
गुजरातमधलं प्रभास पाटण हे ठिकाण सोमनाथच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, पण इथल्या समुद्र किनाऱ्यावरच्या आगळ्या भूरचनेच्या दृष्टीनेही त्याचं विशेष महत्त्व आहे. एका भूगर्भतज्ज्ञाने वेगळ्या नजरेतून घडवलेली सफर
आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून पर्यटनाविषयी आस्था निर्माण झाली आहे. त्याला टीव्ही व वाढलेले पगार या दोन्ही गोष्टी बऱ्याच कारणीभूत ठरल्या आहेत. आता सुटीचे दिवस मजेत घालवण्यासाठी योग्य ठिकाणं, वाहतुकीच्या सुविधा, राहण्याच्या सुविधा आणि येणारा साधारण खर्च याविषयीची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे. बहुतेक ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्व, तिथे आणि आसपास बघण्यासारख्या गोष्टी याविषयीची जुजबी माहितीही मिळते. पण बऱ्याच ठिकाणी असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचना, त्यांचं स्थान, त्यांचा इतिहास याविषयी कुठे माहिती मिळत नाही.
तीर्थाटन किंवा केवळ मौजमजेसाठी होणाऱ्या पर्यटनाच्या वेळी ज्या भूमीवर आपण वावरणार आहोत त्याविषयी, तिथल्या भौगोलिक वैशिष्ट्यांविषयी माहिती घेऊन तो परिसर बघण्याचा-अनुभवण्याचा प्रयत्न केला तर पर्यटनात एक वेगळा आनंद आपण घेऊ शकतो.
पूर्वीपासून जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात अशी बरीच ठिकाणं भारतात आहेत. त्यातील काही ठिकाणं भूरूपकीयदृष्ट्याही महत्त्वाची आहेत. सोमनाथ, खरं म्हणजे प्रभास पाटण हे अशांपैकीच एक ठिकाण. सौराष्ट्र द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावर जवळजवळ दक्षिण टोकाला असलेलं हे ठिकाण ऐतिहासिक काळपासून प्रसिद्ध आहे. प्रभास पाटणच्या किनाऱ्याला लागूनच बारा ज्योतिर्लिंगांमध्ये प्रथम स्थानावर असणारं सोमनाथचं मंदिर आहे. या मंदिरामुळेच प्रभास पाटण हे नाव मागे पडून सोमनाथ हे नाव रूढ झालं आहे. या ठिकाणी खंडीय मंच (किनारी भागात सागरी पाण्याखाली जाणारी खंडीय जमीन) जरी रुंद असला तरी त्याचा उतार बऱ्यापैकी तीव्र आहे. त्यामुळेच किनाऱ्यालगतचा सागरी भाग खोल आहे. खोल सागरामुळे इथे लाटा अधिक उंचीच्या आणि एका मागोमाग एक येतात. उधाणाच्या भरतीच्या लाटा सोमनाथ देवालयाच्या संरक्षक भिंतीवर येऊन आदळतात.
सोमनाथ पाच वेळा लुटलं गेलं..
अतिशय वैभवशाली आणि श्रीमंत अशी कीर्ती असल्यानेच हे मंदिर अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत एकूण पाच वेळा लुटलं गेलं. सर्वप्रथम १०२४ मध्ये महम्मद गझनीने, १२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी, १३७५ मध्ये मुझफ्फर शाह पहिला, १४५१ मध्ये महमूद बेगडा आणि १७०१ मध्ये औरंगजेबाने शेवटची लूट केली. विशेष म्हणजे पहिल्या चारही वेळी देऊळ लुटलं गेल्यानंतर जमीनदोस्त झालेलं देऊळ त्या त्या वेळच्या राजांनी पुन्हा मूलस्थानी उभारलं. पाचव्या वेळी मात्र तसं झालं नाही. याचं कारण भग्न देवालयाजवळ मशीद उभी राहिली. १७८३ मध्ये अहल्याबाई होळकरांनी या देवळाचा जीर्णोद्धार केला, पण पहिल्याइतकं भव्य मंदिर बांधणं त्यांना शक्य झालं नाही. मंदिराचा जीर्णोद्धार करतानाच मूळ देवळाच्या जवळच आणखीन एक छोटं मंदिर त्यांनी बांधलं व मूळ शिवलिंगाची स्थापना त्याच्या तळघरात केली, जेणेकरून पुन्हा हल्ला झाल्यास शिवलिंग सुरक्षित राहील.
देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल व काकासाहेब गाडगीळांच्या पुढाकाराने आणि अनेक अडचणींना तोंड देत आज उभं असलेलं भव्य देऊळ मूळ भग्न देवालयाच्या चौथऱ्यालगतच बांधण्यात आलं. देऊळ बांधण्यापूर्वी तिथे पुरातत्त्वीय उत्खनन करून मंदिराच्या इतिहासाचे पुरावे मिळवण्यात आले.
सोमनाथचे समुद्रस्नान
सोमनाथच्या धार्मिक महत्त्वामुळे समुद्रस्नानासाठी लोक इथे येतात. खरं तर हा किनारा समुद्रस्नानासाठी धोकादायक आहे. तशा पाट्याही इथे आहेत. तरीही लोक समुद्रस्नानासाठी उतरतात. समुद्रस्नानासाठी उतरलेल्यांपैकी पाच ते सहा माणसं दर वर्षी वाहून जातात. खंडीय मंचाचा उतार अधिक असल्याने भरतीच्या लाटा जशा वेगाने येतात तशाच ओहोटीच्या लाटाही वेगात मागे परत फिरतात.
दीड लाख वर्षांपूर्वीचं टेकाड
सोमनाथचं मंदिर फार पूर्वी, सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी याआधीच्या आंतरहिमयुगात (आता आपण आंतरहिमयुगात आहोत.) संचयित होऊन स्थिरावलेल्या वाळूच्या टेकाडावर आहे. किंबहुना संपूर्ण नगरच अशा सागरी टेकड्यांवर वसलेलं आहे. त्यामुळेच सध्याच्या सागरी पातळीपेक्षा मंदिर थोडं उंचावर आहे. मंदिराच्या संरक्षक भिंतीला लागून होलोसीन काळात (साधारण दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा कालावधी) तयार झालेलं कमी उंचीचं सागरी टेकाड होतं. त्याला लागून तीव्र उताराची पुळण आहे. हिरण नदीच्या मुखापर्यंत असणाऱ्या या पुळणाची एकूण लांबी तीन कि.मी. आहे. यापैकी सोमनाथच्या मंदिराकडील जवळजवळ एक किलोमीटरचा भाग आणि त्यामागील सागरी टेकाड तिथे झालेल्या विकासकामामुळे नष्ट झालं आहे. लोकांना सुरक्षितपणे समुद्रस्नान करता यावं यासाठी पुळण आणि टेकाडाचा भाग खरवडून तिथे तीन बाजूंना बांध घालून छोटं सरोवर तयार करण्यात आलं आहे. याशिवाय त्याला लागून कृत्रिम चौपाटीही उभारण्यात आली आहे. उरलेला दोन किलोमीटरचा पुळणाचा भाग अतिशय सुंदर पण तीव्र उतारामुळे थोडासा धोकादायक आहे.
एक लाख सव्वीस हजार वर्षांपूर्वी तयार झालेला पुळण खडक
नव्याने तयार झालेल्या सरोवराच्या उत्तरेकडे आणि सोमनाथ मंदिराच्या मागील बाजूपासून जवळजवळ दीड किलोमीटर लांबीचं आणि दोन मीटर जाडीचं एक वैशिष्ट्यपूर्ण भूरूपक आहे. भूरूपक पुरापर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचं असून या भूमीच्या रचनेतील एक भू-ऐतिहासिक पुरावा म्हणून इथे येणाऱ्यांनी ते जरूर बघायला हवं. हे भूरूपक म्हणजे बहुधा अंतिम प्लास्टोसीन कालखंडात (सुमारे वर्तमानपूर्व एक लाख सव्वीस हजार वर्षांपूर्वी) तयार झालेला पुळण खडक (बीच रॉक) आहे. बारीक पोत आणि चुनखडकाच्या प्रकारात मोडणारा हा खडक अतिशय कठीण असला तरी लाटांच्या मारामुळे त्याची बरीच झीज झाली आहे. त्यामुळे त्यात बऱ्याच ठिकाणी घळयांसारखे भाग तयार झाले आहेत. या खडकात पुळणाचं रूपांतर खडकात होण्याआधी त्यात वावरणाऱ्या शंख-शिंपल्यांनी तयार केलेल्या खोदनलिका आहेत तसेच द्रावणछिद्रंही आहेत. ही सर्व वैशिष्ट्यंच त्याचं पुरातनत्व सिद्ध करतात. या खडकातील अवसादांचं संचयन होत ती टेकाडं तयार होत असताना सागरी पातळी आताच्या पातळीपेक्षा थोडी वर होती. अर्थात हा सगळा तांत्रिक भाग झाला. या खडकाचा पोत बारीक असल्याने त्याच्या पृष्ठभागांची झीज होताना तयार झालेल्या खडबडीत पृष्ठभागात काही भाग खूपच धारदार तयार झाले आहेत. त्यामुळेच त्याच्यावर अनवाणी चालणं धोकादायक ठरू शकतं. पण या खडकावर उभं राहून पुढे येणाऱ्या लाटा बघणं आणि घळयांमध्ये शिरून वर उसळणारं फेसाळ पाणी झेलणं यासारखा आनंद नाही.
