गेल्या दोन-तीन महिन्यात बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यामुळे साऱ्यांचं लक्ष तिकडेच होतं. त्याआधी आम आदमी पक्षाचे आमदार फुटून भाजपमध्ये गेले होते. एवढ्या साऱ्या फाटाफुटीनंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष फुटणार अशा चर्चा रंगू लागल्या. दक्षिण भारतात हात-पाय पसरवता येत नसल्याने भाजप उर्वरित सारा देश स्वत:च्या पाठीशी उभा करू पाहत आहे, असं निरीक्षण या निमित्ताने नोंदवलं गेलं. पण याचा अर्थ भाजपने दक्षिणेकडची आशा सोडून दिली आहे असं नव्हे.
भाजपने दक्षिण भारतात पाय रोवण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांत अनेक प्रयत्न केले. कर्नाटकात ते सरकार स्थापन करण्यापर्यंत गेले, तर तामिळनाडूत अण्णा द्रमुकसोबत युती करून त्यांनी चंचुप्रवेश करण्याचा दीर्घकाळ प्रयत्न केला. केरळमध्ये संघाच्या केडरमार्फत संघर्ष केला. तेलंगणात मागच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने ३५ टक्क्यांपर्यंत मतं मिळवली. आंध्रमध्ये चंद्राबाबूंच्या कडेवर बसून सत्तेत भागीदारी मिळवली. पण तरीही गेल्या दहा-पंधरा वर्षांत भाजप या राज्यांमध्ये त्यापलीकडे मुसंडी मारू शकलेला नाही. स्वत:चं असं राजकारण उभं करू शकलेलं नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत या भागात ते नवा खेळ मांडू पाहत आहेत. उत्तरेतील पक्षांवरच्या चर्चेमुळे या खेळाकडे कुणाचं फारसं लक्ष दिसत नाही.
दक्षिणेतील ज्या राज्यांमध्ये भाजप स्वत:चा जनाधार मिळवू शकलेले नाहीत, त्या राज्यांमध्ये त्यांनी नव्या स्थानिक पक्षांना बळ देण्याचं राजकारण आरंभलेलं दिसतं. ज्या के. अण्णामलाई यांना पक्षाने तामिळनाडूचं प्रदेशाध्यक्ष केलं होतं, त्यांनी अलीकडेच पक्षाचा राजीनामा दिला आणि स्वत:ची राजकीय संघटना काढली. येत्या काही दिवसांत त्याचं रूपांतर राजकीय पक्षात केलं जाईल असं जाहीरही केलं. आपलं भाजपसोबत भांडण नाही असं त्यांनी खुलेपणाने सांगितलं. अण्णा द्रमुकसोबत युती न करता विधानसभेची निवडणूक लढवावी, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मोदी-शहांनी ते मानलं नाही. आता पक्ष सोडल्यामुळे ते द्रमुकसह अण्णाद्रमुक यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतील. ज्या मतदारांना द्रविडी राजकारण नको आहे त्यांना आकृष्ट करण्याचा ते प्रयत्न करतील. जुन्या वैचारिक मारामाऱ्यांशी देणं-घेणं नसलेला तरुण मतदार आणि हिंदू राष्ट्रवादाला प्रतिसाद देणारे मतदार यांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. याचा अर्थ भाजपचाच अजेंडा ते राबवणार आहेत.
हेही वाचा - तमिळनाडू : सत्तांतर नाट्यानंतरचं नाट्य
तामिळनाडूत भाजपला उत्तरेकडचा पक्ष मानलं जातं. हिंदीचा आग्रह हे त्यामागचं मुख्य कारण. अण्णामलाई हे तमिळ असल्याने आणि त्यांच्यावर हिंदीवादी असा शिक्का नसल्याने त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये पूर्वग्रह असणार नाही. त्यामुळे तमिळ अस्मिता आणि हिंदू राष्ट्रवाद यांच्या जोरावर ते वाटचाल करतील असं दिसत आहे. निरीक्षकांचं म्हणणं असं आहे की त्यांचा पक्ष भाजपची तमिळ आवृत्ती असेल. त्यांना चांगलं यश मिळालं तर काही वर्षांनी एक तर त्यांच्यासोबत युती केली जाईल किंवा त्यांचा पक्ष पुन्हा भाजपमध्ये विलीन केला जाईल. अण्णामलाई भाजपमधून ज्या सौहार्द्रपूर्ण वातावरणात बाहेर पडले, त्यावरून हा तर्क बिनबुडाचा नसणार.
