स्त्रीची घर सांभाळणारी, मुलं वाढवणारी आणि पुरुषापेक्षा दुय्यम अशी परंपरेने प्रतिमा परंपरेने ठसली आहे. सनातनी वृत्तीच्या समाजात अजूनही स्त्रीला 'घरकामासाठी उपयुक्त आणि प्रजोत्पादनासाठी आवश्यक' असं मानलं जातं. १९६०-७०च्या सुमारास 'समाज जीवशास्त्र' नावाचं एक शास्त्र उदयास आलं. समाजाचा जीवशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या ह्या शास्त्रास इंग्रजीमध्ये 'सोश्यो बायोलॉजी' असं म्हणतात. त्यानंतर १९९०च्या आसपास उदयास आलेल्या 'उत्क्रांतिवादी मानसशास्त्र' (इव्होल्युशनरी सायकॉलॉजी) या शाखेनं स्त्रीचं जीवन ही एक 'फायद्यासाठीची तडजोड' असल्याचं ठरवलं, असं या शास्त्राचे टीकाकार म्हणतात. या उत्क्रांतिवादी मानसशास्त्रज्ञांच्या मते पुरुष गर्भार राहत नसल्यामुळे तो मुक्त संचारी होता, तर स्त्रीला गर्भारपणात आणि नंतरही बालसंगोपनाच्या जबाबदारीमुळे जखडल्याप्रमाणे वसतिस्थानाच्या जवळपास वावरावं लागत असे. अशा वेळी संरक्षण आणि अन्नपुरवठा ह्या दोन गोष्टींच्या बदल्यात निवडलेल्या पुरुषाला किंवा ज्याने आपली निवड केली त्या पुरुषाला देह समर्पित करणं, ही तडजोड स्त्रीने स्वीकारली.
मात्र, अलीकडच्या काळात स्त्रीसंबंधी जे नवं संशोधन झालं आहे त्यातून एक नवी विचारधारा पुढे येत आहे. परंपरेने ठसवलेल्या स्त्रीच्या प्रतिमेवर तसंच उत्क्रांतिवादी मानसशास्त्राच्या प्राथमिक गृहितांवरच ही विचारधारा घाव घालते. एकविसाव्या शतकात स्त्रीला तिचं योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आणि पुरुषांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हे नवे विचार उपयुक्त ठरतील, असं बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे.
'न्यूयॉर्क टाइम्स'च्या विज्ञान पत्रकार नताली अँजियर यांनी 'वूमन - अॅन इंटिमेट जिऑग्राफी' नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. हे पुस्तक स्त्रीवादी भूमिकेचा आधार ठरलं आहे. मात्र, या पुस्तकाशिवाय स्त्रीविषयी विचार मांडणारी अनेक पुस्तकं एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये डायेन हेल्स यांचं 'जस्ट लाइक अ वूमन हाऊ जेंडर सायन्स इज रीडिफायनिंग व्हॉट मेक्स अस फीमेल', हेलन फिशर या मानववंश संशोधिकेचं 'द फर्स्ट सेक्स: द नॅचरल टॅलंट्स ऑफ वूमेन अँड हाऊ दे विल चेंज द वर्ल्ड' ही दोन पुस्तकं महत्त्वाची मानली गेली आहेत. अर्थात नताली अँजियर ह्यांचं पुस्तक जास्त प्रमाणभूत मानलं गेलं आहे.
हेही वाचा - उपेक्षित स्त्री शास्त्रज्ञ आणि ‘मॅटिल्डा इफेक्ट’
अँजियर ह्या पुलित्झर पारितोषिकविजेत्या अभ्यासू पत्रकार आहेत. अँजियर यांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक स्त्रीविषयक पारंपरिक विचारांना छेद देतं. अँजियर यांचा 'फेमिनिस्ट' ह्या शब्दाला विरोध आहे. याचं कारण फेमिनिस्ट हा शब्द स्त्रीमुक्तीशी जोडला गेलेला आहे. त्या 'फीमेलिस्ट' हा शब्द वापरतात. 'स्त्री ही पुरुषापेक्षा वेगळी आहे आणि तिने स्त्री म्हणून बरंच काही साध्य केलेलं आहे. 'फेमिनिस्ट' अर्थात स्त्रीमुक्तिवादी महिला पुरुषाशी बरोबरी करण्याचं ध्येय बाळगतात. प्रत्यक्षात त्याची काहीही गरज नाही', असं अँजियर ह्यांचं म्हणणं आहे. 'मी स्त्री आहे. माझ्यावर जग अवलंबून आहे. इथून पुढे जगात बदल घडवण्याची जबाबदारी माझी आहे. स्त्री-पुरुषात असंख्य फरक आहेत आणि ते मूलतः नैसर्गिक आणि आनुवंशिक आहेत,' अशी 'फीमेलिस्ट' म्हणजेच 'स्त्रीवादी' भूमिका आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यावर उत्क्रांतीचा तसंच पूर्वेतिहासाचा समसमान परिणाम झाला असल्याचं हे नवं संशोधन सांगतं.
