
नद्यांकडून आपल्याला किती शिकण्यासारखं असतं! आपलं आपण वाहत राहायचं. आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या नद्या आणि त्यांच्याशी जुळलेल्या नात्याबद्दल.
मला पाण्याचं खूप आकर्षण. विशेषत: नद्यांचं आणि तळ्याचं. आई-बाबा माझ्या लहानपणाची एक गोष्ट सांगतात. मी दोन-तीन वर्षांची असताना आम्ही सगळे एकदा टिळक टँकला गेलो होतो. आई पोहत होती. बाबा मला आणि ताईला घेऊन कडेला बसला होता. मला पाण्याचं एवढं आकर्षण की मी मुळीच न घाबरता पाण्यात उडी मारली. सुदैवाने आई तिथे असल्याने तिने मला धरलं. आज हे आठवून मजा वाटते.
शाळेत गेल्यावर मी आणि ताई पोहायला जायला लागलो. मला लगेच जमलंच पोहायला. नंतर एपिलेप्सीचा त्रास सुरू झाल्यावर मी पोहू शकले नाही, पण मनातलं पाण्याचं सुप्त आकर्षण तसंच राहिलं. नदीकाठी, पाण्याकाठी फिरणं, पाण्यात पाय बुडवणं, सतत पाण्यात खेळणं उलट वाढलंच. घरी तर मला सगळे पाणकोंबडी म्हणून चिडवायचे. नंतर कधी आपल्याच शहरात, कधी दुसऱ्या गावात, तर कधी प्रवासात अनेकदा पाणी भेटत गेलं, नद्या भेटत गेल्या तसं पाण्याशी नातं आणखीनच पक्कं झालं.
लहानपणी सुट्ट्यांमध्ये आम्ही नेहमी आजी-आजोबांकडे ओतूरला जायचो. तिथे घराच्या जवळच सुटुंब्याची टेकडी, कापर्दिकेश्वर मंदिर आणि त्याला लागून वळत गेलेली मांडवी नदी होती. लहानपणी मी या नदीलाच कापर्दिकेश्वरी म्हणायचे. मला ते नदीचंच नाव वाटायचं. नंतर ती मांडवी आहे हे कळलं. ओतूरला दर वर्षी जात असल्यामुळे या नदीची किती वेगवेगळी रूपं मी पाहिली! कधी शांतपणे वाहणारी, कधी श्रावणात दुथडी भरून वाहणारी, तर उन्हाळ्यात पूर्ण कोरडी झालेली. मला सर्वांत आवडायचं ते तिचं नेहमीचं रूप. हिरवट निळी, झाडां-डोंगरांमधून वाहणारी.
देवळाच्या मागच्या बाजूला उतार उतरून गवत-मातीतून चालत जायचं आणि नदीच्या पाण्यात पाय बुडवायचे. पाण्यातल्या स्वच्छ दगड-गोट्यांचा स्पर्श अनुभवायचा. छोट्या छोट्या माशांनी पायाला होणाऱ्या हळुवार गुदगुल्या मस्त वाटायच्या. थोडंसं गुडघ्यापर्यंत चालत जायचं, पण तितकंच. त्यापुढे नाही. श्रावणात आम्ही जत्रेला जायचो ओतूरला. तेव्हा उन्हाळ्यात जी शांत मांडवी पाहिलेली असायची ती तिथे नसायचीच. तिथे पावसाने दुथडी भरून वाहणारी चहाच्या रंगाची नदी असायची. एकाच व्यक्तीचं वेगळं रूपच जसं काही. नदीकाठीच जत्रा असल्यामुळे सगळा काठ माणसांनी भरलेला असायचा. नदीतनं होडीत बसून माणसं जाताना दिसायची, पण आम्हाला कधीही होडीत बसावंसं वाटलं नाही. ती नदी आपली वाटायचीच नाही.
एकदा आम्ही मे महिन्यात ओतूरला गेलो होतो, तेव्हा खूप दुष्काळ पडला होता. मांडवी नदी पूर्ण आटलेली. तेव्हा बाबा, मी आणि ताई त्या कोरड्या नदीतून चालत गेलो होतो. मध्येच कुठे तरी पाण्याचं डबकं लागायचं तेवढंच. नाही तर जणू आपण नदीच्या पात्रातून नव्हे, तर वाळूतून चालतोय असं वाटायचं. ते चित्र अगदी नकोनकोसं वाटायचं.
