
दिल्लीत दरवर्षी गणेशोत्सवातील दहा दिवस ‘दिल्ली हाट' नावाचा बाजार भरतो. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती तिथे भरभरून दाद मिळवते. उकडीचा मोदक, झुणका-भाकरी, असे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ चाखायला दिल्लीकर आवर्जून येतात. दहा दिवसांत तीन-चार हजार मोदक हातोहात खपतात. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा स्टॉल लावायला आलेल्या महिला असतात कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा' संस्थेच्या. या महिलांसाठी दिल्लीत जाऊन मोदक विकणं हा असतो एक आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव. कारण आजवर घराचा उंबराही न ओलांडलेल्या या स्त्रिया पहिल्यांदाच कोल्हापूर सोडून स्वतंत्रपणे राजधानीत जाऊन खाद्यपदार्थ विकतायत. ‘दिल्ली हाट'ला जाऊन आल्यानंतर या महिलांच्यात येणारा आत्मविश्वास त्यांना आयुष्यभर पुरणारा असतो. तिथून या महिला मागे वळून पाहतच नाहीत. दिल्ली हाट एक उदाहरण झालं. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो महिलांना असा आत्मविश्वास देण्याचं काम गेली सोळा वर्षं ‘स्वयंसिद्धा'च्या माध्यमातून घडतं आहे, आणि ही किमया साधणाऱ्या व्यक्ती आहेत कांचनताई परुळेकर.
कोल्हापूर तसं परंपरा जपणारं शहर आहे. इथल्या स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे; पण स्त्रियांनी शिकायचं, नोकरी करायची, अशा पद्धतीनेच प्रगती होत राहिली आहे. पूर्वी कोल्हापुरात बरीच महिलामंडळं होती; पण साड्या, सहली, फार तर एखादी स्पर्धा, अशा साच्यात महिला अडकलेल्या होत्या. चाकोरीबाहेरच्या वाटा हाताळाव्यात, स्वत: काही तरी करून दाखवावं, असं चित्र नव्हतं. अशा परिस्थितीत एका स्त्रीने बँकेतील मोठ्या अधिकाराची, मोठ्या पगाराची नोकरी सोडून देऊन सर्वसामान्य गृहिणींसाठी काही करायचं ठरवलं. नवरा ऑफिसला आणि मुलं शाळेला गेल्यावर दुपारच्या १२ ते ४ वेळेत महिलांनी आपला वेळ निर्मितिक्षम कामात घालवावा, असा विचार काम सुरू करण्यामागे होता.
आज दीड दशकानंतर ‘स्वयंसिद्धा' संस्थेच्या महिला चटणी-पापड विकण्यापासून ते कंत्राटी शेतीपर्यंत पोहोचल्या आहेत. लाखो रुपयांची विक्री त्या करत आहेत. राज्यात, राज्याबाहेर जाऊन आपल्या कौशल्याच्या बळावर हजारो रुपयांसोबत लाखमोलाचा आत्मविश्वास मिळवत आहेत. त्या स्वत: तर बदलल्या आहेतच, पण त्यांनी गावंच्या गावं बदलून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘स्वयंसिद्धा'च्या माध्यमातून कोल्हापूरच्या महिलांनी ‘उद्योजिका' म्हणून जी प्रगती केली आहे त्यामागे कांचनताई परुळेकरांचं अचूक व्यवस्थापन व नियोजनकौशल्य आहे.
