणि पुनीतची लिस्ट तर याहूनही मोठी आहे. पुनीत म्हणाली, “बाबा, माझ्यासाठी विमान आणा उडणारं, लाइट लागणारं.”
घरी आल्यावर म्हटलं, पटकन अंघोळ करून घ्यावी. गुरुद्वारात जायचंय. संत म्हणायचे, शुचिर्भूत होऊन यावं. सतनाम... वाहेगुरू! चला, झालं. मी न्हाणीघरातून बाहेर येऊन आवरायला लागलो. सुखमनी आणि पुनीत माझ्या गळ्यात पडल्या. रात्रीच्या यादीतल्या वस्तूंची आठवण करून द्यायला लागल्या.
मी संतांच्या फोटोसमोर डोकं टेकवलं. खोलीत धुपाचा वास दरवळतो आहे. काकी सकाळी उठून धूप लावणं- दिवा लावणं हीच कामं करते. आज तर मी काका-काकीलाही नमस्कार करून आलोय.
“थांबा हं, दही खाऊन जा.”
बख्शिंदरचा आवाज ऐकून मी थांबलो. ती दह्याची वाटी घेऊन आली. मी चार चमचे दही तोंडात टाकलं. ती किती प्रेमाने म्हणाली, ‘सरळ घरीच या, अंधार करू नका. आम्हाला वाट पाहायला लावू नका. आणखी एक... रिकाम्या हाती परतू नका, एका हातात पासपोर्ट आणि तिकीट असू दे आणि दुसऱ्या हातात मिठाईचा पुडा आणि फळं!”
ससाणेवाल्या आणि विमानवाल्या बंगल्यासमोर बस थांबतात, मी बसची वाट पाहत बाहेरच्या ओट्याजवळ उभा राहिलो. मी वाहेगुरू वाहेगुरूचा जप करतोय, पण लक्ष लागत नाहीये. कधी विमानवाल्या टाकीकडे नजर वळतेय, तर कधी ससाणेवाल्या टाकीकडे, केशर साला फसवून गेला! जळ्ळा मेला, बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला! अरे, कुटुंबाला आधार दिला असतास तर तुझं काय झिजणार होतं? या लोकांचं कर्ज तरी झालं नसतं.
त्याला तर बापाचीही दया आली नाही. जमीन ससाणेवाल्याकडे गहाण टाकून तो स्वतः गेला होता. कित्येक वर्षं काका जमीन नांगरत राहिले. शेजारच्याने आम्हालाच भाड्याने दिलेली होती. तरी त्यांनी अनेक वर्ष लाज राखली. त्याच शेतातली भाकर खात राहिले.
बँकेकडून कर्ज घेत राहिले. ते फेडायला पुन्हा सावकाराकडूनही कर्ज घेत गेले. ना सावकाराचं कर्ज फिटलं ना बँकेचं. या ससाणेवाल्याने जमीन सोडवून घेतली होती. सगळे एकाच माळेचे मणी. आता तो सावकार चार दांडग्यांना घेऊन घरी येतो आणि धमक्या देतो. बँकवाल्यांचे छापे वेगळेच. त्यात त्या बाजा पैलवानाने जीव नकोसा केलाय ते वेगळंच.
“तुझा संघर्षाशी-आंदोलनाशी काही संबंधच नाही. तुला माहिती नाही, आंदोलनं माणसाला मरू देत नाहीत. जो हरतो तो मेल्यातच जमा.” आता मला सांगा, आम्ही कशाला मरू ? मरोत आमचे शत्रू ! आज माझं काम होऊ दे... हे सावकार, बँकवाले, सगळ्यांना दाखवतोच!
बस आली. मी ठरवलं होतं, बसमधे आराम करायचा. ही समरा एक्सप्रेस दरबारा सिंहची आहे. साला नेमका बस चेक करत आला नाही म्हणजे मिळवली. उगाचच....! असो, संतांची कृपा असू देत. कोण जाणे का, पण मला अस्वस्थ वाटायला लागलं. मी थोडी खिडकी उघडली. थंडगार वारा आत आल्यावर बाकीच्या प्रवाशांनी माझ्याकडे त्रासिक नजरेने पाहिलं. मी खिडकी बंद केली.