स्त्रिया या पुरुषांपेक्षा वेगळ्या आहेत आणि हे नैसर्गिक सत्य आहे, असं फीमेलिस्ट मानतात. स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी प्रमाणात डावखुऱ्या असतात, त्यांच्यात रंगांधळेपणाचं प्रमाण अत्यल्प असतं. पुरुषांच्या काही व्याधी आणि विकार स्त्रियांमध्ये कमी प्रमाणात आढळतात आणि ते रजोनिवृत्तीनंतर उद्भवतात. उदाहरणार्थ, टक्कल पडणे, गाऊट वगैरे. स्त्रीचं शरीर पुरुषाच्या तुलनेत सरासरीने लहान असतं. त्या प्रमाणात तिचा मेंदूही लहान असतो. मात्र, स्त्रियांच्या मेंदूतील चेतापेशी खूप दाटीवाटीने रचलेल्या असतात. त्यामानाने पुरुषांच्या मेंदूतील पेशींची रचना सैलसर असते. स्त्रियांच्या रक्तात रोगप्रतिकारक पेशींची संख्या अधिक असते, तर पुरुषांच्या रक्तात ऑक्सिजनवहनाची क्षमता जास्त असते. कारण पुरुषांच्या रक्तात हिमोग्लोबिन स्त्रियांच्या मानाने जास्त असतं. पुरुषांना शारीरिक वेदना आणि ताणतणाव लौकर जाणवतात. स्त्रिया झटकन दुःखी होतात. सरासरीने पुरुष हा स्त्रीपेक्षा १० टक्के उंच असतो. पुरुषाचं सरासरी वजन हे स्त्रीच्या तुलनेत २० टक्के जास्त असतं. त्याची ताकदही स्त्रीपेक्षा ३० टक्के जास्त असते. हे सर्व मान्य करूनही स्त्री पुरुषाची बरोबरी करू शकत नाही, हे 'फेमिनिस्ट'ना मान्य नाही.
अमेरिकी लष्कराने १९९५ साली केलेल्या काही चाचण्यांच्या अहवालाच्या आधारे स्त्रिया या शरीरश्रमात पुरुषाची बरोबरी करू शकतात याचे पुरावे डायेन हेल्स यांनी त्यांच्या 'जस्ट लाइक अ वूमन' ह्या पुस्तकात उद्धृत केले आहेत. या चाचण्यांमध्ये विद्यार्थिनी, वकील, बारटेंडर आणि नुकत्याच बाळंत झालेल्या ४१ स्त्रियांनी भाग घेतला होता. या स्त्रिया शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत्या. मात्र, सहा महिने लष्करी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या पुरुष सैनिकांच्या शारीरिक क्षमतेशी बरोबरी करू लागल्या, असे या चाचण्यांचे निष्कर्ष होते. ३४ किलोग्रॅम वजन पाठीवर घेऊन ३ कि.मी. दौड करणे, ४५ किलोग्रॅम वजन खांद्यावर घेऊन पन्नास बैठका मारणे वगैरे शारीरिक क्षमतेचे सर्व निकष त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
स्पर्धात्मक खेळांमध्येसुद्धा हेच दिसून येतं. आज ऑलिंपिक खेळांमध्ये स्त्रिया जे विक्रम करतात ते विक्रम काही वर्षांपूर्वी पुरुषांनी वेगवेगळ्या स्पर्धात्मक खेळांत केलेले होते. आज हे विक्रम स्त्री खेळाडू मागे टाकताना दिसतात. १९६४ साली मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या स्त्रीस जेवढा वेळ लागला होता त्यापेक्षा आज मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या स्त्रीस ३२ टक्के वेळ कमी असतो. पुरुषांच्या बाबतीत मात्र ही वेळ फक्त ४ टक्के एवढी कमी झाली आहे. हे प्रमाण असंच राहिलं तर आज ना उद्या स्त्रिया खेळांमध्ये पुरुषांना नक्कीच मागे टाकतील, असा कयास मांडला जातो.
जीवशास्त्रात जसजशी प्रगती होत आहे तसतसा शास्त्रज्ञांना एक साक्षात्कार होऊ लागला आहे. स्त्री आणि पुरुषांमधील फरक वाटतात तेवढे आणि तसे साधे-सरळ नाहीत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत टेस्टोस्टिरॉन हे पुरुषपणासाठी अत्यावश्यक संप्रेरक आहे आणि स्त्रीत्व म्हणजे इस्ट्रोजनची कमाल आहे, असं जीवशास्त्रज्ञांना वाटत असे. प्रत्यक्षात इस्ट्रोजन हे संप्रेरक स्त्री व पुरुष दोघांमध्ये उपस्थित असतंच आणि दोघांमध्ये ते अतिशय महत्त्वाच्या भूमिका बजावत असतं. अँजियर यांच्या मते मुलं जशी चॉकलेटसाठी भांडतात, त्याप्रमाणे शरीरातील प्रत्येक अवयव इस्ट्रोजेनसाठी उत्सुक असतो. ज्या पुरुषांमध्ये इस्ट्रोजेनची कमतरता असते असे पुरुष जास्त पुरुषी असतील असं आपल्याला वाटेल, पण तसे ते नसतात. उलट, हाडांच्या ठिसूळपणाला इतर पुरुषांच्या मानाने जास्त प्रमाणात त्यांना सामोरं जावं लागतं. स्त्रियांच्या शरीरातही टेस्टोस्टिरॉनची निर्मिती होते. या टेस्टोस्टिरॉनमुळे स्त्रियांच्या लैंगिक भावना जागृत होतात. टेस्टास्टिरॉन आणि आक्रमक वृत्ती यांचाही पूर्वापार संबंध जोडण्यात येतो. मात्र, वेगवेगळ्या चाचण्यांतून असा थेट संबंध आजमितीस स्पष्ट झालेला नाही. अँजियर यांनी याबाबत जे संशोधन केलं आहे त्यात कसोटीच्या अनेक प्रसंगी, विशेषतः साहस करताना किंवा संकटात उडी घेताना पुरुषांच्या रक्तातील टेस्टोस्टिरॉनची पातळी खालावते, असं अँजियर यांच्या निदर्शनास आलं आहे. हवाई छत्रीच्या साहाय्याने उडी मारताना, शत्रूच्या प्रदेशात आक्रमण करताना किंवा जिवाला धोका होऊ शकेल अशा इतर प्रसंगांत हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. या दोन संप्रेरकांच्या बाबत जे समज होते त्यापैकी बरेच गैरसमज होते, ते वस्तुनिष्ठ नव्हते, हे हळूहळू सिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळेच स्त्री-पुरुषांबद्दल आणि विशेषतः स्त्रियांबद्दल जे समज होते त्याबद्दलचं सत्यही आता पुढे येऊ लागलं आहे.
