सध्याच्या काळात राजकीयदृष्ट्या दोन तत्त्वज्ञानं महत्त्वाची ठरतात. एक म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या मार्गाने आलेलं लोकशाहीचं तत्त्वज्ञान आणि दुसरं कम्युनिस्ट क्रांती आणि त्यामागचं आर्थिक समानतेचं तत्त्वज्ञान. या दोन्ही तत्त्वज्ञानांशी असलेला युवकांचा संबंध पाहिला की युवक आणि राजकारण हे नातं किती गहन आहे हे लक्षात येतं.
फ्रेंच राज्यक्रांतीपासून सुरुवात केली तरी कोंडी, फ्रस्ट्रेशन, युवक, आदर्शवाद आणि चळवळ अशीच मालिका दिसेल. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्समध्ये लोकसंख्या वाढली होती, शिक्षित नवयुवक वर्ग निर्माण झाला होता; परंतु सर्व नोकऱ्या आणि पदं उमराववर्गाकडे होती. या नव्या वर्गाची प्रगती कशी व्हावी? ही कोंडी फोडण्यासाठी ‘सर्व मानवजात एक आहे' हा आदर्शवाद उभा राहिला. या मूळ तत्त्वाचा आधार घेऊन स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्त्वं पुढे आली. फ्रेंच राज्यक्रांतीचे नेतेदेखील अगदी तरुण होते. रोबझस्पिय ३१ वर्षांचा होता, दाँताँ २९ वर्षांचा होता, साँ जूस्त २१ वर्षांचा होता आणि नेपोलियन तर केवळ १९ वर्षांचा होता. या सर्व राजकीय संवेदना मुख्यत्वेकरून फ्रेंच राजकीय तत्त्वज्ञ ज्याँ जाक रूसो याच्या तत्त्वज्ञानातून फ्रेंच युवकवर्गात पसरत गेल्या होत्या. रूसोने आपल्या तत्त्वज्ञानाची बांधणी सुरू केली तेव्हा रूसो होता ३७ वर्षांचा!
जी गोष्ट फ्रेंच राज्यक्रांतीने निर्माण केलेल्या लोकशाहीच्या आदर्शांची, तीच गोष्ट कार्ल मार्क्स आणि फ्रिडरिश एंगल्स यांनी कम्युनिस्ट मॅनिस्फेस्टो लिहून निर्माण केलेल्या आर्थिक समतेच्या आदर्शाची. मार्क्स आणि एंगल्स यांनी १८४८ साली कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला तेव्हा मार्क्स होता २९ वर्षांचा आणि एंगल्स होता २७ वर्षांचा.
आपल्याकडेही महात्मा फुल्यांनी स्त्रीशिक्षणाची चळवळ सुरू केली तेव्हा ते २१ वर्षांचे होते. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल काढलं तेव्हा टिळक आणि आगरकर २३ वर्षांचे होते. या दोघांनी मिळून केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं सुरू केली, तेव्हा ते २४ वर्षांचे होते. फुल्यांनी सनातन धर्माने केलेली सामाजिक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, तर टिळक आणि आगरकर यांनी इंग्रज सरकारने केलेली राजकीय आणि शैक्षणिक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पुढे आगरकर समाजिक चळवळीमध्येही उतरले. महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत आपली सिव्हिल राइट्सची चळवळ सुरू केली तेव्हा तेही २४ वर्षांचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपली ‘अभिनव भारत' ही संघटना २०व्या वर्षी स्थापन केली आणि २३व्या वर्षी ‘फ्री इंडिया सोसायटी' स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक' हे वृत्तपत्र काढलं तेव्हा ते २८ वर्षांचे होते आणि ‘बहिष्कृत हितकारिणी' सभा काढली तेव्हा ३३ वर्षांचे होते. गांधीजींनी राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, सावरकरांनी सुरुवातीच्या काळात वीररसाचा अवलंब करून राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, तर डॉ. आंबेडकरांनी राजकीय, सामाजिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि धार्मिक अशा अनेक प्रकारच्या कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.
युवावस्थेत सुरुवात करून हे सर्व भारतीय नेते पुढे प्रौढ आणि मूलभूत क्रांतीचे उद्गाते बनले, समाज बदलवून टाकणारे महात्मे आणि युगपुरुष बनले. परंतु ही उन्नत अवस्था सगळ्याच युवक चळवळीच्या नेत्यांना गाठता येत नाही. अनेक युवक चळवळी आणि युवक नेतेही चांगली सुरुवात करून ‘बर्नआऊट' होतात, किंवा ज्या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड पुकारलेलं असतं त्या व्यवस्थेमध्येच विलीन होऊन जातात. काय फरक असतो यशस्वी युवक नेत्यांमध्ये आणि पुढे बर्नआऊट होणाऱ्या किंवा व्यवस्थेसमोर हात टेकणाऱ्या नेत्यांमध्ये?
महात्मे आणि युगपुरुष कुठल्या ना कुठल्या महान आयडियालॉजीमध्ये, म्हणजे विचारप्रणालीमध्ये आपली पाळंमुळं खोलवर रोवून उभे असतात. फुटकळ नेते तात्कालिक प्रश्नावर किंवा असंतोषावर किंवा कुठल्या तरी तात्कालिक अन्यायाला प्रतिक्रिया म्हणून उभ्या राहिलेल्या संतापावर चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचा - कॉक्रोच आंदोलनामुळे निर्माण झालेले प्रश्न
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचा अभ्यास केला तर लक्षात येतं, की त्यांनी केवळ जातीय अन्याय आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात चळवळी उभ्या केल्या नाहीत. त्यांनी समाज, इतिहास आणि धर्म यांचा वर्षानुवर्षं अभ्यास केला. त्यांच्या रचनेतील दोष शोधले. जातिव्यवस्थेची संरचना समजून घेतली. हा सगळा अभ्यास आणि वैयक्तिक अनुभव यांच्या आधारावर सिद्धांत मांडले आणि चळवळी उभ्या केल्या. महात्मा गांधी यांनी आध्यात्मिक आदर्शांचं चिंतन केलं. या आदर्शांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण्यातच मानवजातीचं अंतिम हित कसं आहे हे समजून घेतलं. या अभ्यासातून निर्माण झालेल्या ‘इनसाइट'वर सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या विचारप्रणालीची मांडणी केली. लोकमान्य टिळकांनी नुसताच ब्रिटिश विरोधाचा आततायीपणा केला नाही. त्यांनी गीतारहस्य लिहून राजकीय कर्मयोगाची मांडणी केली, शिवजयंती आणि गणेशोत्सव अशा धार्मिक आणि ऐतिहासिक उत्सवांना प्रोत्साहन दिलं. त्यायोगे समाज बांधला आणि त्या आदर्शांच्या इमल्यावर स्वातंत्र्याची चळवळ उभी केली.
