आम्ही कोण?
लेखमालिका : उद्योग भरारी

सुहासिनी आणि यतिन शहा : सोलापूरचे जागतिक उद्योजक

  • आनंद अवधानी
  • 16.07.26
  • वाचनवेळ 12 मि.
precision camshaft solapur

सोलापूर. एक असा जिल्हा, की ज्याचं नुसतं नाव घेतलं तरी उन्हाचा चटका जाणवतो. एक असं गाव, की जिथल्या पाणीटंचाईच्या गोष्टी ऐकताना घशाला कोरड पडते. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न तर सोलापूरच्या पाचवीला पुजलेले आहेत. हे कमी म्हणून की काय, सोलापुरातल्या उद्योग-व्यवसायांची कहाणीही फारशी सुखावणारी नाही. एके काळी ‘सोलापुरी चादर' देशभर प्रसिद्ध होती. अनेक सूतगिरण्या तिथे रात्रंदिवस धडधडत होत्या. पण आज सोलापूरच्या जवळपास सर्व गिरण्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला काही प्रमाणात निराशेने ग्रासलेलं आहे. पण त्या निराशेवर मात करत पुन्हा एकदा सोलापूरचं नाव केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर कोरणाऱ्या उद्योगाचं नाव आहे ‘प्रिसिजन कॅमशाफ्ट्स'. 

तसं पाहता ‘प्रिसिजन कॅमशाफ्ट्स'ची कहाणी अवघ्या ३० वर्षांतली आहे, पण तिचा डंका मात्र त्रिखंडात गाजतो आहे. वाहन उद्योगातला अत्यंत महत्त्वाचा भाग, कॅमशाफ्ट्स बनवणाऱ्या या कंपनीची भारतात तर मक्तेदारी आहेच, पण जगातल्या अनेक देशांत दादागिरी आहे. अर्थात हे यश सहजपणे मिळालेलं नाही. कंपनीचे संस्थापक यतिन शहा आणि सुहासिनी शहा या दोघांच्या दूरदृष्टीतून आणि अथक परिश्रमांतून कंपनीच्या यशाची कमान सतत चढती राहिली. 

शहा कुटुंबीयांच्या पाच पिढ्या (म्हणजे गेली दीडशे वर्षं) सोलापुरात स्थायिक आहेत. यतिन शहा यांच्या वडिलांचा फाउंड्री, म्हणजे धातूच्या ओतीव कामाचा व्यवसाय होता. शिक्षण संपल्यानंतर यतिन यांनी काही वर्षं याच फाउंड्रीत काम केलं. अनेक पटीने व्यवसाय वाढवला. पण त्यांचं मन त्या व्यवसायात रमत नव्हतं. त्यांना स्वत:चं काही तरी करायचं होतं. वडिलांच्या फाउंड्रीमध्ये ट्रॅक्टर्स बनवणाऱ्या विविध कंपन्यांसाठी सुटे भाग बनवले जायचे. त्यामधली एक कंपनी होती- एस्कॉर्ट्स. काही नवीन करण्याच्या विचारात असलेल्या यतिन यांना ‘एस्कॉर्ट्स्'च्या अधिकाऱ्यांनी एक कल्पना सुचवली- वाहनांसाठी लागणारे कॅमशाफ्ट्स तयार करणं. यतिनना ती कल्पना आवडली. 

गंमत म्हणजे यतिन शिक्षणाने इंजिनियर नाहीत. त्यामुळे आधी त्यांना कॅमशाफ्ट्स म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं होतं. सोप्या शब्दांत वर्णन करायचं, तर वाहनाच्या हृदयातले स्नायू म्हणजे ‘कॅमशाफ्ट्स'. ज्याप्रमाणे माणसाच्या हृदयाला झडपा असतात, तसंच वाहनांचं असतं. इंधन आणि वायू आत घेणं आणि धूर बाहेर सोडणाऱ्या झडपा चालू-बंद करणं असं कॅमशाफ्ट्सचं काम असतं. कोणत्याही वाहनाचा सर्वांत महत्त्वाचा असा हा भाग असतो. कॅम्पशाफ्टच्या कार्यक्षमतेवरच वाहनाची कार्यक्षमता अवलंबून असते. आता वाचताना आश्चर्य वाटेल, पण १९९२-९३ च्या सुमाराला संपूर्ण भारतात कॅमशाफ्ट बनवणारं एकमेव युनिट होतं आणि ते चेन्नईला होतं. त्यामुळे भारतीय वाहन उत्पादकांना एक तर चेन्नईच्या कंपनीवर अवलंबून राहावं लागायचं किंवा परदेशात धाव घ्यावी लागायची. सरकारच्या १९९१च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानंतर देशात मोटारगाड्यांचं उत्पादन वाढणार हे स्पष्ट दिसत होतं. साहजिकच यतिन आणि सुहासिनी यांनी या क्षेत्रातली संधी हेरली आणि कॅमशाफ्टच्या निर्मितीचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा - चॉकलेट जायंट चंद्रकांत मोरडे

