“आज मराठी समाज म्हणून अभिमानाने मिरवत असताना आपण कधी तरी आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही? जागतिक मराठी चेंबरच्या कार्यक्रमात आपण सगळे बसलो आहोत म्हणून मी हा प्रश्न उपस्थित करतो आहे. या सभागृहात बसलेले बहुतेकजण हे उद्योगक्षेत्राशी संबंधित आहेत. ‘उद्योजक' म्हणून मराठी माणसांचा विचार केला तर आपल्याला काय दिसतं? अनेक क्षेत्रात जगात झेंडा रोवणारी मराठी माणसं या क्षेत्रांत मागे का आहेत? वर्षाला शंभर कोटींची उलाढाल करणारे मराठी उद्योजक किती आहेत? किती उद्योजकांना खरोखर असं वाटतं की आपण शंभर कोटींचा टप्पा पार करावा? एवढं मोठं स्वप्न बघण्याची मराठी उद्योजकांची तयारी आहे?”
जागतिक मराठी चेंबरच्या सभागृहात ज्येष्ठ राजकीय नेते आणि उद्योजक मनोहर जोशी बोलत होते. त्यांच्या रोखठोक सवालामुळे सभागृहात सन्नाटा पसरला होता. सर्वांच्या चेहऱ्यांवर ‘अर्थ'पूर्ण शांतता दिसत होती. एअर कंडिशनरची हवा जरा अधिकच थंड वाटत होती. शंभर कोटींचा मुद्दा मांडल्यानंतर जोशी पुढच्या मुद्द्याकडे वळले. सभागृहातले सर्वच श्रोते त्यांचं भाषण तल्लीन होऊन ऐकत होते, पण एक खुर्ची मात्र अस्वस्थ होती. त्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीच्या हातांच्या मुठी घट्ट वळत होत्या. श्वासाची लय जरा जलद झाली होती. काही तरी करून दाखवण्याची ईर्ष्या उसळी मारत होती... ‘होय, मी होणार शंभर कोटींची उलाढाल करणारा उद्योजक! आज मी कुठे आहे ते तितकं महत्त्वाचं नाही, पण भविष्यात मी कुठे पोचणार हे मात्र आजच नक्की झालं आहे!'
‘पीतांबरी'चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी ही भीष्मप्रतिज्ञा केली त्या दिवशी त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल होती केवळ दहा कोटी रुपये. ते साल होतं १९९९. त्यानंतरच्या अवघ्या चौदा वर्षांत त्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली, शंभर कोटींचा टप्पा ओलांडला. यंदा २०१५-१६ मध्ये त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल १४० कोटींच्या घरात आहे. कोणत्याही मराठी माणसाला थक्क करणारी अशी ‘पीतांबरी'ची ही कहाणी आहे.
‘लहान स्वप्न पाहणं हा गुन्हा आहे' असं सांगणारी एक इंग्रजी म्हण आहे, पण मराठी माणसांचा जर लसावि काढला तर ‘लहान स्वप्नं पाहणारी माणसं' असंच उत्तर येण्याची शक्यता आहे. कारण आयटी उद्योगाची क्रांती झाल्यानंतर मराठी माणसाचा आर्थिक स्तर उंचावला पण आकाश कवेत घेण्याची इच्छा प्रबळ झाली नाही. सर्वाधिक पगारांच्या नोकऱ्यांमध्ये आघाडीवर असणारा वर्ग, अशी मराठी माणसाची प्रतिमा बनते आहे. पण ‘सर्वाधिक जोखीम पत्करणारा वर्ग' अशी ओळख मात्र मराठी माणूस मिळवू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर मराठी माध्यमात शिकलेल्या आणि मराठमोळ्या कुटुंबात वाढलेल्या प्रभुदेसाईंनी मात्र मोठं स्वप्न पाहिलं. इतकंच नाही, तर आपलं सर्वस्व पणाला लावत ते स्वप्न प्रत्यक्षातही आणलं.