या सर्व युवक नेत्यांमध्ये तत्त्वज्ञानाची बीजं होती म्हणूनच ते टिकून राहिले. त्याशिवाय परिस्थितीचं, त्यातील बदलांचं, मानवी भावभावनांचं ज्ञान आणि त्यानुसार स्वतःला बदलण्याची क्षमता तयार झाली तरच युवक नेते प्रौढ नेत्यांमध्ये विकसित होतात. खरं तर समाजाचा आणि राजकारणाचा तोल ढासळलेला आहे हे समाजाला कुठे ना कुठे कळत-नकळत का होईना, जाणवलेलं असतं. त्यामुळेच तो तोल सावरण्यासाठी समाज युवक नेत्यांना पाठिंबा देत असतो. पण जुन्या व्यवस्थेबद्दल राग असला तरी सूडामध्ये वाहवत जायचं नसतं हे युवक नेत्यांना कळावं लागतं. काहीही झालं तरी समाजाला तोल महत्त्वाचा वाटत असतो, सूड नव्हे, हे भान युवक नेत्यांना ठेवायला लागतं.
युवक नेत्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे लहान वयात त्यांच्या हातात कुठल्या ना कुठल्या प्रकारची सत्ता येते. ही सत्ता हाताळणं आणि भ्रष्टाचाराच्या आहारी न जाणं साधलं नाही तर बहुतेक वेळा अपरिपक्व युवक नेते बदनाम होऊन बाजूला फेकले जातात. थोडक्यात सांगायचं, तर तत्त्वज्ञानाचा आणि त्या तत्त्वज्ञानाशी असलेल्या निष्ठेचा पाया नसेल तर युवक चळवळ विरून जाते. वर उल्लेख केलेल्या नेत्यांचं अन् विचारवंतांचं तत्त्वज्ञान, त्यांचे मार्ग आपल्याला पटोत न पटोत, परंतु हे सर्व लोक आपापल्या तत्त्वज्ञानाशी निष्ठा ठेवून होते आणि त्यासाठी या सर्वांनी हालअपेष्टा भोगल्या हे नाकारता येत नाही.
या टप्प्यावर मनात प्रश्न उभा राहतो, की एवढ्या महत्त्वाच्या चळवळी तरुण वयातच का उभ्या राहत असाव्यात? याचं उत्तर शोधायचा प्रयत्न शरीरशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ सातत्याने करत आलेले आहेत. युवक प्रौढ व्यक्तींपेक्षा जास्त आदर्शवादी असतो याचं कारण मेंदूच्या विकासप्रक्रियेत दडलेलं असतं. मानवी मेंदू हळूहळू विकसित होत जातो. काही भाग लवकर विकसित होतात, काही भाग उशिरा. भावना हाताळणारा मेंदूचा भाग लवकर विकसित होतो. त्यामुळे युवक समाजाशी सहानुभूतीच्या भावनेने जोडला गेलेला असतो. परंतु, याच वेळी मेंदूचा माणसाला दूरदृष्टी प्राप्त करून देणारा भाग पूर्ण विकसित झालेला नसतो. लाँगटर्म प्लॅनिंग, धोके लक्षात घ्यायची क्षमता, विरोधी विचार लक्षात घेऊन समतोल विचार करण्याची क्षमता, अशा गोष्टी हाताळणारा भाग उशिरा विकसित होतो. यामुळे युवक अत्यंत पॅशनेटली आदर्शवादी बनलेला असतो आणि त्यासाठी मोठे मोठे धोकेसुद्धा पत्करत असतो.
युवकाच्या आदर्शवादाचं अजून एक समर्पक कारण मानसशात्रज्ञ एरिक एरिकसन यांनी दिलेलं आहे. युवक आयडेन्टिटीच्या शोधात असतो. मी कोण आहे आणि माझी जीवनमूल्यं कोणती, या प्रश्नांचा शोध युवक त्याच्या कळत किंवा नकळत घेत असतो. त्याच वेळी आयुष्यातल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळेही त्याच्या मनात गोंधळ उडालेला असतो. मी कुणाचा तरी मुलगा/ मुलगी आहे, मी विद्यार्थी आहे, नागरिक आहे- अशा अनेक भूमिका. यातल्या कुठल्या भूमिकेला कधी आणि किती महत्त्व द्यायचं याविषयी युवकाच्या मनात गोंधळ उडालेला असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर युवकाची ओळख कुठल्या तरी आयडियालॉजीशी होते. लोकशाही, कम्युनिझम, हिंदुत्ववाद अशा अनेक आयडियालॉजीज समाजात विद्यमान असतात. या आयडियालॉजीज त्याला रेडिमेड सुसंगती देतात. त्याच्या मनातल्या गोंधळाला उत्तरं देतात. गोंधळ निस्तरतात. रेडिमेड विचार, रेडिमेड मूल्यं! ही आयडियालॉजी नीतिमत्तेची दिशा दाखवणारं होकायंत्र आणि समविचारी मित्र-मैत्रिणीही देतात. युवकाची आयडेंटिटीची तहान इथे बहुतांशी पूर्ण केली जाते. त्याच्या मनात घोंघावणारा आयडेंटिटीचा क्रायसिस शांत होतो आणि युवक अत्यंत पॅशनेटली या आयडियालॉजीशी अटॅच होतो.
हेही वाचा - रॅप, ऑपेरा आणि स्टँडअप – आंबेडकरांचा विचार मांडणारी सर्जनशील तरुणाई
इथे आपल्या मनात प्रश्न उभा राहतो की महात्मा फुले, टिळक, आगरकर, महात्मा गांधी, डॉ आंबेडकर किंवा सावरकर यांनाही ही आयडेंटिटीची लढाई लढूनच पुढे महान नेतेपणाच्या पायऱ्या चढत जावं लागलं की हे नेते तत्त्वज्ञानाची परिपक्वता घेऊनच जन्माला आलेले होते?
