डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातले जातिभेद आणि अस्पृश्यताविरोधी चळवळीचे प्रणेते. त्यांचं कार्य जगभरातल्या मानवी हक्कांच्या चळवळींना प्रेरणा देत आलं आहे. केवळ दलित आणि वंचित समुदायातील लोकच नव्हे, तर कामगार, शेतकरीही बाबासाहेबांना उद्धारकर्ते मानतात. साहजिकच त्यांच्या कार्याचं गुणगान गाणारी असंख्य पुस्तकं आजवर लिहिली गेली आहेत. हजारो कलाकार वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करत आले आहेत. पोवाडे, शाहिरी अशा अनेक प्रकारांमधून महाराष्ट्र आजवर भीमगीतं गात-ऐकत आला आहे. हा सिलसिला आजही कायम आहे. रॅप, स्टँड अप कॉमेडी अशा नव्या माध्यमांमधूनही तरुणाई आंबेडकर विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतेच आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील अशाच काही निवडक कलाकारांबद्दल.
रॅप टोली (Rap toli) – रॅप वगैरे गोष्टी फक्त मोठ्या शहरांमध्येच तयार होतात किंवा ऐकल्या जातात, हा समज खोटा ठरवत अमरावतीच्या विपिन तातड आणि सहकाऱ्यांनी मागील १० वर्षांत स्वतःचं वेगळं रॅप कल्चर तयार केलं आहे. विपिन तातड (VIP), तौसिफ खान (TMK), मंगेश इंगोले (वर्धन) आणि गौरव इंगोले (चार्ली) या चार मित्रांनी मिळून २०१६ ‘रॅप टोली’ची निर्मिती केली. याचा सहज सोपा अर्थ रॅप म्हणणारी पोरं असा होतो. अमरावतीच्या सिद्धार्थनगर भागात राहणारे हे चार मित्र. वय तिशीच्या आसपास. चौघांच्या घरची परिस्थिती जेमतेमच. विपिनला लिहायची आवड. पण त्यात नेमकं काय करियर करायचं हा प्रश्न त्याला पडलेला. गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलेला मंगेश एका कँटिनमध्ये हेल्पर म्हणून काम करायचा. इंजिनिअरिंग होऊनही चांगला जॉब मिळत नसल्याने तौसिफ वडिलांच्या चायनीज गाडीवर काम करायचा. गौरवही सुशिक्षित बेरोजगारच. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जगण्याला आधार म्हणून हे चौघे कलेकडे वळले.
याविषयी विपिन सांगतो, ‘‘वस्ती-झोपडपट्टीमध्ये राहत असताना अनेक समस्या रोज पहाव्या लागायच्या. नळाला पाणी नाही, गटारं कायम तुंबलेली, वस्त्यांमधली अस्वच्छता, प्रशासनाची बेपर्वाई.. शिवाय जातीवरून मिळणारी भेदभावाची वागणूक सवयीची झालेली, जो काही विकास पहायला मिळायचा तो श्रीमंत वर्गाचाच. हे सगळं पाहून अस्वस्थता येत होती. ती बाहेर काढण्याचं माध्यम म्हणून आम्ही रॅपकडे वळलो. लहान असताना खैरलांजी हत्याकांड बघितलं होतं. मोठं होऊ लागलो तसं रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी, हाथरसमधील दलित मुलीवर झालेला अत्याचार या घटना अस्वस्थ करत होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यंत्रणेविरुद्ध मोठा लढा दिला. पण ती लढाई अजूनही संपलेली नाही, याची जाणीव होत होती. त्यामुळे गाण्यांमधून या प्रश्नांना आवाज देण्याचा प्रयत्न करण्याचं आम्ही ठरवलं.’’
विपिनच्या बोलण्याला दुजोरा देत तौसिफ म्हणतो, ‘‘मला रॅप म्हणण्यासाठी घरातून विरोध व्हायचा. आमच्या धर्मात गाणं म्हणणं हराम आहे असं कारण घरचे द्यायचे. मात्र मागील काही वर्षांत मुस्लिमांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढलं आहे. कोणतेही पुरावे नसताना त्यांना तुरुंगात खितपत पडावं लागतं. रोजच्या जगण्याची मारामार असताना खटले लढण्यासाठी पैसे कुठून आणणार? कुटुंबाचे त्यात हाल होतात. हे प्रचंड अस्वस्थ करणारं आहे. रॅपच्या माध्यमातून या अस्वस्थतेला मी वाट मोकळी करून दिली.’’