स्त्रियांच्या बाबतीत पूर्वी ज्या गोष्टी कमतरता म्हणून पाहिल्या जात होत्या त्या स्त्रियांच्या दृष्टीने फायद्याच्याच असतात, असं आता नव्या संशोधनातून दिसून येत आहे. प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम (पी.एम.एस.) म्हणजे पाळीपूर्व वर्तणूकबदल या बाबीबाबत पूर्वी काहीसं तुच्छतेने बोललं जात असे. याचा संबंध स्त्रीचा स्वभाव अचानक चिडचिडा बनण्याशी किंवा आक्रमक बनण्याशी लावला जात असे. १९८० नंतरच्या पंचवीसेक वर्षांत अनेकदा स्त्रियांच्या हिंस्र वर्तणुकीचं स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयात 'पाळीपूर्व दिवसा'ची मदत घेतली जात होती. मात्र, जेव्हा मोठ्या संख्येने स्त्रियांच्या या बाबतीत मुलाखती घेण्यात आल्या, तेव्हा पाळीपूर्व काळात ह्या स्त्रिया अधिक उत्साही वाटत होत्या, त्यांच्या आकलनशक्तीमध्ये वाढ झालेली होती. एकंदरीत त्या जास्त आनंदी वाटत होत्या, असं अँजियर म्हणतात. स्वतः अँजियर यांचा अनुभव हाच आहे.
स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. हा काळ स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक मानला जातो. अमेरिकेत हा प्रश्न १९८४च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी प्रथम पुढे आला. जेराल्डाइन फेरारी तेव्हा उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांना रजोनिवृत्ती आली आहे की नाही, हा प्रश्न त्या काळात खूप चर्चेत होता. त्या रजोनिवृत्त नसतील तर त्यांना 'पाळीपूर्व त्रास' सतावू शकतो व त्यामुळे जर त्या संतापी बनल्या तर एखादा राजकीय पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, अशी भीती तेव्हा व्यक्त केली गेली होती. मात्र, पुढच्या दहा वर्षांत ही परिस्थिती पूर्णपणे बदलली. आता याकडे 'हॉट फ्लॅशेस' (एकाएकी शारीरिक तापमानवाढ) या दृष्टीने न पाहता 'पॉवर सर्ज' (ऊर्जास्रोताची कमाल) या दृष्टीने पाहिलं जाऊ लागलं आहे. 'संप्रेरकपूरक' खुराकांची चर्चा स्त्रिया न लाजता करू लागल्या आहेत. बेव्हर्ली डग्लस आणि एलिस सिंप्सन ह्या न्यूयॉर्कमधल्या वलयांकित स्त्रिया मानल्या जातात. त्यांनी रजोनिवृत्तीला सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांसाठी २४ तास दूरध्वनी सल्लाकेंद्र सुरू केली. साधारण याच सुमारास म्हणजे १९९८-९९ साली 'रेड हॉट मामाज' चर्चागटांची स्थापना करण्यात आली. आता अमेरिकेच्या निम्म्याहून अधिक घटकराज्यांमध्ये हे चर्चागट रजोनिवृत्तीला सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना मदत करत असतात.
हेही वाचा - ‘मी क्रांती, मी संघर्ष’: प्रतिसरकारमधल्या लढवय्या स्त्रीची कहाणी
याआधी सिमॉन द बुव्हा यांनी स्त्रीला 'सेकंड सेक्स' असं संबोधलं होतं. मात्र, नवी विचारधारा 'स्त्री हे 'सेकंड सेक्स' नसून 'सेपरेट सेक्स' आहे' असं मानते. स्त्री- पुरुषांची तुलना करण्यात अर्थ नाही. पुरुष हे पुरुष असतात आणि स्त्रिया ह्या स्त्रिया असतात. त्यांच्यात परस्पर तुलना करण्यात अर्थ नाही. ह्या दोहोंतील फरक म्हणजे उणिवा, कमतरता, दोष किंवा व्याधी नाहीत, तर दोन मानवी गटांची ती स्वतंत्र लक्षणं आहेत, असं हे नवे गट मानतात.
