आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला

  • शिल्पा दातार
  • 20.11.25
  • वाचनवेळ 9 मि.
punyastambh

सुनीता धनवटे यांची पुण्यस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनी नगरमधल्या राहता तालुक्यामधील पुणतांबा सुरु झाली असली तरी ती तर देशभरात प्रसिद्ध झाली आहे. एक महिला ही शेतकरी उत्पादक कंपनी उभी करते आणि त्यातून शेतमाल विक्रीसाठी देशभरातल्या बाजारपेठांमध्ये नावलौकिक मिळवते, हा प्रवास सोपा नाही.

हे काम कसं उभं राहिलं?

शेतकरी कर्ज काढून बी-बियाणं, कीडनाशकं विकत आणतो. आपल्या शेतात शेतमाल पिकवतो. राब राब राबतो. ऊन-पावसाचा खेळ सहन करत आपलं उभं पीक हातात यायची वाट बघतो. पीक काढणी झाल्यानंतर त्याच्या शेतमालाचा बाजारपेठेपर्यंतचा प्रवास सुरू होतो. पण त्याच्या आणि ग्राहकांच्या मधे उभी असते त्याला लुटणारी एक व्यवस्था. ही व्यवस्था असते, दलाल, अडते, व्यापाऱ्यांची. घाम गाळतो शेतकरी आणि मजले चढतात व्यापाऱ्यांचे, अशी म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. व्यापारी ठरवतात तो बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतो, तो बाजारभाव अर्थातच व्यापाऱ्यांच्या फायद्याचा असतो. शिवाय, एखादा शेतकरी आपला शेतमाल पाटीत किंवा टेंपोत भरून बाजार समित्यांमध्ये विकायला गेला तरी त्याला तिथे वाईट वागणूक मिळते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य दर मिळावा, त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती झाली. म्हणजे शेतकरी स्वतःचा शेतमाल स्वतःच विकतील. पण या शेतकरी उत्पादक कंपन्या आतापर्यंत पुरुष शेतकऱ्यांच्याच असल्याचं चित्र होतं. ते चित्र बदलण्याचा प्रयत्न सुनीताताईंनी केलाय.

सुनीता या मूळच्या नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातल्या पुणतांब्याच्या शेतकरी. त्या सांगतात, ‘‘आमच्या शेतात त्या त्या हंगामात सोयाबीन, ऊस, गहू, मका, कांदा आणि त्या जोडीला ज्वारी, हरभराही आम्ही घेत होतो. शेतमाल पिकवता येत होता, पण त्याची विक्री करता येत नव्हती. व्यापारी शेतमाल खरेदी करायला बांधावर आले, की ते आपली फसवणूक करताहेत, हे कळत नव्हतं. आम्ही खूप कष्ट करून, वाऱ्यापावसाच्या लहरीवर शेती पिकवायची आणि हातात किती पैसे मिळायचे? कष्टाच्या मानाने अत्यल्प. या गोष्टीवर मी नेहमी विचार करायचे.’’

सुनीताताईंच्या कामाची सुरुवात झाली ती २००८-२००९ या काळात. त्यावेळी गावात महिलांचे बचतगट होते. सुनीताताई गावातील महिला स्वयंसहाय्यता गटासाठी काम करायच्या. सोबतच त्या इतर गटांच्याही संपर्कात होत्या. या बचतगटांमधून महिलांना आर्थिक ज्ञान मिळत गेलं. बँकेत खातं कसं उघडायचं, आर्थिक व्यवहार कसे करायचे, वैयक्तिक पातळीवर तसेच गटात राहून एकत्र व्यवसाय कसा करायचा, त्यासाठी कर्ज कसं घ्यायचं, याची संपूर्ण माहिती त्यांना बाभळेश्वर विज्ञान केंद्रात मिळत असे. तसेच कृषि उत्पादनात वाढ कशी करायची, औजारं कशी घ्यायची, कोणती खतं वापरायची, नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, याची माहिती ‘आत्मा’मध्ये (ATMA ही महाराष्ट्रातील कृषितंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था आहे.) दिली जात असे. तिथे शेतकरी बचतगटांचं प्रशिक्षणही नियमित घेतलं जातं. कृषि सहाय्यक एच. आर. चोळके हे बचतगटांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. प्रत्येक बचतगटात दहा ते एकोणीस शेतकरी असत. त्यावेळी पापड्या, कुरडया, लोणची, मसाले, जाम असे घरगुती पदार्थ तयार करून त्यांची विक्री करायला काही महिला बचतगटांनी सुरुवात केली होती.