लहानपणी आम्ही येरवड्याला राहायचो. तेव्हा घराच्या जवळच मुळा नदी होती. तिकडे गावाबाहेर नदी असल्यामुळे थंड हवाही मिळायची आणि डासही. बाबा आम्हाला नदीपाशी फिरायला न्यायचा. कधी स्कूटरने गावात येत असलो की होळकर पूल पार करायचो. तिथली नदीही आठवते. आजूबाजूला हिरवाई असायची आणि नदीही हिरवीच झालेली असायची. कारण नदीवर बऱ्याचदा हायसिंथ साठत जायचं. मग लष्कराची माणसं ते काढताना दिसायची. दर रविवारी आई-बाबा आम्हाला बंडगार्डनला घेऊन जायचे. तिथे हीच मुळा परत भेटायची, पण जरा नव्या शहरी रूपात. पावसाळ्यात तर या नदीचा चहाच चहा! अगदी अमृततुल्य! एकदा तर पाऊस एवढा जास्त झाला की होळकर पुलावरून पाणी गेल्याचं आठवतंय.
पण आता डेक्कनवर जी मुठा नदी दिसते ती बघून वाईट वाटतं. शहरातून वाहणारी अगदीच कमी पाण्याची नदी. दोन्हीकडे बांध आणि रस्ते केलेले. त्यामुळे वाहतुकीत हरवलेली. पावसाळ्यात वाहणारी मुठा मात्र पाहावीशी वाटते, पण नंतर पाणी ओसरलं की कडेला पाण्याबरोबर वाहत आलेला कचरा राहतो ते बघून वाईट वाटतं.
मुळा-मुठा नद्यांनंतर माझ्या आयुष्यात आली ती इंद्रायणी. मी विपश्यना करायला लागले तेव्हा सुरुवातीचे कोर्सेस इगतपुरीला जाऊन केले. पण नंतर आळंदीच्या पुढे मरकळ इथे नवं विपश्यना सेंटर झालं आणि एक कोर्स मी तिथून केला. तेव्हा इगतपुरीची सवय असल्याने सुरुवातीला चुकल्याचुकल्यासारखं होत असे. मन सैरभैर होई. त्या काळात अचानक शेजारून वाहणारी इंद्रायणी भेटली. आणि बस्स, मला अगदी मैत्रीणच भेटली जशी! मस्त झुळूझुळू वाहत होती. नावही किती सुंदर! विपश्यनेच्या विश्रांतीच्या वेळी मी नदीकाठी जाऊन बसायचे आणि त्या स्तब्ध शांततेत पाण्याच्या लयीकडे पाहत मनात एक नवाच तराणा उमटायचा. पाण्याचे आणि पक्ष्यांचे आवाज सोबतीला असायचे आणि त्यामुळे मौनातला गोडवा दिसायचा. कधी एकटेपणा वाटला की जसं काही ती म्हणायची, मी आहे ना तुझ्याबरोबर. वाटायचं, या नदीकडून किती शिकण्यासारखं आहे! आपलं आपण छान वाहत राहायचं!
नंतर खूप साऱ्या नद्या आणि तळी भेटली ती लडाखमधे. आजकाल खूपजण जातात लेह-लडाखला. पण दहा वर्षांपूर्वी मी आणि माझा नवरा पराग तिकडे जायला लागलो. तेव्हा तिथे भारतीय पर्यटक फारच क्वचित दिसायचे. जर्मन, अमेरिकन जास्त असायचे. आणि तेव्हाही श्रीनगरहून कारगिलमार्गे तर लेहला कुणीच जायचं नाही. आम्ही दोघांनी जायचं ठरवलं तेव्हा सगळ्यांनी वेड्यातच काढलं, पण आम्ही बिनधास्तपणे गेलो. कारगिलमध्ये थांबलो. राहिलो. जवानांना भेटलो. भारतातला खराखुरा भव्य निसर्ग, पर्वत, नद्या पाहिल्या आणि लडाख प्रांताच्या प्रेमातच पडलो.
