
बॉम जीझस नावाचं एक पोर्तुगीज व्यापारी जहाज. शुक्रवार, ७ मार्च, १५३३ रोजी पोर्तुगालच्या लिस्बन बंदरातून ते निघालं खरं, पण पुढे जाऊन ते कुठे पोहोचलंच नाही.. ते नेमकं कुठे गायब झालं, याची माहिती २००८ पर्यंत कुणालाच नव्हती. २००८साली नामिबियाच्या किनारपट्टीवरील ओरांजेमुंडजवळ हिऱ्यांच्या खाणीत या जहाजाचा सांगाडा व इतर अवशेष सापडले.
१ एप्रिल २००८ या दिवशी तिथल्या एका खाणकामगाराला किनाऱ्यावरील भागात खोदकाम करताना तांब्याची वस्तू आणि हस्तिदंताचे अवशेष सापडले. मग तिथे उत्खनन सुरु करण्यात आलं. त्यात सापडला एका महाकाय जहाजाचा सांगाडा! पुढे त्या ठिकाणी ४० टनांहून अधिक माल मिळाला, ज्यात तांब्याचे पिंड, सोन्या-चांदीची नाणी, हस्तिदंत, तोफ, बंदुक, तलवारी, शिसे, कथील, कापड आणि खगोलशास्त्रीय उपकरणांसह हजारो कलाकृती होत्या.
त्यात सापडलेल्या २,१५९ नाण्यांमध्ये स्पॅनिश, पोर्तुगीज, व्हेनेशियन, फ्रेंच आणि मूरिश नाणीही होती. स्पॅनिश नाणी मोठ्या प्रमाणात सापडल्यामुळे सुरुवातीला पुरातत्वशास्त्रज्ञांना हे जहाज स्पॅनिश वंशाचं असल्याचं वाटलं, परंतु पुढील तपासणी केल्यानंतर मात्र हे बॉम जीझस असल्याचं समजलं. १५३० पासून शोध चालू असलेलं बॉम जीझस तब्बल ४७७ वर्षांनी म्हणजे २००८ साली सापडलं.
१५०० व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगालचा राजा मॅन्युएलच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्ताराच्या काळात बॉम जीझस जहाज बांधलं गेलं होतं. हे जहाज पूर्वीच्या पोर्तुगीज आणि स्पॅनिश जहाजांपेक्षा मोठं, अधिक कार्यक्षम आणि टिकाऊ होतं असं मानलं जातं.
जहाजातील मौल्यवान वस्तू आणि दुर्घटनेतील सामग्रीच्या आधारे पुरातत्वशास्त्रज्ञ डायटर नोली यांनी काही अंदाज बांधले. त्यांच्या म्हणण्यानुसार हे जहाज गायब झालं तेव्हां ते लिस्बन बंदरातून पश्चिम भारताकडे जात असावं. या काळात पोर्तुगीज व्यापारी पोर्तुगालपासून चीन, भारत आणि जपान दरम्यान प्रवास करत. सोने, तांबे, मसाले, हस्तिदंत, शस्त्रे आणि रेशीम यांची खरेदी-विक्री करत.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.