शहरात आलो. बसमधून उतरलो. इथून गुरुद्वारापर्यंत दुसरी बस घ्यावी लागेल. त्या बसेस गढशंकर रोडवरून सुटतात. मी चालत तिकडे निघालो. इच्छा नसतानाही वणवैत प्रिंटिंग प्रेसपाशी माझे पाय थबकले. बहुतेक आतून कुणी तरी गुपचूप पाहतंय. मी दुकानाच्या विरुद्ध दिशेला तोंड फिरवलं आणि झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली. पूर्वी या प्रेसच्या शेजारी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होती. हरकंवल त्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला यायची. तिने इथे दोन वर्षं काय काय रंग उधळले हे आम्हाला कळलंच नाही. वणवैताच्या मुलाच्या प्रेमात काय पडली। तो मुलगा कधी कॅनडाला गेला, कधी परतला, त्यांनी कधी दोघांचं लग्न लावलं... आम्हाला ती कॅनडाला गेली तेव्हाच पत्ता लागला याचा. याबद्दल बरंच बोललं गेलं. कुठे तोंड दाखवायची सोय राहिली नव्हती.
“आता जातिपाती विसरा. त्याला आता कोण विचारतंय? मुलगी कॅनडात सेटल झाली. इथे आयुष्यभर घरातच बसली असती.” बख्शिंदर त्यावर पडदा टाकत होती की तिला असूया वाटत होती? तेव्हा लक्षात नाही आलं. अख्ख्या कुटुंबाने हरकंवलचा बॉयकॉट केला होता. तसे आत सगळे खूषच होते. अर्थात, आता येणं-जाणं सुरू झालंय, पण माझी बायको चिमटे काढायचं सोडत नाही. हिच्या मावशीची मुलगी पळून गेली तेव्हा बोंबलत फिरत होती.
मी गुरुद्वारात आलो. इथे आलं की मन शांत होतं, सगळी दुःखं, कष्ट दूर होतात. वाहेगुरू... असंच आनंदी ठेव. मी डोकं टेकवलं आणि मांडवात जमलेल्या भक्तांजवळ जाऊन बसलो. आज इथे झकास मेळावा जमला आहे. रसभरित कीर्तन होऊ घातलंय.
मला येऊन एक तास झाला. कुणीच दिसत नाहीये. सरदार जौहनसिंह शेरगिल तर इथे समोरच बसायचे. संतजी पण दिसत नाहीयेत. छोटे संत प्रार्थनेत मग्न आहेत. ते माझ्या कानात कुजबुजले. मी अठरा नंबरच्या खोलीत पोहोचलो. संतजी आडवे पडले आहेत. मी पाया पडलो आणि शेजारी बसलो.
‘दलजिंदर सिंह, जौहनसिंह अजून आला नाही. गेल्या आठवड्यात आला होता. सात-सात लाख आणखी मागत होता. सांगत होता, की म्हणे आता पंधरा लाख रेट झालाय. मी तर नाराजच झालो होतो. त्याला आज बोलावलं होतं. म्हटलं, बाबा, भक्तांशी तू स्वतःच बोल. अजून नाही आला. बघू कधी येतोय आता... मुळात ती. येतोय की नाही...”
मी उठून उभा राहिलो. माझ्या पायांत त्राण नाहीत. कसा तरी मांडवापर्यंत आलो. भिंतीचा आधार घेत खाली बसलो. भानावर आलो तेव्हा दिवस बुडाला होता. भक्तही इकडे-तिकडे पांगले होते. जौहनसिंह कुठेच दिसला नाही. माझ्यासारखे आणखीही उदास चेहरे होते. छोट्या संतांनी मला उठवलं. बेटा, तुझं नशीब फुटकं, परमात्मा त्याला नक्की शिक्षा देईल. गुरूच्या घरातच फसवणूक नरकातही ठाव मिळायचा नाही.”
मी पाय ओढत बसमधे येऊन बसलो. मला केवळ हरकंवल, बख्शिंदर, काकाच नव्हे, तर इतरही हर प्रकारचे लोक दिसताहेत, ज्यांना मी ओळखतही नाही. तोंडांची दोन-दोन शकलं झाली आहेत, कसं ओळखणार? हां, यांच्या डोक्यांवर नोटांच्या राशी आहेत. काका त्या भाराने मरतील वाटतं. आणि बख्शिंदर...! किमान हरकंवलला वणवैत सोडणार नाहीत. माझी आई, मिंदो, तिचं काय होणार? ती पण मूरतासिंहच्या आईसारखी दगडं मारत फिरणार!
असं म्हणतात, की मूरतासिंहला पण माझ्यासारखाच एकेका माणसाच्या चेहऱ्याच्या जागी चार-पाच चेहरे दिसू लागले होते. ते पाचजणही नोटांच्या राशी घेऊन जायचे. त्याचं ओझं वाढलं की नेणारा त्याच्या वजनानेच मरायचा. माझ्या फुलांसारख्या पोरींची काय चूक आहे? आज तर त्या पण त्या राशींच्या खाली गाडल्या गेल्या आहेत. त्या चिमुकल्यांना तरी कुणी तरी वाचवा!