हे सगळं मान्य केलं तर जीवशास्त्रीय गुणधर्मांचं काय, असा प्रश्न या नव्या मांडणीच्या नव्या निष्कर्षांच्या संदर्भात विचारला जातो. याला उत्तर देताना 'जीवशास्त्रीय विचार लिंगभेदाचा पुरस्कर्ता आहे, डार्विन हा अहंकारी पुरुषार्थाचा प्रवक्ता होता', असं काही स्त्री विचारवंत म्हणतात. १९८५च्या सुमारास ख्रिस्तिन डेल्फी ह्या फ्रेंच विचारवंत आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या पुरस्कर्तीने तर 'जीवशास्त्रावर बहिष्कार टाका' असं आवाहनच स्त्रियांना केलं होतं. डेल्फीच्या विचारांशी सहमत असलेल्या अमेरिकी स्त्री विचारवंतांनी स्त्री आणि पुरुषांच्या फरकांवर संशोधन करू इच्छिणाऱ्या शास्त्रज्ञांना आणि प्रयोगशाळांना यापुढे शासकीय अनुदान मिळू नये असे प्रयत्नही केले होते. त्या संशोधनातून काहीच हाती लागणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात चुकीचं विज्ञान जेव्हा योग्य मार्गावर आणायचं असतं तेव्हा त्याला अधिक चांगल्या आणि वादातीत संशोधनाने उत्तर देणं भाग पडतं. मानवी उत्क्रांती कशी झाली असावी त्याबाबत १९८० नंतरच्या विविध प्रकारच्या संशोधनामुळे खूपच वेगळा प्रकाश पडलेला आहे. यामुळे 'लिंगभेदामुळे शरीरभेद' (सेक्शुअल डायमॉर्फिझम) ह्या गुणधर्मावरही खूप संशोधन झालेलं आहे.
मानवाचे जवळचे भाईबंद मानले जाणारे जे बृहद् कपी (ग्रेट एप्स) आहेत, त्यांच्यामध्ये नर आणि मादी यांच्या आकृतिबंधात (फॉर्म) आणि आकारात (साइज) खूप फरक असतो. त्यांच्या तुलनेत मानवी स्त्री-पुरुषांमध्ये उंची, जाडी, कार्यक्षमता या बाबतींत फारसा फरक नसतो. ह्यावरून उत्क्रांती होत असताना आदिम स्त्री व पुरुष एकमेकांची कामं करीत असावेत, असा तर्क काढता येतो. हिंस्र प्राण्यांपासून स्त्रियांचं आणि मुलांचं रक्षण करणारे पुरुष त्यांना कुठे तरी सोडून शिकारीला जात होते, तर मग मागे राहिलेल्या स्त्रियांच्या आणि बालकांच्या रक्षणाची जबाबदारी पुरुष निभावत होते असं कसं म्हणता येईल, ह्या प्रश्नाने मानवशास्त्रज्ञ खडबडून जागे झाले.
कोणत्याही शिकारी प्राण्याच्या जातीत, मग तो प्राणी एकांडा राहणारा असो किंवा टोळीने राहणारा असो, फक्त नरच शिकार करतो असं दिसत नाही. नर आणि मादी हे दोन्हीही शिकारकार्यात प्रवीण असतात. प्रेतभक्षी किंवा प्रेताहारी म्हणजे दुसऱ्यांच्य शिकारीतला वाटा पळवणारे प्राणी मिळवलेल्या वाट्याचा उपभोग एकटे-दुकटे कधी घेत नाहीत. त्यांच्या टोळीतील नर, माद्या आणि पिल्लं असे सर्वजण मिळालेल्या प्रेतावर तुटून पडताना दिसतात. या निरीक्षणांमुळे आदिमकाळात पुरुष अन्न आणण्यासाठी भटकायचा आणि स्त्रिया गुहेत बसून मुलं सांभाळायच्या, हे विचार एकविसाव्या शतकात हळूहळू मागे पडू लागले आहेत.
हेही वाचा - कोण म्हणतं स्त्रियांना विनोदबुद्धी नसते ?
१९७० नंतरच्या दशकात ह्या विचारपरिवर्तनाची सुरुवात झाली. या काळात मानवशास्त्र आणि मानवी उत्क्रांतिशास्त्र या विषयांत स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं. पूर्वीच्या पुरुषकेंद्री विचारांना छेद देणारं संशोधन करून त्यांनी मानवी उत्क्रांतीची एककल्ली कथा समतोल करायला सुरुवात केली. खरं तर संशोधनक्षेत्रात संशोधन करणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष यावर फारसं काही अवलंबून नसतं. पण जीवशास्त्रीय, विशेषतः मानवशास्त्रात संशोधन वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) असलं तरी निष्कर्ष व्यक्तिनिष्ठ असू शकतात, असं स्त्रीवादी गटांचं म्हणणं होतं. मानवी उत्क्रांतीबाबत पुरुषकेंद्री विचारांवर पहिला आघात १९७५ ते १९८० या दरम्यान अॅड्रियन झिलमन आणि नॅन्सी टॅनर ह्या दोन मानवशास्त्रज्ञ स्त्रियांनी केला.