या सगळ्या प्रवासामध्ये सतत सोबत असायची ती नद्यांची. वळणावळणांच्या अवघड घाटांमधून ते ड्रायव्हर सराईतपणे गाडी न्यायचे. रस्त्याच्या एका बाजूला उंच कडा तर दुसरीकडे खोल दरी. सरळ रस्ता क्वचितच. त्या वेळी नद्यांच्या सोबतीचा दिलासा असायचा. अगदी निघाल्यापासून ते पोहोचेपर्यंत दोन दिवसांच्या लांबच लांब प्रवासात दरीमध्ये सतत एखादी नदी असायचीच. एक संपते न संपते तोच दुसरी लागायची. प्रत्येक नदीचा रंग वेगळा, पात्र वेगळं, किनारा वेगळा आणि मुख्य म्हणजे स्वभाव अन् व्यक्तिमत्त्व वेगळं. वेगवेगळ्या व्यक्तींसारखंच.
श्रीनगरमधे झेलम नदी पाहिली होती, पण तिथे मी तिचा आनंद घेऊ शकले नाही. कारण अतिशय दलदलीतलं ‘दल लेक', सतत जवानांची गस्त आणि अस्वस्थ वातावरण. तिथून निघाल्यावर मात्र खरा प्रवास सुरू झाला. द्रासमधे द्रास नदी पाहिली. ती पुढे ‘सुरू' नदीला मिळते. नंतर कारगिलमधे सुरू नदी लागली. या सगळ्या नद्यांची अन् माझी आधीपासूनच ओळख होती. आता फक्त प्रत्यक्ष भेट होत होती. पण गंमत म्हणजे ड्रायव्हर छातीठोकपणे चुकीची माहिती देत होता. श्रीनगरपासून तो प्रत्येक नदीला सिंधूच म्हणत होता. मी त्याला सांगितलं, की सिंधू नदी तर कारगिलनंतर लागते. माझ्याकडे या प्रदेशांविषयीची भरपूर पुस्तकं आहेत आणि प्रत्येक नदी कुठून निघते, कुठे मिळते याची मला माहिती आहे कळल्यावर तोच मला प्रश्न विचारू लागला.
द्रास आणि सुरू या दोघी सिंधूच्याच कन्या. द्रास सुरू नदीला मिळते आणि सुरू सिंधूला. कारगिलपासून लेहच्या प्रवासात उत्तम साथ मिळते ती सिंधू नदीची. आधीच्या नद्या छोट्या छोट्या, पण सिंधू छान भारदस्त. अगदी एखाद्या उस्ताद गायकाच्या ठाम लयीतल्या विलंबित बडा खयालासारखी. खास व्यक्तिमत्त्वाची. प्रवासात घाट जेव्हा जेव्हा खाली यायचा तेव्हा किती तरी वेळा आम्ही तिच्या किनारी थांबलो. सिंधूच्या खळाळत्या पाण्याबरोबर तासन् तास शांतता अनुभवली. कधी साध्या डोंगरांमधून तर कधी उंचच उंच राकट खडकांमधून वाहत जाणारी सिंधू. त्यानुसार तिचे प्रवाहसुद्धा बदलतात. कधी शांत तर कधी फेसाळलेली. ती अनुभवल्यावरच कळतं की या इंग्रजांनी या नदीवरून आपल्या देशाचं इंग्रजीत नाव का ठेवलं असेल! असं ते अमाप सौंदर्य. सिंधू तिबेटातून उगम पावून भारतात लडाखमधे येते आणि पुढे कारगिलमार्गे पाकिस्तानात जाते. त्यामुळे कारगिलमार्गे लेहला जाताना सिंधूचा उलटा प्रवाह दिसतो, तर मनालीमार्गे जाताना आपण सिंधूच्या बरोबरीने जातो.
मध्यंतरी ॲलिस अल्बिनिया ह्या ब्रिटिश बाईंनी लिहिलेलं ‘द एम्पायर ऑफ इंडस' हे पुस्तक वाचलं. अल्बिनियासुद्धा सिंधूच्या प्रेमात पडली आणि तिने या नदीचा अभ्यासच करायचं ठरवलं. त्यामुळे या बाईंनी सिंधूच्या उगमापासून ते ती समुद्राला मिळते तिथपर्यंत प्रवास केला. बोटीत बसून, कधी चालत, तर कधी अगदी पोहूनसुद्धा. सिंधूच्या किनाऱ्यांवर राहणाऱ्या माणसांच्या मुलाखती घेतल्या. भारतात तिला सिंधूचं सौंदर्य दिसलं, तर पाकिस्तानात सिंधू खोऱ्यातला रखरखाट. अशा ठिकाणी तर तिने चालत आणि बैलगाडीने प्रवास केले. तिथे भेटलेल्या आजी-आजोबांशी गप्पा मारल्या. त्यातल्या अनेकांनी पूर्वीच्या सिंधू नदीच्या समृद्धीच्या कहाण्या तिला ऐकवल्या. त्या बाईंशी माझं नातं जुळलं.
