
विष्णू मनोहर हे मराठी खाद्यपदार्थांचे ग्लोबल ब्रँड अम्बेसॅडर आहेत. जागतिकीकरणानंतर भारतात चिनी, मेक्सिकन, थाई आणि इटालियनसारख्या परदेशी पदार्थांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. या भाऊगर्दीत पारंपरिक मराठी पदार्थांची चव ठळक करण्याचं काम विष्णू मनोहर करत आहेत. ‘विष्णूजी की रसोई’सारखी उपाहारगृहं, टीव्हीवरचे रेसिपी शोज किंवा ऑनलाइन कार्यक्रमांतून ते मराठी पदार्थांचं ध्रुपद आळवत आहेत. नुकतीच त्यांनी अमेरिकेत मराठी खाद्यपदार्थांची क्लाऊड किचन्स सुरू केली आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...
अमेरिकेत मराठी क्लाऊड किचन्स सुरू केली, म्हणजे नेमकं काय?
अमेरिकेत कामानिमित्त गेलेल्या किंवा स्थायिक झालेल्या मराठी मंडळींना रोज स्वयंपाक करण्यासाठी वेळ नसतो. त्यातही मराठी किंवा गुजराथी स्वयंपाक करायला जरा जास्त वेळ लागतो. तुलनेने पंजाबी पदार्थ कमी वेळात होतात. त्यामुळे मराठी जेवणाची सवय असतानाही नाईलाजाने पंजाबी पदार्थ बनवले जातात. यावर उपाय म्हणून मराठी पदार्थांचं किचन सुरू करण्याचा निर्णय मी घेतला.
ही क्लाऊड किचन्स तिथे कोण चालवतं?
अमेरिकेत क्लाऊड किचन्स चालवणार्या कंपन्या असतात. त्या कंपन्यांनी अनेक ग्राहक बांधलेले असतात. त्यांना स्वयंपाक करून देणारी केंद्रं हवी असतात. मी नेमकी इथेच संधी हेरली. महाराष्ट्रातून अमेरिकेत गेलेली महिला व्यवसाय म्हणून २५-३० लोकांचा स्वयंपाक करू शकते. त्यांना स्वयंपाकाचा व्यवसाय करायची इच्छा असते, पण त्यासाठी लागणारं भांडवल त्यांच्याकडे नसतं. अशा महिलांना आम्ही काही पदार्थांच्या रेसिपीज दिल्या. ते पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली. त्या महिला रोज स्वयंपाक करतात आणि क्लाऊड किचन चालवणार्या कंपन्या ते अन्न ग्राहकांपर्यंत नेऊन पोचवतात. यात दुहेरी फायदा झाला. मराठी पदार्थ बनवता येणार्या कुटुंबांना उद्योजकतेची संधी मिळाली आणि अनेक मराठी लोकांना दोन वेळचं मराठी जेवण मिळू लागलं.
या क्लाऊड किचन्सना कोणकोणते पदार्थ पुरवले जातात?
आपल्या रोजच्या जेवणातीलच पदार्थ किचनमध्ये शिजवले जावेत असा माझा विचार होता. त्यानुसार झुणका भाकरी, पिठलं भात, मसाला वांगी, खमंग काकडी, पाटोडी रस्सा, कटाची आमटी, गोळाभात, कोथिंबीर वडी, पंचामृत वांगी, पुरण पोळी, खवा पोळी, उकडीचे मोदक, साबुदाणा वडा, वडा-पाव, मिसळ-पाव, थालीपीठ, दडपे पोहे आणि अगदी वरण-भातासारखे मराठमोळे पदार्थ आहेत. रोज तेच तेच पदार्थ खाऊन लोकांना कंटाळा येतो. त्यामुळे अदलून-बदलून या यादीतील पदार्थ केले जावेत, असं मी सुचवत असतो.
सध्या अशी किती क्लाऊड किचन्स सुरू झाली आहेत?
