‘अमूल ही दुधापासून चविष्ट पदार्थ तयार करणारी कंपनी आहे. अमूलची सर्वच उत्पादनं ग्राहकांमध्ये लोकप्रिय असून, दरवर्षी अमूलच्या उलाढालीत विक्रमी वाढ होते', या आणि अशा काही गोष्टींशिवाय अनेकांना अमूलबद्दल फारसं काही ठाऊक नसतं. अमूलच्या जाहिराती, विक्रीव्यवस्थेतला सफाईदारपणा पाहता ‘अमूल' हे एखाद्या बड्या कंपनीचं उत्पादन आहे, असं कुणालाही वाटू शकतं. पण खरी गोष्ट अशी आहे की, अमूल हा ग्रामीण भागातील लोकांनी उभारलेला अस्सल भारतीय ब्रॅण्ड आहे. हा ब्रॅण्ड यशस्वी केला आहे तो दूध उत्पादन करणाऱ्या हजारो खेड्यातील लाखो शेतकऱ्यांनी. त्यामुळेच अमूलकडे एक दमदार लोकचळवळीची कथा म्हणून पाहिलं जातं.
अमूलचं योगदान हा वास्तविक एका मोठ्या ग्रंथाचाच विषय आहे. मात्र थोडक्यात सांगायचं झालं तर ‘अमूल' नावाच्या चळवळीने भारतात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या संदर्भात एक जबरदस्त आदर्श घालून दिला. दुधाचा महापूर आणण्याचा मार्ग निर्माण केला. डेअरी तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण बनत दूध व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली. दूध उत्पादन हे शेतीतलं केवळ दुय्यम उत्पन्नाचं साधन नसून तो परिपूर्ण व्यवसाय आहे, हे सप्रमाण सिद्ध केलं. अमूलच्या सहकारी चळवळीचा व्यापक परिणाम असा झाला की, आज भारतातील सुमारे एक कोटी शेतकरी दूध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात आहेत. या व्यवसायामुळे कोट्यवधी लोकांना रोजगार मिळालेला आहे.
अमूल म्हणजे अमूल्य. दूध उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांच्यात विश्वासाचा अनोखा बंध निर्माण करणारी अमूल ही खरोखरच मौल्यवान चळवळ आहे. गुजरात राज्याच्या चरोत्तर भागात या चळवळीचं बीजारोपण झालं. आज गुजरात राज्यातील बारा जिल्ह्यांमधले २४ लाख शेतकरी अमूलचे प्राथमिक दूध उत्पादक सभासद आहेत आणि या सदस्यांनी बारा हजार दूध सोसायट्या स्थापन केलेल्या आहेत. अमूलच्या प्लान्टमधील यंत्रं रोज ७४ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेची आहेत. बारा हजार दूध सोसायट्या रोज (सकाळ-संध्याकाळ) सरासरी ५७ लाख लिटर दूध संकलित करतात. २००४-२००५ या काळात अमूलने वर्षभरात २.०८ अब्ज लिटर दूध संकलित केलं. अमूलकडे रोज ५११ मेट्रिक टन दुधाची भुकटी तयार करण्याची यंत्रणा असून, २३४० मेट्रिक टन पशुखाद्य ‘अमूल' बनवतं.
सहकारी चळवळीतून इतकं मोठं यश मिळवणारं ‘अमूल' हे जगातलं एकमेव उदाहरण ठरावं. वास्तविक सहकारी चळवळीच्या संदर्भात महाराष्ट्राचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं. सहकारी साखर कारखान्यांच्या चळवळीने महाराष्ट्राला समर्थ बनवलं खरं, पण आज त्याच महाराष्ट्रात ही चळवळ दुर्बल बनलेली आहे. पण अमूलच्या अगदी प्राथमिक सदस्यालाही त्याचे अधिकार आणि फायदे आजही मिळत आहेत. विकल्या जाणाऱ्या प्रत्येक उत्पादनाचा मोबदला त्याला मिळतोय. अमूलने हा बंध आणि विश्वास जपल्यानेच त्यांच्या प्राथमिक सदस्यांच्या दूध सोसायट्यांच्या संख्येत सातत्याने घवघवीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीची कंपनी झाल्यावरही अमूल ब्रॅण्डने शेतकऱ्यांसोबत नातं तोडलं नाही आणि शेतकरी हा मालक आहे याचा विसरही कधी पडू दिला नाही. अमूल शेतकऱ्यांना नि दूध उत्पादकांना कधी विसरला नाही, कारण त्यांच्यासाठीच या प्रयोगाची उभारणी साठ वर्षांपूर्वी झाली होती.