कोल्हापुरातील ‘हरिजन सेवक संघा'चे कार्यकर्ते बाळकृष्ण परुळेकर यांच्या कांचनताई या कन्या. ताराराणी शाळेत शिकत असताना ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचं लक्ष या चुणचुणीत, फर्डं भाषण करणाऱ्या मुलीने वेधून घेतलं. नि:संतान असणाऱ्या डॉ. व्ही. टी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सरोजिनीदेवी यांनी कांचनताईंच्या शिक्षणाचा भार उचलला, तिला आपली मानसकन्या मानलं. कांचनताई सुरुवातीला ताराराणी शाळेत शिक्षिका आणि नंतर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी म्हणून काम पाहू लागल्या. याच दरम्यान डॉ. व्ही. टी. पाटील हे त्यांनीच स्थापन केलेल्या ताराराणी विद्यापीठातून बाजूला झाले होते. त्यांनी आपली हयात स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करण्यात घालवली. त्यांचं एखादं स्मारक नॉन-फॉर्मल स्त्रीशिक्षणाच्या स्वरूपात उभं राहावं, अशी इच्छा बाळगणाऱ्या कांचनताईंनी १९९२च्या एप्रिल महिन्यात स्थानिक वर्तमानपत्रात छोटी बातमी दिली. ‘ज्या महिलांना फावल्या वेळात काही करावंसं वाटतं त्यांनी येऊन भेटावं,' अशा आशयाची ही बातमी होती. १३६जणींनी नावं नोंदवली. १ मे १९९२ रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने काचंनताईंनी महिलांची बैठक बोलावली.
महिलांना उद्योजक बनण्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी बँकेचे, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आले. कोल्हापुरात त्या वेळेस छोटे उद्योग करणाऱ्या महिलांना कांचनताईंनी फिरून गोळा केलं. मेळावा उत्तम रीतीने झाला. जमलेल्या महिलांपैकी ६० जणींना काही ना काही गोष्टी चांगल्या रीतीने तयार करता येत होत्या. कांचनताईंनी त्या महिलांना वस्तू तयार करण्यास सांगितल्या. ताराराणी शाळेतील पालकसभेच्या दिवशी व्हरांड्यात वस्तू विकायला ठेवण्यात आल्या. चांगली विक्री झाली.
हा अनुभव गाठीशी बांधून संस्था सुरू करायचं ठरवलं गेलं. डॉ. व्ही. टी. पाटील यांनी संस्थेला नाव सुचवलं, ‘स्वयंसिद्धा'. संस्थेत विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. सुरुवातीला मोजक्याच असणाऱ्या प्रशिक्षण वर्गांची संख्या आजघडीला ८०च्या घरात गेली आहे. इथे माफक दरात वर्षाकाठी हजारो स्त्रिया-मुली विविध कौशल्यं आत्मसात करत आहेत. या शिक्षणातून महिला उत्कृष्ट वस्तू, खाद्यपदार्थ तयार करू लागल्या. या वस्तूंसाठी मार्केट मिळवणं गरजेचं होतं. कांचनताईंनी शक्कल लढवली. ज्या ओळखीच्या, हितचिंतकाच्या, सभासदाच्या घरी हळदीकुंकू समारंभ असेल तिच्या घरी सगळ्या वस्तूंचा एक स्टॉल लावण्यास त्यांनी सुरुवात केली. हळदीकुंकवाला येणाऱ्या महिला वस्तू पाहून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ऑर्डर द्यायला लागल्या. हळूहळू ‘स्वयंसिद्धा'च्या उत्पादनांची मागणी एवढी वाढली की संस्थेत दर बुधवारी ‘बाजार' भरायला लागला.
अनेक महिला पदार्थ, वस्तू इतरत्र विकायला लागल्या. काही लोक मग म्हणायला लागले, “हे काय, तुम्ही लायसन्स नाही काढलं आणि खाद्यपदार्थ विकता? तुमच्यावर केस होईल, पोलिस पकडतील.” त्यावर कांचनताईंचं म्हणणं स्पष्ट होतं. कोणतीही महिला प्रथमच उद्योग करण्यासाठी घराबाहेर पडते किंवा आपण बनवलेलं लोणचं, चिवडा, चिरोटे विकू इच्छिते, तेव्हा सुरुवातीलाच तिला लायसन्स-परमिटविषयी सांगितलं तर ती दचकते. काही करण्याचा विचार ती सोडून देते. त्या टप्प्यावर तिला नियम-कायदे यांची भीती वाटते. त्यामुळे आत्मविश्वास आल्यानंतरच या गोष्टी केलेल्या बऱ्या. शिवाय, ‘काउंटर सेल' करायचा असेल तर फुड लायसन्स लागतं, ‘इन-हाऊस सेल'ला लायसन्सची गरज नसते, ही गोष्ट त्या स्पष्ट करतात. प्रश्नावर उत्तर कसं शोधावं हे कांचनताईंकडून शिकण्यासारखं आहे.