एरिक एरिकसनचा ‘गांधीज ट्रूथ' नावाचा १९६९ साली लिहिलेला एक प्रसिद्ध निबंध आहे. गांधीजींच्या तारुण्यातील आयडेंटिटीच्या लढाईचं एका महान मानसशास्त्रज्ञाने केलेलं चित्रण. एका युवकाच्या आयडेंटिटीच्या सामान्य लढाईमधून असामान्यत्व कसं तयार होत जातं हे त्यातून कळतं. गांधीजींच्या मनात एक युवक म्हणून असुरक्षिततेची भावना होती. मुंबई हायकोर्टात निर्भीडपणे बोलणंही त्यांना अशक्य होऊन बसलं होतं. त्यापूर्वी लंडनमध्ये त्यांनी पूर्ण ब्रिटिश जंटलमन बनण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण ब्रिटिश पेहराव धारण केल्यावरही त्यांच्या आतली पोकळपणाची भावना गेलेली नव्हती. पुढे दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर गांधीजी आयडेंटिटीच्या तिहेरी लढाईत सापडले. एका बाजूला ते सामान्य घर-गृहस्थी करणारे नव्हते, दुसऱ्या बाजूला वर्णद्वेषामुळे त्यांचा ब्रिटिश नागरिक म्हणून स्वीकार होणं अशक्य होतं आणि तिसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेत पोट जाळायला आलेला एक कंत्राटी कामगार म्हणून राहणंही त्यांना अपमानाचं वाटत नव्हतं. त्यातच वर्णद्वेषापोटी पीटरमॅरिट्झबर्ग स्टेशनवर त्यांना रेल्वेमधून खाली उतरवलं गेलं.
एरिक एरिकसन लिहितो, की या सगळ्या वेदनेमधून आणि आयडेंटिटी क्रायसिसमधून गांधीजी मोठे होत गेले, विस्तारत गेले. आपल्या दुःखाच्या अनुभवातून त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाने दबून गेलेल्या समस्त भारतीयांचं दुःख कवेत घेतलं. त्यातून त्यांचा राजकीय संघर्ष सुरू झाला. आपल्या आयडेंटिटी क्रायसिसमध्ये एक व्यक्तिमत्त्व म्हणून विखरून जायचं; निराशेच्या, अर्थहीनतेच्या, असमाधानाच्या आणि व्यसनांच्या गर्तेत जायचं की संघर्ष करून त्या मुशीतून तळपून वर यायचं, असं द्वंद्व त्यांच्यासमोर होतं. त्यात गांधीजींनी विस्तारत जायचा मार्ग स्वीकारला. त्यांच्याकडे प्रामाणिकपणा होता, निश्चय होता आणि वैराग्य होतं. या गुणांच्या आधारावर त्यांनी सत्याग्रही संघर्षाची नवी जीवनदृष्टी प्राप्त केली. ‘एक असुरक्षित युवक ते एक निर्भय महात्मा' असा केवळ राजकीयच नव्हे तर आध्यात्मिक प्रवासदेखील पूर्ण केला.
एरिक एरिकसन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं असं चित्र काढलेलं नाही. परंतु वर्गात सगळ्यात हुशार असलेल्या बाबासाहेबांना वेगळं बसवलं गेल्यामुळे आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाला असणार. हुशारी महत्त्वाची की सामाजिक प्रतवारी, असं द्वंद्व तयार झालं. समाजातल्या अस्पृश्यतेच्या अनुभवामुळे हे द्वंद्व आणखी गहिरं होत गेलं. पुढे कोलंबिया आणि लंडनमध्ये त्यांना समानतेने, माणुसकीने आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे अत्यंत आदराने वागवलं गेलं. या दोन विरोधी अनुभवांमुळे त्यांचं तत्त्वचिंतन सुरू झालं. पुढे जगातील सर्वाधिक मानाच्या विश्वविद्यालयांमधून पीएच डी प्राप्त करून आल्यावरदेखील बडोद्याला जेव्हा उच्चवर्णीय शिपायाने त्यांच्या टेबलावर फायली फेकल्या, तेव्हा हा प्रश्न सोडवायलाच पाहिजे, असा निश्चय त्यांच्या मनात तयार झाला. आरामदायी आयुष्य बाजूला ठेवून त्यांनी अस्पृश्यतेविरोधात लढा सुरू केला. २८व्या वर्षी ‘मूकनायक' हे विचारपत्र स्थापलं, ३५व्या वर्षी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आपल्या आयडेंटिटी क्रायसिसच्या निमित्ताने त्यांनी एका विराट युगपुरुषाची आयडेंटिटी धारण केली. संपूर्ण भारतातील पददलित समाजाला स्वतःची अशी स्वाभिमानी ओळख करून दिली.
थोडक्यात, भावनांच्या नाट्यपूर्ण लढाईमधून तत्त्वज्ञानाचा पाया भक्कम होत जाणं, ही प्रक्रिया सर्व मोठ्या नेत्यांच्या बाबतीत दिसून येते. तत्त्वज्ञानाचा पाया भक्कम नसेल तर सत्ता आत्मप्रीती वाढवते आणि नेता सर्वार्थाने भ्रष्ट होऊन अवनत होत जातो.
युवक आणि राजकारण यांचा विचार करताना युवकांच्या हौतात्म्याच्या ओढीचादेखील विचार व्हायला हवा. चापेकर बंधू, सावरकर आणि भगतसिंग ही तीन उदाहरणं या दृष्टीने बघण्यासारखी आहेत.
हेही वाचा - आपल्या लोकप्रतिनिधींना तरुणांच्या रोजगाराची पडली आहे की नाही?
चापेकर बंधू, सावरकर आणि भगतसिंग यांच्या मनात आयडेंटिटीची कुठलीही लढाई नव्हती. याला एरिकसन ‘आयडेंटिटी फोरक्लोजर' म्हणतो. ‘आयडेंटिटी फोरक्लोजर' म्हणजे आयडेंटिटीचं आधीच अस्तित्वात असलेलं मॉडेल स्वीकारून लवकर संपवलेला आयडेंटिटीचा शोध. अशा लोकांना कृती जास्त महत्त्वाची वाटते. चापेकर बंधूंनी सनातनी भारतीय धार्मिक संस्कृतीचे आणि तिच्या महानतेचे आपण रक्षक आहोत, ही आयडेंटिटी स्वीकारली होती, सावरकरांनी स्वतःला मॅझिनीच्या सशत्र राष्ट्रवादाचं पाईक मानलं होतं आणि भगतसिंग यांनी आपण एक सुबुद्ध, बुद्धिवादी क्रांतिकारक राष्ट्रवादी आहोत अशी आयडेंटिटी स्वीकारलेली होती. या तिघांच्या आयडेंटिटी आणि काळ वेगळे असले तरी समाजापुढे हौतात्म्याचा आदर्श उभा करायचा हे ध्येय तिघांमध्येही समान होतं.