शेतकऱ्यांविषयीच्या कळकळीतून सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रेरणेने या प्रयोगाला चालना मिळाली होती. त्या काळात गुजरात आणि देशाच्या इतर भागांतही दुधाचे व्यापारी आणि दलाल दूध उत्पादकांची प्रचंड पिळवणूक आणि कोंडी करत असत. या प्रश्नाची जाण असल्याने शेतकऱ्यांनी स्वत:ची एक संघटना उभी करावी, अशी सरदार पटेल यांची इच्छा होती. त्यांच्या या विचाराला मूर्त स्वरूप दिलं ते त्रिभुवनदास पटेल यांनी. हेच त्रिभुवनदास पटेल गुजरातमध्ये स्थापन झालेल्या खेडा दूध सहकारी संघटनेचे संस्थापक आणि प्रवर्तक बनले. गुजरातमधील खेडा जिल्हा आणि आणंद, बोरसाद, नडीयाट, पेटलाद हे चार तालुके मिळून बनलेला भाग चरोत्तर या नावाने ओळखला जातो. सुपीक जमीन, चराऊ कुरणं आणि मुबलक पशुधन यामुळे चरोत्तर भागातून नेहमीच दुधाचा मुबलक पुरवठा झालेला आहे. मात्र दूध विक्री आणि वितरणाची सुयोग्य यंत्रणा नसल्याने दुधाचे व्यापारी आणि मध्यस्थ यांच्याकडून दूध उत्पादकांना कधीच योग्य मोबदला मिळत नसे. स्वत: सरदार वल्लभभाई पटेल याच चरोत्तर विभागातले असल्याने त्यांनी या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी शेतकऱ्यांची सहकारी संस्था सुरू करण्याचा विचार बोलून दाखवला. त्यांच्या प्रेरणेने ४ जानेवारी १९४६ रोजी आणंद तालुक्यातील समरखा या खेड्यात ‘खेडा सहकारी दूध संघ' या नावाने दूध चळवळीचा पाया घालण्यात आला. या प्रसंगी हजारो शेतकरी उपस्थित होते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे विश्वासू सहकारी या नात्याने सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मोरारजीभाई देसाई उपस्थित होते.
संस्था स्थापन झाली तरी सुरुवातीला खेडा दूध संघाला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. पण संस्थेला त्रिभुवनदास पटेल यांच्यासारख्या सच्च्या, गांधीवादी विचारांचं पाठबळ लाभलेल्या नेत्याचं नेतृत्व लाभलं होतं. हा प्रयत्न शेतकऱ्याच्या भल्यासाठी आहे, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधत त्रिभुवनदास यांनी वर्षभरात चरोत्तर भागात पाच प्राथमिक दूध सहकारी संस्था स्थापन केल्या. पुढे त्यांनी ७० संस्थात्मक सदस्य जोडले. वर्षभराच्या अखेरीस त्रिभुवनदास पटेल यांनी या प्राथमिक संस्थांचा एक संघ स्थापन करण्यात यश मिळवलं आणि ‘खेडा सहकारी दूध उत्पादक संघ' या नावाने १४ डिसेंबर १९४६ मध्ये त्याची नोंदणी करण्यात आली.