मूरतासिंह तर गावात सर्वांत जास्त शिकलेला. शेतीकामात पटाईत होता. यशस्वी शेतकरी. शेतीची अवजारं घ्यायची असोत, बंगला बांधायचा असो किंवा मुलांना कॉन्व्हेंटमधे शिकवायचं असो, परिसरात तोच सर्वांत पुढे असायचा. कुठल्या कुठल्या बँकांकडून कर्ज घेतली होती कोण जाणे. सरकार, बी-बियाणांच्या कंपन्या, सर्वांच्यातच त्याची ऊठबस होती. बस, जप्तीचं वॉरंट आलं. त्याने अख्ख्या कुटुंबाला सल्फास दिलं. एक त्याची आई तेवढी उरली. गल्लीबोळांत फिरत असते. हातात दगडं असतात तिच्या. माझ्या आईच्या हातातही...?
‘हे जे घरोघरी टी. व्ही. आलेत ना, तेच नवनव्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करतात आपल्याला. शेतीच्या साम्राज्यवादी मॉडेलने अनेक ‘मूरतासिंह' खाल्ले.”
हे मी बोललो की बाजा पैलवान ते कळत नाहीये. त्या बाजा पैलवानाला असली भाषणं तेवढी करता येतात. पण आत कुठे तरी मीच बोलत होतो. आता मला बसमधून उतरायचीही भीती वाटते आहे. समोर वणवैत प्रिंटिंग प्रेस. भज्जीने पकडलं होतं. ससाणेवाल्या टाकीवर मेलेलं कबूतर टांगलेलं होतं. भज्जी आणि मूरतासिंह पण...! ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. मी घाबरत घाबरत बसमधून उडी मारली. मी वणवैत प्रिंटिंग प्रेस पळत पार केली. बस स्टँडजवळ दारूची चार दुकानं आहेत. मी बाटली घेतली आणि चौकात आलो. अर्धी बाटली खलास केली. आता सगळा चौक शेरगिलमुळे गांजलेल्यांनी भरून गेल्यासारखं वाटतं आहे. जोडीला ते खोटारडे बाबा. मला तर वाटतं, सर्वांचं संगनमतच आहे. बख्शिंदरची फर्माइश आठवली. ती म्हणाली होती, ‘रिकाम्या हातांनी परतू नका.' मी नामधारी सीड्स स्टोअरमधे गेलो. मग मी बस स्टँडची वाट धरली. तिथे किशनसिंहची करवत सुरू आहे. बख्शिंदरने मला ठेकेदाराकडचं काम सोडायला लावलं तेव्हा एक-दोन वेळा मी यांच्याजवळ कामाबद्दल बोलून गेलो होतो. पण एका जाटाने सुतारकाम करायचं? उपाशी मरण्यापेक्षा ते बरं. चला, सकाळी याच्याशी बोलतो पुन्हा.
नशीब, गावची शेवटची बस मिळाली. मिळाली नसती तर बख्शिंदर वाट बघत बसली असती. सुखमनी आणि पुनीत म्हणाल्या होत्या, जोवर मी घरी परत येणार नाही तोवर त्या झोपणार नाहीत. आता गेल्यावर झोपवेन. साली बसही आज जरा जास्तच डुचमळत चालली आहे. मी नाही होणार मूरतासिंह ! मी डरपोक थोडाच आहे? नशीब, बस घरापर्यंत आली. अरे, आज घरात जरा जास्तच झगमगाट दिसतो आहे. बख्शिंदरने सगळे दिवे लावले आहेतसं दिसतंय. छातीवर दगड ठेवून मी गेट खडखडवलं. माझ्या समोर सरदारीण बख्शिंदर कौर उभी आहे. तिच्या एका बाजूला सुखमनी आणि दुसऱ्या बाजूला पुनीत. माझ्या एका हातात बाटली आहे आणि दुसऱ्या हातात...! तिघीही घाबरल्या.
दुसऱ्या खोलीतून काकीच्या खोकण्याचा आवाज आला. काकाही काही तरी विचारताहेत वाटतं. आता काय करणार या घरातली माणसं ? डोक्यावरच्या नोटांच्या रार्शीखाली हे दबून गेलेत. मी ओरडत लटपटत्या पायांनी आत घुसलो. फाटकन खोलीचा दरवाजा बंद करून आतून कडी लावून घेतली.
बाहेर हलकल्लोळ माजला.
(अनुभव दिवाळी २०१५च्या अंकातून साभार)
(चित्र – सतीश भावसार)
मूळ पंजाबी कथा : अजमेर सिद्धू
हिंदी अनुवाद : राजेंद्र तिवारी
हिंदीतून अनुवाद : प्रीति छत्रे