‘स्वयंसिद्धा'च्या वस्तू, पदार्थ म्हटल्यावर लोक आज डोळे झाकून खरेदी करतात. वर्षातून दोन मोठ्ठी प्रदर्शनं कोल्हापुरात लावली जातात. प्रत्येक प्रदर्शनात ६-७ लाख रुपयांची विक्री होते. दिवाळी फराळ दरवर्षी ६ लाखांचा खपतो. सोळा वर्षांत कांचनताईंच्या मार्गदर्शनाखाली अडीच हजार उद्योजिका तयार झाल्या. एक महिला उद्योजक झाली तर तिने आणखी चारजणींना उभं केलं पाहिजे, असं कांचनताईंचं म्हणणं असतं. इतकंच नव्हे, तर आई उद्योजिका झाली तरच मुलं-मुली उद्योजक होतील. महाराष्ट्रातील महिला उद्योजिका बनत राहिल्या तर पुढची पिढी उद्योजक बनेल, असंही त्या सांगतात.
‘स्वयंसिद्धा'चा ‘नीड बेस्ड' प्रोग्राम तयार झाल्यामुळे कोल्हापुरातील महिलांना सक्षम व्यासपीठ मिळालं. एरवी ‘काय, महिलामंडळात गप्पा मारायला का?’ अशी हेटाळणी होणाऱ्या महिलेकडे घरी, कुटुंबात, समाजात आदराने पाहिलं जाऊ लागलं. ‘स्वयंसिद्धा'त जाते म्हणजे काही तरी शिकायला जाते, असं बोललं जाऊ लागलं. त्यामुळे अनेक कर्मठ, परंपरावादी कुटुंबांतील स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. शिकणं-शिकवणं वाढत गेलं. कोल्हापुरातील महिलामंडळांमध्येदेखील बदल झाला. महिलांच्या अनौपचारिक शिक्षणाच्या वाटा आपोआप तयार होऊ लागल्या. स्त्रियांचा कुटुंबात, कुटुंबाबाहेर समाजात निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढायला लागला.
आपल्याकडे स्वयंसेवी संस्था दोन प्रकारच्या पाहायला मिळतात. एक तर ध्येयवादी वृत्तीने पैशाचं महत्त्व नाकारून अगदी तुटपुंज्या साधनसामग्रीत समाजात काम करणाऱ्या संस्था आहेत. दुसरीकडे परदेशांतून फंड, ग्रँट अशा स्वरूपात येणारा लाखो रुपयांचा निधी, ए.सी. इमारतीत ऑफिस, विमानप्रवास, असं स्वरूप पाहायला मिळतं. मात्र कांचनताईंनी या दोन्हींच्या मधला सुवर्णमध्य साधला आहे. ‘कुणाला काही फुकट द्यायचं नाही, कुणाचं काही फुकट घ्यायचं नाही' असं धोरण ठेवल्यामुळे इथे प्रत्येकाला योग्य ते मानधन मिळतं. ज्यांना सेवाभावी वृत्तीने काम करायचं आहे त्यांना वाहनखर्च मिळतो. स्वत: कांचनताई वाहनखर्च वगळता कोणत्याही स्वरूपाचं मानधन घेत नाहीत. त्या व्याख्यानं वगैरेंसाठी मिळालेलं मानधन, पुरस्काराच्या रकमाही संस्थेतच जमा करतात.
कांचनताईंनी सुरुवातीपासूनच महिलांना ‘स्वयंसिद्ध' होण्यास प्रोत्साहन दिलं आहे. उद्योग करणाऱ्या महिलांची ९४ साली ‘स्वयंप्रेरिका औद्योगिक सहकारी संस्था' स्थापन झाली, जिथे टेंडर भरून ऑर्डर दिल्या जातात. जिथे एकटी-दुकटी महिला कमी पडते तिथे ‘स्वयंप्रेरिका' टेंडर वगैरे भरण्याचे सोपस्कार पार पडत असते.
