आम्ही कोण?
ले 

‘कॉक्रोच जनता पार्टी’ – जेन झी म्हणतेय ग्राऊंडवर उतरा

  • मयूर पटारे
  • 22.05.26
  • वाचनवेळ 7 मि.
cockroach janta party gen-z

भारतात अवघ्या पाच-सहा दिवसांतच ‘कॉक्रोच जनता पार्टी’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावरील या पेजचे झपाट्याने वाढत जाणारे फॉलोअर्स बघून सरकारसोबत अनेकांची झोप उडाली. ही पार्टी सुरू व्हायला कारणीभूत ठरली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांची एक टिप्पणी. न्यायाधीशांच्या टिप्पणीला प्रत्युत्तर देण्यासाठी अभिजीत दिपके नावाच्या ३० वर्षीय मराठी तरुणाने उपहास म्हणून एक पार्टी आणि सोशल मीडिया अकाउंट्सची सुरुवात केली. कॉक्रोच जनता पार्टी नावाने सुरू झालेली ही चळवळ अल्पावधीतच देशव्यापी बनली. ज्यांना या वादळाच्या केंद्रस्थानी मानलं जातंय त्या जेन झीला नेमकं काय वाटतंय? ही तरुण मंडळी त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे कसं पाहतात?

तरुण मंडळी एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीकडे आशेचा किरण म्हणून बघताहेत, पण त्याच वेळी ते याची चिकित्साही करताहेत. आयटी कंपनीत काम करणारी २९ वर्षीय उर्वी तांबे म्हणते, ‘‘भारतातील तरुणाई सध्याच्या राजकीय परिस्थितीने त्रस्त आणि निराश आहे. फक्त सत्ताधारीच नाही, तर विरोधकांबद्दलही लोकांच्या मनात गोंधळ आहे. कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे कळेनासं झालंय. अशा वेळी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ सारखी सुरुवातीला मजेत सुरू झालेली चळवळ लोकांना आशेचा किरण वाटतेय. आताच त्यांच्याकडे स्पष्ट दिशा किंवा पुढचा ठोस प्लॅन दिसत नाही. पण एवढ्या लोकांचा पाठिंबा मिळतोय तर त्यांनी लोकांसाठी उपयोगी पडेल अशी दिशा द्यावी, अशी अपेक्षा आहे.’’

इंजिनीअर असलेला २६ वर्षीय रतन म्हणतो, ‘‘सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचं वक्तव्य खूप बेजबाबदारपणाचं होतं. त्यांच्या या वक्तव्याने माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्या. अशावेळी ‘कॉक्रोच जनता पार्टी’सारखं एखादं सोशल मीडिया पेज सरकारला प्रश्न विचारतंय हे बघून मला भारी वाटलं. मागील एक दोन दिवसांत सरकारने ज्या कारवाया केल्या त्या पाहता ते या सोशल मीडिया प्रवाहाला घाबरलेत असं वाटतंय. भीती न बाळगता सरकारविरुद्ध उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही. आता ‘कॉक्रोच जनता पार्टी’चं पुढचं पाऊल काय, याची स्पष्टता येणं गरजेचं आहे. ती स्पष्टता येत नाही तोपर्यंत यामुळे खरोखर काही बदल घडेल की फक्त एक ट्रेंड येऊन ओसरून जाईल, अशी शंका वाटत राहते.’’

छत्रपती संभाजीनगरची २७ वर्षीय किमया म्हणते, ‘‘यापूर्वी कुठल्याही सोशल मीडिया पेजला एवढ्या कमी वेळात एवढा प्रतिसाद मिळाला नव्हता. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या पेजला मात्र पाच दिवसांतच कोट्यावधी फॉलोअर्स मिळाले ही मोठी गोष्ट आहे. यामुळेच देशभरातील तरुणांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’कडून अपेक्षा वाढल्या आहेत. यानिमित्ताने देशातल्या तरुणांचे प्रश्न आणि बेरोजगारी याकडे लक्ष वेधलं गेलं ही चांगली गोष्टी आहे. तरुणांच्या मनातील आक्रोश वाढत्या फॉलोअर्सच्या रूपाने दिसून येतोय. आता ही फक्त सोशल मीडिया चळवळ न ठेवता त्याला अभिजित कशी दिशा देतो हे पाहावं लागेल. सोशल मिडियावर पाठिंबा मिळतोय म्हणून तो लगेचच राजकारणात उतरला तर ते चुकीचं ठरेल. कारण फक्त सोशल मिडियावर असलेला लोकांचा सपोर्ट मतपेटीत कन्वर्ट होत नाही. ग्राऊंडचा अंदाज न आल्याने राजकारणाच्या रिंगणात मोठमोठे राजकारणी हरल्याचं आपण बघितलं आहे. त्यामुळे त्याने आधी जमिनीवर उतरून काम करणं गरजेचं आहे.’’