स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंगांची नौजवान भारत सभा, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली ऑल इंडिया यूथ काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाची ऑल इंडिया यूथ फेडरेशन अशा अनेक युवक चळवळी स्थापन झाल्या. ऑल इंडिया मुस्लिम स्टुडंट फेडरेशन ही निधर्मी विचारांची युवक संघटना १९३७ साली स्थापन झाली. पुढे मुस्लिम लीगच्या प्रभावाखाली तिचे निधर्मी आणि धर्मवादी युवकांमध्ये तुकडे होत गेले.
१९३०च्या दशकात भारतात समाजवादाची स्थापना झाली. कम्युनिझममधील आर्थिक समतेचे विचार फार महत्त्वाचे होते, परंतु त्यातील हिंसक क्रांतीचा विचार लोकशाहीवादी आणि शांततावादी लोकांना पटणारा नव्हता. म्हणून क्रांति वजा आर्थिक समता असा विचार पुढे आला. याला समाजवाद असं नाव पडलं. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना या नव्या विचाराने भुरळ पाडली होती. परंतु भारतातील पहिला समाजवादी पक्ष जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया आणि मिनू मसानी या युवकांनी स्थापन केला. १९३४ साली या लोकांनी ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी' स्थापन केली. ही पार्टी स्थापन केली तेव्हा जयप्रकाश नारायण ३१ वर्षांचे होते आणि राम मनोहर लोहिया २४ वर्षांचे होते. ४४ वर्षांचे आचार्य नरेंद्र देव वयाने वडील असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शक होते. म्हणजे लोकशाही, कम्युनिझम यानंतर उरलेला सोशालिझमही इतर सर्व तत्त्वज्ञानांप्रमाणेच युवकांमुळेच भारतात आला.
स्वातंत्र्यपूर्व युवक नेते अत्यंत इन्टेन्सली आदर्शवादी होते. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर या सगळ्या विविध विचारांच्या आदर्शवादी नेत्यांनी भारतीय संसदेमध्ये निवडून येऊन संसदेमधील कायदे करण्याच्या प्रक्रियेवर आपल्या विचारांची छाप पाडली. हे सगळे युवक रस्त्यावर येऊन आंदोलनं करणारे होते, लोकांच्या सतत संपर्कात राहणारे होते. त्यामुळे या सगळ्यांना लोकांच्या मनाचा सखोल अंदाज होता. हा अनुभव संसदेत काम करताना या सगळ्या लोकांच्या उपयोगाला आला.
हा इतिहास पाहिल्यावर विविध मागण्यांसाठी आणि चर्चा घडवण्यासाठी युवकांनी शांततापूर्ण मार्गांनी रस्त्यावर येत राहणं का महत्त्वाचं मानलं जातं हे आपल्या लक्षात येतं. प्रसिद्ध समाजवादी नेते राम मनोहर लोहिया याच अर्थाने म्हणाले होते, की अगर सड़क खामोश हो गई तो संसद आवारा हो जाएगी!
१९४२च्या आंदोलनात युवकांचा फार मोठा सहभाग होता. शिक्षणावर लाथ मारून लाखो युवक स्वातंत्र्ययुद्धात उतरले. जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया असे युवक नेते या काळात प्रकाशझोतात आले. अरुणा असफ अली, कनकलता बारुआ आणि उषा मेहता, अशा युवती या काळात आशास्थान बनल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे विविध आदर्शांचे संस्कार प्राप्त झालेली ही युवकांची पिढी भारताच्या बांधणीचा आधारस्तंभ बनली. या पिढीच्या आदर्शवादाचा प्रभाव भारताच्या राजकारणावर १९७०च्या दशकापर्यंत कायम राहिला. देश आपल्यासाठी काय करतो आहे याचा फारसा विचार न करता आपण देशासाठी काय करू शकतो, या विचाराने भारावलेले हे लोक होते. ब्रिटिश विरुद्ध आपण अशा भावनेत वाढलेली ही पिढी होती.
हेही वाचा - ‘कॉक्रोच जनता पार्टी’ – जेन झी म्हणतेय ग्राऊंडवर उतरा
परंतु १९६०च्या दशकापर्यंत एक नवी पिढी तयार झाली. नागरिक म्हणून आपल्या हक्कांची जाणीव असलेली पिढी. आपण आणि देश यांच्या दुतर्फा नात्याची जाण असलेली पिढी. तो काळ समतेचा होता. समाजवाद आणि कम्युनिझम या विचारप्रणालींची चलती होती. कम्युनिस्ट पक्षाची ‘ऑल इंडिया यूथ फेडरेशन' ही युवक शाखा १९५९मध्ये स्थापन झाली. समाजवादी पक्षाची ‘समाजवादी युवजन सभा' ही युवक शाखा १९६०च्या दशकात काम करत होती. सामाजिक न्याय हा त्या काळात चलनातील शब्द होता. ब्रिटिश गेल्यावर जमीनदार आणि सावकार हे सामाजिक न्यायाचे नवे शत्रू झाले. त्या शत्रूंना विरोध आणि वाढत्या बेरोजगारीवर तोडगा हे मुख्य मुद्दे होते. भारतातील कम्युनिस्ट पक्षांनी संसदीय लोकशाहीचा मार्ग स्वीकारला होता; परंतु कम्युनिस्ट क्रांतीच्या विचारांनी भारावलेल्या काही पोथीनिष्ठ युवकांनी पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या खेड्यातून सशस्त्र लढा सुरू केला. नक्षलबारीमधून ही चळवळ सुरू झाली, म्हणून याला नक्षलवादी चळवळ म्हटलं जातं. १९६७पासून ही चळवळ सुरू झाली. चिनी कम्युनिस्ट क्रांतीचे नेते माओ झेडाँग यांच्या विचारांनी चारू मजुमदार, कनू संन्याल आणि जानागल संथाल हे युवक प्रभावित झाले होते. सततच्या सशत्र लढ्याच्या मार्गाने सरकारला सळो की पळो करून श्रमिकांचं राज्य आणायचं, असा हा अपरिपक्व विचार होता. गंमत म्हणजे चीनने स्वतः भांडवलशाहीचा मार्ग स्वीकारल्यावरही अनेक दशकं ही ‘माओवादी' चळवळ सुरू राहिली. पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील दुर्गम भागात ही चळवळ गेली साठ वर्षं या ना त्या प्रकारे सुरू राहिली. पण सरकारांनी दीर्घकाळ केलेल्या विकासकामांमुळे या चळवळीला असलेला थोडाफार पाठिंबा ओसरत चालला आहे.