‘शंभर कोटींचा उद्योजक' म्हणून प्रभुदेसाई यांना अनेक पुरस्कार लाभले. ज्या दिवशी त्यांनी शंभर कोटींचा विडा उचलला त्या दिवशी असलेली त्यांची दहा कोटींची उलाढालही काही कमी नव्हती. कारण त्यापूर्वी त्यांनी शून्य ते दहा कोटी असा खडतर आणि रोमांचक प्रवास केलेला होताच. तो प्रवासही तितकाच कठीण. कारण संपूर्णपणे नवीन उत्पादन असताना आणि हातात फारसं भांडवल नसताना त्यांनी तो केला होता. त्या प्रवासात प्रभुदेसाई यांच्यासाठी जमेची बाजू एकच होती, ती म्हणजे त्यांचे वडील. त्यांचे वडील हे इतर मराठी वडिलांसारखे नव्हते. ‘उद्योग-व्यवसाय करणं आपलं काम नाही; तू सरळ नोकरी बघ आणि लग्न कर' असा मराठी बाण्याचा सल्ला त्यांनी दिला नाही, उलट उद्योजक व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलं. याचं कारण स्वत: वामनराव प्रभुदेसाईंमध्ये उद्योजकीय वृत्ती होतीच. त्यांनी ठाण्यात स्वत:ची रिक्षा सुरू केली होती. ठाण्यातल्या पहिल्या पाच रिक्षांमध्ये त्यांची रिक्षा होती. पुढे ते ट्रान्सपोर्टचाही छोटासा व्यवसाय करत होते. ‘पीताबंरी'च्या यशामागे प्रभुदेसाई यांच्या वडिलांची पुण्याई अशा प्रकारे उभी होती.
हेही वाचा - चॉकलेट जायंट चंद्रकांत मोरडे
वडिलांची परवानगी घेऊन प्रभुदेसाई यांनी सुरू केलेला सुरुवातीचा मोझॅक टाइल्सचा व्यवसाय सपशेल फेल गेला होता. उत्पादन आणि मार्केटिंग या दोन्ही गोष्टींचा काहीच अनुभव नसल्यामुळे प्रभुदेसाई यांना त्यात अपयश पत्करावं लागलं. त्यामुळे त्यांनी तो व्यवसाय सोडून दिला, पण अर्थातच उद्योजक बनण्याचा नाद मात्र सोडला नाही. त्या काळात त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र आणि मिटकॉनसारख्या संस्थांकडून वेगवेगळ्या उद्योगांची माहिती मिळवली. प्रत्येक उद्योगाला किती भांडवल लागतं, तांत्रिक ज्ञान किती लागतं किंवा बाजारात संधी कितपत आहे वगैरेंसारखे तपशील गोळा केले. त्यातूनच घरच्या घरी लिक्विड सोप, सॉलिड फ्युएल अशी उत्पादनं बनवायला सुरुवात केली- पण त्यापेक्षा किती तरी वेगळं करायची कल्पना डोक्यात चालूच होती.
तांब्याची आणि पितळेची भांडी चकचकीत करणारी पावडर त्या काळी बाजारात उपलब्ध नव्हती, हे लक्षात घेऊन त्यांनी कॉपशाइन नावाचं उत्पादन बनवलं. वडिलांच्या मदतीने मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी ते विकायला सुरुवात केली. यात ताज हॉटेल्ससारख्यांचाही समावेश होता. कॉपर बॉटमच्या भाड्यांसाठी ती पावडर ताजमध्ये वापरली जात असे. याच काळात उद्योजक बनायचं तर त्याचं व्यवस्थित शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणून डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला.