तामिळनाडूप्रमाणेच आंध्र आणि तेलंगणमध्ये भाजप हाच फॉर्म्युला राबवू पाहत आहे. आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर मोदींची विशेष कृपादृष्टी आहे. ते मूळचे अभिनेते; त्यामुळे लोकप्रिय. भाषणं ठोकण्यात तरबेज. शिवाय हिंदू राष्ट्रवादाचे मुखर समर्थक. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे भाजपने त्यांना बरीच हवा दिली आहे. आंध्रमध्ये चंद्राबाबूंचा तेलगू देसम आणि जगनमोहन रेड्डींचा वायएसआर पक्ष हे प्रमुख पक्ष. त्यांचे पाय कापून पवन कल्याण हेच आगामी काळातील प्रमुख नेते बनतील, अशी व्यवस्था भाजप करत आहे. शिवाय त्यांनाच शेजारच्या तेलंगण राज्यातही उतरवलं जात आहे. आपला प्रभाव वाढवायची ही चांगली संधी आहे असं त्यांना वाटणं स्वाभाविकच आहे. त्या प्रयत्नांत या दोन्ही राज्यातले प्रस्थापित प्रादेशिक पक्ष खिळखिळे झाले तर भाजपला ते हवंच आहे. पवन कल्याण हे भाजपकृपेने मोठे होणार असल्याने ते भाजपच्या शब्दाबाहेर जाणार नाहीतच. अशा रीतीने भाजप दक्षिणेतील या दोन जुळ्या राज्यांमध्ये त्यांना प्रॉक्झी (म्हणजे मोहरा) म्हणून वापरेल असं म्हटलं जात आहे.
हेही वाचा - एक निवडणूक जेव्हा अनेक उलथापालथी घडवते
हे सारं हवेतलं बोलणं आहे असं कुणाला वाटू शकतं. पण भाजपने हाच खेळ केरळमध्ये करून दाखवला आहे. संघ आणि भाजपच्या केडरमार्फत निवडणुका जिंकता येत नाही हे पाहून त्यांनी केरळमधील इळावा या प्रभावी समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी एका स्थानिक पक्षाची स्थापना करवली होती. श्रीनारायण धर्म प्रतिपालन योगम (एसएनडीपी) ही या समाजाची मोठी प्रभावशाली संघटना. शंभरहून अधिक वर्षांचा महत्त्वाचा इतिहास असलेली. त्यांचे प्रमुख वेलापल्ली नरेशन यांच्यासोबत भाजपने संधान साधलं. मग त्यांचा मुलगा तुषार वेलापल्ली यांनी भारतधर्म जन सेना नावाचा पक्ष काढला. त्याला भाजपने भरपूर मदत केली. तुषार यांना राज्य रालोआचं प्रमुखपद दिलं. त्यांच्यामार्फत इळावा समाजाला कम्युनिस्टांपासून तोडून स्वत:सोबत जोडून घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणामही दिसला. भाजपची मतं भरपूर वाढली.
याचा अर्थ, आपल्याला मतं मिळत नसतील तर राज्याराज्यात नवे पक्ष स्थापन करणं किंवा छोट्या प्रादेशिक पक्षांना कह्यात ठेवून मोठं करणं असं राजकारण भाजप दक्षिण भारतात करत आहे. त्यातून लगेच यश मिळणार नाही पण पाच-दहा वर्षांत तिथे काही घडामोड घडेल आणि त्यातून दक्षिणेत स्थान निर्माण होईल, असं त्यामागचं समीकरण आहे. उत्तरेतील सर्वच राज्यं सर्वस्वी पादाक्रांत करत असताना दक्षिणेतही भाजप दूरदृष्टीचं राजकारण करताना दिसत आहे. उत्तरेकडील फोडाफोडीच्या चर्चा एवढ्या मोठ्या आवाजात चालल्या आहेत, की थंड डोक्याने चाललेलं दक्षिणेचं राजकारण फार कुणाच्या लक्षात येत नाहीये. इकडचं ‘ऑपरेशन कमळ' आक्रमक नाही; धीम्या गतीने जाणारं आहे. पण त्याची दिशा तीच आहे!
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