हेही वाचा - गोपाळबाबा वलंगकर, रामचंद्र बाबाजी मोरे - स्मरण फुले आणि आंबेडकरांच्या दोन खंद्या शिलेदारांचं
शिक्षण, पर्यावरण, महिला सुरक्षितता, लिंगभेद, असमानता, मुस्लिमोफोबिया, आरोग्य, शेतकरी प्रश्न, राजकीय समस्या, महामानवांना अभिवादन हे ‘रॅप टोली’च्या रॅपचे विषय असतात. याशिवाय ज्वलंत सामाजिक-राजकीय प्रश्नांवर थेट भूमिका घेणारे रॅप्सही टीम सादर करते. यामध्ये लॉकडाउन काळात लोकांना आलेल्या अडचणी, स्थलांतरित कामगारांची झालेली होरपळ, आदिवासींच्या जमिनींचे प्रश्न, दिल्लीतलं शेतकरी आंदोलन याविषयी विपिन आणि टीमने रॅप तयार केले आहेत. आंबेडकरांना अभिवादन करणारं ‘रॅप टोली’चं ‘जय भीम कडक’ हे गाणं युट्यूबवर २० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलेलं आहे. रेकॉर्डिंगसाठी विपिनच्या घरातच एक छोटेखानी स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. विपिनने व्हिडिओ एडिटिंग युट्यूबवर ऑनलाइन शिकून घेतलं. गरज पडलीच तर मोठे स्टुडिओही भाड्याने घेतले जातात.
मधल्या काळात विपिनला झुंड या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटासाठी एक गाणं करण्याची संधी मिळाली. ‘रॅप टोली’ची गाणी मराठी, हिंदी आणि वऱ्हाडी भाषेत असतात. सुरुवातीला अमरावती आणि विदर्भात कार्यक्रम करणारी ही टीम आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत आणि देशांतील वेगवेगळ्या राज्यांत कार्यक्रमासाठी जाऊ लागली आहे. या प्रवासाविषयी सांगताना विपिन म्हणतो, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कायम आमच्यासोबत राहणार आहे. त्यांचे विचारच आम्हाला दिशा दाखवतील. माझ्या माणसांसाठी मला रॅप करायचा असून आयुष्यभर ते जास्त चांगल्या पद्धतीने करणं हेच माझं ध्येय आहे.’’
कवन - ॲन आंबेडकराईट ऑपेरा - दीड पावणेदोन वर्षांची वैचारिक घुसळण, वैयक्तिक जीवनातील अनुभवांचं शेअरिंग आणि त्याला दिलेली संगीताची साथ असा कवनचा प्रवास आहे. मुंबईत मागील दहा वर्षांपासून सक्रिय असलेल्या एल्गार सांस्कृतिक मंचच्या कलाकारांनी अभिषेक मुझुमदार या नाट्यशिक्षकाच्या तालमीत कसून सराव करत ‘कवन’चा प्रयोग उभा केला आहे. याच्या निर्मितीमध्ये बंगलोरच्या नालंदा आर्टस् स्टुडिओची मदत घेण्यात झाली आहे. कवन या शब्दाचा अर्थ शाहिरी लोककलेतून प्रबोधन. ऑपेरा या पाश्चिमात्य शब्दाचा अर्थ आहे नाट्यरूपांतरण. भारतीय आणि पाश्चिमात्य कलाप्रकार एकत्र करत ‘कवन’ हा आगळावेगळा प्रयोग मागील वर्षभर भारतातील मुंबई, बंगलोर, म्हैसूर या महत्त्वाच्या ठिकाणी सादर करण्यात आला. शिवाय या प्रयोगाचे अबुधाबीमध्येही प्रयोग झाले.
