
ग्रामीण भागात शेतीत राबणारे हात हे प्रामुख्याने महिलांचे असले तरीही शेतकरी महिला हा विषय आपल्या चर्चाविश्वात जवळपास नाही. समाजाच्या पुरुषी मानसिकतेमुळे शेतकरी असा सर्वसामान्य उल्लेख होतो तेव्हा बहुतेकांच्या नजरेसमोर पुरुषच उभा राहतो, हे दुर्दैव आहे.
सोपेकॉम व मकाम या दोन संस्थांनी अलीकडेच या समीकरणाला आव्हान देणारं व्याख्यान पुण्यात योजलं होतं. व्याख्याते होते मॅगसेसे पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक पत्रकार पी साईनाथ. महिला शेतकरी आणि त्यांचं आपल्या शेतीतलं स्थान यावरचं त्यांचं भाषण ऐकण्यासाठी सर्व वयोगटातील दीडएकशे पुणेकर उपस्थित होते. आज देशातील ८० टक्के शेतकरी महिला आहेत. पण सातबारा (किंवा काही ठिकाणी पट्टा) महिलांच्या नावावर असण्याचं प्रमाण फक्त १३ टक्के आहे, हा साईनाथ यांच्या भाषणातला ठळक मुद्दा होता.
या भाषणानंतर मकाम संस्थेने प्रसिद्ध केलेलं एक हटके पुस्तक हे या भाषणाचं निमित्त होतं. पर्यावरणस्नेही व स्वावलंबी शेतीप्रयोगात सहभागी झालेल्या २५० महिलांपैकी १२ जणींच्या गोष्टी ‘पुष्कळा’ या हटके शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, परभणी आणि विदर्भातील यवतमाळ, नागपूर, अकोला असा सहा जिल्ह्यातील या महिला आहेत
‘पुष्कळा’ हा वेगळाच शब्दप्रयोग या पुस्तकाच्या शीर्षकात का वापरला असावा अशी उत्सुकता माझ्या मनात तायर झाली. वाचकांनाही हा प्रश्न पडू शकतो. म्हणून पुस्तकाच्या प्रास्ताविकात पु. शि. रेगे यांच्या कवितेच्या काही ओळी उद्धृत केल्या आहेत.
पुष्कळ अंग तुझे, पुष्कळ पुष्कळ मन
पुष्कळातली पुष्कळ तू
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी
त्यासोबत म्हटलंय, या प्रयोगात सामील झालेल्या महिला, चारचौघीत उठून दिसणार नाहीत. पुष्कळातील पुष्कळ वाटतील या बाया. पण आपल्या स्वावलंबी वावरात आपलं कुटुंब नि समाजाचं पोषण होईल असं पुष्कळ त्यांनी पेरलंय, पिकवलंय. बाईचं योगदान ओळखलं तर ती समाजाला पुष्कळ देईल, हे आश्वासन या शेतकरणी देताहेत.
खरोखरच या महिलांनी त्यांच्या त्यांच्या गावी केलेले स्वावलंबी, रसायनविरहित आणि विषमुक्त शेतीचे हे अनोखे प्रयोग आहेत. एवढंच नव्हे तर हे अमाप व उदंड श्रमांचे, विविध अनुभवांचे, अनेक सामाजिक चालीरीतींना छेद देणारे आणि तरीही टिच्चून टिकून राहून सर्व अडचणींना तोंड देऊन आत्मविश्वास व आत्मसन्मान मिळवणारेही आहेत.
स्वावलंबी शेती करणं म्हणजे शेती करताना आवश्यक असे सर्व छोटे-मोठे निर्णय घेणं. ते स्त्रीला घेता येणं आपल्याकडे जवळपास अशक्यच. कारण पहिली गोष्ट म्हणजे तिच्या नावावर शेतजमिनीचा तुकडाही नसतो. त्या जमिनीवर तिने फक्त राबणं अपेक्षित असतं. घरातील पुरुष सांगेल ती कामं करणं, सांगेल ती पिकं पेरणं, सांगेल ते बियाणं, सांगेल तीच फवारणी करणं आणि शेवटी बाजारपेठेत सुद्धा कुठे, कधी, कोणाला विकायचं या सर्वाचा फैसला घरातला मालक, म्हणजे पुरुष शेतकरी करणार हे ठरलेलं. भले त्यांनी त्या शेतामध्ये काडीचेही कष्ट केले नसतील. पतीचं निधन झालेल्या घरांमध्ये तर आणखीच बिकट परिस्थिती. निधन झालेल्या पतीच्या नावे शेतजमीन असेल तरी उरलेलं कुटुंब शेतीबद्दलचे निर्णय घेतं. तिथेही बाईच्या हातात अधिकार येतच नाहीत. म्हणूनच पुष्कळामधल्या या कहाण्या वेगळ्या आणि महत्त्वाच्या ठरतात.
पुस्तकात उल्लेख केलेल्या १२ महिलांना केवळ शेतीतच नव्हे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये छोटे छोटे निर्णय घेताना स्वतः स्वावलंबनाचे धडे गिरवावे लागले, प्रसंगी भांडण करावं लागलं, पटवून द्यावं लागलं, विरोध सहन करायला लागला, समाजाच्या प्रचलित रीतीविरुद्धही उभं राहावं लागलं. ‘मी दरवेळी पास झाली’ या गोष्टीत पद्मा भुसारी म्हणतात, लहानपणी शाळेमध्ये नापास म्हणून बसलेला शिक्का पुढे शेतीमध्ये मात्र सर्व प्रयोगात यशस्वी होऊन पुसून टाकला. ‘जमीन नरम झाली’ या गोष्टीत संजीवनी साळवे सहज, सोप्या शब्दात सांगतात, की एकेकाळी ओसाड पडलेली जमीन. पण त्यात योग्य खत, पालापाचोळा आणि नैसर्गिक साहित्य मुबलक उपलब्ध झाल्यामुळे तिचा पोतच बदलला. वंदना खंडागळे यांना आपण असा काही चमत्कार करू शकतो हेच अजून खरं वाटत नाही. ‘माय मलाच कौतिक वाटतंय’ हे त्यांच्या गोष्टीचं शीर्षक त्यांच्या या अचंब्याचं उत्तम वर्णन करतं. आणि तरीही जमिनीत राबणाऱ्या या महिलांचं दुःख एकाच वाक्यात कलावती सवंडकर सांगतात, ‘जिमिनीचं दुक तेच बायांच दुक’.
शेती आणि स्त्रिया यांचे प्रश्न आणि एकूण समाजात घडणाऱ्या विविध प्रवाहांबद्दल ज्यांना विशेष रस आहे अशांनी हे ७० पानी पुस्तक आवर्जून वाचावं. उत्तम छायाचित्र, बोलीभाषेचा वापर यामुळे तो तो प्रदेश डोळ्यासमोर उभा राहतो. प्रशांत खुंटे यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे व स्वाती सातपुते यांनी लेखन सहाय्य केलं आहे.
अजित कानिटकर | kanitkar.ajit@gmail.com
अजित कानिटकर गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ विविध स्वयंसेवी संस्थांसोबत निगडीत आहेत. ते दिल्लीत १५ आणि गुजरातेत सहा वर्षं ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत होते.