दूध संघ स्थापन झाल्यावर मात्र चरोत्तर भागातल्या सर्व थरांतून दूध उत्पादकांचा प्रतिसाद मिळू लागला आणि त्यात सातत्याने वाढ होऊ लागली. दूध संघाच्या सभासदांना दुधाची दिवसातून दोनदा वाजवी किंमत मिळू लागल्याचा अपेक्षित परिणाम इतरांवरही झाला आणि तेही दूध संघाशी जोडले गेले. १९४८, १९४९ आणि १९५० पर्यंत प्राथमिक संस्था आणि प्राथमिक दूध उत्पादक सभासद यांची संख्या वाढत राहिली. १९५० मध्ये २७ प्राथमिक दूध संस्था आणि दोन हजार दूध उत्पादक खेडा सहकारी दूध उत्पादक संघटनेत सहभागी झालेले होते.
दुधासारख्या नाशवंत पदार्थांच्या संकलनाची पद्धत जशी दूधसंघाने लावून दिली, तसाच दुधाचं वितरण आणि विक्रीचा मार्गही आधीच मोकळा करून घेतला गेला. शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून शासनाला ‘बॉम्बे मिल्क स्किम'साठी दूध घेण्यास या संघटनेने भाग पाडलं. दूध संघाचा हा पहिला विजय म्हणता येईल. कारण त्यामुळे दूध व्यापारी आणि दलाल यांच्या कारवायांना आळा बसला. बॉम्बे स्किमला या संघटनेतर्फे रोज ५ हजार लिटर दुधाचा पुरवठा व्हायचा. ही गोष्ट आहे १९५०मधली. एका बाजूला या प्रकारे प्रगती होताना खेडा सहकारी दूध उत्पादक संघटनेसमोर नवी आव्हानंही उभी राहत होती. प्राथमिक दूध सोसायट्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने संघटनेकडे दुधाचं संकलनही मोठ्या प्रमाणात होत होतं. हिवाळ्यात तर हा ओघ आणखीनच वाढत असे. बॉम्बे मिल्क स्किम मात्र जास्तीचं दूध घेण्यास टाळाटाळ करत होती. या दुधाचा योग्य तऱ्हेने वापर होणं तर आवश्यक होतं. मग दुधापासून बटर आणि दूध पावडर बनवण्याचा प्लान्ट टाकण्याचा निर्णय घेतला गेला. सर्वप्रथम दुधाची दीर्घकाळ साठवण करण्यासाठी निर्जंतुकीकरण आणि शीतलीकरण यंत्रांची जास्त आवश्यकता होती. ही दोन्ही यंत्रं आणंदच्या शासकीय दुग्धशाळेत पडून होती. मग त्रिभुवनदास पटेल यांनी दूध संघासाठी ती भाड्याने मिळवली. निर्जंतुकीकरणाचं यंत्र एवढं खराब झालेलं होतं, की ते नव्याने घेणं हाच पर्याय होता. या टप्प्यावर डॉ. वर्गिस कुरियन यांचा सहकारी दूध चळवळीत प्रवेश झाला. ‘अमूल क्रांती'ला नवी दिशा मिळाली.