‘कवन’ हा साधारण दोन तासांचं २४ मुद्यांमध्ये गुंफलेलं संगीत नाटक आहे. नाटकाची भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी. बेजुल या बेरोजगार युवकाची, त्याच्या सगुणा या गाईची, शाहिरी परंपरेत आयुष्य वेचलेल्या वडिलांची, वडिलांचाच कित्ता पुढे गिरवणाऱ्या मुक्ता नावाच्या बहिणीची आणि कौटुंबिक परिस्थिती हलाखीची बनल्यामुळे धार्मिक विचारांना जवळ केलेल्या बेजुलच्या आईची एकत्रित गुंफलेली कहाणी. भारतीय समाजरचनेत अनेक वर्षांपासून चालत आलेला ब्राह्मण्यवाद सामान्य लोकांना कसा पोखरतो याचं अनुभवपर चित्रण ‘कवन’मध्ये आहे. या ऑपेराची निर्मिती उच्च मध्यम आणि श्रीमंत वर्गाला अंतर्मुख करायला लावण्याच्या हेतूने केली आहे. सहसा ऑपेराच्या शेवटी सुखद/शोकात्म संदेश देण्याचा किंवा गुंतागुंतीचा प्रसंग लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. ‘कवन’ हे नाटक मात्र चालू परिस्थितीविषयी विचार करायला प्रेक्षकांना भाग पाडतं.
अभिषेक मुझुमदार हे अबुधाबी येथील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये थिएटर विषय शिकवतात. त्यांची देस, कौमुदी, डेस्डीमोना ही नाटकं प्रसिद्ध आहेत. नालंदा आर्टस् स्टुडिओच्या वीणा अपाइया यांनी नाट्यनिर्मितीची जबाबदारी घेतली. नाटकाची कथा सुदेश जाधव याने लिहिली आहे. नाटकाचं पार्श्वसंगीत तुषार आढाव याने दिलेलं असून कर्नाटकातील सुप्रसिद्ध गायिका एमडी पल्लवी यांनी नाटकातील वाद्यवृंदांच्या सोबतीने नाटकातील गाण्यांना चाल लावली आहे. इरावती कर्णिक आणि जॉस्लिन क्लर्क यांनी नाटकातील प्रसंग बांधण्याचं काम केलं आहे.
हेही वाचा - बाबासाहेब, आपल्या भारतात दलितांवरचे अत्याचार वाढतच आहेत...
महाराष्ट्रातील संत-समाजसुधारकांचा विचार शाहिरी आणि इतर लोककलेच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी एल्गार सांस्कृतिक मंच काम करतो. एल्गार सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून शाहिरी गाण्यांचे शेकडो कार्यक्रम मागील १० वर्षांत मुंबईत झाले. त्यातील धम्मरक्षित रणदिवे, सिद्धार्थ बाविस्कर, अपूर्वा कदम, प्रवीण खाडे, अमृता तोडरमल, प्रियपाल दशांती हे कलाकार ‘कवन’चे प्रयोग सादर करतात. भारतीय राज्यघटनेत उल्लेख केलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक आणि राजकीय न्याय या मूल्यांचा प्रसार करण्याचं काम ‘कवन’च्या माध्यमातून केलं जात आहे. नाटकात काम करणाऱ्या सर्व कलावंतांवर आंबेडकर विचारांचा प्रभाव आहे. हे नाटक सादर करणाऱ्या सहा जणांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटना, त्यातून आलेले बरे-वाईट अनुभव यांच्या मिश्रणातून तयार झालेलं असल्याने त्याचा एकत्रित परिणाम लोकांच्या मनावर राहतो असं नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि भारतातील महत्त्वाच्या गावांत, शहरात आंबेडकर विचारांचा परिपाक असलेलं हे नाटक सादर करण्याची ‘कवन’ टीमची इच्छा आहे. देशाच्या सांस्कृतिक राजकारणात हस्तक्षेप करणारा हा छोटासा पण महत्त्वाचा प्रयोग असल्याची त्यांची धारणा आहे.