१९७२मध्ये महाराष्ट्रात दलित पँथर ही विद्रोही आणि बंडखोर चळवळ उभी राहिली. नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, अर्जुन डांगळे आणि राजा ढाले हे लोक या युवक चळवळीचे संस्थापक होते. ज्यांनी आंबेडकरी चळवळ पुढे नेणं अपेक्षित होतं, ते रिपब्लिकन पक्षाचे नेते सत्तेच्या राजकारणात गुंतून राहिल्यामुळे कोंडी तयार झाली होती. ती फोडून आंबेडकरी चळवळीला आक्रमक रूप देण्यासाठी ही चळवळ सुरू झाली. या चळवळीने महाराष्ट्राला अत्यंत सकस अशा विद्रोही आणि वैचारिक साहित्याची भेट दिली. दलित पँथरचा काळ मानवतावादी मूल्यांनी आणि सकारात्मक बंडखोरीने समृद्ध झालेला काळ होता. पण ही चळवळही पुढे तग धरू शकली नाही.
याच सुमारास शिवसेनेची प्रतिक्रियावादी ‘लुंगी हटाव, पुंगी बजाव' ही चळवळ गाजली. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत आणि या नोकऱ्या ‘पळवणाऱ्या' लुंगी घालणाऱ्या दाक्षिणात्य लोकांना महाराष्ट्रात स्थान दिलं जाता कामा नये, या मुद्द्यावर ही चळवळ सुरू झाली. यातूनच शिवसेनाप्रणित बाहेरच्या लोकांवर दहशत बसवणारी ‘राडा संस्कृती' जन्माला आली. यातील राडेबाज प्रतिक्रियावादावर आक्षेप घेतले गेले. परंतु, शिवसेना सामान्य युवकांमध्ये लोकप्रिय झाली. पुढे शिवसेनेने मराठी अस्मितेचा मुद्दा बाजूला ठेवून राजकीय विस्तारासाठी हिंदुत्ववादाचा आसरा घेतल्यावर ही चळवळ मागे पडली.
१९७३-७४मध्ये नवनिर्माण युवक चळवळ उभी राहिली. गुजरातमध्ये मेस बिलात वाढ झाल्याने हे युवक आंदोलन सुरू झालं. ७१च्या युद्धाने भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण आला होता, आखाती तेल उत्पादक देशांनी क्रूड तेलाच्या किमती अचानक वाढवल्या, १९७१ साली भयानक दुष्काळ पडला. महागाई प्रचंड वाढली. त्यात व्यापाऱ्यांनी अन्नधान्याची साठेबाजी सुरू केली, भेसळ सुरू केली. या पार्श्वभूमीवर युवकांच्या आंदोलनाला मध्यमवर्गीय लोकांचा पाठिंबा मिळाला. युवकांनी दुःखाचं प्रतीक म्हणून आपली डोकी भादरून घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे गुजरात विधानसभा भंग करावी लागली. गुजरातमधील युवक चळवळीचं हे यश बघून बिहारमध्ये ‘छात्र संघर्ष समिती' आंदोलन करण्यासाठी पुढे आली. त्यात पुढे मोठे राजकारणी झालेले लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, सुशीलकुमार मोदी आणि रामविलास पासवान हे युवक होते. त्यांनी मार्गदर्शनासाठी जयप्रकाश नारायण यांना गळ घातली. जयप्रकाश नारायण यांच्या पाठिंब्यामुळे या युवकांच्या मागे एक नैतिक आधार उभा राहिला. ही चळवळ देशभर लाटा उठवू लागली. त्याच वेळी जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेच्या १७ लाख कामगारांनी देशव्यापी संप पुकारला. २० दिवस रेल्वे बंद होती. हे सगळं घडत असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणा वापरली म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवर झालेली निवड रद्द ठरवली. जयप्रकाश नारायण इंदिरा गांधींचा राजीनामा मागण्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन करू लागले. अशा रीतीने परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे बघून इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली आणि आंदोलन ठप्प केलं.
पुढे निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. त्यात आणीबाणीमध्ये झालेल्या अत्याचारांबरोबरच युवकांच्या रागाचाही हात होता. जे पी आंदोलन हे स्वतंत्र भारतातलं राजकीय परिणामाच्या दृष्टीने सर्वांत यशस्वी आंदोलन; परंतु यातील युवक नेत्यांकडे तत्त्वज्ञानाची परिपक्वता नसल्यामुळे ते आदर्श निर्माण करू शकले नाहीत. लालूप्रसाद यादव भ्रष्टाचाराच्या आणि जातीपातीच्या राजकारणाच्या मागे गेले, नीतीशकुमार जातीपातीच्या आणि धर्मभेदाच्या राजकारणाच्या मागे गेले, सुशील कुमार मोदी भाजपात जाऊन धार्मिक विखाराचं राजकारण करू लागले आणि रामविलास पासवान जात आणि धर्म यांचं राजकारण करत राहिले. स्वातंत्र्ययुद्धामधून आलेल्या पिढीच्या आदर्शवादाचा पुढे मागमूससुद्धा उरला नाही.
त्या काळातली अजून एक युवक चळवळ म्हणजे आसाममधील युवक आंदोलन. आसाममध्ये बाहेरचे लोक येऊन आसामी अस्मिता पुसत आहेत आणि आसाममध्येच आसामी लोकांना राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या विस्थापित करत आहेत, या कारणासाठी आसाममधील युवकांनी आसाम गणसंग्राम परिषद स्थापन केली आणि मोठं आंदोलन छेडलं. आसाम सलग पाच-सहा वर्षं खदखदत राहिला. मतदारयाद्यांमधील बाहेरच्या लोकांच्या समावेशामुळे रणकंदन माजलं. नेल्ली आणि आजूबाजूच्या सहा खेड्यांमध्ये पूर्व बंगालमधून आलेल्या मुसलमान लोकांचं हत्याकांड झालं. सरकारी आयोगाच्या आकडेवारीनुसार १८१९ लोक मारले गेले, परंतु काही अंदाजांनुसार हा आकडा ३ ते ५ हजार होता. पुढे केंद्र सरकारबरोबर १९८५ साली आसाम करार झाला. १९७१नंतर रजिस्टर झालेले लोक बाहेरचे समजले जातील असं ठरलं. नंतर झालेल्या निवडणुकीत आसाम गण परिषदेचं सरकार निवडून आलं. युवक नेते प्रफुल्ल कुमार महंतो वयाच्या ३३ वर्षी मुख्यमंत्री झाले. या सरकारने नेल्ली हत्याकांडासंदर्भात दाखल केल्या गेलेल्या ६८८ पोलिस केसेस मागे घेतल्या. ही चळवळ प्रतिक्रियावादी असल्याने ते अपेक्षितही होतं. एक गोष्ट मात्र खरी, की या चळवळीने आसाम राज्याचं राजकारण समूळ बदलून टाकलं. अगदी आजही बाहेरचे आणि आतले हा तिथला वाद मिटलेला नाही
हेही वाचा - देशभरातील आंदोलनं काय सांगताहेत?