या कोर्समुळे प्रभुदेसाई यांचं जग बदलून गेलं. जादू व्हावी त्याप्रमाणे एक नवी दृष्टी त्यांना प्राप्त झाली. उद्योगाची कला आणि शास्त्र दोन्ही त्यांच्यासमोर उलगडत गेलं. सेल्स, मार्केटिंग, प्रॉडक्शन, इनोव्हेशन, मार्केट रिसर्च यासारख्या अनेक संकल्पना समजू लागल्या. या सगळ्याबरोबरच एफ.एम.सी.जी. हा उद्योग जगतातला परवलीचा शब्द पहिल्यांदाच कानावर पडला. एफ.एम.सी.जी. म्हणजे फास्ट मूव्हिंग कंझुमर प्रॉडक्ट्स. म्हणजे वेगाने विकली जाणारी ग्राहकोपयोगी उत्पादनं. यामध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ किंवा टूथपेस्टसारखी अगदी दररोज लागणारी उत्पादनं असतात. हे सगळं वाचल्यावर प्रभुदेसाई ‘युरेका' असं ओरडले नाहीत इतकंच! पण आपण तांबं आणि पितळ स्वच्छ करण्यासाठी जी पावडर बनवतो ती एफ.एम.सी.जी. कॅटेगरीत मोडते आणि त्यामुळे त्या क्षेत्राचे सर्व नियम आपल्या उत्पादनाला लागू होतात हे त्यांच्या लक्षात आलं. त्यातूनच ‘पीतांबरी' या ब्रँडचा जन्म झाला. पीतांबरी या शब्दाचा अनेकांना उलगडा होत नाही. प्रभुदेसाई यांच्या मते पितळाला संस्कृतमध्ये पीत म्हणतात आणि तांब्याला तांबं. तर हे पीत आणि तांबं बरी करणारी ती ‘पीतांबरी'.
आधी फक्त कंपन्यांसाठी आणि हॉटेल्ससाठी विकली जाणारी पावडर ‘पीतांबरी' नावाने घरगुती वापरासाठी बनवून विकायची, असा निर्णय प्रभुदेसाई यांनी घेतला. कारण त्या काळात ज्या घरांमध्ये त्यांचा वावर होता तिथे तांब्याची आणि पितळेची भांडी वापरली जात होती. गंमत म्हणजे सुरुवातीला प्रभुदेसाई यांच्या ‘पीतांबरी' या उत्पादनाला काहीजण हसले होते. कारण आता स्टेनलेस स्टीलच्या जमान्यात तांबं-पितळ कोणी वापरतच नसेल तर ‘पीतांबरी' कशासाठी विकत घेतील, असं हसणाऱ्यांचं म्हणणं होतं. पण प्रभुदेसाई आपल्या म्हणण्यावर ठाम होते आणि ठाम राहिले.
आता कदाचित खरी वाटणार नाही अशी एक हकीकत प्रभुदेसाई सांगतात. ती म्हणजे ‘पीतांबरी'च्या पावडरची विक्री सुरुवातीला त्यांनी स्वत: घरोघरी जाऊन केली होती. प्रत्येक घरात जाऊन त्या घरात तांब्या-पितळेची किती भांडी आहेत याची चौकशी करायची, आपल्या पावडरची माहिती द्यायची, शक्य तिथे पावडर वापरून भांडी चकचकीत करून दाखवायची आणि ऑर्डर मिळवायची, असं कामाचं स्वरूप होतं. हे तपशिलात एवढ्याचसाठी सांगितलं, की असं घरोघरी फिरून काम करणं ही अजिबातच सोपी बाब नाही. प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावल्यानंतर (तेव्हा सर्वांच्या घराला विजेच्या घंटा नव्हत्या.) काय घडेल हे सांगता येत नाही. काहीजण तुमच्याशी न बोलताच धाडकन दार लावतात. कुणी ‘आत्ता नको' असं तुटक बोलतात. कुणी दुपारची झोपमोड झाली म्हणून नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे घरोघरी हिंडून आपल्या उत्पादनाची माहिती सांगणं आणि ऑर्डर मिळवणं याला खूप हिंमत लागते. मराठी भाषिक समाजामध्ये अभावानेच हा गुण आढळतो. प्रभुदेसाई यांच्यामध्ये तो होता. अर्थात तेव्हा त्यांना तरी कुठे माहिती होतं, की त्यांच्या पुढच्या यशाच्या इमारतीचा पाया या तरुण वयातल्या पायपिटीतून घातला जातो आहे म्हणून.
हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला
सुरुवातीच्या काळात ‘पीतांबरी' विक्रीला ठेवण्यासाठी ठाण्यातले दुकानदार अजिबातच तयार नव्हते. स्वत: फिरून विकण्याला मर्यादा होत्या. व्यवसाय तर वाढवायचा होता. यावर उपाय म्हणून प्रभुदेसाई यांनी काही मुलांना हाताशी धरलं. प्रत्येक डब्यामागे पन्नास टक्के कमिशन देऊ केलं. एवढं मोठं कमिशन असल्यामुळे घरोघर फिरून विक्री करायला मुलं तयार झाली. मूळ उत्पादन चांगलं असल्यामुळे आणि लोकांची ती खरंच गरज असल्यामुळे उत्तम प्रतिसाद मिळू लागला. मुलांची संख्याही वाढू लागली आणि उत्पादनाची विक्रीही वाढत राहिली. काही दिवसांनंतर याचा व्हायचा तोच परिणाम झाला. या उत्पादनाला लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे हे हुशार दुकानदारांच्या लक्षात आलं. आधी दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांनी स्वत:हूनच ‘पीतांबरी' मागायला सुरुवात केली. एखादं उत्पादन बाजारपेठेने स्वीकारणं म्हणजे काय असतं याचा सुखद अनुभव प्रभुदेसाई घेत होते. मोझॅक टाइल्सच्या अपयशानंतर यशाची गोड चव ते चाखत होते.
‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी' ही प्रशांत दामले यांनी अभिनय केलेली जाहिरात आजही अनेकांना आठवते. १९९०च्या सुमारास केलेल्या या जाहिरातीने ‘पीतांबरी'च्या यशाला एक नवं शिखर दाखवलं. ‘पीतांबरी' सर्वत्र चर्चेत आली. एखाद्या जाहिरातीमुळे आपल्या उत्पादनाला एवढा मोठा नावलौकिक मिळू शकतो हा अनुभव प्रभुदेसाई यांना नवीन होता. या अनुभवामुळे ते सुखावले पण तिथेच थांबले नाहीत. त्यांच्यातला उद्योजक त्यांना आतून विचारत होता, ‘जाहिरात तर लोकांना आवडली, पण आता त्याचा उपयोग व्यवसायवाढीसाठी कसा करशील?' थोडा विचार केल्यावर प्रभुदेसाई यांना उत्तर सापडलं. जर मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या तर नावलौकिक तर वाढेलच, पण व्यवसायाचाही विस्तार होईल.
त्यानंतर मासिकं, वर्तमानपत्रं, रेडिओ आणि पोस्टर्सच्या माध्यमातून जाहिरातीचं कँपेनच त्यांनी सुरू केलं. आधी ठाण्यापुरतीच असलेली ही मोहीम पहिल्या टप्प्यात मुंबई-पुण्यात आणि नंतर महाराष्ट्रभर सुरू केली. या कँपेनने मार्केटमध्ये अक्षरश: धूम केली. लांबलांबच्या शहरांमधून आणि छोट्या गावांमधूनही दुकानदार संपर्क साधू लागले. मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स नोंदवू लागले. डिपॉझिट देण्याची किंवा आगाऊ रक्कम देण्याची तयारी दाखवू लागले. दुसरीकडे जाहिराती वाचून प्रभावित झालेले ग्राहक दुकानांमध्ये ‘पीतांबरी'ची मागणी करू लागले. एकदा हे उत्पादन वापरलेले ग्राहक आपल्या नातेवाइकांकडे आणि शेजाऱ्यांकडे ‘पीतांबरी'ची शिफारस करू लागले. कोणत्याही उद्योजकाला हवाहवासा वाटणारा सिलसिला सुरू झाला. रवींद्र प्रभुदेसाई नामक एका धडपड्या नवोदित तरुणाचं रूपांतर ‘यशस्वी उद्योजका'मध्ये झालं. पण या आनंदात मश्गुल राहून चालणार नव्हतं. कारण यश मिळवणं जेवढं अवघड असतं त्याहून यश टिकवणं अवघड असतं, ही वडिलांची शिकवण लक्षात होती.