त्यावेळी त्या शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांबद्दलच्याही चर्चा ऐकत असत. त्या कंपन्यांशी संबंधित शेतकऱ्यांशी बोलत असताना महिलांसाठीही असं काहीतरी चांगलं काम उभं करायला हवं, अशी चर्चा होत असे. महिला आपल्या शिवारातल्या शेतमालाच्या विक्रेत्या झाल्या तर त्या माध्यमातून चांगला व्यवसाय उभा करता येईल, असा त्यामागे विचार होता. महिला बचतगटांमुळे त्या आर्थिक बचत करायला शिकलेल्या असतातच; एफपीसीमुळे (फार्मर प्रोड्युसर कंपनी) त्या आपला शेतमाल स्वतः विकू शकतात. निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे बोलण्यात, वावरण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. त्या उत्तम उद्योजक होऊ शकतात.

एकदा ‘आत्मा’मध्ये शेतकऱ्यांचं प्रशिक्षण सुरू असताना विप्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना शेतकरी उत्पादक कंपनीविषयीची व्यवस्थित माहिती दिली. ‘तुम्हीही कोणत्याही व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता तुमचा शेतमाल स्वतःच विकू शकता’, हेही सांगितलं. ही गोष्ट सुनीताताईंनी मनावर घेतली आणि महिला शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करायची, असं ठरवलं. त्यांची बचतगटांतली धडाडी आणि नेतृत्वगुण पाहून कुटुंबातूनही त्यांना सहकार्य मिळालं.

दरम्यान, २०१५ साली त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं. संपूर्ण माहिती घ्यायलाच त्यांना दीड-दोन वर्षं लागली. जिल्हा स्तरावर त्या जाणकारांकडून माहिती मिळवू लागल्या. छोटे छोटे व्यवसाय करत असताना आर्थिक साक्षरता चांगल्यापैकी झालेलीच होती. आता त्याच्या पुढचं पाऊल टाकायचं होतं, ते म्हणजे स्वतःचा शेतमाल स्वतः बाजारपेठ मिळवून विकण्याचं. दरम्यानच्या काळात त्यांनी सेंद्रिय म्हणजेच विषमुक्त शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी गांडुळखताचं, शेणखत, जिवामृतसारख्या आवश्यक गोष्टींचं उत्पादनही करायला सुरुवात केली होतीच. स्वतः विषमुक्त शेती करत असताना इतर शेतकऱ्यांनाही त्याचं महत्त्व त्यांच्या बांधावर जाऊन सांगायला लागल्या होत्या. रासायनिक खतांनी पिकं वेळेआधीच सोन्यावाणी पिकतात; पण त्यातून माणसाच्या शरीरात घातक रसायनं जातात, सेंद्रिय शेती केल्यानं पिकं त्या तुलनेत भराभरा वाढत नसली तरी त्यातलं अन्न खाणाऱ्याला आपण पोषणमूल्यही देत असतो, हे त्या समजावून सांगत होत्या. यातून त्यांच्या गावातल्याच नव्हे, तर पंचक्रोशीलतल्या अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. जमिनीचा पोतही समाधानकारक होऊ लागला.

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतातील अन्नधान्याला, भाजीपाल्याला बाजारपेठेत चांगली मागणी असते. शहरी भागातही त्याची मागणी वाढलीय, हे त्यांना माहीत होतंच. आता शेतकरी उत्पादक कंपनीचं महत्त्व समजावून सांगण्यासाठीही त्या बचतगटातील महिलेच्या वस्तीवर, गावात जाऊ लागल्या. सुनीताताई सांगतात, ‘‘सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना कोणालाच पटत नव्हती. ती मोठी जोखीम वाटत होती. आधीच महिलांना घरी, शेतशिवारात काम करावं लागतं, त्यात हा पसारा कुठून सांभाळणार, असेही प्रश्न आले. आम्ही महिन्याला होणाऱ्या मीटिंगमध्ये महिलांच्या घरच्यांना बोलावून त्याचं महत्त्व समजावून द्यायला लागलो. त्यांना विश्वासात घेऊन, ‘तुम्ही पाठींबा देणार असाल तर आम्ही काहीतरी चांगलं करू’, असंही सांगितलं. शेवटी एकेक जण तयार होऊ लागला.’’