डॉ. कुरियन मूळचे केरळचे. त्यांनी भारत सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयाची पदवी मिळवली होती. योगायोगाने त्यांना डेअरी तंत्रज्ञानाचं विशेष प्रशिक्षण घ्यावं लागलं. वास्तविक त्यांना युनियन कार्बाइड या अमेरिकी कंपनीच्या कोलकाता येथील शाखेत बड्या पगाराच्या नोकरीची संधी आलेली होती. पण शिष्यवृत्ती घेताना मान्य केलेल्या अटींनुसार त्यांना शासकीय नोकरी करणं भाग होतं. त्यावेळी त्यांचं वय होतं केवळ तेहतीस वर्षं. डॉ. कुरियन यांना व्यावसायिक व्यवस्थापनाचं कुशल अंग होतं. बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या कुरियन यांच्याकडे संघटनात्मक कौशल्यही असामान्य होतं. अमूलमध्ये डॉ. कुरियन यांचा प्रवेश झाल्यावर खेडा दूध संघटनेने प्रगतीचे एकेक टप्पे गाठायला सुरुवात केली. १९५५मध्ये संघटनेने खरेदी केलेल्या जागेवर ५० लाख रुपये खर्च करून बटर आणि दूध पावडरचा प्लान्ट उभा राहिला. १९५८मध्ये फॅक्टरीचा विस्तार करून गोड घट्ट दूध (स्वीट कन्डेन्सड् मिल्क) बनवण्याचा विभाग सुरू करण्यात आला आणि याच फॅक्टरीतून पुढे वर्षाला अडीच हजार टन लहान मुलांचं खाद्यान्न (बेबी फूड) आणि सहाशे टन चीज तयार होऊ लागलं. त्रिभुवनदास पटेल, डॉ.वर्गिस कुरियन आणि डॉ. एम. एच. दलाया यांची सर्वांत मोठी आणि महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी व्यावसायिक तत्त्वावर म्हशीच्या दुधाची भुकटी (मिल्क पावडर) आणि त्यापासून बेबी फूड बनवण्यात यश मिळवलं. दुग्ध व्यवसायात ही एक क्रांतीच समजली जाते.तोपर्यंत न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांतही केवळ गायीच्या दुधापासूनच भुकटी बनवली जायची. म्हशीच्या दुधापासून भुकटी आणि लहान मुलांचं खाद्यान्न तयार करण्याचं तंत्र त्यांनाही अवगत झालेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर, दुग्धक्षेत्रात अमूलने अनेक विजयी पताका रोवल्या.
हेही वाचा - स्वातंत्र्याचा सूर्य अंगमेहनती कष्टकऱ्यांच्या घरापर्यंत नेणारा पथदर्शक लढा : हमाल पंचायत
दूध उत्पादनाचा मुख्य आधार म्हणजे पशुधन. ही बाब ओळखून पशुखाद्य बनवणारा अद्ययावत कारखानाही अमूलने उभारला. १९६२च्या सुमारास अमूलने एक मोठी जबाबदारी पार पाडली. १९६२च्या युद्धानंतर सैन्यदलाच्या मागणीनुसार दूध पावडर आणि लोण्याचा पुरवठा ठरल्यावेळेत पूर्ण करून दाखवला. त्यासाठी दुधाची भुकटी बनवण्याचा एक जादाचा प्लान्टही अमूलने उभारला. प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न अमूल करत होतं, हे त्यातून कळतं. प्रगतीचा, वाढीचा आणि भरभराटीचा हा प्रवास वर्षानुवर्षं चालू आहे. मात्र अमूलचं योगदान त्यापेक्षा वेगळंच आहे. हे योगदान अमूल वापरत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा किंवा अमूलने जी विविध उत्पादनं बाजारात आणली त्यापेक्षा वेगळं आहे. अमूलने मिळवलेल्या नफ्यापेक्षा किंवा अब्जावधी रुपयांच्या उलाढालीपेक्षाही ते वेगळं आहे. ग्रामीण भागातल्या असंघटित शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या माध्यमातून एक शाश्वत आणि आधुनिकतेचा स्पर्श असणारी अर्थव्यवस्था आणि यंत्रणा उभी करणं, हे ‘अमूल'चं खरं वैशिष्ट्य आणि योगदान आहे. अमूलने किंवा आणंद पॅटर्नने केवळ एक व्यवसाय उभा केला नाही, तर त्या माध्यमातून लोकशाहीची मुळं खोलपर्यंत नेली. म्हणूनच ‘आणंदचा नमुना म्हणजे केवळ त्यांनी उभारलेली इमारत आणि हाती घेतलेले उद्योग नसून विशिष्ट मूल्यं, ध्येय आणि तंत्र यांच्या पायावर उभारलेला आदर्श आहे' असं अमूलबद्दल अभिमानाने म्हटलं जातं.