झिलमन आणि टॅनर ह्या दोघीही भटक्या शिकारी जमातींच्या अभ्यासक होत्या. त्यांनी बऱ्याच भटक्या जमातींचा अभ्यास स्वतःही केला किंवा इतरांनी केलेल्या संशोधनातील मुद्देही अभ्यासले. आफ्रिकेतील शिकारी जमाती जे अन्न खातात त्यातून त्यांना जे उष्मांक मिळतात तेवढेच स्त्रियांनी गोळा केलेल्या वनस्पतिजन्य अन्नातून मिळतात असं त्यांना अभ्यासातून आढळलं. ज्या जमाती हाण-वेच पद्धतीने (हंटिंग अँड गॅदरिंग) जीवन जगतात, त्यांच्यात शिकार करणारे पुरुष जमातीच्या पोषणासाठी आवश्यक प्रथिनांचा पुरवठा मिळवतात, असं तोपर्यंत मानलं जात होतं. पुरुषांनी जीव धोक्यात घालून केलेल्या शिकारीमुळे या जमातींना काही प्रमाणात प्रथिनं मिळतात हे खरं; पण या टोळ्या जर पुरुषांच्या कौशल्यावरच अवलंबून राहिल्या तर त्यांची उपासमार होण्याचीच शक्यता अधिक असती. पोषणासाठी स्त्रियांनी मिळवलेल्या उष्मांकांची तितकीच गरज असते, असं मत या दोघींनी मांडलं.
१९९४ मध्ये सारा मेसन ह्या पुरावनस्पतिशास्त्रज्ञ स्त्रीने डोल्नी व्हेस्टोनीस इथल्या मानवी अवशेषांचा अभ्यास केला. त्या ठिकाणी उत्खननामध्ये वनस्पतींचे जे अवशेष सापडले होते ते सर्व खाण्यायोग्य कंदमुळं, फळं आणि बियांचे होते. याचा अर्थ पुराश्मयुगीन आहार हा अधिक करून शाकाहारी होता. मांसाहार हे पूरक अन्न होतं. या आहारातील महत्त्वाचे शाकाहारी घटक हे बहुधा स्त्रियांनी गोळा केलेले असत. स्त्रिया कर्बोदकं आणि स्टार्चयुक्त अन्न टोळीला पुरवत. शिकार करणारे पुरुष प्रथिनांचे पुरवठादार असत.
याशिवाय आदिमानवी टोळ्यांत पुरुष शिकार करत असत, वगैरे जे म्हटलं जातं त्याबाबतचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. तो निष्कर्ष परिस्थितिजन्य पुराव्यावर आधारित आहे हे गृहीत आहे. शिकारीला जाताना स्त्रियाही बरोबर असतील तर मुलांना एकटं कुठे सोडणार ? त्यामुळे स्त्रियांबरोबर मुलांनाही बरोबर न्यावं लागणार. मुलांच्या या आरड्याओरड्यामुळे शिकार करणंही तसं अवघडच बनणार. त्यामुळे मुलांना आणि त्यांचं संगोपन करणाऱ्या स्त्रियांना गुहेत बसवून पुरुष शिकारीला जात असावेत. जुन्या पठडीतील काही शास्त्रज्ञ आजही हे गृहीत मानतात. पुरुषांनीच शिकार करायची असते, ते स्त्रियांचं काम नव्हे, अशी समजूत या गृहितातूनच रूढ झाली आहे, असं त्यामुळे म्हणता येईल.
हेही वाचा - श्रीलंकेतील 'लाडक्या बहिणीं'कडे येताहेत सत्तेची सूत्रं
मात्र, शिकारीचा आणखी एक प्रकार काही वन्य जमातींत अनुसरला जातो. याला 'कम्युनल हंटिंग' म्हणजे 'सार्वजनिक शिकारपद्धत' असं म्हणतात. या पद्धतीच्या शिकारीत जमातीतील किंवा टोळीतील सर्व सदस्य भाग घेतात. पूर्वी रेड इंडियन टोळ्या अशा पद्धतीने शिकार करत असत. आपल्याकडे शिकारीमध्ये 'हाकारे' उठवण्याची पद्धत होती, त्याचाच हा एक प्रकार म्हणावा लागेल. गव्यांचा एखादा कळप दिसला की सगळी टोळी त्याच्या एका बाजूला प्रचंड आरडाओरडा सुरू करत असे. त्यामुळे बुजलेला गव्यांचा कळप उधळून दुसऱ्या दिशेने धावत सुटायचा. त्या बाजूला बहुधा एखादा कडा किंवा दलदल असायची. हा गव्यांचा कळप त्या कड्यावरून कोसळला की त्यातल्या गव्यांचे बहुदा पाय मोडले जात किंवा ते दलदलीत रुतत असत. मग त्यांची शिकार करणं सोपं जात असे. काँगोमधले मबुटी जमातीचे सदस्य आजही अशा प्रकारे 'हाकारे' उठवत शिकार करतात. प्राण्यांच्या सहजपणे लक्षात येणार नाही अशा प्रकारे ते एखाद्या ठिकाणी जाळी लावतात. आदिमानवही अशाच प्रकारे शिकार करत असेल का याचे ठोस पुरावे बराच काळ उपलब्ध नव्हते. जे पुरावे होते ते संदिग्ध होते. असे ठोस पुरावे एका स्त्रीने शोधून काढावेत याला केवळ योगायोग म्हणता येणार नाही. ओल्गा सॉफर असं या स्त्रीचं नाव आहे. ती मानवशास्त्राची अभ्यासक आहे.