पण सोलापूरसारख्या ठिकाणी राहून असा कारखाना सुरू करणं किती कठीण होतं याचा अनुभव त्यांना लवकरच आला. सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्या गिरण्यांशिवाय काहीच नव्हतं. त्यामुळे गावात तज्ज्ञ इंजिनियर्सच काय पण साधे मशिन ऑपरेटर्स आणि सुपरवाझयर्स मिळणंही कठीण होतं. मग कारखान्याची तांत्रिक रचना करण्यासाठी कोणी सल्लागार मिळणं तर अशक्यप्राय गोष्ट होती. पण यतिन यांच्या मित्राने अशी माहिती पुरवली की, या क्षेत्रातला एक तज्ज्ञ व्यवस्थापनाशी मतभेद झाल्यामुळे कंपनीतून बाहेर पडला आहे. त्याला भेटल्यास उपयोग होईल. मग यतिन यांनी थेट बेंगळुरू गाठलं. त्या व्यक्तीशी त्यांच्या अनेक भेटी झाल्या. त्या व्यक्तीचा होकार मिळवण्यात त्यांना यश आलं. त्या व्यक्तीचं नाव डी. बी. आर. सुपर्णा असं होतं. या कामी त्यांची मदत महत्त्वाची ठरलीच; पण तेवढ्याने प्रश्न सुटणार नव्हता. उत्पादनाच्या जोडीने विक्रीचाही विचार करावा लागणार होता. 

भारतातल्या वाहन बाजारपेठेमध्ये कॅमशाफ्टसाठी किती मागणी आहे याची एकत्रित माहिती कुठेच उपलब्ध नव्हती. बाजारातल्या मागणीचा नेमका अंदाज आल्याशिवाय कारखान्याच्या कामाला सुरुवात करणं शक्य नव्हतं. त्यामुळे यतिन यांनी देशव्यापी सर्वेक्षणाचा घाट घातला. त्यासाठी व्यावसायिक पद्धतीने सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेची नेमणूक केली. भारतामध्ये दरवर्षी किती कॅमशाफ्टची मागणी असते, ती कशी पूर्ण होते, त्यासाठी स्पर्धा कितपत आहे, बाजारातले चढ-उतार कसे असतात, यापासून ते भविष्यातली आव्हानं कोणती असतील, इथपर्यंत अनेक प्रश्नांचा शोध या सर्वेक्षणामार्फेत घेतला गेला. त्या सर्वेक्षणामुळे यतिन आणि सुहासिनी यांना कंपनी सुरू करण्याचा आत्मविश्वास आला. सोलापूरच्या औद्योगिक मानसिकतेचा विचार करता अशा प्रकारचं देशव्यापी सर्वेक्षण करणं आणि त्यासाठी मोठी रक्कम खर्च करणं ही बाब कौतुकास्पदच म्हटली पाहिजे. यतिन आणि सुहासिनी यांच्या उद्यमशीलतेची ही पहिली चुणूक होती. 