अमूल म्हणजे विश्वास, हा वस्तूपाठ अमूलने आपल्या आदर्शवत ठरलेल्या दूध संकलन व्यवस्थापनातूनही घालून दिलेला आहे. या व्यवस्थापनाचा आवाका प्रचंड आहे. गुजरातमधील १२ जिल्ह्यांतील १२ हजार दूध सोसायट्यांमध्ये रोज सकाळ आणि संध्याकाळ दूध संकलित केलं जातं. दूध केंद्रावर बहुतेक सर्व महिलाच असतात. हिंदू, मुस्लिम, दलित, आदिवासी, ख्रिश्चन महिला डोक्यावर, खांद्यावर दुधाच्या कासंड्या घेऊन रांगेत उभ्या असतात. प्रत्येक सभासदाजवळ एक पासबुक असतं. सोसायट्यांचे तज्ज्ञ सेवक मांडी घालून खाली बसलेले असतात. दुधाचा नमुना काढून दुधाची तपासणी करून घेतल्यावर मोठ्या बरणीत दूध ओतलं जातं. दूध किती भरलं हा आकडा मोठ्याने सांगितला जातो. त्याची नोंद पासबुकात आणि सोसायटीच्या खतावणीत करण्यात येते. दुसऱ्या एका खतावणीतील नोंदीच्या आधारे आधी संकलित केलेल्या दुधाचा चुकारा सभासदाला देण्यात येतो. त्याचीही नोंद पासबुक आणि खतावणीत केली जाते. दुधाच्या मोठमोठ्या बरण्या भरलेले ट्रक आणंद आणि त्यांच्या इतर प्लान्टकडेे रवाना होतात. तिथे या दुधावर प्रक्रिया करून त्यापासून चविष्ट दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात.
मात्र दूध उत्पादक सभासद आणि अमूल यांचा संबंध फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही. उत्पादकांच्या गरजा, त्यांचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यातही अमूलने कायमच पुढाकार घेतला आहे. दुधाचा कायम आणि खात्रीशीर पुरवठा व्हावा, पशुधनाचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी जनावरांचा फिरता अद्ययावत दवाखाना आणि कृत्रिम रेतन प्रयोगशाळा या सोयी आणंद संघाने पुरवल्या आहेत. दूध संकलन यंत्रणेच्या माध्यमातून कुठल्या गावातील कुठल्या सभासदाची गाय अथवा म्हैस आजारी आहे, याची खबर मुख्य केंद्राला अक्षरश: तासा-दीडतासात मिळते. पुढच्या तासाभरात जनावरांचा फिरता दवाखाना औषध-उपचारांसह गोठ्याजवळ पोहोचलेला असतो. ही यंत्रणा १९५० पासून अद्ययावत होत होत इथपर्यंत पोहोचली आहे. भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. आणंदचे प्राथमिक सभासद गमतीने म्हणतात, “इथे माणसांपेक्षा जनावरांवर अधिक वेगाने उपचार होतात.”
जनावरांसाठी फिरता दवाखाना, पशुखाद्य अशा गोष्टी आणंद संघाने पुरवल्याच, शिवाय दुधाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बारा जिल्ह्यांतल्या सर्व खेड्यांना रस्त्यांच्या जाळ्यांनी जोडून घेतलं. ‘दूध रस्ते‘ या नावानेच हे रस्ते ओळखले जातात. याशिवाय आणंदने या संपूर्ण दूधक्षेत्रात आरोग्य, शिक्षण, शेती, सिंचन आणि ग्रामविकास या सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे. बचतगटांच्या माध्यमातून सभासद महिलांना आणि सभासद नसलेल्या कुटुंबांनाही सहभागी करून घेतलं आहे. त्यांच्या पारंपरिक हस्तकौशल्याचा उपयोग करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करायला मदत केली आहे. या संदर्भात त्रिभुवनदास पटेल फाऊन्डेशनने फार मोठी कामगिरी केलेली आहे.