कांचनताईंचं काम फक्त उद्योजिका निर्माण करण्यापर्यंत सीमित नाही. महिलांनी लिहितं झालं पाहिजे. आपलं म्हणणं, मत त्यांना मांडता आलं पाहिजे म्हणून ‘स्वानंद सखी फीचर्स' निर्माण करण्यात कांचनताईंनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लिहिणाऱ्या, लिहू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार झालं. सुरुवातीला ‘स्वयंसिद्धा'ची मदत घेणारी ही संस्था वर्षानंतर स्वतंत्र झाली आहे, सक्षम बनली आहे. तेच बोलणाऱ्या महिलांचं. कांचनताईंनी कोल्हापुरातील वक्त्या, सूत्रसंचालन, कथाकथन करणाऱ्या महिलांसाठी ‘वाणीमुक्ती प्रकल्प' साकारला आहे. इथे वक्ता बँक आहे. महिलांना बोलतं करण्यासाठी विविध शिबिरं, प्रशिक्षिणं घेतली जातात.
कांचनताईंचं काम कोल्हापूर शहरापुरतं मर्यादित नाही. १९९४ साली डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनने ग्रामीण पुनर्रचना कार्यक्रम हाती घेतला. ‘खेडं बदललं पाहिजे' हा विचार घेऊन कांचनताईंनी काम सुरू केलं. सुरुवातीला एखाद्या खेड्याची निवड केली की तिथल्या शाळेत कांचनताई कार्यकर्त्यांसह जात. मुलांना गाणी सांगत, गोष्टी सांगत, खेळ शिकवले जात. गावातील महिलांसाठी आरोग्यशिबिर लावलं जाई. फक्त पाच रुपयांत महिलांची आरोग्यतपासणी करून औषधं दिली जात. आरोग्यशिबिराला जमलेल्या महिलांना आरोग्यशिक्षण दिलं जाई. मग गावात शहरातून आलेल्या कार्यकर्त्यांविषयी आपुलकी तयार होई. गावात असलेल्या बचतगटांना उद्योग प्रशिक्षण, शेतीचं नवं तंत्रज्ञान दिलं जाई. पण बऱ्याच ठिकाणी महिलांचे बचतगट काय करावं हे न उमजून थंड पडलेले कांचनताईंना पाहायला मिळाले. मग कांचनताईंनी ‘आधी उद्योग करा, मग बचतगट बांधा' ही संकल्पना राबवली. पर्स तयार करणाऱ्यांचा ‘बटवा' बचतगट झाला नि कपडे शिवणाऱ्यांचा ‘परिधान' आणि खाद्यपदार्थवाल्यांचा ‘स्वादामृत'. बचतगट उभारताना कांचनताई एक गोष्ट कटाक्षाने करतात. ‘सरकारकडून कर्ज मिळतं, मदत मिळते म्हणून बचतगट काढायचे' हा विचार त्या आधी महिलांच्या डोक्यातून काढून टाकतात. स्वयंसहायता गट म्हणजे स्वत: स्वत:ची मदत करायची आहे, हे महिलांना सांगतात. बचतगटाच्या मीटिंगमध्ये काय करायचं हे त्या सांगतात.
‘प्रत्येक मीटिंग दोन तास असली पाहिजे. अर्धा तास धनव्यवहार होऊ द्यात. अर्धा तास कमावत्या साधनावर चर्चा करा. वीस मिनिटं महिलांच्या आरोग्यावर बोला. अगदी लैंगिक आरोग्याबद्दलही बोललं पाहिजे. वीस मिनिटं नवीन काही तरी शिकलं पाहिजे. उरलेल्या वीस मिनिटांत महिलेला सामाजिक भान आलं पाहिजे,' असं त्यांचं म्हणणं असतं. बचतगटाच्या प्रशिक्षणात कांचनताई सांगत असतात, “गावचं देऊळ माझं आहे असं तुम्हाला वाटतं, पण गावचं गटार माझं वाटतं का? देऊळ तुमचं आणि गटार सरपंचाचं, असं का?” महिलांना कांचनताईंचं म्हणणं पटतं. “तू बदललीस तर तुझं मूल बदलेल, तुझं घर बदलेल, शेत बदलेल. तुझं घर बदललं की गाव बदलेल,” असं त्या पटवून देतात.