१९९२ साली कंपनीची स्थापना झाली. तरी कारखान्याची उभारणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू व्हायला १९९४ साल उजाडलं. उत्पादनाची सुरुवात महिंद्रा ट्रॅक्टर्ससाठी कॅमशाफ्ट्स बनवण्यापासून झाली. काहीच दिवसांत सोनालिका, न्यू हॉलंडसारख्या अनेक ट्रॅक्टर कंपन्यांची कामंही मिळाली. या कामांसोबत कंपनी स्थिरस्थावर होत होती. भारतातल्या वाहन उद्योगामध्ये ‘प्रिसिजन कॅमशाफ्ट्स' या नावाला स्वतंत्र ओळख तयार होत होती. अवघ्या चारच वर्षांत, म्हणजे १९९८ मध्ये रतन टाटा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या टाटा इंडिका या गाडीचे कॅमशाफ्ट्स बनवण्याचं काम ‘प्रिसिजन'ला मिळालं. या निमित्ताने प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात कंपनीचा शिरकाव झाला. सुरुवातच दमदार झाल्यामुळे महिंद्रा, मारुती किंवा फोर्स मोटार्ससारख्या प्रतिष्ठित कंपन्यांच्या प्रवासी वाहनांमध्येही ‘प्रिसिजन'चे कॅमशाफ्ट्स बसू लागले. ट्रॅक्टर्सच्या पाठोपाठ प्रवासी वाहन क्षेत्रातही जम बसल्यामुळे कंपनीचा विस्ताराचा मार्ग प्रशस्त झाला. 

कितीही दर्जेदार आणि तंत्रकुशल काम केलं, तरी भारतीय उद्योजकांना कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो ते पहा. भारतातल्या महत्त्वाच्या कंपन्या करारबद्ध झाल्यानंतर भारताबाहेरच्या कंपन्या जोडून घेण्यासाठी यतिन यांची धडपड सुरू झाली. ही धडपड आत्ताच्या काळापेक्षा तेव्हा खूपच कठीण होती, कारण तेव्हा मोबाइल फोन किंवा इंटरनेटसारख्या सेवा सुरळीत झाल्या नव्हत्या. विमानप्रवासही आतापेक्षा जिकिरीचे होते. शिवाय देशोदेशीच्या कंपन्यांना भेटी देऊन त्यांची कामं मिळवणं खर्चिकही होतं. पण यतिन स्वस्थ बसणाऱ्यांमधले नव्हते. ते अनेक देशांतल्या अनेक कंपन्यांमध्ये जाऊन धडकत होते. पण एक भारतीय कंपनी कॅमशाफ्ट्स बनवू शकते यावर विश्वास ठेवायला जागतिक वाहन उद्योग तयार नव्हता. आपली बाजू पटवून देण्यासाठी यतीन हरतऱ्हेचे प्रयत्न करत होते आणि वाहन उद्योजक अत्यंत थंड प्रतिसाद देत होते. परिस्थिती बिकट होती. पण अखेर यतिन यांनी उपाय शोधलाच. 

हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला

यतिन यांच्या लक्षात आलं, की युरोप किंवा अमेरिकेतल्या एखाद्या कंपनीसोबत भागीदारी केल्याशिवाय आपल्याला जगाचे दरवाजे उघडणार नाहीत. अनेक देशांत शोध घेतल्यानंतर त्यांना इंग्लंडमध्ये ‘जी-क्लान्सी' नावाची कंपनी सापडली. या कंपनीमध्ये फक्त कॅमशाफ्ट्सच बनत होते, पण ते बनण्याचा त्यांचा खर्च खूपच जास्त होता. त्या तुलनेत सोलापूरमध्ये अत्यंत कमी खर्चात उत्पादन शक्य होतं. जसा हा फायदा जी-क्लान्सीच्या बाजूने होता, तसेच ‘प्रिसिजन'च्या बाजूनेही काही फायदे दिसत होते. पहिलं म्हणजे ‘जी-क्लान्सी' वापरत असलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळणार होतं. उत्पादनाची क्षमता वाढवताना नवा कारखाना त्या धर्तीवर उभारता येणार होता. दुसरं म्हणजे ‘प्रिसिजन'सोबत एक युरोपियन कंपनी असल्यामुळे जगाचे दरवाजे किलकिले होणार होते. कॉर्पोरेट परिभाषेत सांगायचं तर दोन्ही कंपन्यांसाठी ‘विन-विन सिच्युएशन' होती. स्वाभाविकच भागीदारीच्या करारावर सह्या झाल्या, ‘क्लान्सी प्रिसिजन कंपोनेंट्स प्रा. लि.' या नावाच्या कंपनीचा जन्म झाला. या करारामुळे ‘प्रिसिजन'चा काही पटींत विस्तार झाला. दर महिन्याला एक लाख कॅमशाफ्ट्स बनू लागले. जनरल मोटर्स हा भारताबाहेरचा पहिला क्लाएंट कंपनीला मिळाला. कोणे एके काळी द्वारकानाथ कोटणीस या डॉक्टरने जगाच्या नकाशावर सोलापूरची मुद्रा उमटवली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा मान यतिन आणि सुहासिनी शहा या दांपत्याने मिळवला. ते साल होतं २०००. 