हेही वाचा - पर्यावरणस्नेही उद्योजिका -अमिता देशपांडे
अमूलने आणखी एक काम केलं, ते म्हणजे एरवी शेतकऱ्यांना अप्राप्य असलेलं आधुनिक तंत्रज्ञान आणंद पॅटर्नने सगळ्यांना खुलं करून दिलं. ते रोजच्या वापरातही आणलं. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे दूध उत्पादक सजग तर झालेच, शिवाय हे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांनी स्वत:चा विकासही साधला. संघटन, व्यवस्थापन, बचत, योग्य निर्णय याबाबतीत प्रत्येक सभासद जागृत झाला. एका अर्थाने एक नवं जग त्याच्यासाठी खुलं झालं. शेती व्यवस्थेला धक्का न लागता आणंद पॅटर्नच्या माध्यमातून ९०० खेड्यांतून स्वतंत्र रोजगार निर्माण झाले. या खेड्यांचं उत्पन्न वाढलं. दुधापासून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाने कौटुंबिक परिस्थितीही सुधारली. आज गुजरात सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यक्षेत्रातील बारा जिल्ह्यांतील प्रत्येक खेड्यातील प्रत्येक घराचं पन्नास टक्के उत्पन्न दुधाशी जोडलेलं आहे. आणंद पॅटर्नच्या माध्यमातून त्रिभुवनदासजी पटेल, डॉ. कुरियन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्वेतक्रांतीही यशस्वी करून दाखवली. शिवाय देशातील दुग्ध व्यवसायासाठी दिशादर्शक कामही केलं. आणंद पॅटर्न गुजरातमधल्या प्रत्येक जिल्ह्यात राबवला गेला. शिवाय डेअरी बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या संस्था अमूलच्या मदतीने उभ्या राहिल्या. आणंदच्या पशुखाद्य केंद्राचं उद्घाटन करताना पंतप्रधान लालबहादूर शास्त्री म्हणाले होते, “एका अमूलने काम भागणार नाही. अनेक ‘अमूल' ही काळाची गरज असेल.” आणंदने आपला शब्द पाळला. देशभर दुग्धव्यवसाय भरभराटीस आणण्यात अमूलने देशाला अमूल्य असं योगदान दिलं.
साठ वर्षांच्या कालावधीत लक्षावधी रुपयांचं परकीय चलन वाचवून, भारताला दूध व्यवसायात स्वयंपूर्ण बनवून, पन्नासहून अधिक ग्राहकप्रिय दुग्धजन्य उत्पादनं बनवून आणि जागतिक स्तरावर प्रस्थापित होऊनही ‘अमूल' या ब्रॅण्डने व्यवसायाच्या अगदी तळाला असलेल्या शेतकरी सभासदाशी नातं कधीच तुटू दिलं नाही. उलट ते जास्त घट्ट आणि जिव्हाळ्याचं बनवलं. २००४-२००५ साली सुमारे तीन हजार कोटी रुपयांची विक्री उलाढाल करणाऱ्या अमूलच्या यशाचं हे सार आहे.
आणंद पॅटर्नबद्दल बोलताना डॉ. वर्गिस कुरियन (ते स्वत:ला दूधवाला म्हणवून घेतात!) यांनी म्हटलंय- “भारताची सर्वांत मोठी शक्ती म्हणजे सर्वसाधारण माणसाचं सामर्थ्य. या सामर्थ्याच्या जोडीला व्यावसायिक पद्धतीच्या व्यवस्थापनाकडून एकात्म झालेला सहकारी ढाचा उभा करणं हे आणंद पॅटर्नमागचं मूलभूत तत्त्व होतं. त्यात मिळालेलं यश ही या प्रयोगातील सर्वोच्च बाब आहे.”
सर्वसामान्य भारतीयाचं सामर्थ्य, सहकार आणि लोकशाही मूल्यं अंमलात आणणारं व्यवस्थापन या त्रिसूत्रीवर ‘अमूल' उभं आहे. समरखा खेड्यात ६० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या दूध चळवळीने यशाचा कळस गाठताना देशाला दिलेला हा विचार आहे.
(युनिक फीचर्सच्या 'खरीखुरी टीम इंडिया' या पुस्तकातून साभार.)