पुढे कारगिलमधून लेहकडे जाताना झंस्कार पर्वतांमधे लागते झंस्कार नदी. नीमू गावात सिंधू आणि झंस्कार नद्यांचा संगम आहे. आज-काल ड्रायव्हर्स प्रवाशांना घेऊन हा स्पॉट हमखास दाखवतात. सिंधूचा रंग ब्राउनिश तर झंस्कारचा पांढरट. पण पुढे जाणारा सिंधूचा प्रवाह झंस्कारचा रंग धारण करून जातो. आमचा ड्रायव्हर म्हणाला, 'मला तर वाटतं की झंस्कारच पुढे वाहते; पण लोक सिंधू पुढे वाहते असं का म्हणतात कळत नाही.' हा रंग बदलण्याचा अनुभव मला अनेक संगम बघताना आला.
प्रत्यक्ष लेह शहरातली सिंधू खूप वेगळी दिसते. कारण एरवी भारतात, शहरात सुंदर नदी कधी दिसत नाही. त्या युरोपात दिसतात. पण इथे अगदी भर लेहमधे असूनही अगदी स्वच्छ. अगदी दोन्हीकडे बांध घातलेले, बागा केलेल्या. पण मला अशी आखीव-रेखीव नदी फारच वेगळी वाटते. तिचा बांध न घातलेला ओरिजिनल किनारा, त्या किनाऱ्यावरच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, अस्ताव्यस्त झाडं हे सगळं बरं वाटतं. पण तरी पुण्यातल्या मुळा-मुठेपेक्षा किती सुंदर आहे ही!
नंतर लेहच्या अजून उत्तरेला भेटली ती नुब्रा नदी आणि नंतर श्योक नदी. दोघीही अक्षरश: पांढऱ्या शुभ्र. अगदी मोठ्ठा पदर असलेल्या पांढऱ्या शुभ्र साड्या नेसल्यासारख्याच. नुब्रा व्हॅली म्हणजे समुद्रसपाटीपासून दहा हजार फुटांवर असलेलं वाळवंट. अगदी उंट, निवडुंग- सगळं काही असलेलं वाळवंट. आणि तिथून वाहणारी ही नुब्रा नदी. तिथेच नुब्राच्या बरोबरीने वाहणारी श्योक नदी भेटते. श्योकच्या किनारी तर मला कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांचीच आठवण आली... त्या भजनाच्या ठेक्यात वाहत होती जशी ती. पण असं वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे कुमार गंधर्वांनी त्यांच्या चीजांमध्ये किंवा भजनांमध्ये स्वत:चा उल्लेख ‘शोक' असा केला आहे. तशीच ही नदी म्हणजे शोकातलं सौंदर्य. ह्या दोन्ही छान फेसाळ नद्या. किनाऱ्यावर अनेक पांढरे दगड-गोटे. कुठलीही नदी भेटली की मी आठवण म्हणून तिच्यातले छान दगड-गोटे वेचून घेते. घरातल्या बागेत एरवी त्या दगड-गोट्यांना बघितलं की नदीची आठवण येते.

मनालीहून लेहला जाताना भेटली बियास नदी अन् तिचा धबधबा. त्याच वाटेवर चंद्रा नदी, भागा नदी, त्यांचा संगम होऊन पुढे वाहणारी चंद्रभागा (ज्याला चिनाब असंही म्हणतात.) या नद्या भेटल्या. त्या नद्यांनीही आपापल्या वेगळेपणाने माझ्याशी नातं जोडलं.
नंतर एकदा ‘सरंधा जैन' या पंचविशीतल्या मुलीने लिहिलेलं ‘इन सर्च ऑफ यमुना : रेफ्लक्शन्स ऑन द रिव्हर लॉस्ट' हे पुस्तक वाचनात आलं. सरंधा जन्मापासून दिल्लीत राहणारी. तिला नदीचं खूप आकर्षण. त्यामुळे तिने लहानपणापासून दिल्लीतली यमुना नदी जवळून अनुभवली. दिल्लीच्या शहरी झगमगाटात लहान लहान, चिंचोळी होत जाणारी यमुना पाहून सरंधा खूप अस्वस्थ व्हायची. तिचे आजोबा, त्यांच्या लहानपणी दिल्लीतली यमुना केवढी रुंद होती आणि झाडांनी वेढलेली होती हे सांगायचे, तेव्हा ती अस्वस्थता आणखी वाढायची. यमुनेवरच्या प्रेमापोटी ती सतत यमुनेला भेटत राहिली. उगमापासून ते अगदी यमुना गंगेला मिळते तिथपर्यंत प्रवास केले. नदीतल्या प्रदूषणाचा अभ्यास केला. त्या प्रदूषणाला विरोध म्हणून सामाजिक चळवळीत उतरली. सरंधा लिहिते, 'आपलं एखाद्या नदीवर प्रेम असतं; त्या प्रेमातल्या आनंदापेक्षाही त्या नदीची मानवाने केलेली दुर्दशा पाहून होणारं दु:ख हे खूप पटीने जास्त असतं.'
