
भारताची राजधानी कलकत्त्याहून नवी दिल्लीला येऊन आज ९४ वर्षं झाली. १९३१मध्ये ब्रिटिशांनी तिथून कारभार चालवायला सुरुवात केली. पण प्रत्यक्षात राजधानी नवी दिल्लीत हलवण्याचा निर्णय त्याआधी तब्बल वीस वर्षांपूर्वी घेतला गेला होता, हे माहिती आहे?
जून १९११ मध्ये पंचम जॉर्ज इंग्लडचा राजा झाला. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांच्या भारतभेटीनिमित्त नवी दिल्लीत भरवण्यात आलेल्या खास दरबारात राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांनी राजधानी दिल्लीत हलवणार असल्याची घोषणा केली. लगेच १५ डिसेंबर रोजी कोरोनेशन पार्क येथे नव्या राजधानीची कोनशिलाही बसवण्यात आली. लॉर्ड हार्डिंग हे त्यावेळचे व्हाईसरॉय होते.
१९१२ मध्ये एडविन ल्यूटन आणि हर्बट बेकर या त्याकाळच्या प्रसिद्ध ब्रिटिश वास्तूविशारदांनी ‘नवी दिल्ली'चा आराखडा तयार केला. राजधानीच्या निर्मितीचं कॉन्ट्रॅक्ट सरदार बहाद्दू सर शोभा सिंग या त्यावेळच्या मोठ्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरना देण्यात आलं. पण त्यानंतर लगेचच, म्हणजे १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाचा भडका उडाल्याने हे काम लांबलं आणि तब्बल २० वर्षांनी ते पूर्ण झालं.
कलकत्ता शहरही ब्रिटिशांनीच वसवलेलं. त्यांना अतिशय प्यारं होतं. पण १९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली आणि असंतोषाचा भडका उडाला. यामुळे ब्रिटिशांना कलकत्ता असुरक्षित वाटू लागलं. शिवाय दिल्लीची ‘क्रेझ'ही मोठी होती. मुघल साम्राज्याने दीर्घ काळ दिल्लीतूनच भारतावर राज्य केलं होतं. मुख्य म्हणजे उत्तरेकडील सीमेवरची सततची बंडाळी नियंत्रित करण्यासाठी दिल्लीचं स्थान महत्त्वाचं होतं. असा रीतीने अखेर नवी दिल्ली आपली कायमची राजधानी झाली.
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.