झेक प्रजासत्ताकामधील पाव्हलोव इथल्या पुराश्मयुगीन अवशेषांमध्ये ओल्गाला हे पुरावे मिळाले. इथल्या मातीच्या प्राचीन अवशेषांत काही समांतर रेषा उमटल्या आहेत, असं ओल्गाच्या लक्षात आलं. हे अवशेष किंवा अवशेषांचे ठसे २५ हजार वर्षांपूर्वीचे होते. मुख्य म्हणजे हे ठसे विणलेल्या धाग्यांचे होते. अशा तऱ्हेचे विणलेले धागे सापडावेत यामुळे कुतूहल निर्माण झाल्याने ओल्गाने आणि तिच्या सहकाऱ्यांनी ह्या भागातील मातीच्या प्राचीन जमिनींची कसून तपासणी केली. त्यात मातीच्या जमिनीच्या ८४०० तुकड्यांवर त्यांना असे ठसे आढळून आले. ते एका जाळ्याचा पुरावा ठरत होते. हे जाळं सार्वजनिक शिकारीसाठी वापरलं जात असावं. पुरुष शिकार करत असत, हा निष्कर्ष काही टिकाऊ पुराव्यांवरून काढण्यात आला होता. टिकाऊ पुरावे म्हणजे दगडी हत्यारं आणि नंतरच्या काळातील धातूची हत्यारं. पण याव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी माणूस शिकारीसाठी वापरत असणार. जैव विघटन होणाऱ्या गोष्टी काळाच्या ओघात कुजून नाहीशा होतात. उदा. गवत किंवा कळकाच्या बऱ्याच वस्तूंचा वापर अजूनही आदिवासी जमातींत होतो. अशा वस्तूंचे पुरावे शिल्लक राहत नाहीत. एखाद्याच पुरातत्त्वशास्त्रीय उत्खननामध्ये असे अवशेष खूप चांगल्या स्थितीत आढळतात. ही अर्थात निसर्गाची कमाल असते. अशा ठिकाणी वीस टिकाऊ गोष्टींमागे एक नाशवंत गोष्ट शिल्लक राहिलेली दिसते. ओल्गा सॉफरच्या संशोधनामुळे पुराश्मयुगीन 'सार्वजनिक शिकारी'ची व त्यातल्या स्त्रियांच्या सहभागाची शक्यता जगासमोर आली. अर्थातच, पुरुष शिकार करायचे व स्त्रिया गुहेत बसून मुलांना सांभाळायच्या, या गृहिताला त्यामुळे छेद गेला.
'वूमन, द हंटर' या १९९७ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात लेखिका मेरी झीस स्टांग म्हणतात, 'स्त्रियांनी तथाकथित पुरुषी हत्यारं वापरून शिकार केली नसेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.' याच पुस्तकामध्ये त्या म्हणतात, 'प्राचीन काळातील बऱ्याच स्त्री युद्धदेवता प्रसिद्ध आहेत. हिंसा आणि आक्रमकता ह्या बाबतीतही त्या प्रसिद्ध होत्या.'
सुमेरची युद्धदेवता निन्हुर्साग आणि प्राचीन ग्रीसमधील युद्धदेवता आर्टेमिस ह्या दोघीही सुंदर होत्याच, पण त्या अतिशय आक्रमक, युयुत्सू आणि युद्धनिपुण होत्या. त्याचबरोबर त्या प्रजननाचं नियंत्रण करणाऱ्या देवताही होत्या. प्राचीन संस्कृतीमधल्या बऱ्याच देवता या शिकारी देवता होत्या. अॅनाटोलियातील सर्वाधिक शूर शिकारी देवता 'किबेले' ही सिंहांची सेनापती होती, तर इजिप्तमध्ये तिचं नाव 'सेखमेत' होतं. तिथे ती सिंहाच्या स्वरूपात दिसते. फरक एवढाच, की तिच्या आयाळीच्या जागी उफाळणाऱ्या ज्वाळा असत. आपल्याकडे वाघावर आरूढ होणारी दुर्गा आपण बघतोच. ह्याशिवाय इतर संस्कृतींतही अशाच पराक्रमी स्त्री देवता बघायला मिळतात. ह्याचा अर्थ सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी स्त्रियासुद्धा पराक्रमी असतात, हे त्या त्या समाजाला ठाऊक होते. असो.
एकंदरीत, आदिमकाळात टोळीतील आबालवृद्धांसह प्रत्येकाला त्याच्या दृष्टीने योग्य असा कामाचा वाटा उचलावा लागत असावा आणि कामाच्या बाबतीत फारसा भेदभाव नसावा असं दिसतं.