शेतकरी उत्पादक कंपनी उभी करायची असेल तर आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल देण्यासाठी मोक्याची जागा हवी, हा विचार करून जागेचा शोध सुरू झाला. पुणतांबा - श्रीरामपूर रस्त्यावर जागा मिळाली. तिथे सुनीताताईंनी २०१५ मध्ये पुण्यस्तंभ महिला शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. त्यांच्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये पाच महिला डायरेक्टर आहेत. दीडशेहून अधिक महिला या कंपनीशी जोडलेल्या आहेत. महा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे महाव्यवस्थापक योगेश थोरात यांचं मार्गदर्शन यावेळी मोलाचं ठरलं. त्यांना महाएफपीसीने मार्केटिंगसाठी पूर्ण प्रशिक्षित केलं. शेतमाल स्वच्छ असेल तर चांगला बाजारभाव मिळतो, हे लक्षात घेऊन ‘आत्मा’ अंतर्गत ग्रेडिंगचं मशीन घेतलं. बाजारपेठेत शेतमाल पाठवायचा तर त्याचा दर्जा चांगला हवा, त्याचं पॅकिंग चांगलं हवं. ते सगळं करायला एफपीसीमधल्या महिलांना शिकवलं आहे.

सुनीताताई सुरुवातीचा अनुभव सांगतात, ‘‘कंपनी सुरू केल्यावर पहिल्या वर्षी तुरीनंतर, दुसरा सीझन कांद्याचा होता. तिसऱ्या वर्षी शेतमालाची काढणी झाली आणि नदीला पूर आला. पुराचं पाणी गोण्यांमध्ये शिरलं. सात टन माल खराब झाला. पण आम्ही हिंमत सोडली नाही. आम्ही दुसरीकडून दर्जेदार माल विकत घेऊन बाजारपेठेला वेळेवर पुरवला. दिलेला शब्द पाळला, त्यामुळे नाव खराब झालं नाही. या व्यवसायात वेळेचं गणित खूप महत्त्वाचं असतं.’’

शेतकऱ्यानं मधली व्यापाऱ्यांची फळी बाजूला सारून शेतमाल स्वतःच विकला तर व्यापारी खवळणारच. तसाच काहीसा अनुभव त्यांना आला. परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादक कंपनीला माल देऊ नये, यासाठी व्यापारी प्रयत्न करत होते. कंपनीनं रजिस्ट्रेशन चालू केलं, की आपण शेतमालाला दर जास्त द्यायचा, म्हणजे शेतकरी पुन्हा आपल्यालाच माल देतील, असा विचार त्यामागे होता. त्यातून सुनीताताईंनी त्याच पद्धतीनं प्रस्थापित व्यवस्थेला उत्तर दिलं. त्या शेतकऱ्यांना सांगत, माल घेऊन या. गाडीभाडं तुम्ही द्या, हमाली आम्ही देऊ. हा व्यवहार पटल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणावर ‘पुण्यस्तंभ’मध्ये येऊ लागले.

सुनीताताईंची ही उत्पादक कंपनी परिसरातील सुमारे दीड-दोन हजार शेतकऱ्यांकडचा दर्जेदार शेतमाल घेते आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवते. कांदा, मका, सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीची वार्षिक उलाढाल आज दोन ते अडीच कोटी रुपये आहे. महिला शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे आज या कंपनीचं नाव पंचक्रोशीत पोहोचलं आहे. आपण आपला शेतमाल कुणाला विकायचा, याबाबत त्यांना निवडीचं आणि विचारांचं स्वातंत्र्य असल्यानं सारासार विचार करून त्या निर्णय घेतात. तसेच क्रेडिट आणि आर्थिक सेवांमध्ये प्रवेश झाल्याने त्या आपले आर्थिक व्यवहार स्वतःच पाहण्याइतक्या सक्षम होताहेत. याबरोबरच अधूनमधून या महिलांच्या कार्यशाळा घेणं, कामाव्यतिरिक्त भेटीगाठी घेणं, वस्तीवर जाऊन त्यांच्यासाठीच्या योजना समजावून सांगणं ही कामंही सुनीताताई करत असतात. उदा. सोलर, मुक्त गाय गोठे, विषमुक्त शेती अशा अनेक विषयांवर त्या मार्गदर्शन करतात. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा वसाच त्यांनी घेतलाय.