युरोपात आल्यावर माझीही एका नदीशी अशीच खूपच गहिरी दोस्ती झाली. ती म्हणजे जर्मनीत भेटलेली ऱ्हाईन नदी. ऱ्हाईन नदी म्हणजे पश्चिम युरोपचं महाकाव्य. पश्चिम युरोपचा इतिहास ऱ्हाईन नदीच्या काठानेच जातो. या इतिहासात डोकावून पाहिलं तर अनेक प्रसिद्ध कवींनी या नदीवर केलेली सुंदर काव्यं सापडतात. ग्रीक, जर्मन, रोमन, फ्रेंच अशा अनेक कवींची काव्यं. ऱ्हाईनमुळे पश्चिम युरोपातली संस्कृती विकसित झाली. हिरव्याकंच डोंगरांमधून मुरडत मुरडत जाणारी ऱ्हाईन आपण बघतो तेव्हा तिच्या प्रेमातच पडतो! ऱ्हाईन स्वित्झर्लंडमधल्या आल्प्स पर्वतातल्या एका ग्लेशियरमधे उगम पावते आणि एका खूपच मोठ्या धबधब्याच्या रूपाने पुढे येते. नंतर त्याचं एक विस्तीर्ण तळं होतं आणि मग ती नदीच्या रूपाने वाहू लागते. या ऱ्हाईनचा जास्तीत जास्त भाग जर्मनीत असला तरी ती ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि नेदरर्लंड अशा अनेक देशांमधून वाहत जाते, आणि आता तर ती युरो रिव्हर म्हणूनच ओळखली जाते.
सगळीकडे सिमेंटने बांधलेले काठ ही एक गोष्ट सोडली तर मला ऱ्हाईन खूपच आवडून गेली. नंतर ऱ्हाईनवरचं पुस्तक वाचताना समजलं, की ह्या सगळ्या देशांनी, ऱ्हाईन कमिशनने ऱ्हाईन वाचवण्यासाठी, ती शुद्ध ठेवण्यासाठी केवढे परिश्रम घेतले आहेत! आणि अजूनही अथकपणे ते काम सुरू आहे. आणि त्यामुळेच आज ती आपल्याला एवढी स्वच्छ सुंदर दिसते आहे! एखाद्या नदीमुळे देशाचं आणि गावाचं व्यक्तिमत्त्व किती बदलून जातं ह्याचं ऱ्हाईन हे उत्तम उदाहरण.
पूर्वी हॉलंडमधे राहत असताना मला ऱ्हाईन नदीबद्दल कधीच आपलेपणा वाटला नाही. कारण हॉलंडमधली ऱ्हाईन फारच स्थिर दिसायची. राखाडी रंगाची. तिला प्रवाह खळखळता अजिबात वाटायचा नाही. ती मला एखाद्या अति थंड स्वभावाच्या व्यक्तीसारखी वाटायची. आणि त्यामुळे तिच्यापासून लांबच जावंसं वाटायचं. जर्मनीतल्या ऱ्हाईनचा स्वभाव मला वेगळा वाटला. फारच वेगळा. मनात मजा वाटली. एकाच व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळ्या देशांमध्ये वेगळा कसा असेल? तिचं मन तर एकच असतं ना? पण नंतर विचार आला, की का असू नये वेगळा स्वभाव? माणसं पण किती वेगळी वागतात आपल्या देशात आणि परक्यांच्या देशात! हेच तत्त्व कशावरून या नदीनेसुद्धा घेतलं नसेल? म्हणूनच कदाचित ती जर्मनीत, स्वत:च्या देशात आनंदाने, उत्साहाने स्वत:च्या रंगांची उधळण करत भरभरून वाहत असेल!