सोमनाथमधली इतर मंदिरं
सोमनाथचं नवीन मंदिर, अहल्याबाई होळकरांनी बांधलेलं मंदिर, पुरापुळण खडक याव्यतिरिक्त सोमनाथमध्ये बघण्यासाठी कृष्ण आणि शंकर म्हणजे हरी आणि हराची अनेक देवालयं आहेत. याशिवाय परशुराम मंदिर, कामनाथ महादेव मंदिर, शंकराचार्य मठ, शारदा मठ, हिंगलाज माता मंदिर, हरिहर वन, गीता मंदिर इथे आहे. इथल्या गीता मंदिरात अठरा संगमरवरी खांब असून प्रत्येक खांबावर गीतेतील एकेक अध्याय कोरलेला आहे. या मंदिराची स्थापना नवव्या शतकात वल्लभाचार्यांनी केली. मंदिरातील कृष्णाची बासरी वाजवणारी मूर्ती अतिशय रेखीव आणि बघण्यासारखी आहे. प्रभास पाटण-सोमनाथचे राजे सूर्यवंशी होते, त्यामुळे त्यांनी बांधलेली सूर्यमंदिरंही बघण्यासारखी आहेत. बहुतेक सर्व मंदिरं हिरण नदीच्या उजव्या काठाला आहेत.
कपिला, हिरण आणि लुप्त सरस्वतीचा त्रिवेणी संगम
हिरण नदीच्या मुखापासून सुमारे २०० मीटर अंतरावर एक बांध घालण्यात आला आहे. तिथून एक किलोमीटरवर कपिला, हिरण आणि लुप्त सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाचं ठिकाण आहे. संगमाजवळ एकापुढे एक ओळीने सात घाट आहेत. प्रत्येक घाटाला सप्तऋषींपैकी एकेकाचं नाव दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी होमहवन करण्यासाठी होमकुंड आहेत आणि त्यांच्याभोवती चार खांब असलेलं छत्रीसारखं बांधकाम आहे. एकूणच, घाटांचं बांधकाम खूप सुंदर आहे. हिरण नदीच्या मुखाशी असणाऱ्या बांधामुळे इथे मोठं सरोवर तयार झालं आहे. जराने कृष्णाला बाण मारल्यानंतर जखमी झालेल्या कृष्णाने त्रिवेणी संगमाजवळ थोडी विश्रांती घेतली होती, अशी आख्यायिका या ठिकाणाबद्दल सांगण्यात येते. संगम आणि घाटांचा हा परिसर स्वच्छ ठेवला तर खरोखर सुंदर आहे, पण दुर्दैवाने इथे होणारे धार्मिक विधी, अंघोळी, पाण्यात सोडला जाणारा निर्माल्याचा कचरा यामुळे इथलं पाणी प्रदूषित झालं आहे. विशेष म्हणजे प्रभास पाटण-सोमनाथ भागातील शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या सरोवराची निर्मिती झाली असं सांगितलं जातं.
सोमनाथच्या भग्न मंदिराच्या परिसरात एक खुलं नाट्यगृह बांधण्यात आलं आहे.