सतत दुकानदारांनी येणं आणि मालाची मागणी करणं हे अनुभव म्हणून जेवढं छान वाटत होतं तेवढंच प्रत्यक्ष व्यवहार म्हणून कटकटीचंही होतं. कारण एवढ्या दुकानदारांशी रोजच्या रोज बोलणं, त्याच्या नोंदी ठेवणं, वेळेत माल पोचवणं आणि पैसे जमा करत राहणं प्रचंड दमछाक करणारं होतं. हे करत असताना वेळेची तारांबळ उडणं आणि कधी कधी हिशोबाचे गोंधळ होणंही चालूच होतं. हे असंच चालू ठेवणं धोक्याचं होतं. कारण त्यातून पूर्ण व्यवसाय कोलमडू शकतो. लवकरात लवकर उपाय शोधून अमलात आणायला पर्याय नव्हता. त्यातूनच ‘वितरक' नेमण्याची कल्पना पुढे आली. ठाण्यात पहिला वितरक नेमला गेला. त्यामुळे दुकानदारांबरोबरचे सर्व व्यवहार त्याच्याकडे शिफ्ट झाले. पुढे तोही पुरा पडेना तेव्हा महाराष्ट्रात ठिकठिकाणी वितरक नेमले गेले.
उत्पादनाची क्षमता वाढवणं, सातत्याने जाहिराती करत राहणं, वितरणाची व्यवस्था पक्की करणं आणि आर्थिक नियोजन अचूक करणं यावर प्रभुदेसाईंची सर्व भिस्त होती. या सगळ्या धामधुमीत पहिली दहा वर्षं कशी सरली हे लक्षात आलं नाही. आता सरावलेल्या उद्योजकाप्रमाणे त्यांचा सर्वत्र वावर होऊ लागला. निर्णय घेण्याची क्षमता वाढली. काही अडचणी आल्या तर न डगमगता ठाम राहण्याची ताकद निर्माण झाली. १९९०च्या सुमारास फक्त पाच हजार रुपये भांडवल घेऊन सुरू केलेला व्यवसाय आता दहा कोटींच्या घरात पोचला होता. सुखी, समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी जे जे हवं असतं ते सगळं मिळालं होतं. व्यवसाय, घर, गाडी आणि नावलौकिक असं सगळं विश्वास बसणार नाही इतक्या कमी वेळात कवेत आलं होतं. नेमक्या याच टप्प्यावर मनोहर जोशी यांच्या शंभर कोटींच्या आवाहनाने प्रभुदेसाई यांना पछाडलं आणि ते पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने कामाला लागले. कारण हा टप्पा पूर्वीपेक्षा अधिक कठीण असणार होता याची त्यांना पुरेपूर जाणीव होती.
हेही वाचा - अस्सल देशी शेफ : विष्णू मनोहर
कोणतंही मोठं काम एकटा माणूस करू शकत नाही, तर त्यासाठी उत्तम टीमवर्क हेच उत्तर आहे, याची पुरेपूर जाणीव प्रभुदेसाई यांना सुरुवातीच्या दहा वर्षांत झाली होती. आता तर काय, छाती दडपून टाकणारं आव्हान समोर उभं होतं. आपणच पाहिलेल्या स्वप्नाचा पाठलाग करत ते सत्यात उतरवायचं होतं. पण त्यासाठी मुख्य पूर्वअट होती. ती म्हणजे ते स्वप्न एकट्या प्रभुदेसाई यांचं राहून चालणार नव्हतं. ते टीममधल्या प्रत्येकाचं होणं आवश्यक होती. स्वराज्याचं स्वप्न सर्व मावळ्यांचं बनवून ते प्रत्यक्षात आणणाऱ्या शिवाजी महाराजांचा आदर्श प्रभुदेसाई यांच्यासमोर होता. त्यातूनच अष्टप्रधान मंडळाची कल्पना पुढे आली. प्रॉडक्शन, मार्केटिंग, सेल्स, डिस्ट्रिब्युशन, ब्रँडिंग, फायनान्स यासारखे विभाग तयार केले गेले. प्रत्येक विभागासाठी एका प्रमुखाची नेमणूक झाली. या सर्व विभागप्रमुखांचा मिळून तयार झाला तो कोअर ग्रुप किंवा अष्टप्रधान मंडळ! प्रत्येकाची कामं निरनिराळी पण ध्येय मात्र एकच : शंभर कोटींचा जादुई आकडा गाठायचा. पाहता पाहता प्रभुदेसाई यांचं स्वप्न हे कंपनीत सर्वांचं स्वप्न बनलं. सर्वजण कामाला लागले. हर हर महादेव!