एखाद्या अनवट घाटातून प्रवास करावा तशी ‘प्रिसिजन'ची आजवरची वाटचाल आहे. कधी वळणं असतात, कधी खडे चढ असतात, तर कधी तीव्र उतार असतात. मैलोन्मैल सरळ आणि गुळगुळीत रस्ता या कंपनीला माहीतच नाही. ३० वर्षांच्या वाटचालीत दर थोड्या वर्षांनी काही ना काही घटना घडलेल्या दिसतात. ‘जी-क्लान्सी'बरोबरचा संसार खरं तर सुखाचा चालला होता; पण २००६ मध्ये जी-क्लान्सी ही कंपनीच दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे साहजिकच तिचा ‘प्रिसिजन'सोबतही घटस्फोट झाला. जी-क्लान्सीचे ५१ टक्के शेअर्स ‘प्रिसिजन'ला मिळाले. ‘क्लान्सी प्रिसिजन कंपोनेंट्स प्रा. लि.' हे नाव मोडीत निघालं. शंभर टक्के मालकीसह ‘प्रिसिजन कॅमशाफ्ट्स'चा फलक कंपनीच्या प्रवेशद्वारावर झळकला. त्यानंतर कंपनीच्या विस्ताराने वेग पकडला. जनरल मोटर्सच्या पाठोपाठ बीएमडब्ल्यू, फोर्ड आणि मर्सिडीज यांसारख्या प्रवासी वाहनांची कामंही ‘प्रिसिजन कॅमशाफ्ट्स'ला मिळाली. 

दरम्यानच्या काळात ‘प्रिसिजन'चा विस्तार थेट चीनमध्ये झाला, पण त्यामागे अगदीच वेगळं कारण होतं. चीनमध्ये जनरल मोटर्स आणि फोर्डचे प्लँट्स होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘प्रिसिजन'मध्ये तयार झालेले कॅमशाफ्ट्स चीनला निर्यात केले जात होते. चीन सरकारच्या नियमाप्रमाणे त्यांच्या देशात कोणतंही उत्पादन जास्तीत जास्त दोन वर्षं आयात करता येतं. त्यानंतर त्या उत्पादनाचा कारखाना चीनमध्ये उघडावाच लागतो. कारखाना सुरू करताना चीनमधला स्थानिक भागीदार घेणंही बंधनकारक असतं. त्यायोगे ‘प्रिसिजन'ने २०११ साली ‘शेंगलाँग ऑटोमोटिव्ह' या चिनी कंपनीसोबत भागीदारी करून चीनमध्ये कारखाना सुरू केला. २०११ मध्ये मशिन शॉप सुरू झालं. आणि २०१३ मध्ये फाउंड्री सुरू झाली. तो कारखाना जवळजवळ २०१८ पर्यंत चालू होता. त्यानंतर प्रिसिजनने या जॉईंट व्हेंचरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

२०१६ ते २०१८ या दोन-तीन वर्षांत ‘प्रिसिजन'मध्ये आणखीही महत्त्वाच्या घटना घडल्या. कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाली. एन.एस.ई. आणि बी.एस.ई. अशा दोन्ही ठिकाणी गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कंपनीत खेळता पैसा आला. त्याद्वारे आणखी विस्तार आणि आधुनिकीकरण करता आलं. ते झाल्यानंतर नाशिकची ‘मेमको' नावाची इंजिनियरिंगमधली कंपनी ‘प्रिसिजन'ने विकत घेतली. हे घडत असतानाच जर्मनीची ‘एम.एफ.टी.' आणि नेदरलँडची ‘इमॉस' नावाची कंपनीही ‘प्रिसिजन'ने विकत घेतली. भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारे हे सोलापुरी षट्कार होते. 