हेही वाचा - ‘ड्रायव्हिंग लेसन्स’ : इराणमधलं जळजळीत वास्तव
मानवी उत्क्रांतीच्या सुमारे वीसेक लाख वर्षांच्या किंवा त्याहूनही अधिक काळाच्या इतिहासात अनेक प्रकारच्या परिस्थितींमधून मानवाला जावं लागलं. विषुववृत्तीय प्रदेशापासून ध्रुवीय प्रदेशापर्यंत आणि सागरसपाटीपासून पर्वतराजींमधल्या उंच ठिकाणापर्यंत माणूस पोहोचला. दर वेळी त्याला नवनव्या अडचणींशी सामना करावा लागला, त्या त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागलं. अशा वेळी कामचुकार व्यक्तीला टोळीत नक्कीच स्थान नव्हतं, हे तथ्य 'उत्क्रांतिवादी मानसशास्त्रा'च्या मुळावरच घाव घालतं. आपले पूर्वज एकच एक परिस्थितीत राहत असत आणि पूर्वजांचे गुण ह्या परिस्थितीतूनच निर्माण झाले, हे 'उत्क्रांतिवादी मानसशास्त्रा'चं गृहीत मानवी इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या दृष्टीने चुकीचं ठरतं. प्रत्येक वेगळ्या परिस्थितीत माणसांना वेगळ्या प्रकारे जगावं लागलं, हे गृहीत धरलं तर मानवी गुणधर्मही वेगवेगळ्या प्रकारे उत्क्रांत झाले, हे मान्य करणं भाग पडतं.
पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त आक्रमक असतात, असं म्हटलं जातं. प्रथमदर्शनी हे म्हणणं अगदी खरं वाटावं असंच दिसतं. रोजच्या वृत्तपत्रात हाणामारीच्या बातम्यांमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुधा पुरुषांचीच नावं आढळतात. पोलिस कोठडीत, तुरुंगात पुरुषांचीच संख्या जास्त असते. लष्करात आणि खासगी लष्करी संघटनांमध्ये पुरुषच मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे आतापर्यंतच्या उत्क्रांतीच्या चित्रात अगदी योग्य तऱ्हने बसतं. मात्र, ज्या वेळी प्रयोगशाळेत पुरुष व स्त्री यांच्यातील आक्रमकता शोधण्याचे प्रयत्न झाले त्या वेळी हा समज मिथ्या असल्याचं स्पष्ट झालं. स्त्री आणि पुरुष हे सारखेच आक्रमक असतात, हे अशा प्रकारच्या अभ्यासांत सिद्ध झालं आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणांत शास्त्रीय देखरेखीखाली जे नियंत्रित अभ्यास केले गेले त्यात दोन्ही लिंगांच्या व्यक्ती समप्रमाणात आक्रमक असल्याचं दिसून आलं. केवळ स्वतःला आनंद मिळावा म्हणून एखाद्या व्यक्तीला विद्युतप्रवाहाचा झटका देणं, असा एक प्रयोग केला गेला होता. तो वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणांत वाढलेल्या तीन वर्षांखालील मुला-मुलींच्या बाबतीत करण्यात आला. त्यातही मुलींपेक्षा मुलं जास्त आक्रमक किंवा क्रूर असतात असं कुठेच आढळलं नाही.
१९९७ साली जान्निन डेव्हिस किंबॉल यांनी त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर केले. त्यांनी युरेशियातील म्हणजे युरोप आणि आशियातील विविध भटक्या जमातींचा अभ्यास केला. त्यात त्यांना सुमारे २५०० वर्षांपूर्वीच्या एका लढाऊ स्त्री जमातीचा शोध लागला. रशियाच्या सीमारेषेवर पण कझाकस्तानच्या हद्दीमध्ये एका कबरस्तानातील सर्व सांगाडे स्त्रियांचे होते. त्यातल्या अनेक स्त्रियांच्या मृत्यूचं कारण शस्त्रांचा आघात हे होतं. सर्व कबरींमध्ये या स्त्रियांच्या सांगाड्यांबरोबर खंजीर, बाण, तलवारी आणि शस्त्रांना धार लावायला वापरण्यात येणारे दगड पुरलेले आढळले. काही सांगाड्यांत बाण आणि वाकून मोडलेली तलवारींची पाती होती. स्त्रीच्या आक्रमकतेचा हा एक पुरावा होता.
अँजियर यांच्या मते 'शारीरिक आक्रमकता' या एका घटकावर लक्ष केंद्रित करणं योग्य होणार नाही. शाब्दिक आणि मानसिक आक्रमकताही तेवढीच महत्त्वाची ठरते. स्त्रिया अशा आक्रमकतेत पुरुषांना सहज मागे टाकतात. अँजियर यांनी शाळा आणि महाविद्यालयांतील विविध इयत्तांमधील मुलींच्या भांडणांचा अभ्यास केला. होस्टेलवरील विविध गटांची भांडणं तपासली, तेव्हा हा शाब्दिक मार शारीरिक माराच्या तुलनेत अधिक धोकादायक असतो असं त्यांच्या लक्षात आलं.