आत्तापर्यंत पंचवीस सुरू झाली आहेत आणि व्यवस्थित चालू आहेत. प्रत्येक किचनमार्फत किमान पंचवीस व्यक्ती जेवतात असं मानलं तर सध्या सव्वासहाशे अमेरिकास्थित मराठी बांधव या जेवणाचा दररोज आस्वाद घेत आहेत, असं म्हणायला हरकत नाही. पण एकूण अमेरिकेचा आकार पाहता या उपक्रमाला आणखी प्रचंड वाव आहे. मुख्य म्हणजे मी हा उपक्रम पैसे मिळवण्यासाठी सुरू केला नसून यातून मराठी खाद्यसंस्कृतीचा प्रसार व्हावा आणि तिथल्या मराठी माणसांना रोज मराठमोळं जेवण मिळावं, असा माझा हेतू आहे. अमेरिकेसोबतच संपूर्ण युरोप आणि इतर देशांमध्येही या उपक्रमाची गरज असल्यामुळे त्या दिशेने मी काम सुरू करतो आहे.
अमेरिकेत जाऊन डोसे बनवण्याचा विक्रम करण्यामागे आपला काय विचार आहे?
तो विक्रम मी करणार आहे हे जरी खरं असलं तरी त्यामागची कल्पना माझी नाही. ‘अमेरिकन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’या कंपनीने मला त्यासाठी पाचारण केलं. आजवर त्यांच्यामार्फत अनेक प्रकारचे विक्रम केले गेले आहेत. पण खाद्यपदार्थांशी संबंधित विक्रम झालेला नाही. त्यासाठी त्यांनी माझ्याकडे विचारणा केली. पूर्वी मी नागपूरमध्ये सलग चोवीस तासांत चौदा हजार डोसे बनवण्याचा विक्रम केला होता. माझाच विक्रम मी मोडायचा ठरवलं आहे. ‘अमेरिकन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’साठी मी सलग चोवीस तासांत पंधरा हजार डोसे करणार आहे. हा विक्रम येत्या २७ सप्टेंबरला टेक्सास शहरामध्ये साकारला जाणार आहे. या उपक्रमामुळे डोसा या भारतीय पदार्थाची अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल आणि आपल्या ‘मराठी क्लाऊड किचन्स’च्या उपक्रमालाही त्याचा उपयोग होईल, असं मला वाटतं.
अमेरिकेत तुम्ही आधीपासून काही मराठी रेस्टॉरंटस् चालवत आहातच...
कोरोना साथीच्या आधीपासून मी अमेरिकेत ‘विष्णूजी की रसोई’ या नावाने काही उपहारगृहं चालू केली. आधी मला असं सांगण्यात आलं होतं, की अमेरिकेत मांसाहारी पदार्थ असल्याशिवाय उपाहारगृह चालू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला मी तसे ते ठेवलेही होते. नंतर प्रयोग म्हणून एक महिना फक्त शाकाहारी पदार्थ ठेवून पाहिले. तर गल्ला आधीच्या महिन्याइतकाच गोळा झाला. मग मात्र मांसाहारी पदार्थ पूर्णपणे बंद केले.
पुणे-लातूर-नागपूर-अमरावतीच्या ‘विष्णूजी की रसोई’पेक्षा अमेरिकेतल्या या उपहारगृहांमध्ये काही वेगळेपण आहे का?
वेगळेपण तर नक्कीच आहे. आपले नेहमीचे मराठी पदार्थ अमेरिकेत वेगळ्या पद्धतीने सादर करावे लागतात, असं माझ्या लक्षात आलं. आपल्या झुणका-भाकरीचं उदाहरण घ्या. आपल्याकडे एका ताटात भाकरी, शेजारी झुणका आणि कडेला कांदा- लिंबू ठेवून ग्राहकांना दिलं जातं. अमेरिकेत आम्ही भाकरी छोट्या करतो. त्याचा पापुद्रा थोडा उघडून त्यात झुणका घालतो. कांदा-काकडी-लिंबू त्या शेजारी ठेवतो. या सगळ्यात कोणती पोषणमूल्यं मिळतात याचा कागद सोबत जोडतो आणि या सगळ्याला ‘इंडियन कॉटेज सँडविच’ असं नाव देतो. या डिशला तिथले ग्राहक आनंदाने दहा डॉलर्स देतात. विशेष म्हणजे या ग्राहकवर्गात अमेरिकन आणि युरोपियनही असतात.
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.