हेही वाचा - अस्सल देशी शेफ : विष्णू मनोहर

‘इमॉस' कंपनीच्या खरेदीने ‘प्रिसिजन'ला एका वेगळ्या उंचीवर नेलं. कारण त्या कंपनीचा व्यवसाय वेगळा होता. कोणत्याही प्रवासी गाड्यांचं किंवा ट्रकचं ‘रेट्रोफिटिंग' करण्याचं काम (गाड्यांचं डिझेल इंजिन बदलून ती गाडी इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करणं) ही कंपनी करत होती. ‘इमॉस'मुळे हे तंत्रज्ञान ‘प्रिसिजन'ला मिळालं. या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘प्रिसिजन'ने भारतात रेट्रो फिटेड इलेक्ट्रिक व्हेइकल्स बनवण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली आहे. त्यात भारतातली पहिली ‘मिड साइज बस' नुकतीच बनवली आहे. यापुढे लाइट कमर्शिअल व्हेइकल (ई-एलसीव्ही) बनवण्यावर भर असेल. युरोपातलं आणि भारतातलं हवामान खूपच वेगळं असल्यामुळे इमॉसच्या तंत्रज्ञानामध्ये आवश्यक ते बदल केले जात आहेत. ‘प्रिसिजन'च्या ई-एलसीव्ही गाड्यांना भारतातच मोठं मार्केट आहे. 

इलेक्ट्रिक इंजिनवर चालणाऱ्या गाड्या बनवणं हा ‘प्रिसिजन'साठी फक्त व्यवसाय नाही. वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून या विजेवरच्या गाड्यांकडे पाहिलं जात आहे. म्हणून चाचणी पातळीवर सोलापूर महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवर सध्या काम चालू आहे. 

‘प्रिसिजन'मध्ये सध्या दर महिन्याला १० लाख कॅमशाफ्ट्स बनतात. भारतातले आणि जगातले वाहन क्षेत्रांतले सर्व प्रमुख ब्रँड्स आज ‘प्रिसिजन'चे ग्राहक आहेत. जागतिक बाजारपेठेतही कॅमशाफ्ट्सच्या बाबतीत या कंपनीची मक्तेदारी आहे असं म्हणायला हरकत नाही. कंपनीची सध्याची वार्षिक उलाढाल ७५० कोटी रुपये आहे. कंपनीत १८०० कर्मचारी काम करतात. अपवाद म्हणून पाच-सहा सोडले तर सर्वच्या सर्व कर्मचारी सोलापूर जिल्ह्यातलेच आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी एरवी पोटासाठी पुणे किंवा मुंबईत स्थलांतर केलं असतं ते सगळे प्रिसिजनच्या अंगणात सुखाने नांदत आहेत. नांदत आहेत म्हटलं, कारण या कंपनीत बाहेरच्या कामगार पुढाऱ्यांची युनियन नाही. आपले प्रश्न, मागण्या यांसाठी यतिन आणि सुहासिनी शहा यांच्यासमवेत कामगार प्रतिनिधी चर्चा करतात. चर्चेदरम्यान वादविवाद जरूर होतात, पण त्यामध्ये ताण नसतो. मालक आणि कामगार एकमेकांकडे परिवाराचे सदस्य म्हणून पाहतात. कामगार संघटनांसोबतच्या वादांमुळे सोलापुरातल्या अनेक गिरण्या बंद पडल्याचं सांगितलं जातं. त्याच सोलापुरातला हा सुसंवाद बरंच काही सांगून जाणारा आहे. 