ऱ्हाईन जर्मनीतल्या वेगवेगळ्या शहरांमध्येही वेगवेगळी भासते. कलोन शहरामध्ये खूप शहरीपणा लाभलेली. आजूबाजूने झगमग, इमारती, कारखाने वगैरे असलेली. पण नव्या इमारतींच्या बरोबरच काही जुन्या रेखीव इमारती, चर्चेस, कॅथेड्रल्ससुद्धा आहेत. कलोन शहर म्हणजे जुन्या-नव्याची सरमिसळ. कलोन शहराची सुरुवातच ह्या नदीपासून होते, आणि नदीचं पात्रसुद्धा केवढं रुंद! छान प्रशस्त. अगदी आपलंसं करणारं.
बॉन शहरात मात्र ह्याच नदीच्या कडेने छान हिरवाई आहे. अगदी भर शहरातही नदीच्या बाजूला इमारतींसोबत हिरवाई जास्त. उन्हाळ्यात पाहिलं तर गडद हिरवाई. मार्चमधे अनेक रंगांच्या फुलांनी डवरलेली झाडं. त्या फुलांचं प्रतिबिंब ऱ्हाईनमधे पडलेलं. एप्रिलच्या शेवटाला फुलं गळायला लागतात तेव्हा त्या फुलांचा तवंग नदीवर सुंदर उमटतो. पिवळा, गुलाबी, पांढरा वगैरे. अगदी रांगोळीसारखा. सप्टेंबरपासून पानांचे राग बदलत जाणारी झाडं आपलं नदीवरचं रूप बदलतात. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमधे पूर्ण पानगळ होणारी झाडं. हा सर्व सुंदर बदल आपल्या डोळ्याला जितका हवाहवासा वाटतो तितकाच त्या नदीलासुद्धा किती वेगळा आनंद देत असेल!
याच गावात नदीच्या किनारी एकाला एक लागून असलेल्या प्रसिद्ध सात टेकड्या आहेत. त्या टेकड्यांमध्ये काही जुने किल्लेसुद्धा आहेत आणि इथे नदीच्या कडेने असलेल्या हिरवाईमधे पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक हे सगळं फारच छान आहे. लांबवरची ऱ्हाईन बोट टूर करताना या हिरव्याकंच टेकड्या, हे जुने किल्ले, ऱ्हाईनची अनेक वळणं वळणं, अनेक टेकड्यांच्या उतारांवर केलेले वाइन यार्ड्स, हे सगळं खूप छान वाटतं, पण त्याचबरोबर मनात येतं, की ह्या नदीने महायुद्धाचे धक्के पण किती सोसले आहेत! ऱ्हाईन नदीच्या पूर्ण पात्राबरोबर तिच्या दोन्ही बाजूंना अधूनमधून बाराव्या शतकापासून बांधलेले अनेक किल्ले आहेत. त्यातल्या अनेक किल्ल्यांचा वापर सैनिकांना लपायला, राहायला, आणि गोळीबार करायलाही झाला आहे. तेव्हा काय वाटलं असेल ह्या नदीला? का ही माणसं एवढी एकमेकांच्या उरावर बसत आहेत? का एवढं युद्ध करत आहेत? नदीने हे सगळं निमूटपणे पाहिलं, पण ती आपली डोळे टिपत शांतपणे वाहत राहिली.
अशा अनेक नद्या अनुभवल्या तरी माझं नद्यांचं आकर्षण काही कमी होत नाही, उलट वाढतच जातं. संवाद साधायला आपल्याला नेहमी एक अनुभवी व्यक्ती बरोबर असावीशी वाटते. तशी ही नदी. एखाद्या मावशी किंवा आजीसारखी माया करणारी. आपण आपला आनंद, दु:ख सगळं काही शेअर करू शकतो तिच्याबरोबर आणि आपल्या कळत-नकळत आपणच तिच्याकडून शिकत जातो. वर्षानुवर्षांच्या अनुभवांनी समृद्ध असतं हे पाणी. पाण्याचं मला सर्वांत आवडतं ते म्हणजे त्याचं नितळ मन! त्या नितळ, निकोप मनाने ते पाणी माणसांना, प्राण्यांना पोसतं, जगवतं आणि एक सुंदर अर्थपूर्ण जीवन देतं! मनात आशा वाटत राहते, की माणूस कधी ना कधी नक्की शिकेल ह्या नद्यांकडून एक नितळ जीवन जगायला!