ही धडपड पाहून महाएफपीसीकडून त्यांना एक मोठा प्रकल्प दिला गेला. या प्रकल्पांतर्गत एक हजार मेट्रिक टनांची कांदे साठवण्यासाठीची आधुनिक कांदा चाळ उभी केली गेली. त्यासाठी १९ क्लस्टर तयार केले. त्यात ‘पुण्यस्तंभ’चाही समावेश होता. या प्रकल्पासाठी सुनीताताईंना महिला शेतकरी उत्पादक म्हणून थेट दिल्लीला जायला मिळालं. त्यानंतर कांद्याबरोबर हरभरा, मका, तूर या पिकांच्या विक्रीसाठी आणि बाजारपेठ मिळवण्यासाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली. आता ‘पुण्यस्तंभ’अंतर्गत मालाचं ग्रेडिंग, पॅकिंग करून तो देशांतर्गत बाजारपेठांमध्ये पाठवला जातो. सरकारच्या ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या कंपन्यांना तसेच खासगी बाजारपेठेची गरज पाहून तिथेही त्या शेतमाल पाठवतात. संगणकावर काम करायला, ऑडिटला त्यांनी प्रशिक्षित पगारी माणसं नेमली आहेत. ट्रान्स्पोर्टच्या गाड्या येऊन त्यांचा माल बाजारपेठेपर्यंत घेऊन जातात. त्याचा सगळा व्यवहार महिला पाहतात. पुण्यस्तंभमध्ये सुमारे दीड हजार टन शेतमाल साठवण्यासाठीचं स्टोरेज आहे. दररोजच्या बाजारभावाची माहिती ऑनलाईन समजते. कोणत्या शेतकऱ्याचा किती शेतमाल विकला गेला, त्याला किती बाजारभाव मिळाला, हे ऑनलाईन समजतं. शेतमाल दिलेल्या शेतकऱ्यांची आवश्यक कागदपत्रं स्कॅन करून त्याची माहिती पोर्टलमध्ये भरली जाते. गेल्या तीन वर्षांत व्यवहार ऑनलाईन झाल्याने काम सोपं झालंय, असं त्या सांगतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे दहा ते बारा दिवसांतच एकरकमी त्यांच्या खात्यात जमा होतात. बरेचदा अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असते तेव्हा सुनीताताई त्यांना शेतमाल घेतल्यावर लगेच काही रक्कम देऊ करतात. त्यांच्याकडून सध्या चेन्नई, हैदराबाद, दिल्लीच्या मदर डेअरीमध्ये शेतमाल पाठवला जातो.

सुनीताताईंबरोबर काम करणाऱ्या १८० महिलांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाला असून त्या आता उत्तम व्यावसायिक झाल्या आहेत. एकेकाळी त्या बँकेची पायरीही चढल्या नव्हत्या. स्वयंसहाय्यता गट, त्यानंतर छोटे-मोठे व्यवसाय ते महिला शेतकरी उत्पादक कंपनीची सदस्या असा त्यांचा प्रवास आता त्यांना लाखो रुपये मिळवून देतोय. आज त्यांच्या खात्यात स्वकष्टाच्या आणि कौशल्याच्या बळावर लाखांमध्ये पैसे जमा होतात.

महिला शेतात राबतात, पण शेतमाल विकण्याच्या प्रक्रियेत मात्र त्यांचा सहभाग नाही, हे सर्वसाधारण चित्र सुनीताताईंच्या कंपनीने त्यांच्या स्तरावर बदललं आहे. उत्पादनापासून विक्रीपर्यंत या महिलांचा सहभाग असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती तर सुधारली आहेच पण सामाजिक प्रतिष्ठाही वाढली आहे. महिला शेतकऱ्यांसाठी राज्यभर पुण्यस्थंभ सारख्या संस्था उभ्या राहण्याची गरज आहे. आता इतर शेतकरी महिलांना ‘पुण्यस्तंभ’चा आदर्श घ्यावा वाटतोय. सुनीताताई सांगतात, ‘‘आमचं पाहून काही महिला शेतकरी आमच्यासारखं काम करू पाहत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. ’’

शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना येण्याआधी शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दलाल, अडते, बाजार समित्यांवर अवलंबून राहत असत. बरेचदा ते घट पकडून शेतमाल घेत आणि त्याला खुलेआम फसवत असत. तिथे गेल्यावर नक्की वजन किती आहे, हे कळत नसे. पण शेतकरी उत्पादक कंपनीचं काम करता करता व्यापाऱ्यांचा भ्रष्ट व्यवहार लक्षात यायला लागला. एकदा मापात पाच किलो दगड होते. कंपनीत आल्यावर वजन केलं तेव्हा लक्षात आलं, की त्यांच्या आणि आमच्या मापात सहा क्विंटलचा फरक पडायचा. सुनीताताई असे अनेक गैरप्रकार उलगडून सांगतात.

शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com

शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results