इथे मंदिराच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सातनंतर प्रकाश-छायेच्या माध्यमातून प्रभास पाटण-सोमनाथचा इतिहास उलगडून दाखवला जातो. जवळजवळ तास-दीड तास चालणारा हा कार्यक्रम खरोखर प्रेक्षणीय आहे. या प्रेक्षागृहाच्या शेवटच्या पायरीवर जर तुम्ही बसलात तर घोंघावणारा वारा आणि पुरा पुळण खडकावर, देवळाच्या संरक्षक भिंतीवर आदळणाऱ्या लाटांचा भुलवणारा नाद तुम्हाला ऐकू येतो आणि कार्यक्रम संपल्यानंतरही तिथून हलू नये असं वाटतं.
सोमनाथच्या सध्याच्या देवळाभोवती मोठं फरसबंद पटांगण आहे. देवळाच्या परिसरात केलेल्या दिव्यांच्या रचनेमुळे आणि पिवळ्या वालुकामय खडकातील बांधकामामुळे रात्रीच्या वेळी देऊळ अधिकच सुंदर दिसतं. सोनेरी चमकणारं देऊळ आणि त्याच्या पार्श्वभूमीला गडद निळ्या सागरी पाण्यावरून किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या पांढऱ्या फेसाळ लाटा व जोडीला शीळ घालणारा- घोंघावणारा वारा! तिथून पाऊल निघत नाही. स्वर्गीय आनंद म्हणतात तो बहुधा हाच असावा.
सोमनाथला आल्यानंतर वेरावळला जायलाच हवं.
सोमनाथ-वेरावळ अंतर फक्त सहा किलोमीटरचं आहे. सोमनाथ-वेरावळ जोडणारा खाडीवरील पूल ओलांडला की माशांचा उग्र दर्प नाकात शिरतो. वेरावळवरून येणाऱ्या वाऱ्यामुळे हा दर्प सोमनाथलाही अनुभवता येतो. पुलावरून डावीकडे दिसणाऱ्या नांगरलेल्या मोठमोठ्या बोटी; किनाऱ्यावर, समोर, आसपास अनेक ठिकाणी उभारणी सुरू असलेल्या बोटी दिसायला लागल्या की आपण भान विसरतो आणि माशांच्या दर्पाचं आपल्याला काही वाटेनासं होते.
१३व्या-१४व्या शतकात राव वेरावळजी वढेर (राठोड) यांनी वेरावळ वसवलं. एके काळी तटबंदी असलेलं हे बंदराचं नगर होतं. त्यावर जुनागढच्या शाही कुटुंबाचं अधिपत्य होतं. १९५३ मध्ये जुनागढ भारतात विलीन झाल्यामुळे वेरावळही भारतात आलं. सध्या जिथे संस्कृत विद्यापीठ आहे पण जी इमारत सोमनाथ कॉलेज म्हणून ओळखली जाते, ती इमारत म्हणजे वेरावळच्या राजघराण्याला उन्हाळ्यातील वास्तव्यासाठी बांधण्यात आलेला राजवाडा होता. गॉथिक पद्धतीने तो बांधलेला आहे. सुरत बंदर म्हणून नावारूपाला येण्याआधी वेरावळ हेच महत्त्वाचं बंदर होतं आणि मक्केला जाणारे यात्रेकरू इथूनच रवाना होत होते. बंदर म्हणून त्याचं महत्त्व जरी आता संपलेलं असलं तरी आजही ते भारतातील मासेमारी करणाऱ्या मोठ्या केंद्रांपैकी एक आहे. याशिवाय भारतातील जहाजबांधणीचंही ते एक महत्त्वाचं केंद्र आहे. विशेष म्हणजे कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान न वापरता पारंपरिक पद्धतीने इथे जहाजबांधणी होते. ही कला वंशपरंपरेने बापाकडून मुलाकडे हस्तांतरित केली जाते. छोट्या होड्यांपासून प्रचंड मोठ्या आकाराची जहाजं इथे बांधली जातात. बांधणीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील बोटी इथे बघायला मिळतात आणि एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो.