युवक चळवळी हिंसात्मक आणि अहिंसात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या असतात. युनिसेफच्या जागतिक आकडेवारीनुसार इतिहास बघता ५० टक्के युवक चळवळी हिंसक असतात आणि ५० टक्के अहिंसक असतात. परंतु याच आकडेवारीनुसार आधुनिक चळवळी मुख्यतः अहिंसक असतात, हेही दिसून येतं. परंतु युवक चळवळ कधीही हिंसक होऊ शकते हे अशाचळवळी हाताळताना लक्षात ठेवावं लागतं.
स्वतंत्र भारतात प्रतिक्रियावादी युवक चळवळी झाल्या; परंतु समतेच्या, न्यायाच्या, प्रागतिकतेच्या आणि पुरोगामी तत्त्वांवर आधारलेली अशी एकही चळवळ झाली नाही. खरं तर महाराष्ट्रात १९४० आणि ५०च्या दशकात जन्मलेले अनेक क्रियाशील विचारवंत युवक सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत कार्यरत होते. कुमार शिराळकर, अजित सरदार, भारत पाटणकर, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, नरेंद्र दाभोळकर आणि भाई संपतराव पवार ही त्यातली काही नावं. या लोकांनी वैयक्तिक पद्धतीने खूप कार्य केलं, परंतु ते म्हणावी अशी आदर्शवादी आणि ताकदवान चळवळ उभे करू शकले नाहीत.
याचं कारण १९७५पासून बदललेल्या राजकारणामध्ये शोधता येईल. १९७५नंतर राजकारण पैशावर चालवलं जाऊ लागलं. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि परत सत्तेतून प्रचंड पैसा असं समीकरण बनून गेलं. मध्यमवर्गीय माणसाला कसलाच वाव उरला नाही. वरील क्रियाशील विचारवंत या ना त्या विचारसरणीशी संलग्न होते आणि त्या त्या विचारसरणीच्या पक्षांमध्येसुद्धा केव्हा ना केव्हा काम करत होते. परंतु हे पक्ष या विधायक कामं आणि विचार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. समाजकार्य करा, आदर देऊ- परंतु राजकीय चळवळीचं बोलू नका, अशी एकंदर भूमिका या सगळ्यांच्याच अनुभवाला आली. १९२० आणि ३०च्या दशकांत लोक सहजपणे पक्ष काढत असत. तशीही परिस्थिती आता राहिली नव्हती. सगळं पैशावर अवलंबून. मतांसाठीही बेसुमार पैसा उधळला जाऊ लागला. कार्यकर्तेसुद्धा पैसा खर्च केल्याशिवाय उपलब्ध होईनासे झाले.
भाई संपतराव पवार यांच्या ‘मी लोकांचा सांगाती' या पुस्तकात या बदलाची चर्चा केली आहे. सत्तेचं आणि पैशाचं राजकारण करणाऱ्या नेत्यांनी काम करणाऱ्या लोकांची पूर्ण कुचंबणा करून टाकली. त्यामुळे या लोकांनी राजकारण सोडून वैयक्तिक पातळीवर कामं सुरू केली. संपतरावांनी सरकारी मदतीविना गावात धरण बांधलं. अनिल अवचट नशामुक्ती आणि लेखनाकडे वळले. नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनाकडे वळले. गेल्या तीस वर्षांत राजकारण पैशावर अधिष्ठित झाल्यामुळे ही कोंडी दिवसागणिक आणखी गुदमरवणारी होत चालली आहे. खऱ्या तत्त्वज्ञानी, संवेदनशील आणि आदर्शवादी नेत्यांना राजकारणातून परागंदा व्हावं लागत आहे. हे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतभरातील चित्र आहे.
आज देशातील ८० कोटी लोकांना फुकट रेशन देऊन जगवावं लागत आहे, परंतु अशा देशातले ९२ टक्के खासदार कोट्यधीश आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना निवडून येणं अशक्य बनलं आहे. मेधा पाटकर यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी जीवन वेचलं, परंतु आदिवासी भागातून त्या निवडणूक लढवू शकल्या नाहीत. जिथल्या लोकांच्या घरांच्या हक्कासाठी त्या लढल्या, तिथेही त्यांना पराभव पत्करावा लागला. लोक कार्यकर्त्यांकडून कामं करून घेतात आणि मतं मात्र पैसे देणाऱ्या उमेदवाराला देतात, असं चित्र तयार झालं आहे. सगळ्या पक्षांच्या यंत्रणासुद्धा अर्थकेंद्रित झाल्या आहेत. अशा अवस्थेत खऱ्या कार्यकर्त्याचा कसा टिकाव लागायचा आणि खरं युवक आंदोलन कसं निर्माण व्हायचं, अशी परिस्थिती आहे.
गेल्या पंचवीस वर्षांत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून शिवसेनेचं युवक आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या राडा संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर खळ्ळखट्याक संस्कृती उभी केली. एका बाजूला आक्रमकतेने प्रश्न सोडवायचे आणि दुसऱ्या बाजूला मराठी अस्मितेचा हुंकार जनमानसात रुजवायचा, अशी ही दुहेरी नीती या आंदोलनाने स्वीकारली; परंतु या नीतीला म्हणावा असा जनमताचा पाठिंबा अजून तरी मिळालेला नाही.
भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला म्हणून २०१२-१३ साली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली युवक आंदोलन झालं. तेव्हा काहींना असं वाटलं होतं की ते जे पी आंदोलनापेक्षा सशक्त होईल. या आंदोलनामुळे काँग्रेसचं सरकार पडलं, भाजपप्रणित एनडीएचं सरकार आलं. लोकपाल बिल आणि आर टी आय कायदा असे कायदे आणणाऱ्या अण्णा हजारे आणि त्यांच्या मागे उभे राहिलेलं युवा नेतृत्व अरविंद केजरीवाल यांच्याविषयी खूप आशा तयार झाल्या. केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये निवडून आला, पंजाबमध्येही निवडून आला; परंतु पुढे सगळं ठप्प झालं. लोकपाल कायद्यावर मोदी सरकारने पाणी ओतलं. पुढे सगळा मीडिया सरकारधार्जिण्या उद्योगपतींनी खिशात घातला, विचारस्वातंत्र्याचा गळा चेपला गेला, तरीही अण्णा गप्प राहिले. आमदार आणि खासदार यांचा राजरोस घोडेबाजार पराकोटीला पोहोचला तरी अण्णा गप्प राहिले. मग लोकांच्या लक्षात आलं, की अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन फक्त काँग्रेसविरोधी होतं. जी तत्त्वं काँग्रेसने मोडल्यावर अण्णा बोलले, तीच तत्त्वं भाजपने मोडल्यावर मात्र ते शांत राहिले. जे पी आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्यामागे उभ्या असलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिक्रियावादामुळे आणि कोतेपणामुळे थंडगार झालं, अण्णा हजारे यांचं आंदोलन मार्गदर्शकच उच्च तत्त्वांमागे उभे राहायला कमी पडले म्हणून थंडगार झालं.
हेही वाचा - कोकणाच्या विनाशकारी विकासाला आव्हान देणारी राखणदार यात्रा
गेल्या पंचवीस वर्षांतलं सर्वांत महत्त्वाचं आंदोलन म्हणजे मराठा क्रांती मोर्चा. मराठा समाजातल्या युवकांना रोजगाराच्या संधी आणि त्यासाठी आरक्षण मिळालं पाहिजे, अशा मागण्यांसाठी लाखो मराठा युवक-युवती २०१६ साली मूक मोर्च्यांमध्ये सामील झाले. फार मोठ्या आशा निर्माण करणारं हे आंदोलन होतं. या आंदोलनाचं वेगळेपण म्हणजे सुरुवातीला ते सामूहिक होतं, कोणा एका नेत्याच्या मागे जाणारं नव्हतं. कुणाच्याही छातीत धडकी भरवणारे हे अतिविराट मोर्चे अत्यंत शांततेत आणि शिस्तीत आयोजित केले गेले. या मोर्च्यांचं नियोजन करणाऱ्या युवक-युवतींविषयी त्या काळात खूप आकर्षण तयार झालं होतं. यातून विचार करण्याची क्षमता आणि लोकांना हाताळण्याची हातोटी असलेलं नेतृत्व तयार होईल अशी आशा वाटली होती; परंतु हे सगळे युवक -युवती बहुतकरून पडद्यामागे राहिले याची आज अनेकांना खंत वाटते. २०२३नंतर मात्र मराठा युवक मनोज जरांगे यांच्या मागे उभा आहे.
गेल्या पंचवीस वर्षांत दलितांच्या युवक चळवळीमध्ये अनेक तट पडले. हे अनेक तट आपल्या आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रश्नांवर आणि अन्यायांवर लढत असल्याचं दिसतं. दलित पँथरसारखी एकसंध आणि एकवटलेली ताकद दलित चळवळीमध्ये उरली नाही. अर्थात साहित्यिक दर्जाचा विधायक विद्रोह फारसा दिसत नसला तरी सोशल मीडियामुळे आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि त्याविषयीचं आदान-प्रदान खूप वाढलं आहे.
पैशावर अधिष्ठित राजकारणाने गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांत निर्माण झालेली कोंडी गेल्या दहा वर्षांत आणखी करकचून आवळली जात आहे. आता त्याविरुद्ध बोलायला मीडियाही राहिला नाही. सोशल मीडियावरील ट्रोल आर्मी विचारस्वातंत्र्याविरुद्ध काम करू लागल्या. लोकशाहीची आणखी आणखी गळचेपी सुरू झाली.
२०२२नंतर तर युवकांची अवस्था जास्त जास्त बिकट होत गेली आहे. शिक्षण अत्यंत महाग होत चाललं आहे. कायमस्वरूपी नोकऱ्या सोडूनच द्या, पण सामान्य रोजगाराच्या संधीही कमी होत गेल्या आहेत. भारतातच नाही, तर जगभरच आर्थिक विकासाच्या प्रमाणात नोकऱ्यांची संख्या वाढत नसल्याचं गेल्या दहा-बारा वर्षांत दिसत आहे. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यात आता एआय क्रांतीमुळे नोकऱ्या आणखी दुर्लभ होत जाणार आहेत. त्यामुळे नोकऱ्यांसाठीची स्पर्धा गेल्या दहा-बारा वर्षांत प्रचंड वाढली. त्यामुळे स्पर्धापरीक्षा आणि प्रवेशपरीक्षा यांच्या प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी प्रचंड पैसा ओतला जाऊ लागला. सतत फुटणाऱ्या प्रश्नपत्रिकांमुळे वर्षांमागून वर्षं सुरळीत परीक्षा होणं मुश्किल होऊन बसलं. यातून तरुणवर्गामध्ये संताप आणि फ्रस्ट्रेशन तयार झालं आहे. १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेल्या युवकांना जेन झी (जनरेशन झी) म्हणतात. भारतात या १५ ते २९ वयोगटामधले ३५ कोटी जेन झी युवक आहेत. त्यांच्या भविष्याविषयी खूप अपेक्षा आहेत. न्याय्य वातावरणात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झाल्याशिवाय हा युवक खूष राहणार नाही. अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीने केलेल्या एका सर्व्हेमध्ये १५ ते २५ वयोगटातले ४० टक्के युवक आणि २५ ते २९ वयोगटातले २० टक्के युवक बेरोजगार असल्याचं पुढे आलं आहे. हे प्रमाण प्रचंड आहे. एका बाजूला राजकीय कोंडी आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक कोंडी आणि तिसऱ्या बाजूला प्रस्थापित समाजाची असंवेदना अशा तिढ्यात ही पिढी अडकली आहे.