असाच सुसंवाद यतिन आणि सुहासिनी यांच्या वैयक्तिक आयुष्यातही दिसतो. लग्न झालेल्या कोणत्याही दांपत्याविषयी ‘मेड फॉर इच अदर' असं म्हणण्याची पद्धत आहे; पण यतिन आणि सुहासिनी यांनी त्यांच्या जगण्यातून या विधानाला वेगळा आशय प्राप्त करून दिला आहे. तसं पाहता यतिन हे एका व्यावसायिक कुटुंबात जन्माला आलेले आणि कॉमर्स व व्यवस्थापनात शिक्षण घेतलेले आहेत. सुहासिनी पूर्वाश्रमीच्या चितळे. त्यांचे आई-वडील सोलापुरातले प्रख्यात डॉक्टर आहेत. आई-वडिलांप्रमाणे सुहासिनी यांनी मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यात सुवर्णपदकही मिळवलं. त्यांची आणि यतिन यांची भेट बॅडमिंटनच्या कोर्टवर झाली. ओळखीचं रूपांतर आधी मैत्रीत झालं आणि दोघांनी १९८८ साली प्रेमविवाह केला. लग्नानंतर दोघांनी एकत्रितपणे काही तरी व्यवसाय करावा असा त्यांचा विचार होता. यतिन यांना डॉक्टर होणं शक्य नव्हतं. त्यामुळे सुहासिनी यांनी यतिन यांचा व्यवसाय जॉइन करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाची म्हणजे ‘प्रिसिजन'ची गरज म्हणून त्याआधी एलएल.बी. झाल्या आणि मग अहमदाबादच्या आय.आय.एम.मधून त्यांनी व्यवस्थापनाचा कोर्सही केला. यतिन कंपनीचं उत्पादन आणि जगभरचं मार्केटिंग सांभाळतात, तर सुहासिनी कंपनीची कायदेशीर बाजू आणि कामगार कल्याणाची बाजू पाहतात. दोघांचे विचार आणि काम परस्परपूरक असल्याने कंपनीची वाढ अनेक पटींनी अधिक होते आहे. 

हेही वाचा - पितांबरी : कोटींच्या उड्डाणाची गोष्ट

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिकसारखे काही जिल्हे वगळले तर महाराष्ट्रात म्हणावी तशी उद्योजकता वाढलेली दिसत नाही. काही अपवाद वगळता बहुतांश जिल्हे उद्योजकतेच्या बाबतीत दुष्काळीच आहेत. सूतगिरण्या बंद पडल्यानंतर सोलापूरचं नावही याच यादीत लिहिलं जात होतं; पण ‘प्रिसिजन'च्या यशामुळे सोलापूरच्या औद्योगिक विकासाला पुन्हा एकदा पालवी फुटली आहे. आपल्याकडेही जागतिक दर्जाची कंपनी तयार होऊ शकते, असा आशावाद ‘प्रिसिजन'ने महाराष्ट्रभर जागवला आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्राच्या आर्थिक असमतोलाबद्दल चिंता वाटते आणि मागास जिल्ह्यांचा अनुशेष भरून निघाला पाहिजे असं वाटतं त्या सर्वांना ‘प्रिसिजन'ने एक नवा विकासमार्ग दाखवला आहे. ‘प्रिसिजन'च्या जागतिक यशाचा महाराष्ट्रापुरता संदर्भ हा असा आहे. ©

‘प्रिसिजन फाउंडेनशन'चं योगदान
‘कारखाने हे फक्त वस्तूंच्या उत्पादनांसाठी नसतात तर सामाजिक परिवर्तनाचे वाहकही असतात' ही धारणा घेऊन टाटांपासून किर्लोस्करांपर्यंत अनेक कंपन्या काम करत असतात. ‘प्रिसिजन फाउंडेशन' ही या परंपरेशी नातं सांगणारी संस्था आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, सामाजिक बदल आणि कला-साहित्य अशा माध्यमांतून ही संस्था काम करते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग, लघुविज्ञान केंद्र, लैंगिक शिक्षण, वाचनाची गोडी निर्माण करणारा ‘पासवर्ड प्रकल्प' इथपासून ते शास्त्रीय संगीताची ओळख करून देणाऱ्या ‘बैठक'पर्यंत अनेक प्रकल्प संस्थेतर्फे राबवले जातात. आरोग्य क्षेत्रातही त्यांची कामं सुरू आहेत. गरीब रुग्णांना डायलिसीस मशिन्स उपलब्ध करून देणं, सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटर्स उभारून देणं, ही त्यांतली काही उदाहरणं. शाश्वत विकासासाठी पाणीपुरवठा योजना, सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातात. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांना भरीव रकमांचे पुरस्कार दिले जातात. तसंच शहराच्या सांस्कृतिक भरण-पोषणासाठी शास्त्रीय संगीताच्या मैफली आणि साहित्यिक चर्चांसाठी मान्यवरांच्या ‘प्रिसिजन गप्पा' आयोजित केल्या जातात. या सगळ्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये ‘प्रिसिजन फाउंडेशन'ची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण झाली आहे. सुहासिनी शहा या फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतात. 

(अनुभव, एप्रिल २०२३च्या अंकातून साभार)

आनंद अवधानी

आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results