वेरावळ सुरू होतानाच भालका तीर्थ म्हणून श्रीकृष्णाचं देऊळ आहे. ज्या ठिकाणी कृष्णाच्या पायावर चुकून बाण मारला ते हे ठिकाण आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. ‘भालकातीर्थाला महाप्रभुजीकी बैठक' असंही म्हणतात. कृष्णाचं स्मरण म्हणून इथे एक तुळसही लावण्यात आली, तिचीच पुढची पिढी इथे आहे असं मानतात. कृष्णाने प्रत्यक्षात ज्या ठिकाणी देह ठेवला ते ठिकाण सोमनाथमध्ये हिरण नदीच्या काठावर आहे. तिथे हे मंदिर आहे.
सोमनाथशी तुलना करता येईल असं ठिकाण म्हणजे तिरुचेंदूर.
तमिळनाडूच्या किनाऱ्यावर सागरापासून केवळ दोनशे मीटरवर तिरुचेंदूर मुरुगन तिरुकोविल किंवा सुब्रमण्यम स्वामी मंदिर आहे. मुरुगदेव म्हणजेच कार्तिकेयाचं असलेलं हे मंदिर तमिळनाडूतील कौमारम पंथाच्या तीन संतांनी मिळून बांधलं. अशी आणखीन पाच देवळं त्यांनी बांधली, पण ती सगळी डोंगराळ भागात आहेत. तिरुचेंदूर कन्याकुमारीपासून ७५ कि.मी. ईशान्येला आहे. तिरुचेंदूरचं देऊळ म्हणजे सहा देवळांचा मिळून एक देऊळ समूह आहे. सतराव्या शतकातील एका दंतकथेनुसार तिरुचेंदूरला मुरुगनने सुरपद्मन राक्षसाचा वध केला. परशुरामाप्रमाणेच बाण मारून त्याने किनारा तयार केला असं मानलं जातं. तमिळनाडूतील देवळांपैकी पूर्वेकडे द्वार नसलेलं हे एकमेव देऊळ आहे. या देवळाचं प्रवेशद्वार पश्चिमेला आहे. शिवाय हे एकमेव देऊळ आहे ज्याचं गर्भगृह पृष्ठ पातळीच्या खाली आहे व याच्या राजगोपुराची लांबी चव्वेचाळीस मीटर आहे. समुद्रस्नान करून ओलेत्याने देवळात जाणाऱ्यांसाठी समुद्र किनाऱ्यापासून देवळाच्या प्रवेशद्वारापर्यंत एक पूर्ण आच्छादित मार्ग बांधण्यात आला आहे.
तिरुचेंदूर मन्नार आखाताच्या किनाऱ्यावर असून इथे किनारपट्टी नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत आहे. तिरुचेंदूर देवळापासून नैर्ऋत्येच्या दिशेने किनाऱ्यावर फिकट पिवळ्या वाळूचं सुंदर पुळण आहे. भरतीच्या लाटा देवळाच्या ईशान्येकडील संरक्षक भिंतीवर आदळतात.
सोमनाथप्रमाणेच तिरुचेंदूरला ही अंतिम प्लायस्टोसीन काळातील जुना पुळण खडक आहे. फरक एवढाच, की तो सध्याच्या भरती-ओहोटीच्या मर्यादेत नसून सागर- सपाटीपासून जवळ जवळ तीन ते चार मीटर उंचीवर देवळाच्या आवारातच आहे. त्यातील खोदनलिका व द्रावणछिद्रांमुळे नैसर्गिकरीत्या त्यात कड्यांसारखे भाग तयार झाले आहेत. इथे नवस बोलणारी मंडळी नवस फेडल्यानंतर या कड्यांना लाल किंवा पिवळा रुमाल किंवा चिंधी बांधून जातात. खरं तर जवळजवळ तीन मीटर जाडीचा हा पुळण खडक त्याच्या फिकट पिवळ्या रंगामुळे खूप सुंदर दिसतो, पण त्याचं हे सौंदर्य त्याच्यावर बांधलेल्या चिंध्यांमुळे नष्ट झालंय. पण त्यात एक जमेची बाजू म्हणजे धार्मिक महत्त्व प्राप्त झाल्याने तो नष्ट होणार नाही. म्हणजेच अंतिम प्लायस्टोसीन काळातील उच्चभू्र किनाऱ्याचा एक पुरावा तरी इथे निश्चितपणे बघता येईल.
सविता घाटे | 02024483726 | savitaghate@gmail.com
सविता घाटे या पुरातत्व शास्त्रातील संशोधक आणि निवृत्त प्राध्यापक आहेत