हा युवावर्ग डिजिटल युगात जन्माला आला आहे आणि वाढला आहे. डिजिटल स्पेसमध्ये, म्हणजे फेसुबक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूब या माध्यमांच्या सहवासात तो वाढला आहे. त्यांच्या संवेदना या स्पेसमध्येच व्यक्त होत असतात. या युवकांच्या सगळ्या चळवळी या स्पेसमध्येच आकार घेत असतात. मराठा क्रांती मोर्र्चामधला युवक १९८१ ते १९९६मध्ये जन्मलेला म्हणजे ‘मिलेनियल' जनरेशनचा होता. त्याच्या आणि जेन झी युवकांमध्ये आणि त्यांच्या एक्प्रेशनमध्ये खूप फरक आहे. ‘एआय'च्या आगमनामुळे जेन झीचा युवक पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा खूप मोठ्या जगाशी जोडलेला आहे. जगातील कुठल्याही तत्त्वज्ञानाशी किंवा विचारप्रणालीशी तो पटकन जोडला जाऊ शकतो. आपले आणि आपल्या आंदोलनाविषयीचे विचार तो फार वेगाने सर्वत्र पसरवू शकतो. त्याचं उदाहरण आपण नुकतंच पाहिलं.
हेही वाचा - सरकारने आमच्याकडे आधी या देशाचे नागरिक म्हणून बघावं: अनिल उकरंडे
सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार युवकांचा उल्लेख ‘कॉक्रोचेस' असा केल्यामुळे या जेन झींच्या भावनांचा स्फोट झाला. अभिजित दिपके या तरुणाने ‘कॉक्रोच जनता पार्टी' नावाची डिजिटल पार्टी काढली. त्या पक्षाच्या इन्स्टाग्राम हँडलला काही दिवसांतच सुमारे तीन कोटी फॉलोअर्स मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या हँडलला ८० लाख फॉलोअर्स मिळायला ११ वर्षं लागली आणि दिपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या हँडलला तीन कोटी फॉलोअर्स केवळ १५ दिवसांत मिळाले. यावरून या पिढीची आंदोलन करण्याची ताकद लक्षात येते. या पार्टीचं हँडल लोकप्रिय होत असतानाच मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या. त्या मागोमाग सीबीएसई बोर्डाच्या निकालांमध्ये गोंधळ झाला. नवीन ‘डिजिटल पक्षाला' आंदोलन करण्याचे मुद्दे मिळाले. अभिजित दिपकेने शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला. दिपके डिजिटल स्पेसमधून रस्त्यावर उतरला. युवकांच्या आंदोलनाला कुणा तरी बुजुर्ग नेत्याचा आधार लागतो तो लडाखचे सोनम वांगचुक यांच्या रूपाने मिळाला.
जेन झी युवक एकगठ्ठा रस्त्यावर आला नाही याचा अर्थ ते आंदोलन फसलं असा निष्कर्ष काढणं चुकीचं होईल. सभेत विचार ऐकायला जायचं असतं, एखाद्या विचाराने किती लोक प्रभावित झाले आहेत, हे दाखवून द्यायला जायचं असतं. या दोन्ही गोष्टी आजकाल स्मार्टफोनवरून साधल्या जातात. दिपकेच्या इन्स्टाग्राम हँडलला तीन कोटी युवकांची सभाच असते.
या डिजिटल स्पेसमधूनच नवं युवक आंदोलन रूप घेऊ लागेल अशी आशा निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षानेही स्वतःचं युवक आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेस पक्ष आणि कॉक्रोच जनता पार्टी यांच्यात आज एकमेकांविषयी संशयाचं वातावरण आहे. ते निवळलं तर युवक आंदोलनाला एका समर्थ राजकीय पक्षाची मदत मिळू शकते.
युवकांची गेल्या पंचवीस वर्षांतील अस्वस्थता अण्णा आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा आणि कॉक्रोच आंदोलन अशा अनेक आंदोलनांमधून व्यक्त होते आहे. आपल्या देशात आज आर्थिक अस्वस्थताही बरीच आहे. शेतकरी गेली कित्येक वर्षं शेतमालाला मिळणाऱ्या भावाविषयी असंतुष्ट आहे. शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाचा आवाज आकार घेऊ लागलेल्या युवक आंदोलनात मिसळला तर जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनाप्रमाणे एक मोठं आंदोलन उभं राहू शकतं. देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात निर्माण झालेली कोंडी बघता सर्व दृष्टीने आदर्श आंदोलन जन्माला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं वाटतं. युवकांची आंदोलनं जास्त करून फसत असतात. परंतु, एकंदर राजकारण आणि राजकीय तत्त्वज्ञान त्यातूनच आकार घेत असतं, हे आपण अनेक उदाहरणांमधून आणि इतिहासाच्या दाखल्यांमधून पाहिलं. आता होऊ घातलेली आंदोलनं फसूही शकतात, विरघळूनही जाऊ शकतात. परंतु, समाजापुढचे आणि राजकारणापुढचे प्रश्न कायम असतात. समाजात आणि राजकारणात तयार झालेली कोंडी फोडण्याची गरज आणि खऱ्या कार्यकर्त्यांना जागा मिळण्याची गरज कायम असते. आताचं जेन झीचं आंदोलन विरघळलं तर भारतीय राजकारणात पुन्हा मोठं आंदोलन तयार व्हायला २०१२ ते २०२४ मध्ये जन्मलेली ‘जनरेशन अल्फा' मोठी व्हायची वाट पाहावी लागेल.
इतिहासाचा मागोवा घेऊन गेल्या पंचवीस वर्षांतील युवक चळवळींकडे बघायचं झालं तर आपल्याला जाणवतं, की फुले, गांधी, टिळक आणि आंबेडकर यांच्यासारखी तत्त्वज्ञानात्मक सखोलता आजच्या चळवळींमध्ये नाही; चापेकर, सावरकर आणि भगतसिंग यांच्यासारखी भावनांची तीव्रताही दिसून येत नाही आणि १९४० आणि ५०च्या दशकांत जन्मलेल्या युवकांचा आदर्शवादही अस्तित्वात नाही. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याशिवाय पैशाच्या आधारावर केल्या जाणाऱ्या राजकारणामुळे निर्माण झालेली कोंडी म्हणावी अशी फोडली जाणार नाही; परंतु या गोष्टी कधी जुळून येतील हेही सांगता येत नाही. शेवटी युवकाचं मन हे प्रचंड ऊर्जा असणारं रसरशीत रसायन असतं. तत्त्वज्ञानाची सखोलता, भावनांची तीव्रता आणि आदर्शवाद या गोष्टी ते कधीही कवेत घेऊ शकतं.
(अनुभव, जुलै २०२६च्या अंकातून साभार.)
श्रीनिवास जोशी
श्रीनिवास जोशी नाटककार आहेत आणि गेली दोन दशके वैचारिक लिखाण करत आहेत.