हेही वाचा - कॉक्रोच जनता पार्टी; 'झुरळां'ची पार्टी व्हायरल कशी झाली?

२३ वर्षाचा शैलेश पुण्यात नोकरी करतो. तो म्हणतो, ‘‘कॉक्रोच जनता पार्टी’ला सोशल मीडियावर काही दिवंसातच कोट्यवधी लोकांचा पाठिंबा मिळाला हे चांगलंच आहे. पण हा प्रयत्न फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित रहायला नको. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने महिला आरक्षण आणि पेपर फुटीसंदर्भात काही मुद्दे मांडले होते. हे मुद्दे फक्त सोशल मीडियावर बोलून काय उपयोग? त्यासाठी ग्राउंडवर उतरणं गरजेचं आहे.’’

मुंबईमध्ये राहणारी २५ वर्षांची गौरी म्हणते, ‘‘सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी तरुणांना झुरळ संबोधणं योग्य नाही. त्यामुळेच तरुणांचा निषेध बनून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ उदयाला आली, हे भारीच आहे. मी सुद्धा हे सोशल मीडिया पेज फॉलो केलंय. पण पुढे काय हा प्रश्न आहेच. कारण २०१४ मध्ये देशात काहीतरी बदल घडावा यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिलं होतं. पण तंस घडलं नाही. सोशल मीडियावरचे रील्स पाहून तरुण मुलं राघव चढ्ढाकडेही आकर्षित झाली होती. पण तो आप सोडून भाजपकडे गेल्यावर अनेक तरुण नाराज झाले. त्यामुळे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे लोक पुढे काय करतील, पॉलिटिकल पार्टी म्हणून उभे राहिले किंवा ग्राउंडवर उतरलेच तर ते आपल्या प्रश्नांवर बोलणार का, याचा विचार आपण करायला हवा. लोकांच्या जगण्याशी संबंध असलेले प्रश्न त्यांनाही विचारायला हवेत.’’

काही तरुण सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळले असून त्याला पर्याय म्हणून ते ‘कॉक्रोच जनता पार्टी’कडे बघताहेत. शिरवळमधील खाजगी कंपनीत कामाला असलेला २६ वर्षांचा सचिन जगताप म्हणतो, ‘‘चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची क्षमता असणारे लोक सत्तेवर असावेत, असं आता अनेकांना वाटतंय. त्यामुळे प्रस्थापित पुढारी, आमदार सोडून नवीन सुशिक्षित लोकांच्या हाती सत्ता द्यायला हवी हा विचार पुढे येतोय. न्यायव्यवस्थेवरचा उडलेला विश्वास, दैनंदिन जीवनातल्या मूलभूत सोयीसुविधा मिळण्यात येणाऱ्या अडचणी (उदा. पिण्यायोग्य पाणी, सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास, महिलांची सुरक्षितता), आरोग्य आणि शिक्षणव्यवस्थेत चालणारा भ्रष्टाचार यामुळे नागरिक त्रासलेत. असं असलं तरी जनता कुणाला निवडून द्यायचं हा निर्णय विचारपूर्वक घेत नाही. पैसे घेऊन किंवा जात-धर्माच्या नावावर होणाऱ्या मतदानामुळे समाजात चुकीच्या गोष्टी घडत आहेत. वाढत चाललेली गुन्हेगारी आणि लवकर न मिळणारा न्याय यामुळे समाजातील संवेदनशील लोकांचा संयम तुटत चालला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हा विषय ट्रेंडिंगला आणणारे लोक या सगळ्याचा विचार गांभीर्याने करतायत असं नक्कीच म्हणता येईल. ही चळवळ चेष्टामस्करीत सुरू झालेली असली तरी ती आता गांभीर्याने घ्यायला हवी असंच मला वाटतंय.’’