अंकुर तांगडे (ब्ल्यू मटेरियल) – ज्या समाजात दलितांना अजून मनापासून स्वीकारलं जात नाही तिथे लैंगिक अल्पसंख्याकांसमोरचं (क्वीर) आव्हान मोठं असणार याची जाणीव अंकुरला होती. महाराष्ट्रातील पहिली दलित क्वीर स्टँड अप कॉमेडियन ही ओळख अंकुरने स्वतः बनवली आहे. बीडमधील मनीषा तोकले आणि अशोक तांगडे या सामाजिक कार्यकर्त्यांची मुलगी ही अंकुरची दुसरी ओळख. आई-वडिलांकडून सामाजिक प्रश्नांची समज मिळालेली अंकुर ‘मकाम’ (महिला किसान अधिकार मंच) या शेतकरी आणि शेतमजूर महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनेची सक्रिय कार्यकर्ती आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१८ च्या अखेरीस अंकुरने स्टँड अप कॉमेडी करायला सुरुवात केली. या क्षेत्रातही उच्चवर्णीयांची मक्तेदारी तिला अनुभवायला येत होती. कुटुंबातील लोकांना (वडील आणि आजोबा) जातीय भेदभावाला सामोरं जावे लागलेले अनुभव अंकुरने ऐकले होते. त्यामुळे ती लहानपणापासूनच जात बाजूला ठेवून इतरांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र आयुष्यातील एका टप्प्यावर तिची जात समजल्यानंतर काही लोकांकडून मिळालेली दुजाभावाची वागणूक तिला अस्वस्थ करत होती.
स्टँड अप कॉमेडी करताना अंकुर स्वतःविषयी बोलू लागली. स्वतःचं समलैंगिक आणि दलित असणं ती उघडपणे स्टेजवरून मांडू लागली. असं बोलल्यामुळे अनेक ठिकाणी तिला संधी नाकारली जाईल याची जाणीव तिला होती. मात्र तिने स्वतःच्या हिंमतीवरच कार्यक्रम करायचं ठरवलं. महाराष्ट्रात आणि भारतात दलितांच्या वाट्याला येणारी वागणूक, समाजात क्वीर म्हणून जगताना येणाऱ्या अडचणी याविषयी ती विनोदी अंगाने मांडणी करू लागली. तिच्या स्टँड अप कॉमेडीच्या प्रयोगाला येणारे लोक कुतूहलाने विचारायचे, आता आपण शिक्षित झालो आहोत, सुधारलो आहोत. आता कुठे जात-पात वगेरे काही मानलं जातं. यावर उत्तर देताना अंकुर म्हणते, ‘‘अनेक लोकांना आपल्या आसपास चालणारा भेदभाव दिसूनच येत नाही. ते इथल्या सामाजिक वास्तवाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात किंवा त्यांना ते समजूनच घ्यायचं नसतं.’’
काही दलित मित्र-मैत्रिणींना सोबत घेत अंकुरने ‘ब्ल्यू मटेरियल’ नावाची स्टँडअप कॉमेडी फर्म सुरू केली. याशिवाय दलित क्वीर नावाचं संघटनही ती चालवत आहे. अंकुरच्या ओळखी आता महाराष्ट्राबाहेर अगदी देश-परदेशात झालेल्या आहेत. आम्हाला स्वाभिमानाने जगण्याची आणि कुणाहीसमोर न झुकण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असून त्यांचा विषमता निर्मूलनाचा, समानतेचा विचार आम्ही आमच्या कलेतून मांडत राहू, असं अंकुर आत्मविश्वासाने सांगते. रवी गायकवाड, विशाल, फलाह, राधे हे अंकुरचे ब्ल्यू मटेरियल मधील सहकारी. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत आशयपूर्ण स्टँड अप कॉमेडी सादर करत अंकुरने स्वतःला सिद्ध केलं आहे.
हेही वाचा - आजही दलितांना सर्रास मंदिर प्रवेश नाहीच?
नवसांस्कृतिक पर्याय – नवसमाजवादी पर्याय ही साधारण १३ वर्षांपूर्वी पुण्यात सुरू झालेली विद्यार्थी चळवळ. शेतकरी आणि कष्टकरी कामगारांच्या प्रश्नावर हे तरुण काम करतात. रस्त्यावर उतरून आंदोलन करणं, प्रशासनाला जाब विचारणं, पत्रक वाटणं आणि या सर्वातून कष्टकरी बांधवांचा आवाज बनणं असं या तरुणांच्या कामाचं स्वरूप आहे. या तरुणांनी नवसांस्कृतिक पर्याय ही एक शाखा तयार केलेली आहे. गाणी, कविता, शाहिरी, पोवाडे या माध्यमातून चळवळीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे तरुण गेल्या १० वर्षांपासून करताहेत. अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, शाहीर अमर शेख, संभाजी भगत यांची शाहिरी गाणी सादर करण्याचं काम बरीच वर्षं केल्यानंतर ही मंडळी आता रॅप या नव्या प्रकारात आपली कला सादर करत आहेत. महामानवांचे विचार आणि शेतकरी-कष्टकरी कामगार वर्गाच्या व्यथा-वेदना मांडणारी रॅप गाणी ते सादर करतात. चळवळींच्या इतिहासात लोकांमध्ये उत्साह आणि जोश निर्माण करण्यासाठी गाण्यांनी नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. हाच विचार लक्षात घेऊन रॅपच्या माध्यमातून आजूबाजूला घडणाऱ्या घटना, समाजातील प्रश्न लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न ही टीम करतेय. यामध्ये सागर सविता धनराज म्हणजेच एमसी सोशालिस्ट, मकरंद, केतकी, धनश्री आणि आदित्य हे पाच कलाकार आहेत. हे कलाकार तुम्हाला जसे रॅप म्हणताना दिसतील तसेच ते रस्त्यावर उतरून कष्टकऱ्यांसाठी भांडतानाही दिसतील.