स्त्री-पुरुष जोडीदारांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक एकनिष्ठ असतात, ही समजूतही चुकीची असल्याचं अनेक अभ्यासकांचं मत आहे. पुरुष आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ नसतो, कारण त्याची जननिक रचनाच तशी असते, असं प्रतिपादन स्टीव्हन पिंकर ह्यांनी 'न्यूयॉर्कर' या नियतकालिकातील एका लेखात केलं आहे. त्याचं दीर्घ स्पष्टीकरण त्यांनी या लेखात दिलं होतं. पुरुष त्याच्या पालकत्वाची कधीच खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे एकाहून अधिक ठिकाणी संबंध ठेवले तर त्यात कुठे ना कुठे आपलं अपत्य जन्माला येईल, असा त्याचा साधा-सरळ हिशोब असतो. याउलट, स्त्री किती मुलांना जन्म देणार यावर नैसर्गिक मर्यादा असते. शिवाय गर्भारपण आणि बाळंतपण, तसंच त्यानंतरचा काही काळ तिच्या हालचालींवरही मर्यादा असतात. अशा वेळी तिच्या जोडीदाराशी ती अप्रामाणिक राहिली तर तिचं अपत्य आणि ती या दोघांचेही जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. शिवाय उदरनिर्वाहाचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे स्त्रीला जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्यावाचून गत्यंतर नसतं, असं स्टीव्हन पिंकर यांनी म्हटलं होतं.
पुरुष हा जोडीदाराशी अप्रामाणिक असतो, ही गोष्ट स्वीकारली तर प्रश्न उरतो तो स्त्रीचा. माणसाच्या जवळच्या असणाऱ्या प्रायमेटवर्गी प्राण्यांच्या म्हणजे चिंपांझी व बोनोबो या कपींच्या अलीकडे झालेल्या अभ्यासातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. हे कपी आणि त्यांच्या माद्या दोघंही परस्परांशी एकनिष्ठ नसतात. या प्रवृत्तीचे काही उत्क्रांतिजन्य लाभ मादीला मिळतात असं दिसून आलं आहे. आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट या देशातील टाई अरण्यामधील चिंपांझींच्या डीएनए चाचण्या करण्यात आल्या. या चिंपांझींच्या टोळीतील नर हे त्यांच्या माद्या इतर नरांबरोबर रत होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेत असतात. तरीही या माद्या नरांची नजर चुकवून बेपत्ता होत असतात. या माद्यांच्या एकूण अपत्यांपैकी निम्मी अपत्यं ही दुसऱ्या नरांची असतात, असं डीएनए चाचण्यांनी सिद्ध केलं आहे. बोनोबोंमध्ये नर व मादीमध्ये अजिबात एकनिष्ठता आढळत नाही. ह्या व अशा बाबींचा जेव्हा वर्तणूकशास्त्रज्ञांनी खोलवर जाऊन अभ्यास केला, त्या वेळी एकनिष्ठपणाचा अभाव हा माद्यांच्या दृष्टीने जननिक फायद्याचा ठरतो असं आढळून आलं. 'प्रेअरी डॉग' नावाचा एक कृदंतवर्गी प्राणी आहे. त्या प्राण्यातली एखादी मादी जेव्हा जास्तीत जास्त नरांशी संबंध ठेवते तेव्हा गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. शिवाय अशा संबंधातल्या वेतातील पिल्लांची संख्याही जास्त असते. अँजियर यांनी लैंगिक संबंधातून स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त आनंद मिळेल अशी व्यवस्था निसर्गाने केली आहे, असा एक निष्कर्ष काढला आहे; पण त्याला सर्वच अभ्यासकांनी दुजोरा दिलेला नाही किंबहुना ह्या निष्कर्षावर खूप टीका झाली आहे.
अलीकडच्या काळात उत्क्रांतीच्या पुनर्विचारानंतर हाती आलेले निष्कर्ष या लेखात मांडले आहेत. हे निष्कर्ष काय सांगतात? स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही जे गुणधर्म दिले आहेत ते एकाच परिस्थितीत दिले आहेत. शिकार, अन्न गोळा करणे, लढाया करणे आणि अन्नाच्या तसेच निवाऱ्याच्या शोधात भटकणे, या साऱ्यांत जे गुणधर्म मानवाला प्राप्त झाले ते दोघांतही समसमान उतरले आहेत. दोघांनाही रोजच्या आयुष्यात कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागतं. त्या वेळी त्यांना परिस्थितीनुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. मानवी समाज वेगवेगळ्या परिस्थितींत स्थिरावल्यावर त्यांनी त्या त्या भागाला साजेशी बंधनं किंवा वागणुकीचे नियम बनवले. त्याला ते संस्कृती म्हणू लागले. त्यात स्त्रियांवर विविध बंधनं आली. ही बंधनं सांस्कृतिकदृष्ट्या स्त्रियांवर लादली गेली. हे सर्वच संस्कृतींमध्ये घडलं असंही नाही, पण प्रामुख्याने ज्या संस्कृतींची भरभराट झाली त्या संस्कृतींमध्ये हे घडलं. त्यामुळे स्त्री-पुरुषांमधील उत्क्रांतिजन्य गुणधर्म मागे पडत गेले. आता हे ज्ञान पुन्हा नव्याने उघड होत असलं, तरी सांस्कृतिक पुनर्रचना व्हायला अजून बराच काळ जावा लागेल. तोपर्यंत उत्क्रांतीच्या दृष्टीने स्त्री-पुरुष समान आहेत, एवढं सत्य मान्य झालं तरी खूप आहे. त्यामुळे हळूहळू सामाजिक व सांस्कृतिक बदल व्हायला मदत होईल.
(निरंजन घाटे लिखित समकालीन प्रकाशनाच्या 'तीची कहाणी' या पुस्तकातून साभार.)
