आम्ही कोण?
काय सांगता?  

दीर्घायुषी जपानी कंपन्या

  • आनंद अवधानी
  • 25.03.25
  • वाचनवेळ 1 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
japaneese company

दीर्घायुषी कंपन्या हे जपानचं खास वैशिष्ट्य आहे. तिथे शंभराहून अधिक वर्षं व्यवस्थित चालू असलेल्या हजारो कंपन्या आहेत. त्यांतल्या बाराशे कंपन्यांचं वय दोनशे वर्षांहून अधिक आहे. इतकंच नाही, तिथे पाचशे वर्षांहून अधिक काळ चालू असलेल्या तीस कंपन्या आहेत. एक हजारांहून अधिक वर्षं चालू असलेल्याही पाच कंपन्या आहेत. त्यातल्या एका कंपनीचं वय तर चौदाशे वर्षं इतकं आहे. आता बोला!

सातत्याने बसत आलेला आर्थिक मंदीचा फटका, हिरोशिमा-नागासाकी बॉम्बहल्ले, अमेरिकेने जपानची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी केलेले प्रयत्न पाहता इतर देशांपेक्षा जपानमध्ये कंपन्या चालवणं आणि एवढा दीर्घकाळ चालवणं हे अधिक कठीण होतं. पण जपानी उद्योजकांनी आत्मविश्वास, स्वत:च्या सहकार्‍यांवरचा, ग्राहकांवरचा आणि पुरवठादारांवरचा विश्वास याच्या बळावर एवढी मजल मारली. यासोबतच काटेकोरपणा, शिस्त आणि काटकसर ही त्रिसूत्रीही महत्वाची होती. जगात व्यवस्थापन शास्त्र अजून विकसित व्हायचं होतं तेव्हापासून कित्येक जपानी उद्योगसमूहांनी त्या विचारधारेने काम सुरू केलं होतं.

कोणत्याही खाजगी कंपनीचं महत्त्वाचं उद्दिष्ट नफा मिळवणं हे असतं, यात शंका नाही. पण जपानमध्ये अनेक दीर्घायुषी कंपन्यांनी आर्थिक नफा आणि राष्ट्रहित यांची सांगड घातलेली दिसते. ही खास जपानी औद्योगिक संस्कृती म्हणायला हवी.

इतक्या लहानशा देशात असं वातावरण कुठून निर्माण झालं असेल? विचार करण्याजोगी गोष्ट आहे...

आनंद अवधानी

आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results