स्वप्नपूर्तीचा मुहूर्त चुकला पण स्वप्नपूर्ती मात्र झालीच. २००९ साली शंभर कोटींची उलाढाल करण्याचं उद्दिष्ट होतं ते २०१३ साली पूर्ण झालं. मधल्या काळात उलाढालीबरोबरच सर्व बाबतींत दहा पटींनी वाढ झाली. सुरुवातीला चार-पाचच उत्पादनं होती. त्यांची संख्या आता पन्नासच्या घरात गेली. सर्वांचं ब्रँडनेम ‘पीतांबरी' हेच राहिलं, पण होमकेअर, हेल्थकेअर, ॲग्रिकेअर आणि फुडकेअर असे चार स्वतंत्र विभाग तयार झाले. तांबं आणि पितळ चकचकीत करण्याच्या पावडरबरोबरच चांदीची भांडी लखलखीत करणारी ‘रुपेरी' नावाची पावडर आली. वेदनाशामक क्युअर ऑनसारखं तेल आणि अनेक रोगांवर गुणकारी अशी गोमूत्र प्लस कॅप्सुल आली. वसुंधरा बेबी मसाज ऑइल आलं. सुपारीविरहित पाचक मुखवास आला. राजकेशी हेअर ऑइल आलं. शिवाय सप्तशक्ती तीळ तेल, भूशक्ती शेंगदाणा तेल आणि राईसब्रान ऑइलही आलं.
ज्या प्रमाणात उत्पादनांची संख्या वाढली आणि त्यांना मागणी वाढली त्या प्रमाणात उत्पादनाची क्षमता वाढवणंही आवश्यक होतं. त्यामुळे पूर्वी फक्त ठाण्यात असलेली फॅक्टरी पुरेनाशी झाली. मग गुजरातमध्ये वडोदरा इथे दुसरी फॅक्टरी सुरू झाली, तर हिमाचल प्रदेशात बद्दी इथे तिसरी सुरू झाली. उत्पादनाबरोबरच बाजारपेठ विस्तारणंही आवश्यक होतं. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर विक्री वाढवणं आवश्यक होतं. सध्या देशातल्या चोवीस राज्यांमध्ये आणि जगातल्या पंधरा देशांमध्ये ‘पीतांबरी' उत्पादनं विकली जातात. त्यासाठी दीडशे सुपरस्टॉकिस्ट, तीन हजार वितरक आणि पाच लाख दुकानदार यांचं प्रचंड जाळं तयार झालेलं आहे. सुरुवातीला हा सगळा कारभार सांभाळायला कंपनीत जेमतेम पन्नास-शंभर माणसं होती. आता त्यांचा आकडा साडेअकराशेच्या घरात गेला आहे. आधीचे सर्व विभाग जोरदार कार्यरत असतानाच आर. अँड डी.बरोबरच आय.टी. विभागही सुरू झाला आहे.
शंभर कोटींची उलाढाल करणारे मराठी उद्योजक तयार होऊ शकतात का, या व्यासपीठावरून विचारल्या गेलेल्या प्रश्नाला प्रभुदेसाई यांनी प्रत्यक्ष कृतीमधून उत्तर दिलेलं आहे. जर इच्छा प्रबळ असेल आणि दीर्घकाळ कष्ट करण्याची तयारी असेल तर शंभर कोटींचे मानकरी ठरतील असे अनेक मराठी उद्योजक तयार होऊ शकतात, असं खणखणीत उत्तर प्रभुदेसाई यांची कृती सांगते. सध्या शंभर कोटींचा टप्पा गाठलेले प्रभुदेसाई पुढच्या काही वर्षांत पाचशे आणि हजार कोटींचा टप्पा ओलांडतील यात शंकाच नाही.
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.