या गटाचा प्रमुख सागर आहे. त्याने स्वतःची नवी ओळख एमसी सोशालिस्ट अशी तयार केली आहे. रॅप कल्चरमध्ये एमसीचा अर्थ मास्टर ऑफ सेरेमनी (कार्यक्रमाचा केंद्रबिंदू/प्रमुख) असा होतो. सोशालिस्ट हे भारतीय राज्यघटनेतील समाजवादाचं महत्त्व ओळखून स्वतःशी जोडलेलं नाव आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील कुंभेज गावचा. घरची परिस्थिती हलाखीची. आई-वडील सालाने आणि वाट्याने शेती करणारे. जातीय भेदभावाचा अनुभव लहानपणापासूनच आलेला. राहण्याचा एकच एक ठिकाणा नाही. अशा उपऱ्या जगण्यातच त्याच्या हातात विद्या बाळ यांचं ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक पडलं. ‘देव सखा की बागुलबुवा’ हा त्यातला लेख वाचून त्याला आसपास असलेला अंधश्रद्धेचा विळखा लक्षात आला. त्यानंतर त्याने विद्याताईंची भेट घेऊन स्वतःमध्ये बदल करण्याचं ठरवलं. तो विद्यार्थी चळवळीशी जोडला गेला.
हेही वाचा - दलितांवरचे अत्याचार वाढतच चालले आहेत..
रॅपमध्ये कुठल्याही प्रकारची अश्लील भाषा वापरायची नाही, शिवीगाळ करायची नाही हा नियम या लोकांनी कटाक्षाने पाळला आहे. संस्कृती म्हणजे काय, शिवराय- महात्मा फुले-सावित्रीबाई-राजर्षी शाहू-डॉ बाबासाहेब आंबेडकर-रमाई या महामानवांचा विचार, कष्टकऱ्यांचं जगणं आणि भांडवलशाही व्यवस्थेची चिकित्सा हे एमसी सोशालिस्ट आणि त्यांच्या टीमचे रॅपचे विषय आहेत. समाजात दुर्लक्षित राहिलेल्या लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम ही मंडळी करतात. बोल inqilabi नावाने त्यांचं युट्यूब चॅनेलही आहे. महामानवांच्या जयंती-पुण्यतिथीला तसेच वेगवेगळ्या साहित्य-नाट्य संमेलनाला आपली कला सादर करण्यासाठी या गटाला बोलावलं जातं. मागील ३ वर्षांच्या विद्रोही साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या गटाला आवर्जून बोलावण्यात आलं. या गटाने आतापर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या २५ हून अधिक ठिकाणी आपली कला सादर केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांपर्यंत रॅपच्या माध्यमातून पुरोगामी विचार पोहोचवण्याचा या टीमचा निर्धार आहे. रॅपची निर्मिती हे खर्चिक काम असलं तरी कुणाकडूनही अवास्तव पैसे घेण्याचं काम हे तरुण करत नाहीत. हे काम ते ज्या कष्टकरी बांधवांसाठी करतायत त्यांनी एक रुपयाची मदत केली तरी ती समाधानकारक असल्याचं एमसी सोशालिस्ट सांगतो.
फोटो क्रेडिट (कवन) - एमडी पल्लवी
तुम्हालाही वर उल्लेख केलेले कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास खालील नंबरवर संपर्क करू शकता.
रॅप टोली – 8788594316
कवन – 9167491799
ब्ल्यू मटेरियल – 7588525350
नवसांस्कृतिक पर्याय – 7875893712