‘आपण सरकारच्या दारात जायचं नाही' या भूमिकेवर कांचनताई पहिल्यापासून ठाम आहेत. त्यामुळे योजना, सबसिडी, असल्या फंदात त्या पडत नाहीत. त्या काम सुरू करतात. म्हणूनच २००३ साली कोल्हापूर जिल्हा परिषदेने कृषी सप्तक योजनेअंतर्गत महिलांना कृषी तंत्रज्ञान देण्यासाठी आपणहून ‘स्वयंसिद्धा'ची निवड केली. त्या अंतर्गत राधानगरी तालुक्यातील गावात प्रशिक्षण देणं सुरू झालं, तेव्हा आपल्याला कृषिक्षेत्राची माहिती नाही असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी वाचन सुरू केलं. कृषी विद्यापीठांना भेटी देणं, नर्सरी पाहणं, आधुनिक शेती पाहणं सुरू झालं. ‘कमी खर्चात जास्त उत्पन्नाची शाश्वत शेती' असं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून राधानगरी तालुक्यात कांचनताईंनी काम सुरू केलं.
शेतीच्या पुस्तकात दिलेली माहिती क्लिष्ट असते, ती कांचनताईंनी सोपी केली. ‘इतक्या त्रिज्येचं वर्तुळ, तितक्या व्यासाचं वर्तुळ' असं सांगण्यापेक्षा कांचनताई सांगतात, “हे बघ, घमेलं पालथं घाल. गोल आख. दोन घमेलं माती काढ. एका घमेल्याचा चिखल कडेने लाव. बोट वितीच्या अंतरावर बी आडवी लाव. एक घमेलं माती वरती थाप. त्यात चांगलं कुजलेलं खत घाल. वरून पाणी शिंपड. कडेने पाणी घाल.” अशा प्रकारे आळं कसं करायचं हे त्या बाईच्या बरोब्बर लक्षात राहतं.
प्रशिक्षणादरम्यान महिलांना कृषी तंत्रज्ञानाच्या सीडी दाखवल्या जातात, आधुनिक बियाणं दिलं जातं. घरातली बाई सगळं शिकते, बचतगटात चर्चा करते, निर्णय घेते आणि यंदा उसात कुठलं आंतरपीक घ्यायचं हे ठरवून टाकते. तिच्या निर्णयाला घरी विरोध होतच नाही, कारण तिला शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान मिळालेलं असतं. एकीच्या शेतीकडे पाहून इतरही जण बदलतात, गावच्या गाव बदलतात. राधानगरी तालुक्यात भात लावण्याची नवी चतु:सूत्री भातपद्धत विकसित झाली ती अशाच महिलांच्या निर्णयशक्तीमुळे.
कांचनताईंचं काम असं चौफेर सुरू असतं. स्त्रीने मालक झालं पाहिजे, रोजगार उत्पन्न केला पाहिजे, असं त्या म्हणतात. म्हणूनच कर्नाटकातील उगारपासून त्रिपुरा राज्यापर्यंत बचतगटांना प्रशिक्षण द्यायला कांचनताई जात असतात. सर्वसाधारणपणे समाजकारणात गुंतलेले लोक राजकारणाशी फटकून असतात. कांचनताईंचं मात्र तसं नाही. महिला सक्षमीकरणाच्या आपल्या अजेंड्याशी वेगवेगळ्या विचारांच्या राजकारणी व्यक्तींना जोडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘कोणत्याही कोंबड्याने का होईना, आरवू दे' असं त्या म्हणतात.
यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील विनय कोरे, सतेज पाटील, धनंजय महाडिक अशी राजकीय मंडळी स्वयंसिद्धाच्या कामाला जोडली गेली आहेत. त्यांच्या सहभागामुळे स्वयंसिद्धाच्या कामाचा विस्तार होत आहे. एका मीटिंगमध्ये कांचनताईंनी तेव्हा मंत्री असलेल्या विनय कोरे यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, “आजवर तुम्ही वारणेच्या सभासद महिलेसाठी खूप केलं आहे; पण जी महिला दूर खेड्यात राहते आहे तिच्यासाठी काही तरी करायला हवं.” त्यातूनच वारणेच्या खेड्यातील महिलांसाठी ६० लाखांचा शेळीपालन प्रकल्प कोरे यांनी राबविला.
आरोग्यक्षेत्रातदेखील डॉ. व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून कांचनताईंनी मोठं काम उभं केलं आहे. राधानगरी संस्थेत प्रशिक्षण घेतलेले ५० आरोग्यदूत डोंगरी, दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमधून काम करत आहेत. कुकुडवाडी, चोरवाडी, भुजंग पाटीलवाडी, वलवण, कारिवडे, दिगेवाडी, कलंकवाडी, अशा गावांतील अगदी अल्पशिक्षित महिला आज किरकोळ आजारांवर औषधं देत आहेत, आरोग्यशिक्षण देत आहेत. चार महिन्यांत ॲनिमिया टप्प्याटप्प्याने दूर करण्याचा प्रयोग सुरू आहे. कोल्हापूर शहरात मोलकरणींसाठी, भाजीविक्रेत्या महिलांसाठी, दूधवाले व पेपर टाकणारे यांच्यासाठी ‘डॉ. शोभना तावडे-मेहता आरोग्यम् धनसंपदा' प्रकल्पांतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, मोफत औषधं, प्रबोधन, असे उपक्रमही राबविण्यात आले आहेत.
अर्थात गेल्या दीड दशकात निर्माण झालेलं हे काम आपण एकटीने केलेलं नाही, असं कांचनताई मोकळेपणाने सांगतात. सरोजिनी शिरगोपीकर, तृप्ती पुरेकर, जयश्री गिव्हे, कामत, दीपाली जाधव, मधुकर सरनाईक, डॉ. वैशाली कुलकर्णी, डॉ. वाघ, डॉ. माधवी सावंत, अशी कार्यकर्त्यांची, मार्गदर्शकांची मोठी फौज त्यांच्याकडे आहे. प्रत्येक महिलेनं लीडर झालं पाहिजे, असं त्या म्हणतात तेव्हा ‘स्वयंसिद्धा'त लीडर बनलेल्या हजारोजणी त्यांचं म्हणणं सिद्ध करत असतात. उखाणे म्हणत, गाणी म्हणत गावोगावी नीळ, फिनेल विकणाऱ्या मंजुळाबाई पवार, शिरसेगावचं कृषी तंत्रज्ञान बदलणारी गीता पाटील, मस्लेवाडीत राहून वर्षाकाठी दोन लाखांचं गांडूळखत विकणारी शीतल पाटील, आंबावडी बनवत आता महिन्याला लाख रुपयांची ‘केटरिंग ऑर्डर' घेणाऱ्या आपटेबाई, लाख रुपयांची राखी विकणाऱ्या राधिका, सगळ्याच जणी अभिमानाने सांगतात, आम्ही ‘स्वयंसिद्धा'च्या महिला आहोत.... त्या सर्वांमागे कांचनताई परुळेकरांचं परखड नेतृत्व असतं. एखाद्या नव्या कल्पनेचा, योजनेचा पाठपुरावा करताना कांचनताई अगदी हसत हसत सहज म्हणून जातात, “कुठलाही धातू वितळत नाही असं नाही; तुमची उष्णता वाढवा!”
(समकालीन प्रकाशनाच्या 'खरेखुरे आयडॉल्स भाग २' या पुस्तकातून साभार.)