काही तरुणांना या चळवळीकडून अपेक्षा असल्या तरी झटपट घडणाऱ्या घटनांमुळे ते याकडे साशंक होऊनही बघतायत. नुकताच एमबीए केलेला २४ वर्षीय विवेक म्हणतो, ‘‘एखादी सोशल मीडिया चळवळ तरुणांचा आवाज म्हणून उभी राहते ही चांगली गोष्ट आहे. परंतु हे खरोखरच चांगल्या उद्देशाने ही चळवळ उभी करतायत की फक्त सत्ताधारी पक्षाला विरोध करायचा म्हणून किंवा एखाद्या पार्टीचा अजेंडा पुढे न्यायचा म्हणून हे चाललंय अशी शंका वाटते. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ जर स्वतंत्र पक्ष असेल तर अनेक राजकीय पक्षांचे लोक त्यात का सामील होत आहेत हा प्रश्न मला पडलाय. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश तरुणांना झुरळ म्हणाले. त्यानंतर त्यांनी हे मी सर्व तरुणांना उद्देशून बोललो नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं. त्यांचं म्हणणं खरं असेल तर हा ट्रेंड अनावश्यक आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला फॉलो करण्यामागे इतरही करणं असू शकतात. आजकाल लोकांना रिलेव्हन्ट किंवा ट्रेंडमध्ये रहायला आवडतं. अनेकदा लोकांना सोशल प्रेशर असतो की, इतरांना माहिती असलेली गोष्ट मलाही माहीत असायला हवी. म्हणूनही लोक असे ट्रेंड फॉलो करतात. हा ट्रेंड सक्सेसफुल झाला तर चांगलीच गोष्ट आहे. पण नाही झाला तर काय? एक चळवळ देशाच्या कामी न येता वाया गेली, असं म्हणावं लागेल.’’

हेही वाचा - १५ ते २९ वयोगटातील १३ टक्के मनुष्यबळ बेरोजगार

आयटी क्षेत्रात काम करणारा २६ वर्षीय तेजस म्हणतो, ‘‘प्रसिद्धीसाठी सरकारच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट करण्याचं हे काम असू शकतं. पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किती ताकदीचा आहे हे त्यानिमित्ताने देशाला कळलं. अवघ्या पाच-सहा दिवसांत कोट्यवधी लोक याला जोडले गेलेत. एखादी सोशल मीडिया चळवळ जमिनीवर उतरू शकते आणि सत्ताबदल घडवू शकते हे श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांच्या उदाहरणांतून आपल्या लक्षात आलेलं आहे. आता ‘कॉक्रोच जनता पार्टी’ तसं करू शकेल का, हेही आपल्याला लवकरच कळेल.’’

२५ वर्षांचा यश मास मीडियाचा विद्यार्थी आहे. तो म्हणतो, ‘‘अशा पद्धतीने सोशल मीडियावर ट्रेंड चालवून जमिनीवरची चळवळ चालू शकत नाही. ती चालली तर चांगलंच आहे. परंतु आतापर्यंत तशी ठोस उदाहरणं नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या व्यक्तव्याचा विपर्यास केला गेलाय असं वरकरणी पाहताना दिसतंय. हे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चं हँडल कुठल्यातरी एका पार्टीच्या सपोर्टने चालतं अशी शंका अनेक जण घेत आहेत. सोबतच देशाबाहेर बसून देशातील प्रश्नांवर बोलणं किती योग्य आहे हा प्रश्न मला पडलाय. ‘नीट पेपर फुटी’सारखी महत्त्वाची प्रकरणं फक्त मंत्र्यांचा राजीनामा घेऊन सुटणार नाहीत. आज आपण एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावू पण त्याच्या जागी येणारा मंत्री त्याच्याहून वाईट असेल तर काय? अशा प्रश्नांवर सरकारसोबत चर्चा करून त्यावर ठोस उपाय निघायला हवा.’’

राजकारणात रस नाही असं सांगून अनेक तरुणांनी या विषयावर बोलणं टाळलं. तर अनेक तरुणांना हा विषयच माहिती नाही हे त्यांच्याशी बोलताना जाणवलं.

आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने मोठ्या प्रमाणात तरुणांना स्वतःकडे खेचून आणलंय. ताज्या माहितीनुसार त्यांच्या फॉलोअर्सचा आकडा दोन कोटीच्या पलीकडे गेलाय. एवढ्या मोठ्या संख्येने एकवटलेल्या तरुणाईला अभिजित काही कृतिकार्यक्रम देऊ शकेल का या प्रश्नाची सध्या चर्चा सुरू आहे.

मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com

युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results